
नमस्कार !
नववर्षातील पहिला लेख सादर करताना आनंद होत आहे.
सन 2020मध्ये ‘सुखी झोपेचा साथी’ हा लेख इथे लिहिला होता (https://www.maayboli.com/node/73074). त्यामध्ये फक्त मेलाटोनिन या झोपेशी संबंधित एकाच हॉर्मोनचा विचार केलेला होता. त्या धाग्यावरील चर्चेदरम्यान वाचकांनी सूचना केली की, झोपेची एकंदरीत प्रक्रिया या विषयावर सविस्तर लेखन करावे. या चांगल्या सूचनेचा विचार करून हा लेख लिहीतोय. यामध्ये आपण झोपेची आवश्यकता, तिच्या दरम्यान होणारे शारीरिक बदल, तिचे शास्त्रीय प्रकार, तिचा वयाशी संबंध आणि झोप-जाग चक्र या मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत.
झोप कशासाठी ?
रोजची झोप हा माणसाच्या जीवनातील अत्यावश्यक भाग आहे. दमलेल्या शरीराला दैनंदिन विश्रांती देणे हा त्याचा मुख्य हेतू. आपल्या जागृत अवस्थेतून झोपेत गेल्यानंतर आपली इच्छाशक्ती काही काळासाठी स्थगित होते. जीवनातल्या छोट्या मोठ्या त्रासदायक गोष्टींपासून काही काळ तरी आपली सुटका होते. झोपेत आपण स्वप्नांच्या राज्यात अगदी मनमुराद विहार करतो. तसं पाहायला गेलं तर आपल्या झोपेवर आपले निस्सीम प्रेम असते. उगाच नाही आपण आपले एक तृतीयांश आयुष्य झोपेसाठी राखून ठेवत ! झोप ही जरी विश्रांतीची अवस्था असली तरी त्या त्या काळात मेंदू जागृतावस्थेइतकीच ऊर्जा वापरत असतो हा मुद्दा महत्त्वाचा.
झोपेला प्रवृत्त करणारे घटक
मेंदूला सतत पोचणाऱ्या संवेदना कमी होणे हे झोप येण्यासाठी आवश्यक असते. त्या दृष्टीने खोलीतील अंधार, शांतता आणि सुखकर बिछाना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या उलट जेव्हा मन चिंताग्रस्त असते किंवा काही कारणांनी मनात भावनांचा अतिरेक झालेला असतो तेव्हा शरीरात एपिनेफ्रीन या हार्मोनचा प्रभाव राहतो आणि त्यामुळे मेंदू जागृत ठेवला जातो. हा अर्थातच झोप येण्यातील मोठा अडथळा ठरतो. इथे एक मुद्दा रोचक आहे. जेव्हा अतिशय श्रमाने माणूस खूप दमलेला असतो तेव्हा झोपेला पोषक असणारे आजूबाजूचे वातावरण नसले तरी देखील तो शांत झोपू शकतो.
शरीरक्रियेतील महत्त्वाचे बदल
1. हृदयगती रक्तदाब आणि श्वसनगती कमी होतात
2. स्नायू शिथिल पडतात
3. शरीरातील विविध स्राव कमी होतात पण काहींच्या बाबतीत जठरस्राव वाढू शकतो.
झोपेचा कालावधी
दैनंदिन जीवनात जाग-झोप असे एक जैविक चक्र कार्यरत असते. प्रौढ व्यक्तीत साधारणपणे १६ तास जागृतावस्था आणि ८ तास झोप असे ते चक्र आहे. झोपेच्या एकूण कालावधीत आपण दोन प्रकारची झोप घेतो :
. 80 टक्के झोप : शांत किंवा मंदतरंग स्वरूपाची असते
. 20 टक्के झोप : ही काहीशी ‘खळबळजनक’ असते तिला विरोधाभासी झोप असेही म्हणतात. आता हे दोन प्रकार विस्ताराने पाहू.
१. मंदतरंग झोप : या झोपेचे साधारण तीन टप्पे असतात : हलकी , मध्यम आणि गाढ.
पहिल्या टप्प्यात शरीराचे स्नायू शिथिल पडू लागतात. डोळ्यांच्या गोल गोल फिरल्यासारख्या सौम्य हालचाली होत राहतात. या टप्प्यात बाह्य आवाज किंवा हालचाल यामुळे संबंधित व्यक्ती झोपेतून सहज उठण्याची शक्यता राहते. हा टप्पा पार पडल्यानंतर खरी झोप सुरू होते आणि हळूहळू ती गाढ स्वरूपाची होते. त्या टप्प्यात मात्र झोपलेल्या व्यक्तीला उठवायचे असल्यास मोठे आवाज किंवा गदागदा हलवणे या गोष्टींची गरज भासते.
