
नमस्कार !
नववर्षातील पहिला लेख सादर करताना आनंद होत आहे.
सन 2020मध्ये ‘सुखी झोपेचा साथी’ हा लेख इथे लिहिला होता (https://www.maayboli.com/node/73074). त्यामध्ये फक्त मेलाटोनिन या झोपेशी संबंधित एकाच हॉर्मोनचा विचार केलेला होता. त्या धाग्यावरील चर्चेदरम्यान वाचकांनी सूचना केली की, झोपेची एकंदरीत प्रक्रिया या विषयावर सविस्तर लेखन करावे. या चांगल्या सूचनेचा विचार करून हा लेख लिहीतोय. यामध्ये आपण झोपेची आवश्यकता, तिच्या दरम्यान होणारे शारीरिक बदल, तिचे शास्त्रीय प्रकार, तिचा वयाशी संबंध आणि झोप-जाग चक्र या मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत.
झोप कशासाठी ?
रोजची झोप हा माणसाच्या जीवनातील अत्यावश्यक भाग आहे. दमलेल्या शरीराला दैनंदिन विश्रांती देणे हा त्याचा मुख्य हेतू. आपल्या जागृत अवस्थेतून झोपेत गेल्यानंतर आपली इच्छाशक्ती काही काळासाठी स्थगित होते. जीवनातल्या छोट्या मोठ्या त्रासदायक गोष्टींपासून काही काळ तरी आपली सुटका होते. झोपेत आपण स्वप्नांच्या राज्यात अगदी मनमुराद विहार करतो. तसं पाहायला गेलं तर आपल्या झोपेवर आपले निस्सीम प्रेम असते. उगाच नाही आपण आपले एक तृतीयांश आयुष्य झोपेसाठी राखून ठेवत ! झोप ही जरी विश्रांतीची अवस्था असली तरी त्या त्या काळात मेंदू जागृतावस्थेइतकीच ऊर्जा वापरत असतो हा मुद्दा महत्त्वाचा.
झोपेला प्रवृत्त करणारे घटक
मेंदूला सतत पोचणाऱ्या संवेदना कमी होणे हे झोप येण्यासाठी आवश्यक असते. त्या दृष्टीने खोलीतील अंधार, शांतता आणि सुखकर बिछाना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या उलट जेव्हा मन चिंताग्रस्त असते किंवा काही कारणांनी मनात भावनांचा अतिरेक झालेला असतो तेव्हा शरीरात एपिनेफ्रीन या हार्मोनचा प्रभाव राहतो आणि त्यामुळे मेंदू जागृत ठेवला जातो. हा अर्थातच झोप येण्यातील मोठा अडथळा ठरतो. इथे एक मुद्दा रोचक आहे. जेव्हा अतिशय श्रमाने माणूस खूप दमलेला असतो तेव्हा झोपेला पोषक असणारे आजूबाजूचे वातावरण नसले तरी देखील तो शांत झोपू शकतो.
शरीरक्रियेतील महत्त्वाचे बदल
1. हृदयगती रक्तदाब आणि श्वसनगती कमी होतात
2. स्नायू शिथिल पडतात
3. शरीरातील विविध स्राव कमी होतात पण काहींच्या बाबतीत जठरस्राव वाढू शकतो.
झोपेचा कालावधी
दैनंदिन जीवनात जाग-झोप असे एक जैविक चक्र कार्यरत असते. प्रौढ व्यक्तीत साधारणपणे १६ तास जागृतावस्था आणि ८ तास झोप असे ते चक्र आहे. झोपेच्या एकूण कालावधीत आपण दोन प्रकारची झोप घेतो :
. 80 टक्के झोप : शांत किंवा मंदतरंग स्वरूपाची असते
. 20 टक्के झोप : ही काहीशी ‘खळबळजनक’ असते तिला विरोधाभासी झोप असेही म्हणतात. आता हे दोन प्रकार विस्ताराने पाहू.
१. मंदतरंग झोप : या झोपेचे साधारण तीन टप्पे असतात : हलकी , मध्यम आणि गाढ.
पहिल्या टप्प्यात शरीराचे स्नायू शिथिल पडू लागतात. डोळ्यांच्या गोल गोल फिरल्यासारख्या सौम्य हालचाली होत राहतात. या टप्प्यात बाह्य आवाज किंवा हालचाल यामुळे संबंधित व्यक्ती झोपेतून सहज उठण्याची शक्यता राहते. हा टप्पा पार पडल्यानंतर खरी झोप सुरू होते आणि हळूहळू ती गाढ स्वरूपाची होते. त्या टप्प्यात मात्र झोपलेल्या व्यक्तीला उठवायचे असल्यास मोठे आवाज किंवा गदागदा हलवणे या गोष्टींची गरज भासते.
या प्रकारच्या झोपेत डोळे बऱ्यापैकी स्थिर आणि शांत राहतात. म्हणूनच तिला ‘नॉन रॅपिड आय मुव्हमेंट (NREM)’ या प्रकारची झोप म्हणतात. या झोपेत मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून ग्रोथ हॉर्मोन आणि gonadotropins ही हॉर्मोन्स टप्प्याटप्प्याने स्रवतात. तसेच शरीराला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळून त्याचा चयापचय पुनर्स्थापित होतो (restoration). तान्ह्या मुलांच्या बाबतीत या झोपेचा त्यांच्या शारीरिक वाढीशी बऱ्यापैकी संबंध आहे.
