कुलवधु

Submitted by nimita on 10 January, 2024 - 05:12

संध्यासमयीच्या विझत्या सोनेरी किरणांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. दिवसभर तळपणारे रविराजही आता श्रांत, क्लांत होऊन क्षितिजाच्या दिशेनी मार्गक्रमण करत होते. तसं पाहता हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता. या अहोरात्र चालणाऱ्या प्रवासाची त्यांना सवय होती. रोज संध्यासमयी या सृष्टीचा निरोप घेताना मनात एक ओढ असायची - दुसऱ्या दिवशी पुन्हा परतून येण्याची… आपल्या सहस्त्ररश्मी पुन्हा एकदा धरतीवर विखुरण्याची ! पण आज मात्र रविराजाचं मन जणू छिन्न-विच्छिन्न होत होतं ; आक्रंदून स्वतःलाच विचारत होतं…'आता उद्यापासून कोणासाठी परतून यायचं ? आपलं हे ओजस्वी अस्तित्व कोणाला दाखवायचं ? ज्याच्या भेटीची ओढ रोज इथे खेचून आणायची तोच आज पंचमहाभूतांत विलीन होतो आहे ! रोज ब्राह्ममुहूर्ती नदीच्या पात्रात उभा राहून; ओंजळीत पाणी घेऊन मला अर्घ्य अर्पण करण्यासाठी माझी वाट पाहणारा...माझ्या प्रथम दर्शनासाठी तिष्ठत राहणारा... बघणाऱ्यांना प्रतिसूर्य भासावा असा माझा तेजोमय, यशोमय अंश… माझा पुत्र …. 'कर्ण' … आता कधीच दिसणार नाही मला ! '
त्या संध्याकाळचा सूर्यास्त कित्येक जणांचं आयुष्य अंधारमय करून गेला. कुरुक्षेत्रावर पसरणाऱ्या काळोखाच्या काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर धगधगणारी 'ती' चिता बघणाऱ्यांच्या जीवाला चटका लावत होती. आता हळूहळू काळोख दाटून येत होता. कर्णाच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेले सर्वजण आपापल्या शिबिराच्या दिशेने निघून गेले होते.
त्या गडद होत जाणाऱ्या काळोखात अचानक एका वृक्षामगून एक स्त्री त्या चितेजवळ आली…. चोरपावलांनी…. अंगावरच्या उत्तरियाने आपला चेहेरा अजूनच झाकून घेत, आजूबाजूला कोणी नसल्याची पुनःपुन्हा खात्री करून घेत ती चितेच्या जवळ जाऊन पोचली… अनावधानाने तिचे हात जोडले गेले; ओठांतून एक अस्फुट हुंदका निघाला आणि ती स्त्री खाली वाकली….ज्या धरणीवर ती चिता धगधगत होती तिथली चिमूटभर माती तिने उचलून घेतली…. तिच्याही नकळत तिचा हात कपाळाच्या दिशेने उचलला गेला.
"थांबा… " अचानक कानांवर पडलेल्या त्या मंजुळ तरीही धीरगंभीर आवाजामुळे ती दचकली … तिच्या हातातली माती पुन्हा खालच्या मातीत जाऊन मिसळली. कपाळावरचं उत्तरीय अजून पुढे ओढून घेत तिने आवाजाच्या दिशेनी पाहिलं - समोर वृषाली उभी होती - कर्णाची जीवनसंगिनी… त्याची धर्मपत्नी 'वृषाली' ! गालांवर सुकलेल्या अश्रुंचे ओघळ अजूनही स्पष्ट दिसत होते. रणांगणात आपल्या पतीच्या मृत्यूची वार्ता समजल्यावर एका पत्नीची जी अवस्था होईल - अगदी तशीच अवस्था तिचीही झाली होती. एखाद्या भक्कम झाडाचा आधार उन्मळून पडल्यावर त्याच्यावर विसावलेल्या नाजूक वेलीसारखी - असहाय ; तरीही स्वतःला सावरत तग धरण्याचा प्रयत्न करणारी… आपलं निराधार अस्तित्व टिकवून ठेवत ; त्या परिस्थितीतही कणखरपणे उभी असलेली एका वीर योद्ध्याची वीरपत्नी - वृषाली !
"थांबा महाराणी द्रौपदी… त्या मातीला पुन्हा स्पर्शही करू नका. जशा आलात तशाच उलट्या पावली परत जा. माझे पती त्यांच्या अंतिम प्रवासासाठी निघत आहेत. आता तरी त्यांना सन्मानाने जाऊ द्या. आत्ता इथे थांबून पुन्हा त्यांचा अपमान करू नका."
वृषालीच्या तोंडून आपल्या नावाचा उल्लेख ऐकताच ती अवगुंठीत स्त्री गोंधळून गेली. चेहेऱ्यावरचे उत्तरीय बाजूला सारत तिने थरथरत्या आवाजात प्रश्न केला. "माझा चेहेराही न बघता ओळखलंस तू मला ? माझ्या इथे येण्याची पूर्वसूचना मिळाली होती का तुला ? पण मी तर कोणालाही याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता ; मग तुला ….?"
द्रौपदीच्या या प्रश्नावर थोडं हसत वृषाली म्हणाली,"आपली दोघींची आजपर्यंत एकदाही प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलंय मी…. त्यामुळे न भेटताही तुम्हाला पुरेपूर जाणलं, ओळखलं आहे . आणि म्हणूनच माझी खात्री होती की तुम्ही आत्ता इथे नक्की येणार. खरं म्हणजे मी तुमच्यासाठीच थांबले होते. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आहे … जशा आलात तशाच परत जा. इतरांना कळायच्या आत पुन्हा तुमच्या शिबिरात, तुमच्या स्वतःच्या आयुष्यात परत जा."
वृषालीचं इतकं मुद्देसूद तरीही निक्षून केलेलं विधान ऐकून द्रौपदी काही क्षण थबकली. तसं पाहता वृषालीच्या वक्तव्यात द्रौपदीला उद्देशून एकही अपशब्द नव्हता. तिने द्रौपदीचं संबोधनही आदरपूर्वक शब्दांनी केलं होतं. पण तरीही तिच्या बोलण्याचा तो सूर आणि त्यातून डोकावणारी तिरस्काराची छटा द्रौपदीला अस्वस्थ करून गेली. द्युतगृहात घडलेला प्रसंग वगळता आजपर्यंत कोणीच तिच्याशी अशा प्रकारे बोललं नव्हतं … कोणाचीही तशी प्राज्ञा नव्हती ! कारण द्रौपदी कोणी सामान्य स्त्री नव्हती - ती याज्ञसेनी होती; सामर्थ्यशाली पांडवांची पट्टराणी …. कुरुकुलाची कुलवधू होती! आणि म्हणूनच वृषालीच्या भाष्यातले साधेसरळ वाटणारे ते वाग्बाण तिच्या उद्विग्न मनावर अजूनच ओरखडे ओढून गेले.
