कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत.....

Submitted by sarika choudhari on 4 December, 2023 - 04:26

कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत.....

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, नुसती तिची धावपळ,
प्रत्येकाच्या आवडी जपत, तीच करते पळापळ.
शांत बसून एका ठिकाणी चहाही पीत नाही बसत....
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II1II

सकाळी नवऱ्याचा उपवास, म्हणून त्याला खिचडी,
पोराला वांग आवडत नाही, म्हणून त्याची भाजी वेगळी.
स्वतः मात्र आवडी बाजूला ठेवून, दुसऱ्यांच्या आवडी बसते जपत...
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II2II

डब्बा भरायची तऱ्हाच न्यारी ,
स्वतःचा, नवऱ्याचा, मुलाचा डब्बा भरता होते, दमछाक पुरी.
नाश्त्याचा वेगळा, जेवणाचा वेगळा , सुक्या भाजीचा वेगळा, पातळ भाजीचा वेगळा,
एवढं करून डब्याची आदलाबदल झाली,
तर घरातले तिच्या नावाने बोंबाबोंब बसतात करत.....
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II3II

घरतील सर्व पसारा आवरून लोकल ती पकडते,
चार मैत्रिणी भेटल्यात तर गप्पा ती मारते.
नाहीच भेटलं कोणी तर नाम जप करते,
ते संपल्यावर थोडं मोबाईल कडे ही बघते ,
तेवढ्यात आज दिराचा वाढदिवस, तिला आठवतो ,
लगेच शुभेच्छा चा संदेश बसते ती टाईप करत ...
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II4II

ऑफिसमध्ये आल्यावर प्रवासाने झालेला अवतार जरा ती सावरती,
लगेच पुरुषांना बोलायला वेळ, ती अर्धा तास मेकअप करते.
सुगंधी गजऱ्याची माळ आपल्या केसात ती माळते,
त्या मंद सुवासाने वातावरण सुगंधी ती करते,
काम करण्याचा नवीनच, एक उत्साह तिला येतो,
कामाबरोबरच ती इतरांच्या समस्या बसते सोडवत ...
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II5II

काम करताना तिचं लक्ष असतं चौफेर,
जेवणाला मैत्रिणी जमल्या की रंगतो थोडा गप्पांचा खेळ.
याही वेळेस ती, जेवला का , गोळ्या घेतल्या का, अशा चौकश्या बसते करत....
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II6II

संध्याकाळी परतताना तोच प्रवास,
आता मात्र डोक्यात रात्रीच्या जेवणाचा घाट,
घरात पाय टाकतात नवऱ्याला चहा हवा,
मुलांना काहीतरी खायला हवं,
हे सर्व झाल्यावर स्वयंपाक बसते रांधतत.....
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II7II

सर्व आवरून उद्याच्या भाजीची तयारी करून ठेवते,
उद्याचा नाश्ता काय ? याचा विचार करत बसते ,
मैत्रिणींनी सांगितलेली नवीन पदार्थाची रेसिपी युट्युब वर बसते पहात....
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II8II

ही सर्व तारेवरची कसरत करूनही ती कधी दमत नाही,
आजारी पडलो तर कोण आपली सेवा करणार हा विचारही तिच्या मनाला शिवत नाही,
नवरात्रीच्या नवरंगात , मनसोक्त न्हाऊन ती निघते,
तर कधी दिवाळीत प्रकाशाने आंगण उजळून टाकते,
या सर्वांच्या बदल्यात प्रेमाचं दान फिरते मागत...
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II9II

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काहीच गरज नाही हे सर्व करायची. अकेले रहो मस्त खुश रहो. खाना ऑर्डर करो. ब्रेक ऑल सोशल कंडिशनिन्ग ताई. चला गोव्याला जाउ. मजा करू.

ही "आई कुठे काय करते" छाप कुटील कविता वाटते. कडव्यांचा आणि ध्रुवापदातल्या वाक्याचा दुरून पण संबंध जुळत नाही.
कवितेत माझी थोडी अड्डीशन...

फोन नाही केला, मेसेज नाही केला
म्हणून नवऱ्याचे डोके सतत ती खाती
सासू- नंदेच्या नावांनी खडे फोडून
नवऱ्याचे सगळी दुरावते नाती
धडधाकट नवऱ्याचे बीपी शुगर वाढल्यावर पस्तावा बसते करत...
कोण म्हणतं बायकांना मोबाईल शिवाय नाही करमत II12II

या सर्वांच्या बदल्यात प्रेमाचं दान फिरते मागत...>> हे फार संतापजनक वाक्य आहे. सेल्फ रिस्पेक्ट जासत महत्वाचा पक्षी आत्म सन्मान. स्वाभिमान. बाई पण भारी देवा टाइप रिग्रेसीव विचार मॉडेल आहे. रिजेक्ट रिजेक्ट राइट नाउ.

