शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत
उपेक्षितांच्या दुनियेत काही गुणवंत माणसे जशी असतात तशी काही पुस्तकंही असतात. काळाच्या पडद्या आड माणसे असो वा साहित्य असो इतिहासात त्याची दखल घेतली तरी काळाच्या प्रवाहात ती गडप होउन जातात. एखादा सामान्य वकूबाचा माणूस देखील प्रसिद्धीचे तंत्र उमगल्यामुळे व्यवहारात यशस्वी होतो तर एखादा असामान्य माणूस देखिल प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहिल्याने दुर्लक्षित रहातो. पुस्तकांचही तसच आहे. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फलज्योतिष हा विषय मध्यवर्ती घेउन कुणी एखादी विनोदी कादंबरी लिहिली असेल असे कुणाला वाटत नाही. प्रो. नारळीकरांशी एकदा सहज गप्पा मारताना म्हणून या पुस्तकाचा परिचय करुन दिला. त्यांनी ते पुस्तक विमानप्रवासात वाचले. त्यांना ते पुस्तक खूप आवडले. ते पुस्तक म्हणजे शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत भाग १ ते ३, लेखक: चिंतामण मोरेश्वर आपटे
हे पुस्तक म्हणजे 'डॊन क्विक्झोट' या जगप्रसिद्ध कादंबरीचे मराठी करण आहे. मराठीकरण म्हणजे मराठी अनुवाद नव्हे. सर्व्हेंटिस हा एक साधा सैनिक होता. शेक्सपिअरचा समकालिन होता. वयाच्या ५८ व्या वर्षी त्याने हे पुस्तक लिहिले. जानेवारी १६०५ मध्ये ते प्रसिद्ध झाले.नंतरच्या काळात ते अनेक भाषांत अनुवादित होउन गाजले. त्या काळात युरोपात शिलेदारीचे खूळ होते. हे खूळ डोक्यात शिरलेली व्यक्ति म्हणजे डॊन क्विक्झोट हे त्या स्पॆनिश कादंबरीचे प्रमुख पात्र आहे. त्याचा अर्धवट शिष्य सॆंकोपांझा, त्याची तरुण पुतणी, त्याची प्रेमळ पत्नी. त्याची एकतर्फ़ी काल्पनिक प्रेयसी डल्सिनिया अशा पार्श्वभूमीवर डॊन क्विक्झोट साहसपूर्ण प्रसंगाच्या शोधार्थ निघतो. प्रवासात निरनिराळ्या प्रसंगात काय भ्रम होतात व ते सत्य समजून तो त्यातून मार्ग काढतो. हे वर्णन फार विनोदी वाटते. तत्कालिन साहित्यात तो एक नवा आविष्कारच होता.
या कादंबरीची फक्त संकल्पनाच उचलून त्याच धर्तीवर त्याचा मराठी आविष्कार करताना त्यावेळच्या महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थीतीचा विचार करुन आपट्यांनी फलज्योतिष हा विषय व गुरु-शिष्य परंपरा ही पार्श्वभूमी निवडली.फलज्योतिषाचा फोलपणा पटवून देण्यासाठी विनोदी कादंबरी हे माध्यम आपटे यांनी निवडले. याचे कारण खुसखुशीत विनोदी माध्यम जनसामान्यांवर प्रभाव टाकू शकते; फलज्योतिषा सारखा बोजड विषय घेउन टीका केली तर ती दुर्बोध होईल. एखादी कडू गोळी जर गोड आवरणातून दिली.त्याचा कडूपणा जाणवत नाही व परिणामही साधता येतो.