तशा अवस्थेतही तिने स्वतःलाच समजावलं -'कर्णाच्या मृत्यूची बातमी ऐकून माझीच मनोवस्था इतकी दोलायमान झाली आहे ; वृषाली तर त्याची पत्नी आहे. तिचं संपूर्ण विश्वच उध्वस्त झालंय .अशा दुःखी मनस्थितीत कदाचित ती चुकून हे सगळं बोलून गेली असेल. तिला दोष देण्यात काय अर्थ ? '
अचानक द्रौपदीच्या मनात वृषालीबद्दल अपार प्रेम, माया दाटून आली. भावनेच्या भरात ती वृषालीच्या जवळ गेली आणि तिला धीर देण्यासाठी तिच्या दिशेनी हात पुढे केला. पण त्याच क्षणी वृषाली दोन पावलं मागे सरकली आणि द्रौपदीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत तिने प्रश्न केला ,"आत्ता यावेळी इथे येण्याचं प्रयोजन? मला जरी त्याची कल्पना असली तरी ते सत्य मला तुमच्या तोंडून ऐकायचंय."
आता मात्र द्रौपदीला वृषालीचं ते टोचून बोलणं चांगलंच झोंबलं. तिच्या मनात आलं … 'माझ्या पदाचा , माझ्या प्रतिष्ठेचा हिला पुरेपूर विसर पडलेला दिसतोय… आज जरी मी हिच्यासमोर अशा परिस्थितीत उभी असले तरी मी कुरुंची कुलवधू आहे. अशी अपमानास्पद वागणूक मला मान्य नाही.' तिच्याही नकळत तिची मान उंचावली. तिने वृषालीच्या काहीशा संतप्त चेहेऱ्यावर आपली नजर खिळवली आणि मनात शब्दांची जुळवणी करत बोलायला सुरुवात केली , " मी इथे आले आहे ती केवळ तुझ्या पतीचं अंतिम दर्शन घ्यायला…."
तिला मधेच थांबवत वृषालीने प्रश्न केला ,"या युद्धात आजपर्यंत कित्येक योद्धे धारातीर्थी पडले. त्या प्रत्येकाच्या अंतिम दर्शनासाठी गेला होतात तुम्ही ? नाही ना …? मग माझ्या पतीच्या बाबतीतच हे का आणि कसं आलं तुमच्या मनात ? तुम्ही तर कायम त्यांचा तिरस्कारच केलात… म्हणजे निदान जगाला तरी तसंच भासवलंत …"
वृषालीचं ते शेवटचं वाक्य ऐकताच द्रौपदीच्या चेहेऱ्याचा रंग उडाला. तिला क्षणभर शंका आली -' या वृषालीला दुसऱ्याच्या मनातलं जाणून घ्यायची कला तर अवगत नाही ना ?' इतका वेळ वृषालीच्या डोळ्यांत बघणारी द्रौपदी आता तिची नजर चुकवत म्हणाली, "बरोबर आहे तुझं म्हणणं…. मी प्रत्येक योध्याच्या अंत्यदर्शनासाठी नव्हते गेले. पण तरीही आज आत्ता तुझ्या पतीच्या चितेसमोर उभी आहे ; आणि तीदेखील फक्त एकाच कारणासाठी ! आज मी त्यांची क्षमा मागायला इथे आले आहे…" वृषालीच्या चेहेऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव बघत द्रौपदी घाईघाईत पुटपुटली ,"नुसती क्षमा मागायलाच नव्हे ….. तर त्यांच्या प्रति माझ्या मनात जो आदरभाव आहे...…" बोलता बोलता द्रौपदी थांबली. तिच्या चेहेऱ्यावरचा तो लाचार आणि काहीसा लाजिरवाणा भाव बघून वृषालीच्या काळजात संतापाची एक तीव्र कळ उठली. काही क्षणांसाठी ती आजूबाजूचं सर्व काही विसरली. तिला फक्त दोनच सत्यं दिसत होती ...तिच्या प्राणप्रिय पतीची धगधगणारी चिता आणि त्या दिवंगत आत्म्याकडे क्षमायाचना करणारी , त्याच्याप्रती आपला आदर व्यक्त करणारी द्रौपदी ! स्वतःच्या भावनांवर कसाबसा ताबा मिळवत तिने द्रौपदीला विचारलं,"क्षमा ? आणि तीही माझ्या पतीची ? काय हा विचित्र योगायोग ! आज एका सूतपुत्राची क्षमा मागायला क्षत्रिय कुलातील महाराणी आल्या आहेत …. आणि तेही त्याच्या मृत्यूनंतर ! नक्की कशाबद्दल आहे ही क्षमायाचना ? पदोपदी त्यांच्या केलेल्या अपमानाबद्दल ? तुमच्या स्वयंवरात उपस्थित सर्व योद्धयांमधे अंगराज कर्ण सर्वच बाबतीत श्रेष्ठ आहेत याची जाणीव असूनसुद्धा भर सभेत त्यांच्या कुलाचा उल्लेख करून त्यांना कमी लेखल्याबद्दल ? सांगा महाराणी द्रौपदी, कशासाठी आहे ही क्षमायाचना ? आणि जर क्षमा मागायचीच होती तर आधी का नाही आलात ? आत्ता हे असं त्यांच्या पश्चात येऊन त्यांच्या चितेसमोर एखादी याचना करण्यात काय अर्थ ?" वृषालीच्या प्रत्येक शब्दातून तिच्या मनाचा होणारा उद्वेग बाहेर पडत होता. राग अनावर झाल्यामुळे तिची नाजूक काया थरथरत होती. वृषालीच्या त्या आवेशपूर्ण वक्तव्यातला शब्द न् शब्द खरा होता. त्या प्रत्येक शब्दागणिक द्रौपदी ते सगळे प्रसंग पुन्हा अनुभवत होती … पण यावेळी नव्याने… वृषालीने जणू काही तिला नाण्याची दुसरी बाजू दाखवून दिली होती.
द्रौपदी आपली बाजू मांडायला सुरुवात करणार इतक्यात वृषालीला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली ,"आणि तुम्ही काय म्हणालात ? तुमच्या मनात माझ्या पतीविषयी आदरभाव आहे ? विश्वास बसत नाहीये ; पण जर खरंच तसं असेल तर … उशिरा का होईना पण त्या विश्वेश्वराने तुम्हाला सद्बुद्धी दिली म्हणायची! पण या पश्चातबुद्धी मागचं कारण कळू शकेल का मला ?"
काही क्षण तसेच निःशब्द शांततेत गेले. स्वतःचं संपूर्ण मानसिक बळ एकवटून द्रौपदीने बोलायला सुरुवात केली…"होय वृषाली, तू जे ऐकलंस ते सत्य आहे. माझ्या मनात… खरं म्हणजे फक्त माझ्याच नाही ; तर पांडव परिवारातील प्रत्येक सदस्याच्या मनात तुझ्या पतीबद्दल नितांत आदरभाव आहे. तो दानवीर होताच तसा ! आपल्या वर्तनामुळे, आपल्या निःस्वार्थी स्वभावामुळे, आपल्या दानशूर वृत्तीमुळे तो प्रत्येकासाठी आदरणीय होता….आणि यापुढेही राहील! पण मी आज इथे आले आहे ती त्यांच्या दानशूर वृत्तीचे, त्यांनी माझ्यावर केलेल्या उपकारांचे स्मरण करायला… त्यांच्या उपकारासाठी त्यांचे आभार मानायला !"
