संध्याकाळी बराच उशीर झालेला, चालून चालून पायाचे तुकडे पडलेले, आणि भुकेने पोटात खड्डा. तीनेक तास तरी आम्ही IKEA तल्या तीन एक मजल्यांवर पसरलेल्या लिविंग रूम , बेडरूम, किचन , चिल्ड्रेन’स रूम मधलं सामान , शोभेच्या वस्तू, झाडं, कुंड्या , झालच तर कचऱ्यांच्या पिशव्या ठेवायचा प्लास्टिकचा डिस्पेन्सर सगळं भारी कौतुकाने बघत, काय घ्यायचं त्याच्या नोंदी करत फिरत होतो. चेक आउट कॉउंटरच्या पलीकडे कुठेतरी बहुदा कॅन्टीन होत. आम्ही त्या लांबलचक लायनीतून एकदाचे (कसेबसे) काउंटरच्या पलीकडे आलो आणि तडक फूड कॉउंटर गाठला. तिकडे वेगवेगळॆ पदार्थ, ब्रेड्स, सॅलड्स अतिशय आकर्षकरित्या मांडलेले. आम्ही कॉउंटरशी पोहचलो तर तो म्हणाला,
“बोर्ड बघा. आता बंद झालं “
“अहो, एक मिनिट पण नाही उलटून गेलं ..”
“आता नाही मिळणार “, त्याने निक्षून सांगितले.
“बरोबर छोटी मुलं आहेत, त्यांना तरी काही घेऊ देत .. “, वगैरे वगैरे युक्तिवाद करण्याचा आम्ही निष्फळ प्रयत्न केला. पण तो गडी काही बधला नाही. त्याने एक मोठा कचऱ्याचा डबा आणला आणि एक एक ट्रे त्यात रिकामा करायला सुरुवात केली.
आम्हाला इतकी भूक लागली असताना, आम्ही ते अन्न विकत घ्यायला तयार असताना, आम्हाला ते न देता त्याला त्या रीतीने ते सगळंच्या सगळं अजुन चांगलं असलेलं अन्न फेकून देताना बघून, इतके वर्ष “अन्न हे पूर्णब्रम्ह “ बिंबवलेलं मन हलल, कुठेतरी आत दुखावलं गेलं.
पण मग नंतरच्या कालावधीत, मुलांना सक्चिची म्हणून शाळेत दिली जाणारी सफरचंद, भाज्या, दूध हे सगळं कचराकुंडीची धन झालेली खूप वेळा बघायला मिळाल. “Problem Of Abundance” किंवा “विपुलतेची समस्या”!
हळू हळू कळत गेलं इकडे लोकांचा रात्रीच्या जेवणाची वेळ साधारण सहा साडेसहा असते. अगदी उन्हाळ्यात सुद्धा जरी सूर्य साडेआठ नऊला मावळत असला तरीही. त्यामुळे जर भारतीय वेळेनुसार तुम्ही नऊला हॉटेलात जेवायला जाल तर बऱ्याच वेळेला ती बंद झालेली किंवा होत असतात. आम्ही पण हे ज्ञान कष्टानी कमवले. एकदा पिझ्झा कमी वाटला म्हणून मग एक्सट्रा सांगायला कॉउंटर वर गेलो तर,
“आता नाही मिळणार .”
“पण इथे तर नऊ पर्यंत लिहिलंय.. “
“हो पण नऊला दुकान बंद करायच तर साडेआठला आम्ही ऑर्डर घेणं बंद करतो.”
म्हणजे तुम्हाला दुकान बंद व्हायच्या आधी ४० मिनिटे तरी पोहोचायला पाहिजे.
आपली भारतीय हॉटेलं त्यातल्या त्यात उशिरा म्हणजे तरी दहा वाजता बंद होतात.
