बुलडोझर (एकांकिका - प्रवेश १)

Submitted by प्रणव साकुळकर on 28 November, 2023 - 15:41

(उठा-उठा हो सकळीकं - भुपाळी भोंग्यावर लागली आहे. सुखवस्तू मध्यमवर्गीय घरातील समोरची खोली. आईची सकाळची धावपळ. वडील आळस देत समोरच्या खोलीत येतात. हळूहळू आवाज कमी होत जात बंद होतो.)

वडील:- (मोठ्या आवाजात) चहा.

आई:- अहो उठलात? इतक्या लवकर?

वडील:- अगं, राजू, बाळ्या वगैरे कार्यकर्ते येणार आहेत चंदन नगरचे. त्यांच्यासोबत तात्या साहेबांकडे जायचंय. त्यांचा पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही.

आई:- पण त्यात तुम्ही काय करणार?

वडील:- प्रश्न समजावून सांगणार. लोकांचं समाधान नुसतं. प्रश्न सुटेल असं तर काय वाटत नाही.

आई:- मग कशाला जायचं स्वतःची झोपमोड करून सकाळी सकाळी?

वडील:- तात्या साहेबांना दुपारी विमानानं मुंबईला जायचं आहे. त्याच्या आधी भेटावं लागणार. परत कधी येणार माहिती नाही. काल गर्दीत बोलायचं राहूनच गेलं. आपण आपले प्रयत्न करायचे. निदान ते केले हे लोकांना कळायला तरी हवं. अशी शेकडो माणसं जोडावी लागणार मला आता पुढचे सहा महिने तरी.

(आई अजूनही आवरा-आवरीतच गुंतलेली.)

वडील:- अगं चहा.

आई:- अरे हो, विसरलीच की.

(आई आत जाते. सोफ्यावर बसून वडील टेबलावरचा पेपर हाती घेतात. एका ठराविक बातमीच्या शोधात पानं पलटवतात. बातमी सापडते. ती वाचून वडील चिडतात. पेपर फेकून देतात. पाठीमागे हात ठेवून येरझारा मारायला लागतात.)

वडील:- हरामखोर साले. बास्टर्ड्स.

(आई चहा घेऊन बाहेर येते. वडिलांना चिडलेलं पाहून थबकते.)

आई:- हे काय झालं अचानक?

वडील:- पेपर बघितला नाहीस? तात्या साहेबांचा फोटो आलाय कालचा.

आई:- हो. पण त्यात चिडायचं काय एवढं?

वडील:- तात्या साहेबांसोबत माझाही फोटो यायचा होता. देशमुख सोबत सेटिंग केली होती मी. दोन विदेशी बाटल्या पोहोचवल्या होत्या परवा. चांगला क्लोजअप छापील म्हणाला होता. इथे फोटो तर सोडच बातमीत साधं नाव पण नाही. प्यायलेल्या दारूलाही जागत नाहीत लेकाचे. बास्टर्ड्स. (विराम. येरझारा सुरूच.) बाकीचे छापणार नाहीतच, त्यातल्या त्यात आपल्या पेपरकडून तरी अपेक्षा होती.

आई:- फोन करा आता देशमुखला. म्हणा उद्या तरी नक्की छाप. नसेल जमलं आज काही कारणानं. गणेशोत्सव चांगला आठवडाभर आहे अजून.

वडील:- (चिडून) तात्या साहेब राहणार का पण इथे? आणि ते नसणार तर फक्त आमचा कोणी छापेल का फोटो?

आई:- शांत व्हा बरं. आधीच बीपीचा त्रास तुम्हाला. आणि तो चहा घ्या आधी. थंड होईल नाहीतर.

(वडील आईकडे दुर्लक्ष करतात. स्वतःच्याच तंद्रीत. भोंग्यावर घोषणा: "नमस्कार. समस्त भक्त मंडळींना सुचित करण्यात येते की हनुमान नगर गणेशोत्सव मंडळाची सकाळची आरती अकरा वाजता आदरणीय नगरसेवक भास्करराव उर्फ दादासाहेब जोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. तरीही सर्व भक्त मंडळींनी आवर्जून आरतीला उपस्थित रहावे. धन्यवाद.” घोषणा सुरू असतानाच त्रासिक मुद्रेत मुलगा येतो.)

अथर्व:- अरे यार! काय कटकट आहे यांची.

आई:- अरे! आता तू पण उठलास? प्रवासाचा शीण असेल ना. झोपायचं एखाद्या दिवशी.

अथर्व:- तोच प्लॅन होता माझा. पण हे सकाळपासून काय चालवलय यांनी? धड झोपू सुद्धा देत नाहीत लोकांना. नेमकं दोन दिवस घरी यावं तर यांचे हे आवाज सुरू. सगळेच नियम धाब्यावर बसून ठेवतात. बंद करायला हवेत हे सगळे लाऊडस्पिकर.

वडील:- (रागावून) आठवडाभर भोंगे लावलेत तर कसला त्रास? त्या मुसलमानांचे वर्षभर चालू असतात पहाटे पहाटे. तेव्हा त्यांना कोणी हटकत नाही. आता हिंदूंनी दहा दिवसही सण साजरे करायचे नाही का?