द्रौपदीच्या या कबुलीवर वृषाली काही बोलणार इतक्यात हाताच्या इशाऱ्याने तिला थांबवत द्रौपदी पुढे म्हणाली ,"त्यांनी इंद्रदेवांना आपली कवचकुंडले दान केली … या कृतीमुळे पुढे आपल्या जीवाला धोका आहे - याची पूर्ण जाणीव असताना देखील त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता इंद्रदेवांची इच्छा पूर्ण केली. त्यांच्या त्या निःस्वार्थ त्यागामुळेच आज माझे पती - धनुर्धारी अर्जुन जिवंत आहेत. माझं सौभाग्य सुरक्षित आहे. मी वेळोवेळी त्यांचा अपमान केला पण त्यांनी मात्र माझं सौभाग्य अबाधित ठेवलं….आणि म्हणूनच मला त्यांचे मनःपूर्वक आभार मानायचे आहेत."
आपली ही प्रांजळ कबुली ऐकून वृषाली काहीशी शांत होईल असा द्रौपदीचा समज होता ; पण तो गैरसमज ठरला. वृषालीच्या चेहेऱ्यावरचे संतापाचे भाव अजूनच तीव्र झाले. स्वतःच्या रागावर कसाबसा काबू मिळवत ती फणकारली,"अजूनही तुम्ही माझ्या पतीला पुरेसं ओळखलेलं नाही महाराणी ! खूप मोठ्या भ्रमात आहात तुम्ही. तुम्हाला खरंच असं वाटतंय - की माझ्या पतीने त्यांची कवचकुंडले दान केली त्यामुळे अर्जुनाला त्यांचा वध करणं शक्य झालं ? स्वतःचीच फसवणूक करून घेताय तुम्ही. ती कवचकुंडले माझ्या पतीला जन्मजात मिळाली होती. त्यात त्यांचं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नव्हतं. पण तसं पाहिलं तर माता कुंतीच्या इतर पाचही पुत्रांना देखील जन्मतःच काही ना काही दैवी शक्ती, वरदान मिळालं होतंच ना !
पण त्या पाचही बंधुंच्या शक्ती, त्यांचं सामर्थ्य एकत्र आलं तरीही ते अंगराज कर्णाचा एक केसही वाकडा करू शकणार नाहीत याची जणूकाही खात्रीच होती तुमच्या हितचिंतकांना … आणि म्हणूनच फक्त त्यांची कवचकुंडले घेऊन ते थांबले नाहीत , तर पुढे युद्धभूमीवर देखील जेव्हा माझे पती अर्जुनाला धूळ चारू लागले तेव्हा त्यांचा घात करून ; ते निशस्त्र, असहाय अवस्थेत असताना तुमच्या त्या धनुर्धारी पतीने त्यांच्यावर हल्ला केला … युद्धनीतीचे सगळे नियम डावलून तुमच्या पतीने माझ्या न्यायप्रिय, शिस्तप्रिय पतीवर आक्रमण केलं. एका क्षत्रियाच्च्या कर्तव्याची , एका योद्ध्याच्या मर्यादांची पायमल्ली केली तुमच्या पतीने…."
वृषालीचे हे आरोप ऐकून मात्र द्रौपदीलाही राग अनावर झाला. वृषालीने फक्त द्रौपदीलाच नव्हे तर तिच्या पाचही पतींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. एका नीच कुलातली एक सामान्य स्त्री आज राजवंशातल्या सन्माननीय सदस्यांना त्यांच्या कृत्यांचा जाब विचारत होती. तिला वेळीच तिची खरी जागा दाखवून देणं आवश्यक होतं. द्रौपदी थोड्या चढ्या आवाजात म्हणाली,"एका योद्ध्याची कर्तव्ये आणि त्याच्या मर्यादा याबद्द्ल तू न बोललेलंच बरं वृषाली. द्युतगृहातली तुझ्या पतीची वर्तणूक आणि त्यांनी माझ्या विषयी काढलेले ते उद्गार तुझ्यापर्यंत पोचले असतीलच ! एका असहाय अबलेची मदत करणं हे एका योद्ध्यचं कर्तव्य आहे , हो ना ? पण तुझ्या पतीने काय केलं ? त्या दुष्ट, पापी कौरवांच्या तावडीतून माझी सुटका करायची सोडून तुझा न्यायप्रिय पती एक मूक पात्र बनून माझी विटंबना बघत राहिला… इतकंच नाही तर माझ्यासारख्या शीलवान पतिव्रतेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्याने आपल्या मर्यादांचा भंग केला."
बोलताना द्रौपदीच्या डोळ्यांसमोर द्युतगृहात घडलेला तो प्रसंग अगदी जसाच्या तसा उलगडत गेला. त्या नुसत्या आठवणीनेच तिच्या डोळ्यांत संतापाचे, अपमानाचे अश्रू गर्दी करू लागले. पण वृषालीच्या पुढच्या वक्तव्यानंतर मात्र तिला आपल्या गालांवरून ओघळणाऱ्या अश्रूंचंही भान उरलं नाही.
"मर्यादा? कोणाच्या मर्यादा? कोणत्या मर्यादा, महाराणी ?" वृषालीने एकवार आपल्या पतीच्या चितेकडे घायाळ नजरेने बघितलं. काही क्षणांसाठी तिची नजर शून्यात अडकून पडली. पण मग भानावर येत तिने पुन्हा प्रश्न केला ,"सांगा ना, कोणत्या मर्यादा ? आणि सगळ्यात आधी त्या मर्यादेचा भंग कोणी केला ? तुमच्या स्वयंवरात भर सभेत तुम्ही माझ्या पतीच्या सूतकुलाचा दाखला देऊन त्यांना अपमानित केलंत. अगदी मनापासून सांगा महाराणी… ज्या क्षणी अंगराज मत्स्यभेद करण्यासाठी उठून उभे राहिले त्या क्षणी तुम्हाला कोणतीही आपत्ती नव्हती… माझ्या पतीचं ते लोभस, कवचकुंडलधारी रूप बघून लज्जेनी तुमची नजर झुकली होती… खरं आहे ना माझं हे विधान ? पण केवळ श्रीकृष्णाच्या एका इशाऱ्यावर तुम्ही माझ्या पतीला मत्स्यभेद करायला मना केलंत. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहीये… ते एक 'स्वयंवर' होतं आणि त्यामुळे तुमचा वर निवडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार होता. पण माझ्या पतीला नाकारण्यासाठी तुमच्याकडे कोणतंही सबळ कारण नसल्यामुळे तुम्ही त्यांच्या कुलाचा आधार घेतलात ; त्यांच्या सूतकुलाला कमी लेखत त्यांचा अपमान केलात. आपल्या एका सन्माननीय अतिथीचा असा भरसभेत अपमान करताना तुमची मर्यादा कुठे गेली होती ?
आणि मुख्य म्हणजे - दुसऱ्यांच्या कुलाचा उद्धार करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? . तुम्ही तर स्वतःच याज्ञसेनी आहात. केवळ एका क्षत्रिय कुलातील परिवारात तुमचं पालनपोषण झालं इतकंच ! आणि तरीही तुम्ही उच्च आणि नीच कुलांच्या गोष्टी करता ?"
वृषालीच्या या विधानामागचं कटू सत्य द्रौपदीच्या जिव्हारी लागलं. पण आता वृषालीला थांबवणं अशक्य होतं. ती घडाघडा बोलत होती…. इतक्या वर्षांपासून मनात साठलेल्या संमिश्र भावनांना जणूकाही आज वाचा फुटली होती. एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली , "इंद्रप्रस्थाच्या मयसभेत जेव्हा तुम्ही गवाक्षातून माझ्या पतीला बघितलंत तेव्हाची तुमच्या मनाची अवस्था विसरलात ? एक विवाहित स्त्री असूनही माझ्या पतीचं अलौकिक पौरुष बघून तुमच्या मनात नेमके कोणते भाव जागे झाले होते त्याचं जरा स्मरण करा ! असे भाव की ज्यांमुळे तुमच्या गाली लज्जेचे गुलाब फुलले. तुमची नजर झुकली. पण तुम्ही नुसता विचार करून थांबला नाहीत ; तर तो विचार आपल्या सखीलाही सांगितलात. आठवतायत का तुम्हाला तुमचे ते शब्द ? नसतील आठवत तर मी आठवण करून देते…. 'जर हा पुरुषश्रेष्ठ मला पती म्हणून लाभला असता तर… सहा पतींमधे बारा महिन्यांची समसमान वाटणी झाली असती….' हे असंच काहीसं म्हणाला होतात ना तुम्ही ? मग आता मला सांगा महाराणी द्रौपदी…. एक विवाहित स्त्री असूनही एका परपुरुषाबद्दल असा विचार करताना तुमची मर्यादा कुठे गेली होती ?"
वृषालीचा हा गौप्यस्फोट ऐकून द्रौपदी मुळापासून हादरली. तिच्या चेहेऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य, भीती, लज्जा, संभ्रम असे अनेकविध भाव तरळून गेले. तिच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघून वृषाली कुत्सित हसत म्हणाली, "तुमचं हे गुपित मला कसं माहीत - याचं आश्चर्य वाटतंय ना तुम्हाला? मलाच काय पण ही गोष्ट माझ्या पतीला सुद्धा ज्ञात होती ! पण तरीही त्यांनी या गोष्टीचा कधीच गैरफायदा घेतला नाही. कारण त्यांना त्यांच्या आणि त्याहीपेक्षा जास्त तुमच्या मर्यादांची जाणीव होती. इतकं सगळं कळल्यानंतरही तुम्हाला वाटतंय का - की माझ्या पतीने मर्यादाभंग केला ?"
वृषालीचा हा प्रश्न द्रौपदीला अंतर्मुख करून गेला...पण काही क्षणांतच तिचा अभिमान पुन्हा उफाळून आला. तिने वृषालीला उलटप्रश्न केला ,"जर त्यांना माझ्या मर्यादांची इतकी जाणीव होती तर द्युतगृहात माझ्या अब्रूची लक्तरं निघत असताना माझ्या मदतीला का नाही आले तुझे पती ?"
आता मात्र वृषाली विषण्ण हसली. द्रौपदीच्या चेहेऱ्यावर आपली नजर खिळवत म्हणाली," तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देखील माहीत आहे महाराणी. फक्त ते कबूल करण्याचं धैर्य नाहीये तुमच्याकडे. कृपा करून एकदा त्या दिवशी घडलेल्या घटना आठवून बघा. जेव्हा दुःशासन तुमच्या दिशेने येत होता तेव्हा तुम्ही सभेत उपस्थित असलेल्या प्रत्येक पुरुषासमोर हात जोडून उभ्या राहिलात, प्रत्येकाकडे मदतीची याचना केलीत - अगदी जीवाच्या आकांताने ! पण तुमची मदत करणं तर सोडाच… त्यांच्यापैकी एकानेही नजर उंचावून तुमच्याकडे बघितलंही नाही. त्यावेळी केवळ माझे पती त्यांच्या आसनावरून उठून पुढे सरसावले होते…. एका योद्धयाप्रमाणे - एक हात आपल्या खड्गावर ठेवून, समोर घडणाऱ्या अघटिताला रोखण्यासाठी तत्पर ! पण तुम्ही ? तुम्ही काय केलंत? सभेतल्या प्रत्येकासमोर हात जोडलेत, दयेची भीक मगितलीत. पण माझ्या पतीसमोर आलात तेव्हा मात्र गप्प राहिलात ? का ? त्यांच्याकडे मदतीची याचना करायची लाज वाटली म्हणून? पण लाज तरी का आणि कशाची वाटावी ? एका क्षत्रिय स्त्रीला एका सूतपुत्राकडे मदतीची याचना करावी लागेल याची लाज ? का भूतकाळात तुम्ही ज्याचा वेळोवेळी अपमान केलात ; तोच योद्धा इतक्या अपमानानंतरही खड्ग सरसावून तुम्हाला वाचवायला एकटा उभा आहे- हे बघून स्वतःचीच लाज ? सांगा महाराणी , का गप्प राहिलात तुम्ही ?"
वृषालीच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे द्रौपदी निरुत्तर झाली होती ; काहीशी अंतर्मुख होऊन आपल्याच मनाला, भावनांना पडताळून पहात होती. पण वृषालीच्या आक्षेपांना थोपवून धरेल असं एकही सबळ कारण तिला सापडत नव्हतं. शेवटी नाईलाजाने तिने शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. उसन्या आवेशाने ती उत्तरली ,"त्यावेळी माझ्या मनाची स्थिती काय होती याची तुला तिळमात्रही कल्पना नाहीये वृषाली. त्या क्षणी मी द्यूतात हरलेली एक दासी होते - एक असहाय अबला …"
तिचं वाक्य मधेच तोडत वृषाली उद्गारली ,"तुम्हाला खरंच असं वाटतंय ? खरंच तुम्ही स्वतःला असहाय समजता ? …अबला मानता? महाराणी, तुमच्या या नाजूक शरीरात एखाद्या पुरुषाचा प्रतिकार करायची शक्ती नसेलही कदाचित ; पण तुमच्या वाणीत अपार शक्ती आहे - विनाशकारी शक्ती ! समोरच्या व्यक्तीला आपल्या शाब्दिक बाणांनी छिन्नविच्छिन्न करून त्या व्यक्तीचा अभिमान, त्याची मनःशांती भंग करण्याचं सामर्थ्य आहे तुमच्या वाणीत….. एका सर्वश्रेष्ठ योद्धयाला त्याच्या युद्धकौशल्याच्या तराजूत तोलायचं सोडून केवळ त्याच्या कुलावरून त्याच्या शौर्याचं मूल्यमापन करणं - हेच का तुमचं 'असहाय' असणं?
महाराज धृतराष्ट्र सारख्या वयोवृद्ध कुरुश्रेष्ठांच्या शारीरिक व्यंगाचा उल्लेख करून त्यांचा आणि युवराज दुर्योधनाचा अपमान करणं - हेच का तुमचं 'अबला' असणं ? सांगा महाराणी… खरंच तुम्ही असहाय अबला नारी आहात ?"
आता मात्र द्रौपदी निःशब्द झाली होती. उभ्या जागी खिळून ती अगतिकपणे वृषालीचं सगळं बोलणं ऐकून घेत होती. आता वृषालीलाही स्वतःच्या भावनांचा आवेग अनावर झाला होता. तिच्या मनात साठलेलं विचारांचं मळभ तिच्या प्रत्येक शब्दागणिक दूर होत होतं. वर्षानुवर्षे आपल्या पतीला झालेला मानसिक त्रास, वारंवार त्याच्या कुलावरून झालेली त्याची हेटाळणी, आणि शेवटी त्याच्या जन्माचं सत्य समजल्यानंतर त्याची झालेली भावनिक ओढाताण… सगळं सगळं आठवत होतं तिला. आणि तोच सगळा राग, तो मनःस्ताप आता शब्दांचं रूप घेऊन बाहेर पडत होता.
द्रौपदीच्या दिशेनी येत वृषाली म्हणाली," खरं सांगू महाराणी ? आज मला तुमची कीव येते आहे. भलेही तुमचे पाचही पती या युद्धात विजयी ठरत असतील… पण आत्ता - या क्षणी त्या दिग्विजयी वीरांची पट्टराणी एका पराभूत योद्ध्याच्या चितेपाशी उभी आहे…. त्याचं अंतिम दर्शन घ्यायला….त्याच्याकडे क्षमेचं दान मागायला ! किती विचित्र योगायोग आहे नाही ? म्हणजे बघा ना - तुमच्या विजयी पतींच्या नावाचं….त्यांच्या सौभाग्याचं लेणं ज्या कपाळावर लावायचं तिथे त्यांच्या शत्रूच्या चितेची राख लावायला आला आहात तुम्ही….. आणि तेही अशा चोरपावलांनी ! तुमच्या या एका कृत्यामुळे आज ते दिग्विजयी पांडव पराभूत झाले आणि माझ्या दिवंगत पतीचा विजय झाला. आणि म्हणूनच मला तुमची दया येते आहे. आज एक विधवा होऊनही मी भाग्यशाली ठरले आणि तुमचं सौभाग्य अबाधित असूनही तुम्ही मात्र अभागी ठरलात ! आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट विसरताय तुम्ही ….
गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींतून अजून एक सत्य जगासमोर आलंय - माझ्या पतीच्या जन्माचं सत्य ! आयुष्यभर ज्याला सगळे सूतपुत्र समजत होते तो 'कर्ण' हा कुंतीमातेचा ज्येष्ठ पुत्र आहे - हे सत्य ! आणि म्हणूनच त्या नात्याने आता मी - कर्णाची प्रथमपत्नी - कुरुकुलाची ज्येष्ठ कुलवधू आहे ."
वृषालीचे हे बोल कानांवर पडताच द्रौपदीने चमकून तिच्या दिशेने बघितलं. आत्तापर्यंत हे सत्य तिच्या लक्षातच नव्हतं आलं. अचानक तिच्या डोळ्यांत संभ्रमाची, भीतीची छटा तरळून गेली. वृषालीच्या ओठांवर एक मंद स्मित झळकलं.. जणू काही द्रौपदीची ही प्रतिक्रिया तिला अपेक्षितच होती. ती शांत स्वरांत म्हणाली, "ऐकून धक्का बसला ना तुम्हाला ? कदाचित एक असुरक्षिततेची भावना देखील डोकावली असेल मनात. या नव्या नात्यांच्या समीकरणात आता मी नक्की कशी वागेन… तुमच्यावर सूड उगवेन की काय… ही भीतीयुक्त शंकाही वाटत असेल ? पण काळजी करू नका. . मी जरी कुरुकुलाची ज्येष्ठ वधू असले तरीही या साम्राज्ञाची महाराणी तुम्हीच आहात. खरं सांगायचं तर मला या कुरुकुलाची कुलवधू म्हणवून घेण्यातही काहीच स्वारस्य नाहीये .. कधीच नव्हतं !
असो, या सगळ्याचा उहापोह करण्यात आता काहीच अर्थ उरलेला नाही. त्यामुळे आपण आत्ताच्या इथल्या परिस्थितीचा विचार करू या. तुम्ही आत्ता माझ्या पतीकडे क्षमायाचना करण्यासाठी आला आहात. ,पण दुर्दैवाने त्या क्षमेचं दान तुमच्या पदरात घालण्यासाठी माझे पती हयात नाहीत. पण काळजी करू नका. आजपर्यंत दानवीर कर्णाच्या समोरून कोणीच रिकाम्या हाती परत गेलेले नाही. तुम्हाला देखील योग्य ते दान मिळेल. त्या दानवीराची ही पत्नी अजून जिवंत आहे. मी देईन तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार दान! मी त्यांच्या वतीने तुम्हाला क्षमा नाही करू शकणार ! कारण एक तर माझं मन तितकं मोठं नाही आणि दुसरं कारण म्हणजे माझ्या लेखी तुमची तेवढी पात्रता नाही. पण आज मी राधेयपत्नी, कर्णप्रिया वृषाली - माझा हा ज्येष्ठत्वाचा मान आणि त्याद्वारे मला मिळालेलं माझं कुलवधूचं पद तुम्हाला दान करते. आजपासून या कुरुकुलाची कुलवधू म्हणून सदैव तुमचंच नाव घेतलं जाईल !..... आता मला आज्ञा द्या कुलवधू द्रौपदी…. माझे पती माझ्यासाठी खोळंबले असतील. आमच्या सहप्रवासाची घटिका आता जवळ येऊन ठेपली आहे. येते मी."
वृषालीच्या अखेरच्या वक्तव्याचा अर्थ द्रौपदीच्या लक्षात येइपर्यंत वृषालीने समोर धगधगणाऱ्या आपल्या पतीच्या चितेत सहर्ष मुद्रेनी प्रवेश केला देखील !
तिने दिलेलं ते अनमोल दान पेलणं अशक्य झाल्यामुळे की काय...पण द्रौपदी उभ्या जागी धरतीवर कोसळली.
दूर कुठूनतरी एका मंजुळ बासरीचे धीरगंभीर स्वर संपूर्ण आसमंतात घुमत होते.

