ववि २०२३ (यशोदा फार्म & रिसॉर्ट) - वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 30 July, 2023 - 23:40

कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.

प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.

vavi 2023.jpg

चला तर मग, येऊद्या तुमचे अनुभव इथे.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांनी कंपलसरी वृत्तांत लिहा रे.
मी तुकड्या तुकड्यात सुचेल तसे इथे लिहीत जाईन.
मी अटेंड केले त्यातील सर्वात धमाल ववि होता हा Happy
अर्थात हा माझा अकरा वर्षांनी दुसराच ववि..
पण त्यातही हा धमाल का,
तर ते सांगतो लवकरच..... Happy

वृत्तांत नंतर लिहिनच पण संयोजकांचे खूप आभार.
त्यांनी घेतलेले कष्ट दिसून आले. पडद्यामागे अनेक कलाकार असतीलच पण स्पेशली कविन चे कौतुक करण्यासाठी ही पोस्ट Happy

अनेक वर्षे जेव्हा ववि होत होता त्यावेळी मला जमले नव्हते.
आणि जेव्हा मला जमणे शक्य होऊ शकले असे असते त्यावेळेपासून ववि झालाच नव्हता.
अशी हुलकावणी देणारी अनेक वर्षे गेल्यावर अखेरीस ह्या वर्षी ववि होतोय म्हटल्यावर ही संधी न साधणे शक्यच नव्हते.

वविला जशी धमाल होते असे ऐकून होतो अगदी तशीच ती धमाल आली.

मधल्या मोठ्या गॅपनंतर परत एकदा ववि जुळवून आणल्याबद्दल संयोजकांचे विशेष आभार.

रिसॉर्टवाल्यानी त्यांची जाहिरात व्हावी म्हणून रिसॉर्टचे नाव असलेला फोटो पॉईंट बनवला आणि वरच्या फोटोत नाव सोडून बाकी सगळे आले आहे Proud Light 1

असो! एक सुंदर सुस्मरणीय दिवस Happy मनस्वी आभार संयोजक मंडळींचे _/\_ खूप ऊर्जा, उत्साह, विनोदबुद्धी यांचा खळाळता प्रवाह म्हणजे कालची संयोजन टीम! सगळे संयोजन करायचे सोपे काम नाही याची विनम्र जाणीव आहे म्हणून या सर्वांचे प्रचंड कौतुक वाटते.

सविस्तर नंतर लिहितो आता जरा गडबडीत आहे.

