आमच्या घरात माझे विचार घरातल्या चारचौंघांपेक्षा वेगळे आहेत. तसेच मला ते विचार मांडायला आणि शक्य तिथे आर्ग्युमेंट करायला आवडते. त्यामुळे घरात वादविवाद चर्चा होत राहतात.
-------------------------------
तर या शनिवारची गोष्ट. सुर्याचे पहिले किरण धरतीवर पोहोचायच्या आधीच आम्ही मस्त नहा धो के मॉर्निंग वॉल्कसाठी निघालो. आम्ही म्हणजे मी आणि माझी लेक. हे आमचे दर विकेंडचे रुटीन आहे. पोरांना घेऊन मॉर्निंग वॉकला मिनी सी शोअरला जायचे. तिथून चहा नाश्त्याला जवळच असलेल्या माझ्या सासुरवाडीला आणि पोरांच्या आजोळी फेरी मारून यायचे.
भल्या पहाटे ऊठायला अडचण येत नाही कारण बरेचदा रात्रभर जागेच असतो. त्यामुळे ईतर जनता उठायच्या आधी आम्ही घराबाहेर पडू शकतो. तसेच तिथे गेल्यावर ईतर मॉर्निंग वॉकला आलेल्या जनतेपासून वेगळे असे निर्जन निवांत जागी आम्ही फिरत राहतो. ईतर लोकं मिनी सीशोअरच्या तलावाभोवती फेरी मारत असतात, तर आम्ही खाली पायर्या उतरून तेथील खडकांवर जातो. तिथे विविध प्रकारचे पक्षी-पाणपक्षी दाणे टिपत असतात त्यांना न्याहाळणे हा आमचा छंद आहे. आणि तलावाच्या पाण्यात खडे मारणे हा आमचा खेळ आहे.
पुढच्या स्टोरीचा फिल यावा म्हणून त्या जागेचा फोटो अपलोड करतो..
तर असेच सर्व काही नेहमीप्रमाणे आणि सुरळीत चालू असताना अचानक लेकीची नजर तेथील एका खडकावर ठेवलेल्या गणपतीच्या मुर्तीवर पडली. मला म्हणाली, ब्रो, मला तशी मुर्ती हवी आहे.
ती गणपतीची मुर्ती दोन फूटाची होती. मी म्हटले घरी गेल्यावर मम्मीला सांग, ती ऑर्डर करेल.. ही माझी नकार द्यायची पद्धत आहे.
तिच्या शेजारी अजून एक चार ईंची नागाची मुर्ती होती. गणपतीला नकार देताच तिने मला मग अशी नागाची मुर्ती हवी आहे असा हट्ट धरला. मुलांचे काय, त्यांना जे दिसेल ते हवे असते.
माझ्या तोंडातून चटकन बाहेर पडले, जा ऊचल मग तीच !
तसे तिचे डोळे लकाकले...
खरंच..?? घेऊ ती?
आणि मी फसलो!
तिथे आढळणारे शंख शिंपले, रंगीबेरंगी दगडे गोळा करून घरी आणने हा देखील तिचा एक छंद आहे. ते उचलायला तिला कधी अडवले नाही. तर आता ही कोणीतरी खडकावर सोडून किंवा विसर्जन करून गेलेली मुर्ती आपण का घेऊ नये हे तिला कसे समजवावे हा प्रश्न मला पडला. कारण ती तिथून नेण्यात कोणाचे काही नुकसान नव्हते, ना ती कसली चोरी होती. ना तिला कोणी हारफुले गंध वाहलेले. कोणीतरी बस असेच ती ठेऊन गेले होते.
तर अशी ती मुर्ती किंवा तिच्या द्रुष्टीने छोटासा तो खेळण्यातील नाग उचलण्यात फारसे काही वावगे नव्हते. पण घरी गेल्यावर काय वादळ येऊ शकते याची मला कल्पना होती.
म्हणून मी तिला प्रामाणिकपणे म्हटले,
बघ परी, मला काही प्रॉब्लेम नाही. तुला माहीत आहे मी देव मानत नाही (हे तिला खरेच माहीत आहे). पण घरी मम्मीला हे आवडणार नाही. अशी देवाची विसर्जित केलेली मुर्ती घरी आणणे हे फार वाईट समजले जाते. अशी मुर्ती घरात ठेवणे मम्मा अलाऊडच करणार नाही.
पण माझे पहिले वाक्यच तिच्या डोक्यापर्यंत पोहोचले आणि पुढची वाक्ये या कानाने ऐकून त्या कानाने सोडून तिने पडत्या फळाची आज्ञा घेत चटकन मुर्ती उचलून बॅगेत ठेवली.