मुलांना सॉकर (फ़ुटबाँल ) ला घातलेलं. संध्याकाळी त्यांची प्रॅक्टिस असे. मुलं खेळत असताना पालक तिकडे मैदानाच्या कडेला बसत. काही काही कुटुंब तिथेच बाजूला बसून खात असत. मग लक्षात आलं के ते त्यांचं डिनर करतायत आणि खेळणाऱ्या मुलाच बहुदा पार्सल बाजूला ठेवलेलं असे. किंवा एखाद्या वेळी मुलं फारच रंगात आली, खूप वेळ खेळत बसली तर मग एखादा पालक त्याच डिनर म्हणजे बहुदा बरिटो / पिझ्झा ग्राउंड वरच घेऊन येई. आणि मग तिथेच तो मुलगा त्याच डिनर उरके.
स्केटिंग पार्कच्या बाहेर, पार्कच्या बाहेर, पिकनिक टेबलवर अशी खूप वेळा कितीतरी कुटुंबाना जेवणे उरकताना बघतलीयेत त्यामुळे सुरुवातीला बसणारा धक्का हळू हळू अंगवळणी पडला.
आपल्या कडे कसं पूर्वी साग्रसंगीत उठणाऱ्या पंगती किंवा मग नंतरच्या काळात गोल करून सगळ्यांनी एकत्र जेवायला बसणं मागे पडत जाऊन आता हातात आपापलं ताट घेऊन TV पुढे सोफ्यावर बसून जेवणं रूढ व्हायला लागलय? त्याच धर्तीवर डाईनिंग टेबलवर सगळ्यांनी एकत्र बसून डिनर करणे हे इकडेही विरळ होत चालले असावे किंबहुना घरी नीट बसून जेवणेही मागे पडत चालले असावे.
बऱ्याचशा घरांमध्ये रात्रीच्या जेवणाला (To go )बाहेरून जेवण घेऊन येतात किंवा पटकन होईल असे काही, त्यात बहुतांशी फ्रोझन पॅटी/ डिनर गरम करून खाणे हे नॉर्मल असते. covid नंतर लोकांचं घरी बनवून जेवायचं प्रमाण वाढलय, रेडी मिल पॅकेजेस मिळतात, त्यात एखाद्या डीशला लागणारी सगळी सामग्री तयार असते. त्यामुळे तुमचा तयारीचा वेळ वाचून तुम्ही घरी बनवलेले जेवण जेऊ शकता. भारतीय कुटूंबामध्ये (मी बघितलेल्या) बहुतांशी घरचे जेवण असते, परंतु ते त्याच दिवशी बनवलेले असेल असे नाही. काही जण वीकएंडला जेवण बनवून फ्रिज मध्ये ठेवतात आणि लागेल तस गरम करून घेतात किंवा आठवड्यातून २-३ दा स्वयम्पाक करतात.
मुख्य म्हणजे बऱ्याचशा कुटुंबात जेवण बनविणे, नंतरचे आवरणे ही फक्त गृहिणीची मक्तेदारी नसून ते कोणीही किंवा पाळी लावून केले जाते. अगदी मुलांपासून थोरांपर्यंत इकडे प्रत्येकाला काहीतरी काम असते किंबहुना करावे लागते. पाहुणेही ह्याला अपवाद नाहीत.
लंचही बऱ्याचदा आपापल्या कामाच्या / शाळेच्या ठिकाणी घेतात म्हणजे कॅन्टीन मध्ये किंवा बाहेरून, काही घरांमध्ये सकाळी पटकन बनविता/ खाता येईल असे, सलाड बॉक्सेस, रेडिमेड लंच बॉक्सेस किंवा तत्सम पदार्थ असतात.