अनेक वर्षे वविला जायची ईच्छा होती पण काळ आणि वेळ कधीच जुळून आली नाही. या वर्षी ववि होणार हे कळल्या कळल्या वविला तर जायचेच, पण संयोजनामधे पण भाग घ्यायचा हे ठरवलेच होते. ववि संयोजनाचा अनुभव छानच होता पण त्याविषयी परत कधीतरी. तसेही ववि संयोजनात कविनने केलेल्या कामांना मम म्हणण्याशिवाय दुसरे काही काम नव्हते….
वविची तारीख ३० जुलै ठरली आणि वेळ मिळाल्या मिळल्या मी सकुसप येण्याच्या तयारीने पैसे भरले. पण ते भरल्या वर दोन चार दिवसांनी लक्षात आले की बरोबर ३१ जुलैला मोठ्या चिरंजिवांची चाचणी परीक्षा आहे. पण माझाच मुलगा तो…चाचणी परीक्षेत असे काय दिवे लावणार आहे…. त्यामुळे वविचा प्रोग्रॅम काही बदलला नाही.
वविला यावेळेस पुण्यातुन १७ जण होते. वविच्या दोन दिवस आधी संयोजकांनी येणाऱ्या सर्व जणांचा कायप्पा गृप तयार केला होता. तिथे चालणाऱ्या एकंदर गप्पांवरून मला वविला यायच्या आधी काय काय तयारी करावी लागणार आहे याचा अंदाज आलाच होता. त्याची यादी पण मी त्याच गृपवर शेअर केली होती….
वविच्या आधीच्या आठवड्यात अगदी ठरवून यावी तशी विघ्ने येत होती. ती सगळी २८ पर्यंत कशीबशी संपवली तर २९ तारखेला घरी गावावरून रहायला ७ जण, ते ७ अधिक घरातले ५ यांचे सगळे आवरून आम्हाला झोपायला ११.३० झाले. झोपताना मी चारचा गजर लावून झोपलो खरा पण रात्री अडीचलाच जाग आली आणि त्यानंतर काही केल्या झोप आली नाही. मी स्वतः साडेचार आणि आम्ही सगळे बरोबर साडेपाचला आवरून तयार होतो. साडेपाचला ऊबर रिक्वेस्ट केली खरी, पण एका मागोमाग एक अशी प्रत्येक चालकाने ती कॅन्सल केली, शेवटी पाचवा की सहावा यायला निघाला, तो पर्यंत मी आणि बायको आपले दोन बॅग्स, दोन चिल्ली पिल्ली आणि चोवीस लिटर पाणी घेऊन, चल चालत निघू, चौकात जाऊन एक तरी रिक्षा मिळेल, म्हणून अर्धा किमी पायपिट करत निघालो होतो.
तिकडे पियू आणि शून्य शून्य एक बरोबर साडेपाचला कात्रजला आले होते आणि बसच दहा पंधरा मिनिटे लेट आली. पण तरी बस मनपाला अगदी वेळेवर पोचली जिथे मी, योकु आणि हर्पेन बसायचो होतो.
मी अॅाटो मधे बसल्यावरच काही मिनिटांतच योकुचा कॅाल आला, ते सगळे आणि बस स्टॅापवर पोचले होते. मीच राहीलो होतो. सव्वासहाला बस मनपावरून निघायची होती आणि आम्ही अगदी ६.१४ ला मनपाला पोचलो. ऊशीरा पोचल्याचा बट्टा लागता लागता राहीला…. रिक्षात बसल्या बसल्या मला घडाळ्यात कविनचा चेहरा आणि तिचा ववि वृत्तांतात येणार प्रतिसाद डोळ्यासमोर यायला लागला होता. थोडक्यात वाचलो.

