छंद पक्षीनिरिक्षणाचा (Black Phoebe)

Submitted by वर्षा on 24 June, 2023 - 22:00

मांजरांखालोखाल मला काय प्रिय असेल तर ते पक्षी.
मुंबईतल्या मुलुंड पूर्वेसारख्या शांत उपनगरात माझं बालपण गेलं. मुलुंड पूर्वेस तेव्हा तरी झाडांनी आच्छादीत रस्ते होते, चिंतामणराव देशमुख गार्डनचा रस्ता तर अगदी पूर्णपणे छान सावलीमय होता, अजूनही असावा बहुतेक. (तिथे बहुतेक रेन ट्रीचे मोठे वृक्ष आहेत). (ईस्टन एक्स्प्रेस) हायवेला नेणार्‍या मुख्य रस्त्यावर बाजूने बकुळीची कैक झाडे होती. आमच्या सोसायटीतही पुष्कळ झाडे होती त्यात उंबर, पेरु, निलगिरी, लाल चाफा, जांभूळ ही झाडे तर अगदी खिडकीतूनही दिसत. याखेरीज तुती, जंगली बदाम, चिकू अशीही झाडे होती. त्यामुळे पोपट, हळद्या, दयाळ , बुलबुल, तांबट, शिंपी इ आणि उंबरामुळे भरपूर वटवाघळेही संध्याकाळी कलकलाट करत असत.
खिडकीतून नुसत्या डोळ्यांनी हे पक्षी न्याहाळायला मज्जा यायची. घरी अ‍ॅग्फा (ब्रँडनेम चुकले असू शकेल पण बहुतेक असेच काहीतरी नाव होते) कॅमेरा होता पण त्याने कधी पक्ष्यांचे फोटो काढल्याचे आठवत नाही. खिडकीजवळ येणार्‍या फांद्यांमुळे पक्षी बर्‍यापैकी जवळून पाहता येत असत.
आमच्या घरात वॉलपेपर होते आणि तिन्ही खोल्यांतील त्या वॉलपेपरवर झाडा-वेलींचीच चित्रे/डिझाईन्स होती. त्यातल्या हिरवी पाने व लालचुटूक फळे असे डिझाईन असलेल्या खोलीत एखाद्या वेळेस एखादा पक्षीही फसून आत शिरलेला आहे.
नंतर पुढे अचानक कलर्ड पेन्सिल माध्यमाशी ओळख झाली आणि पक्षी रेखाटण्याचा छंद लागला. त्याबरोबर पक्ष्यांना नुसतं पाहण्यापेक्षा कॅमेर्‍यातही (जमल्यास) पकडण्याचे प्रयत्न चालू झाले. या गोष्टीला आता दहाएक वर्षं झाली असतील. यादरम्यान मी बरेच पॉईंट अ‍ॅन्ड शूट प्रकारातले कॅमेरे वापरुन पाहिले. एसएलआर/डीएसएलआर प्रकरण मला झेपत नाही त्यामुळे कॅमेर्‍याचा हा प्रकार मला एकदम सोयीस्कर पडलाय. (बेसिकली त्यात रेडीमेड मोड्स बरेच असल्याने काहीच कराव लागत नाही Lol ) निकॉन, कॅनन, पॅनासॉनिक इ. ब्रँडचे कॅमेरे वापरल्यानंतर त्यात माझी निकॉनला विशेष पसंती पडली असल्याने इथून पुढे निकॉनच संगतीला असेल.
सध्या माझ्याकडे नि़कॉनचा पी९५० आहे आणि मी रहात असलेल्या परिसरातील रोज दिसणार्‍या पक्ष्यांना कॅमेर्‍यातून निरखून पाहणे आणि उडून जाण्याच्या आत (हे सर्वात कठीण आहे Happy ) क्लिक करणे यात रोजचे काही तर शनि-रविवारचे थोडे जास्त तास खर्ची पडल्यास मला मनापासून छान वाटते.
मी आहे अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या बे एरियात आणि इथे काही टिपीकल नॉर्थ अमेरिकन पक्षी दिसतात. त्यातले काही इथे शेअर करत जाणार आहे.

Black Phoebe अर्थात ब्लॅक ब्यूटी
खरंतर फारसं साम्य नाही पण आपला दयाळ (तो जास्त चमकदार असतो म्हणा) + थोडा लालबुड्या बुलबुल या दोघांची आठवण मला याला पाहून होते.

साधारणपणे कुठल्याही हिरवळीच्या तुकड्यांवर हा दिसलाच पाहिजे. हवेत उडणारे किडे वेगवेगळ्या प्रकारे हवेत सूर किंवा चकरा किंवा कोलांट्या मारुन मटकावणे, या कृतीमुळे हा लक्षात राहतो.

काळा (थोडा डार्क चॉकलेट कडे झुकणारा) रंग, पांढरे पोट असंणारा Black Phoebe इथे सकाळच्या कोवळ्या उन्हात बर्‍याचदा अशी साफसफाई करताना दिसतो.

चिमण्या कावळ्यांइतक्या सहजपणे कुठेही दिसणार्‍या या पक्ष्याने दिवसाची सुरुवात होते. जवळच असलेल्या फ्रीमॉन्टमधल्या एलिझाबेथ लेकवर एका दगडावर एकदा अगदी शांत बसलेला दिसला. अहो आश्वर्यम! कारण हा बर्‍यापैकी अस्थिर, चंचल वाटतो मला.

पाठीवरच्या पिसांची ही मनोरम रचना एरवी नजरेस पडलीच नसती. Happy
याचे एक ढोबळ स्केच केले होते. त्याच्या चौकस नजरेला कागदावर उतरवण्याचा एक प्रयत्न.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त Happy छान फोटो आणि वर्णन. माझ्याकडे P900 आहे.
चित्र किती छान काढलंय. चित्राच्या आधीचा फोटो मला दिसत नाहीये.

