
अर्थ स्वातंत्र्याचा
ते फार्म हाऊस रोषणाईने, तरुणाईच्या कलकलाटाने फुलून गेलेलं होतं. म्युझिक वर सगळे उत्साहाने थिरकत होते. वेटर्स ड्रिंक्स च्या ग्लासेसचे ट्रे घेऊन हॉलभर फिरत होते. ट्रे भराभर रिकामे होत होते. मंद संगीताचा आणि धुंद करणाऱ्या ड्रिंक्सचा अंमल तरूण - तरूणींच्या मनांवर, देहांवर, त्या सगळ्या वातावरणात पसरू लागला होता. पार्टीला हळूहळू रंग चढू लागला होता.
मनाली इतरांपासून जरा बाजूलाच तिच्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत उभी होती. बोलता बोलता म्युझिक च्या तालावर हलकेच डोलत होती. गोरीपान, हसऱ्या चेहऱ्याची, सुडौल बांध्याची मनाली हलक्याशा मेकअप मध्येही आकर्षक दिसत होती. आज तिने व्हाईट शोल्डर टॉप आणि पिंक कलरचा लॉंग स्कर्ट परिधान केला होता. त्यात तिचं सौंदर्य अजूनच खुललं होतं. ती मैत्रिणीशी गप्पा मारत असताना हातात ड्रिंकचे दोन ग्लासेस घेतलेला रोहित ऐटबाज चालीत तिथे आला. ही पार्टी त्याच्याच वाढदिवसानिमित्त अरेंज केली गेलेली होती.
" हॅलो..." किंचित घसा खाकरून हसतमुखाने रोहित म्हणाला. त्याचा आवाज ऐकून मनालीची व तिच्या मैत्रिणीची तंद्री भंगली.
" ए हाय. हॅपी बर्थडे हॅन्डसम." त्याला Hug करून मनालीची मैत्रीण म्हणाली. रोहितने तिचे आभार मानले आणि त्याची नजर मनालीकडे गेली. आपल्या पासून नजर चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनालीचं लक्ष वेधून घेण्यासाठी रोहित म्हणाला.
" हाय मनाली."
" हाय रोहित. हॅपी बर्थडे." हळूवार स्मित करून आपला हात पुढे करत मनाली म्हणाली. रोहितने तिचा हात हातात घेतला, आणि हलकेच दाबला. त्याच्या हाताच्या राकट, मजबूत स्पर्शाने तिला शहारल्या सारखं झालं. हात मागे घेताना तिच्या गालांवर जराशी लाली आली होती. ओठांच्या कडेने हसू उमटलं होतं, आणि खाली झुकलेल्या नजरेत एक वेगळीच चमक आली होती. खरं म्हणजे मनालीला रोहित आवडत होता ; पण आपल्या भावना ती त्याच्यासमोर कधीच व्यक्त करू शकली नव्हती. आजच्या दिवसासाठी ती खूप उत्साहित होती. आपले खास आवडीचे आऊट फिट्स परिधान करून वेळेत ती पार्टीला हजर होती. वरवर ती आपल्या फ्रेंडशी बोलत होती ; पण तिची नजर रोहितलाच शोधत होती. स्वतःहून त्याच्यापुढे जाऊन त्याला विश करण्याचं धाडस तिला झालच नसतं. त्यामुळे तो स्वतःच त्यांच्यापाशी आल्यावर मात्र तिची कळी खुलली होती.
" काय रे दोन-दोन ग्लास एकदम."
" अं.." रोहित गोंधळून उद्गारला. मग एकदम तिच्या बोलण्याचा अर्थ समजून म्हणाला " नो नो. धिस इज फॉर मनाली." असं म्हणत हातातला भरलेला ग्लास त्यांनी मनाली समोर धरला.
" माझ्यासाठी ? अरे नाही... नको. मी.." ती गोंधळून चाचरत म्हणाली.
" अगं नको काय ? मी पाहतोय, तू आल्यापासून काहीच घेत नाहीयेस. घे ना. संकोच बाळगू नकोस."
" अरे खरंच नको न. प्लीज." त्याचंही आपल्याकडे लक्ष होतं हे समजताच ती मनातून लाजली, अन् सुखावलीही.
" कम ऑन. माझ्या बर्थडे च्या दिवशी मला तू अशी नाराज करणार आहेस का ? "
" हो मनाली. अगं तो इतका आग्रह करतोय, तर घे ना. " तिची मैत्रीण ओठातल्या ओठात हसू दाबत म्हणाली.
" अगं पण.."
हो ना करत शेवटी मनालीने ग्लास घेतला, आणि पिऊन रिकामा केला. एक हलकीशी सुखद संवेदना शरीरभर पसरत गेल्यासारखं तिला वाटलं. ओठांवर स्मित उमटलं.
" अजून एक." रोहित.
" अरे नाही. नको." मनाली म्हणाली.
मात्र तिच्या नकाराकडे दुर्लक्ष करीत रोहित ने एका वेटरला आवाज दिला.