समाप्त

लेखिकेचे मनोगत : ही कथा जरी पौराणिक संदर्भांवर आधारित असली तरी कथाबीज आणि कथाविस्तार हा पूर्णपणे लेखिकेचा कल्पनाविलास आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकून एक कथा दोन वेळा पोस्ट झाली. पण रिपीट झालेलं लिखाण delete करता येत नाहीये. कृपया याबाबत कोणी मार्गदर्शन करेल का ?

धन्यवाद सामो. अमेरिकेहून प्रसिध्द होणाऱ्या एका दिवाळी अंकाच्या स्पर्धेसाठी लिहिली होती. त्या स्पर्धेत माझ्या या कथेला पारितोषिक मिळालं आहे. Happy _/\_

पूर्णपणे लेखिकेचा कल्पनाविलास आहे - अस लिहिल कि. काय वाट्टेल ते लिहायचा आधिकार मिळतो का?
एक म्रूत्युंजय ही़ कादंबरी सोडली तर. कर्ण हे आतिशय नीच व्यक्तिमतव आहे माहाभारतात.
द्रौपदी चा नीट आभ्यास करा. द्यूत प्रसन्गी सगळ्या पात्रांच वागण नीट समजून घ्या.
माहाभारतात ल्या स्त्री पात्रांचा नीट आभ्यास करा, असल काहि कल्पनाविलास म्हणून लिहिण्या पूर्वी.