ˌही झोप साधारण एक तास पूर्ण झाल्यानंतर तिच्यातून बाहेर येण्याची उलटी प्रक्रिया चालू होते. म्हणजेच,
गाढ >> मध्यम >> हलकी
अशी प्रक्रिया पूर्ण झाली की आता झोपेचा पुढे वर्णन केलेला दुसरा प्रकार चालू होतो.
२. ‘खळबळजनक’ झोप : या प्रकारात डोळ्यांच्या हिसके मारल्यागत वेगवान हालचाली ही महत्त्वाची घटना असते. आपले डोळे अक्षरशः एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे झपाझप हलत राहतात. त्यांच्या हालचालींनी ते जणू काही एखादे संपूर्ण दृश्य त्यांच्या पूर्ण आवाक्यात आणू पाहतात. या वैशिष्ट्यपूर्ण घटनेमुळेच या प्रकारच्या झोपेला ‘रॅपिड आय मुव्हमेंट (REM) प्रकारची झोप असे म्हणतात.
डोळ्यांचा अपवाद वगळता शरीराचे इतर स्नायू मात्र आता कमालीचे शिथिल होतात. जेव्हा जीभ शिथिल पडते तेव्हा ती श्वसनमार्गात अंशतः अडथळा आणते. त्यातूनच घोरण्याचा उगम होतो ! जेव्हा एखादी व्यक्ती पाठ टेकून (supine) झोपलेली असते तेव्हा या प्रकारचा अडथळा सर्वाधिक असतो.
झोपेच्या या स्थितीतून एखाद्याला उठवायला खूपच कष्ट पडतात; त्यातून जर काहीजण कुंभकर्ण असतील तर मग काय विचारायलाच नको ! अर्थातच झोपमोड झाल्याची त्रस्तता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसून येते. अशा झोपेतून उठल्या किंवा उठवल्यानंतर सुमारे 90% लोक त्यांना स्वप्न पडल्याचे सांगतात. स्वप्नरंजन हा या प्रकारातील अर्थातच विशेष भाग. स्वप्नांच्या संदर्भात विज्ञानात जे अभ्यास झाले आहेत त्यातले बरेचसे ‘गृहीतक’ या स्वरूपाचे आहेत.
एखादी व्यक्ती या झोपेत असताना दर जर तिच्या मेंदूचा विद्युत आलेख (EEG) काढला तर तो जागे असतानाच्या अवस्थेसारखाच असतो. या वैशिष्ट्यपूर्ण विरोधाभासामुळेच झोपेच्या या प्रकाराला विरोधाभासी (paradoxical) झोप असेही म्हटले जाते.
या झोपेची अन्य वैशिष्ट्येही महत्त्वाची आहेत. तिच्यात आपल्या नाडीचे ठोके, श्वसनगती आणि रक्तदाब अनियमित होतात. लिंग (किंवा शिश्निकेची ताठरता) आणि स्नायूंचे बारीक झटके येऊ शकतात. मुलांमध्ये दात खाणे बऱ्यापैकी दिसते. या झोपेदरम्यान मेंदूत काही महत्त्वाचे दीर्घकालीन रचनात्मक आणि रासायनिक बदल होतात. त्यातून आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. तान्ह्या मुलांच्या बाबतीत तर ही झोप आकलन व स्मरणशक्ती जोपासण्यासाठी पूरक ठरते.
साधारण 20 ते 25 मिनिटे या स्वरूपाची झोप झाल्यानंतर आपण त्यातून बाहेर येऊन पुन्हा एकदा पहिल्या प्रकारच्या, म्हणजे मंदतरंग झोपेत प्रवेश करतो. या प्रमाणे प्रकार १ व प्रकार २ चे एकआडएक चक्र आपण उठेपर्यंत चालू राहते. जर रात्रभराची झोप शांत लागली असेल तर सकाळ होण्याच्या सुमारास विरोधाभासी झोपेचा कालावधी काहीसा वाढतो.
वरील चित्रानुसार आतापर्यंत आपण प्रौढांचे झोपचक्र पाहिले. एक वर्षाखालील मुलांमध्ये यात एक महत्त्वाचा फरक असतो. तो म्हणजे, त्यांच्या बाबतीत झोपेचे वरील दोन प्रकार (१ व २) प्रत्येकी ५०% असतात. या बालकांच्या बाबतीत अजून एक उल्लेखनीय मुद्दा. त्यांना झोप लागण्यासाठी आपण त्यांना मांडीवर घेऊन डोक्यावर आणि अंगाच्या काही भागावर सातत्याने थोपटत राहतो. आपल्या या क्रियेमुळे त्यांच्या त्वचेतील विशिष्ट भाग (mechanoreceptors) उत्तेजित होतात आणि त्यांच्यापासून निघालेल्या संवेदना मेंदूत पोचून झोप लागणे सुलभ होते.
