"क्लर्क"
मनोज कुमार, रेखा, शशी कपूर, अनिता राज, प्रेम चोपडा, अशोक कुमार, सतीश शहा, दीना पाठक.
सुरूवातीला ही सगळी नावं स्क्रीनवर ओळीनं उमटतायत. बॅकग्राऊंडला "मैंss कलर्क हूॅंss" हे गाणं चाललेलंय.
मनोज संरक्षणमंत्रालयात क्लर्क आहे. प्रामाणिक आहे. वक्तशीर आहे. रोज वेळेआधी कामावर जायचं. मन लावून सिगरेटी ओढायच्या. आणि मग खऱ्या टाईमपासला हात घालायचा. असं साधारण रूटीन आहे त्याचं.
मनोजच्या प्रामाणिकाची चर्चा सर्वदूर आहे. त्यामुळे बॉस त्याच्यावर चिडून आहे. तो वारंवार मनोजला धमक्या देत असतो की, "तू फक्त एक क्लर्क आहेस, जास्त टुरटुर करू नकोस. मी तुझा सीआर खराब करेन". हा बॉस म्हणजे सतीश शहा. त्याच्या धमक्या त्याला स्वतःलाच खऱ्या वाटत नाहीत. आपण तरी कशाला सिरियसली घ्यायचं.
मनोजची फॅमिली नॉर्मल नाही. बाप अशोककुमार पूर्वी आझाद हिंद सेनेत सैनिक होते. मोठा भाऊ माजी पायलट. त्याला १९६२ च्या युद्धात अपंगत्व आलंय. शिवाय चेहऱ्यावर बॉंबवर्षाव झाल्यामुळे एक गालही जळालाय.
बाप कर्जबाजारी आहे. चार पोरांना पोसता पोसता शेत गहाण टाकलंय. अजून एक बहिण लग्नाची आहे. पेन्शनमध्ये भागत नाय. दारिद्र्याची अशी साधारण रूपरेखा. (पुढे मग मनमोहनसिंगांच्या काळात तेंडुलकर कमिटी गठीत झाली. त्यांनी दारिद्र्याचे निकष ठरवले. त्यासाठीचा डाटा त्यांनी 'क्लर्क' मधूनच ढापला, असं म्हणायला जागा आहे)
परिणामी भावाचं रूपांतर बेवड्या मनुष्यात झालंय. आणि मनोजलाही नॉनस्टॉप सिगरेटी ओढाव्या लागतायत. तेवढंच माणसाचं जरा दुःख हलकं होत असेल. मला काही अडचण नाही.
बाकी, मनोजचा दुनियेवरून विश्वास कधीचाच उडालाय. त्याचा आता फक्त स्वतःच्या गरीबीवरच विश्वास उरलाय. अशा पर्मनंट गरीब कुटुंबाची आशा धाकट्या भावावर लागलीय. त्यास नोकरी लागल्यावर परिस्थिती बदलणार असते.
पण सध्यातरी तशी काही चिन्हं नाहीत. सध्या अशोककुमार खाटेवर कण्हत पडलेत. छाती जोरजोरात चोळतायत. त्यांना भीषण हर्ट ॲटॅक आलेला आहे. आत्ता जातो की मग जातो, अशी कंडीशन. सौ. दीना पाठक नवऱ्याच्या काळजीनं कासावीस.
आणि डॉक्टरचा तर निरोप आहे की, मी काय येत नसतो. पयली आधीची उधारी टाका. साला मी काय इथे धर्मशाळा उघडून बसलोय की काय ?
प्रसंग बाका आहे.
परंतु मनोज मनोज आहे. तो डगमगत नाही. तो चेहरा झाकतो पण त्याचं मन खुलं आहे. परिस्थितीला शरण जाणं त्यास मंजूर नाही. शिवाय असंही आहे की मनोज आपल्या बापाचा पिंड ओळखून आहे.
त्यामुळे मनोज एक आयडिया करतो. काय आयडिया करतो मनोज? तर खिशातून एक कागदाचं पुडकं काढतो. त्यातून सेल काढतो. ते टेपरेकॉर्डरमध्ये घालून बटण ऑन करतो. आणि मग चालू होतं आझाद हिंद सेनेचं स्फूर्तीगीत..! कदम कदम बढाये जा..!
