लढाई

Submitted by पराग र. लोणकर on 5 January, 2024 - 09:59

*लढाई*

नेहमीप्रमाणे अपेक्षित टार्गेट पूर्ण न झाल्याने बॉसचे फायरिंग ऐकून जड पावलाने बँकेबाहेर पडलो. रोजचंच होतं हे.

सकाळी आल्या आल्या बॉससमोर सर्वांची मीटिंग. मग त्या मीटिंगमध्ये बॉसचं तेच तेच रटाळ, अपमानित करणारं बोलणं, त्या त्या दिवशी अपेक्षित असलेली टार्गेट्स सांगणं. मग कामावर बसल्यापासून संध्याकाळपर्यंत- आलेल्या- शक्य त्या प्रत्येक ग्राहकाला बँकेचं काहीतरी प्रॉडक्ट म्हणजे विविध प्रकारची loans, insurance, investment options विकायचा प्रयत्न करायचा, तेही आपलं- आपल्याकडून खरं अपेक्षित असलेलं बँकिंगचं काम करता करता. पुन्हा या सगळ्या प्रयत्नात बँकेच्या गणिती कामात काही चूक झाली तर खपण्यासारखी नसतेच. प्रसंगी खिश्यातून पैसे भरावे लागतात, लागलेत.

सांगितलेली; खरं तर बहुतेक वेळा अशक्य अशी- टारगेट्स पूर्ण करण्यासाठी (ग्राहकांसाठीच्या) बँकेच्या वेळेव्यतिरिक्त लोकांना फोन करत बसणे. मन दगड बनवून ठेवण्याचा प्रयत्न करत. कारण बहुतेक वेळा पलीकडच्या व्यक्तीकडून अवेळी त्रास दिल्याबद्दल शिव्याशाप मिळत असतात. पलीकडून अतिशय वैतागून, त्रागा करून फोन ठेवल्याचे लक्षात येत असते. एकूण सकाळी बँकेत आल्यापासून जो- सर्व बाजूंनी अपमान सोसणे चालू होते, ते बँकेची ग्राहकांसाठीची वेळ संपल्यावरही- संध्याकाळचे साडेसात, आठ अगदी कधी कधी नऊ वाजेपर्यंत चालू असते.

आणि हे सर्व रोज.. अगदी रोज..

नको ही प्रायव्हेट बँकेची नोकरी, राजीनामा देऊन मोकळं व्हावं, असं अक्षरश: हजारो वेळा डोक्यात आलेलं. पण ते शक्य नव्हतं. पुढील काही काळातही शक्य दिसत नव्हतं.

असंच आजही संपूर्णपणे frustrate होऊन मी बँकेबाहेर पडलो. निराश मन:स्थितीत बाइक काढली. आकाशात असलेला अंधार, माझ्याही मनात दाटला होता. खूप रडावंसं वाटत होतं, अगदी ओरडून ओरडून. पण तेही शक्य नव्हतं.

घरी पोचलो. Latchने दार उघडलं. हॉलमध्ये कुणी नव्हतं. आत गौरी फोनवर बोलत होती. बऱ्यापैकी मोठ्याने. बहुतेक तिच्या आईशी बोलत असावी. तिच्या आईला हल्ली कमी ऐकू येत होतं.

“अगंss, तू फारच काळजी करतेस माझी. सगळं छान चाललं आहे. परेश कष्टाळू आहेत. बँकेत नोकरी आहे. फार मोठ्या हौशी-मौजी करता येत नसल्या, तरी सगळे आवश्यक खर्च अगदी व्यवस्थित करू शकतोय आम्ही. अधून मधून बाहेर जेवायला जाणं, पिक्चर बघणं हे तर करत असतोच. आता प्रथमेशच्या शाळेची फी भरायची होती. एकदम चाळीस हजार रुपये लागणार होते. पण परेशने- मी त्यांना सांगताच चेक काढून दिला चाळीस हजारांचा. अगंs हेही जमू शकत नाही अनेकांना. किंवा अनेकदा जमत असलं, तरी किती कटकटी करतात अनेकांचे नवरे. व्यसनांचं तर काही बोलूच नकोस. त्यामुळे परत सांगते, आम्ही श्रीमंत नसलो, तरी सुखी आहोत. परेशसारखा नवरा मला मिळाला, मी नशीबवान आहे. बरं चल, ठेवू फोन? परेश येतील इतक्यात. प्रथमेश देखील येईल आता खालून खेळून. आल्या आल्या भूक भूक करत बसेल. चल, बाय...”

माझ्या कानावर वरील एकन् एक शब्द पडत होता, आणि मनात, हृदयात साठत होता.

माझ्या मनावर दाटलेलं निराशेचं मळभ कुठल्या कुठे पळून गेलं होतं आणि मी उद्याच्या माझ्या दिवसभराच्या लढाईसाठी नव्या उत्साहाने सज्ज झालो होतो...