>>>>>काय वाट्टेल ते लिहायचा आधिकार मिळतो का?
तुम्हाला वाट्टेल ते वाटते ते अन्य कोणाला रोचक वाटू शकते.
>>>>>कर्ण हे आतिशय नीच व्यक्तिमतव आहे माहाभारतात.
हे पात्रही कोण्या पूर्वग्रह असलेल्या व्यक्तीनेच, हाडामासाच्या व्यक्तीनेच रंगविलेले असेल ना? मग ते १००% बरोबर आहेत असे कसे म्हणता येईल? शिवाय संपूर्ण काळे- संपूर्ण पांढरे असे फार कमी असते. करड्याच छटा आढळतात.
>>>>>>माहाभारतात ल्या स्त्री पात्रांचा नीट आभ्यास करा, असल काहि कल्पनाविलास म्हणून लिहिण्या पूर्वी.
कल्पनाविलास आहे हा. तसाच वाचावा.

हे पात्रही कोण्या पूर्वग्रह असलेल्या व्यक्तीनेच, हाडामासाच्या व्यक्तीनेच रंगविलेले असेल ना? मग ते १००% बरोबर आहेत असे कसे म्हणता येईल? >> We are talking about Vyaas here.
Seriously- Study a little more.

तुम्हाला वाट्टेल ते वाटते ते अन्य कोणाला रोचक वाटू शकते. >>हे रोचक द्रौपदी चा किती आपमान करणारे आहे याची अजिबात कल्पना येत नाही क?

व्यास मुनी आभाळातून पडले होते का? त्यांनी निर्माणच केलेले आहे ना हे पात्र? बाकी व्यासांची तुम्ही व्यक्तीपूजा करत असाल तर तो तुमचा हक्क आहे , दॄष्टीकोन आहे. माझा नाही.
यापुढे मला वाद घालण्यात रस नाही. कारण एकदा व्यक्तीचे उदोउदो सुरू झाले की मग ती व्यक्ती (ऋषी मुनी का असेना) परफेक्ट आणि अजिंक्य (इन्व्हिन्सिबल) ठरते व तर्क खुंटतो.
चालू द्या.

छान लिहिलेय, आवडले. द्रौपदीच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर दिले..

व्यास मुनी आभाळातून पडले होते क?? >>>
सामो - नमस्कार. तुम्ही महान आहात.

mrutynjay is the intellectual limit here. actually trying to read /understand/study Mahabharat is beyond capacity so one should not expect better.

हे म्हणजे महाभारतकालीन 'पती पत्नी और वो' सारखं झालं.‌
प्राणप्रिय पतीच्या किंवा छुप्या क्रशच्या अंत्यसंस्काराचं गांभीर्य लक्षात घेऊन लांबलचक भाषणं टाळली असती दोघींनीपण, तर बरं झालं असतं.‌ पण हे असं होतंच म्हणजे.‌ इलाज नाही.
त्यातल्या त्यात नशीब एवढंच की, अशा केसेसमध्ये घटनास्थळावरच एकमेकींच्या झिंज्या वगैरे पकडायची वेळ येते, तशी इथं आली नाही.‌

बाकी, सावंत, देसाई, क्षेत्रमाडे वगैरेंच्या पौराणिक/ऐतिहासिक पात्रांवरील कादंबऱ्याच्या भाषेमध्ये एक उत्कृष्ट कृत्रिमता दिसते, जी आज वाचायची म्हटलं तर मी पहिल्याच पानात ढेर होतो.

पण, हे सहर्ष मुद्रेने चितेत प्रवेश करणं, भक्कम झाडाचा आधार उन्मळून पडल्यावर त्याच्यावर विसावलेल्या नाजूक वेलीसारखी - असहाय असणं, हे समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.‌

मित्र असावा कर्णा सारखा… असे म्हणतात…
नीच वगैरे पहिल्यांदा ऐकले कर्णा बद्धल.. ऐकायला आवडेल असे काय कारण आहे…

मित्र असावा कर्णा सारखा… असे म्हणतात…
नीच वगैरे पहिल्यांदा ऐकले कर्णा बद्धल.. ऐकायला आवडेल असे काय कारण आहे…

मला एवढ मराठी टायपिंग जमत नाही. सांगता येइल पण तेवढ ळलिहायला खूपच वेळ लागेल. पण अस दिसतय की मूळं महाभारत कोणीच वाचत नाही.
खरच कर्णा बद्धल सम्जून घेण्याची इच्चा असेल तर I will recommend Amy Ganatra's video about analysis on Mahabharat on you tube. she has discussed Karna and his behavior in every occurrence and situation.
She has done her PhD and has studied the original scriptures of Ramayana and Mahabharat. I have read the original texts by Vedavyas and Walmiki ramayan. and I found her analysis very good.

काल्पनिक आहे ते ठीक आहे हो पण पांचाली आणि वृषाली ला पार एकता कपूर/करण जोहर/भन्साळी च्या नायिका करून टाकलं की.आणि सतीचं ग्लोरिफिकेशन नका करू हो.सहर्ष मुद्रेने कशाला कोण चितेत जाईल. भयंकर आहे हे. याला पारितोषिक भेटलेलं? अमेरिकेत ते पण? कोणत्या शहरात/राज्यात?

>>>>>आणि सतीचं ग्लोरिफिकेशन नका करू हो.सहर्ष मुद्रेने कशाला कोण चितेत जाईल.
धिस वॉज द एलिफंट इन द रुम दॅट वॉज मिस्ड Sad व्हाइटहॅट तुमच्या या पॉइन्टला १००% सहमती आहे.

