पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले. तोपर्यंत पुणे स्टेशनची कौलारू मुख्य इमारत आटोपशीर होती. स्टेशनमध्ये तीन फलाट होते आणि पहिल्या फलाटावरून दुसऱ्या-तिसऱ्या फलाटावर जाण्यासाठी एक लोखंडी पादचारी पूलही होता. दोन आणि तीन नंबरच्या फलाटावर उतरत्या छपराप्रमाणे शेड करण्यात आली होती. तिचा भाग आजही पाहायला मिळतो. या फलाटांच्या शेजारीच छोटे फलाट केलेले होते, जे अतिविशिष्ट व्यक्तींच्या प्रवासाच्यावेळी वापरले जात असत. गाड्या आणि जादाचे डबे उभे करून ठेवण्यासाठी काही मार्ग त्याचबरोबर मालगाड्यांमध्ये मालाचा चढउतार करण्यासाठी स्वतंत्र मार्ग तीन नंबरच्या फलाटाच्या पलिकडे होते. त्याच बाजूला एक लोको शेडही होती. तरीही त्यावेळी पुणे जंक्शनचा विस्तार मर्यादित होता.
वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीचा पुणे जंक्शनवर उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांवर ताण वाढत चालला होता. त्यामुळे या स्थानकाच्या परिसराची पुनर्रचना करण्याची गरज भासू लागली होती. ती गरज विचारात घेऊन पुणे जंक्शनमध्ये 1925 आमुलाग्र बदल केले गेले. आधीची इमारत पाडून प्रशस्त इमारत बांधली गेली आणि स्थानकाचाही मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. स्थानकामधल्या फलाटांची संख्या वाढली. 1928-29 पर्यंत मुंबई-पुणे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले. कालांतराने घोरपडीला मोठी डिझेल लोको शेड उभारण्यात आली.
आजही पुणे जंक्शनवर वाहतुकीचा मोठा ताण आहे. जवळजवळ दीडशे प्रवासीगाड्या पुणे जंक्शनमध्ये ये-जा करतात, त्यापैकी काही दैनिक तर काही आठवड्यामधल्या काही दिवशीच धावतात. त्यामध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल, दख्खनची राणी या ऐतिहासिक गाड्यांचाही समावेश आहे. त्याबरोबर मालगाड्यांचीही पुणे जंक्शनवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. 1971 पर्यंत ब्रॉड गेज आणि मीटर गेज गाड्यांची ये-जा या स्थानकातून होत होती. या स्थानकाच्या विस्ताराला आता मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे आता अन्य ठिकाणी टर्मिनल उभी करून या जंक्शनवरचा भार कमी केला जात आहे.
पुणे जंक्शनच्या 165 वर्षांच्या निमित्ताने मी तयार केलेला व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/WRCVsP9W2Mc
छान.
छान.
मुंबई पुणे थेट रेल वाहातूक कधी सुरू झाली?
<<मुंबई पुणे थेट रेल वाहातूक
<<मुंबई पुणे थेट रेल वाहातूक कधी सुरू झाली?>>
१८६३