पुन्हा लागली फाटकी माणसे पेटाया

Submitted by दत्तात्रय साळुंके on 8 June, 2023 - 03:00

पुन्हा लागली फाटकी माणसे पेटाया

पुन्हा लागली फाटकी माणसे पेटाया
वाजू लागले पडघम निवडणूका आल्या

पुन्हा जयघोष झाला लोकशाहीचा
आला भाव मताला जरा कम‌ऊया

ऋतू पेटवाया असे चांगला हा
तापला तवा भाकरी भाजूया

जळतील अश्राप कुठे आपले ते
ठेकेदार आपणच वाटणी करुया

कशाला भिती नीती अनितिची
चांगभलं मेंढरांच, कळप राखूया

पक्षनिष्ठा,विचारधारा बाजूला ठेवू
संपत्ती साठी सत्ता धोरण राब‌ऊया

सारी तिकिटं देऊनिया घरातच
पिढ्यानपिढ्या अघोषीत सम्राट होऊया

कार्यकर्ता फुटकळ, बाजारबुणगा
त्यास सतरंजी उचलाया ठेवूया

भाषणात पातळी सोडून दुषणे देऊ
सत्ताधारी, विरोधक एकत्र येऊया

लोककल्याण भावना कागदावरच बरी
अंगावरी नाटकी झूल‌ चढवूया

दीस सुगीचे आले लगबग पीक काढूया
सण सरंजामशाहीचा साजरा करुया

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दसा
काही इलाज नाही.
जो है उसको मुकद्दर समज लो.
मध्य आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका त्यांच्याकडे पहा. आपण त्या मानाने फार सुदैवी आहोत.

आपण फाटके, बाजारबुणगे कुठे आहोत दसा? जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हिस्सा आहोत आपण. अगदी महत्वाचा (क्रुशिअल) हिस्सा.

सामो
तुम्ही अमेरिकेत आहात ना? मग कवी काय म्हणतोय ते समजणार नाही, का तुम्ही सर्कास्टीकलि लिहिलंय? ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हिस्सा आहोत आपण. अगदी महत्वाचा (क्रुशिअल) हिस्सा इत्यादी.

srd खूप धन्यवाद..
>>>हं. शंभर प्रतिसाद एकाच फाटक्या कवितेत.>>>
मी समजलो नाही..

केशवकूल तुमचेही मनापासून आभार...

सामो... कविता वाचल्या बद्दल अनेकानेक धन्यवाद...
>>>>आपण फाटके, बाजारबुणगे कुठे आहोत दसा?
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हिस्सा आहोत आपण. अगदी महत्वाचा (क्रुशिअल) हिस्सा.>>>>
हो अलीकडे आपल्याला जरुर महत्व मिळतंय... अंशतः पूर्वीही मिळालं पण ते लक्षवेधी नव्हत. ओपेक, अमेरिका कुठे आपल्या बाजूला होती. उदाहरणार्थ बांगलादेश युद्ध...

मला मुळात तुमच्या सर्वांच्या मतांचा आदर आहे. या विषयी मत भिन्नता असू शकते. पण अद्यापही कुपोषण, बेकारी, राजकीय मक्तेदारी, सत्तेसाठी खालच्या पातळीवर तडजोडी, भ्रष्टाचार, बेरोजगारी , मत विकणं, आदी गोष्टी आहेतच. आता कुणी म्हणेल corruption is universal phenomena....
बेरोजगारी सगळीकडे असते , गरिबी सगळीकडं असते वगैरे वगैरे.
मी एक लेखक आहे आणि जे दिसतं ते बिनधास्त मांडलं नाही तर अलीकडे आपणच म्हणतो हल्ली समाजाभिमुख लिखाण होत नाही. मला जे खटकलं ते मांडलं...मी कवितेत लिहिलेलं कपोलकल्पित नाही. ही आपली प्रगत समाजाची काळी बाजू आहे. म्हणजे समाजपुरुष सुंदर दिसतोय पण त्याला कुष्ठरोग झालाय. त्याची बोटं, हात, पाय झडण्या आधी त्याला उपचार मिळायला हवा...
पुष्कळ सुधारणा झाल्या मान्य पण म्हणून ही धुमसणारी आग अर्थात आहे रे आणि नाही रे मधली दरी मिटली नाही तर अनर्थ ओढवेल. दिवसेंदिवस ती वाढू नये.
मी हे पहातच मोठा झालो...सर्वत्र राजकीय घराणी मोठी होतायेत कार्यकर्ता हरकाम्याच आहे .त्यांच्यासाठी बाजारबुणगा शब्द वापरला . फाटका शब्द अस्तित्वहीन माणसासाठी. निवडणुका आल्या की चहा पेक्षा किटली गरम असं होतं...ही फाटकी माणसं नेत्यांचं ऐकून विरोधकांवर पेटून उठतात. प्रसंगी जीव घेतात.
भ्रष्टाचार उघड झाला अधिकारी, जवळचा विश्वासू कार्यकर्ता अडकतो. त्यांना सांगतात मी आहे ना का घाबरतो... मुळात जे कुकर्म केलं जातं त्यांचे बालंट आपल्यावर येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. मला वाटतं अरुण साधूंचं मुंबई दिनांक वास्तववादी आहे. शोध पत्रकारितेला हे लोक वचकून असतात. घाशीराम कोतवाल किंवा सिंहासन सारख्या कलाकृती यामुळंच लोकप्रिय होतात. त्या कलाकृती असल्या तरी वास्तवाच्या निकट आहेत. ......
अजूनही समाजात तळाचा घटक मग तो कुठल्याही जातीधर्माचा असो मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. कितीतरी आदिवासी पाडे कुपोषित आहेत. मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अलीकडेच कांदा १ रुपये, टोमॅटो दोन रुपये, बटाटा तीन रुपये होता. का नैराश्य येणार नाही. Starbucks काॅफी 200 ते 300. का दरी वाढणार नाही.
असो खूप झाले... कुणाला दुखावणे अथवा कमी लेखणे नाही...पण आपण वास्तव किती दिवस नाकारणार.
माफ करा माझी कविता कदाचित तुम्हाला कठोर शब्दातली वाटली असेल कदाचित मला सुरेश भटां सारखं "उष:काल होता होता काळ रात्र झाली...कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली" वगैरे. असं म्हणता आलं नाही हे माझं खुजेपण...
राजकारण सेवाभावी असतं आणि त्यात अर्थकारण नसतं तर किती गर्दी झाली असती तिकिटासाठी? २०२४:साठी आतापासूनच धमक्या चालू झालेत.

