इंटिरिअर आणि आम्ही-भाग १

Submitted by mi_anu on 14 November, 2023 - 01:25
Renovation, interior,middleclass

भाग 2 आणि 3 इथे वाचा:
भाग २
भाग ३

रिकामं/वापरात नसलेलं घर किंवा त्या घरातली डागडुजी कामं याचं बॉलिवूड पिक्चर्स आणि के ड्रामा मध्ये अत्यंत सुंदर तलम गुलाबी चित्रण असतं.म्हणजे असं बघा:

१. नायक नायिका एकदम जंगलात एकदम दुर्गम जागी वादळात सापडलेले असतात.मोबाईल ची रेंज, फॉरेस्ट ऑफिस,चहावाला काही काही नसतं.आणि त्यांना एक एकदम टापटीप, पांढरेशुभ्र पडदे वालं,फर्निचर वर पांढरीशुभ्र कव्हरं टाकलेलं, वुडन फ्लोरिंग वालं,अजिबात धूळ, केर आणि बुरशी नसलेलं रिकामं, दाराला कुलूप नसलेलं घर मिळतं. मग ते आपले भिजलेले कपडे बदलून पिळून वाळत घालतात,पटकन लाकडं तोडून आणून फायरप्लेस पेटवतात, आपले मसल्स किंवा कर्व्ह दाखवत हालचाली करत सर्व फर्निचर वरची पांढरीशुभ्र कव्हरं ओढून काढतात आणि मग....इत्यादी इत्यादी.

२. नायक नायिका घर लावत आणि डेकोरेट करत असतात.नायिका हॉट पॅन्ट मध्ये शिडीवर चढून रंगकाम करत असते, मग नायकाला ब्रश ने रंगवते, मग दोघे ब्रश ने रंगपंचमी आणि पळापळी खेळतात आणि मग....इत्यादी इत्यादी.

3. नायक नायिका अतिशय चांगल्या बाहेर जायच्या कपड्यात, किंवा नुकत्याच एरियल नीळ केलेल्या पांढऱ्या फॉर्मल शर्टात फर्निचर जागेवर ठेवत असतात.त्यांनी घामाची चिंता न करता मेकप, आयलायनर, ब्लशर आणि हेअर सेटिंग पण केलेलं असतं.आणि मग ते सर्व फर्निचर ठेवून झाल्यावर हुश्श करून बेडवर अंग टाकून देतात आणि मग....इत्यादी इत्यादी.

नव्या घरात आल्यावर 15 वर्षांनी होऊ घातलेले कुलकरण्यांच्या घराचे नूतनीकरण मात्र बराच गुंतागुंतीचा आणि अरोमँटिक मामला होता.लग्नात, समस्त सणावाराना नातेवाईकांनी हौसेने दिलेली मोठीमोठी भांडी, साबां नी त्यांच्या संसारात खूप पाहुणे आले गेले असताना घेऊन ठेवलेली भरपूर प्रमाणात भांडी(त्यांचं स्वतःचं अतिशय गरीबीत झालेलं लग्न.घरात ३-४च भांडी.जे भांडं चहा कॉफीला वापरणार तेच घासून त्यात नंतर भाजी आमटी होणार.त्यामुळे त्यांना आपल्या होणाऱ्या सुनांना भांड्यांची अजिबात ददात पडू नये वाटलं आणि त्यांनी भरपूर भांडी जमा केली तर नवल नव्हतं.),कपाटातून बदाबदा कोसळणारे कपडे,अनेक प्रसंगांना मिळालेली शाळकरी स्टेशनरी, 'लागतील कधीतरी' म्हणून जपून ठेवलेल्या प्लास्टिक, पॅकिंग च्या वस्तू, ऑफिसातून वेगवेगळ्या प्रसंगी मिळालेल्या (पाण्याच्या) बाटल्या असा सगळा मालामाल प्रकार.कोणतंही कपाट उघडलं की करंगळीवर गोवर्धन तोलून धरणाऱ्या कृष्णाप्रमाणे स्वतःच्या बरगडी किंवा ढु च्या आधाराने खाली कोसळणारा पसारा आवरून धरावा लागे.इतकं करून सणावाराला घालायला धड कपडे नाहीत ते नाहीत.म्हणजे, कपडे चांगले टिकत होते.पण आतली माणसं चंद्राच्या कलांप्रमाणे जाड बारीक होत होती.त्यामुळे जाड फेज बारीक फेज असे दोन्ही वॉर्डरोब प्रेमाने सांभाळावे लागत होते.

इंटिरियर करायला घेतल्यावर पहिला शोध मध्यमवर्गीय विचारांना सूट होणाऱ्या एजन्सी चा.म्हणजे, डिझायनर 'इथे काचेचे मस्त पारदर्शक पार्टिशन लावू आणि स्वयंपाकघराच्या मधोमध आयलंड ओटा करू' म्हटलं की आम्ही 'ओटा धुणार कसा?किचन मध्ये बसून खोबरं खवावं लागलं तर?ओट्यावरून दुसऱ्या बाजूला पडून काचेच्या वस्तू फुटल्या तर?' असे तद्दन त्यांना हताश करणारे प्रश्न विचारणार.त्यांनी 'कपाट पुढून चकचकीत ठेवून आरसा दाराच्या आतच लावू' म्हटल्यावर 'पण घाईत दारं जोरात आपटली तर?आरसा फुटेल.' असे वर्स्ट केस सिनारिओ सांगून त्यांना जेरीस आणणार. इंटिरियरवाल्या माणसांना आमचं काम पूर्ण झाल्यावर मानसोपचार घ्यायला लागू नयेत यासाठी अनेक चाळण्या लावून योग्य एजन्सी निवडणे गरजेचे होते.

शोधानंतर एक एजन्सी मिळाली. आपण त्यांना 'ओ' मानुया.मग 'ओ' ची आणि आमची जास्त वेळा नाही कोण म्हणणार याची शर्यत चालू झाली.बऱ्याच टेबलांच्या,बुकशेल्फ च्या,दारांच्या व्हर्च्युअल महिरपी, कमानी आम्ही 'बिन उपयोगाचे उगीच लाकूड' म्हणून जन्मण्यापूर्वी छाटून टाकल्या.कुलकर्णी 'स्टोरेज' मॅनिक लोक आहेत.कोणताही लाकडी पृष्ठभाग दिसला की त्याचा आत काहीतरी ठेवायला उपयोग झालाच पाहिजे.मग अगदी बाथरूम शेल्फ म्हणू नका, डायनिंग टेबल ची खुर्ची म्हणू नका,लॅपटॉप टेबल म्हणू नका, प्रत्येकाच्या आत स्टोरेज.आणि त्याच्या आत....पसारा.

आम्ही पुढे केलेल्या प्रत्येक रंगाला 'ओ' नाही म्हणायला लागले.मूळ बेसिक मध्ये दोघांच्या फरक होता.एक माया साराभाई एक मोनिषा साराभाई.आमचे रंग 'आल्हाददायक, घरात प्रकाश येईल असे, जरा नवा रंग दिलाय असं वाटणारे,उठून दिसणारे,ज्यावर उभं राहिल्यावर फोटो चांगले येतील असे' वगैरे वगैरे आणि त्यांचे रंग 'सटल,डिसेंट, आतून 5 लाईट लावल्यावर खोली क्लासी दिसेल असे' होते.त्यांना 'क्लासी, मॅट, नॉन ग्लॉसी, महाग टाईल्स' हव्या होत्या, आम्हाला 'पटकन पाण्याचा पंप मारून धुता येईल, खसाखसा एक फडका मारला की चमकेल असे' गुळगुळीत ग्लॉसी लॅमीनेट हवे होते.त्यांना 'सुंदर कोरीवकाम वाले आर्टिफेक्ट, हेअर ड्रायर ने नियमित एक एक पोकळी साफ ठेवली की सुंदर दिसणारे' हवे होते.(मेला आयुष्यात आलिया भट्ट वाला केराटीन हेअर ड्रायर घरात पडून असून एकसंध पूर्ण केसांना कधी लागला नाहीये, भोकाभोकाच्या कोरीवकाम लाकडी शोपीस ला लागणारे ...डोंबल.) मग काही रंग त्यांचे काही आमचे,'कोणताही हेअर ड्रायरने साफ करावा लागणार नाही, आयुष्यात कमीत कमी वेळा पुसावा लागेल असा शोपीस' यावर मांडवली झाली.

'तुम्ही दुसरीकडे राहायला जा 2 महिने' ला आम्ही कामाची बोलणी किंवा मूळ काम ठरायच्या आधी नकार दिला.'आम्ही राहून चालणार असेल तरच' या बोलीवर काम या एजन्सीला मिळणार होतं.यात मुद्दे 3: ज्या एरियात राहतो तिथे भाड्याची घरं महाग पडणे, आणि 8 पर्यंत कॉल्स झाल्यावर साईट वर वेगळ्या ठिकाणाहून येऊन पाहणी करायचा उत्साह राहिलेला नसणे, आणि शाळेच्या बस चा रूट बदलायची तयारी नसणे.शिवाय '2 महिने' 2 महिने नसणार याची पूर्ण खात्री होती.

