संबंधित व्यक्तींची आणि हॉस्पिटल/बँकची नावं बदलून लिहिलेली ही एक सत्यकथा आहे.
ह्या सत्यकथेला दोन पार परस्परविरोधी अंगं आहेत -- एक "स्वर्गकथे"चं, आणि दुसरं "नरककथे"चं.
--------------------
त्यांपैकी "स्वर्गकथा" अंगातल्या दोन व्यक्ती शुभा आणि माझी ताई.
शुभा.
वयाच्या सोळाव्या वर्षी तिच्या आईवडिलांनी लग्न करून दिलेली आणि नववीपलिकडे लौकिकार्थाने "शिक्षण" घेण्याची संधी कधीच न मिळालेली, पण कमालीची बुद्धिमान, अतिशय सुसंस्कृत, अतिशय विचारी, आणि अतिशय थोर मनाची अशी ३९ वर्षांची शुभा. ('अतिशय" हे क्रियाविशेषण अव्यय मला तीनदा वापरावंच लागलं आहे.)
सध्याच्या आठ अब्जहून जास्त जनगणनेच्या विशाल जगात शुभासारखे स्त्रीपुरुष कुठे ना कुठे लाखात एक असणारच, पण वर लिहिल्याप्रमाणे लौकिकार्थाने "शिक्षण" घेण्याची संधी कधीच न मिळालेली, आणि तरीही कमालीची बुद्धिमान, अतिशय सुसंस्कृत, अतिशय विचारी, आणि अतिशय थोर मनाची अशी शुभा ही असामान्य व्यक्ती माझ्या सध्याच्या ८३ वर्षांच्या आयुष्यात २२ महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच आली हे खरं.
माझ्याहून दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या आणि मुंबईत तिचं सबंध आयुष्य जगलेल्या माझ्या विधवा बहिणीचं -- ताईचं -- मुंबईतल्या "रामचंदानी हॉस्पिटल"मधे तिच्या ९३व्या वर्षी नुकतंच २५ नोव्हेंबर २०२३ला निधन झालं. त्यापूर्वी २२ महिने परिचारिका म्हणून शुभाने माहीमला ताईच्या घरी दिवसा आणि रात्री राहून ताईची पूर्ण समर्पणभावाने काळजी घेतली. शुभा ताईला "आई" असं संबोधत असे. (संदर्भाखातर, माझं वास्तव्य गेली सहा दशकं अमेरिकेत आहे.)
ताई.
व्यवसायाने शिक्षिका -- तिच्या शाळेतल्या तमाम शिक्षकगणात सगळ्यात उत्कृष्ट शिक्षिका आणि त्याच वेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरता तळमळ राखणारी शिक्षिका म्हणून तिच्या कित्येक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींमधे कमालीची प्रिय असलेली. आपल्या अंवतीभोवतीच्या माणसांचं चांगलं व्हावं ही भावना राखणारी. तिची आणखी एक असामान्यता अशी की वयाच्या ७०व्या वर्षी "मराठी भाषा" ह्या प्रांतात एक प्रबंध लिहायला सुरवात करून तिने दोन वर्षांनी पीएच्.डी. पदवी मिळवली होती.
--------------------
आता ह्या सत्यकथेच्या "नरककथा" अंगाचा सुरवातीलाच सांगायचा, कोणाचाही विश्वास बसणार नाही असा केन्द्रीय भाग असा --
माझ्या ताईचं मुंबईतल्या रामचंदानी हॉस्पिटलमधे जे नुकतंच निधन झालं ते पुण्यात वास्तव्य असलेल्या तिच्या हरीश नावाच्या ६२ वर्षांच्या एकुलत्या एका मुलाने आणि त्याच्या वंदिनी नावाच्या बायकोने त्या हॉस्पिटलमधल्या एका निर्दय "कर्मचाऱ्या"ला पुरेसे पैसे चारून -- त्यांच्या दृष्टीने "खूप चलाखीने" -- घडवून आणलेल्या खुनामुळे.
--------------------
हरीश आणि वंदिनी.
१९६१ साली त्याच्या अतिशय सज्जन आईवडिलांच्या पोटी त्यांच्या कमालीच्या म्हणजे कमालीच्या दुर्दैवाने जन्माला आलेला हरीश १२ वर्षांचा होईपर्यंत चांगला वागत होता. त्यानंतर एके दिवशी "त्याच्या अंगात कुठलातरी 'सैतान' अचानक अवतरला."
शाळेत जाण्याचं अजिबात बंद करून दिवसभर कुठेतरी भटकणं त्याने सुरू केलं.