ही कादंबरी १८९३ सालातील आहे हे विचारात घेउन वाचकांनी तत्कालीन सामाजिक परिस्थीती व साहित्य नजरेसमोर आणावे. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा अभिप्राय असा: ' फलज्योतिषासारख्या गोष्टी विषयी लोकात अश्रद्धा उत्पन्न करण्याचे मुख्य दोन मार्ग, एक तत्वविचारांचा व दुसरा मार्ग म्हणजे अशा श्रद्धा ठेवल्याने व्यवहारात कसे फसगतीचे प्रकार होतात हे दाखवणे.तत्वविचारांचा मार्ग अशा वेळी उपयोगाला येत नाही, म्हणून दुस-या मार्गाचा अवलंब ग्रंथकर्त्याने केला आहे ते यथायोग्य आहे.'
तीन भागात हे पुस्तक लिहिले आहे.पहिल्या भागात शामभट्ट हा फलज्योतिषाचे महत्व अ़ज्ञ जनसामान्यांना कळावे, कोणते ग्रह इष्ट कोणते अनिष्ट? वाईट ग्रह मोकळे सुटले तर काय अनर्थ होईल? यासाठी म्हणून गावोगावी जाण्याचे प्रयोजन करतो.जनहितार्थ एक प्रबोधन यात्रा म्हणा ना! त्याचा शिष्य बटो सोबत येण्याचे ठरवतो.मुहूर्तावर जाण्याच्या खटपटीच्या प्रसंगातून विनोद निर्मिती चालू होते.प्रचलीत म्हणी,वाक्प्रचार,यमक यांची जोरदार उधळण बटो व शामभट्ट यांच्या संवादातून लेखकाने केली आहे. एका गावात बटोला पल्लीपतन,सरडारोहण,शिंकेचा शकून,काकपल्ली व पिंगलाशब्दशकून या विषयी पृच्छक प्रश्न विचारतात तेव्हा तो म्हणतो,"ज्योतिषशास्त्र व तर्कशास्त्र या दोहोची सांगड घालून व्यवहारदृष्टीच्या वल्ह्याने एकेक प्रश्नरूप नौका संशयसमुद्रातून मी पैलतीर नेत असताना तुम्ही काक,पल्ली पिंगळारुपी जो मच्छ मला अडवायला सोडलात त्याचे मला वाईट वाटते.बाबा रे तू हे अज्ञान सोडून दे.कावळ्याल काव काव शब्द करण्याची सृष्टीकृत आ़ज्ञा आहे.मनुष्याला शिंक यावी हा शारिरविशिष्ट धर्म आहे असे तू समज. तिचा संबंध मनुष्याच्या बर्या वाईटाशी आहे असे म्हणणे म्हणजे म्हातार्या बाईची केरसुणी लागून आकाश ठेंगणे होते ते उंच गेले असे म्हणण्यासारखे आहे." तर असा हा व्यवहार चतुर बटो आपल्या फलज्योतिषाने पछाडलेल्या गुरुजी शामभट्टाची फलज्योतिषसंबंधाने संधी मिळेल तेव्हा फिरकि घेत असे. शनीच्या पीडेपासून विक्रमराजाची शामभट्टाने केलेली सुटका म्हणजे त्याल झालेला फलज्योतिषकीय इंद्रियजन्य भ्रम लेखकाने छान रंगवला आहे.
दुस-या भागात शामभट्ट व बटो हे भद्या व मंगळ्या या शेतावरच्या राखणदारांकडून बेदम मार खातात. याला ते अपशकूनाचा परिणाम म्हणतात.पुरंदरच्या प्रवासात भौगोलिक परिस्थिती उंच सखल असल्याने घोड्यावरील प्रवासात चुकामुक होते.झोपेत टांगेखालून घोडे निघून जाते; याला तो शनीचे प्रताप समजतो, व बटोने पाहिलेल्या ख-या परिस्थितीला तो स्वप्न समजतो. नेहमीप्रमाणे बटोला माघार घ्यावी लागते. पुरंदर मुक्कामी आलेले अनुभव,ग्रहांची दाने व प्रश्नोत्तरे हा भाग घेतला आहे. त्यात पृच्छकाला शब्दबंबाळ करुन आपल्याला हवे असलेले उत्तर त्याच्याचकडून कसे वदवून घेत याचे वर्णन आहे. हे वर्णन वाचताना पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या आत्मपुराण ची आठवण येते.