सकाळी ब्रेकफास्ट करायला सगळ्यांना वेळ असतोच असं नाही, कामाच्या दिवशीचा ब्रेकफास्ट सर्वसाधारणपणे सिरिअल-दूध, ज्यूस, फळे किंवा स्मूदी, ओटमील, बेगल (एक प्रकारचा गोल डोनट सारखा दिसणारा पण त्यापेक्षा जास्त सकस(?) ), मफिन ( मावाकेक सारखा छोटा केक ) किंवा तत्सम ब्रेडचे प्रकार, योगर्ट (दही , बहुतांशी फ्लेवर्ड ) थोडा जास्त हेल्दी म्हणजे अंड/ ऑम्लेट्स वगैरे. आपल्याकडेही धावत्या जीवनशैलीत काहीसे असेच झाले आहे.
एक माझ्या ओळखीची पालक होती तिची तिन्ही मुले खूपच ऍक्टिव्ह होती, त्यामुळे ती दुपारी दोननंतर संध्याकाळ पर्यंत गाडी घेऊन मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना सोडणे आणणे ह्यातच गर्क असायची. पूर्वी मी भारतात मुलांना क्लासला टाकलं की हुश्श करायचे. त्यांना अडकवल की मला वेळ मोकळा कारण सोडण्या-आणण्याला रिक्षावाले काका असायचे. पण इकडे क्लास लावण्याआधी आपल्याला सोडा-आणायला जमणारे का हा प्रश्न आधी सोडवायला लागतो .
इकडे मुलांना शाळेत सोडणे, आणणे, त्यानंतर त्यांना शाळा सुटल्या नंतर वेगवेगळ्या क्लासेस नाआणि घेऊन जाणे जसे की बास्केट बॉल प्रक्टिस, सॉकर, कराटे, डान्स, पेंटिंग, शाळेमध्य व्हॉलंटिअरींग करणे, घरच क्लीनिंग, आवरा आवरी, भांडी, कपडे मशीन मध्ये धुवून, वाळवून घेणे, घड्या घालणे, जागेवर ठेवणे, ग्रोसरी आणणे, स्वयंपाक, ओटा किचन आवरणे, झाडू किंवा व्याकूम फिरविणे. घर असेल तर गार्डनिंग, मोविंग एक ना दोन हजार कामं .
त्यातून जर दोघंही नोकरी करणारे असतील तर खरच तारेवरची कसरत असते. क्लीनिंग किंवा कूकिंगसाठी कोणी कामाला मदत घेतली तरी ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येतात. आणि दोघेही नोकरी करणारे असतील तरच सामान्यतः अशा सर्विसेस घेणे परवडते.
“तू स्वयंपाक करतेस ? रोज ?” हा प्रश्न ऐकून सुरुवातीला मी दचकले आणि खात्री करून घेतली की नक्की हेच विचरायचंय ना. पण आता इकडची जीवनशैली बघून वाटत की खरंच त्याच्या उत्तरावरून त्यांना जज करू नका किंवा तोलू नका कारण प्रत्येकाची प्रश्न पत्रिका वेगळी असते त्यामुळे त्यांची उत्तरेही निरनिराळीच असणार!
माझी अमेरिका डायरी - १० - आहार,विहार, खान,पान !
Submitted by छन्दिफन्दि on 30 April, 2023 - 09:56
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण आता इकडची जीवनशैली बघून
पण आता इकडची जीवनशैली बघून वाटत की खरंच त्याच्या उत्तरावरून त्यांना जज करू नका किंवा तोलू नका कारण प्रत्येकाची प्रश्न पत्रिका वेगळी असते त्यामुळे त्यांची उत्तरेही निरनिराळीच असणार!>>> हे खूप आवडलं.
अल्पना, धन्यवाद!
अल्पना, धन्यवाद!
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
अमेरीकेतलं काही काही वाचून गड्या आपला गाव बरा (म्हणजे देश भारत), काही काही वाचून वाटतं हे कित्ती छान तिकडे,आपल्याकडे का नाही (सुसज्ज लायब्ररीज बघून वाटलेलं). अशा माझ्या मिश्र भावना असतात.