पुढची बारा वर्षं दिवसभरचा वेळ तो नेमका कसा घालवत होता हे त्याचे वडील १९८५ साली (त्याच्या त्या बारा वर्षांमधल्या सैतानी वागणुकीपायी झालेल्या असह्य मानसिक ताणाने) एका तीव्र झटक्याने हृदय बंद पडून मृत्यू पावेपर्यंत त्यांना, आणि त्यानंतरही त्याच्या आईचा त्याने आणि त्याच्या बायकोने रामचंदानी हॉस्पिटलमधे नुकताच खून घडवून आणेपर्यंत गेली ३८ वर्षं तिला कधीच कळलं नव्हतं.
१९७३ -१९८५ सालांच्या बारा वर्षांमधे दिवसा कुठेतरी उपाहारगृहांमधे एकट्याने किंवा त्याच्यासारख्याच टवाळखोरांसमवेत जेवण्याकरता, चित्रपट पहाण्यात वेळ घालवण्याकरता तिकिटं विकत घेण्याकरता, सिगरेटी विकत घेण्याकरता, अशा प्रकारच्या अज्ञात "हातखर्चां"करता आईला मारहाण करून तिच्याकडून पैसे उकळण्याचं काम सैतान हरीश नेमाने करत असे आणि रात्री केव्हाही आठ-दहा-बारा वाजता झोपायला घरी येत असे.
एकदा त्याच्या आईने त्याला पैसे देण्याचं नाकारल्यावर हा नराधम तिच्या गालाला रागाने चावला होता, आणि त्यामुळे तिचा तो गाल सुजून कित्येक दिवस काळानिळा झाला होता; तरी त्या अवस्थेत तिला शाळेत शिकवायला जावं लागलं होतं. सहशिक्षिकांनी/विद्यार्थिनींनी "बाई, तुमच्या गालाला काय झालं" असं मग साहजिकपणे विचारलं असता तिला काहीतरी सारवासारव करावी लागली होती. एकदा त्याने मागितलेले पैसे देण्याचं तिने नाकारल्यावर त्याने घरातला एक मोठा किंमती आरसा फोडून टाकला होता. एकदा दिवसभर कुठेतरी भटकून अगदी खूप रात्री घरी आल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला त्याबद्दल जाब विचारला असता त्याने त्यांना घराबाहेर घालवून आतून कडी लावून अख्खी रात्र घराबाहेर बसवलं होतं.
त्याच्या ह्या बारा वर्षांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात वेळ घालवण्याकरता कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दुय्यम-तिय्यम दर्जाच्या "नेत्यां"च्या आदेशांनुसार काहीतरी सटरफटर कामं करणं हरीशने सुरू केलं होतं. त्यांपैकी एक काम त्याला देण्यात आलं होतं ते म्हणजे पोलिसांची नजर चुकवून त्यावेळी सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात भिंतींवर भित्तीपत्रकं चिकटवणं. ते काम तो बावळटपणे करत असताना पोलिसांनी त्याला पकडून तुरुंगात डांबलं होतं आणि मग तिथे त्याला नागडं करून चामड्याच्या पट्ट्यांनी झोडपून त्याच्याकडून त्याच्या "नेत्यां"ची नावं मिळवली होती.
त्याला तुरुंगात डांबल्याची वार्ता त्याच्या सज्जन आईवडिलांच्या कानावर आल्यानंतर पार हादरून त्याचे वडील त्यांच्या एका स्नेह्याबरोबर तुरुंगाच्या अधिकाऱ्याला भेटायला गेले, आणि त्यांनी आपल्या ह्या चिरंजीवाला तुरुंगातून कसंतरी सोडवून आणलं. त्या घटनेनंतर थोड्याच दिवसात एका तीव्र झटक्याने हृदय बंद पडून त्यांचं निधन झालं.
वडिलांच्या मृत्यूनंतर हरीशच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला तो असा की आता पहिल्यांदा शालांत परीक्षा पास करून आणि मग बी.ए.सारखी एकादी बाह्य पदवी पदरात पाडून घेऊन कुठेतरी मामुली नोकरी मिळवल्यावाचून आपली धडगत नाही. तसं त्याने केलं.
त्यानंतर आगटे नावाच्या त्याच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वीच्या एका निकटच्या स्नेह्यांनी दयाळूवृत्तीने आपलं वजन खर्च करून पुण्यातल्या "समता बँक"मधे त्याला एक मामुली नोकरी मिळवून दिली.