तिस-या भागात सरोदे म्हणजे कुडमुडे जोशी याच्याशी भेट होते. हा सरोदी शेवटी प्रकांडपंडित ज्योतिषी शामभट्टाकडूनच कशी दक्षीणा उपटतो हे प्रत्यक्ष वाचण्यासारखे आहे. पुढे एके ठिकाणी शामभट्ट गोविंदपंत नावाच्या गृहस्थांना त्यांच्या मुलाच्या पत्रिकेवरुन मुलगा तुमच्या मुळावर आला आहे असे सांगून त्याचा त्याग करण्यास सांगतो.अन्य कोणी सांभाळत नाही म्हटल्यावर तो मुलाला देवळात सोडून येतो. उद्विग्न झालेली गोविंदपंतांची बायको शेवटी शामभट्टाचे ग्रंथ फाडून,शाई सांडवून ठेवते. नंतर पश्चातापदग्ध झालेवर शामभट्ट त्यांना बोधामृत पाजतो. ही कादंबरी शिवकालीन रंगवली आहे.शिवाजीमहाराजांची मान्यता मिळवण्यासाठी शामभट्ट त्यांच्या दरबारात जातो. शिवाजीमहाराज त्याला म्हणतात,"मुहूर्त पहाण्याची सवय काम करणार्या माणसाच्या उपयोगाची नाही. ज्याला आजचे काम उद्यावर टाकण्याचे आहे. त्याला मात्र मुहूर्त पहाणे सोईचे आहे. तोरणा किल्ला घेताना किंवा त्यात पुरलेले द्र्व्य काढताना, किंवा राजगड किल्ला बांधताना मी जर मुहूर्त पहात बसलो असतो तर कदाचित कामे झाली नसती." त्यावर शामभट्ट म्हणतो," अंगिरा ॠषीचे असे मत आहे की मनाच्या उत्साहकाली कार्यासाठी गमन करावे. म्हणजे काम होते.त्याप्रमाणे तू मनाच्या उत्साह काली काम करण्यास निघालास म्हणून तुझी कामे झाली, याकरिता ती तू सुमुहूर्तावरच केली असे म्हटले पाहिजे, सुमुहूर्त असल्यावाचून कोणतेही काम होणे नाही." असेच विद्वत्ता व वीरता याबाबतचे संवाद वाचकाचे एकीकडे मनोरंजन करतात तर दुसरीकडे प्रबोधन करतात. पुढे शिवाजी महाराज त्यांना रामदासस्वामींकडे पाठवतात.आपल्या ज्योतिषशास्त्रातील ज्ञानाचा अहंकार झालेल्या शामभट्टाला ही एक चांगली संधी वाटते.विद्ववत्तेला देखील समाजमान्यतेसाठी थोरामोठयांचे प्रशंसन लागते. नाहीतर तुमची विद्वत्ता तुमच्यापाशीच रहाते. आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन रामदासस्वामींपुढे करुन शामभट्ट रामदासस्वामींना अजिंक्यपत्र देण्याची मागणी करतो. शामभट्टाची ही मागणी पाहून रामदासस्वामी त्याचा यथेच्छ समाचार घेतात. वेगवेगळे ग्रंथकार एकाच ग्रहयोगाबाबत वेगवेगळे अर्थ काढतात. असे ग्रंथाधार देउन रामदासस्वामी फलज्योतिषातील अंतर्विसंगती सांगतात. शामभट्टाला ताळ्यावर आणल्यावर त्याचे भ्रम गळून पडतात. चरितार्थासाठी त्याला जमीन इनाम मिळवून देतात.शेवटी फलज्योतिषाच्या सल्ल्याने नुकसान झालेल्या लोकांचे किस्से चर्चेच्या रुपाने मांडले आहेत. त्यातील गंगाधरपंत नावाचे गृहस्थ शामभट्टाला म्हणतात," ज्योतिषात वागल्यावर जे लोकांचे नुकसान होते ते कोणी भरुन द्यावे? मी आपल्या बुद्धीने चाललो असतो तर माझ्या कर्माला मीच जबाबदार झालो असतो, पण मी तुमच्या मताप्रमाणे काम केले आहे तेव्हा त्या कामाच्या ब-या वाईटाबद्दल तुम्ही जबाबदार आहात. जामीनदाराच्या वचनावर विश्वास ठेवून सावकार जामीनदारास पकडतो व त्याच्याकडून आपले पैसे व्याजासह वसूल करतो.