घरी जायच्या आधी आम्ही नेहमीच्या रुटीनप्रमाणे माझ्या सासुरवाडीला गेलो. पहिली चकमक तिथे घडली. तिने नेहमीप्रमाणे मोठ्या कौतुकाने हे बघा मी सी शोअर वरून काय आणले, ढॅन टॅं ढॅण करत ती मुर्ती दाखवली. आणि सगळ्यांचे चेहरे खरा नाग बघितल्यासारखे झाले. आता जावईबापूंना काय बोलणार म्हणत तिलाच ओरडले, आणि ताबडतोब ती मुर्ती एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायला सांगितले. मग मीच म्हटले, बरे, घरी जाताना कुठेतरी झाड बघून ठेवतो.
चहा पिऊन घरी जायला निघालो. सवयीप्रमाणे मी सांगितलेले काम विसरलो. मुर्ती विसर्जन न करताच घरी पोहोचलो. पण त्या आधीच मुर्तीची किर्ती घरी पोहोचली होती. जे सासुरवाडीला नाही घडले ते ईथे घडले. हे माझे घर होते, आणि माझी बायको या घराची सिंघम. तिने मला आडवेतिडवे झापले. मुलीला प्रेमाने समजावले. अशी एखादी वस्तू घरात आणतो तेव्हा आपल्याला तिचा ईतिहास भूगोल माहीत नसतो. ती तिथे कोणी का ठेवली आहे याची माहिती नसते. त्यामुळे त्यासोबत कशी कोणाची पनवती, साडेसाती किंवा नकारात्मक उर्जा आपण घरात आणू शकतो याचे ज्ञान तिला दिले.
यावर मी बायकोला शांतपणे ईतकेच म्हटले की हे मी तिला सांगू शकलो असतो, पण ज्या गोष्टींवर माझा स्वत:चाच विश्वास नाही ते मी तिला पटवू शकलो नसतो...
लेकीचे मन मात्र ईतक्यात भरले नव्हते. हायकोर्टात निकाल विरोधात गेला की सुप्रीम कोर्टात जावे तसे तिने माझ्या आईला फोन लावला. पण तिथे काय निकाल लागणार होता हे मला माहीत होते. सात वर्षे सक्त मजूरीची शिक्षा आजन्म कारावासात बदलणार होती.. आणि तेच झाले.
तुझ्या बापाला एक अक्कल नाही, तुला तरी समजायला हवे... - ईति आमच्या मातोश्री.
(जनरली हे वाक्य लोकांकडे उलटे म्हटले जात असावे)
तात्पर्य - केस डिसमिस झाली. दुसर्या दिवशी रविवार असल्याने "जिथे होती तिथेच" मुर्ती ठेवून या असे फर्मान निघाले. यात जराही कसूर होऊ नये म्हणून कधी नव्हे ते दस्तुरखुद्द माझी बायको सुद्धा आमच्यासोबत मॉर्निंग वॉल्कला आली. मुर्ती होती तिथे ठेवली. बायकोने मुर्तीच्या आणि मी बायकोच्या पाया पडून आम्ही निघालो.
---------------------------------
किस्सा ईथेच संपत नाही. शीर्षकातील क्रिकेटचे चेंडू अजून शिल्लक आहेत. Hence it's not over yet!
त्याच रात्री बायकोची बहिण घरी आली होती. मावशीला कौतुकाने दाखवायला म्हणून लेकीने आपला खजिना तिच्यासमोर रिता केला. हा खजिना म्हणजे जवळपास दहा बारा क्रिकेटचे चेंडू. काही रबरी चेंडू, तर काही टेनिस बॉल. आता ते लेकीकडे आले कुठून??
तर आमच्या बिल्डींगला लागूनच एका शाळेचे भले मोठे मैदान आहे. तिथे रोज संध्याकाळी आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर आजूबाजूची बरीच मुले क्रिकेट खेळत असतात. आता क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे म्हणतात. गल्ली क्रिकेट हा त्याहून मोठा अनिश्चिततेचा आणि अनपेक्षित नियमांचा खेळ आहे म्हणतात. जिथे ईंटरनॅशनल क्रिकेटमध्ये उत्तुंग फटक्यांना सहा धावा मिळतात, तिथे गल्ली क्रिकेटमध्ये कधीकधी फलंदाजाला चक्क बाद ठरवावे लागते. कारण त्याने तो चेंडू अश्या जागी पोहोचवला असतो जिथून तो कधीच परत येत नाही. किंवा परत आणने अवघड असते.