" हेss वेटर.."
तो जवळ येताच रोहित त्याच्या कानात काहीतरी पुटपुटला. वेटर ग्लास घेऊन आला. रोहितने पुन्हा मनालीला आग्रह करून तो संपवायला लावला. पुन्हा तीच फिलींग ; पण यावेळी थोडी अधिक स्ट्रॉंग. पूर्ण शरीर हलक होऊ लागल्यासारखं मनालीला वाटू लागलं.
" वील यू डान्स वुईथ मी ? " रोहित ने आपला हात पुढे करत मनालीला विचारलं. मनालीने क्षणभर धुंदावलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो हसत होता. मनालीची मैत्रीण नवलाने आणि कौतुकाने तिच्याकडे बघत होती.
मनालीने स्मित करत मूकपणे आपला हात त्याच्या हातात दिला. तो तिचा हात पकडून हॉलच्या मध्यभागी आला. दोघेही हातात हात गुंफून डान्स करू लागले. रोहितच्या स्पर्शाने मनाली क्षणाक्षणाला अधिकाधिक मोहरत होती. तिला हे स्वप्नवत वाटत होतं. हातांप्रमाणे हळूहळू नजराही एकमेकांत गुंतू लागल्या. त्याचे डोळे तिच्या डोळ्यांत काहीतरी शोधत असल्या सारखे खोलवर पाहत होते. त्यांत उत्सुकता होती, मिष्कीलपणा होता. तर तिच्या नजरेत स्त्रीसुलभ लज्जा होती. मध्येच तो थांबला. आणि हात उंचावून जरा मोठ्या आवाजात म्हणाला -
" स्टॉप."
म्युझिक थांबलं. हॉलमध्ये उपस्थित सर्वांच्या नजरा गोंधळून त्याच्याकडे वळल्या. मनाली ही गोंधळली होती. थोडावेळ शांततेत गेल्यावर, रोहित बोलू लागला.
" लेडीज अॅन्ड जंटलमेन. अटेन्शन प्लीज."
आणि असं म्हणून तो मनाली समोर गुडघ्यावर बसला. मनालीच्या मनातील गोंधळ अधिकच वाढला.
" मनाली मला तू खूप आवडतेस. वील यू मॅरी मी ? "
त्याच्या या अनपेक्षित वागण्याने, बोलण्याने मनाली क्षणभर स्तब्धच झाली. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर ती भानावर आली. तिला अगदी आस्मान ठेंगणे झाल्यासारखं वाटत होतं. काय बोलावं नि काय नको ते सुचेचना. लाजून किंचित स्मितहास्य करीत तिने होकारार्थी मान डोलावली. तो हसत झटकन उभा राहिला. क्षणभरच दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, आणि एकमेकांना मिठी मारली. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
" मनाली..."
अचानक एक संतापलेला आवाज त्या हॉलमध्ये घुमला. मनाली आणि रोहित पटकन एकमेकांपासून दूर झाले. सगळ्यांनी दचकून आश्चर्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. मनालीची आई दरवाजाच्या आत थोड्या अंतरावर उभी होती. नाजूक, बांधेसूद शरीरयष्टी, मध्यम उंची, गोऱ्यापान रंगाची नाकी डोळी रेखीव असलेली मनालीची आई मालती चिडलेल्या नजरेने मनाली कडे बघत होती.
मालती मनाली अन् रोहितच्या कॉलेज मध्येच शिक्षिका होती. आपल्या परिपक्व, समजूतदार आणि प्रेमळ स्वभावामुळे ती सगळ्या स्टुडंट्स ची फेवरेट होती. संपूर्ण कॉलेजच्या स्टुडंट्सनाच नाही तर स्टाफ, टीचर्सना ही तिच्या विषयी प्रेमपूर्वक आदर होता.
मनालीचा चेहरा प्रथम भीती व शरमेने पांढरा पडला ; पण मग त्यावर निश्चय व गंभीरता आली. तिच्यावर एक रागाचा कटाक्ष टाकून एकदम मालती तरातरा चालत तिच्या व रोहितच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.
" हे सगळं काय चाललंय ? "
" अ..आई. हे बघ." मनाली बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे डोळे, किंचित जडावलेली जीभ, देहबोली यांवरून मालतीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने मनालीच्या तोंडाजवळ तोंड नेलं, आणि क्षणार्धात सगळा प्रकार तिच्या ध्यानात आला. ती दारू प्यायली
होती. रोहितने खरंतर मगाशी कोल्ड् ड्रिंक च्या बहाण्याने तिला दारू प्यायला लावली होती.