ह्या गाण्यात काही विशिष्ट औषधी गुणधर्म आहेत. त्यातील ध्वनिलहरी अशोककुमारसाठी जीवनदायी सिद्ध होतात. अशोककुमारचा रोम रोम समाधानानं भरून पावतोय. चेहऱ्यावर रोमांच उमलतंय. परिणामी ते खाटेवर झोपूनच दोन्ही पाय हवेत गोल गोल फिरवायला लागतात. सायकलला पायडल मारायला लागलेत, बहुतेक.
देवा पांडुरंगाss औषधाचा डोस जास्त तर नाही ना झाला..?
कारण ते ताडकन उठून उभे राहिलेत आता. छातीवर बुक्क्या मारत गर्जना करून राह्यले की मी एकदम फिट झालोय. आणि आता स्वतःच हे गाणं गाऊन नाचून दाखवण्याचा माझा इरादा आहे. सगळ्या कुटुंबांनं ह्यात मला साथसंगत करावी, असंही ते आवाहन करतात. कारण आता हृदयातलं ब्लॉकेज वगैरे निघून गेलंय.
कोलेस्टेरॉल वगैरेचं बाष्पीभवन झालेलंय.
आणि सगळ्या रक्तवाहिन्यांतून मुक्त रक्तप्रवाह सळसळतो आहे. आता चिंता कसली? आता मी नाचणार.
तिकडे कॅमेरा भिंतींवरून सरकतोय. आणि तिथल्या फोटोंमधून गांधी-नेहरू-सुभाषबाबू, ह्या सगळ्या फॅमिलीकडे प्रेमानं/दयेनं बघतायत.
बाकी, त्याकाळच्या भारतीय स्त्रियांमध्ये नवऱ्याकडे कौतुकमिश्रित आदराने बघण्याची रीत होती, असं म्हणतात. खरं खोटं मला माहिती नाही. तो ॲकॅडमिक चर्चेचा वगैरे विषय होऊ शकतो. परंतु इथे सौ. दीना पाठकच्या मनात "बाई बाई बाई..! आता काय करावं ह्या म्हाताऱ्याचं.! शोभतं का हे ? वय है का आता हे?" असा भाव असावा, असं वाटतं.
रेखा ही मनोजची कॉलेजच्या काळातली प्रेयसी आहे. कॉलेजात असताना मनोज टॉपर होता. रिझल्ट लागला की दुसऱ्या दिवशी पेपरला मनोजचा फोटो हमखास यायचा. तो अभ्यास करत करत सिगरेटी ओढायचा. आणि फेकून द्यायचा. आणि मग रेखा ती उरलेली थोटकं गोळा करत फिरायची आणि नंतर मोठ्या प्रेमानं ओढायची.
अहो, ओढू द्या ना मग. लव होतं त्यांचं. तुम्हाला काय अडचणाय? प्रेमात पडल्यावर हे असं होतंच ना..! प्रेमात माणूस अशा गोष्टी करतंच ना? मग?
अर्थात, ह्या फटेहाल मनोजशी लग्न करून खाणार काय? हा योग्य प्रश्न रेखाला योग्य वेळी पडतो. म्हणून तिनं श्रीमंत शशी कपूरबरोबर लग्न उरकून घेतलंय. आता लागलीय मग मस्त संसाराला वगैरे.
पण काहीही झालं तरीही शेवटी पहिलं प्रेम पहिलं असतं. मनाचं पाखरू ओढ घेतं. म्हणून अधूनमधून भेटून मनोजला सिड्युस करण्याचा तिला नाद आहे. जुन्या आठवणी वगैरे. पुन्हा एकदा सुटावा वारा, यू नो ?
तर अशीच आता रेखा मनोजच्या तनामनास आग लावून गेली आहे. तिथेच एका पानटपरीवर प्रेम चोपडा कोल्ड्रिंकमध्ये देशी मिक्स करून पितोय. त्याकाळी टपरीवर मिळायची..!
मनोज तहानलेला आहे. तो चोपडाकडून 'चपटी' हिसकावतो. घटाघट पितो. आणि वर छातीत जळजळतंय म्हणून तक्रार करतो. आता देशी दारू कच्ची मारल्यावर दुसरं काय होणार ना?
मनोज टुन्न होतो. तडक रेखा-शशीच्या फंक्शनमध्ये जाऊन गळा काढतो.
शशी हा काहीतरी दोन नंबरचे धंदे करणारा बिझनेसमन आहे. रेखाही समजा त्याच्याबरोबर राहून राहून तशीच झालीय. आणि त्या दोघांचं एकच सामाईक स्वप्न आहे- मनोजला गैरमार्गाला लावणं. त्याला आपल्या कह्यात आणणं. त्यासाठी त्यांना मनोजच्या कुटुंबावर संकंटं कोसळवावी लागतात.