या प्रकारच्या झोपेत डोळे बऱ्यापैकी स्थिर आणि शांत राहतात. म्हणूनच तिला ‘नॉन रॅपिड आय मुव्हमेंट (NREM)’ या प्रकारची झोप म्हणतात. या झोपेत मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून ग्रोथ हॉर्मोन आणि gonadotropins ही हॉर्मोन्स टप्प्याटप्प्याने स्रवतात. तसेच शरीराला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळून त्याचा चयापचय पुनर्स्थापित होतो (restoration). तान्ह्या मुलांच्या बाबतीत या झोपेचा त्यांच्या शारीरिक वाढीशी बऱ्यापैकी संबंध आहे.
ˌही झोप साधारण एक तास पूर्ण झाल्यानंतर तिच्यातून बाहेर येण्याची उलटी प्रक्रिया चालू होते. म्हणजेच,
गाढ >> मध्यम >> हलकी
अशी प्रक्रिया पूर्ण झाली की आता झोपेचा पुढे वर्णन केलेला दुसरा प्रकार चालू होतो.
२. ‘खळबळजनक’ झोप : या प्रकारात डोळ्यांच्या हिसके मारल्यागत वेगवान हालचाली ही महत्त्वाची घटना असते. आपले डोळे अक्षरशः एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे झपाझप हलत राहतात. त्यांच्या हालचालींनी ते जणू काही एखादे संपूर्ण दृश्य त्यांच्या पूर्ण आवाक्यात आणू पाहतात. या वैशिष्ट्यपूर्ण घटनेमुळेच या प्रकारच्या झोपेला ‘रॅपिड आय मुव्हमेंट (REM) प्रकारची झोप असे म्हणतात.
डोळ्यांचा अपवाद वगळता शरीराचे इतर स्नायू मात्र आता कमालीचे शिथिल होतात. जेव्हा जीभ शिथिल पडते तेव्हा ती श्वसनमार्गात अंशतः अडथळा आणते. त्यातूनच घोरण्याचा उगम होतो ! जेव्हा एखादी व्यक्ती पाठ टेकून (supine) झोपलेली असते तेव्हा या प्रकारचा अडथळा सर्वाधिक असतो.
झोपेच्या या स्थितीतून एखाद्याला उठवायला खूपच कष्ट पडतात; त्यातून जर काहीजण कुंभकर्ण असतील तर मग काय विचारायलाच नको ! अर्थातच झोपमोड झाल्याची त्रस्तता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसून येते. अशा झोपेतून उठल्या किंवा उठवल्यानंतर सुमारे 90% लोक त्यांना स्वप्न पडल्याचे सांगतात. स्वप्नरंजन हा या प्रकारातील अर्थातच विशेष भाग. स्वप्नांच्या संदर्भात विज्ञानात जे अभ्यास झाले आहेत त्यातले बरेचसे ‘गृहीतक’ या स्वरूपाचे आहेत.
एखादी व्यक्ती या झोपेत असताना दर जर तिच्या मेंदूचा विद्युत आलेख (EEG) काढला तर तो जागे असतानाच्या अवस्थेसारखाच असतो. या वैशिष्ट्यपूर्ण विरोधाभासामुळेच झोपेच्या या प्रकाराला विरोधाभासी (paradoxical) झोप असेही म्हटले जाते.
या झोपेची अन्य वैशिष्ट्येही महत्त्वाची आहेत. तिच्यात आपल्या नाडीचे ठोके, श्वसनगती आणि रक्तदाब अनियमित होतात. लिंग (किंवा शिश्निकेची ताठरता) आणि स्नायूंचे बारीक झटके येऊ शकतात. मुलांमध्ये दात खाणे बऱ्यापैकी दिसते. या झोपेदरम्यान मेंदूत काही महत्त्वाचे दीर्घकालीन रचनात्मक आणि रासायनिक बदल होतात. त्यातून आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. तान्ह्या मुलांच्या बाबतीत तर ही झोप आकलन व स्मरणशक्ती जोपासण्यासाठी पूरक ठरते.
साधारण 20 ते 25 मिनिटे या स्वरूपाची झोप झाल्यानंतर आपण त्यातून बाहेर येऊन पुन्हा एकदा पहिल्या प्रकारच्या, म्हणजे मंदतरंग झोपेत प्रवेश करतो. या प्रमाणे प्रकार १ व प्रकार २ चे एकआडएक चक्र आपण उठेपर्यंत चालू राहते. जर रात्रभराची झोप शांत लागली असेल तर सकाळ होण्याच्या सुमारास विरोधाभासी झोपेचा कालावधी काहीसा वाढतो.