मनालीच्या मनातील रोहित बद्दल असलेल्या भावना मालती चांगल्या ओळखून होती. अजाण वयात बाह्य रंगाच्या आकर्षणालाच भुलून जाऊन व्यक्ती त्यालाच प्रेम समजून बसतो, आपल्या मुलीच्या बाबतीतही हेच घडत असल्याचं तिला समजत होतं. म्हणूनच दोन तीन वेळा अप्रत्यक्ष पणे तिने आपल्या मुलीला ती अजून लहान, अजाण असून तिने आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असेही समजावलं होतं. तसेच ती हेदेखील जाणून होती की मनाली सारख्या जराशा बुजऱ्या स्वभावाच्या मुलीला आपल्या मनातलं रोहित समोर उघड करण्याचं धैर्य होणार नव्हतं ; पण आता त्या बीयरच्या अंमलाखाली तिच्या मनात जरा हिंमत आणि बेपर्वाई आली होतं. तसे फक्त दोनच पेग्ज घेतले असल्यामुळे ती अगदीच काही ऑफ ही झालेली नव्हती. सांगितलेल्या गोष्टी समजण्याएवढ्या शुद्धीत नक्कीच होती.
" काय बघू ? तू घरी चल. आणि पुन्हा याच्या सोबत दिसलीस तर याद राख." मालती उद्विग्नतेने बोलत होती.
" एक मिनिट आई. रोहित आवडतो मला. आणि मी याच्याशीच लग्न करणार आहे." मनाली उद्दामपणे उत्तरली.
" लग्न ? हे तूच ठरवलस. स्वतःच ? अं ? "
" हो आई. आता मी काय लहान बाळ नाहीये. मोठी झाली आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य मला मिळायला हवं आता."
" स्वातंत्र्य ? हं." मालती तुच्छतेने हसली. " स्वातंत्र्याचा अर्थ तरी कळतो का तुला ? सगळं मनासारखं, भल्या बुऱ्याचा विचार न करता हवं तसं वागता येणं, म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, स्वैराचार आहे. ज्यामुळे पुढे फक्त पश्चात्ताप करावा लागतो. आपल्या आईला उलट उत्तर देऊन, दुखावून, तिला न जुमानता तु जे स्वातंत्र्य मिळवशील ते तुला सुखी करू शकेल असं वाटतं तुला ? " शेवटी तिच्या आवाजात जरा नरमाई, आणि कळवळा होता.
मनालीने खाली झुकलेली मान खाडकन वर करून आईकडे पाहिलं. प्रथमच तिच्या डोळ्यांत काहीसा पश्चात्ताप दिसत होता. काही क्षण थांबून मालती म्हणाली -
" तसं असेल तर तुझं स्वातंत्र्य तुला लखलाभ." असं म्हणून मालती माघारी वळाली. आणि चालू लागली.
" थांब आई." मनाली म्हणाली. मालतीने थांबून तिच्याकडे पाहिलं. मनाली आईजवळ आली, आणि म्हणाली.
" खरं आहे आई तू म्हणालीस ते. आईला दुखावून मिळवलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसतच. आणि ते कधीच कुणाला सुखी करू शकत नाही."
मग ती रोहित कडे वळून म्हणाली -
" आय अॅम सॉरी रोहित. हे सगळं आपल्यासाठी योग्य नाही. तुला वाढदिवसाच्या आणि पुढील करियरच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा."
असं म्हणून ती आई सोबत निघाली
समाप्त
@ प्रथमेश काटे
छान कथा लिहिली आहे. आपला
छान कथा लिहिली आहे. आपला जोडिदार निवडण्याचे स्वातंत्र्य तरूण पिढीला हवे हे मालती बाईंनी मान्य केले पाहिजे हे माझे वैयक्ति क मत.
आईला दुखावून मिळवलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसतच. आणि ते कधीच कुणाला सुखी करू शकत नाही.">> हे जिंदगी मे प्यार एक ही बार होता है लेव्हलचे आहे. तरुण पिढी ला स्वातंत्र्य हवेच की त्यांचे जीवन कसे जगायचे ते. तरुण व्यक्तिरेखा छान रंगवल्या आहेत. पुढील लेखनास शुभेच्छा.
तरुण पिढी ला स्वातंत्र्य हवेच
@अश्विनीमामी - धन्यवाद मॅम.
तरुण पिढी ला स्वातंत्र्य हवेच की त्यांचे
जीवन कसे जगायचे ते. >>अजाण वयात बाह्य रंगाच्या
आकर्षणालाच भुलून जाऊन व्यक्ती त्यालाच प्रेम समजून बसतो,
आपल्या मुलीच्या बाबतीतही हेच घडत असल्याचं तिला समजत
होतं.
@अश्विनीमामी - धन्यवाद मॅम.>>
@अश्विनीमामी - धन्यवाद मॅम.>> अहो नुसते मामी म्हटलेत तरी चालेल की. लेखन शैली छान आहे तुमची. तरुण मनाचे तरंग छान टिपले आहेत. मानसीचा ड्रेस इमॅ जिन करुन पाहिला.
बाह्य आकर्षणाचे चार पाच कमीत कमी अनुभव आले की गोड स्वभाव वगैरे कळू लागेल.
छान लिहिलंय... पूर्वार्ध
छान लिहिलंय... पूर्वार्ध आवडला.