वा वा, काय मस्त.
फोटो, लिखाण छानच. चित्र तर आहा
हो एक फोटो दिसत नाहीये

मस्त लिहीलंयस. मुलुंड पूर्व अजूनही हिरवं आहे मात्र इमारतींची संख्या वाढत चाललीये.

स्केच अफाट सुंदर झालंय आणि डोळ्यातले भाव निव्वळ अप्रतिम.

सुंदर.
कधीतरी पक्षी निरीक्षण गटग ठेवा. रविवारी सकाळी.

वावे दे टाळी. माझ्याकडे पूर्वी पी६०० होता. मस्त होता तो पण.
अवल, रु, मामी, सामो धन्यवाद. मामी, मुलुंडच्या हिरवाईबद्दल ऐकून छान (हायसं) वाटलं.
एसआरडी, धन्यवाद. छान कल्पना. बेकर माबोकरांपैकी कुणाला इंटरेस्ट असल्यास छानच होईल.
स्केचच्या आधीचा पाठमोरा मिसिंग फोटो परत टाकलाय. आता दिसावा अशी अपेक्षा. कुणीतरी बघून सांगा.

वर्षा Happy मीपण एकदम खूष आहे P900 वर. पक्ष्यांपासून ते आकाशातल्या ग्रहांपर्यंत सगळ्याचे फोटो चांगले येतात!
तो पाठमोरा फोटो अजूनही दिसत नाहीये मात्र.

मस्त फोटो, लेखन आणि चित्र तिन्ही.

तो पाठमोरा फोटो अजूनही दिसत नाहीये मात्र. >> मला तो कधी दिसतोय तर कधी नाही. पण मला वाटतय तो सर्वात बेस्ट फोटो आहे.

>>पक्ष्यांपासून ते आकाशातल्या ग्रहांपर्यंत सगळ्याचे फोटो चांगले येतात!
+१! तुझे पक्ष्यांचे सर्व फोटो त्यातलेच आहेत का? सुरेख आहेत.

मनमोहन, अस्मिता, मनीमोहोर धन्यवाद.
मला माझ्या मोबाईलवरुन तोच एक फोटो दिसत नव्हता. लॅपटॉपवरुन पाहिलं तर दिसतो.काय कळत नाही असं का ते.
आता मी तोच फोटो लेखाच्या शेवटी परत एकदा दिलाय. आता दिसला तर दिसला. नाहीतर जाऊ देत. Happy

मस्तच लेख व फोटो चित्रे. काल मी असेच युट्युब सर्फ करत होते तेव्हा व्हिसा टु एक्स्प्लोअर व हरीश बाली ट्रॅवल्स ह्या माणसाचे व्हिडीओ लागले. त्यात एक राजस्थानच्या भरतपूर पक्षी अभयारण्याचा पण आहे. तो नक्की बघा सर्व पक्षी प्रेमी लोक. भरतपूरला ट्रिप प्लान करण्याजो गे आहे.
आत राहायची सुविधा आहे. १८ खोल्या असलेले जंगल लॉज आहे. व अरण्याच्या बाहेर सायकल रिक्षा तासाच्या भाड्याने व सायकली पण भाड्याने मिळतात. ह्या व्हि डो मध्ये जो एक्स्पर्ट माणूस घेतला आहे बरोबर त्याचा हाच व्यवसाय आहे. जे लोक आधीच बर्डिंगचे शौकीन व माहितगार आहेत त्यांना तो ट्रिप ऑर्गनाइज करुन देतो व फोटो कसे घ्यायचे त्याची माहिती देतो. लडाख इकडे तिकडे पण जातो कमिशन फी बेसिस वर तो व्हिडि ओ बघताना मला येथील पक्षी प्रेमींची आठवण आली.

तिथे फ्लेमिन्गो. बगळे व इतर भरपूरच पक्षी वैभव आहे. मायग्रेटरी बर्ड येतात. पाण्याची तळी आहेत.

आत खायची काही सोय नाही बहुतेक चहा कॉफी मिळते एकाठिकाणी. आता हे भरतपूर नक्की कुठे येते गुगल करते. हॅपी बर्डिंग.

ह्या जंगलात इतर डेंजरस असे प्राणी नाहीत. हरीण हे ते आहेत. त्यामुळे मनमुराद भटकता येते. खोलीचे भाडे ४००० रु पर डे च्या आसपास आहे. व एक आ ठवडा तरी राहावे इतके बघायला आहे असे तो एक्स्पर्ट म्हटला.

मस्त फोटो, लेखन आणि चित्र तिन्ही.
लेखाच्या शेवटी टाकलेला पाठमोर्‍या पक्षाचा फोटो दिसतोय.

लोणावळा ॲम्बीवॅली रोडवर लायन पॉइंट नंतर रस्त्याकडच्या झाडांवर असंख्य पक्षी पाहता येतात. हातात camera /bino पाहिजे. हे रानपक्षी आहेत. भरतपूरला पाणपक्षी अधिक आहेत. थंडीत स्थलांतर करून येणाऱ्यांची भर पडते तेव्हा पर्यटक वाढतात.

अमा, कविन, हर्पेन, एसआरडी धन्यवाद.
अमा होय हे भरतपूर आणखी दक्षिण भारतातही एक ठिकाण आहे (केरळात), तिथेही बर्डींगसाठी लोक जातात. ही लिस्टीत आहेत.
एसआरडी, लोणावळ्याजवळ कामशेतला मस्त पक्षी दिसले होते मला. मी पहिल्यांदा इंडीयन रोलर तिथेच पाहीला होता.