वरील चित्रानुसार आतापर्यंत आपण प्रौढांचे झोपचक्र पाहिले. एक वर्षाखालील मुलांमध्ये यात एक महत्त्वाचा फरक असतो. तो म्हणजे, त्यांच्या बाबतीत झोपेचे वरील दोन प्रकार (१ व २) प्रत्येकी ५०% असतात. या बालकांच्या बाबतीत अजून एक उल्लेखनीय मुद्दा. त्यांना झोप लागण्यासाठी आपण त्यांना मांडीवर घेऊन डोक्यावर आणि अंगाच्या काही भागावर सातत्याने थोपटत राहतो. आपल्या या क्रियेमुळे त्यांच्या त्वचेतील विशिष्ट भाग (mechanoreceptors) उत्तेजित होतात आणि त्यांच्यापासून निघालेल्या संवेदना मेंदूत पोचून झोप लागणे सुलभ होते.
मेंदूचे नियंत्रण व रासायनिक घडामोडी
मेंदूमध्ये झोपेचे विविध विभाग असतात. त्यांना शरीराकडून येणारे विविध चेतातंतू योग्य ते संदेश पुरवतात. त्याचबरोबर मेंदूतील दृष्टी विभागाचे सहकार्य देखील महत्त्वाचे असते. या सर्वांच्या समन्वयातून झोपेचे नित्य चक्र कार्यरत राहते. या संदर्भात ज्या रासायनिक घडामोडी घडतात त्यामध्ये अनेक रसायनांचा वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग असतो. त्यापैकी काही प्रमुख रसायने अशी :
Serotonin, prostaglandin, norepinephrine & acetylcholine
आपले दैनंदिन झोपजागचक्र नियमित राहण्यासाठी मेंदूच्या hypothalamus या विभागात एक जैविक घड्याळ असते. या संदर्भात असलेल्या मेलाटोनिनच्या कार्याचा परिचय उपरोल्लेखित स्वतंत्र लेखात यापूर्वीच करून दिलेला आहे.
वय आणि झोप
वाढत्या वयानुसार झोपेचे तास कमी होत जातात हे आपण जाणतोच. सर्वसाधारणपणे वयानुसार ते तास असे असतात :
• 0 ते 1 वर्ष :16 तास
• बालपण : 10 तास
• प्रौढावस्था : 6-8 तास
अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार प्रौढपणी झोपेच्या कालावधीत फरक राहतो.
जन्मापासून जसे वय वाढत जाते तसे मेंदूतील झोपेच्या जैविक घड्याळात बदल होत जातात. जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यात असे जैविक घड्याळ तयार झालेले नसते. त्यामुळे ही बालके त्यांची झोप संपूर्ण 24 तासात निरनिराळ्या वेळी हवी तशी विभागून घेतात. तसेही ते राजेच असतात ना ! यानंतर जसे वय पुढे सरकते तसतसे मेंदूत जैविक घड्याळ तयार होऊ लागते आणि रात्रीच्या वेळी अधिकाधिक झोपण्याकडे आपला कल होतो.
शालेय मुलांच्या बाबतीत शाळेच्या वेळा हा घटक झोपेच्या वेळा आणि कालावधी ठरवण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचा ठरतो. या विषयावर अलीकडेच आपण जोरदार राज्यस्तरीय चर्चा अनुभवली ! प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन जीवनातले अनेक घटक झोपेच्या कालावधीवर परिणाम करतात. त्यामध्ये डोळ्यांवर सातत्याने पडणारा कृत्रिम प्रकाश (e-screens), बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव, चहा, कॉफी आणि कृत्रिम शीतपेयांचा अतिरेक, कौटुंबिक समस्या आणि विविध औषधांचा परिणाम यांचा समावेश आहे. व्यावसायिक कसरतपटूना सामान्य प्रौढापेक्षा जास्त झोपेची (सुमारे 9 तास दैनंदिन) गरज असते.
ज्येष्ठ नागरिकांची झोप
मध्यमवयाशी तुलना करता ज्येष्ठ वयात एकंदरीत झोप कमी होते हे साधारण निरीक्षण आहे. या वयात झोपेसंदर्भात खालील महत्त्वाचे बदल बऱ्याच जणांमध्ये जाणवतात :
1. ‘लवकर निजे आणि लवकर उठे’ ही सवय वाढीस लागते.