ती मालती का आली मध्येच रसभंग करायला.. मस्त चाललं होतं सगळं.. मुळात या लेक्चरबाज काकूला पार्टीचं निमंत्रण कोणी दिलं ? विनानिमंत्रण आली असेल तर तिचा त्रिवार धिक्कार !
पुलेशु !
गोष्ट चांगली लिहिली आहे पण...
गोष्ट चांगली लिहिली आहे पण...
स्वातंत्र्य पाहिजे न घ्या पण परिणामांची जबाबदारी पण घ्या.
ती मालती का आली मध्येच रसभंग
ती मालती का आली मध्येच रसभंग करायला.. मस्त चाललं होतं सगळं.. मुळात या लेक्चरबाज काकूला पार्टीचं निमंत्रण कोणी दिलं ?>> हो ना.
मी तर रोहीत आणि मालतीचा मस्त
मी तर रोहीत आणि मालतीचा मस्त डान्स इमॅजिन केलेला शेवटी...
छान लिहिलंय... पूर्वार्ध
छान लिहिलंय... पूर्वार्ध आवडला.
पुलेशु ! >>> थॅंक्यू सर ; पण उत्तरार्धातच खरा कथेचा सार आहे.
@हाडळीचा आशिक,@आश्विनीमामी
ती मालती का आली मध्येच रसभंग करायला.. मस्त
चाललं होतं सगळं.. मुळात या लेक्चरबाज काकूला
पार्टीचं निमंत्रण कोणी दिलं ?>>> मालतीच खरी कथेची नायिका आहे. ती मनाली आणि रोहित सारखी नादान नसून mature आहे. तिला योग्य अयोग्य यातला फरक समजतो.
@केशवकूल - थॅंक्यू सर.
@केशवकूल - थॅंक्यू सर.
स्वातंत्र्य पाहिजे न घ्या पण परिणामांची
जबाबदारी पण घ्या.>> हो ना.
कथेत रोहितने ड्रिंक्समध्ये
कथेत रोहितने ड्रिंक्समध्ये काहीतरी मिळवायला त्या वेटरला खाजगीत सांगितले ह्यावरून उद्देश खचितच चांगला नसावा आणि मनाली नाहक शोषणाची पीड़िता बनली असती त्यामुळे मालतीची सिनेस्टाइल एंट्री येथे आवश्यक ठरते असे वाटते.
रोहित दोन ग्लास घेऊन फिरत
रोहित दोन ग्लास घेऊन फिरत होता म्हणजे प्रत्येक हातात एक ग्लास ना? मग शेक हॅंड कसा केला?
छान कथा..
छान कथा..
काकूंनी एकदम सिनेमातल्या पोलीसांसारखी शेवटी एन्ट्री मारली.
कथेत रोहितने ड्रिंक्समध्ये
कथेत रोहितने ड्रिंक्समध्ये काहीतरी मिळवायला
त्या वेटरला खाजगीत सांगितले ह्यावरून उद्देश
खचितच चांगला नसावा आणि मनाली नाहक
शोषणाची पीड़िता बनली असती त्यामुळे
मालतीची सिनेस्टाइल एंट्री येथे आवश्यक ठरते असे
वाटते. >> अगदी बरोबर.
छान कथा..
काकूंनी एकदम सिनेमातल्या पोलीसांसारखी शेवटी
एन्ट्री मारली. >> हाहाह. थॅंक्यू सर.
विचार करायला लावणारी आणि
विचार करायला लावणारी आणि चर्चेस (चांगल्या अर्थाने) उद्युक्त करणारी कथा आहे. वरती अमांच्या प्रतिसादाशी सहमत.
खरं आहे आई तू म्हणालीस ते. आईला दुखावून मिळवलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसतच. आणि ते कधीच कुणाला सुखी करू शकत नाही. >> हे वाक्य कधीच कुणाबद्दलही म्हणू शकत नाही आपण. अगदी आई/नवरा/बायको/मुलगा/मुलगी कुणीही. जर प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे, तर त्याच्या किंवा तिच्या विचाराशी इतरांचे सगळेच विचार जुळतील असं नाही. काही विचार जुळणार नाहीत, काही दुखावणारे असतील तर काही सुखावणारे. हे असं कुणालाही न दुखावता स्वातंत्र्य मिळणं मला तरी अशक्य वाटतं. त्याचं कारण आयुष्यात अनेक निर्णय हे चूक की बरोबर असे बायनरी नसतात.
दो उदाहरणं देतो -
१. छोटं उदाहरण घेऊ - घरी टीव्ही घ्यायचा आहे, आई म्हणते मोठा कशाला? छोटाच घेऊ २४ इंची. मुलगा म्हणतो ५५ इंची घेऊ - त्यात सगळे स्मार्ट फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी. छोटा आणि ऑटडेटेड टेक्नॉलॉजीचा घेतला तर २-४ वर्षात पुन्हा बदलायची पाळी येईल. आता ह्यात काय बरोबर आणि काय चूक? कुणीतरी दुखावलं जाणारच ना?