हा विषय काही मनोजचा वैयक्तिक मामला नाही.
मनोजसारखी मनुष्ये ही काही 'फक्त मनुष्य' नसतात. ते देशाची बहुमोल साधनसंपत्ती असतात. त्यांचं जतन करणं किंवा त्यांना बरबाद करणं, यादृष्टीनं इतर पात्रांच्या हालचाली आहेत. त्याशिवाय कथानक पुढं कसं सरकणार?
त्यामुळे सगळ्या परोक्ष अपरोक्ष संवादांमध्ये मनोजचा उल्लेख येणं आवश्यक. उदाहरणार्थ, 'माझ्या मनोजला काय वाटेल', 'आमचा मनोज असं कदापि करू शकत नाही', 'माझ्या मनोजसाठी मी काय वाट्टेल ते करीन', 'माझा मनोज उपाशी झोपला' वगैरे वगैरे.
बाकी मग पूरक गोष्टी आहेतच. मनोजचा धाकटा भाऊ एका फटाकडीच्या नादी लागणं, त्यानं बॅंकेवर दरोडा घालणं, तो आळ मनोजनं स्वतःवर घेणं, अशोककुमारनं जेलमध्ये मनोजला भेटून भारतमातेची शपथ घालणं.
शिवाय मनोज हिरो आहे म्हटल्यावर त्याच्या सोज्वळ बहिणीवर गुंडाने अतिप्रसंग न करून कसं चालेल? गुंडांनी करायचं तरी काय मग दुसरं? त्यांना घेतलंय कशाला पिच्चरमधी? तर मग तेपण एक आहे.
आता सवाल असा आहे की मग हे कुटुंब चालवतंय कोण? देव चालवतोय का?
तर नाही. मनोजला एक भाभी पण आहे. युद्धात एक गाल करपलेल्या भावाची बायको. तीच भागवतेय सगळा घरखर्च. कसा बरं रेटतेय ती ह्या लिजेंडरी कुटुंबाचा गाडा? काही केसस्टडीज बघूया.
केसस्टडी क्र.१—
प्रश्न : बिलं थकलीयेत. किराणा बिल, लाईट बिल, पाणी बिल, हे बिल, ते बिल. कशी भागवायची ही बिलं?
उपाय : भाभी निघाली हॉस्पिटलमध्ये. रक्त विकलं. झाला पैशाचा जुगाड. सपला विषय.
केसस्टडी क्र.२—
प्रश्न : दीर बॅंकेवर दरोडा घालायला गेला न् तुरूंगात अडकला. त्याला सोडवायला वकील पैशे मागतोय. काय करायचं आता?
उपाय : भाभी चालली हॉस्पिटलमध्ये. रक्त विकलं. झाला पैशाचा जुगाड.
केसस्टडी क्र.३—
प्रश्न : समजा नवऱ्याला रोज दारू लागते. काय करावं?
उपाय : भाभी निघाली हॉस्पिटलमध्ये. रक्त विकलं. झाला जुगाड दारूचा.
केसस्टडी क्र.४—
प्रश्न : समजा आज मनोज उपाशी आहे. कसं करावं?
उपाय : निघाली भाभी हॉस्पिटलमध्ये. रक्त विकलं. पैशै घेतले. झाला जुगाड मनोजच्या खादगीचा.
पण मला खरंच आश्चर्य वाटतं. संताप संताप येतो. जेव्हा अशा ह्या गृहकृत्यदक्ष भाभीच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो?
ती बिचारी एवढं बादली बादली भरून रक्त विकून संसार चालवतेय. खरंतर हा सगळा वुमन एम्पॉवरमेंटचाच एक भाग म्हणून बघायला पाहिजे. ते राह्यलं बाजूला. तुम्ही सरळ तिच्या कमाईवर संशय घेता? तुमच्या जीवास काही वाटत कसं नाही? कुठे फेडाल?
संशयात्मा विनश्यति. डोन्ट यू नो?
पुढे आता रेखा-शशी बिचाऱ्या मनोजला लपेट्यात घेतायत. संरक्षणमंत्रालयातून एक महत्त्वाची फाईल चोरायची आहे. दहा लाखांची ऑफर दिलीय मनोजला. मनोजनं ऑफर स्वीकारलीय.