तर असेच काही षटकाररुपी चेंडू आमच्या सोसायटीत येत राहतात. जे आमच्या सोसायटीतील मुले कधीच परत करत नाही. वॉचमन सुद्धा त्यांना सामील असतो. बॉल आला की तो ठेवून घेतो. आणि आमची मुले खेळायला आली की त्यांना देतो. आता या सगळ्यात माझी लेक लीडर बनत पुढे असल्याने ते चेंडू तिच्याकडे जमा होतात. जे ती आणि तिचे मित्रमैत्रीणी स्वतः खेळायला वापरतात.
मला व्यक्तीशः हे कधीच पटले नाही. मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा सांगून पाहिले. पण त्यांचा मुद्दा असा होता की बॉल परत देऊ लागलो तर त्या पलीकडच्या मुलांना कसली भिती राहणार नाही आणि ते मोठे फटके बिनधास्त मारतील, बॉल वारंवार येऊ लागेल, जो आपल्याच मुलांना लागू शकतो.
कदाचित हा मुद्दा योग्यही असेल, तरी मला कधीच पटला नाही. याचे कारण म्हणजे माझे सारे बालपण अश्याच एका कंपाऊंडपलीकडील मैदानात खेळण्यात गेले. त्यामुळे त्या पलीकडच्या मुलांमध्ये मी स्वतःला बघतो. एक मैदान आमच्या घराच्या समोर सुद्धा आहे. बाल्कनीत बसून एका चहाच्या कपाला सोबत घेत मी तासनतास तिथल्या मुलांना खेळताना बघू शकतो. ते माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर आहे. कारण त्यावेळी मी मनाने त्यांच्यासोबत खेळत असतो. क्रिकेट रक्तातच नाही तर श्वासात आहे, त्यामुळे त्या एक चेंडूची किंमत काय असते हे मी समजू शकतो. ती पैश्यात कधीच नसते..
लहानपणी आम्ही बाहेरच्या पोरांशी क्रिकेटच्या मॅचेस खेळायचो. तेव्हा प्राईजमनी सोबत बॉल सुद्धा ठेवला जायचा. मॅचसाठी म्हणून नवीन बॉल विकत घेतला जायचा आणि जो जिंकेल त्याला तो बॉल मिळणार अशी पद्धत असायची. पैश्यापेक्षा जास्त आनंद तो बॉल जिंकल्याचा व्हायचा. पैश्याला सुद्धा किंमत याचसाठी होती की त्यात नवीन बॉल किंवा बॅट घेता यायची. कारण रोजच्या खेळाला बॉल घेता यावा म्हणून पॉकेटमनीचे खाऊचे पैसे वाचवा, चालत जाऊन बसचे पैसे वाचवा, रद्दी विका, शेजारील बंद कंपनीच्या पत्र्यावर चढून तिथले भंगार गोळा करून विका असे कैक उद्योगधंदे केले जायचे. आणि खेळताना तो बॉल कुठे अडकला तर प्रसंगी जीव घोक्यात घालून, स्टंट करून तो काढला जायचा.
संध्याकाळी अंधार पडला की खेळ थांबायचा. पण मित्रांच्या गप्पा नाही. तेव्हा हाताला चाळा म्हणून तो बॉल सोबत असायचाच. हातातल्या हातात बॉल टर्न करत राहायचे. समोरच्या भिंतीवर आपटून झेल घेत राहायचे. ऊगाचच जमिनीवर टप्पा टप्पा पाडत राहायचे. मग कोणी मागायला आले तरी हातातून सुटायचा नाही, झाल्यास दोघे मिळून कॅच कॅच खेळत राहायचे.. कारण तो फिल सतत सोबत हवा असायचा. तो केवळ एक बॉल नसायचा, तर ते एक ईमोशन होते.
अगदी रस्त्याने चालतानाही एखादा गोलाकार दगड दिसला तर त्याला उचलून हातात चेंडूसारखे खेळवायचे आणि मग बॉलिंग अॅक्शन करून टाकायचे. त्यानंतर तो दूरवर कुठेतरी घरंगळत गेल्यावर आजूबाजूच्या ईतर शेकडो दगडांकडे दुर्लक्ष करून, तिथवर चालत जाऊन पुन्हा तोच दगड आणायचा यामागेही तेच इमोशन होते. कारण त्या दोनचार मिनिटे हातात खेळवल्यानंतर त्या दगडाशी स्पर्शाचे एक नाते जुळले असायचे.