हा आपल्या बहुतांश समाजाचा चेहरा आहे.
एकेकाळी मी सात बायकांमध्ये एकटा पुरुष जेवायला बसायचो. सर्व बायका इंजिनिअर आणि आर्किटे्क होत्या. सुशिक्षित आणि उत्तम पगार असलेल्या. पण अपवाद वगळता हेच चित्र त्यांच्या गप्पांतून दिसायचे.

या सहस्त्रकातली आतापर्यंतची सर्वात सुंदर कविता.
व्हॉट्स अ‍ॅप वर येईलच बाबॅ होऊन.

एव्हढी धावपळ करणार्‍या सर्व महिलांना अभिवादन ! एव्हढी धावपळ करतानाही मोबाईलवर सर्व मालिका, कोरिअन ड्रामा, साउथ डब्ड मूव्हीज, ओटीटी हे सर्व सांभाळणार्‍या माता भगिनींना त्रिवार अभिवादन !

खुपच छान कविता.
जळजळीत वास्तव मांडले आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा.

बायकांचे कष्ट आणि दमछाक करणारी लाईफ स्टाईल वाचूनच दम लागला.हे वाचून महिलाविषयीचा आदर जरी दुणावला असला तरी हे सगळं एकटीने करण्याची आवशक्यता नाही असं सांगावसं वाटतं. अश्या आई कुठे काय वाल्या कविता नाही आवडत उगाच आणखी चार स्त्रियांना कामं करण्याचा कॉम्प्लेक्स दिल्यासारख्या वाटतात .पुरुषांसाठी हीच किंवा अशी एखादी कविता लिहिता येईल का !

कविता आवडो न आवडो कवितेचं शीर्षक अगदी कॅची आहे, आवडलं. नाव बघून क्लिक करून वाचावीशी वाटली.

कथा, कविता लिहील्या की त्या आत्मचरित्राचाच भाग आहे असं अनेकांना का वाटत माहिती नाही.
हे मनापासून लिहिलंय की विनोदाने, की व्याजोक्ती/वक्रोक्तीने, की नवशिका प्रयत्न.. हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते लेखक/कवीचं वैयक्तिक मतच आहे, हे गृहीत धरणं अप्रस्तुत ठरावं.
स्वाभिमान महत्वाचाच... पण त्या स्वाभिमानाबद्दल दुराभिमान असू नये.

सर्वप्रथम सर्वाचे खूप खूप धन्यवाद. गोड बरोबर तिखट प्रतिक्रीयांचे देखील स्वागत.आपण सर्वानी आपले मत प्रामाणिकपणे मांडले. सर्वाचेचं मत आवडले कारण त्यातूनच माझे लिखाण सुधारणार आहे.
अ नि रु ध्द ही कविता मी , माझ्यासारख्या घरकाम करून ऑफीस सांभाळणाऱ्या महिलाविषयी लिहीली आहे. नवशिक्या म्हणायला हरकत नाही. कारण फारश्या कविता लिहील्या नाही.
माझी कवितेत कोणाला वास्तव जाणवलं, कुणाला रिलेट झाली, कुणाला शिर्षक आवडले, कुणाचा महिलाविषयीचा आदर दुणवला, कुणाला सहस्त्रकातील सुंदर कविता वाटली यासाठी आपले धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी आपआपल्यापरीने मला चांगले लेखन करण्याची जी प्रेरणा दिली, त्यासाठी सर्वाचे आभार. परमेश्वर आपणांसर्वाचे खूप खूप भले करो.

सारिका चौधरी, तुमचा प्रतिसाद आवडला. इथल्या प्रतिक्रियांना तुम्ही ज्या तर्‍हेने हाताळले त्याबद्दल कौतुक.

सारिका चौधरी, तुमचा प्रतिसाद आवडला
+786
छान स्पिरीटमध्ये घेतले सर्वच प्रतिसाद.
इतर सर्वच नवीन धागाकर्त्यांसाठी अनुकरणीय Happy

कविता छान आहे ..
कवितेचं शीर्षक एकदम भारी..!