शीर्षकातला फाटका शब्द घेतलाय. बाकी कविता जमली आहे. मला तर वाटतं जमेल तर प्रतिसाद पद्यातच द्यावे सगळीकडे. कारण लेखन आटोपतं राहातं.

सुरेश भटां सारखं. . .
कवींनी कुणीच तुलना करू नये. कुणालाही कधीही चांगली कविता सुचते.

srd
पुन्हा एकदा आभार..
>>>>मला तर वाटतं जमेल तर प्रतिसाद पद्यातच द्यावे सगळीकडे. कारण लेखन आटोपतं राहातं.>>>>
मला त्या राजाची गोष्ट आठवली आणि हसू आले कारण तो राजा हुकूम काढतो की यापुढे प्रत्येकाने गाण्यात बोलायचे. एके दिवशी त्याच्या राजवाड्याला आग लागते आणि कोणीतरी गात सांगेपर्यंत राजवाडा जळून खाक होतो .
महाराज आपुला
महाराज आपुsss
ssssला
राsssज
वाडाssssss
ओsssssss
जळूनी ssss
खाकsssss
झाsss
ला
वगैरे.... मग पुढे त्यात वर्णन असेल आग कशी लागली कुठून लागली.
तुम्हाला गाण्यातलं चांगलं माहीत असेल...
तद्वत कोण काव्य कसं करेल कोण जाणे.... एखाद्याने संस्कृतातून, प्राकृतातून केलं तर ? Happy
व्यक्ती तितक्या प्रकृती....
सुरेश भटांशी माझी तुलना होऊच शकत नाही. कारण
कुठे इंद्राचा ऐरावत,कुठे शामभटाची तट्टानी

कृपया हलके घ्या.

अस्मिता
प्रथम तुमचे आभार...
>>>चपखल कविता आहे. हाच पॅटर्न आहे साधारण, त्यामुळे ह्या प्रक्रियेबद्दल आस्था राहिलेली नाही.>>
सहमत....मतदानाची टक्केवारी बोलकी असते.

भाषणात पातळी सोडून दुषणे देऊ>> फक्त एवढं आणी एवढंच चालतं आता.

कधी कधी वाटतं आपल्या आठ तासांच्या नोकरीत पण आपण कामात केवढं गर्क असायचो अन एवढ राज्य... देश चालवाचा तरी ह्या लोकांना कायम एवढा फालतू वेळ कसा मिळतो?

SharmilaR खूप धन्यवाद...
>>>कधी कधी वाटतं आपल्या आठ तासांच्या नोकरीत पण आपण कामात केवढं गर्क असायचो अन एवढ राज्य... देश चालवाचा तरी ह्या लोकांना कायम एवढा फालतू वेळ कसा मिळतो?>>>
खरंच मला वाटतं हे याच उद्योगात मश्गूल आणि राज्यशकट अधिकारी हाकत असावेत काही अपवाद सोडले तर. म्हणून सरकार बदललं की सोईचे अधिकारी येतात. शासकीय कामही तेच जमेल तसं करत असावेत आणि क्वचित साहेब एखाद्या वादग्रस्त विषयावर राजकीय सोईचा निर्णय देत असावेत. अशात अधिकारी मुजोर होतात. विरोधक खूप आक्रमक झाले तर त्यांच्या जुन्या अडचणीच्या फाईली वर काढायच्या‌...हे चालूच असतं.