पाऊसधारा

Submitted by अभिषेक_ on 24 July, 2023 - 10:16

आभाळातून आल्या दोऱ्या
सरसर सरसर पाण्याच्या
अन् हलकेच लगेच उमटल्या
मनात ओळी गाण्याच्या

हितगूज करण्या सूर्याशी
ढग आड तयाच्या आले
आनंदाश्रू अन् या भेटीचे
पृथ्वीवर बरसून गेले

पानांचे घेत थांबे
थेंब ठिबकत खाली आले
मातीचीच ओढ मनात
मातीतच मिसळून गेले

थेंब टपोरे पडता खाली
सूक्या मातीतही जीव आला
अन् मृद्गंध जो दरवळला
ओढ पृथ्वीची लावी नभाला

वीज बेधुंद नाचे आभाळी
अन् झाडांची तिला साथ
हिरवळलेले डोंगर माथे
देती ढगांच्या हातात हात

इनक्यात कुठूनसा आला वारा
पसरून गेला ढगांचा पसारा
मी एकटा जरी, सोबती न कुणी
सोबत आहेत पाउसधारा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.
वाटे मी ही पाऊस व्हावे
बेधुंद होऊनी बरसावे
कधी कवीच्या लेखणीतून
कविता होऊन बाहेर पडावे

शुक्रवार, २२/३/२०२४ , १२:५५ PM
अजय सरदेसाई (मेघ)