रात्र पडलीय. मनोज दबकत दबकत कपाटातून एक फाईल चोरतोय. पाच रूपैवाली छापडीची फाईल आहे. त्यावर 'ऑपरेशन ग्रीन स्टार' असं लाल स्केचपेनानं ठळक लिहिलंय. मनोज ते प्रेक्षकांना व्यवस्थित दाखवतो.
तिथेच अंधारात एक सावली पाळत ठेवून बसलीय. ती सावली प्रेम चोपडाची आहे. चोपडासाहेब संरक्षणमंत्रालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत, बाई द वे.
दहा लाख मिळालेत मनोजला. लॉटरी लागली म्हणून सांगितलंय घरी मनोजनं. सगळी गरीबी मिटलेली आहे. अशोककुमारला पुन्हा एकदा नाचण्याची संधी मिळाली आहे. ते कशाला सोडतील?
बाकी मग आता दिवस जरा बरे आलेत. आणि आपल्या मनोजनं सगळ्यांचं सगळं केलंय, बरं का.. ! शेतजमीन सोडवली. शेतात सुभाषबाबूंचा पुतळा उभा केला. शेतातली माती कपाळाला लावण्याचा अशोककुमारचा हट्ट पुरवला. बहिणीच्या लग्नाचा विषय सलटवला. भावाच्या करपलेल्या गालावर प्लॅस्टिक सर्जरीपण करून घेतलीय. कारण मनोज आता शशीच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सभासद झालाय. पण कदाचित ही मनोजची चाल असेल. अर्धा पिच्चर अजून बाकीय तसा.
खतरनाक लिहिलेय.. मजा आ गया...
खतरनाक लिहिलेय.. मजा आ गया...
तिथेच एका पानटपरीवर प्रेम चोपडा कोल्ड्रिंकमध्ये देशी मिक्स करून पितोय. त्याकाळी टपरीवर मिळायची..!
>>> आय रिमेम्बर दोज डेज....
भारी लिहिले आहे
भारी लिहिले आहे

पिक्चर नाही पाहिला पण,
तो गाण्याने अशोककुमार बरा होतो हा सीन साजिद खानच्या एका शो मध्ये पाहिला होता
एकदम भारी. क्रमशः आहे ना?
एकदम भारी. क्रमशः आहे ना?
अरे देवा! खतरनाक आहे हे.
अरे देवा! खतरनाक आहे हे.
जोरदार लिहिलेय..
शिरीष कणेकर क्लर्क चित्रपटाची
शिरीष कणेकर क्लर्क चित्रपटाची नेहमी खिल्ली उडवत असत
भन्नाट लिहिलेय! पुभाप्र
भन्नाट लिहिलेय!
पुभाप्र
हा चित्रपट आल्या आल्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटगृहात पाहून पोपट करून घेतला होता.
'तुणं तुणं तुणं तुणं किसी माईक गुणं' असलं काहीतरी गाणं आहे अनिता राजचं, यातच बहुतेक.
बाई बाई बाई....
बाई बाई बाई....
भारी
भारी
भारी लिहिले आहे.
भारी लिहिले आहे.
अरे हा सिनेमा बघितला होता आणि
अरे हा सिनेमा बघितला होता आणि भावंडांसोबत अशी चिरफाड केली होती
तो अशोक कुमार गांगुलींचा हार्ट अटॅक + देशभक्ती गीत सीन तर ह ह पु वा आहे.
... मनोज चेहरा झाकतो पण त्याचं मन खुलं आहे...... ह्यावर प्रचंड हसलो !
पु भा प्र
मनोज चेहरा झाकतो पण त्याचं मन
मनोज चेहरा झाकतो पण त्याचं मन खुलं आहे...... ह्यावर प्रचंड हसलो !
>>>>> +१
महान लिहिलयं. भाग २ पण
Lol Rofl महान लिहिलयं. भाग २
Lol Rofl महान लिहिलयं. भाग २ पण येवूद्यात! +1111
उपाय : भाभी निघाली
उपाय : भाभी निघाली हॉस्पिटलमध्ये. रक्त विकलं. झाला जुगाड दारूचा. >>>>भाभी नेमकं खाते काय जेणेकरून तिच्या शरीरात एवढं रक्त निर्माण होत हे एवढे गरीब आहेत यांच्याकडे खायला काहीच नाही आणि हिच्या शरीरात एवढ रक्त ???
बीटरूट आणि डाळिंब खाते असे
बीटरूट आणि डाळिंब खाते असे दाखवलंय