मेंदूचे नियंत्रण व रासायनिक घडामोडी
मेंदूमध्ये झोपेचे विविध विभाग असतात. त्यांना शरीराकडून येणारे विविध चेतातंतू योग्य ते संदेश पुरवतात. त्याचबरोबर मेंदूतील दृष्टी विभागाचे सहकार्य देखील महत्त्वाचे असते. या सर्वांच्या समन्वयातून झोपेचे नित्य चक्र कार्यरत राहते. या संदर्भात ज्या रासायनिक घडामोडी घडतात त्यामध्ये अनेक रसायनांचा वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग असतो. त्यापैकी काही प्रमुख रसायने अशी :
Serotonin, prostaglandin, norepinephrine & acetylcholine
आपले दैनंदिन झोपजागचक्र नियमित राहण्यासाठी मेंदूच्या hypothalamus या विभागात एक जैविक घड्याळ असते. या संदर्भात असलेल्या मेलाटोनिनच्या कार्याचा परिचय उपरोल्लेखित स्वतंत्र लेखात यापूर्वीच करून दिलेला आहे.
वय आणि झोप
वाढत्या वयानुसार झोपेचे तास कमी होत जातात हे आपण जाणतोच. सर्वसाधारणपणे वयानुसार ते तास असे असतात :
• 0 ते 1 वर्ष :16 तास
• बालपण : 10 तास
• प्रौढावस्था : 6-8 तास
अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार प्रौढपणी झोपेच्या कालावधीत फरक राहतो.
जन्मापासून जसे वय वाढत जाते तसे मेंदूतील झोपेच्या जैविक घड्याळात बदल होत जातात. जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यात असे जैविक घड्याळ तयार झालेले नसते. त्यामुळे ही बालके त्यांची झोप संपूर्ण 24 तासात निरनिराळ्या वेळी हवी तशी विभागून घेतात. तसेही ते राजेच असतात ना ! यानंतर जसे वय पुढे सरकते तसतसे मेंदूत जैविक घड्याळ तयार होऊ लागते आणि रात्रीच्या वेळी अधिकाधिक झोपण्याकडे आपला कल होतो.
शालेय मुलांच्या बाबतीत शाळेच्या वेळा हा घटक झोपेच्या वेळा आणि कालावधी ठरवण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचा ठरतो. या विषयावर अलीकडेच आपण जोरदार राज्यस्तरीय चर्चा अनुभवली ! प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन जीवनातले अनेक घटक झोपेच्या कालावधीवर परिणाम करतात. त्यामध्ये डोळ्यांवर सातत्याने पडणारा कृत्रिम प्रकाश (e-screens), बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव, चहा, कॉफी आणि कृत्रिम शीतपेयांचा अतिरेक, कौटुंबिक समस्या आणि विविध औषधांचा परिणाम यांचा समावेश आहे. व्यावसायिक कसरतपटूना सामान्य प्रौढापेक्षा जास्त झोपेची (सुमारे 9 तास दैनंदिन) गरज असते.
ज्येष्ठ नागरिकांची झोप
मध्यमवयाशी तुलना करता ज्येष्ठ वयात एकंदरीत झोप कमी होते हे साधारण निरीक्षण आहे. या वयात झोपेसंदर्भात खालील महत्त्वाचे बदल बऱ्याच जणांमध्ये जाणवतात :
1. ‘लवकर निजे आणि लवकर उठे’ ही सवय वाढीस लागते.
2. रात्री प्रत्यक्ष झोप लागण्यास बराच वेळ घेतला जातो
3. झोपेचा एकूण कालावधी कमी होतो
4. मंदतरंग झोपेतील गाढपणा कमी होतो - हे विशेषतः पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. मात्र खळबळजनक झोप कमी होण्याचा परिणाम स्त्री व पुरुष दोघांमध्ये सारखाच होतो.
5. झोपेत वारंवार व्यत्यय येतात आणि थोडंसं कुठे खुट्ट वाजलं की जाग येते
6. काहींच्या बाबतीत दिवसा डुलक्या घेण्याचे प्रमाण वाढते- विशेषता जर अनेक दीर्घकालीन आजार मागे लागलेले असतील तर. पण काहींच्या बाबतीत दुपारची झोप अजिबातच येत नाही.
वर लिहिलेली निरीक्षणे सर्वसाधारण आहेत. त्यातील प्रत्येकाला अपवाद देखील दिसून येतात.
वाढत्या वयानुसार वरीलप्रमाणे झोपेतील बदल होण्यास मेंदूच्या विविध भागांमधले चेतारासायनिक बदल कारणीभूत असतात. त्याचबरोबर या वयोगटात असणाऱ्या इतर व्याधी आणि समस्यांचा देखील झोपेवर परिणाम होतो. यामध्ये रात्रीची लघवीची वारंवारिता, औषधांचे परिणाम आणि मद्यपानाचा समावेश आहे. पुरुषांमध्ये मंद-झोपेचे प्रमाण कमी होण्यामागे पुरुष हॉर्मोनची पातळी कमी होण्याचा संबंध असू शकतो. वृद्धांच्या बाबतीत त्यांच्या अवतीभवती असणारे वातावरण- म्हणजे घर की वृद्धाश्रम- याचाही झोपेच्या कालावधीवर बराच प्रभाव पडतो.
या वयात झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ती देखील कमी होते, की दोन्ही स्वतंत्रपणे कमी होतात, या विषयावर सातत्याने संशोधन चालू आहे.
सरतेशेवटी एक लाखमोलाचा प्रश्न उपस्थित होतो :
“म्हातारपणी शरीराची झोपेची गरजच कमी होते, का गरज (पूर्वीइतकीच) असूनही अथक प्रयत्नांती झोप येत नाही?”
हा प्रश्न वादग्रस्त असून त्यावर अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मात्र बऱ्याच संशोधकांचे मत, “म्हातारपणी झोप निर्माण करण्याची क्षमता कमी होत असावी’, या गृहीतकाकडे झुकलेले आहे.
झोपेचा आदर्श कालावधी ?
स्पष्ट सांगायचे झाल्यास, “रोज किती तास झोपावे” या प्रश्नाचे एकचएक असे शास्त्रीय उत्तर नाही ! निरनिराळ्या देशांमध्ये संबंधित वैद्यकीय संघटनांनी वेगवेगळ्या शिफारसी केलेल्या आहेत. परंतु झोपेचा ठराविक कालावधी हा शेवटी व्यक्तीसापेक्ष आहे. झोप झाल्यानंतर ताजेतवाने वाटले पाहिजे आणि दिवसभरातील कामे उत्साहाने करता आली पाहिजेत, हाच निकष महत्त्वाचा. तसेच, ‘ प्रौढपणी दिवसा झोपावे की नाही”, याचे उत्तरही पुन्हा व्यक्तीसापेक्ष आहे. आपापल्या नोकरी-व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि गरजेनुसार आपली झोप दिवस आणि रात्र या वेगवेगळ्या सत्रात विभागली जाऊ शकते.
समारोप
दैनंदिन झोपेची मूलभूत प्रक्रिया, त्या संदर्भातील मेंदूतील घडामोडी आणि वयानुसार झोपेत होणारे बदल यांचा आढावा या लेखात घेतला. उत्तम आरोग्यासाठी शरीराच्या भरणपोषण आणि व्यायामाबरोबरच यथायोग्य झोपेची नितांत आवश्यकता असते. निद्राराज्यातील स्वप्नसृष्टी हा कुतुहलजनक विषय असला तरी तो स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखनाचा विषय आहे. झोपेसंबंधीच्या विविध समस्या आणि आजार हा विशेष तज्ञांचा प्रांत असून तो या लेखाच्या कक्षेबाहेर आहे.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिक अनंत काणेकर यांनी लिहिलेला ‘यथेच्छ झोपा’ हा लघुनिबंध गाजला होता आणि तो शालेय अभ्यासक्रमातही होता. त्याची स्मृती कायम राहिलेली आहे. आपल्या रोजच्या झोपेचा कालावधी हा व्यक्तीसापेक्ष असल्याचे आपण वर पाहिलेच. तेव्हा आपापल्या दिनक्रम आणि गरजेनुसार प्रत्येकाने आपापल्या झोपेचे वेळापत्रक ठरवलेले उत्तम !
****************************************************************
संदर्भ :
१. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
२. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5440010/#:~:text=62%20The%2....
३. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5810920/#:~:text=Advancing%...(4)
विविध भारती हे आयुष्यातील
विविध भारती हे आयुष्यातील अनमोल देणं
>>> +१०००००००......
पूर्वीच्या 'साज और आवाज'ची रात्री नऊची वेळ मात्र बदलली.
ती आता कधीतरी संध्याकाळी मध्येच होऊन जाते ते कळत नाही.
मी परदेशात जेव्हा एकटा राहत होतो तेव्हा मला रात्री झोपताना गाण्याच्या निव्वळ धून ऐकतच झोपी जावे लागे. अन्यथा झोप येत नसे. त्या सीडीवर एकणे बरे पडायचे. म्हणजे झोप लागली तरी ते आपोआप बंद होते.
कुमार सर, तुमच्या रात्री
कुमार सर, तुमच्या रात्री वेळेत निजणे आणि त्यासाठी स्क्रीन टाइम लौकर बंद करणे तसेच बहुतेक सकाळी उठल्यावर ठराविक गोष्टी आटोपून घेतल्या शिवाय सोमी नाही याची नोंद मी केव्हाच घेतली होती.
(कोडे खेळताना कितीही रंगात असले तरी तुम्ही तुमच्या वेळेला लॉग ऑफ करणार आणि सकाळी सुद्धा ठराविक वेळे नंतरच प्रतिसाद येणार यावरून.) तुमच्या शिस्तीचे कौतुक वाटते.
अशी शिस्त मला जमत नाही, प्रयत्न करूनही. त्यापेक्षा काही दिवस/आठवडे/महिने सरळ सगळ्या व्हॉट्सऍप ग्रुप मधून बाहेर, आणि माबोवर न फिरकणे असे करतो. हे दोनच सोमी वापरतो. टिव्ही फारसा बघतच नाही.
हे दोनच सोमी वापरतो. टिव्ही
हे दोनच सोमी वापरतो. टिव्ही फारसा बघतच नाही.
>>> +११
मानव छान ! जेवढे कमी तेवढे हे प्रकार चांगलेच. जसा कोविड सुरू झाला तसे मी टीव्ही पाहणे जवळजवळ बंदच केले. गेल्या कित्येक महिन्यात मी तो लावलेला सुद्धा नाही.
2000 साली मी जेव्हा मेलाटोनिनचा लेख इथे लिहिला तेव्हाच मला प्रथम जाणीव झाली, की झोपण्याआधी तास-दीड तास स्क्रीनबंदचा नियम आपण स्वतः आधी पाळला पाहिजे. तरच आपल्याला ते लिहिण्याचा /सांगण्याचा अधिकार पोचतो !