2. रात्री प्रत्यक्ष झोप लागण्यास बराच वेळ घेतला जातो
3. झोपेचा एकूण कालावधी कमी होतो
4. मंदतरंग झोपेतील गाढपणा कमी होतो - हे विशेषतः पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. मात्र खळबळजनक झोप कमी होण्याचा परिणाम स्त्री व पुरुष दोघांमध्ये सारखाच होतो.
5. झोपेत वारंवार व्यत्यय येतात आणि थोडंसं कुठे खुट्ट वाजलं की जाग येते
6. काहींच्या बाबतीत दिवसा डुलक्या घेण्याचे प्रमाण वाढते- विशेषता जर अनेक दीर्घकालीन आजार मागे लागलेले असतील तर. पण काहींच्या बाबतीत दुपारची झोप अजिबातच येत नाही.
वर लिहिलेली निरीक्षणे सर्वसाधारण आहेत. त्यातील प्रत्येकाला अपवाद देखील दिसून येतात.
वाढत्या वयानुसार वरीलप्रमाणे झोपेतील बदल होण्यास मेंदूच्या विविध भागांमधले चेतारासायनिक बदल कारणीभूत असतात. त्याचबरोबर या वयोगटात असणाऱ्या इतर व्याधी आणि समस्यांचा देखील झोपेवर परिणाम होतो. यामध्ये रात्रीची लघवीची वारंवारिता, औषधांचे परिणाम आणि मद्यपानाचा समावेश आहे. पुरुषांमध्ये मंद-झोपेचे प्रमाण कमी होण्यामागे पुरुष हॉर्मोनची पातळी कमी होण्याचा संबंध असू शकतो. वृद्धांच्या बाबतीत त्यांच्या अवतीभवती असणारे वातावरण- म्हणजे घर की वृद्धाश्रम- याचाही झोपेच्या कालावधीवर बराच प्रभाव पडतो.
या वयात झोप कमी झाल्यामुळे स्मरणशक्ती देखील कमी होते, की दोन्ही स्वतंत्रपणे कमी होतात, या विषयावर सातत्याने संशोधन चालू आहे.
सरतेशेवटी एक लाखमोलाचा प्रश्न उपस्थित होतो :
“म्हातारपणी शरीराची झोपेची गरजच कमी होते, का गरज (पूर्वीइतकीच) असूनही अथक प्रयत्नांती झोप येत नाही?”
हा प्रश्न वादग्रस्त असून त्यावर अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मात्र बऱ्याच संशोधकांचे मत, “म्हातारपणी झोप निर्माण करण्याची क्षमता कमी होत असावी’, या गृहीतकाकडे झुकलेले आहे.
झोपेचा आदर्श कालावधी ?
स्पष्ट सांगायचे झाल्यास, “रोज किती तास झोपावे” या प्रश्नाचे एकचएक असे शास्त्रीय उत्तर नाही ! निरनिराळ्या देशांमध्ये संबंधित वैद्यकीय संघटनांनी वेगवेगळ्या शिफारसी केलेल्या आहेत. परंतु झोपेचा ठराविक कालावधी हा शेवटी व्यक्तीसापेक्ष आहे. झोप झाल्यानंतर ताजेतवाने वाटले पाहिजे आणि दिवसभरातील कामे उत्साहाने करता आली पाहिजेत, हाच निकष महत्त्वाचा. तसेच, ‘ प्रौढपणी दिवसा झोपावे की नाही”, याचे उत्तरही पुन्हा व्यक्तीसापेक्ष आहे. आपापल्या नोकरी-व्यवसायाच्या स्वरूपानुसार आणि गरजेनुसार आपली झोप दिवस आणि रात्र या वेगवेगळ्या सत्रात विभागली जाऊ शकते.
समारोप
दैनंदिन झोपेची मूलभूत प्रक्रिया, त्या संदर्भातील मेंदूतील घडामोडी आणि वयानुसार झोपेत होणारे बदल यांचा आढावा या लेखात घेतला. उत्तम आरोग्यासाठी शरीराच्या भरणपोषण आणि व्यायामाबरोबरच यथायोग्य झोपेची नितांत आवश्यकता असते. निद्राराज्यातील स्वप्नसृष्टी हा कुतुहलजनक विषय असला तरी तो स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखनाचा विषय आहे. झोपेसंबंधीच्या विविध समस्या आणि आजार हा विशेष तज्ञांचा प्रांत असून तो या लेखाच्या कक्षेबाहेर आहे.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिक अनंत काणेकर यांनी लिहिलेला ‘यथेच्छ झोपा’ हा लघुनिबंध गाजला होता आणि तो शालेय अभ्यासक्रमातही होता. त्याची स्मृती कायम राहिलेली आहे. आपल्या रोजच्या झोपेचा कालावधी हा व्यक्तीसापेक्ष असल्याचे आपण वर पाहिलेच. तेव्हा आपापल्या दिनक्रम आणि गरजेनुसार प्रत्येकाने आपापल्या झोपेचे वेळापत्रक ठरवलेले उत्तम !