आजचं वाचून इथे रात्री उशीराही खायला मिळू शकतं बाहेर ह्याचं बरं वाटलं. याबाबतीत म्हणजे कोणीतरी पैसे देऊन खायला मागत असताना (म्हणजे विकत घेत असताना) , रुल इज रुल जरा रुड वाटलं, फेकून देण्यापेक्षा खायला देऊ शकले असते. आपल्याकडे फेकून देण्यापेक्षा, असंच कोणाला देतातही.
धन्यवाद, अन्जू .
धन्यवाद, अन्जू .
अमेरीकेतलं काही काही वाचून गड्या आपला गाव बरा (म्हणजे देश भारत), काही काही वाचून वाटतं हे कित्ती छान तिकडे,आपल्याकडे का नाही (सुसज्ज लायब्ररीज बघून वाटलेलं). अशा माझ्या मिश्र भावना असतात. >>>
आजचं वाचून इथे रात्री उशीराही खायला मिळू शकतं बाहेर ह्याचं बरं वाटलं. >> ते थोडं सवयींवर पण असत.
याबाबतीत म्हणजे कोणीतरी पैसे देऊन खायला मागत असताना (म्हणजे विकत घेत असताना) , रुल इज रुल जरा रुड वाटलं, फेकून देण्यापेक्षा खायला देऊ शकले असते. आपल्याकडे फेकून देण्यापेक्षा, असंच कोणाला देतातही.>>> +१
पहिला प्रसंग वाचून बरेच काही
हाही लेख छान.
पहिला प्रसंग वाचून बरेच काही आठवले. पहिलं what do you think about the scarcity of food in the rest of the world.
भांडवलशाहीला समोर ग्राहक पैसे मोजायला तयार असताना तयार अन्न कचर्यात फेकायला कसं जमतं?
बाकी, घरी रोज स्वयंपाक न करणं, पाहुण्यांसकट सगळ्यांनी आवरा आवरीत हातभार लावणं हे वाचून वाचून माहितीचं झालंय.
We get bagels and muffins
We get bagels and muffins home delivery on demand. Readily available.
अमेरीकेत शिजवलेल्या आणि
अमेरीकेत शिजवलेल्या आणि कच्च्या अन्नाबाबतचे बरेच नियम आहेत. कमर्शिअल सेटअपमधे ते काटेकोर पाळणे अपेक्षित असते. अन्न काय प्रकारचे आहे त्यानुसार ते किती तापमानाला ठेवल्यास सेफ याचे नियम असतात. त्यामुळे उरलेले अन्न फुकट जावू नये म्हणून आधीपासून करार वगैरे करुन मगच ते अन्न गरीबांसाठी वाटायला उपयोगात आणले जाते. योग्य प्रकारच्या भांड्यांतून, योग्य तापमानाला ठेवत हे अन्न हलवावे लागते. जिथे नेणार तिथेही ते साठवायची योग्य सोय लागते. उद्या उरलेल्या अन्ना मुळे कुणी आजारी पडले तर ... कायद्याचा बडगा! त्यामुळे आपल्याला जरी अन्न फेकून दिले, फुकट घालवले वाटले तरी तिथे काम करणारी व्यक्ती केवळ नियम पाळत असते. दुकान बंद करायचे म्हणूनत्यांची सिस्टिम ऑफ केल्यावर तिथले अन्न योग्य तापमानाला रहात नाही त्यामुळे ते अनसेफ - टाकून देणे होते. मी साल्वेशन आर्मीच्या किचनसाठी उरलेले अन्न साठवणे, नेणे वगैरेला मदत केली आहे. अन्नाचे तापमान, पी एच, डेअरी-मीट प्रॉडक्ट वगैरे बरेच काही लक्षात घ्यावे लागते. अगदी फूड पॅन्ट्रीसाठी दान केलेल्या कॅन गुड्स च्या तारखा देखील बरेचदा विशिष्ठ कालावधीतल्या लागतात.