अथर्व:- पाच मिनिट असतो तो. यांचं तासंतास तेच सुरू राहणार. आणि दुसऱ्यांवर हसताना पहिले आपल्या नाकावरचा शेंबूड बघावा प्रत्येकानं.

वडील:- याच्याशी तर बोलणंच बेकार. हा घरी आल्या आल्या मनस्ताप नुसता.

(अथर्व पेपर हाती घेतो. पेपरातली बातमी वाचून चिडतो. पेपर खाली फेकून देतो.)

आई:- आजचा पेपर फेकायचाच असं ठरवलंय बापलेकांनी म्हणजे.

अथर्व:- (चिडून) इथेही पोहोचला बुलडोजर आता! मोमीनपुऱ्यात घरं आणि दुकानं उध्वस्त केलीत. काय चाललंय हे!

वडील:- मिरवणुकीवर दगडफेक करतात साले हरामखोर. आता बसा म्हणा बोंबलत.

अथर्व:- मिरवणूक?

आई:- अरे परवा चतुर्थीला गणपती आणताना मोमीनपुऱ्यात त्यांनी दगडफेक केली आपल्या मिरवणुकीवर. मी तर ह्यांना म्हटलं होतं तुम्ही घरीच बसा म्हणून. उगाच पुढे-पुढे करण्यात काय अर्थ. आपला जीव महत्त्वाचा.

अथर्व:- पण चितार ओळीतून हनुमान नगरात गणपती आणताना मोमीनपुरा कसा आला मध्ये?

वडील:- म्हणजे? कोणाच्या बापाची हिम्मत आहे आम्हाला अडवायची? आपला देश आहे. मोमीनपुऱ्यातून नेऊ नाही तर आणखी कुठून.

अथर्व:- पण तिकडून मिरवणूक नेण्याचं कारणच काय म्हणतो मी. मुद्दाम मुस्लिमांना चिथावण्यासाठीच ना?

वडील:- अर्थात. (गर्वाने) मुद्दाम राजुला तिथे मशिदीसमोर थांबून मोठ्यानं डीजे लावायला लावला मी. त्यांनाही कळलं पाहिजे देश कोणाच्या बापाचा आहे तर.

अथर्व:- गणेशोत्सवाच्या आनंदापेक्षा मुस्लिमांना डिवचण्याचा आनंदच जास्त दिसतोय तुम्हाला.

वडील:- (दरडावून) अथर्व! (विराम.) तुमच्यासारख्या हिंदूंमुळेच जास्त माजलेत ते. चांगला धडा शिकवायला पाहिजे त्यांना. आता शेकली असेल त्यांची चांगली.

अथर्व:- म्हणजे दोन-चार गुंडांच्या गुन्ह्याची शिक्षा अख्ख्या वस्तीला? हा कसला न्याय! त्यांच्या आई-वडिलांची ती काय चूक?

वडील:- त्यांच्या मायबापांनाही तेच हवंय. दहशतवादी निर्माण करायची फॅक्टरी आहे यांची वस्ती म्हणजे. काश्मिर, बंगाल, केरळ सर्वत्र हेच चाललंय.

अथर्व:- छान! म्हणजे कोर्ट, पोलीस कशाचीच काही गरज नाही. बंदच करून टाका ना मग. एक बुलडोजर असला म्हणजे झालं. तुम्हीच ठरवा आता कोण दहशतवादी तर आणि पाठवा बुलडोझर. आज याचं घर, उद्या त्याचं.

वडील:- (त्वेषाने) हजार वर्षांच्या मुस्लिम राजवटीत किती अन्याय झाले आपल्यावर. शेकडो मंदिरं तोडलीत यांनी आपली. तलवारीची भीती दाखवून धर्मांतरण केलं हिंदूंचं.

अथर्व:- अच्छा! म्हणजे आता इज्राईलनी जर्मनीवर बॉम्ब फेकायचे का दुसऱ्या महायुद्धात ज्यू मारल्याबद्दल? आणि अमेरिकेत काळ्यांनी मग गोऱ्यांना मारायला हवं गुलामगिरीचा बदला म्हणून. ऐतिहासिक अन्यायाचा फिट्टमफाट करण्यात पिढ्यानपिढ्या घालवायच्या का? आणि हाच तर्क वापरून दलितांनी ब्राह्मणांना चोपलं तर…

वडील:- आणखी दुसरं काय चाललय भारतात.

अथर्व:- काय? अहो, कुठल्या काल्पनिक विश्वात वावरत आहात तुम्ही?

वडील:- आता कुठे मिसरूड फुटलं तुला आणि मला शिकवतोस जगाबद्दल? वर्षभरापासून दिल्लीला काय शिकतो आहेस आणि इथे जगाचं ज्ञान पाझळवतोयस. (निग्रहानं) बुलडोझर चालणारच. दंगेखोरांना शासन होणारच.