माबो आणि मिपा दोनच ठिकाणी. फेसबुक मला फक्त ऐकून माहिती आहे
व्हाट्सअपवर फक्त व्यावसायिक काम.
बाकी शाळा, कॉलेज, नातेवाईक असल्या कुठल्याही ग्रुपमध्ये सामील व्हायचे कटाक्षाने टाळले आहे. जे एक दोन जवळचे मित्र असतात ते सर्व महत्वाच्या बातम्या पुरवतात. वार्षिक संमेलनाला गेले की पुरते.
>>>>तुमच्या शिस्तीचे कौतुक
>>>>तुमच्या शिस्तीचे कौतुक वाटते.
+१०००००
- शिस्तशीरपणा,
- स्वतःच्या धाग्यांची ओनरशिप समर्थपणे हाताळणे. उदा - अवांतर टाळण्याचे बजावणे, प्रत्येक प्रतिसदास योग्य ते उत्तर देणे
- उपयुक्त आणि ' व्हॅल्यु अॅडेड' धागेच काढणे
- एकंदर वावर जसे अन्य लोकांच्या अध्यात ना मध्यात
खूप गुणांचे नीरीक्षण केलेले आहे.
सुरेख लेख आहे.
सुरेख लेख आहे.
सामो, धन्यवाद !
सामो, धन्यवाद !
पण ..
' व्हॅल्यु अॅडेड' धागेच काढणे >>> याचे श्रेय मी चांगले विषय सुचवणाऱ्या इथल्याच बंधू-भगिनींना देतो !
प्रस्तुत लेखविषय चार वर्षापूर्वीच लाडली यांनी सुचवला होता. पण मधली तीन वर्षे covid च्या प्रश्नोत्तरात गेली. मग डिसेंबरमध्ये प्रथम या विषयावरची पाठ्यपुस्तके मिळवली. वाचन चालू केले आणि मग नव्या वर्षाचा हा पहिला लेख असे मनात ठरवले होते.
ते सफल झाले त्याबद्दल तुम्हा सर्वांनाच धन्यवाद !
..
शुभरात्री
हा इतका चांगला धागा ग्रुप
हा इतका चांगला धागा ग्रुप पुरता मर्यादित का?
शीर्षकांच्या धाग्यावर पाहिलं नसतं तर मिस झाला असता माझा.
फार उपयुक्त लेख.
रिया
रीया
तुमचा गैरसमज झालेला असावा. कारण माझे सर्वच धागे ' पब्लिक' या पर्यायाखालीच प्रकाशित केलेले आहेत.
आता तुम्ही म्हटला म्हणून मी संपादन करून पुन्हा एकदा पाहिले तेव्हा ते "सर्वांसाठी खुला" असेच आहे.
धन्यवाद !
कधीतरी त्या ट्युनशी माझा
कधीतरी त्या ट्युनशी माझा संबंध आलेला आहे असे वाटते. गूढ वाटते.>> प्रत्येक बाब गूढ वगैरे नसू शकते. तुम्ही आमलेट केले तरी अंड्याची रास तपासुन घेत असणार . लाइफ इज क्वाइट ओपन अँड सिम्पल. असा थोडा विचार करून बघा. बरीच मेंटल क्लटर कमी होईल व झोपेची क्वालिटी सुधारेल.
>>>>>>बरीच मेंटल क्लटर कमी
>>>>>>बरीच मेंटल क्लटर कमी होईल व झोपेची क्वालिटी सुधारेल.
ताई मेंटल क्लटर नाही हो. तुम्ही निष्कर्षावरती उड्या मारताय. या वयात हे ऑलिम्पिक बरे नव्हे.
गाढ झोप लागणे ही खूप
गाढ झोप लागणे ही खूप गुंतागुंतीची क्रिया असावी.
गाढ झोप येण्यासाठी बाह्य घटका सहित . बाकी घटक पण त्याला कारण असावेत.
१) तुम्ही mentaly relax आहात का?
२) तुमचा आहार काय आहे.
३) तुम्ही चिंता किती करता फक्त आजचा च विचार करणारे सुखी.
४) तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल तर तुमच्यावर त्याचे दडपण किती आहे
५) तुम्हाला भावनिक blackmail कोणी करत नाही ना.
६) तुम्हाला उद्या ची किंवा भविष्याची चिंता किती आहे.
७) नाते क्संबंधत तुम्ही अशस्वी नाही ना.
८) तुम्ही शारीरिक दृश्य निरोगी आहात ना.
९)
तुम्ही शारिरीक मेहनत किती घेता, आहार काय घेता.
अशी अनेक कारणे आहेत झोपे मागें
असे मला वाटतं
+११३) तुम्ही चिंता किती करता
+११
३) तुम्ही चिंता किती करता फक्त आजचा च विचार करणारे सुखी.
आणि
९) तुम्ही शारिरीक मेहनत किती घेता,
>>>>
या संदर्भात एक सर्वसाधारण निरीक्षण सांगतो. काबाडकष्ट करणारा श्रमजीवी वर्ग कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत पटकन झोप लागण्याच्या बाबतीत (संपन्न बुद्धिजीवी वर्गापेक्षा) सुखी असतो.
(अपवाद सोडून द्या)
अरे हा धागा कसा मिस झाला..
अरे हा धागा कसा मिस झाला..
या कमी झोपायच्या सवयीमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला आहे.