फारच आवडली. पुढे फॉरवर्ड केली तर चालेल का ?
शिरीन, महाभारतातलं कुठलंच पात्र एकदम नीच किंवा ग्रेट नाही आहे. प्रत्येकाच्या नजरेचा फरक आहे. जे पात्र तुम्हाला ग्रेट वाटतंय ते मला नीच वाटू शकतं. कर्ण तुम्हाला नीच वाटत असेल , मला ग्रेट वाटतो.
मला असं वाटतं तुम्ही एकदम उद्विग्न न होता तुमचे पाँईट मांडा पण तुमच्या विरुद्ध मत असलेले किती बावळट आहेत अशा टोन तुमच्या पोस्ट मधे दिसतो आहे तो प्लिज बदला आणि शांतपणे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते लिहा. मला तुमचा दृष्टिकोन वाचायला आवडेल.

प्रत्येक व्यक्तीला आपल मत, आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण केवळ आपलंच मत आणि आपलेच विचार योग्य, बरोबर आहेत आणि इतर सर्व चूक आहेत ही विचारधारा मला पटत नाही. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून कितीही समर्थन केलं तरी त्याचं रूपांतर शेवटी वादविवादात होतं. त्यामुळे मी माझ्या लेखनाचं समर्थन, justification देत बसणार नाही. तुम्ही सर्वांनी वेळ काढून माझी कथा वाचलीत आणि त्यावर विचार करायला प्रवृत्त झालात , तुमचे विचार इथे मांडलेत त्याबद्दल सर्वांचे आभार

चांगलं लिहिलंय.मध्ये मध्ये राधेय ची आठवण आली(फक्त भाषेमुळे, त्यावरून तुम्ही घेतलंय असं म्हणत नाहीये).बक्षीसाबद्दल अभिनंदन.
महाभारतातल्या प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून पुस्तकं लिहून लेखकांनी लायब्ररीची शेल्फ भरली आहेत.मुळात महाभारत हीच मानवी सूडबुद्धी, इच्छा, वासना,सत्तेची भूक असलेल्या पात्रांची कॉर्पोरेट इगो संघर्षाची गोष्ट आहे प्रत्येक पात्राचा आपला असा, स्वतःला बरोबर वाटणारा दृष्टिकोन असणं साहजिक आहे.

प्रत्येक व्यक्तीला आपल मत, आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण केवळ आपलंच मत आणि आपलेच विचार योग्य, बरोबर आहेत आणि इतर सर्व चूक आहेत ही विचारधारा मला पटत नाही.>>>
निमिता- महाभारता बद्दल लिहिताना, किमान महाभारताचा थोडा तरी अभ्यास करा. कादंबर्या वाचून. द्रौपदी. सारख्या तेजस्वी स्र्त्री बद्दल इतक हलक लिहू नका.

माझ्या पतीच्या जन्माचं सत्य ! आयुष्यभर ज्याला सगळे सूतपुत्र समजत होते तो 'कर्ण' हा कुंतीमातेचा ज्येष्ठ पुत्र आहे - हे सत्य ! आणि म्हणूनच त्या नात्याने आता मी - कर्णाची प्रथमपत्नी - कुरुकुलाची ज्येष्ठ कुलवधू आहे .">>> हे काय आहे? ़कर्ण कुन्ती चा मुलगा होता, विवाहा पूर्वीचा.
त्याचा कुरुं च्या घराण्याशी काहिच सम्बन्ध नाही. think about it. even if the secret came out there was no claim of him being a Kuru.

युद्ध संपल्यानंतर कर्णाला नीच म्हणवल्या गेले आणि ह्याला थोर म्हणवल्या गेले:

1) ज्याने भावाभावात भांडणे लवून रक्तपात घडवला
2) ज्याने एका विवाहित स्त्रीला गर्लफ्रेंड बनवले आणि नंतर तिला सोडून दिले
3) ज्याने एका व्यक्तीची केवळ अपशब्द बोलला म्हणून निरघुणपणे हत्या केली
4) जो लहानपणापासुनच पतालयांत्रि, कपटी, कारस्थानी खोटेच बोलणरा होता
5) ज्याने लढाईत मूळच्या स्थानिक राजना ठार मारून त्यांच्या हजारो स्त्रिया आणुन बंदिवान केल्या आणि लग्न केले म्हणून संगितले जगाला
6) युद्ध हरत आहे असे दिसल्यावर रडीचा डाव खेळला आणि युद्धाचे नियम मोडून शत्रूवर हल्ला करून ठार मारले

शिरीन,
कुरु कोणाला म्हणायचं याची व्याख्या बरीच लिबरल होती त्या काळात. पंडु धृतराष्ट्र हे व्यासांचे मुलगे. व्यास हा एका ऋषीचा मुलगा. सो जेनेटिकली पंडुचा OG कुरु म्हणजे शंतनूरावांशी काही संबंध नव्हता. देवव्रत भीष्म हा last biological kuru म्हणता येईल.
आणि पांडवांचा पंडुशी biological संबंध नव्हता. त्यामुळे इतर कुंती पुत्रांसारखाच करण पण कुरु होऊ शकला असता. आमच्या बाजूला ये, लहरी युधिष्ठिरला बाजूला करून तुला राजा करतो अशी ऑफर कृष्णाने दिलेली होती.
ही एक लिबरल बाजू म्हणता येईल महाभारताची. कुंती सत्यवती द्रौपदी all had kids officially from more than one man. नंतरच्या काळात असं उदाहरण सापडत नाही.

मध्यंतरी काका विधाते या लेखकाची दुर्योधन कादंबरी मोठ्या उत्सुकतेने वाचायला घेतली होती , थोडं वाचल्यानंतर ते लिखाण असह्य होऊन बाजूला ठेऊन दिलं , तसंच हेही फास्ट फॉरवर्ड करत नजर फिरवत वाचलं . शिवाजी सावंतांनी किती ग्रेट कलाकृती निर्माण केली हे लक्षात येण्यासाठी अधूनमधून असलं नजरेखालून जायला हरकत नाही . कुठल्याही पात्राचं हीन चित्रण न करता महाभारताची कथा मांडणं हे शिवधनुष्य आहे , प्रत्येकाला ते पेलवेलच असं नाही .

लेखिकेला इतर विषयांवरील नवनवीन लेखनासाठी शुभेच्छा .

Pages