त्यामुळे असा बॉल जर कुठे हरवला, कोणी घेतला, आणि परत दिला नाही तर त्या व्यक्तीबद्दल मनात किती शिव्याशाप यायचे हे अनुभवाने माहीत होते. बॉल परत करणारे देवदूत आणि न करणारे शैतान ईतके साधेसोपे गणित होते. आणि हेच मी बायकोला आणि तिच्या बहिणीला समजावून सांगू लागलो.
कालची कोणी तरी सोडून दिलेली नागाची मुर्ती घरी आणल्यावर, कश्याला उगाच कोणाची तरी नकारात्मक उर्जा आपल्या घरात आणा म्हणून मुलीला ओरडलात..
तर आता हे चेंडू घरात आणताता त्यामागे कोणाची हाय, कोणाचे तळतळाट घरात आणत आहोत हा प्रश्न नाही का पडत तुम्हाला??
माझा बोलायचा टोन अगदी जाब विचारल्यासारखे सिरीअस होता. तरी त्यांना काय विनोदी वाटले त्यांनाच ठाऊक. सगळ्याजणी हसायला लागल्या.
कदाचित हेच त्यांच्या सोयीचे असावे. कारण माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नसावे..
तुमच्याकडे आहे का? माझ्या प्रश्नाचे ऊत्तर...
प्रतिसादात वाट बघतोय,
तोपर्यंत हा पहा तो नाग आणि हे पहा ते ढापलेले क्रिकेटचे चेंडू
- ऋन्मेऽऽष
लेख आवडला.
लेख आवडला.
धन्यवाद शर्मिला
धन्यवाद शर्मिला
सभासद, तुमचा आयडी बघून आधी
सभासद, तुमचा आयडी बघून आधी नवीन सभासद वाटलात. पण तुम्ही तर एक तपापेक्षा जास्त जुने निघालात... <<<
सभासद आयडी असली की कमीतकमी बखरीएवढी जुनी असायलाच पाहिजे..
क्या बात है! तपाहून जास्त काळ
क्या बात है! तपाहून जास्त काळ हे लक्षातच आलं नव्हतं. शाळेनंतर 'कॄष्णाजी अनंत सभासदांची' आत्ता गाठभेट होत्येय
वर्षे तर माझीही ईतकी झाली
वर्षे तर माझीही ईतकी झाली आहेत जे बघून मला धक्का बसतो.
असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. ईथे जास्त नको ताणूया
अगदीच व्हॅलीड मुद्दा आहे.
अगदीच व्हॅलीड मुद्दा आहे. पण व्हॅलीड इज नॉट इनफ किंवा इज नथिंग सुद्धा.
घरात असे मुद्दे आधी सरळपणे मांडायचो, मग खुबीने मांडणे वगैरे सुरु केले. पण "जाऊ द्या याला अक्क्ल नाही / अजुन मॅच्युरिटी आली नाही" असे निष्कर्ष परत एकदा काढले जातात आणि त्यावर एकमत होत असल्याने तेव्हा आपण विषय बदलणेच उचित असते.
मानवमामा, हो खरे आहे.
मानवमामा, हो खरे आहे.
आपली श्रद्धा आपले विचार आपल्याजवळ ठेवायचे असे ठरवले तरी एका घरात राहून ते शक्य नसते. काही प्रसंगात स्टँड घेणे गरजेचे असते तिथे नाईलाज होतोच आणि मग असे ऐकावे लागतेच..
बाई दवे,
काल संध्याकाळी व्हॉटसअप स्टेटसला त्या दिवशीचे सीशोरचे फोटो शेअर केले ज्यात एका सेल्फी मध्ये पोरगी हातात नाग घेऊन दाखवत आहे.
त्यावर दोन माबोकरांचे रिप्लाय आले, अरे हा तोच नाग का? म्हणजे तो किस्सा खराच आहे की...
फोटोशिवाय माझ्यावर विश्वास न ठेवायची परंपरा कायम आहे
खूप छान लिहिलं आहे.+१
खूप छान लिहिलं आहे.+१
छानच लिहीलंयस ऋन्म्या.
छानच लिहीलंयस ऋन्म्या.
आणि तुझा मुद्दा पटला मला.
दत्तात्रय, धनुडी धन्यवाद
दत्तात्रय, धनुडी धन्यवाद
मुद्दा पटल्याचे प्रतिसाद जास्त असल्याने आता धागा घरी दाखवायला हरकत नाही
Pages