भरणी श्राद्ध
अंतिम भाग
" येसाजी काय झालं रं, आसं येकदम हासाया ? " रंगाने आश्चर्याने
विचारलं.
" कित्ती रं तू खोटारडा ? काय तर कदी काही कमी केलं न्हाई. डोळ्यात त्याल घालून सेवा केली. मोठा आव आणून, सुस्कारं टाकून सांगतूयास. आरं एखाद्याला खरच वाटायच की रं." येसाजी हसू आवरत म्हणाला.
" येसाजीss तोंड सांभाळ. काय बोलतूयास तुझं तुला तरी.." येसाजीचं बोलणं ऐकून रंगनाथ संतापून ओरडला.
पण त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधी त्याच्या वरताण आवाजात येसाजी कडाडला -
" अssय. आवाज खाली. बापावर आवाज चढवतो, व्हय रं चुक्काळीच्या."
" बा..प ?? " येसाजीचा आवाज क्षीण झाला होता. थरथरत होता.
" व्हय, बाप. नाथाभाऊ कापसे." ऐटीत बसत गुर्मीने येसाजी म्हणाला. खोलीत चिडीचूप शांतता पसरली. सगळे लोक मोठमोठे डोळे करून येसाजीकडे बघू लागले. कुणाचा घास तोंडात टाकण्यासाठी तोंडाजवळ नेलेला हात तसाच वरच्यावर राहिला. घास खाण्यासाठी अर्धवट उघडलेली तोंडं उघडीच राहिली. आपल्या ताटाकडे बघत येसाजी बोलू लागला.
" रंग्या. लेका, घरात काय येगळं केलं, काही गोडाधोडाचं केलं तर मला कदी बघायला बी मिळालं न्हाई. माझ्यासाठी कायम कालवण न्हायतर मिरची न् भाकरी. तीबी कदी प्वाटभर मिळायची न्हाय. आन् आज माझ्या नावानं लोकांना एवढं चमचमीत खायला घालताय व्हय रं. पुरी भाजी काय, भजी काय, कुरडया, पापड. वा रे पठ्ठ्या. जंगी बेत केलाय की." असं म्हणून येसाजीनं एक पुरी उचलली. आणि मटकी बटाट्याच्या भाजीत बुडवून अख्खी तोंडात टाकली. मग दोन - तीन भजी एकदम उचलून तोंडात कोंबली. मग कुरडया. असं त्याचं ते खाणं सगळी वेड्यासारखी बघत होती. स्वतःच्या जेवणाकडे कुणाचं लक्षच नव्हतं. बघता बघता येसाजीच्या पत्रावळीतील भजी संपली, तसा तो आपल्या खणखणीत आवाजात ओरडला -
" सविते. भजी आण."
त्याची हाक ऐकताच सविता सावध असल्यासारखी घाईघाईने भज्यांचं पातेलं घेऊन आली. आणि तिने येसाजीच्या ताटात भजी वाढली. इतरांना विचारण्यासाठी तिने सगळ्यांवरून नजर फिरवली. आणि ती काय समजायचे ते समजली. पातेलं घेऊन ती परत निघाली. दारापर्यंत जाताच येसाजी मोठ्याने म्हणाला -
" जाऊ नको. थांब जरा.."
सविता दारात उभी राहिली.
" काय रंगा. काय सांगत व्हतास तू मघाशी ? म्हातारा पिंडाला बी शिवला न्हाय. आज घास बी खाल्ला न्हाई. आरं, प्वाटभर अन्नासाठी, तुमच्या दोन पिरमाच्या शब्दांसाठी आसुसलेलो आसायचो रं मी. पण कदी नीट खायला दिलं ? कदी पिरमानं बोललात ? न्हाई. कायम त्वांड वाकडं करून, तुसडेपणानं बोलायचं. हिडीस फिडीस करायचं. तुमचं बघून बाळू ( रंगनाथ अन् सविताचा मुलगा ) बी नीट बोलना झालेला माझ्याशी. मग कसा शिवल म्हातारा पिंडाला ? कसा खाईल घास ? " बोलता बोलता येसाजीचा स्वर कातर झाला होता. रंगनाथ आणि सविता सुन्न होऊन गेले होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, तेव्हा दोघांच्याही नजरेत शरमेची, अपराधीपणाची भावना होती.
येसाजी पुढे बोलू लागला -
" गेल्यानंतर बी माझा आत्मा तडफडत व्हता. म्हणून आज मुद्दाम या येसाजीच्या अंगात घुसलो. म्हटलं आज मन मोकळं करून टाकायचं. तुमचं पिरमाचं बोलणं तर नशिबात न्हाईच ; पण आज माझ्या श्राद्धासाठी, माझ्या नावानं एवढं मोठं जेवण घातलय, तर चांगलं चुंगलं मन भरून खायचं. चला.. येतो." असं म्हणून येसाजीने डोळे मिटले. तोच रंगा म्हणाला -
" आबा.."
येसाजीनं डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं.
" आबा... माफ कर रं मला. तू असताना तुझी किंमत कळली न्हाई. कदी तुज्याशी धड बोललो न्हाई. लई मोठा पापी हाय म्या. लई मोठा.." असं म्हणून येसाजी रडू लागला.
" पोरा.. रडू नको. तुला तुझी चुक कळली, तेच महत्वाचं हाय. रंगा.. सविता.. सुखात रहा पोरांनो. बाळूची काळजी घ्या. येतो." असं म्हणून येसाजीने पुन्हा डोळे मिटले, अन् त्याच्या अंगाला एकदम एक झटका बसला. क्षणभराने त्यानं डोळे उघडले. आणि तो नवलाने सगळ्यांकडे बघू लागला.
" आबा.." रंगाच्या तोंडून रडवेल्या सुरात शब्द निघाले. आणि तो एकदम ढसाढसा रडू लागला.
समाप्त
@ प्रथमेश काटे
ठीक वाटली.
ठीक वाटली.
लवकर संपवली, अजून काही घडेल
लवकर संपवली, अजून काही घडेल असं वाटतं होत, असो ठीक वाटली
>>>>>मोठा पापी हाय म्या. लई मोठा.." असं म्हणून येसाजी रडू लागला.>>>
इथे रंगा हवंय ना? O
जमली आहे
जमली आहे