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा चांगलीय. पण बॅंकेची मस्त एसीत बसून असलेली नोकरीही त्रासदायक वाटते? कमाल आहे.

मस्त आहे कथानक.
अशी समंजस काटकसरी संसारी बायको मिळण्यास १६ सोमवार ३२ मंगळवार आणि ६४ बुधवार केले होते असणार नक्कीच ह्या कथानायकाने Light 1

वाह! प्रेरणादायक. एक दोन महिन्यापूर्वी एचडीएफसी बँकेच्या ऑनलाइन मिटिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सेल्सच्या मुलांवर वाईट ओरडणे, अपमानास्पद बोलणे हे सगळे पाहून खरंच मन विषण्ण झाले होते. कथेतले वर्णन वाचून तो व्हिडीओ आठवला. शेवट मात्र खूपच छान.

लिहिलेलं वाचून बरं वाटलं.
मला दिवसाला 5 लोन आणि ओव्हरद्राफ्ट चे फोन यायचे.त्यातले 3 इंडसइंड चे असायचे. त्यांना बँक मध्ये जाऊन dnd साठी सही आणि निवेदन दिलं.तरी त्यांनी केलं नाही.मग ऑनलाईन बँकिंग ऍप वर सापडलं आणि परत रिक्वेस्ट टाकली.मग 10 दिवसात इश्यू सुटला.
मला पटतं त्यांच्याशी वाईट बोलू नये.पण कुठेतरी काहीतरी ऑफिस म्हद्ये पेटलेलं असतं, आणि हे लोक त्यांच्या मूळ मुद्द्यावर यायला आधी 3 मिनिटं आणि 10 वाक्य घेतात(विशेषतः इन्व्हेस्टमेंट वाले.मग त्यांना मध्येच फोन कट करून बंद करण्याशिवाय पर्याय नसतो. बरं सगळे अनोळखी नंबर फोन घ्यायचे नाहीत असं पण करता येत नाही.
ऑनलाईन ऍप वरून fd करत असताना पण त्यांचे आग्रही फोन येतात की मी घरी येतो,माझा रेफरन्स कोड देऊन माझ्याकडूनच करून घ्या.बरं 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून नातं वाढवायला जावं तर 2 वर्षात पंटर सोडून जाऊन नवा त्याच उमेदीने त्रास देतो.'घरी येतोच' नाहीतर तुम्ही चिंचवड ब्रँच ला याच असे प्रेमळ आग्रह होतात.दर 2 वर्षांनी एका नव्या सोम्यागो म्याला आपलं घर का दाखवावं?.मग रूड बोलण्याशिवाय पर्यायच उरत नाही.
त्यांचा हा रोजचा रोल आहे हे कळतं, शक्य तितक्यांशी नम्र बोलून फोन ठेवते.

>> त्यांचा हा रोजचा रोल आहे हे कळतं, शक्य तितक्यांशी नम्र बोलून फोन ठेवते.
+१११
मलाही सेल्स आणि मार्केटिंगवाल्यांचे फोन येतात तेंव्हा त्यांना सुनवावे किंवा त्यांची मस्करी करावी वगैरे कधीच वाटंत नाही. क्रेडीट कार्ड, लोन, इन्शुरन्स इत्यादीसाठी फोन आहे कळल्यावर मी शांतपणे "सॉरी, मी बिझी आहे" म्हणून फोन ठेऊन देतो. अखेर ते सुद्धा कर्मचारी असतात.

हे बॅंक/मार्केटींग/सेल्स मधून फोन करनारे मराठी असले तरी हिंदीत का बोलतात मुर्खासारखे?? त्यांच्याकडे आपलं नाव पत्ता असा डेटा असतो तिथे आडनावावरून दिसत असतं की ज्याच्याशी बोलतोय तो मराठी आहे नी पत्ताही महाराष्ट्रातला आहे तरी मराठी न बोलता हिंदी बोलायची खाज का असते ह्यांना कळत नाही.

हे बॅंक/मार्केटींग/सेल्स मधून फोन करनारे मराठी असले तरी हिंदीत का बोलतात मुर्खासारखे?? त्यांच्याकडे आपलं नाव पत्ता असा डेटा असतो तिथे आडनावावरून दिसत असतं की ज्याच्याशी बोलतोय तो मराठी आहे नी पत्ताही महाराष्ट्रातला आहे तरी मराठी न बोलता हिंदी बोलायची खाज का असते ह्यांना कळत नाही.

छान कथा..

प्रत्येक बायकोने वाचावी अशी...
मी माझ्या बायकोला लिंक देतो याची...

>>>>>>>>> त्यांचा हा रोजचा रोल आहे हे कळतं, शक्य तितक्यांशी नम्र बोलून फोन ठेवते.
+१११
मलाही सेल्स आणि मार्केटिंगवाल्यांचे फोन येतात तेंव्हा त्यांना सुनवावे किंवा त्यांची मस्करी करावी वगैरे कधीच वाटंत नाही.

+१०००१