थोड्या वर्षांनी हरीशचं लग्न झालं आणि मग थोड्याच वर्षांमधे त्याचा आपल्या बायकोशी घटस्फोट झाला. नंतर १९९८ साली घटस्फोटित वंदिनीशी त्याचं दुसरं (अ)शुभमंगल झालं. "अशुभमंगल" म्हणायचं कारण असं की वंंदिनी कल्पनेबाहेर सैतानी वृत्तीचीच निघाली, आणि मग तिच्या संगतीत त्याआधीच्या १९८५ - १९९८ ह्या सालांमधल्या तेरा वर्षांच्या अवधीत हरीशच्या अंगातला बऱ्यापैकी शमलेला "सैतान" हळुहळू पुन्हा एकदा अधिकाधिक उफाळून आला.
ताई नेहमी मुंबईत माहीममधे आपल्या 1BHKमधे राहिली, आणि हरीश-वंदिनींकरता ताईने पुण्यामधे विकत घेतलेल्या 2BHKमधे ते दोघे -- बिनभाड्याने -- राहत आले. हरीशने आपल्याला अधूनमधून भेटायला यावं म्हणून मृत्यूपूर्वीची सुमारे चोवीस वर्षं ताईच्या हरीशला सतत विनवण्या असत. तेव्हा १९९८ - २०१६ ह्या सालांमधे वर्षातून फार तर दोन वेळा आपल्या आईला आपलं तोंड दाखवायची मेहरबानी करण्याकरता हरीश वंदिनीसमवेत माहीमला एक दिवस येऊन राहून पुण्याला परत जात असे. ह्या "पर्वणीं"मधे ताई त्या दोघांचं हर्षभराने इतकं कोडकौतुक करत असे की बस.
२०१७ - २०२० सालांमधे हरीशने चक्रमपणे आपल्या आईशी फोनवरून बोलणंही अजिबात बंद करून टाकलं. (त्याच वेळी त्याने माझ्याशीही फोनने संवाद/संबंध पूर्णपणे तोडून टाकला.)
२०२० साली करोनाच्या साथीत सापडून ताई हॉस्पिटलमधे एक आठवडा जाऊन आली. ते वृत्त त्रयस्थामार्फत हरीशला समजल्यानंतर अचानकपणे -- त्याच्या "हृदयात फार दयाबुद्धी निर्माण झाल्यामुळे" असावं -- त्याने आपल्या आईशी फोनवरून बोलणं सुरू केलं. गंमत म्हणजे त्याच्या त्या बोलण्यांमधे आपल्या आईच्या क्षेमकुशलाबद्दल प्रथम पंधरावीस सेकंद कोरडी विचारणा झाल्यानंतर उरलेल्या वेळात ताईला काहीही रस नसलेल्या कुठल्यातरी सटरफटर गोष्टींबद्दल तो बडबड करत असे. पण निदान त्या वेळी त्याचा आवाज ऐकायला येत आहे ही देवाची कृपा असल्याचं मानून ताई त्याची बडबड ऐकत असे.
पण २०२० - २०२३ ह्या कालखंडामधेही "मला एकदा तरी भेटून जा ना" अशी त्याच्या आईने -- विशेषतः दिवाळीसारख्या प्रसंगी -- हरीशला फोनवरून वारंवार विनवण्या करूत राहूनही -- आणि आपली सुमारे पाच कोटी किंमतीची एकूणएक स्थावर-जंगम मालमत्ता एकमेव हरीशला दिल्याचं नमूद असलेलं आपलं रजिस्टर्ड मृत्युपत्र तिने आपल्या निधनापूर्वी तीन वर्षं हरीशच्या हवाली केलं असूनही -- तो नराधम तिला एकदाही भेटायला आला नव्हता.
--------------------
१४ नोव्हेबर ते २७ नोव्हेंबर २०२३ ह्या दरम्यानच्या काही फक्त अगदी मोजक्या घटना --
१४ नोव्हेंबरला ताईच्या पचनक्रियेत काही बिघाड झाल्यावर दक्ष शुभाने ताईच्या डॉक्टर बादलना फोन करून त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं मागवली. पण तीन दिवस ती औषधं ताईला गुणकारी न ठरल्याने तिने १७ नोव्हेंबरला रात्री ताईला रामचंदानी हॉस्पिटलमधे नेण्याचं ठरवलं. (तीन वर्षांपूर्वी करोनाच्या साथीत सापडून त्या हॉस्पिटलमधे ताई गेली होती तेव्हापासून आपल्या व्यवसायात तज्ञ असलेले आणि त्याच्या जोडीला रुग्णांबद्दल अतिशय आस्था बाळगणारे तिथले डॉक्टर बादल ताईचे आवडते डॉक्टर झाले होते, आणि त्यांनीही ताईबद्दल खास आस्था राखली होती.) ताईला हॉस्पिटलमधे नेल्यानंतर कर्तव्यानुसार शुभाने ती गोष्ट हरीशला फोनने कळवली.