****************************************************************
संदर्भ :
१. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
२. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5440010/#:~:text=62%20The%2....
३. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5810920/#:~:text=Advancing%...(4)
अतिशय माहितीपूर्ण, पण अर्थात
अतिशय माहितीपूर्ण, पण अर्थात नेहमीप्रमाणेच.
फार छान लेख.
फार छान लेख.
खूप छान झोप पुराण ! चांगली
खूप छान झोप पुराण ! चांगली झोप कार्यक्षमता वाढवते तरीही समहाऊ आपल्याकडे छान झोपलेल्या माणसांबद्दल काहीसा हेवा म्हणा सुप्त राग म्हणा असतो. “काय झोपा काढत होता का ?” वगैरे… झोपणे म्हणजे काहीतरी निगेटिव.
म्हणूनच गाढ झोपलेल्या माणसाला गदागदा हलवून विचारले की “झोपला होतास का?” तर तो बापडा “झोप कसली येतेय, जरा आडवा झालो होतो” असेच म्हणणार
चर्चा उद्घाटनाबद्दल सर्वांना
चर्चा उद्घाटनाबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
“झोप कसली येतेय, जरा आडवा झालो होतो” असेच म्हणणार
>>>>
बरोब्बर ! खरं म्हणजे असा अपराधीपणा नसला पाहिजे.
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख!
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख!
घड्याळ कसं बदलावं?
दुपारी अगदी दहा मि.जरी झोपले तर रात्री लवकर झोप येत नाही म्हणून अजिबात आडवी पण होत नाही हे जवळपास पंधरा वर्षापासून सुरू आहे. क्वचित कधी झोपले दुपारी तर आज लवकर झोप लागणारच नाही हे कितीही मनात आणायचं ठरवलं तरी होतं नाही आणि लागतच नाही झोप त्यामुळे दुपारी झोपण्याचा धसकाच घेतलाय! शरिराचं घड्याळ असं सेट झालंय की रात्री कितीही उशीरा झोपले तरी सकाळी पाचला जाग येतेच. कंटाळा आलाय ह्या घड्याळाचा
झोपे बाबत मी खूप भाग्यवान आहे
झोपे बाबत मी खूप भाग्यवान आहे . झोपेसाठी वाट बघावी लागत नाही.
झोपायचे ठरवले की लगेच झोपी जातो आणि सकाळ पर्यंत बिलकुल उठत नाही.
स्मार्ट वॉच मुळे झोपेचे circle माहीत होते.
एक चक्र पूर्ण होण्यास किती वेळ लागतो हा प्रश्न होता.
Rapit eye movements मध्ये blood pressure पण वाढते असे वाचले आहे आणि ते आपण फास्ट चालत असू तर जितके असेल तितके blood pressure वाढलेले असते.
आणि heartbeat पण वाढलेले असतात
हे सत्य आहे का?
दुपारी झोपण्याचा धसकाच घेतलाय
दुपारी झोपण्याचा धसकाच घेतलाय! >>>
सहाजिक आहे कमी अधिक प्रमाणात मी सुद्धा सहमत आहे.
दुपारची झोप वीस-पंचवीस मिनिटांच्या वर न आलेली बरी असते कारण रात्र झोपेविना तळमळत काढणे अवघड असते.
blood pressure वाढलेले असते.
blood pressure वाढलेले असते. हे सत्य आहे का?
होय, हे सत्य आहे.
झोपेच्या पहिल्या प्रकारातून दुसऱ्या प्रकारात संक्रमण होत असताना रक्तदाब वाढतो. याचे कारण शरीराच्या autonomic या चेतासंस्थेतील बदलाशी निगडित आहे. तसेच मेंदूच्या मध्यातील डोपामिन संदर्भातही काही बदल होतात.
रक्तदाब एकूणच अस्थिर होतो. दर काही वेळाने तो थोड्या थोड्या प्रमाणात वाढतो व कमी होतो (phasic surges). तो किती प्रमाणात वाढेल हे व्यक्तीसापेक्ष राहते.
छान लेख....
छान लेख....

मला परवा स्वप्न पडले गणिताचा पेपर असल्याचे. परिक्षा केंद्रावर गेलो तर हॉल टिकेट घरीच राहीले. बॅग तपासणी केली पण काही मिळाले नाही. परिक्षकाला विचारलं घरी जाऊन घेऊन येऊ का? तो वर रेल्वे इंजिना सारखा स्वास फुलला होता जाग आली तेव्हा. गणित खूप छळतयं शाळेत असल्यापासून आतापर्यंत.