बाकी उशीरा खायला मिळणे वगैरे तर भारतातही मी रहात होते तेव्हा तालूक्याच्या ठिकाणी आठ-साडेआठ नंतर शुकशुकाट असे. बाबांना कामानिमित्त प्रवास असल्यास कोरडा खाऊ सोबत ठेवत. मुक्कामासाठी बरेचदा डाकबंगल्याचे बुकिंग एवढाच पर्याय असे .
अमेरीकेत न्युयॉर्क सारख्या शहरात, मुंबईसारखेच उशीरापर्यंत सर्व सुरु, अन्नाची डिलीवरी वगैरे मिळते. अर्थात जे यात काम करतात त्यांच्यासाठी ते कष्टाचेच असते. ऑन डिमंड डिलीवरीचे वाईट वास्तव आहेच. https://www.cnn.com/2023/05/05/business/delivery-workers-new-york-bathro...
आमच्या इथे गावातली खायची ठिकाणे लवकर बंद होतातच पण आजकाल हायवे जवळची फास्ट फूडची दुकानेही कामगार मिळत नसल्याने लवकर बंद होतात. युनियन असलेल्या फॅक्टरीत बेनिफिटवाले चांगले जॉब /हायस्कूलच्या मुलांना अप्रेंटिसशिप वगैरे असल्यावर गिग जॉब करायला फारसे कुणी तयार नसते.
भांडवलशाहीला समोर ग्राहक पैसे
भांडवलशाहीला समोर ग्राहक पैसे मोजायला तयार असताना तयार अन्न कचर्यात फेकायला कसं जमतं?
एखाद्या हॉटेल वाल्याने समजा हॉटेल बंद झाल्यावर राहिलेले अन्न दिले/विकले आणी त्या ग्राहकाला उलट्या जुलाब झाले व त्याने खटला दाखल केला तर केवढ्याला पडेल? हॉटेल आठ ला बंद झाले व आठ वाजून पाच मिनिटानी अन्न दान केले होते एवढा पुरावा पुरेसा आहे.
अमेरिकेत घरासमोर साईड वॉक वर बर्फ साचला व तो आम्ही वेळेवर काढला नाही व त्यात घसरून दुसरा एखादा पडला तर तोही खटला करू शकतो आमच्यावर. मंगळागौरीला आमच्या घरी एक मुलगी आली व नाचताना घसरून पडली तर तीही खट्ला दाखल करू शकते. ( असं होत नाही सहसा ..)
>>>>>>भांडवलशाहीला समोर
>>>>>>भांडवलशाहीला समोर ग्राहक पैसे मोजायला तयार असताना तयार अन्न कचर्यात फेकायला कसं जमतं?
भरत यांचा प्रश्न कळला मला. भांडवलशाहीचे तत्व असते - स्वतःचा विकास सर्वात प्रथम. आपला विकास झाला की आपोआप समाजाचा विकास होतो.
अशा वेळी ग्राहकाला डावलतात कसे? आपलाही तर त्यात फायदाच आहे.
तर मला वाटते - हे दुकानात काम करणारे हरकामे असतात. ८ वाजता बंद म्हणजे बंद. त्यांनाही कुटुंब असते. शिवाय एकदा असे ८ नंतर पाच मिनिटांनी दिले की उद्या १० लोकं येणार वगैरे वगैरे. त्यापेक्षा मग फेकण्याने 'शिस्त/ नियम' एन्फोर्स होतात. लोकांनाही वळण रहातं.
>>>>>>हॉटेल आठ ला बंद झाले व आठ वाजून पाच मिनिटानी अन्न दान केले होते एवढा पुरावा पुरेसा आहे.
होय होय!! हाही मुद्दा आहे.
