फिरून नवी जन्मेन मी

Submitted by आस्वाद on 8 June, 2023 - 11:51

कधीकधी आयुष्यात काही घटना घडतात ज्याने आयुष्यच बदलून जातं. लहानपणापासून आई वडिलांचे, शाळेचे, शेजारच्या परिस्थितीचे संस्कार आपल्यावर घडत असतात. जशी आजूबाजूची परिस्थिती असते, तसेच आपण घडतो. जे लोक लहानपणापासून मम घरात वाढतात, ते साधारण तसेच बनतात. लहानपणापासून जे पाहत आलो, तेच 'नॉर्मल' वाटत. पुढे मोठं झाल्यावर त्यातल्या त्रुटी दिसायला लागतात, मग माणूस हळूहळू बदलतो. पण हा बदल फार सटल असतो. यालाच आपली प्रगती पण म्हणू शकतो. पण काही काही लोकांच्या बाबतीत बदल अचानक होतो. इतका की हा तोच माणूस आहे ना, असा प्रश्न पडतो.

मी लहान असताना आमच्या शेजारी एक आजी आजोबा राहायचे. आजोबा एक्दम कडक शिस्तीचे, सोवळं ओवळं काटेकोर पाळणारे. सतत देवदेव करणारे. कायम आजींवर आणि घरच्या -दारच्या सगळ्यांवरच गुरगुरणारे. ते नेहमी धोतर सदरा घालायचे, कपाळी गंध. त्यामानाने आजी टिपटॉप. आजोबा फार कोणाशी बोलायचे, मिसळायचे नाहीत. आजी मात्र बडबड्या. परिस्थिती अगदीच साधारण. त्यांचा एकुलता एक मुलगा (४ मुलींच्या पाठीवर झालेला) त्यांच्या या देवदेव आणि कर्मठपणाला कंटाळून पूर्ण रिबेल झाला. वडिलांसोबत त्याचं अजिबात पटत नसे. त्यांच्या मर्जीविरुद्ध शिक्षण घेऊन, परजातीच्या मुलीसोबत लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाला. तेव्हापासून तर आजोबांनी त्याचं नावच टाकलं. आजोबांचा चिडचिडा स्वभाव अजूनच वाढला. पुढे काही वर्षांनी मुलगा-सुनेने आग्रहाने त्यांना बोलावलं. खरं म्हणजे आईला बोलावलं. बरेच मनधरणी केल्यावर ते जायला तयार झाले. जेव्हा ६ महिन्याने वापस आले, तेव्हा आजोबा आमूलाग्र बदलले होते. धोतर- सदरा जाऊन जिन्स टी-शर्ट आला, गंध गायब झालं. आजोबांच्या चेहऱ्यावर चक्क स्मित आलं! आजोबा शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना अगत्याने बोलावू लागले, त्यांच्या घरी स्वतःहून जाऊ लागले. घरी आलेल्या लहान मुलांना चॉकोलेट्स देऊ लागले. भेटेल त्याला आपल्या मुलाचे, सुनेचे आणि नातवंडांचे कौतुक ऐकवू लागले. अमेरिकेतल्या त्याच्या मोट्ठ्या घराचे, गाडीचे, ऐश्वर्याचे वर्णन करताना त्यांचे डोळे चमकू लागले. लोकांना काय काय सांगू आणि काय नको, असं त्यांना झालं. (९५-९६ चा काळ जेव्हा घरोघरी NRI नसत). पुढे मुलाशी संबंध सुधारले, बरेचदा ते जात त्याच्याकडे. त्यावेळी तो बदल पाहून सगळेच अचंबित झाले होते. जणू हा त्यांचा नवीनच जन्म होता.