२. कथेसारखंच उदाहरण, पण थोडे बदल करून. फक्त इथे समजा की रोहितने मनालीला फसवून ड्रिंक वगैरे काही प्यायला दिलं नाही. पण तो तिला खरंच आवडतो. त्याने लहानपणी अत्यंत हालाखीची परिस्थिती बघितली आहे. पुढे घरास हातभार म्हणून काबाडकष्ट करून तो शिकला आणि कॉलेजात आला. मनालीला तो केवळ त्याच्या दिसण्यामुळे नाही, तर एकंदर अंगभूत गुणांमुळे आवडतो. मालतीला यातलं काहीच माहीत नाही. आता एके दिवशी त्याने मनालीला प्रपोज केलं. इथे मनाली स्वतःहून दारू प्यायली आहे आणि तीही कमी प्रमाणात. तेव्हा नेमकी मालती तिथे आली आणि तिचा पारा चढला. तिने गृहीत धरलं की रोहितने मनालीला बळजबरी दारू प्यायला दिली आणि नादाला लावले. इथे कोण चूक आणि कोण बरोबर? दारू पिऊन घरी खोटं बोलणं हे एकवेळ चूक म्हणता येईल; पण त्यात रोहितची चूक नाही आणि मनालीचं प्रेमही चुकीचं नाही. ते प्रेम दारू पिण्याआधीही तेवढंच होतं व ते दारू न पिता ही त्यांनी व्यक्त केलंच असतं. इथे मनाली कदाचित मालतीला सत्य परिस्थिती समजवायचा प्रयत्न करेल, पण ती मालतीला पटली नाही तर ती दुखावली जाणार हे साहजिकच आहे. पण केवळ त्यासाठी मनालीने रोहितचा विचार सोडून द्यावा का? नाही.
इथे मालतीनेही मी म्हणते तसं कर असा हेका न ठेवता मनालीला तिच्या विरोधाचं कारण व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. त्याही आधी मनालीला काय म्हणायचं आहे ते आधी ऐकून घेतलं पाहिजे. त्यात जर आपल्याला माहीत नसलेल्या कुठल्या गोष्टी मनालीने सांगितल्या, तर 'बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्' या नीतीला जागून तिच्या भावनांचा आदर करून त्यांचा स्वीकार केला पाहिजे. स्वातंत्र्य उपभोगणे आणि ते निभावण्याची जबाबदारी - या दोन्ही गोष्टींची आठवण तिने मनालीला करून देऊन निर्णय तिच्यावर सोपवायला पाहिजे. कुठलेही स्पष्टीकरण न देता मनालीच्या बाजूने स्वतःच निर्णय घेणे किंवा तिच्यावर राग धरून तिला अमुक एक निर्णय घेण्यास भावनिक ताणामार्फत भाग पाडणे हे स्वातंत्र्य नव्हे.
"अजाण वयात बाह्य रंगाच्या आकर्षणालाच भुलून जाऊन व्यक्ती त्यालाच प्रेम समजून बसतो" - हे आपलं गृहीतक आहे; पण ते चुकीचं असू शकतं.
- केवळ अजाणच नाही, तर जाणतं वय असलेलेही बाक्य आकर्षणाला भुलतात ; फक्त त्यांना आकर्षित करणारे मुद्दे वेगळे असू शकतात (हा कोट माझ्या नावाने व्हॉट्सॅपवर फिरवा लोकहो) - पैसा, घर, गाडी, नोकरी, संस्कार वगैरे.
- प्रेमात पडलेल्या सर्वच अजाण व्यक्ती या बाह्य आकर्षणालाच भुलून जातात - असं नाही.
कथा लेखकाला आपली कथा आपल्याला
कथा लेखकाला आपली कथा आपल्याला हवी तशी पाडता येते. तस प्रेम ही शाश्वत नसते व आकर्षण ही शाश्वत नसते. जगण्याचीच शाश्वती नसते तर! अनेक प्रसंगात मदन विवेकावर मात करतो.
हरपा, प्रतिसाद आवडला.
हरपा, प्रतिसाद आवडला.
