अंमली - (पुनर्लेखन) भाग ८!

Submitted by अज्ञातवासी on 24 June, 2023 - 10:22

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83603

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

विलास शिंदे, त्याची आई, त्याची बहीण, सगळी मंडळी त्याच्याकडे बघतच राहिली...
हे वेड या थराला गेलं असेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती...
"सुंदर..." दादासाहेब म्हणाले.
"हो खूपच सुंदर..." तो म्हणाला.
"प्राजक्ता... प्राजक्ता एंटरप्रायजेस. माझं स्वप्न."
"खूप मोठं स्वप्न आहे, महादेव तुम्हाला ते पूर्ण करण्याची शक्ती देवो... चला खानसाहेब."
दादासाहेब तिथून निघूनही गेले.
तो त्यांच्याकडे बघतच राहिला.
"मंडळी चलायचं?" तो म्हणाला. आणि तोही लिफ्टच्या दिशेने निघाला.
दिवसभर समारंभ चालला. मीडिया, पाहुणे, यांना उत्तरे देतानाच तो दमून गेला...
...रात्री बारा वाजता तो घरी आला...
...सगळेजण जागेच होते.
आई, बाबा, त्याची बहीण. सगळेच...
"अरे, तुम्ही झोपले नाहीत अजून?"
"तुझीच वाट बघत होतो."
"का? काय झालं."
"काही नाही. कार्यक्रम खूप छान झाला."
"हे उद्या बोलायचं का? थकलोय आता मी."
"मला बोलायचं आहे." त्याची आई म्हणाली.
"बोल ना."
"प्राजक्ता... आज ते नाव बघितलं मी बिल्डिंगवर... अजूनही हा वेडेपणा जात नाहीये तुझा?"
"आई. झोपुयात ना. बोलू उद्या."
"नाही. हे अति होतय. एकदा एक नजर बघितलेली मुलगी, जिचं खरं नाव प्राजक्ता आहे की नाही हे माहिती नाही, तू स्वतःच शोध लावला, आणि आता सगळं आयुष्य त्याच नावासाठी..."
"...माफ कर. तुझं बोलणं मी मध्येच तोडतोय. काय आहे आई, आता सगळं हळूहळू नीट होतंय. आज मी एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. हवा तितका पैसा हाताशी आहे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं...
...मी स्वतःला फक्त माझ्या जुन्या रुपात नाही, तर त्याहीपेक्षा बेस्ट रुपात इमॅजिन करतोय. कारण आयुष्यात कुठल्याही क्षणी ती पुन्हा समोर आली ना, तर त्याक्षणी ती माझ्या प्रेमात पडली पाहिजे...
...हे सगळं होतंय ना, हे मी सगळं करतोय, फक्त तिच्यासाठी. त्यादिवशी कपालेश्वराला ऐकू आलेल्या हाकेसाठी... वेडेपणा नाहीये हा, महादेवाने दिलेलं वरदान आहे. संकेत आहे... भविष्याचा... आता जग इकडे नाहीतर तिकडे होऊ दे, एक ना एक दिवस मला माझी प्राजक्ता मिळेल.
चला झोपुया. उद्या पुन्हा उठून ऑफिसला जायचं आहे. पण यावेळी मालक म्हणून जाईन.
सिस्टर, तुला नवीन लॅपटॉप घ्यायचा होता, हवा तो घे. सगळ्यात बेस्ट कन्फिग्युरेशनचा घे. आय सेवन आताच लॉन्च झालाय, तोच प्रोसेसर बघून घे. तुझा बटनांचा फोन फेक आता, आयफोन थ्रीजी आताच लॉन्च झालाय, तो घे. माझं क्रेडिट कार्ड राहू दे तुझ्याकडे, तुला आवडले ते घे..."
...तो हसला, आणि तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला...
"तुझ्या दादाने स्वतःची कधीही नीट हौस केली नाही, फक्त पैसा कमवत राहिला. आता तो त्याची बकेट लिस्ट बनवेल, आणि सगळं पूर्ण करेन. तूही तसच कर. ओके?"
त्याच्या बहिणीने मान हलवली. तिच्या डोळ्यात पाणी होतं...
"...चला... झोपा आता... गुड नाईट..." पेंगुळलेल्या अवस्थेत तो झोपायला गेला, आणि त्याने रुमचं दार लावलं...
...त्याच्या बहिणीचा इतका वेळ दाबून धरलेला अश्रूंचा बांध फुटला...
"...आई... तो अजिबात नीट नाहीये... तो वेडा होतोय हळूहळू, आई, प्लीज सावर त्याला, जर ती मुलगी अस्तित्वातच नसेल आणि असली तरी जर ती त्याची होणार नसेल, तर तो वेडा होईन..."
...आई हताशपणे तिच्याकडे बघत राहिली.
*****
त्याने डस्टर पार्किंगमध्ये लावली. गाडी पार्किंग मध्ये लावून तो रस्त्यावर आला.