छान लेख. तो अन्न वाया घालवणे
छान लेख. तो अन्न वाया घालवणे प्रकार आपल्याला पटत नाही. हाटेलात भरमसाठ थाळ्या ऑर्डर करतात आणि राहिलेलं टाकून देतात. पॅक करून घेणे हास्यास्पद किंवा गरीबीचं लक्षण समजतात (निदान माझ्या पाहण्यात तरी ... सगळीकडे आहे का कल्पना नाही). मग जर पॅक नसेल करायचं तर निदान आपल्याला पोटाला लागेल तेवढंच घ्यावं ना! कित्येकदा तर लोक न जाणारी डिश एकही चमचा न खाता टाकून देतात. तिथे माझा मराठी मध्यमवर्गीय जीव हळहळतो.
लेखिकेच्या वतीने डिस्क्लेमर
लेखिकेच्या वतीने डिस्क्लेमर टाकतो. हि "त्यांची" डायरी आहे, "त्यांच्या" अनुभवावर बेतलेली. त्यांच्या डायरीवरुन असं जाणवतं कि त्यांना अजुन खूप अमेरिका बघायची आहे. तेंव्हा हि डायरी वाचुन अमेरिके बाबत कुठल्याहि निष्कर्शावर पोचु नका. वर अन्न डिस्पोज ऑफ करण्याची प्रोसेस सांगितलेली आहेच, दुसरा मुद्दा रात्री-बेरात्री खादाडीचा. इथे २४/७ रेस्टराँ आहेत, काहि फास्टफुड्स देखील असतात. तिथे वडा-पाव, पावभाजी, भुर्जी-पाव वगैरे सध्यातरी मिळत नाहि, पुढेमागे एखादा देसी तेहि सुरु करेल...
लेखात लिहीलेला पहिला अनुभव
लेखात लिहीलेला पहिला अनुभव वाचून आश्चर्य वाटले. सहसा दुकानातून्/रेस्टॉ च्या दारात "ओपन" पाटी असताना आत आलेल्यांना सर्विस नाकारत नाहीत. तसा कधीच अनुभव नाही. रेस्टॉ बंद म्हणजे नवीन लोकांना आत घेणे बंद होते. आता शेवटी आलेल्या लोकांना अनेकदा "ऑर्डर देउन टाका, आत किचन बंद होत आहे" असे सांगतात. पण लाइनीतून पुढे आलेल्याला वेळ संपली म्हणून सर्विस नाकारली असा माझा तरी अनुभव नाही. आणि तसे होणार असेल तर अगदी सहज जाणवेल अशा पद्धतीने घोषणा करतात. अचानक सरप्राइज दिल्यासारखे "तोंडावर खिडकी बंद" करत नाहीत हा जरा अपवादात्मक अनुभव वाटतो.
घरी स्वयंपाक करणे, ग्रोसरी पॅटर्न्स मधे कोस्टल अमेरिका व मध्य अमेरिका यात खूप फरक आहे. मध्य अमेरिकेत एका चौ मैलात ८-१० ग्रोसरी स्टोअर्स सहज असतात आणि सर्व धो धो चालतात. घरी स्वयंपाक करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. या भागातील फॅमिली व्हॅल्यूज वगैरे धर्माचा फरक सोडला तर भारतीयांना सहज रिलेट होतील अशा आहेत.
आपली कामे आपण करणे व घरातील कोणतेही काम कोणीही करणे ही इथली कॉमन पद्धत आहे. त्याची एकदा सवय झाली की इथे स्वयंपाकाला व घरकामाला लोक येत नाहीत वगैरे विचारही येत नाहीत. या गोष्टी फक्त सुरूवातीला इथे आल्यावर जाणवतात.