छोटं उदाहरण घेऊ - घरी टीव्ही
छोटं उदाहरण घेऊ - घरी टीव्ही घ्यायचा आहे, आई
म्हणते मोठा कशाला? छोटाच घेऊ २४ इंची. मुलगा
म्हणतो ५५ इंची घेऊ - त्यात सगळे स्मार्ट फीचर्स
आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी. छोटा आणि ऑटडेटेड
टेक्नॉलॉजीचा घेतला तर २-४ वर्षात पुन्हा
बदलायची पाळी येईल. आता ह्यात काय बरोबर
आणि काय चूक? कुणीतरी दुखावलं जाणारच ना? >> अत्यंत अर्थहीन उदाहरण. यात कुणीही अगदी दुखावल्या जाण्याचा प्रश्नच कुठे येतो ? इथे फक्त आपल्या मताप्रमाणे ( आई ) आणि मनाप्रमाणे ( मुलगा ) होण्याचा विषय आहे. तसं नाही झालं तर फार फार तर जरासा राग येऊ शकेल ; पण कथेत मनाली ही आपल्यापेक्षा अधिक समज असणाऱ्या आईचं न ऐकता बालिश हट्ट धरून बसली आहे. तिला स्वातंत्र्य म्हणजे काय हेच मुळात समजत नाही. तिला फक्त रोहित आवडतो तो खरा कसा आहे, त्याची नियत कशी आहे, मूळ स्वभाव कसा आहे हे तिला माहीत नाही. तो काही तिचा जवळचा मित्र नाही ; पण हा सगळा विचार करण्याची तिची अजून क्षमताही नाही अन् तिला असा विचार करायचाही नाही. तिला फक्त त्याच्याशी लग्न करायचय. थोडक्यात मनमानी करायची आहे. असा मागचा पुढचा विचार न करता काही करणे म्हणजे स्वातंत्र्य आहे का ? याउलट तिच्यापेक्षा काही पावसाळे अधिक पाहिलेल्या, तिच्यापेक्षा जास्त समज असलेल्या एक उत्तम प्रोफेसर असणाऱ्या बुद्धिमान आणि मॅच्युअर मालतीने रोहितची पूर्ण जरी नाही तरी बऱ्याच प्रमाणात पारख केली आहे. तो कसा आहे याचा थोडाफार अंदाज तिला आला आहे. आणि अशा मुलांपासून आपल्या मुलीने दूर राहावं असंच कोणत्याही आईला वाटेल. आता यात काय चूक आणि काय बरोबर ?
कथेसारखंच उदाहरण, पण थोडे बदल करून. फक्त इथे
समजा की रोहितने मनालीला फसवून ड्रिंक वगैरे
काही प्यायला दिलं नाही. पण तो तिला खरंच
आवडतो. त्याने लहानपणी अत्यंत हालाखीची
परिस्थिती बघितली आहे. पुढे घरास हातभार म्हणून
काबाडकष्ट करून तो शिकला आणि कॉलेजात आला.
मनालीला तो केवळ त्याच्या दिसण्यामुळे नाही, तर
एकंदर अंगभूत गुणांमुळे आवडतो. मालतीला यातलं
काहीच माहीत नाही. आता एके दिवशी त्याने
मनालीला प्रपोज केलं. इथे मनाली स्वतःहून दारू
प्यायली आहे आणि तीही कमी प्रमाणात. तेव्हा
नेमकी मालती तिथे आली आणि तिचा पारा चढला.
तिने गृहीत धरलं की रोहितने मनालीला बळजबरी
दारू प्यायला दिली आणि नादाला लावले. इथे कोण
चूक आणि कोण बरोबर? >> मालती काहीही गृहीत धरून गैरसमज करून घेणार नाही. ती आपल्या मुलीला चांगली ओळखते. आणि तिने रोहितची ही थोडीफार पारख केली आहे ( जी अजाण मनालीला करता येणार नाही.) त्यामुळे ती सत्य परिस्थिती ओळखू शकते.
केवळ अजाणच नाही, तर जाणतं वय असलेलेही बाक्य
आकर्षणाला भुलतात ; फक्त त्यांना आकर्षित
करणारे मुद्दे वेगळे असू शकतात (हा कोट माझ्या
नावाने व्हॉट्सॅपवर फिरवा लोकहो) - पैसा, घर,
गाडी, नोकरी, संस्कार वगैरे.>> संस्कार नव्या पिढीतल्या नादान तरूण तरूणींना आऊट डेटेड वाटतील. त्यांकडे ते आकर्षित होणार नाहीत.
प्रेमात पडलेल्या सर्वच अजाण व्यक्ती या बाह्य
आकर्षणालाच भुलून जातात - असं नाही.>> अर्थातच असंच आहे. त्याचा पुरावा तुमच्या वाक्यातील एक शब्द आहे - ' अजाण '
अमांचा प्रतिसाद आवडला.
अमांचा प्रतिसाद आवडला.
मालतीबाईंची पार्टीत एंट्री फार बाळबोध फिल्मी वाटली.
आपले मूल बाहेरच्या जगात वावरणार तर त्या जगात योग्य निर्णय घेत स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी त्याला तयार करणे हे पालकांचे काम. 'दुसर्याने हातात ठेवलेल्या कोल्ड-ड्रिंकच्या ग्लासमधे दारु मिसळलेली असू शकते त्यामूळे अशावेळी ..... ' एवढेही मार्गदर्शन मालतीबाईंनी स्वतःच्या मुलीला केलेले नाही आणि वर परत तिला इमोशनल लोड देवून तिच्यावर स्वतःचे निर्णय लादत आहेत. आपले अपत्य बाहेरच्या जगात सुरक्षित राहील, निदान त्याची vulnerability कमीत कमी असेल यासाठी आधी स्वतः काही करायचे नाही आणि नंतर अपत्याकडून अजाणता चूक झाल्यावर त्याला संभाळून न घेता एकदम स्वातंत्र्याचा पंचनामा !