'तुम्हाला आवाजाचा त्रास होईल' हा 'ओ' चा मुद्दा आमच्या साठी एकदम नगण्य होता.गेली अनेक वर्षं आमच्या सोसायटीत आम्ही 4-5 कुटुंबं आपापल्या मुलांवर साधारण 2 चौक पलीकडे ऐकू येईल इतक्या बुलंद आवाजात ओरडतो. सकाळी 5.30 ला 'सच्या, उठ मूर्खां,बस यायला पंधरा मिनिटं राहिलीत,आजपण घाणेरडा डुक्कर बनून जाणार का?', त्यानंतर 6.40 ला 'मिनी जलदी करो, बस्स गेट पर आ गया, कबसे हॉर्न बजा रहा है!!', '7.35 ला 'हरी अप लुबना,विल यु, डॅम ईट, बस अलरेडी क्रॉसड काऊ शेड!'(हे इंटरनॅशनल बोर्ड मधले असल्याने यांना मुलांशी घरी इंग्लिश बोला अश्या सूचना आहेत.) अश्या वेगवेगळ्या आवाजात सोसायटी दणाणून जाते.त्यामुळे आम्हाला आवाजाचा त्रास होण्यापेक्षा आमच्याकडून इतरांना आवाजाचा त्रास होण्याचा धोका जास्त होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्येक वाक्यांना अगदी अगदी हे तर आमच्याच घराचं वर्णन असं वाटत राहिलं
मस्त खुसखुशीत लिहिलं आहे Happy

सोफा कापड चे तर अजीब किस्से आहेत
दुकानात भरपूर वेळ घालवून सिलेंक्त केलेलं कापड घरी आल्यानंतर वेगळंच दिसायला लागलं, त्यावर यांनी चुकीचे कापड पाठवलं म्हणून भांडायला गेलो तर त्यांनी आम्ही निवडलेल्या कापडाचा कॅटलॉग क्रमांक आणि याचा दोन्ही मॅच करून दाखवले

शेवटी कापड दुकानात वेगळ्या रंगाचं असतं आणि घरी वेगळ्या असा बोध घेऊन परतलो Happy

दुकानात वेगळ्या रंगाचे दिवे असतील आशुचँप. त्यामुळे रंग वेगळा वाटत असेल.
ज्वेलर्सच्या दुकानातपण असे वेगळे दिवे असतात त्यामुळे तिथे आपण आपल्याला आरशात जास्त छान आणि तेजस्वी दिसतो.

दुकानात वेगळ्या रंगाचे दिवे असतील आशुचँप. त्यामुळे रंग वेगळा वाटत असेल. >>> त्याचाही अनुभव होताच म्हणून बाहेर जाऊन स्वच्छ सूर्यप्रकाशात नेऊन खात्री केलेली, पण घरी आलं ते कापड वेगळ्या शेडचे सुद्धा नाही तर वेगळ्याच रंगाचं आलं
त्यामुळे एकतर कटलॉग चा नंबर बदलला असावा किंवा आपल्या चष्म्याचा तरी या निष्कर्षाला आलो Happy

एप्रिलमधे आम्ही हॉलला फक्त रंगकाम करुन घेतलेलं, नवरा म्हणाला निदान हॉलतरी बरा दिसूदे, प्लॅस्टीक पण फार महाग नाही, रॉयल कलर लाऊन घेतला. स्काय ब्लु, सी ग्रीन मधला आम्हा दोघांना आवडला तो सिलेक्ट केला. एक पिलर जरा वेगळा कलर हवा म्हणून आम्ही आणि रंग कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याने मिळून ड्रॅगनफ्रूट सिलेक्ट केला. कॉम्बो एकदंरीत छान दिसतंय. आत्ता दिवाळीआधी बेडरुम मधे कलर करताना आधी पिंक होता, तसाच परत सांगितला आणि एक पिलर ड्रॅगनफ्रुटच कर, असाच हवा सांगितलं. कलरवाल्याने ब्राऊन, मरुन टाईप लावला (यावेळी contract सोसायटीतर्फे काम करतायेत त्यांना दिलं) आणि मी विचारलं तर म्हणाला, ड्रॅगनफ्रुटच लावलाय , नंतर दिसेल बाहेर सारखा, असा कसा दिसणार नंतर, नाहीच दिसत तसा. एकंदर अवतार चांगला दिसतोय पण सेम आम्ही सांगितलं तसा असता, तर फार सुरेख दिसला असता. असा एकंदरीत आनंदी आनंद, पैसे खर्च करुनही पुर्ण समाधान मिळालं तर बघायलाच नको.

अंजू, मजेशीर.जमलं तर त्या ड्रॅगनफ्रुट पिलर चा फोटो टाक.नंतर दिसेल हे एकदम पार्लर मध्ये आपल्याला 'अहो फेशियल चा इफेक्ट दुसऱ्या दिवशी दिसेल, चेहरा झळाळून उठेल' सांगतात तसं वाटलं Happy

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी.

अनु तू लिहिलंस म्हणून दोन्हीचे फोटो काढले, नवऱ्याच्या मोबाईलवरून त्याला काढायला लावले. जास्त उजेडात, कमी उजेडात काढले. एकतरी परफेक्ट येईल तर शप्पथ. त्यातल्या त्यात बघते, रात्री सवडीने शेअर करेन.

ज्वेलर्सच्या दुकानातपण असे वेगळे दिवे असतात त्यामुळे तिथे आपण आपल्याला आरशात जास्त छान आणि तेजस्वी दिसतो.
>>> अगदी अगदी....साड्यांच्या दुकानात पण.

Pages