धागा वरवर चाळला. नेहमी प्रमाणे बरीच उपयुक्त माहिती दिसत आहे. निवडक दहात साठवून सावकाश वाचतो.
खरेच उपयुक्त लेख. मला झोप
खरेच उपयुक्त लेख. मला झोप कमीच येते. विचारच फार असतात डोक्यात. अगदी कधी तरीच खूप जास्त झोप येते. मध्ये तर फार बिघडले होते गाडे झोपेचे. रात्री 2 चया सुमारास जग यायची आणि मग परत झोप लागायला खूप वेळ लागायचा. आता परिस्थिती जरा बरी आहे.
श्रमजीवी वर्ग कुठेही आणि
श्रमजीवी वर्ग कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत पटकन झोप लागण्याच्या बाबतीत (संपन्न बुद्धिजीवी वर्गापेक्षा) सुखी असतो.
(अपवाद सोडून द्या)
व्यायाम नी सर्व तणाव नष्ट होतात, मन ताजे होते.
त्या मुळे श्रम करणाऱ्या लोकात पण व्यायाम करण्याचेच परिणाम होतात.
ही लोक विनाकारण जगाची चिंता करत नाहीत.
ना समाज माध्यम किंवा टीव्ही न्यूज chya भानगडीत पडून जे अस्तित्वात च नाहि त्या गोष्टी ची भीती बाळगत नाहीत.
म्हणून चिंता मुक्त असतात
((श्रमजीवी वर्ग कुठेही आणि
((श्रमजीवी वर्ग कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत पटकन झोप लागण्याच्या बाबतीत (संपन्न बुद्धिजीवी वर्गापेक्षा) सुखी असतो )))...
खरंय..
यावरून ती एक 'राणीची झोप' नावाची गोष्ट आठवली. त्यात एका राणीला अजिबात झोप येत नव्हती. खूप उपचार करून झाले. खूप वैद्य करून झाले. खाण्यापिण्यात बदल करून पाहिला. वेगवेगळ्या गाद्या बदलून झाल्या. पण तिला काही केल्या झोप येत नव्हती. मग एकदा समुद्रातून प्रवास करताना त्या राजा-राणीचे जहाज भरकटते आणि राणी एका अनोळखी किनाऱ्याला लागते. इथे तिला कष्ट करण्याशिवाय पर्याय नसतो . तिला आपले आरामदायी जीवन सोडून किनाऱ्यावरील इतर लोकांसोबत भरपूर काबाडकष्ट करावे लागतात. ह्या श्रमजीवी जीवनशैलीमुळे तिला तिची हरवलेली झोप परत मिळते.
(राणीच्या काळात व्हाट्स ऍप आणि फेसबुक नव्हते ही एक जमेची बाजू !)
(राणीच्या काळात व्हाट्स ऍप
(राणीच्या काळात व्हाट्स ऍप आणि फेसबुक नव्हते ही एक जमेची बाजू !
>>> अगदी
रात्रीच्या वेळेस छापील मजकुराचे टेबल लॅम्पच्या पिवळ्या प्रकाशाच्या दिव्यातले (incandescent bulb) वाचन हे नैसर्गिक असते. ते पुरेसे वाचन थकवा आणून झोप येण्यास पूरक ठरते. या उलट कुठल्याही इ-स्क्रीनवरचे वाचन किंवा खोलीतील आधुनिक एलईडी बल्बच्या प्रकाशातल्या वाचनातून डोळ्यांवर विशिष्ट तरंगलांबीचा नीलप्रकाश पडत राहतो, जो मेंदूतील मेलाटोनिन आणि झोपेच्या अन्य यंत्रणांवर विपरीत परिणाम घडवतो.
तसेच स्क्रीनवरील माध्यमे, ज्यात आपण सतत स्क्रोल करत राहतो ती व्यसन लावणारी असतातच.
नेहमीप्रमाणे अतिशय उपयुक्त
नेहमीप्रमाणे अतिशय उपयुक्त लेख!
झोपेचा तसा काही त्रास नाही. मात्र हल्ली कटाक्षाने ठराविक वेळेनंतर मोबाईलचा वापर कमी ठेवते, फक्त फोन करण्यापुरताच वापरते. झोपण्यापूर्वी वाचन करण्याचे टाळते. कोणत्याही प्रकारचे पुस्तक वाचले तरी मला रात्रभर त्या संबंधित स्वप्नं पडतात. मात्र झोपण्यापूर्वी गाणी ऐकण्याची सवय आहे.
संध्याकाळी साधरण साडेसातच्या आत जेवण करते, त्याचा झोपे बरोबरच इतर बाबतीतही चांगला उपयोग होतो. बाहेर कुठे जेवायला जायची वेळ आली तर मात्र ह्या लवकर जेवायच्या सवयीमुळे पंचाईत होते.
मोठ्या शहरात नवीन कल्चर
मोठ्या शहरात नवीन कल्चर निर्माण होत आहे पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण चालू आहे.
दिवस भर झोपा काढायच्या आणि रात्र भर पार्टी,alcohol ह्या साठी जागे राहायचे.
रिकाम टेकडे पैसेवाले रोज अशीच लाईफ stayle ठेवतात.
उच्च नोकरी वाले शनिवार रविवार रात्र भर जागतात आणि दिवसभर झोपतात.
मधुमेह ,कॅन्सर,आणि बाकी शारीरिक बिघडवर आधारित आजार,हार्ट अटॅक ह्याचे प्रमाण वाढण्याचे हे पण एक कारण आहे.