पुढच्या दोन स्टॅापचे मेंबर पण अगदी वेळेत आले आणि आम्ही अगदी ठरलेल्या वेळेवर हायवेला लागलो.
बसमधे थोड्याफार सुरवातीचे हाय हॅलो झाल्यावर गाण्यांच्या भेंड्या चालू झाल्या आणि मी मेडिटेशन करायचा प्रयत्न चालू केला…….बसच्या मागच्या भागातून ईतके बेसूर आवाज येत होते की ज्याचे नाव ते……,त्यातला त्यात पियूचा नवरा तालात सुरात गात होता आणि बरोबर तोच माझ्या मागे बसला होता हे माझे नशीब….बाकीच्यांबद्दल काय बोलावे…बरं ताल सुर राहू द्या…नसते एखाद्याच्या अंगीत कला… पण गाणी???? अभिरूची वगैरे काही प्रकार असतो की नाही? अंताक्षरीमधली अनेक गाणी अशी होती की ती अशी गाणी आहेत हेही मला माहीत नव्हते. अशी गाणी म्हणण्यापेक्षा मी माझ्यावर हव्या तेवढ्या भेंड्या चढू दिल्या असत्या…यांच्या बेसूर आवाजांचा आणि गाण्यांच्या निवडीचा आमच्या बसचालकाने पण ईतका धसका घेतला होता की त्याने वेळेच्या अर्धा तास आधीच आम्हाला रेसॅार्टवर पोचवलं. रेसॅार्टवर पोचल्यावर त्याने सोडलेला निश्वास मला सोडून कोणालाच ऐकू आला नाही.
मुंबईकर नेहमी प्रमाणे पुणेकरांनंतर आले… ते आले तो पर्यंत आम्ही फ्रेश होऊन आमचा नाश्ता झाला होता आणि मुले स्विमिंग पुल पाहून चेकाळली होती. मुलांची स्विमिंग पुलमधे ऊतरायची घाई बघून मी आधी चेंज करून पुलच्या कडेला मांड ठोकली…..
मुंबईकर आल्या आल्या त्या रेसॅार्टला जाग आली. त्यांच्या गडबड गोंधळाने त्या रेसॅार्टचे निवांत शांत वातावरण अगदी ढवळून निघाले….. मुंबईच्या काही महिलांनी पुलमधे ऊतरल्या ऊतरल्या जेव्हा “असावा सुंदर चॅाकलेटचा बंगला” वर जेव्हा डान्स करायला सुरुवात केली तेव्हा तर मी फिट येऊन पडायचाच बाकी होतो. त्यांचे एक एक रील ती गाणी आणि त्यावरच्या डान्सस्टेप बघून माझ्या सारख्या पुण्यातील सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या बालमनाला धक्क्यावर धक्के बसत होते. मुंबईकरांनी एका तासात जेवढे फोटो आणि व्हिडीओ काढले तेवढे तर पुणेकरांनी पुर्ण दिवसभरात काढले नाहीत. कविनने जेव्हा कायप्पावर पॅकिंग लिस्ट टाकली त्यात चार्जर आणि पॅावर बॅंकपण होते. मी घरी आलो पोचलो तेव्हाही माझ्या फोनचा बॅटरी ७७% शिल्लक होती….. ट्रिपला चाललेल्या माणसाला चार्जर आणि शिवाय पॅावर बॅंक का लागेल हा गहन प्रश्न मला तेव्हा पडला होता. त्याचे ऊत्तर मला तिथे मिळाले. मुंबईकरांना जेवढे फोटो दिवसभरात काढले आणि गृपवर टाकले तेवढे फोटो तर पुण्यात एखाद्या लग्नात पण कोणी काढत नाही…. असो.
ते स्विमिंग पुलमधले रील तरी एकवेळ परवडले, पण रेन डान्स मधे साचलेल्या पाण्यात विनय भिडे आणि आनंदमैत्री यांनी केलेला नाच म्हणजे काय वर्णावा…. त्या दोघांना “कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना” आणि “मार डाला” वर नाचताना बघून माझ्या मनावर जो काही विपरीत परिणाम झाला आहे त्याचे वर्णन मी करूच शकत नाही.
या सर्व वातावरणात मी ईतका भरकटलो की माझे लक्षच ऊडाले होते. तिकडे माझ्या मोठ्या मुलाने शून्य शुन्य एकला काका बनवून गोड बोलून त्याला फक्त बॅाल फेकणे आणि झेलणे हा खेळ खेळायला भाग पाडले होते. त्या क्षणी मला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायला कॅमेरा हवा होता. सगळे जण फुल्ल आवाजात गाणी लावून डान्स करत असताना पूलमधे बॅाल फेकणे आणि झेलणे हा खेळ खेळावा लागण्यातला वैताग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

क्रमशः

कडक सुरूवात Lol

त्याची यादी पण मी त्याच गृपवर शेअर केली होती….
>>>
ती यादी पण फार अतरंगी आहे.. येऊ द्या ती सुद्धा इथे Proud

मस्त धमाल व वि झालेला दिसतोय.

अतरंगी मस्त भारी पोस्ट .

अजून येउदेत पोस्ट्स.

कोण कोण होतात, ते मात्र सांगा व वि करांनो. उगाच उत्सुकता.

अतरंगीची ओपनिंग दमदार!
फोटोतले अतुल ,रियाला भेटलेय आणि न भेटलेल्यात रूला ओळखलं . अजून फोटो नावासहित टाका...

Rofl एकदम दमदार सुरुवात अतरंगी !!! क्रमशः लवकर पूर्ण कर. आपण ववि ला विशाल कुलकर्णी त्याच्या कथा अपूर्ण ठेवतो यावर जशी चर्चा केली Lol तसा हा वृत्तांत अर्धवट ठेवू नको.

अतरंगी Lol
(एकदा खास मुंबईच्या बसमधून वविला जाऊन बघा. Wink )

मस्त वृत्तांत
खरंच फोटो वर नाव लिहायला हवं होतं म्हणजे समजलं असतं.

मी विनय भिडे, हरपेन, कविन, मुग्धा, योकु, मंजिरी वेदक ऋ आणि त्याची मुलं, रिया एवढ्यानाच ओळखलं आहे. आणि मंजू डी दिसली नाही फोटोत कुठे मला

Pages