त्याप्रमाणे तुमच्या वचनावर विश्वास ठेउन ज्यांनी काम केले आहे त्या कामाबद्द्लचे नुकसान तुमच्या जवळून का भरुन घेउ नये? रुपवान, सशक्त, निरोगी, कुळसंपन्न अशा मुलांच्या पत्रिका आणून मी तुम्हाला दाखवल्या परंतु त्या सर्वांना काही न काही तरी दुषणे ठेउन शाळीग्रामच्या मुलाशी माझ्या मुलीचे टिप्पण सोळा आणे जुळते आहे असे सांगितले आणि त्याच मुलाला मुलगी देण्यास भरीस पाडले.त्यावेळी त्यावेळी मी तुम्हाला इतकेही सांगून ठेवले कि तो मुलगा रोगी दिसतो. त्याला मी आपली मुलगी द्यावी अशी माझी मनोदेवता लवत नाही. त्यावर तुम्ही खात्रीने सांगितले कि त्या मुलाचे ग्रह उत्तम आहेत. व तो अल्पायु मरणार नाही. असे असूनहि माझी एकुलती एक मुलगी बालविधवा झाली.."
या उदाहरणावरुन श्री ह.अ.भावे यांना २२ आक्टो. १९८९ च्या रविवार सकाळ मधील श्रीमती नीला ठकार यांच्या 'संस्काराच्या नावांखाली हे काय चाललय?' या लेखातील उदाहरणाची आठवण झाली. मुंबईच्या एका प्रसिद्ध कॊलेजमध्ये लेक्चरर असलेली मुलगी लग्न होताच पंधरा दिवसात परत पाठवली होती. तिच्या पत्रिकेत मंगळ आहे हे लग्नानंतर समजले. हिचा आर्किटेक्ट नवरा फुशारकीने नातेवाईकांना सांगत होता की, लग्नाच्या दुस-या दिवशी आई पाय घसरुन पडली व पाय फ्रॆक्चर झाला. वडिलांचे अचानक ब्लडप्रेशर वाढले. त्याने गोड बोलून बायकोची पत्रिका आणून एका प्रसिद्ध ज्योतिषाला दाखवली. त्याने पत्रिका बघताच सांगितले," हिचा मंगळ घरातल्या कुणालातरी गिळणार! ताबडतोब बंदोबस्त करा." लगेच त्याच्या वडिलांनी मुलीचा बाडबिस्तारा बांधला आणि घटस्फोटाच्या पेपरबरोबर माहेरी रवानगी केली. या उदाहरणामुळे श्री ह.अ.भावे यांनी हे पुस्तक पुनर्मुद्रित करण्याचा निश्चय केला. न जाणो हे पुस्तक वाचून एखादे तरी जीवन उध्वस्त व्हायचे वाचले तरी ते पुनर्मुद्रित करण्याचे श्रम कारणी लागले असे वाटेल.
लेखकाने संवादात घातलेले शास्त्राधार व त्याची व्यवहारिक सांगड बघितली तर लेखकाचा फलज्योतिषाचा चांगला अभ्यास होता हे स्पष्टपणे जाणवते. गुणमेलन, मुहूर्ताचे स्तोम, शकुन विचार, प्रश्न विचार इत्यादि गोष्टी आजही दिसून येतात. समाजमनावर फलज्योतिषाचा पगडा, ज्योतिषभाविकांना पटणारे फलज्योतिषाचे समर्थन, पाखंडी लोकांच्या मनातील ज्योतिषविश्वासार्हतेबद्द्लचा संशय हे सर्व पाहिले कि जाणवते काळानुसार प्रसंगात बदल पण आशय मात्र तोच! नव्या बाटलीत जुनीच दारु.