भारतीय तर आंधळे च आहेत .
लवकर उठा,लवकर झोप घ्या,साधे जेवण घ्या ही भारतीय संस्कृती आहे.
जे संस्कृती पाळतात त्यांना झोपेच्या समस्या पण येत नाहीत
पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण
पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण चालू आहे. दिवस भर झोपा काढायच्या आणि रात्र भर पार्टी,alcohol ह्या साठी जागे राहायचे.
रिकाम टेकडे पैसेवाले रोज अशीच लाईफ stayle ठेवतात.लवकर उठा,लवकर झोप घ्या,साधे जेवण घ्या ही भारतीय संस्कृती आहे. जे संस्कृती पाळतात त्यांना झोपेच्या समस्या पण येत नाहीत >>>>
सर्व जण काही पार्ट्या नी अल्कोहोलसाठी नाही जागत. तुम्ही मल्टिनॅशनल कंपन्या, बीपीओ, एलपीओ मध्ये वगैरे काम करत असाल तर तुमचे क्लायंट भारताबाहेर असू शकतात, थोडा वेळ त्यांच्याबरोबर ओव्हरलॅप करण्यासाठी सकाळी अति लवकर जाणे/ रात्री उशिरा थांबणे करावे लागते. मेडिकल व त्याच्याशी संबंधित क्षेत्रांत (फार्मा, पॅथॉलॉजी), रेल्वे/बस/विमान वाहतूक/उबर ओला वगैरे साठी काम करणाऱ्या लोकांना तर वेळेचे बंधन नसते. मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेस प्लान्ट्स मध्ये 9 ते 6 प्लान्ट चालवता येत नाही. तिथे शिफ्ट मध्ये काम करावे लागते. लोक घरी पोहोचतात त्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्विस सेक्टरमधील (हॉस्पिटॅलिटी/केटरिंग/जिम/दुकाने/गिरण्या/पाळणाघर/पोळ्या-स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया) लोकांचे काम अजून एखाद दोन तास चालूच राहते.
डिलिव्हरी/कुरियर बॉईज/पार्लर-सलून चालवणारे स्त्रीपुरुष वगैरे पैसेवाले नसतात. ते ज्यांना केटर करतात त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा जर सेवा दिली नाही तर ते त्या व्यवसायातून बाहेर फेकले जाऊ शकतात.
काम संपवून घरापर्यंतचा प्रवास, घरी आल्यावर कुटुंबासोबत काही तास घालवणे यामुळे झोपेला उशीर होतो.
अगदी गावात शेत किंवा फळबाग असली तरी रात्री बेरात्री पाणी द्यायला/राखणीला जावे लागते.
कार्यसंस्कृतीनुसार विविध
कार्यसंस्कृतीनुसार विविध प्रकारच्या जीवनशैलीमधले दैनंदिन जीवन आणि झोप यासंबंधीचे अनुभव वरील प्रतिसादांमधून चांगले मांडले आहेत.
नैसर्गिक जैविक चक्राला पूरक अशी काटेकोर जीवनशैली सेवानिवृत्त वयात आखता येते.
… काटेकोर जीवनशैली
… काटेकोर जीवनशैली सेवानिवृत्त वयात आखता येते.….
आणि नेमकी त्या वयात झोप कमी येते
वयानुसार झोप कमी होते
वयानुसार झोप कमी होते
छान लिहिले आहे. शांत झोपेसाठी
छान लिहिले आहे. शांत झोपेसाठी मी चालू घडामोडी आणि आरोग्यम् धनसंपदाम् मधून बाहेर पडले आहे.
त्यामुळे येणं होत नाही. मी कित्येक वर्षांपासून रोज रात्री दहा ते सहा झोपते, जागरण आवश्यक असले तरच. सिनेमा बघत, पुस्तक वाचत किंवा उगाच नाहीच. श्रम तर आहेतच आणि कुत्र्याला फिरवल्याने काहीच प्रॉब्लेम येत नाही. स्क्रीन टाईम आणि उठसूठ व्यक्त होणंही कमी केलं आहे. कारण पुन्हा पाय माबोवर बघायला वळतातच. 
धन्यवाद !
धन्यवाद !
१. नेमकी त्या वयात झोप कमी येते >>> खरंय !
२. स्क्रीन टाईम आणि उठसूठ व्यक्त होणंही कमी केलं आहे. >>>> छान ! मर्यादित वावर आपल्याच हिताचा.
रात्रीच्या वेळेस छापील
रात्रीच्या वेळेस छापील मजकुराचे टेबल लॅम्पच्या पिवळ्या प्रकाशाच्या दिव्यातले (incandescent bulb) वाचन हे नैसर्गिक असते. ते पुरेसे वाचन थकवा आणून झोप येण्यास पूरक ठरते. या उलट कुठल्याही इ-स्क्रीनवरचे वाचन किंवा खोलीतील आधुनिक एलईडी बल्बच्या प्रकाशातल्या वाचनातून डोळ्यांवर विशिष्ट तरंगलांबीचा नीलप्रकाश पडत राहतो, जो मेंदूतील मेलाटोनिन आणि झोपेच्या अन्य यंत्रणांवर विपरीत परिणाम घडवतो.>>>>>>महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
काही जण शनिवार रविवार सुट्टी असल्याने उशिरा किंवा अगदी दुपारी बारा पर्यंत उठतात. आमचा आठवड्याचा झोपेचा कोटा पूर्ण करतोय असे त्यांचे म्हणणे.
