योग्य निर्णय

Submitted by प्रथमेश काटे on 10 November, 2023 - 01:25

योग्य निर्णय

निमा आणि विनु शेजारच्या फ्लॅट मधल्या रूपेश दादाकडे आलेले. तिघे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. जवळपास वर्षभरापूर्वी दुसऱ्या शहरातून आपल्या आईवडिलांसोबत रूपेश इथे राहायला आला होता. आपल्या प्रेमळ, मनमोकळ्या स्वभावाने थोड्या दिवसात आसपासच्या सगळ्यांना त्यानं आपलसं केलं होतं. लहानग्यांशी छान मैत्री केली होती. शेजारी राहत असल्याने विनू व निमाशी तर त्याची खास गट्टी जमली होती.

" वर्षभरात आपण खूप मज्जा केली ना. " निमा उत्साहाने बोलत होती. " मकर संक्रांतीला, होळीला, रंगपंचमीला, गणपती बसवल्यावर. दादा यावेळी तू असल्यामुळे आम्हाला अजूनच मजा आली."

रूपेशने फक्त स्मितहास्य केले.

" आता दिवाळीलाही खूप मजा करूयात. किल्ले बनवूया. खूप सारे फटाके फोडूया. दादा तुला कोणते फटाके आवडतात ? " विनूने विचारलं.

" नाही. मी फटाके अजिबात नाही फोडत." रूपेश.

" च्यल. काही पण खोटं सांगतोस. कुणाला नाही आवडणार फटाके फोडायला ?" निमा अविश्वासाने म्हणाली.

" अगं खरंच सांगतोय निमाताई. तुमच्याशी खोटं बोललो का मी कधी ? "

" पण का नाही फोडत तू फटाके ? " विनूने उत्सुकतेने विचारले.

" कारण फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होतं. आपल्या आजूबाजूला म्हातारी माणसं असतात. लहान मुलं असतात. त्यांच हृदय नाजूक असते. त्यांना आपल्यासारखा फटाक्यांचा आवाज सहन होत नाही. शिवाय फटाके पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरामुळे हवा दूषित होते. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. इतर आजारही उद्भवतात. आधीच कोविड तर सुरूच आहे."

थोडावेळ कुणीच काही बोललं नाही. मग एकदमच निमा म्हणाली -

" बरोबर आहे दादा तुझं. मी ठरवलय. यावर्षी पासून फटाके फोडणं बंद."

" अरे वा. व्हेरी गुड डिसीजन, निमा." रूपेश कौतुकाने म्हणाला.

" अगं पण.."

विनू काही बोलणार तोच निमा म्हणाली -

" हे बघ विनू, आपण आता लहान नाही. चूक बरोबर आपल्याला समजायला हवं. फटाक्यांमुळे आपल्या माने आजी आजोबांसारख्या वृद्ध लोकांना, चिनू सारख्या लहान मुलांना त्रास झालेला मला नाही आवडणार. आपण पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी इकोफ्रेंडली गणपती बसवतो, आणि दिवाळीत फटाके फोडून त्याचाच ऱ्हास करतो. मग काय फायदा ? आणि दादाने सांगितलं तसं फटाके फोडल्यानंतर त्याच्या धुरामुळे हवा दूषित होते, ज्यामुळे आपल्यालाही आजार होऊ शकतात."

विनूलाही ते पटलं. तो म्हणाला.-

" हो बरोबर आहे. पण मग दिवाळीत एन्जॉय कसं करायचं ? खूप बोअर होईल."

" नाही होणार. " रूपेश म्हणाला. " हे बघा. किल्ले तर आपण बनवणारच आहोत. मी तुम्हाला पेपर कप्स, कार्डशीट पासून कंदील वैगरे बनवायला शिकवेन. तुमची आई दिवाळीचा फराळ बनवणार. तिला जमेल तशी मदत करा. पप्पांना घर डेकोरेट करायला मदत करा. मग नाही बोअर होणार. काय ? "

विनू व निमाचे चेहरे फुलले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. मग रूपेश कडे बघून एकसुरात म्हणाले

" डन."

- समाप्त
@ प्रथमेश काटे

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ☺️l

Group content visibility: 
Use group defaults

एका फालतू व्हिडिओची ( ज्याचं कॅप्शनही चुकीच्या इंग्रजीत दिले आहे ) लिंक देऊन आपला स्वार्थीपणा व स्वैर विचारशैली दाखवून दिलीत. असो आपल्यालाही दिवाळीच्या हार्दिक ( निर्मळ व कुठल्याही लिंक्स रहित ) शुभेच्छा Biggrin

आपला गैरसमज होणं साहजिक आहे ; पण एकदा ' ती जोडते... बंध प्रेमाचे ' या माझ्या कथेवरील, आणि आपल्याच ' उपभोग स्वातंत्र्याचा ' या विडंबनपर लेखावरील याच्या कमेंट्स, आणि माझ्या कमेंट्सला केलेले रिप्लाय वाचून पहा.

आणि एकदा कथा वाचून या महाशयांनी दिलेली लिंकही ओपन करून पहा. म्हणजे मी ,' स्वैर विचारसरणी व स्वार्थीपणा ' असं का म्हणालो हे आपल्या लक्षात येईल.