समोर ग्राहक तयार असताना दुकान
समोर ग्राहक तयार असताना दुकान बंद करून अन्न टाकून देणे वगैरेची बरीच कारणे आहेत - एकतर विकुंनी म्हंटल्याप्रमाणे लाएबिलिटी हे एक कारण आहे. दुसरे म्हणजे अनेक ठिकाणी चेन रेस्टॉ मधे कामाला असलेले लोक हे तासाच्या पगारावर असतात. त्यांना वेळ संपल्यावर पुढे चालू ठेवण्यात काहीच मोटिवेशन नसते. फॅमिली ओन्ड दुकाने/रेस्टॉ असतात तेथे लोक फ्लेझिबल असतात. देसी ग्रोसरीत दुकान बंद झाल्यावर "पटकन दोन गोष्टी उचलायच्या आहेत" सांगून घेऊन आल्याचे लक्षात आहे. तो दुकानदार डीडीएलजे मधल्या अमरिश पुरीसारखा नव्हता
सेण्ट्रली ऑपरेट केला जाणारा पेमेण्ट काउन्टर बरोब्बर वेळेला बंद होतो आणि मग पेमेण्ट सुद्धा होत नाही असेही त्या लोकांकडून ऐकले आहे. ते कितपत खरे आहे माहीत नाही.
“ सेण्ट्रली ऑपरेट केला जाणारा
“ सेण्ट्रली ऑपरेट केला जाणारा पेमेण्ट काउन्टर बरोब्बर वेळेला बंद होतो” - बरेचसे फ्रँचाइझी रेस्ट्राँट्स चे मालक स्वतः पूर्णवेळ तिथे नसतात. बराचसा बिझनेस कंट्रोल हा कॅमेराज, ऑटोमेटेड सिस्टिम्समधून चालतो. नियम आणि पॉलिसीजच्या बाबतीत फ्रॅचायझीज चे स्वतःचे नियमसुद्धा काटेकोर असतात.
८ वाजता बंद म्हणजे बंद.
८ वाजता बंद म्हणजे बंद. त्यांनाही कुटुंब असते. शिवाय एकदा असे ८ नंतर पाच मिनिटांनी दिले की उद्या १० लोकं येणार वगैरे वगैरे. त्यापेक्षा मग फेकण्याने 'शिस्त/ नियम' एन्फोर्स होतात. लोकांनाही वळण रहातं.>>> हे असे असावे कद्चित.
वरती कॉमेंट्स मध्ये म्हंटल्याप्रमाणे इकडे लगेच खटले लावायची भीती असते हे खरेच.
स्वाती२ तुम्ही विस्तृतपणे अन्न आठवायचे नियम, पद्धत सांगितल्या बद्दल धन्यवाद!
राज, तुम्ही म्हंटल्याप्रमाणे मी जशी बरीचशी अमेरिका बघितलेली नाही तसेच बराचसा भारतही, गेला बाजार महाराष्ट्रही.
मी impression नोंदवतले ते साहजिकच मी बघितलेल्या आणि अनुभवलेल्या प्रसंगांवर बेतले असते.
पण इतर कोणालाही दुसरी बाजू मांडावीशी वाटली तर जरूर करा, सगळ्यांनाच नवीन माहिती मिळेल.
घरी स्वयंपाक करणे, ग्रोसरी पॅटर्न्स मधे कोस्टल अमेरिका व मध्य अमेरिका यात खूप फरक आहे. मध्य अमेरिकेत एका चौ मैलात ८-१० ग्रोसरी स्टोअर्स सहज असतात आणि सर्व धो धो चालतात. घरी स्वयंपाक करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. या भागातील फॅमिली व्हॅल्यूज वगैरे धर्माचा फरक सोडला तर भारतीयांना सहज रिलेट होतील अशा आहेत.>>> असू शकेल. ती पायोनियर वूमन अशाच ४-५ मुलं, शेती वगैरे असलेल्या कुटुंबातील असल्यामुळे खूप सारा स्वयंपाक करत असते. त्यातूनच मला वाटतं ती फूड ब्लॉगर आणि कूकिंग शो करायला लागली.