अथर्व:- या बुलडोझरची झळ जेव्हा तुम्हाला लागेल ना तेव्हा कळेल. बॉटल मधून एकदा बाहेर आलेला जिनी पुन्हा आत बंद करणं महा कठीण. (काही क्षण शांतता.) बाबा, पण हे का करताय तुम्ही?

वडील:- देशासाठी. (विराम.) धर्मासाठी.

अथर्व:- की विधानसभेच्या तिकिटासाठी?

आई:- (दरडावून) अथर्व!

अथर्व:- पण खोटं आहे का ते? काल घरी आल्यापासून पहिल्यांदा बाबांना बघतोय मी. दिवसभर काय तो जनसंपर्क. लहानपणापासून तेच पाहतोय. सतत कार्यकर्त्यांची गर्दी घरी. आई दिवसातून वीस वेळा चहा करणार. आणि आता तर काय गणेशोत्सव. दिवसभर या मंडळातून त्या मंडळात.

आई:- तसं चहाचं बरोबर बोललास तू. इतका चहा पिऊन ऍसिडिटी वाढली आहे ह्यांची. आणि आता बीपीचही मागे लागलंय. आरोग्याची काळजी घ्यायला हवी. रात्री अवेळी घरी येऊन, उशिरा झोपून त्रास आणखीनच वाढणार.

(अथर्वला यात मुळीच रस नाही. "चालू दे यांचं” या अविर्भावात मोबाइल उचलून आत निघून जातो.)

वडील:- अगं प्यावा लागतो चहा दहा ठिकाणी. नाहीतर लोकांना संशय येतो, ब्राह्मण असल्यामुळे आमच्याकडे खातपीत नाहीत म्हणून. आधीच ब्राह्मणद्वेष सगळीकडे. उगाच त्याला खतपाणी नको.

आई:- आता झेपत नाही तुम्हाला. सगळं तब्येतीवर निघतं मग.

वडील:- न झेपून कसं चालेल? आता विधानसभेसाठी तर जनसंपर्क आणखीनच वाढवायचाय. आणि आता पैशाची पण व्यवस्था करायला हवी.

आई:- खर्च तर पक्ष करेल ना?

वडील:- (हताश) पक्षाला मागायची तर काही सोय नाही. इथे स्वखर्चानेच लढणारे दहा डोळे लावून बसलेत तिकिटावर. चार-पाच कोटी तरी लागतीलच.

आई:- काय? चार-पाच कोटी?

वडील:- मग काय. मागे साध्या महानगरपालिकेसाठी २५-३० लाख खर्च आला. विधानसभेसाठी तर इतका येणारच.

आई:- कुठून आणणार इतके पैसे?

वडील:- आपली गावाकडची काही जमीन विकायचं म्हणतोय.

आई:- अहो वडिलोपार्जित जमीन ती. अशी कशी विकायची? आणि तिकीट मिळणार हे तरी नक्की आहे का?

वडील:- तिकीट न मिळून कसं चालेल? पंधरा वर्षं झाली नगरसेवक राहून. किती दिवस एकाच पदावर राहणार? मागून आलेले सगळे पुढे गेले. हा तात्या. गुंड होता एकेकाळी. मग राजकारणात. याच्याविरुद्ध प्रचार केला आम्ही दर निवडणुकीत. आणि मागच्या वर्षी आपल्या पक्षात प्रवेश. आल्या आल्या जिल्हाध्यक्षपद. आणि आता हा ठरवणार कोणाला तिकिटं वाटायची तर. आम्हा निष्ठावंतांना यांचा लाळ घोटेपणा करावा लागतो आहे. काय दिवस आलेत बघ!

आई:- काय करता, आलिया भोगासी…

(हताश वडील सोफ्यावर बसतात. काही क्षण शांतता. अंधार.)

बुलडोझर एकांकिकेची संपूर्ण संहिता:

  1. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश १)
  2. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश २)
  3. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ३)
  4. बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ४ - अंतिम)

© प्रणव साकुळकर, २०२३.

प्रकाशनाचे, अभिवाचनाचे आणि प्रयोगाचे सर्व हक्क लेखकाकडे. परवानगीसाठी लेखकाशी संपर्क साधावा.
Contact: pranav.sakulkar@gmail.com

Group content visibility: 
Use group defaults

एकदम सॉलिड विचार करायला लावणारी आहे एकांकिका. पुढचे भाग वाचते
(तुम्ही याचा प्रयोग करत असाल, किंवा पुढेमागे पुस्तक छापणार असाल तर कॉपीराईट डिस्क्लेमर (कोणी अभिवाचन केलं तर चालेल/चालणार नाही, प्रयोग केल्यास पूर्व परवानगी आवश्यक वगैरे नीट असूद्या.म्हणजे एक चांगला कंटेंट संरक्षण या अर्थाने म्हणते.)

@mi_anu, तुमच्या सल्ल्यानुसार कॉपीराईट डिस्क्लेमर टाकलाय. धन्यवाद!

@सोनाली ०४, धन्यवाद! संपूर्ण संहितेवरही तुमचे विचार ऐकायला आवडतील.