दुसऱ्या दिवशी अगदी अनपेक्षितपणे वंदिनीचा शुभाला फोन आला तो असा - "उद्या सकाळी साडेअकराच्या सुमाराला हरीश आणि मी माहीमला सासूबाईंच्या घरी येत आहोत, तर तुम्ही आमच्याकरता सहा पोळ्या, भात, बटाट्याचा रस्सा, टमाटो-काकडीची कोशिंबीर, लोणचं, पापड आणि दही असा स्वैपाक तयार करून ठेवा. बटाटे चिरताना उभे चिरा."
आपल्या अगदी कौतुकास्पद विचारपरिपक्वतेतून निर्माण झालेला संयम राखून शुभाने माजलेल्या आणि अतिमूर्ख वंदिनीचा तो हास्यास्पद आणि जगाआगळा "हुकूम" शांतपणे पाळला.
माजलेल्या आणि अतिमूर्ख वंदिनीने आधल्या २२ महिन्यांमधे फोनवरून शुभाशी अधूनमधून केलेलं वरच्या प्रकारचं गुर्मीचं बोलणं तिने जसं अनुभवलं होतं तसंच काही वेळा वंदिनीच्या मनात तिला "उचित" भासेल त्या त्या प्रसंगी तिचं -- हास्यास्पद रितीने केलेलं -- "मधाच्या पोळ्यासारखं गोड, गोड" बोलणंही अनुभवलं होतं. (उचित प्रसंगी) “मधाच्या पोळ्यासारखं वंदिनीताईंचं गोड, गोड बोलणं" ही उपमा बुद्धिमान शुभाने माझ्याकडे बोलताना एकदा वापरली होती.
१९ नोव्हेंबरला हरीश-वंदिनींच्या मुंबईत अगदी अनपेक्षितपणे अवतरण्यामागचा -- पुढे सहा दिवसांमधे उघड झालेला -- त्यांचा एकमेव हेतू मी ह्या सत्यकथेच्या काहीशा सुरवातीला सुचवला आहे.
१९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर ह्या काळात हरीश आणि वंदिनी ताईला हॉस्पिटलमधे आपली तोंडं अधूनमधून दाखवून जात होती. त्या काळात त्या दोघांचे काय काय कमालीचे नीच आणि निष्ठुर उद्योग चालू होते त्यांचं निरीक्षण बुद्धिमान शुभा करत होती, आणि मला कळवत होती.
तिचं कथन अगदी १०० टक्के वास्तवपूर्ण असल्याची माझी पूर्ण खात्री आहे ह्याचं कारण शुभा, हरीश, आणि वंदिनी ह्या
तिघांच्या मनाची घडण मी पूर्णपणे ओळखलेली आहे. शुभाच्या मनाची घडण जशी एका टोकाची, अतिशय थोर आणि सुंदर, तशीच हरीश आणि वंदिनी ह्या दुकलीच्या मनाची घडण पार दुसऱ्या टोकाची, मनुष्यसमाजाला वेगवेगळ्या प्रकारांनी खूप म्हणजे खूप लाजिरवाणी, अगदी किळसवाणी.
२३ तारखेला सकाळी ११च्या सुमाराला शुभाखेरीज हॉस्पिटलमधे काम करणारी दोन माणसं ताईजवळ असताना हरीश-वंदिनी ह्या दुकलीने बेलाशकपणे उघडपणे पहिला मोठा कायद्यानुसार गुन्हा केल्याचं शुभाने त्यांच्या त्या गुन्ह्यानंतर अर्ध्या तासात मला सांगितलं. तो गुन्हा असा -- त्या वेळी ताईच्या हाताच्या आंगठ्याला शाई लावून ताई जोराने प्रतिकार करत असतानाही तिचा हात घट्ट पकडून हरीश-वंदिनी दुकलीने एका दस्तऐवजावर तिच्या हाताचा आंगठा जबरदस्तीने उमटवून घेतला होता.
२४ तारखेला सकाळी बादल डॉक्टर ताईची तपासणी करायला आले तेव्हा त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या शुभाला ताई नक्की बरी होऊन घरी परतणार आहे असं आश्वासन दिलं होतं, "continue same treatment” असं ताईच्या रेकॉर्डमधे लिहिलं होतं, त्यांच्या सूचनेनुसार हॉस्पिटलमधल्या एका परिचारिकेने ताईला व्यायामाकरता थोडं फिरवून आणलं होतं, आणि दुपारी (बादल डॉक्टरांच्या सूचनेनुसार) एका फिजिकल थेरपिस्टने ताईच्या शरीरावर उपचार केले होते.