माझ्या १०वी च्या ट्युशनला एक मुलगी होती. लहान गावातून त्याच वर्षी आली होती. तिचे वडील आदिवासी भागात काम करत, डॉक्टर होते. आई पण nurse. त्यामुळे गावात पैसा फारसा मिळत नसला तरी त्यांना खूप मान, आपसूकच तिलापण. जात्याच हुशार असलेल्या तिच्यात आत्मविश्वास ठासून भरला होता. खडा आवाज, स्पष्ट. सरांना प्रश्न विचारायला आम्ही सगळेच फार घाबरायचो, पण ही पटकन विचारून मोकळी होई. त्यामुळे ती लक्षात राहिली. नंतर २ वर्षांनी इंजिनेरींगला माझ्याच वर्गात परत भेटली. आता तिला ३ वर्षं आमच्या शहरात झाले होते, अजूनही तशीच होती. सावळी, उफाड्याची, सुंदर लांब केसांची घट्ट वेणी घातलेली. स्वच्छ, मोत्यासारखे दात. सलवार सूट घातलेला. आता ती, तिची आजी आणि लहान भाऊ असे तिघे घर करून राहत. आई बाबा अधूनमधून येऊन बघून जात. त्यावर्षी आमच्या बॅचमध्ये खूपच (८०%) बाहेरचे मुलं होते. बंगाली, बिहारी, दिल्लीहुन आलेले. ते सगळे होस्टेलवर राहत. आम्ही मूठभर लोकल होतो. बाहेरून आलेले फार श्रीमंत घरचे होते, बरेचसे आर्मीवाल्यांचे मुलं-मुली होते. या मुली आमच्यासारख्या बाळबोध नव्हत्या. दहा गावच्या पाणी पिलेल्या, कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या. अर्थात आमची सगळ्यांची मैत्री लगेच झाली. आमचा ४ जणींचा लोकल मुलींचा ग्रुप होता. ही ना धड लोकल ना धड होस्टेलवाली. पण हिला होस्टेलवल्या ग्रुप मध्ये जायचं होत.आणि त्यांना ही फारच डाउनमार्केट वाटायची. त्या मुली हिच्या रांगडेपणावर खूप हसत. तिचं मोठमोठ्याने बोलणं, घट्ट चोपून चोपून वेणी घालणं, manners त्यांना आवडायचं नाही. पुढल्या वर्षी तिच्या आजीची तब्बेत खराब झाली आणि हि होस्टेलवरच गेली. ती त्यांच्यामध्ये फिट होण्याचा प्रयत्न म्हणून त्यांच्यासारखा मेकअप करणे, तसलेच कपडे घालणे, मोठमोठे झुमके-हातात कडे घालणे असे प्रकार करायची. केस कापून टाकले, डाय केले, डोळ्यात काजळ, nose-रिंग असा स्वःचा कायापालट केला. पण हे सगळं करूनही त्या मुली हिला एकसेप्ट करत नव्हत्या. उलट पथेटिक wannabe झाली. कारण वरून कितीही makeover केला तरीही वागणं अजूनही तसंच. शिवाय तिच्याकडे फारसे पैसे नव्हतेच. त्यामुळे तिचे कपडे अगदीच छपरी दिसत. ४ वर्षं असेच गेले, त्या मुलींनी काही तिला एकसेप्ट केला नाही, आणि तिने प्रयत्न सोडला नाही. त्यामध्ये झालं इतकंच की अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं, स्वतःचं हसं झालं. तिला पुढे नोकरी लागली, बंगलोरला गेल्यावर आमचा फारसा संबंध नाही राहिला. पण अधूनमधून कळतं काय चाललंय. बंगलोरला गेल्यावर तर हातात पैसापण खेळू लागला. तिचे फेसबुकवर मिनी स्कर्ट मधले, प्रचंड gaudy मेकअप केलेले आणि हातात ड्रिंक्स किंवा सुट्टा मारतानाचे फोटो पाहून विश्वास होत नाही की ही तीच मुलगी आहे जी खणखणीत आवाजात मॅथ्सचे प्रश्न विचारायची आणि जिच्या आई-वडिलांनी आदिवासींची सेवा करण्यात स्वतःला वाहून घेतलय.

तुमच्या माहितीत असे लोकं आहेत का जे पूर्णपणे बदलले?

Group content visibility: 
Use group defaults

खूप ईंटरेस्टींग धागा आहे.
हळू हळू बदललेले काही लोक माहित आहेत. कायापलट आमुलाग्र असे माहित नाहित. इतरांचे अनुभव वाचायला आवडतील.

>>>>>>>>>मागे वळून बघितलं की आपणच केवढं अंतर चालून आलो हे जाणवतं...
+१
आणि सातत्याने, तर हेच जाणवते -
मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरीम|
यत्कृपा तमहं वंदे, परमानंद माधवम||