सोबत

Submitted by प्रथमेश काटे on 9 July, 2023 - 12:16

सोबत

विसाजी भरभर चालत होता. एका हातात बॅटरी आणि दुसऱ्या हातात उंच, मजबूत काठी घट्ट पकडलेली होती. त्याच्या पायांना लागलेल्या चिखलावरून तो शेतावरून घरी परतत असावा असा अंदाज येत होता. तसा तो घाबरलेला मुळीच नव्हता. गावात चोर, दरोडेखोर किंवा जंगली श्वापदांची काही भीती नसायची आणि भुताखेतांसारख्या गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता ; पण रात्रभर बरीच झालेली. डोळ्यांवर पेंग येऊ लागलेली, त्यामुळे तो घाई करत होता.
मघापासून त्याला कुणीतरी आपल्या मागून येत आहे असं वाटत होतं. आता पावलांचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत होता. त्याने थांबून कानोसा घेतला. काही हालचाल जाणवली नाही. तो पुढे चालू लागला. पुन्हा मागून चालण्याचा आवाज येऊ लागला. विसाजीने मागे वळून बॅटरीचा झोत त्या व्यक्तीच्या तोंडावर पाडला. त्या व्यक्तीने दचकून तोंड वळवल, आणि तोंडावर आडवा हात धरला. मग हात बाजूला करून विसाजीकडे पाहिलं. ती एक तरूणी होती. वय असेल सत्तावीस - अठ्ठावीस. निमगोऱ्या रंगाची, दिसायला नाकी डोळी नीटस, रेखीव ; पण चटकन नजरेत भरत होता तिचा सडपातळ, कमनीय बांधा. विसाजी तिच्याकडे बघतच राहिला. क्षणभर त्याच्या नजरेत वेगळेच भाव तरळले ; पण लगेच त्याने मनातले विचार बाजूला सारले.

" तू गं कोण ? तुला कधी गावात पाह्यल्या सारखं वाटत नाय." विसाजी.

" मी सीमा. शांताराम मडकेची मुलगी. मीपण तुम्हाला कदी बघितल नाय."

" ऑं. बरं ते जाऊ दे. एवढ्या रातीच फिरायला भीती नाय का वाटत ? "

" भीती तर वाटती ; पण काय करता आता ? " ती तरूणी खाली मान घालून म्हणाली.

" मग चल माझ्याबरोबर. मला तुमच्या घरावरूनच जायचयं. " विसाजी म्हणाला. ती मुलगी आधी जरा घुटमळली ; पण मग विसाजीने थोड समजावल्यावर त्याच्यासोबत यायला शेवटी तयार झाली. ते पुढे निघाले.

रात्र चढत चालली होती. रातकिड्यांचा मंदपणे किरकिरण्याचाच काय तो आवाज ऐकू येत होता. बाकी पूर्णपणे शांतता होती. अगदी भयाण शांतता. विसाजी व सीमा शिवाय आता त्या निर्जन रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. दोघेही मूकपणे चालत होते. शेवटी सीमा म्हणाली -

" बरं झालं, तुम्ही भेटलात सोबतीला. मला बाई लई भीती वाटती, असं रातीच कुठे जा ये करायला .पण म्हत्वाच असल्यामुळ जायला लागलं."

" खरंतर तसं घाबरायच काय कारण नाय. आपल्या गावात ना वाघाबीघा सारख्या जनावरांच भ्या, ना चोराचिलटांच.

" ते खरंय ओ ; पण अशा वेळेला भुताखेताची पण भीती असती की."

" भुताखेतांची ? "

" हां. तुम्हाला नाय वाटत. "

" छ्या. हे भूतबीत काय नसतय. "

" कधी असंच रातीच एकटं फिरताना समोर येईल, तव्हा कळलं." सीमा थट्टेने म्हणाली.

" हूंs." छद्मी पणाने हुंकारत, शांतपणे विसाजी म्हणाला. " भूत दुसऱ्या भुताला घाबरत नाय." त्याच्या आवाजातील थंडपणाला गूढतेची किनार होती. त्याच्या शब्दांनी, त्यापेक्षाही त्याच्या आवाजाने सीमाच अंग शहारल्यासारख झालं. ती जागीच खिळून उभी राहिली.

क्रमश:
पुढील भाग लवकरच

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पुढील भाग लवकरच...म्हणजे किती लवकर ? कुठे पोस्ट केला असेल तर ह्या भागासाठी - सोबत भाग १ असे नाव देऊन लास्टला भाग २ ची लिंक देत जा म्हणजे सोप्पे काम होईल.

अजुन २रा भाग लिहिलाच नसेल तर शक्यतो भाग पोस्ट करताना कन्टीन्यूटी राहु दे म्हणजे वाचकांचा प्रतिसादसुद्धा कंटिन्यू राहतो. बरेच जण सलग वाचता यावे म्हणून काही भाग प्रकाशित झाल्यावर वाचण्यास सुरुवात करतात त्यामुळे सुरुवाती सुरवतीला कमी प्रतिसाद दिसल्यास बिलकुल नाराज न होता पुढील भाग एका ठराविक अंतराने (फार प्रलंबित न ठेवता) पोस्ट करत जावेत. लेखन आणि संकल्पना छान आहे पण भाग फार छोटे वाटतात तर लगेच दुसरा भाग आणि पाठोपाठ पुढचा भाग येत राहिला तर वाचक म्हणून उत्सुकता कायम राहील.
पुढील लेखनास शुभेच्छा !

@साद - धन्यवाद सर.

@अज्ञानी - २ रा भाग परवाच अपलोड केला आहे सर. थॅंक्यू.