भरणी श्राद्ध भाग २ (भयकथा)

Submitted by प्रथमेश काटे on 3 October, 2023 - 12:39

भरणी श्राद्ध
भाग दुसरा

गप्पा गोष्टी करीत जेवणाला सुरुवात झाली. थरथरत्या हातानं येसाजीने एक भजी उचलली, आणि हातात घेऊन तो एकटक त्या भज्याकडे बघू लागला. त्याच्या नजरेत कमालीची आतुरता दाटून आली होती. जर कुणी त्याच्याकडे निरखून पाहिलं असतं ( खरंतर त्यावेळी तसं न करणेच योग्य ठरणार होतं.) तर त्याला येसाजीच्या डोळ्यात खोलवर कुठेतरी एक वेदना जाणवली असती. क्षणभर त्या भज्याकडे पाहून येसाजीने तो हलकेच तोंडात टाकला. आणि पुन्हा थरथरत्या हाताने त्याने अजून एक भजी उचलली. तेवढ्यात शेजारी बसलेल्या शांतारामचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने विचारलं -

" काय रं येसाजी, तुझा हात का असा थरथरतोय ? "

पण येसाजी स्वतःच्याच तंद्रीत होता. त्याने शांतारामकडे बिलकुल लक्ष दिले नाही. भजी खाण्यासाठी तो हात तोंडाजवळ आणू लागला. तोच " बघू.." असं म्हणत शांतारामने त्याच्या गळ्याला हात लावला. येसाजीने त्याचा हात एकदम जोरात हिसडला. आणि त्याच्याकडे संतापाने एक कटाक्ष टाकला. एक क्षणभरच. पुन्हा तो शांतपणे जेवू लागला. शांताराम मात्र काहीवेळ हतबुद्ध होऊन वेड्यासारखा त्याच्याकडे बघत होता. मग कसंबसं चित्त थाऱ्यावर आणून तो मुकाट्याने जेवू लागला.

गिरणी वाल्या सतीशशी बोलणं झाल्यावर दामूने रंगाला विचारलं -

" का रं रंगा. अंमळ उशीरच झाला ( जेवणासाठी पंगत बसायला ). "

" आरं काय सांगू बाबा. कावळ्यानं घासच घेतला न्हाई."

" आसं का घडावं रं ? " दामूने मनापासून काळजीने विचारलं.

" काय म्हाईत बुवा ? तू तर बघतच आला हायेस. म्या आन् सवितानं काय कमी केलं व्हतं का कदी म्हाताऱ्यासाठी ? "

दामू यावर काहीच बोलला नाही.

" सविता तर दिसभर म्हाताऱ्याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायची. त्यांना काय हवं नको ते बघायची. म्या गावातून पायजे ते आणून द्यायचो. राती शेतावरनं आल्यावर न चुकता पाय चेपून देत व्हतो. एवढं करून बी पिंडाला पण शिवला न्हाई, अन् आता बी." असं म्हणून रंगाने दीर्घ सुस्कारा सोडला.

दामू आणि सगळेच कसलीही प्रतिक्रिया न देता त्याचं निमूटपणे ऐकत होते. अधूनमधून अर्थपूर्ण नजरेने एकमेकांकडे बघत होते. एकदम कसलीशी हलक्या आवाजातली खुसफूस ऐकू येऊ लागली. लोकं आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले. रंगाही जरा गोंधळून खोलीभर नजर फिरवू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इतका वेळ कुणाशीच चकार शब्दही न बोलता खाण्यावर ताव मारत बसलेला येसाजी हळूवार आवाजात हसत होता.

" येसाजी काय झालं रं, आसं येकदम हासाया ? " रंगानेही जरा हसत हसतच विचारलं.

हळूहळू त्यानं आपली मान वर केली. आणि आता तो आधिकच मोठ्यानं हसू लागला होता. त्याच्याकडे पाहता पाहता रंगाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला‌. त्याच्या अंगावर सर्रकन काटाच उभा राहिला. इतरांच माहीत नाही ; पण रंगाला त्याच्यात काहीतरी वेगळं जाणवलं होतं.

••••••

सविता किचनमधल्या ओट्यापाशी उभी राहून समोरच्या खिडकीतून बाहेर बघत होती ; पण तिचं खरं तिकडे बिलकूल लक्षच नव्हतं. ती स्वतःच्याच विचारात गुंतली होती.
येसाजीनं जेव्हा एकदम झटकन मान वर करून एकदा तिच्याकडे आणि एकदा तिच्या हातातल्या भज्यांच्या पातेल्याकडे बघितलं, तेव्हा त्याच्या डोळ्यातली ती चमक, त्याचा तो आसुसलेला चेहरा बघून तिला कसंसच वाटलं. दुसऱ्या एखाद्या बघणाऱ्याला वाटलं असतं, त्यात काय झालं एवढं ? पण एवढच नव्हतं. तो चेहरा, ते डोळे, आणि ते हसणं. सगळंच भयानक. आणि एकदम विपरीत. त्याचं बिलकूल न वाटणारं. त्याचा चेहरा असा इतका फिकुटलेला, पिवळट कसा असेल ? अन् ते डोळे. इतके बटबटीत आणि तांबारलेले !! असे डोळे येसाजीचे असूच शकत नाहीत. आणि.. आणि ते त्याचं दातावर दात रोवून हसणं. येसाजी असा कधीच हसत नाही. तो चेहरा, डोळे, ते हसणं त्याचं नव्हतंच. या सगळ्या गोष्टी दुसऱ्याच कुणाशी तरी साधर्म्य सांगणाऱ्या होत्या ; पण तो विचारच भीतीदायक, नकोसा होता. हे असं असूच शकत नाही, असं तिचं मन तिला सांगत होतं. खरंतर तिला समजावत होतं ; पण अगदी आतून, या समजावण्यापेक्षा मनातली भीती तिला आधिक खरी वाटत होती. त्याच्याकडे बघून तिला ज्या कुणाची आठवण आली होती, त्याचा तो कळाहीन, भयाण चेहरा, ते अंगावर काटा आणणारे बटबटीत डोळे आणि ते हसणं हे ज्याच्याशी तंतोतंत जुळणारं होतं ते दुसरे तिसरे कुणी नसून तिचे सासरे होते. ज्यांना हे जग सोडून गेल्याला नुकतच वर्ष होऊन गेलं होतं. ज्यांच आज त्यांच्या घरी भरणी श्राद्ध केलं जात होतं, ते तिचे सासरे. रंगाचे वडील.

ओट्याच्या कठड्याला पकडून, सविताने डोळे गच्च मिटून घेतले, आणि स्वतः शीच हळूहळू नकारार्थी मान हलवू लागली ; पण एकदम तिचे मिटलेले डोळे चटकन उघडले गेले. सारं शरीर क्षणभर सुन्न झालं. घामाचा एक टपोरा थेंब तिच्या केसांतून झिरपून हळूहळू खाली ओघळू लागला. तिच्या मनात एकच विचार आला. " हा... हा आवाज तर.. येसाजी भावजींचा.."

क्रमशः
@ प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults