जगण्याचे सोने व्हावे…

Submitted by झुलेलाल on 13 August, 2023 - 08:11

जगणे आणि जिवंत असणे यातला फरक जेव्हा कळतो तेव्हा जगणे अधिक आनंदी होते. हा फरक सूक्ष्म असतो, पण अनेकदा तो समोर आला तरी जाणवत नाही. बऱ्याचदा तो सहजपणे समोर येऊनही, पकडून ठेवायचं सुचत नाही. मग आपलं जगणं म्हणजे केवळ जिवंत असण्यापुरतंच उरतं. जगण्याचा साक्षात्कार व्हावा, केवळ जिवंतपणाच्या सपक जाणिवेतून बाहेर पडून जगण्याचा जिवंत अनुभव घ्यायचा असेल, तर त्याचा जाणीवपूर्वक शोधही घ्यावा लागतो. अनेकदा, अचानक हा अनुभव समोर येतो, आणि ज्याच्या शोधात आपण चाचपडत होतो असे वाटते, तो शोध संपतो.
जगण्याच्या आनंदासाठी असा एखादाच अनुभव पुरेसा असतोच, पण अशा अनेक अनुभवांच्या आनंदाची पोतडी सोबत साठली की जगण्याचे सोने झाल्यासारखे वाटू लागते.
… असं सोने झालेलं एक जगणं मी काल अनुभवलं. अशा केवळ अनुभवांनीही आपल्या जगण्याला एक अर्थ सापडतो, याची सहज जाणीव मला त्यामुळे काल झाली…

आपल्या जगण्याचं सोनं व्हावं, असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी सगळेच आपापल्या अपेक्षांनुसार प्रयत्न करत असतात.
आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाची चिरफाड वगैरे व्हावी ही कल्पना जिवंतपणी स्वीकारण्यास आपल्याकडे सहसा कोणी तयार नसतात. दहाबारा वर्षांपूर्वी माझ्या गाववाल्या एका मित्राने देहदानाचा संकल्प सोडला, तसं मला उत्साहाने कळवलं, आणि मी भारावून गेलो. लोकसत्तात ‘देहरूपी उरावे’ या मथळ्याचा एक दीर्घ लेख लिहून मी त्या विचाराचं भरभरून कौतुक केलं, आणि हजारो वाचकांचा त्याला अक्षरशः भरभरून प्रतिसाद मिळाला.
काही दिवसांपूर्वी एक वेबसिरीज पाहिली होती. कुठल्याशा देशातले एक जोडपं, दीर्घकाळ आनंदी सहजीवन जगलं आणि वृद्धापकाळ खुणावू लागल्यानंतर, आपल्या पश्चात आपल्या देहाची व्यवस्था (विल्हेवाट नव्हे!) कशी लावावी याविषयी कायदेशीर प्रक्रिया करून कागदपत्रेही तयार करून ठेवली. आपणही आपल्या पश्चात इस्टेटीच्या वाटण्या वगैरेंची इच्छापत्रे करतो, पण आपल्या पश्चात आपल्या देहाचे काय व्हावे याचा निर्णय घेण्याचा विचार फारसा रुजलेला नाही. कोणे एके पुराणकाळी, दधिची नावाच्या ऋषीने देहदान करून कोणाचे प्राण वाचविण्याचा पहिला पायंडा सुरू केला होता असे म्हणतात. या कथा आजही सांगितल्या जातात…
परवा पुन्हा कुठेतरी ही कथा ऐकली आणि आजच्या युगातील एक दधीचीभक्त आठवला!
आमच्या जवळच, बोरीवलीच्या गोराई भागात बाळकृष्ण भागवत नावाच्या एक ज्येष्ठ व्यक्तीने व्रत म्हणून देहदान चळवळीत स्वतःस झोकून दिले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षीही ते या व्रताचा वसा तीन दशकांपासून अधिक काळ निष्ठेने जपत आहेत. काल त्यांच्याकडे गेलो होतो.
जगणे आणि जिवंत असणे यातल्या फरकाचा अनुभव देणारी ती भेट होती!
भागवत हे निष्ठावंत संघ स्वयंसेवक. लौकिकार्थाने नियत वयोमानानुसार शिक्षकाच्या नोकरीतून निवृत्त झाले, पण आजही त्यांनी शिक्षकी पेशाचा वसा सोडलेला नाही. व्याख्याने, मुलांना शिकविणे, नव्या ओळखी करून घेणे, सामाजिक आणि विधायक कार्ये करणाऱ्या संस्थांना मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, कुटुंबांचे जाळे तयार करणे, त्यांच्या नियमित भेटी घेऊन नाते जोडणे व त्यातून जगण्याचा आनंद अनुभवणे हे त्यांच्या खणखणीत आरोग्याचे इंगित आहे. तल्लख स्मरणशक्ती, कामांची व्रतस्थ बांधीलकी आणि स्वयंसेवकाचे संस्कार यामुळे भागवतांच्या जगण्याला झळाळी लाभली आहे. काल ते भरभरून बोलत होते. मी श्रोत्याच्या भूमिकेत होतो.
‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ या बोधवाक्यात ‘जिंदगी के बाद’ आपल्या मागे राहिलेल्यासाठीच्या विचाराचा संदेश आहे. मग, आपल्या मागे राहिलेल्या देहाचा विचार आपण का करू नये?… त्याची माती तर होणारच असेल, तर त्याआधी त्या पार्थिवानेही काही नाती का जोडू नयेत?…
हा विचार पचवायलाच नव्हे, तर करायलाही कठीण आहे. पण ही चळवळ वाढली पाहिजे, असे भागवतांच्या तळमळीतून उमटू लागले.
काल त्यांच्याशी गप्पा मारल्यावर मी सहज त्यांना म्हटलं, “मला तुमचा फोटो काढायचाय!”
तेही खुश झाले. बाजूलाच टेबलवरचं पुस्तक त्यांनी हातात घेतलं, आणि समाधानी चेहऱ्याने ते फोटोसाठी तयार झाले!
आपल्या हातातलं पुस्तक या निमित्ताने आणखी एकापर्यंत पोहोचलं, याचं ते समाधान होतं!

Group content visibility: 
Use group defaults

छान परीचय. धनवंती यांना मम. खरोखर दंडवत.

दधिची चळवळीबद्दल लहानपणापासून ऐकून आहे, डोंबिवलीत आहे ही संस्था. त्यामुळे आपणही देहदान करावं असं कुठेतरी आत पहील्यापासून वाटतंय.

हल्ली देहदान करणारे लोक जास्त आणि स्वीकारण्याची गरज/क्षमता कमी असे चित्र झाले आहे असे ऐकून आहे. हे कितपत खरे आहे?

माझ्या आईने २०१३ मध्ये आणि वडिलांनी मे २०२३ मध्ये देहदान केले. तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये. देहदानाबद्दल काही माहिती किंवा कुणाला संपर्क करायचा याची माहिती हवी असेल तर देऊ शकेन.
वडिलांचे मे २०२३ मध्ये निधन झाले तेव्हा कोविड निगेटिव्ह टेस्ट लागत होती. ती माझ्या बहिणीने निधनाच्या आदल्या दिवशी करून घेतली होती, त्यामुळे प्रत्यक्ष वेळी त्रास झाला नाही. निधनानंतर ६ तासाच्या आत किंवा जमेल तितके त्याच्या आधीच, देहदान करून बॉडी कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवावी लागते. वडिलांचे निधन रात्री १० वाजता झाले, तर अँब्युलन्सने रात्री २ वाजता त्यांना तळेगावला नेण्यात आले, पेपरवर्क दुसऱ्या दिवशी केले. २०२३ या वर्षात मे महिन्यापर्यंत फक्त ७ जणांनी देहदान केले होते, मी विचारले होते त्यांना.

देहदानाची इच्छा पूर्ण होण्यासाठी जवळचे नातलग, एखाअडा घनिष्काठ मित्र ज्याच्यावर इतरांचाही विश्वास आहे, अशी कोणीतरी व्यक्ती निवडून त्याला ह्या इच्छेची पूर्तता होण्यासाठी आपल्या मृत्यूनंतर काय करावे लागते ह्याची पूर्ण माहिती देऊन ठेवावी. इतर जबाबदार लोकांनाही ह्याची कल्पना द्यावी. त्यासाठी लागणारे कागदपत्र कुणाच्यातरी हवाली करून ठेवावे. त्यांच्या नकलाही एक दोघांकडे देऊन ठेवाव्यात. खूप वर्षांपूर्वी जर फॉर्म भरला असेल ( २०-२५ वर्षे) तर काही माहिती वेळोवेळी अपडेट करावी लागू शकते. मृत्यूनंतरच्या भावनिक आणि परिस्थितीजन्य गोंधळामुळे देहदात्याची देहदानाची इच्छा पुरी होऊ न शकल्याची उदाहरणे आहेत.

छान लेख ! छान विचार..
माझ्याही आईवडिलांनी काही वर्षापूर्वी मला म्हटले होते की आमचे देहदान करूया. चौकशी कर जरा. पण ते राहिले आणि डोक्यातून निसटले. कुठे असा विषय निघाला की ते आठवते. आधी पुन्हा एकदा त्यांना विचारून बघायला हवे.