भारतीय ध्वजधारक एमव्ही साईबाबा या तेलवाहू जहाजावर हुथी बंडखोरांनी 23 डिसेंबरला दक्षिण लाल सागरात ड्रोन हल्ला केला. एकाच दिवसात हुथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांवर केलेला हा दुसरा होता. त्यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी लाल सागरातील परिस्थिती किती धोकादायक झाली आहे, हे दिसून येत आहे.
लाल सागराच्या दक्षिणेला येमेनच्या पश्चिम किनाऱ्याच्या जवळपासच्या भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतानं भा.नौ.पो. कोलकाता (INS Kolkata) आणि ‘कोची’ या अत्याधुनिक विनाशिका त्या परिसरात तैनात केल्या आहेत. यापैकी ‘कोची’ भारतीय नौदलाच्या Mission-based deployment अंतर्गत एडनच्या आखाताजवळ आधीपासूनच तैनात होत्या. मात्र लाल सागरातील बदललेल्या परिस्थितीनंतर तिला आणि पाठोपाठ ‘कोलकाता’ला लाल सागराच्या जवळच्या परिसरात धाडण्यात आलं आहे. त्या नव्या जबाबदारीवर जाण्याच्या आधी 16 डिसेंबरला ‘कोची’नं एडनच्या आखाताजवळ माल्टाचा ध्वज असलेल्या MV Ruen मालवाहू जहाजाची सुटका केली होती. सोमाली चाचांनी त्या जहाजाचं अपहरण केलं होतं.
उत्तरेला सुएझ कालवा आणि दक्षिणेला बाब एल-मंदेबची चिंचोळी सामुद्रधुनी यांच्या दरम्यान वसलेल्या लाल सागराचं युरोप आणि आशिया यांच्यातील व्यापाराच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्व आहे.
येमेनमध्ये इराणसमर्थक हुथी (Houthi) बंडखोरांनी देशाच्या उत्तर भागावर आणि काही प्रमाणात पश्चिम भागावर ताबा मिळवलेला आहे. राजधानी सनाच्या काही भागावरही त्यांचा ताबा आहे. हुथी बंडखोरांचं इस्राएलशी कायम शत्रुत्व राहिलेलं आहे. सध्याच्या इस्राएल-हमास युद्धात इस्राएलकडून गाझामधील सामान्य नागरिकांवर बाँबवर्षाव केला जात असून तो थांबत नाही, तोपर्यंत लाल सागरातून जाणाऱ्या इस्राएलच्या मालकीच्या आणि इस्राएलकडे माल घेऊन जाण्याऱ्या अन्य देशांच्या व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याची घोषणा हुथींनी केलेली आहे. त्यांनी अलीकडेच माल्टा, नॉर्वेच्या लाल सागरातून जाणाऱ्या 3 व्यापारी जहाजांवर हल्लेही चढवले आहेत. या हल्ल्यांसाठी हुथींकडून ड्रोन्स, क्षेपणास्त्रे आणि हेलिकॉप्टरचाही वापर होत आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत अनेक कंपन्यांनी आपल्या जहाजांना लाल सागर-सुएझ कालव्याऐवजी दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जाण्यास सांगितलं आहे. परिणामी त्या जहाजांना 6000 सागरी मैल (nautical mile) अंतर जास्त कापावं लागणार असून प्रवासाचा कालावधीही 3 ते 4 आठवड्यांनी वाढणार आहे आणि खर्चही वाढणार आहे. त्याचा विपरीत परिणाम तेल आणि अन्य वस्तूंच्या पुरवठ्यावर होऊन युरोपात महागाई वाढण्याची भीती आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळं युरोपात आधीच महागाई भडकलेली आहे.
आशिया आणि युरोप यांच्यातील व्यापारापैकी 40 टक्के व्यापार सुएझ कालव्यातून चालतो. एकूणच लाल सागरातील हुथींचे हल्ले आणि सुरक्षेच्या कारणास्तव व्यापारी जहाज कंपन्यांनी घेतलेला निर्णय यांचा आंतरराष्ट्रीय बाजारावर विपरीत परिणाम होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन अमेरिकेनं लाल सागरातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना सुरक्षा देण्यासाठी Operation Prosperity Guardian सुरू केलं आहे. त्यात ब्रिटन, स्पेन, इटली, सेशल्स आणि बहरीनसह एकूण 10 देश सहभागी झालेले आहेत. भारत या मोहिमेत थेट सहभागी झालेला नसला तरी या क्षेत्रातील सुरक्षित जलवाहतुकीसाठी तिथं त्यानं आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत.
https://avateebhavatee.blogspot.com/2023/12/blog-post_22.html