सोबत भाग २

Submitted by प्रथमेश काटे on 10 July, 2023 - 12:53

आपल्याच गावातील व्यक्तीला तिनं आजपर्यंत कधी बघितलेलही नाही या गोष्टीचं सीमाला आश्चर्य वाटत होतच. आणि तरीसुद्धा त्याच्यासोबत यायला तयार झाली, याबद्दल ती स्वत:लाच दोष देऊ लागली. अशा काळोख्या रात्री, सुनसान रस्त्यावर आपण उभ्या आहोत, आणि आपल्याजवळ... या विचारानेच सीमाच अवसान गळाल. काय कराव सुचेना. शेवटी धीर एकवटून ती विसाजीकडे वळाली ; पण समोरील दृश्य पाहून घाबरून किंचाळत मागे सरकली व डोळे गच्च मिटून घेतले. तिला घाबरवण्यासाठी तोंडाजवळ धरलेली बॅटरी बाजूला करीत विसाजी म्हणाला.

" अगं अगं. किती घाबरलीस ! मी काय भुतबीत नाय, तुझ्यासारखा माणूस हाये. ही बग माझी सावली." खाली रस्त्याकडे बोट दाखवत येसाजी म्हणाला " आणि पायबी सरळच हायेत, बग."

सीमाने सावकाश डोळे उघडून त्याला न्याहाळलं. त्याने आपल्याला घाबरवण्यासाठी मुद्दाम हे केलं हे ध्यानात येताच दोन्ही हात कंबरेवर ठेऊन घुश्शातच ती म्हणाली -

" आवो काय हे ? किती घाबरले व्हते मी. कामेडी करायचा वेळ आहे का हा ? "

" बरं बाई चुकलो. माफ कर. कान पकडतो तू म्हणत असली तर. ही बॅटरी अन् काठी पकड."

" राहू दे.राहू दे. चला." हसू दाबत लटक्या रागाने सीमा म्हणाली.

ते पुढे निघाले. चालता चालता त्यांच्या गावात घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलू लागले. तीन महिन्यांपूर्वी लोकांचा गळा फाडून नरडीच रक्त पिणारा माथेफिरू खूनी ' काळू खत्री ' याला पोलिसांनी हुशारीने पकडून जेरबंद केलं होतं. गावातील ' अलीम पटेल ' या गरीब घरातल्या मुलाने एका राज्यस्तरीय परीक्षेत उत्तम गुण मिळवून गावाचं नाव मोठं केलं होतं. मागील महिन्यात गावाला स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाला होता. यांसारख्या गोष्टींवरून थोड्याच वेळात त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. संकोच कमी होऊन मोकळेपणा वाढू लागला. सीमाला विसाजीचा विनोदी मिष्कील स्वभाव मघाशीच कळू लागला होता. आणि हळूहळू आवडूही लागला होता. तो दिसायलाही कमी नव्हता. रंगाने थोडा सावळा ; पण देखणा व राजबिंडा, तसाच अंगापिंडाने मजबूत होता. विशेषतः त्याच्या डोळ्यात सीमाला वेगळीच जादू जाणवत होती. त्याच्या डोळ्यात नजर गुरफटून जाते असं वाटायचं. विसाजीलाही सीमा किती मनमोकळी व बडबडी आहे हे समजलं.
दोघेही भरभर चालत होते. अचानक सीमाच्या पायात काटा शिरला. कळ मस्तकापर्यंत पोचली. वेदनेने कण्हत सीमा मटकन खालीच बसली. तिला असं बसलेलं पाहून विसाजी घाईने तिच्या जवळ आला. सीमाच्या पायात घुसलेला काटा बघताच त्यानं फार विचार न करता तिचा तळपाय हातात घेतला. अलगद पायातून काटा काढला, व जखमेवर हळूवार फुंकर मारू लागला. सीमा त्याच्याकडेच पहात होती, हे त्याला कळलं नाही. आपला रूमाल त्याने तिच्या जखमेवर बांधून, तिला दोन्ही खांदे धरून उठवलं‌. प्रथमच झालेल्या पुरुषी, बळकट हातांच्या स्पर्शाने तिचा नाजूक देह आणि मन रोमांचित झालं. विसाजीने तिच्याकडे पाहिलं. दोघांच्याही ओठांवर स्मित उमटलं. सीमाने लाजून मान खाली घातली. विसाजी वेड्यासारखा तिच्या सुंदर रूपाकडे बघतच राहिला. रात्र चढतच चालली होती

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गोष्ट ठिकठाक आहे पण इतक्या काळोखात बॅटरीच्या प्रकशात एकामागुन एक चालताना नजरेत नजर कशी गुरफटु लागली ते कळले नाही.

मस्त भाग हा पण.

ते काट्याने एवढी मोठी जखम नाही ओ होत Happy

@आबा - थॅंक्यू. तुम्हाला ' एवढ्या वेदना होत नाही ' असं म्हणायचंय का ? ते फक्त काटा रूतण्याबद्दल नाही ; पण पायात अचानकपणे काटा शिरला तर मग मेंदूत सणक जाण्यासारखी वेदना होईलच ना.

@आबा - थॅंक्यू. तुम्हाला ' एवढ्या वेदना होत नाही ' असं म्हणायचंय का ? ते फक्त काटा रूतण्याबद्दल नाही ; पण पायात अचानकपणे काटा शिरला तर मग मेंदूत सणक जाण्यासारखी वेदना होईलच ना. पुन्हा एकदा धन्यवाद.

@राजा मनाचा - थॅंक्यू सर.

आपला रूमाल त्याने तिच्या जखमेवर बांधून, तिला दोन्ही खांदे धरून उठवलं‌.
>>>> एवढी रुमाल बांधण्याईतकी अस म्हणायचं होत.

@Naru2022 - थॅंक्यू सो मच.

@आबा - Cinematic Liberty प्रमाणे इथे कथेसाठी लिबर्टी घेतलीये समजा. थोडं कमीजास्त थोडी अतिशयोक्ती चालायचीच. काय ?