ते भलंमोठं नाव बघून तो हरखला.
' ...माझी प्राजक्ता... ' त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
तो लिफ्टने वर आला. अजूनही ती इमारत बरीचशी रिकामीच होती. अगदी थोड्या ठिकाणी कामकाज चालू होतं.
सगळयात वरचा मजला मात्र प्रचंड सुसज्ज होता. त्याने अक्षरशः तिथे एक क्लबच उभारलं होतं. टेबल टेनिस, स्नूकर साठी तिथे व्यवस्था केलेली होती. बाजूलाच एक छोटेखानी लायब्ररी होती. शेजारी वीस लोक बसू शकतील असं मिनी थीयेटर होतं.
अजून बऱ्याच सुविधा त्याने ऑफिसमध्ये ठेवल्या होत्या.
त्याची केबिन, त्याच्या वरच प्राजक्ता हे नाव होतं. केबिन पूर्ण काचेची होती, आणि समोरच त्याचं आवडत ठिकाण होतं...
...शेलारांचा वाडा...
आणि तोच तो आता न्याहाळत होता...
"सर." एका आवाजाने त्याची तंद्री भंगली.
"ओह कम, आय वॉज वेटींग फॉर यू..." तो हसला.
"मी टू सर, नाईस टू मीट यू अगेन..."
"या आफ्टर इंटरव्ह्यू. लेट्स गो इन मीटिंग रूम."
दोघेही केबिनच्या बाहेर आले.
सात आठ जण, ऑलरेडी मीटिंग रूममध्ये बसलेले होते, त्याला बघताच सगळेजण उभे राहिले.
"बसा बसा सगळ्यांनी. यापुढे हे फॉर्मल कल्चर नको आहे मला. तुम्ही सर्वांनी फक्त एक फॉर्मालीटी पाळायची. यू शुड कॉल मी सर... येस सर, नो सर, ओके सर. जस्ट सर... ओके?"
"येस सर..." सर्वांनी एकसुरात म्हटले.
"गुड. तुम्हाला आता वाटत असेल प्राजक्ता काय आहे? असं वाटत असेल की ही कंपनी टाकण्यामागे या माणसाचं कारण काय, ध्येय काय, उद्देश काय? प्राजक्ता इंटरप्राईजेस नावाच्या जगात हजार कंपन्या असतील, तर याला हेच नाव का सुचलं? मुख्य म्हणजे तुमचे सगळ्यांचे ऑफर लेटर दिले गेले आहेत, पण अजूनही कंपनी रजिस्टर नाही, तर नेमकं काय? तुमच्या भविष्याचं काय माझ्या भविष्याचं काय? प्रश्न असतील. आज सगळी उत्तरे मिळतील."
तो काही क्षण बोलायचा थांबला.
"पुढची सहा महिने, तुम्हा सगळ्यांना ठरवलेली सॅलरी कॅश मध्ये दिली जाईल. आणि कॅश बोनस म्हणून दहा टक्के सॅलरी एकस्ट्रा दिली जाईल. नंतर तुमची ऑफर लेटर जनरेट करून पुन्हा पगार वाढ म्हणून दहा टक्के वाढ दिली जाईल. आता प्राजक्ता काय आहे ते सांगतो. प्राजक्ता माझं स्वप्न आहे, जे मी जागेपणी दिवसाढवळ्या सतत बघितलं आहे. प्राजक्ता माझं आयुष्य आहे, ज्यासाठी मी स्वतःला अर्पण केलं आहे. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षणी मी प्राजक्ताला दिला आहे, आय वॉन्ट टू बी द बेस्ट पर्सन फॉर प्राजक्ता...
... आय एम टॉकिंग अबाउट कंपनी माय फ्रेंड्स..." तो हसला.
लोकही हसले.
"केमिकल, आयटी, फायनान्स आणि मायनिंग या चार क्षेत्रात आपण काम करणार आहोत. फक्त हे चार क्षेत्र. यात आपल्याला असा धुमाकूळ घालायचा आहे, की सगळे जग बदलेल. जगभरातले सगळे स्पेशलिटी केमिकल बनवू, अक्षरशः स्वतःचे सॅटेलाईट बनवून खाणी शोधू, ब्लॅकरॉक सारखी कंपनी आपण फायनान्शिअल सेक्टरमध्ये हलवू आणि गुगल व ॲपल इतकी ताकद आपण निर्माण करू... बिकॉज आय वॉन्ट बेस्ट इन द वर्ल्ड फॉर प्राजक्ता... सगळं जग प्राजक्तासाठी, कळलं?
येस सर.
विजन माझं, डोकं माझं, काम तुमचं, अपयश आलं तर माझं, यश आलं तर सर्वांचं...
गेट रेडी गाईज, जग जिंकायचं आहे, प्राजक्तासाठी... लेट्स शूट...सी या..."
...तो तिथून तरातरा निघूनही गेला...
सगळेजण भारावल्यासारखे जागीच खिळून राहिले...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान भाग.!
पुढचा भाग थोडा मोठा लिहा जमल्यास..!

@रुपाली - धन्यवाद!
हो सध्या प्रवासात असल्याने भाग छोटा झाला, पुढील भाग नक्कीच मोठा येईल.

धागे दोरे जुळायलेत आता मागच्या कथेशी जरा..
लिहिता जबरदस्तच... लिहीत रहा... स्वस्थ राहा.