बादल डॉक्टरांखेरीज हॉस्पिटलमधले मेहता नावाचे एक पचनक्रियातज्ञ डॉक्टर ताईच्या पचनक्रियेतल्या बिघाडावर इलाज करत होते. त्यांच्या इलाजांनी तो बिघाड बरा झाल्यानंतर ताई आपल्या घरी नक्की परत जाणार आहे असं मेहतांनीही २४ तारखेलाच दुपारी चारच्या सुमाराला शुभाला सांगितलं होतं. कर्मधर्मसंयोग असा की आधी २२ तारखेला मेहतांचा ताईवर कोलनॉस्कॉपी करायचा जो विचार चालला होता, तो विचार आपण बदलल्याचं आणि ताईवर कोलनॉस्कॉपी करायची गरज नसल्याचं बोलताबोलता त्यांनी शुभाकडे त्यावेळी म्हटलं होतं.
२४ तारखेच्या संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता शुभा हॉस्पिटलमधून ताईच्या घरी आली. हरीश-वंदिनी दुक्कल त्यावेळी घरीच होती. थोड्या वेळाने वंदिनी शुभाला म्हणाली -- "आम्हाला हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आलाय्, आणि सासूबाईंवर उद्या कोलनॉस्कॉपी करण्याबद्दल आम्हाला हॉस्पिटलमधे तातडीने बोलावलंय्."
पार चकित होऊन शुभा म्हणाली -- "कोलनॉस्कॉपी? तीन तासांपूर्वीच कोलनॉस्कॉपीची गरज नसल्याचं डॉक्टर मला म्हणाले! आणि आई माझ्याशी अगदी नीट बोलत होत्या, बादल डॉक्टरांनी 'आई घरी नक्की जाणार आहेत' असंही मला सकाळी म्हटलं होतं, एका फिजिकल थेरपिस्टने आईवर थेरपी केली होती!..." "तुम्हाला मेडिकल गोष्टींमधलं काही कळत नाही" असं काहीतरी वंदिनीने शुभाला म्हटलं आणि मग हरीश-वंदिनी दुक्कल लवकरच घराबाहेर पडली.
सुमारे अडीच तासांनी ती दुक्कल घरी परतली, आणि वंदिनी शुभाला म्हणाली, "शुभाताई, सासूबाई सकाळपर्यंत जगणार नाहीत असं डॉक्टर आम्हाला म्हणाले आहेत हो!"
पायाखालची जमीन सरकल्यासारखी शुभा उद्गारली, "काय म्हणताय् हे? हे कसं शक्य आहे? मी फक्त सहा तासांपूर्वी आईंशी बोलले. त्यावेळी त्या माझ्याशी अगदी नीट बोलल्या!..."
"काही वेळा माणसांची वेळ येते" अशा प्रकारचं काहीतरी वंदिनी म्हणाली, आणि मग थोड्या वेळात हरीश-वंदिनी ताईच्या 1BHKमधल्या बेडरूमचं दार बंद करून झोपायला गेले.
शुभा हॉलमधल्या आपल्या पथारीवर आडवी झाली. सबंध रात्र ती साहजिकपणे कमालीच्या अस्वस्थ अवस्थेत बहुतांशी जागी असताना (२५ नोव्हेंबरच्या) पहाटे चार वाजता वंदिनी हॉलमधे येऊन शुभाला म्हणाली -- "शुभाताई, शांत रहा... हॉस्पिटलमधून आम्हाला आत्ताच फोन आला की सासूबाई गेल्या." शुभाला हे सांगताना -- आणि त्यानंतर पुढे केव्हाही -- वंदिनीची स्वतःची मनःस्थिती "विशेष काही न घडल्यासारखी" शांत होती! अविश्वसनीयपणे हरीशनेही ढोंगाखातरसुद्धा आपली आई निवर्तल्याबद्दल काहीएक दुःख शुभाच्या पुढ्यात प्रदर्शित केलं नव्हतं.
उलट, अतिशय थोर आणि इमानी शुभाची त्यानंतरची मनःस्थिती कशी कमालीची शोकग्रस्त होती ह्याची मला इथे २०,००० किलोमीटर अंतरावरूनही चांगली कल्पना आहे.