रोज ठराविक वेळेत उठत असल्यास असे सुट्टीच्या दिवशी काही जण उशिरापर्यंत कसे झोपू शकतात. म्हणजे शरीराचे एक चक्र सेट झालेले असते ना. मला तरी सुट्टीच्या दिवशी रोजच्याच वेळी जाग येते.
असे सुट्टीच्या दिवशी काही जण
असे सुट्टीच्या दिवशी काही जण उशिरापर्यंत कसे झोपू शकतात ?
>>>चांगला मुद्दा.
याबाबतीत आपल्याला काही व्यक्तीभिन्नता जरूर दिसून येते. शरीराच्या मूलभूत जैविक चक्राला circadian rhythm (circa = day) असे शास्त्रीय नाव आहे. त्यानुसार ते 24 तासासाठी “सेट” झालेले असते. परंतु काही जणांच्या बाबतीत त्यांच्या रोजच्या कार्यालयीन वेळा (रात्रपाळी, अर्धरात्रपाळी इत्यादी), इतर उद्योग आणि काही वैयक्तिक सवयी यांच्यामुळे त्या दैनिक चक्रात काहीसा बदल (किंवा बिघाड) होतो.
जर हा बदल जर नित्याचाच राहू लागला तर मग सुट्टीच्या दिवशी मनात एक निवांतपणाची भावना येते. त्यानुसार थोडेफार चेतारासायनिक बदल मेंदूच्या पातळीवर होतात. परिणामी, सुट्टीच्या दिवशी फक्त झोपच नव्हे तर अन्य काही शरीरधर्मांमध्ये सुद्धा बदल दिसू शकतात.
अर्थात असे सर्वांनाच लागू होताना दिसत नाही. माझा अनुभव उलटा आहे तो सांगतो.
रोज समजा मला कामावर वेळेत पोचायचे आहे म्हणून सकाळी साडेसहाला उठावे लागते. तर गंमत अशी की, साडेसहा वाजले की मला रोज वाटते, “अरे, सकाळ एवढ्या लवकर का झाली? अजून अर्धा तास तरी बाकी हवा होता”.
परंतु पूर्ण सुट्टीच्या दिवशी, मला सकाळी साडेपाच वाजताच आपोआप जाग येते ! मग स्वतःवरच वैतागायला होते. आता याला काही शास्त्रीय स्पष्टीकरण असं नाही. व्यक्तिगत अनुभव म्हणून सोडून द्यायचे.
जे सरासरी रात्री वेलवर झोपतात
जे सरासरी रात्री वेळेवर झोपतात त्यांनी रोज सकाळी लवकर च उठावे .
आणि उठल्यावर जॉगिंग, walking हा क्रम ठेवावा खूप मस्त वाटते.
आणि झोप पूर्ण झाल्याची भावना शरीरात निर्माण होते.
उशिरा 12 , एक वाजता उठले तर झोप तर जास्त तास होते पण झोप पूर्ण झाल्याचे सुख काही मिळत नाही.
हा माझा पर्सनल अनुभव आहे.
मी कधी उशिरा उठलो तर पूर्ण दिवस कंटाळवाणा जातो
फ्रेश वाटत नाही.
झोप पूर्ण झाल्याचा फील येत नाही.
माझा एक झोपेचा रेकॉर्ड पण आहे
माझा एक झोपेचा रेकॉर्ड पण आहे जेव्हा मी कॉलेज ला होतो.
संध्याकाळी सहा झोपलो होतो ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा लाच उठलो.
सूर्य मावळला आहे की उगवला आहे हेच काही वेळ समजत नव्हते
झोपेच्या कर्जाबद्दलचा
झोपेच्या कर्जाबद्दलचा वेबमेडवरचा लेख
When losing sleep sometimes is unavoidable due to life circumstances, you should make up for lost sleep by taking naps, sleeping more on the weekends, and most importantly, reconsidering your relationship with sleep.
कोणे एके काळी सव्वा ते दीड लाख डिव्हिडंड वॉरंट्स इन हाउस प्रिंट करण्यासाठी आम्ही ऑफिसात रात्रभर काम केले आहे. पहाटे थोडावेळ झोपून उजाडल्यावर घरी जाऊन आणखी एक लहानशी झोप घेऊनन अंघोळी इ. थोडं उशिरा ऑफिसात येत असू. पुन्हा रात्री प्रिंटिंग. मग ही अपुरी राहिलेली झोप शनिवार रविवार भरून काढली आहे.
----
लेखाचं शीर्षक वाचताना एक मुद्दा अनेकदा डोक्यात आला. ज्यांना चांगली झोप लागते त्यांच्यासाठी ती आवडती, सुखकर गोष्ट. पण ज्यांना लागत नाही, त्यांच्यासाठी रात्र ही शिक्षेची वेळ. एके काळी माझ्या वडिलांना झोपेची वेळ झाली की झोप येणार की नाही याचाच ताण यायचा. पहाटे लवकर जाग आली तरी तसंच पडून राहावं लागायचं.
पहाटे / सकाळी लवकर उठून प्रभात फेरीसाठी बाहेर पडणार्यांत वृद्धांचं प्रमाण अधिक दिसतं.
Pages