दृश्य

Submitted by प्रथमेश काटे on 25 July, 2023 - 14:37

दृश्यं

चहूबाजूला मिट्ट काळोख पसरला होता. तो किती वेळा पासून तिथे होता, हे त्यालाच नीट आठवत नव्हतं. जे काही घडलं होतं, घडत होतं, ते अकल्पनीय होतं, मती गुंग करून टाकणारंं होतं‌. अशात वेळ काळाचं भान कसं राहिलं ? आणि तो तर एकटाच होता. पूर्णपणे एकटा. समोर दिसणारी ' ती ' दृश्यं क्षणाक्षणाला अंगावर काटा उभा करीत होती. अन् त्यात ही एकटेपणाची जाणीव भीतीत अजूनच भर घालीत होती. खरंतर हे सुरूवातीपासून असं नव्हतं. आधी सगळं ठीक होतं. आलबेल होतं. पण आता जे घडत होतं, जे दिसत होतं ते बिलकुल साधसरळ नव्हतं. हळूहळू त्या दृश्यांतील, त्या घटनांतील भयानकता, अमानुषता कणाकणाने वाढत चालली होती‌. त्याला असह्य होऊ लागली होती. भीती मनाला व्यापत चालली होती‌. त्याला हे सगळं अगदी नकोसं होऊ लागलेलं. वाटत होतं... वाटत होतं की.. पण कितीही वाटूनही तो तसं करू मात्र शकला नव्हता. कारण जे घडत होतं त्याची त्याला जितकी भीती वाटत होती, तितकंच.. तितकंच त्या सगळ्याबद्दल मनात एक सुप्त आकर्षण निर्माण झालं होतं. त्याला स्वतःलाही या भावनेचं आश्चर्य वाटत होतं ; पण ती खरी होती. मध्येच असं काहीतरी व्हायचं, असं काही दिसायचं की दचकून, भितीने किंवा जराशी किळस वाटून तो डोळे गच्च मिटून घ्यायचा ; पण क्षणभरच. पुन्हा डोळे उघडून काय होतंय, हे पाहण्याचा मोह होऊन डोळे उघडायचा. दिसणारं अतिशय भयंकर, विचित्र आहे हे ठाऊक असूनसुद्धा.
ही दृश्ये दर दोन तीन मिनीटानंतर बदलत होती. आता समोर एक स्त्री पाठमोरी उभी होती. लहान चणीची, गव्हाळ वर्णाची. केस मोकळे सोडलेले. एक फिकट निळ्या रंगाची साडी नेसली होती. तरूण असावी. साधारण तीस बत्तीस वर्षाची असावी. त्याच्या मनात सहज विचार येऊन गेला. शांतच उभी होती ती ; पण त्याला ही शांतता फसवी वाटत होती. मनातून काहीतरी होणार.. काहीतरी होणार असं सारखं वाटत होतं. हृदयाची धडधड वाढत चालली होती. त्याने नकळत श्वास रोखून धरला होता. शरीराची गात्रन् गात्र ताठरली होती. नजर तिच्यावर खिळलेली. ती तशीच स्तब्ध. वेळ जसजसा पुढे सरकत होता, तसतसा त्याला मनावरचा ताण असहनीय होऊ लागलेला. सेकंद तासाएवढा वाटू लागला होता. छातीतली धडधड स्पष्ट जाणवत होती. अन्.... अन् तिची मान झटकन मागे वळली. पूर्णपणे. फक्त मानच. ती होती तशीच उभी होती. पाठमोरी. त्यात तिचे डोळे. पांढरेफटक. त्यात बुबुळेच नव्हती. आणि तिच्या ओठांवरच हास्य.... भयंकर, विकृत ; पण एवढं निरीक्षण तो करूच शकला नव्हता. जशी तिने मान पूर्णपणे वळवली, तसा त्याच्या काळजाचा आणि संपूर्ण शरीराचा थरकाप उडाला. त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. मग ते डोळे नजरेस पडले होते. तो आधिकच मोठ्याने किंचाळला.

तेवढ्यात त्याच्या खोलीचं दार धाडकन उघडलं. दारातून एक मध्यमवयीन स्त्री त्रासिक मुद्रेने पुढे येऊन म्हणाली‌ -
" अज्जू.. तुला म्हणत होते आता यावेळी मोबाईलवर हॉरर मूव्ही बघत बसू नकोस. तुम्ही आजकालची मुलं पण ना. भीती तर वाटते, तरी भलतं धाडस करायचं. चल आता ठेव तो मोबाईल बाजूला. माझ्या समोर ठेव. आणि झोप मुकाट्याने."

" सॉरी ममा..." अजिंक्य ओशाळून, हळू आवाजात म्हणाला. आणी त्याने समोरच्या होल्डर मधून मोबाईल काढून मोबाईल पलंगाशेजारच्या छोट्या टेबलावर ठेवला. आणि होल्डर टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवून दिला. पाय सरळ करून, पुढे सरकून ब्लॅंकेट ओढून घेऊन तो झोपला. त्याची आई मान‌ हलवत स्वतःशीच हसली. मग खोलीच्या बाहेर पडून तिने दरवाजा ओढून घेतला.

अजिंक्यच्या खोलीत, त्याच्या डोक्याकडेच्या भिंतीतील खिडकीच्या पडद्यावर बाहेरच्या दिव्याच्या खांबावरील दिव्यांचा उजेड पडला होता. त्या उजेडात पडद्यावर एक आकृती दिसत होती. केस मोकळे सोडलेल्या स्त्री सारखी..

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!

@केशवकूल - होय. धारपांच्या भयकथा खूप वाचल्यामुळे नकळत त्यांची शैली माझ्या लेखनात उतरली. आणि होय पुढेही कथा येतीलच. खूप आभार.

@हरचंद पालव - थॅंक्यू

आभार