The point is anyone above 18
The point is anyone above 18 should find their own way make mistakes and explore life. A so called good life and partner that is parent approved is clipping g ones own wings. Being an adult means parental approval no longer need. Mess around and find out.
अनेक प्रतिसादांवरून असं
अनेक प्रतिसादांवरून असं लक्षात येतं की बऱ्याच जणांना नायिका मालतीचा Stand अयोग्य वाटतो. तिचं मध्ये येणं अनाठायी वाटतं. याचा अर्थ कदाचित माझ्या लेखनपद्धतीतच काहीतरी उणिव राहिली. चूक झाली आहे. अयोग्य बाजू नकळत फारच आकर्षकरित्या मांडली गेली, आणि योग्य बाजू प्रभावीपणे, ताकदीने मांडण्यात काहीतरी कमी राहिली. याबद्दल मी दिलगीर आहे ; पण शेवटी काहीही झालं तरी बरोबर ते बरोबरच आणि चूक ते चूकच.
>>Submitted by प्रथमेश काटे
>>Submitted by प्रथमेश काटे on 17 August, 2023 - 01:39>>
मी लेखनपद्धतीबद्दल बोलत नाहीये. तर एकंदरीत स्वातंत्र्य, त्यासोबत लागणारे शहाणपण याबद्दल बोलत आहे.
'आईला दुखावून मिळवलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसतच. आणि ते कधीच कुणाला सुखी करू शकत नाही' ही विचारधारा मला पटत नाही. यात अपत्यावर विनाकारण भावनिक ताण, वेठीला धरणे येते. आईला पसंत नाही म्हणजे चुकीचेच असे नसते, आईचे विचार पूर्वग्रहदूषित असू शकतात. ' पालकांना दुखावून स्वातंत्र्य' यात फोकस अपत्यावर रहात नाही तर पालकांवर रहातो. फोकस हा 'अपत्याकडून चुकीच्या गोष्टींची निवड आणि त्यातून पुढे त्याच्या वाट्याला येणारा त्रास' हे शक्य तितके टाळणे यावर हवा. आपल्या मुलाने चांगले लाईफ चॉईसेस करावे असे वाटत असेल तर त्या दृष्टीने त्यांना हळू हळू तयार करणेही आले, असे करताना मूल चुकले तर सांभाळून घेणेही आले. प्रसंगी अपत्याला सुरक्षित ठेवण्यासाठी समोरच्या पार्टीला कायद्याचा बडगा दाखवण्याची तयारीही हवी. अपत्याचा बाहेरच्या जगात सावध वावर, त्यातून अंदाज चुकला-असुरक्षित वाटले तर विश्वासाने पालकांशी संवाद, मदत मागणे आणि पालकांनी अपत्याच्या पाठी भक्कम उभे रहाणे हा नॉर्मल पॅटर्न हवा. तुमच्या कथेतल्या मुलीकडे पार्टीला जायचे तर साधी बडी सिस्टिमही नाही. मित्र दारु मिसळलेले सॉफ्ट ड्रिंक देतो आणि मैत्रीण बघत रहाते. मुलगी काहीतरी चुकीचे करणार या भीतीने आईने पार्टीला येणे, हस्तक्षेप करणे या ऐवजी 'इथे काहीतरी चुकीचे घडत आहे' हे उमजून मुलीने मदतीसाठी आईला संपर्क करणे, अपत्यात आलेली निर्णय क्षमता-नात्यातला विश्वास हे मुलीला अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित करते.
असू द्या. मनाली आणि तिची आई
असू द्या. मनाली आणि तिची आई दोघी गोर्यापान, सुडौल आहेत, मनाली बीअरचे दोन पेग्ज घेऊनही ऑफ होत नाही आणि पार्टीक्रॅशर आईच्या एका डायलॉगमध्ये तिचं हृदयपरिवर्तन होतं यात कथेचं आणि भारतीय संस्कृतीचं सगळं सार आलेलं आहे. उद्बोधक कथा आहे.
ह्या कथेच्या निमित्ताने एक
ह्या कथेच्या निमित्ताने एक चांगली चर्चा होतेय हे लेखकाने आपल यश समजायला हवं
वाचकांचे विचार लेखकाच्या दृषटिकोना पेक्षा वेगळे असतील तर त्यातून काहीं नवीन पुढे येतय.
दोन पिढीतील वैचारिक संघर्ष हे कायम राहणार.. पण वरच्या @स्वाती२ च्या प्रतिसादातील हे अतिशय पटलं......