माहीतीपूर्ण लेख.
माहीतीपूर्ण लेख.
झोपेचे आणि माझे सूत साधारण २४-२५ वर्षे वयानंतर नीटसे जमत नाही. सध्या निद्रानाश बऱ्यापैकी आहे.
दुपारी जेवण करून झोपल्यास विचित्रच त्रास होतो लहानपणापासून. पचन नीट होत नाही, अंगात वात भरणे म्हणतात तसे होते, फार उदासही वाटते उठल्यावर उर्वरीत दिवस खराब जातो अगदी दहा मिनिट झोपले तरी. पण सकाळी भरपेट नाष्टा करून झोपले किंवा रात्री कधी जेवल्या जेवल्या झोपले तर मात्र नाही होत असा त्रास. ( हल्ली GERD ट्रिगर्ड झाला असताना असे करता येत नाही ते वेगळे).
जास्त शारीरिक श्रम झाले असता मात्र छान निद्रासुख मिळते.
छान लेख. शनिवारच्या लोकसत्ता
छान लेख. शनिवारच्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत निद्रानाशावर वाचले आणि आज हा लेख.
छान लेख.
छान लेख.
मी power nap घेऊच शकत नाही एकदा झोपले की किमान दोन तास जाग नाही येत. असं झोपून उठलं की डोकं जड पडणं, डोकेदुखी, आळस, असं होतं.त्यामुळे कॉलेज ला असतानापासून दुपारी झोपणे बंद केले ते आजतागायत.
असंही झोप ही luxury आहे new moms साठी, रात्रीची गाढ स्वस्थ सलग झोप घेऊन ४ वर्ष होत आले आता
मला परवा स्वप्न पडले.....
मला परवा स्वप्न पडले..... परिक्षा केंद्रावर गेलो तर हॉल टिकेट घरीच राहीले.
>>>
अगदी अगदी !
लेखी परीक्षा असणे आणि प्रश्नपत्रिका बघितल्या बघितल्या त्यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर येत नसणे, हे दृश्य मी नेहमी अनुभवतो ! आजपर्यंत मला कुठल्याही ट्रेनसाठी स्थानकावर पोहोचण्यासाठी उशीर झालेला नाही. परंतु, ट्रेनचा फलाट आपल्याला न सापडणे किंवा ट्रेन निघून गेलेली असणे अशी स्वप्ने अजून मधून पडतातच.
दुपारी जेवण करून झोपल्यास
दुपारी जेवण करून झोपल्यास विचित्रच त्रास होतो लहानपणापासून. पचन नीट होत नाही >> +1
जेवणानंतर २ तास मी सरळ बसतो. त्यानंतर फक्त अर्धा तास आडवा होतो. तेव्हा दुपारचे ४ वाजून गेलेले असल्याने पूर्ण झोप येत नाही. त्याचा फायदा रात्री नक्की होतो.
२ तास सरळ बसण्यामागे विचार असा:
जेवणानंतर जठरातले अन्न पूर्णपणे आतड्यांत सरकण्याचा काळ दोन ते अडीच तास असतो. ज्यांना जठराम्ल-अधिक्य व तत्सम त्रास आहेत, त्यांना हे उपयुक्त ठरते, हा स्वानुभव.
एका वैद्यकीय तज्ञांचे मत मला खूप आवडले : दुपारची झोप (हवीच असल्यास ) आरामखुर्चीत घ्या, आडवे होऊन नको !
हो, मी दोन महिन्यांपूर्वी
हो, मी दोन महिन्यांपूर्वी अरामखुर्ची घेतली गरज पडेल तेव्हा दुपारी थोडी झोप घेता येईल कधी म्हणुन. अगदी जुन्या प्रकारची, लाकडी साचा आणि कापड. पंधरा वीस मिनिट डुलकी घेता येते.
जास्त झोपले की मात्र होतो त्रास.
लोकसत्ता चतुरंग पुरवणीत
लोकसत्ता चतुरंग पुरवणीत निद्रानाशावर >>>
छान. पाहतो.
4 जानेवारीच्या मटामध्ये डॉ. प्रसाद कर्णिक यांचा अतिनिद्रा या विषयावर लघुलेख आहे. रात्रीची पुरेशी झोप होऊनही दिवसा सारखी झोप येत राहणे, हा विकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
new moms साठी, रात्रीची गाढ
new moms साठी, रात्रीची गाढ स्वस्थ सलग झोप घेऊन ४ वर्ष होत आले आता
>>> +१ अरेरे...