पुढचे दोन तास पाषाणहृदयी हरीश-वंदिनी दुकलीने आपापले प्रातर्विधी घाई न करता केले, दात घासले, हरीशने दाढी केली, दोघांनी आंघोळी केल्या, स्वैपाकघरात येऊन कॉफी केली, दोघे ती प्याले -- त्यांपैकी हरीशने नेहमीप्रमाणे कॉफीचे तीनचार कप रिचवले -- दोघांनी बिस्किटं खाल्ली, (त्या वेळी आपण बिस्किटं खाताना "हरीश, तुला आणखी बिस्किटं हवीत का?" अशी वंदिनीने आपल्या नवऱ्याकडे "आस्थापूर्वक" विचारणा केली), आणि मग कपडे करून ही दुक्कल हॉस्पिटलकडे निघाली.
मात्र निघण्यापूर्वी वंदिनीने शुभाला ताकीद दिली ती अशी -- "मी तुम्हाला फोन करेपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमधे न येता घरीच रहा. आणि सासूबाई गेल्याची बातमी आम्हीच कोणाला सांगायची ती सांगू; तुम्ही कोणाला सांगून नसता गाजावाजा करू नका."
वंदिनीने शुभाला वर म्हटलेली "ताकीद" दिली होती, म्हणून ते दोघे घराबाहेर पडेपर्यंत थांबून शुभाने मला लगेच फोन केला. "आई गेल्या'' हे शब्द तोंडातून उच्चारणं तिला अशक्य म्हणजे अशक्य होतं. धाय मोकलून, मोकलून तिने जे काही मला तुटक तुटक सांगितलं त्यावरून ताई गेली असणार असा मी अंदाज बांधला, पण "आई गेल्या” असं शुभाने कधीच न म्हटल्याने मला त्या गोष्टीची १०० टक्के खात्री वाटली नाही.
तरीही त्या नराधम हरीश आणि वंदिनी ह्या दुकलीच्या शौचकूपासारख्या मनोवृत्तीची मला चांगली कल्पना असल्याने त्यांनी ताईचा हॉस्पिटलमधे -- त्यांच्या दृष्टीने "खूप चलाखीने" -- बहुतेक खून घडवून आणला असणार हेही माझ्या लक्षात आलं.
सकाळच्या आठ वाजण्यापूर्वी डॉक्टर बादल हॉस्पिटलमधे येण्याची शक्यता कमी आहे असा विचार करून मी आठ वाजून पाच मिनिटांनी त्यांना फोन केला, पण ते त्यांचा मोबाइल फोन त्यावेळी उचलण्याची शक्यता मला खूप कमीच भासली होती.
आश्चर्यात आश्चर्य, डॉक्टर बादलनी त्यांचा फोन लगेच उचलला. (मी कोण ते त्यांना माहीत होतं.) शुभाने मला जे तुटक तुटक सांगितलं होतं त्यावरून मी बांधलेला अंदाज मी त्यांना अर्धामुर्धा सांगून त्यांच्याकडून ताई खरोखरच गेल्याची खात्री करून घेतली, आणि मग मी त्यांना लगेच माझी तातडी दाखवून ताईच्या मृतदेहावर त्यांनी लवकरात लवकर autopsy करवून घ्यावी अशी माझी इच्छा असल्याचं सांगितलं. पाषाणहृदयी हरीश-वंदिनींनी ताईचा खून घडवून आणण्याचं केलेलं दुष्कृत्य डॉक्टर बादलांच्या अर्थात केव्हाच लक्षात आलं होतं. ताईच्या मृतदेहावर सायन हॉस्पिटलमधे autopsy करवून घेण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलं, आणि मग मी त्यांना केलेली माझी विनंती हरीश-वंदिनींना रीतसर सांगून autopsyची त्यांनी तजवीज केली.
डॉक्टर बादलनी हरीश-वंदिनींना माझी विनंती सांगितल्यावर ते दोघे अर्थात चमकले.
पण त्यांच्या नरककथेचा उत्तरार्ध अजून पुढे आहे.
हरीश-वंदिनींनी जलदीने हॉस्पिटलजवळच्या एका ए.टी.एम.मधून "पुरेसे" पैसे आणले.
ताईचा मृतदेह सायन हॉस्पिटलमधे नेण्यात आल्यानंतर तिथे त्याच्यावर सुमारे चार तास तथाकथित autopsy झाली.