>>>>>विश्वासाने पालकांशी संवाद, मदत मागणे आणि पालकांनी अपत्याच्या पाठी भक्कम उभे रहाणे हा नॉर्मल पॅटर्न हवा
इथे लेखक मनालीच्या जागी आणि
इथे लेखक मनालीच्या जागी आणि कथा न पटल्याचे प्रतिसाद देणारे मालतीबाईंच्या जागी ठेवून पाहिले तर.. मनालीचे आपल्या विचारांनी कथा लिहिण्याचे स्वातंत्र्य मालती बाईना मान्य नाही असे म्हणू शकतो का
पण गंमत म्हणजे लेखक मालती बाईंची बाजू घेत आहे आणि ते वाचक मनालीची
बिचाऱ्या रोहितला मात्र कोणीच
बिचाऱ्या रोहितला मात्र कोणीच वाली नाही.
हरकत नाही .... सुग्रीव असेल तर बोलावून घेऊरिक्षा चालक मुळे आता फोटो पाहिला . ... पण त्यात मालती आहे की मनाली ? ते नाही समजले
असू द्या. मनाली आणि तिची आई
असू द्या. मनाली आणि तिची आई दोघी
गोर्यापान, सुडौल आहेत >> मी सुडौल हा शब्द मनाली च्या आईच्या बाबतीत लिहीलेलाच नाही. बांधेसूद शरीराची, गोरीपान आणि रेखीव हे असं वर्णन करण्याचं कारण फक्त एवढंच की ती कथेची नायिका आहे. जी प्रगल्भ, बुद्धिमान, त्याचबरोबर दिसायलाही सुंदर अशी मला प्रेझेंट करायची होती. आणि मनाली तिचीच मुलगी शिवाय तरूण, जिच्यावर एक वाईट मनोवृत्तीचा मुलगा भाळतो असं दाखवायचं असल्याने साहजिकच ती एक सुंदर, attractive मुलगी असल्याचं दाखवणं गरजेचं आहे. आणि कथांमध्ये नायिकेचं, किंवा इतर एखाद्या तरुणीचं असं वर्णन कथानकानुसार केलं जातचं. मूव्हीतली हिरोईन सुद्धा सुंदरच असते. तिच्या अंगप्रत्यंगाचे प्रदर्शन केलं जातं ते चालत, आणि मी माझ्या कथेत असंकाही ( ते ही मर्यादित ) वर्णन केलं तर लगेच खुपलं ? आणि मला कुणी भारतीय संस्कृतीचे धडे देण्याची मुळीच गरज नाही. भारतीय संस्कृती काय असते हे मी व्यवस्थित जाणतो. आणि मी काही आपल्या संस्कृतीचा अपमान केलेला नाही.
असू द्या. मनाली आणि तिची आई
त्यात मालती आहे की मनाली ? ते नाही समजले >> तो फोटो मध्यमवयीन ; पण सुंदर, बुद्धिमान अशा नायिकेचं प्रतिक आहे. अर्थात मालती.
रोहितने खरंतर मगाशी कोल्ड्
रोहितने खरंतर मगाशी कोल्ड् ड्रिंक च्या बहाण्याने तिला दारू प्यायला लावली होती. >>>> खरतरं पहिल्यापासूनच तो तिला हार्ड ड्रिन्क्स घ्यायला सांगतोय अस समजं झाला होता माझा
पण आता त्या बीयरच्या अंमलाखाली तिच्या मनात जरा हिंमत आणि बेपर्वाई आली होतं. -- बीअरला दारू कॅटेगरीमध्ये टाकतात का? कल्पना नाही .
तसे फक्त दोनच पेग्ज घेतले असल्यामुळे ती अगदीच काही ऑफ ही झालेली नव्हती. >>> सिरियसली ? तिची टॉलरन्स लेवेल बरीच असावी मग किन्वा ही पहिलीच वेळ नसावी .
कथाबीज चांगले आहे , पण शेवट , अगदी ४ वाक्यात गुंडाळलाय आणि फिल्मी मतपरिवर्तन अगदीच ड्रामाटीक .
तसे फक्त दोनच पेग्ज घेतले
तसे फक्त दोनच पेग्ज घेतले असल्यामुळे ती अगदीच
काही ऑफ ही झालेली नव्हती. >>> सिरियसली ?
तिची टॉलरन्स लेवेल बरीच असावी मग किन्वा ही
पहिलीच वेळ नसावी. >> तिच्या कोल्ड्रिंक मध्ये बीयर मिसळल्याचं दाखवलं आहे. थेट बीयरच दिली असती तर तिच्या लक्षात येऊ शकलं असतं ना की काहीतरी वेगळं आहे. हो, दोन पेग्ज अशा शब्दप्रयोगामुळे गैरसमज होऊ शकतो. तिथे जरा चूक झाली खरी. त्याबद्दल सॉरी ; पण दोन पेग म्हणजे बीयर मिसळलेल्या कोल्ड्रिंकचे दोन पेग्ज असा अर्थ घ्यावा.
तो फोटो मध्यमवयीन ; पण सुंदर,
तो फोटो मध्यमवयीन ; पण सुंदर, बुद्धिमान अशा नायिकेचं प्रतिक आहे. अर्थात मालती.>>>
आणखी एक संतूरमॉम !
Pages