बहुतेक आयांना / आई-बाबांना या टप्प्यातून जावेच लागते ! आई-बाबांच्या व तान्ह्या मुलांच्या झोपण्याच्या वेळा बऱ्याचदा बरोबर विरुद्ध निघतात.

पण हेही दिवस जाणार असतातच..
डॉक्टर जरासे थंड असले की
डॉक्टर जरासे थंड असले की चांगली झोप येते का? की हे व्यक्तीनुरुप बदलते?
कारण न्यु यॉर्कमध्ये खूप थंडी असूनही, मला चादर व ऊशी थोडे थंडच आवडतात. मग पलंगाच्या, एकदा या भागावर एकदा त्या भागवर कूस बदलत रहाते मी. शॉर्ट्स आणि टँकटॉपच लागतो. कुलिंग फॅब्रिक असलेली चादरच लागते वगैरे वगैरे.
कुमार सर समदुःखी
कुमार सर समदुःखी
गणिताचा पेपर, मारामारी झालीय आणि पळायला येत नाही किंवा हवेतून हनूमानासारखे उडत चाललोय हे काही स्वप्नांचे मासले.
M३ च्या paper ची स्वप्ने
M३ च्या paper ची स्वप्ने आताही पडतात.
गणित आवडत असलं तरी m३ म्हणजे अतिच घाबरवणारा प्रकार आहे.. विशेषकरून diploma करून engg करणाऱ्या students साठी!
भूत, हवेली आणि मी त्यांना राम नाम म्हणून हरवून घरी आले अशीही स्वप्ने पडतात खूपदा मला
मला कुठल्याही विषयाबद्दल
मला कुठल्याही विषयाबद्दल - थोडक्यात परिक्षेबद्दल - अशी स्वप्ने पडतात. आज पेपर आहे हेच विसरलोय आणि एक तास उशीर झालाय वगैरे.
त्यात आपण प्रॅक्टिकल्सचे क्लासेस अजिबात अटेंड केले नाहीय सरांनी प्रिन्सिपलकडे तक्रार केलीये असे स्वप्न नेहमी पडते, आणि प्रत्यक्षात मात्र एकही चुकवत नसे खूप आवड असल्याने.
जरासे थंड असले की चांगली झोप
जरासे थंड असले की चांगली झोप येते का?
>>> माझ्या बाबतीत तरी होय !
पण व्यक्तीसापेक्षता आहे. काही माणसांचा शारीरिक गुणधर्म अति थंडी वाजण्याचा तर काहींचा त्याबरोबर विरुद्ध असतो.
पण सर्वसाधारण हिवाळ्यामध्ये अंधार लवकर पडणे, कडाक्याची थंडी आणि रजईत गुरफटणे या गोष्टींमुळे गाढ झोपेचा कालावधी वाढतो.
छान अनुभवकथन सर्वांचे !
छान अनुभवकथन सर्वांचे !
आता अभियंता मंडळी त्यांच्या स्वप्नांवर सुरू झाली आहेत तर मी पण थोडा वैद्यकीय अनुभव लिहितो
प्रथम वर्ष वैद्यकीयला शरीररचनाशास्त्र हा अत्यंत किचकट आणि अति पाठांतराचा विषय असतो. त्याच्या दोन प्रश्नपत्रिका असतात. त्यातल्या दुसरा भाग मुख्यत्वे मेंदूच्या अभ्यासाचा. माझ्या वेळेस प्रत्येक प्रश्न 16 किंवा 17 मार्कांचा असायचा (अलीकडे बरेच सुलभ केले आहे). त्यामुळे त्याची जबरदस्त भीती असायची. टे .. र.. र !
इतक्या वर्षानंतर आजही मी त्या विषयाच्या दुसऱ्या भागाच्या परीक्षेच्या आधीची रात्र विसरू शकत नाही. बराच वेळ जागून बऱ्याच गोष्टी घाईने वाचत होतो. नंतर गाढ झोप लागली. त्यात, घरच्यांनी सांगितल्यानुसार अक्षरशः बरळत होतो. म्हणजे वास्तवातली भीती खरोखर स्वप्नात उतरली.
असला प्रकार नंतरच्या आयुष्यात बहुदा कधी झालेला नाही !
मला पण आज गणिताच्या किंवा
मला पण आज गणिताच्या किंवा इंग्लिशचा पेपर आहे आणि हे मला आत्ताच माहित पडलेय, त्यामुळे प्रचंड भीती वाटते आहे अशी स्वप्न पडतात. गम्मत म्हणजे विद्यार्थी दशेत मला या विषयांची कधीच भीती वाटली नव्हती.