डॊन क्विक्झोटच्या कथेवर आधारित 'यात्रिक' ही कथा श्री जी ए कुलकर्णी यांनी लिहिली. ती 'पिंगळावेळ' या कथासंग्रहात प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त श्री दा. न शिखरे यांनी यथामूल अनुवाद केला व तो महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळाने १९७४-७५ मध्ये प्रसिद्ध केला. 'शामभट्ट' मात्र उपेक्षितच राहिला. सुप्रसिद्ध कथालेखक श्री दि. बा. मोकाशी यांचेकडे त्याची दुर्मिळ प्रत होती. त्यांच्या मनामध्ये हे पुस्तक लोकांच्यासमोर पुन्हा यावे असे होते. आयुष्याच्या शेवटी आपल्याजवळील पुस्तके त्यांनी मित्रमंडळींना वाटून टाकली.त्यात हे पुस्तक वरदा बुक्सचे प्रकाशक श्री ह.अ.भावे यांना मिळाले. उत्तम परंतु दुर्लक्षित, उपेक्षित, काळाच्या पडद्या आड गेलेले दुर्मिळ साहित्य शोधून काढून ते पुन्हा प्रकाशात आणण्याचे काम 'वरदा बुक्स' आजवर करीत आलेले आहे. त्यातूनच हे पुस्तक जवळजवळ शंभर वर्षांनी पुन्हा प्रकाशित झाले.
प्रकाशक :- ह.अ.भावे.
पृष्ठे- ५१६
'वरदा बुक्स' सेनापती बापट मार्ग, पुणे ४११०१६ किंमत- शंभर रुपये.
अफाट रोचक दिसतय.
अफाट रोचक दिसतय.
फारच इन्टरेस्टिंग वाटते आहे
फारच इन्टरेस्टिंग वाटते आहे हे पुस्तक. वाचायला आवडेल नक्की!
>>फारच इन्टरेस्टिंग वाटते आहे
>>फारच इन्टरेस्टिंग वाटते आहे हे पुस्तक. वाचायला आवडेल नक्की!>> +१
पुस्तक परीचयाबद्दल धन्यवाद.
वरच्या तिन्ही प्रतिसादांना मम
वरच्या तिन्ही प्रतिसादांना मम.
हो. परिचय छानच आहे. पुस्तकात
हो. परिचय छानच आहे. पुस्तकात खूप रस निर्माण झाला आहे.
परिचय आवडला. वाचायला आवडेल.
परिचय आवडला. वाचायला आवडेल. धन्यवाद.
या पुस्तकाचे कागदी प्रत फक्त
या पुस्तकाची कागदी प्रत फक्त रसिक या संकेत स्थळावर उपलब्ध दिसली पण डॉलर मध्ये फक्त. किमान २० डॉलरची ऑर्डर हवी.
बूकगंगा वर इ-पुस्तक उपलब्ध आहे ते घेतले (₹१०५). पण ते वाचण्यास त्यांचेच ॲप डाउनलोड करावे लागते जे फोन आणि संगणकासाठी उपलब्ध आहे. पण संगणकावर फक्त एक्सपी/विस्टा/विंडोज ७ ओएस साठी. त्यातही विंडोज ७ वर ॲप इंस्टॉल तर झाले पण पुस्तक डाऊनलोड करून उघडताना एरर येऊन बंद होते. रि- इंस्टॉल/री - डाऊनलोड करूनही तेच.
फोनवर (ॲंंड्रॉइड ) नीट वाचता येत आहे.
कुणी बूकगंगावरून इ पुस्तक घेण्याचा विचार करत असल्यास याची नोंद घ्यावी.