वाचकहो, विश्वास ठेवा किंवा न ठेवा, त्या चार तासांमधे हरीश-वंदिनी, हरीशचे दोन "मित्र", वंदिनीचा ठाण्याहून आलेला एक भाचा ह्या मंडळींचा त्या हॉस्पिटलमधल्या एका बाकावर -- एकमेकांना खेटून बसून -- हसतखिदळत गप्पा झाल्या, आणि दुपारी एका उपाहारगृहामधे जेवण झालं. मग तथाकथित autopsy झाल्यानंतर (२५ तारखेच्या) संध्याकाळी सहाच्या सुमाराला हरीश-वंदिनींनी ताईच्या मृतदेहाची जबाबदारी दिली गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला एक पुडकं देऊन त्याच्याकडून कपड्यांमधे गुंडाळलेला ताईचा मृतदेह आणि एक "दस्तऐवज" आपल्या ताब्यात घेतला, तो दस्तऐवज एकत्रपणे वाचला, वंदिनीने तो आपल्या पर्समधे ठेवला, आणि मग त्यांनी पूर्वतयारीने सायन हॉस्पिटलच्या दारात आणून ठेवलेल्या एका शववाहक गाडीत कपड्यांमधे गुंडाळलेला ताईचा मृतदेह घालून घेऊन तो "शिवाजी पार्क दहनभूमी"त नेला.
वाचकहो, तिथल्या विद्युद्दाहिनीत ताईचा मृतदेह घालण्याकरता तिथले कर्मचारी तो नेण्यापूर्वी "तुम्हाला कोणाला दाखवण्याकरता सासूबाईंच्या (कपड्यात गुंडाळलेल्या) मृतदेहाचा व्हिडिओ काढायचा आहे का?" अशी भेसूर पृच्छा वंदिनीने तिथे उपस्थित असलेल्या शोकग्रस्त शुभाला खोचकपणे केली!! (वंदिनीच्या भाच्यालाही ती पृच्छा इतकी क्रूर भासली होती की "मावशी, जाऊ दे ना" असं त्यावेळी त्याने त्या महापापी वंदिनीला म्हटलं. हरीश गप्प होता.)
त्यानंतर हरीश-वंदिनी ही दुक्कल ताईच्या -- म्हणजे आता ह्यापुढे त्यांच्या "स्वतःच्या" झालेल्या -- माहीमच्या घरी परतली.
मात्र त्या रात्री शुभाने "त्यांच्या" घरी झोपायला न येता मुंबईतल्या तिच्या स्वतःच्या घरी जावं आणि मग वंदिनी तिला फोन करून सांगेल त्या दिवशी/वेळी तिने त्यांच्या घरी येऊन आपली पथारी आणि आपल्या गोष्टी घेऊन जाण्याकरता यावं, तिचा पगार गूगल पेद्वारे तिच्या खात्यात जमा होईल, अशी सूचना वंदिनीने शुभाला दिली होती.
२७ नोव्हेंबरला सकाळी वंदिनीने शुभाला फोन करून त्या दुपारी त्यांच्या घरी येण्याबद्दल कळवलं. त्याप्रमाणे शुभा तिथे गेल्यानंतर तिने आपल्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या डोळ्यांदेखत आपल्या पिशव्यांमधे घातल्या, आपली पथारी घेतली, आणि त्या गोष्टी तिने हळूहळू दाराबाहेर देल्यानंतर वंदिनीने घराचं दार धाडकन् बंद केलं.
---------------------
वाचकहो, फक्त संबंधित व्यक्तींची नावं बदलून लिहिलेली ही एक सत्यकथा आहे, आणि तीही तिच्या "नरककथा" अंगातल्या अगदी मोजक्या घटनांचं थोडक्यात वर्णन करून लिहिलेली. (१९ नोव्हेंबर - २७ नोव्हेंबर ह्या आठ दिवसांमधल्या -- शुभाने मला सांगितलेल्या -- हरीश-वंदिनी दुकलीच्या इतर किळसवाण्या वागणुकींचं वर्णन मी इथे करत बसत नाही.)
ह्या सत्यकथेतल्या "नरककथा" अंगाचा सारांश असा --
१९६१ साली जन्माला आलेल्या हरीशने आपल्या आयुष्यातल्या पहिल्या १२ वर्षांनंतरची १२ वर्षे त्याच्या अतिशय सज्जन आणि अतिशय प्रेमळ आईवडिलांच्या आयुष्यात त्याच्या सैतानी -- क्रूर आणि विकृत -- वागणुकीने पराकाष्ठेचे क्लेश आणले. ते इतके की त्याचे वडील त्या क्लेशांमुळे त्यांचं हृदय बंद पडून १९८५ साली मृत्युमुखी पडले.