झोपेत पण माणसाचा sixth सेन्स
झोपेत पण माणसाचा sixth सेन्स चालू असावा.
कारण अगदी दोन फुटाच्या बाकड्यावर पण काही लोक रात्र भर झोपतात पण झोपेत कुस पण बदलत नाहीत.
कुस जरी बदलली तरी त्या बाकड्या वरून खाली पडण्याची शक्यता असते.
आणि ही जाणीव झोपेत पण असते.
मी दहावीत असताना आम्ही तिघे मित्र एकाच कॉट वर अंगणात झोपत असू.
खूप कमी जागा असायची तीन जणांसाठी मी नेहमी कडेला च झोपायचो पण कधीच खाली पडलो नाही.
झोपेत पण ही काळजी कशी काय घेतली जाते हा प्रश्न मला आज पण पडतो.
प्रवासात मी बस मध्ये सरळ बसून झोपतो पण बाजूच्या व्यक्ती च्या खांद्यावर कधीच मान जात नाही.
सरळ बसून च झोपतो.
एकट्याने प्रवास करताना,
एकट्याने प्रवास करताना, रेल्वेच्या बाकड्यावर (बर्थवर) झोप येत असते परंतू सामान चोरीला जाईल या भीतीने जागे राहावे लागते. झोपेचे खोबरे होणे याचा अनुभव.
_________________________
मनोरंजन क्षेत्रातील लोकांचा दिवस रात्र घड्याळ वेगळे असते. 'लवकर झोपेच्या' पाच तास पुढे.
मी नेहमी कडेला च झोपायचो पण
मी नेहमी कडेला च झोपायचो पण कधीच खाली पडलो नाही. >> खाली पडायचे नसेल तर एक उत्तम उपाय आहे. पलंगाच्या कडेला हाताच्या कुशीवर झोपायचे. झोपेत आपण ३६० अंशात कधीच वळत नाही, फार तर १८० अंशात वळतो. (म्हणजे पाठीवरून हाताच्या कुशीवर आणि तसेच पुढे पोटावर असा प्रवास कधीच होत नाही.)
२ प्रश्न:
१. डोक्याला तेल लावले तर शांत झोप लागते, याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण काय आहे?
२. कितीही थंडी असली किंवा AC असला तरी अंगावर थेट वारा घेत झोपायची मला सवय आहे. ही acquired सवय आहे की याचा झोपेशी थेट संबंध आहे?
झोपेत पण ही काळजी कशी काय
झोपेत पण ही काळजी कशी काय घेतली जाते हा प्रश्न
>>>
याला शरीरशास्त्रात proprioception असे म्हणतात. ही फार महत्त्वाची यंत्रणा आहे.
तिच्यामुळे आपल्याला आपल्या शरीराच्या स्थानाची योग्य ती जाणीव जागेपणी अथवा झोपेतही नेहमी असते.
झोपी जाताना आपण पलंगाचे आकारमान व कड वगैरे गोष्टी पाहिलेल्या असतात. ते संदेश मेंदूत कुठेतरी ही जाणीव 'जागृत' ठेवतात.
मनोरंजन क्षेत्रातील लोकांचा
मनोरंजन क्षेत्रातील लोकांचा दिवस रात्र घड्याळ वेगळे असते
>>>
चांगला मुद्दा.
मध्यंतरी ‘मित्र म्हणे’ या मुलाखत कार्यक्रमात निवेदिता सराफ यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी नाटकांच्या प्रयोगांच्या वेळा ( विशेषता दुपारच्या) यावर बऱ्यापैकी भाष्य केलेले आहे. संयोजकांनी त्या वेळा ठरवताना कलाकारांच्या जेवणाच्या योग्य त्या वेळेची देखील काळजी घेतली जावी असे त्यांनी म्हटले आहे.
कलाकारांच्या बाबतीत जेवण व झोप या गोष्टी एकंदरीतच बिघडतात आणि त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत असतो.
१. डोक्याला तेल लावले तर
१. डोक्याला तेल लावले तर शांत झोप लागते, याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण
>>> मला माहित नाही आणि ते वैद्यकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये कधीही वाचण्यात आलेले नाही. अर्थात लहान मुलांच्या बाबतीत लेखात मी थोपटणे आणि mechanoreceptors याचा उल्लेख केलेला आहे. तसे मोठ्यांत डोक्याला मसाज किंवा ते ताबडून घेणे याचा संबंध आहे का, यावर शोध घ्यावा लागेल. ?
२. अंगावर थेट वारा घेत झोपायची मला सवय आहे. ही acquired सवय आहे की >>>
माझ्या मते तरी ही acquired आहे.
Pages