उतरणीच्या भेटी

Submitted by anudon on 30 January, 2024 - 18:50

दुपारचं जेवण झालं. बाईंनी मागचं टेबल आवरलं, भांडी विसळून ती जागेवर लावून ठेवली. आणि त्या, “पुढचं दार लावून घ्या. मी येते संध्याकाळी येते” म्हणून गेल्या. रामरावांनी अंगणातली खुर्ची थोडसंच उन्ह अंगावर येईल अशा बेतानं ठेवली आणि सकाळच्या पेपरमधलं शब्दकोडं सोडवायला घेतलं. मन तसं निवांत होतं, कुठे जायचं नव्हतं आणि कुणी येणारही नव्हतं. मुलं परदेशात आपापल्या ठिकाणी, त्यांचे फोन आले तरी रात्री नाहीतर सकाळीच. त्यांची बायको निर्मलाला जाऊनही आता पाच वर्ष होत होती. ती गेल्यापासून त्यांचा दिनक्रम असाच असायचा. नशिबानं बाई चांगली मिळाली होती, म्हातारपणाच्या काळ्या छायेचं अस्तित्व त्यांना जाणवतं तर होतंच. आताही आपण खुप दिवस असे काही तास सुद्धा एकटे राहू शकणार नाही. २४ तासांसाठी मदत बघावी लागेल. ह्या विचाराचे काळे ढग सोबतीला असायचेच. पण रोज सकाळी उठल्यावर “आला दिवस गोड मानून साजरा करायचा आहे” असं वचन ते स्वत:ला देत असतं.
कालच त्यांच्या मित्रांकडे ते जाऊन आले होते. एक दोन कॉलेजचे तर काही ऑफिसमधले आता निवृत्त झालेले सहकारी आणि काही इतक्या वर्षांची ओळख असलेले. ह्या भेटी सुद्धा आजकाल कमी व्हायला लागल्या आहेत. प्रत्येकाच्याच काही ना काही तब्येतच्या तक्रारी सुरू असायच्या. त्यात भेटीचे ठिकाण ठरविणे, तिथे येण्या-जाण्याची व्यवस्था करणे ह्या सगळ्या बाबींचा विचार करणे कठीण होत होते. पण कोणत्याही नात्याचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, कुठल्या ना कुठल्यातरी स्वरुपात भेटीचा झरा हा आवश्यक. तसंच भेटींच्या ओढींमुळेच आणि एकटेपणावर फुंकर घालत हे त्यांचं असं मैत्र चालू राह्यलं आहे.
तर काल ते भेटले, फारा दिवसांनी. त्या भेटींतून नक्की काय सापडतं, काय मिळवायचं असतं? रामरावांच्या मांडीवर पेपर तसाच पडला होते आणि त्या हिवाळ्यातल्या दुपारी त्यांचं मन कसल्या तरी तंद्रीत वाऱ्यावर एखादं वाळकं पान विहरावं, तसं विचार त्यांच्या मनात विहरत होते.
त्या भेटींनी आपल्याला आनंद होतो की उदासीने झाकोळून जातो आपण? आयुष्याची गाडी आता शेवटच्या मुक्कामाकडे निघालीय. गाडीतल्या सहप्रवाशांची संख्या अजूनच रोडावलीय. अर्थात भेटलो की सगळेच प्रेमभावानं बोलतात, हे खरं. सगळ्यांच्या बोलण्याची पद्धतही आता परिचयाची झाली आहे. कुणी यावेळेला मागच्या वेळेपेक्षा अजूनच म्हातारा आणि पिकलेला दिसतोय, असं वाटूनही कुणी तसं बोलून दाखवत नाही. सौजन्याचा एक अलिखीत करार आपण सगळे पाळत असतो. नात्यांमधले पीळही आता सैल पडले आहेत. पूर्वीसारखे कुठल्याच मुद्द्यांवरून वादावादीची गरज आता कुणालाच वाटत नाही. सगळ्यांचं गोष्टींचे संदर्भ बदलेले आहेत. तेव्हा वर्तमानावर आरुढ होणारे आपण आता क्षणाक्षणाला बदलणाऱ्या वर्तमानाशी नाळ जोडू पाहतो आहोत.
सणासुदीला भेटलो की आणि नविन वर्षांच्या शुभेच्छाही देतो एकमेकांना पण तेव्हाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी आता इथे नसलेल्यांची आठवण दबा धरून असते. आपण बोलतो, इतर मित्रांबद्दल आणि त्यांच्या यशोगाथांबद्दल, त्यांनी मिळवलेल्या संपत्तीबद्दल. त्यांनी ती कधी मिळवली आणि त्यांनी कधी काय म्हटले होते. आपण बोलत राहतो, कधीतरी जाणवतं ज्याच्या बद्दल आपण बोलतोय तो तर कधीच पुढच्या मुक्कामाला निघूनही गेला. आणि कधीतरी कुणाबद्दल तरी बोलतांना तो गेलेला आहे असं समजून बोलल्या जातो. सगळ्याचीच सरमिसळ, भूतकाळ आणि वर्तमानकाळ, जिवंत आणि मृतांची ! सगळीच मजा.
शेवटी थट्टामस्करीत, कुणीतरी म्हणालं, “अरे आपण सगळे तरी नक्की जिवंत आहोत ना? की अर्धी भुते आहेत इथे?”
आणि त्यानंतर अचानक त्या सगळ्या चेष्टखोर गप्पांवर पसरलेली ती उदासीची सावली.
रामरावांचे डोळे आता मिटलेले असतात, आणि समोरचं दार तसंच उघडं असतं.
(Based on "The Meeting” by Henry Wadsworth Longfellow.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>रोज सकाळी उठल्यावर “आला दिवस गोड मानून साजरा करायचा आहे” असं वचन ते स्वत:ला देत असतं.
त्यांचं मन कसल्या तरी तंद्रीत वाऱ्यावर एखादं वाळकं पान विहरावं, तसं विचार त्यांच्या मनात विहरत होते.
सौजन्याचा एक अलिखीत करार आपण सगळे पाळत असतो.
सगळ्याचीच सरमिसळ, भूतकाळ आणि वर्तमानकाळ, जिवंत आणि मृतांची ! सगळीच मजा.>>>>
खूप सुंदर वाक्यरचना....
शेवट
रामरावांचे डोळे आता मिटलेले असतात, आणि समोरचं दार तसंच उघडं असतं.

एक उदासी, रुखरुख की सुटल्याचा आनंद...

खूप सुंदर लिखाण....

पुअर गाय. ही डिझर्वज अ ट्रिप टू बँकॉक. वृद्धत्व म्हणजे असला रडके पणा हे फेकून द्यायला पाहिजे. गो बुक अ टिकेट मॅन. जिस दिन मौत आएगी देखेंगे. उगीच काय एकट्याने लांब तोंडे करुन बसायचे.