पुढे १९९८ साली त्याचं समस्वभावी सैतानी -- क्रूर आणि विकृत -- वागणुकीच्या वंदिनीशी लग्न झाल्यानंतर त्या जोडगोळीने २०२३ सालापर्यंतची तब्बल २५ वर्षं हरीशच्या आईच्या आयुष्यात पराकाष्ठेचं दुःख आणलं. कमालीची विचित्र गोष्ट अशी की मी आधी लिहिल्याप्रमाणे हरीशच्या आईने तिची सुमारे पाच कोटी किंमतीची एकूणएक स्थावर-जंगम मालमत्ता एकमेव हरीशला दिल्याचं नमूद असलेलं आपलं रजिस्टर्ड मृत्युपत्र आपल्या निधनापूर्वी तीन वर्षं हरीशच्या हवाली केलं होतं. त्याशिवाय तिच्या वार्धक्यातली तिची कोणतीही काळजी घेण्याची जबाबदारी त्या जोडगोळीवर तिने एक दिवसदेखील टाकलेली नव्हती.
हरीश-वंदिनीच्या नरककथेचा कळस म्हणजे २५ नोव्हेंबर २०२३ तारखेला त्या जोडगोळीने रामचंदानी हॉस्पिटलमधल्या एका निर्दय "कर्मचाऱ्या"ला पुरेसे पैसे चारून -- त्यांच्या दृष्टीने "खूप चलाखीने" -- हरीशच्या आईचा खून केला!
---------------------
ह्या सत्यकथेच्या "स्वर्गकथा" अंगातल्या थोर आणि अतिशय प्रेमळ मनाच्या माझ्या ताईच्या स्मृतीला माझं वंदन आहे.
आणि शुभाबद्दल ह्या सत्यकथेच्या सुरवातीला मी जे दोन परिच्छेद लिहिले तेही मला इथे पुन्हा एकदा उद्धृत करायचे आहेत --
---------------------
शुभा.
वयाच्या सोळाव्या वर्षी तिच्या आईवडिलांनी लग्न करून दिलेली आणि नववीपलिकडे लौकिकार्थाने "शिक्षण" घेण्याची संधी कधीच न मिळालेली, पण कमालीची बुद्धिमान, अतिशय सुसंस्कृत, अतिशय विचारी, आणि अतिशय थोर मनाची अशी ३९ वर्षांची शुभा. ('अतिशय" हे क्रियाविशेषण अव्यय मला तीनदा वापरावंच लागलं आहे.)
सध्याच्या आठ अब्जहून जास्त जनगणनेच्या विशाल जगात शुभासारखे स्त्रीपुरुष कुठे ना कुठे लाखात एक असणारच, पण वर लिहिल्याप्रमाणे लौकिकार्थाने "शिक्षण" घेण्याची संधी कधीच न मिळालेली, आणि तरीही कमालीची बुद्धिमान, अतिशय सुसंस्कृत, अतिशय विचारी, आणि अतिशय थोर मनाची अशी शुभा ही असामान्य व्यक्ती माझ्या सध्याच्या ८३ वर्षांच्या आयुष्यात २२ महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच आली हे खरं.
---------------------
ह्या विशाल जगात महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे-आनंदीबाई कर्वे, बाबा आमटे-साधनाताई आमटे ह्यांसारख्या कित्येक नावाजलेल्या फार थोर व्यक्ती आपापली आयुष्यं जगून गेल्या किंवा सध्या जगत आहेत त्याप्रमाणेच शुभासारख्याच लाखात एक असलेल्या, आणि जगाला अज्ञात असलेल्या व्यक्तीही आपापली आयुष्यं सध्या जगत आहेत किंवा जगून गेली आहेत. त्या सगळ्या प्रसिद्ध/अप्रसिद्ध व्यक्तींबद्दल बा. भ. बोरकरांच्या दोन ओळी उद्धृत करून ही सत्यकथा मी संपवतो.
दिव्यत्वाची जेथ प्रतीती । तेथे कर माझे जुळती ॥
================
बापरे ... किती भयानक. त्यांना
बापरे ... किती भयानक. त्यांना शिक्शा नाही झाली का ?
सर अतिशय वाईट वाटले तुमच्या
सर अतिशय वाईट वाटले तुमच्या वयोवृद्ध बहिणीसोबत त्यांच्या एकुलत्या एक मुलाने आणि सुनेने जे केले असा तुमचा दाट संशय आहे हे वाचून.
लेख लिह्ण्यामागे तुमचा हेतु केवल मन मोकळे करायचं इतकाच असेल तर विषय संपला. पण जर तुम्हाला तुमच्या ताईंना न्याय्य मिळवूण दयाचा असेल तर एकाद्या चांगल्या वकिलला गाठून सल्लामसलत घ्या. वेळ दवडून चालणर नही. हॉस्पिटलातले सिसिटीवी फूटेज असेल ते ताब्यात घ्या. पण वकील मात्र अगदी जवळचा विश्वसु पहा. बरेच वकील लोक परक्या क्लायेंट साठी अतिशय नीच असतात.
मन सुन्न झाले वाचून
मन सुन्न झाले वाचून