सुरक्षित चौकटीत
जगणारा माझा चेहरा
वेल फेड वेल पेड
दिसणारा माझा
तजेलदार चेहरा
मला आणि माझ्या
चौकटीतले बांधवांना
आवडतो
त्याला चौकट सुरक्षितता देते
संरक्षण देते
आणि मी शिकतो
चौकटीतले शिक्षण
करतो चौकटीतलं
लग्न ,...
पण चौकटीचा तुरुंग
मला जाणवत नाही
माझ्या कुटुंबाला
कारण मी
माझ्या कुटुंबासहित
चौकटीबाहेर
कधीच उडत नाही
बाहेरच्या अमर्यादित
जगात न भागलेली
भूक असते,तहान असते
शरीर ओरबाडणार्या
वासना असतात
असुरक्षित व दर सेकंदाला
मरणाची भीती दाखवणारी
परिस्थिती असते
कधीतरी उठल्यावर
मला तिची झळ लागते
दु:खीर होऊ लागल्यावर
मी परत सुरक्षित
चौकटीत परततो
चौकटीचा आरती करतो
चौकटीतलीी गाणी म्हणतो
तिथलेच नाटक सिनेमे पाहतो
माझ्याच वेल फेड वेल पेड
बांधवांना मिठ्या मारतो
ते माझा सत्कार करतात
बाहेरील जगातून
न खरचटता
परत आल्याबद्दल
तिथेच माझी मुलं
मोठी होतात
मेल्यावर मात्र माझा
चौकटीत अडकला देह
बाहेर काढण्यास
चौकटीबाहेरील
लोक लागतात
नंगे,उपाशी
लक्तरं पांघरलेले.
तरी त्यांना आमचेच
बंधू ओरडून सांगतात
"अरे जरा नीट ओढा,
लागेल त्याला
कालातीत झालेला मी
ओरडतो,"अरे ते आणि आपण
एकच आहोत " पण लक्षात
कोण घेतो ?
चौकट कोण मोडतो ?
मग चौकट गाणं म्हणते
" चौकटीला जपा रे
चौकटीला जपा
चौकटीत प्राण
चौकटीत जीवन
चौकटीत प्रसिद्धी
चौकटी बाहेर ....
फक्त वेदना आणि मरण
फक्त वेदना आणि मरण
अरुण कोर्डे
जबरदस्त! चपखल मांडलत वास्तव
जबरदस्त!
चपखल मांडलत वास्तव
खूप सुंदर..
खूप सुंदर..