पण आमच्या आजूबाजूला दिसणारे चित्र, येणारे प्रश्न, त्यांची लाईफ स्टाईल हे मी वर सांगितलेलं असच साधारण आहे. त्या पलीकडे TV news, quora, सिरिअल्स, movies सगळीकडे असच रिफ्लेक्शन दिसतं.
covid मध्ये एक बाई, (बहुतेक सेंट्रल अमेरिका वगैरे मधली असावी) रडु न रडून सांगत होती आता जॉबचे वांदे झाल्यामुळे त्यांच्यावर इतकी वाईट परिस्थिती आलीये की आता तिच्या नवऱ्याला आणि मुलांना ब्रेड घरी बेक करावा लागतोय. हे एक उदाहरण ठळकपणे आठवतंय पण त्या वेळी सतत हेच ठसत होत की रेस्टॉरंट्स हि लक्सरी नाही तर लोकांच्या जीवनावश्यक गोष्ट आहे. म्हणूनच तीच चालू ठेवलेली.
स्वाती२, फारएण्ड तुंम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद!
अजून एक जाणवलेली गोष्ट, अमेरिका खरं तर दोन कोस्टवर (टोकांवर ) वेगळी आहे आणि मधली एकदम वेगळी आहे. ट्रम्प ची अमेरिका म्हणू शकतो का ? ह्या मधल्या अमेरिकेत ऑरगॅनिक, vegan पदार्थ मिळतात का ? तिकडून इकडे शिफ्ट झालेल्या लोकांकडून काही गोष्टी ऐकल्या त्यावरूनही बरेच फरक आहेत हे कळले.
भरत, हरचंद पालव धन्यवाद!
भरत, हरचंद पालव धन्यवाद!
हरचंद पालव, इकडे एक चांगली गोष्ट म्हणजे तुहाः अन्न उरलय हे बघून ते वेटरच रिकामे बॉक्स आणून देतात पदार्थ घरी घेऊन जायला.
स्वाती२ तुम्ही विस्तृतपणे
स्वाती२ तुम्ही विस्तृतपणे अन्न आठवायचे नियम, पद्धत सांगितल्या बद्दल धन्यवाद! >>> अगदी अगदी.
बाकी बरेच प्रतिसादही माहीतीपुर्ण आहेत.
वर दिलेले आदर्श नियम पाळणारे
वर दिलेले आदर्श नियम पाळणारे जसे आहेत तसे दिवसेंदिवस तेच अन्न परत परत सर्व करणारी देसी बुफे स्टाईल रेस्टॉरंट आहेत. अगदी सबवे टाईप चेनचे नियम वाकवुन देसी मॅनेजमेंट देसी जुगाड करणारी मंडळी ही आहेत.
फा +१. मॉम-पॉप डायनर मध्ये वेळ संपल्यानंतर काय करुन देता येईल टाईप चर्चा करुन काही तरी गरम वाढलेलं आहे. शटर बंद होताना पटकन खाली वाकुन एकच वस्तू हवी आहे करुन कधीमधी जाण्याची वेळ आली आहे. कधी जाऊ दिलं आहे कधी नाही. तो आपला हक्क नाही हे समजुन जाऊच नये अगदीच निकड असेल तर विनंती करुनच जावे. रजिस्टर बंद झालंय पण कॅश असेल तर जा पटकन असंही सांगण्यात आलं आहे. थोडक्यात अमेरिका एकाच रंगाची नाही.
अजून एक जाणवलेली गोष्ट,
अजून एक जाणवलेली गोष्ट, अमेरिका खरं तर दोन कोस्टवर (टोकांवर ) वेगळी आहे आणि मधली एकदम वेगळी आहे. ट्रम्प ची अमेरिका म्हणू शकतो का ?
ट्रम्प बद्दल बोलायचं झाल्यास कमालीचं पोलरायझजेशन झालेलं दिसेल. इथली शहरी वोटिंग झोन डेमोक्रॅट लीनिंग आहेत तर रूरल कट्टर रिपब्लिकन.
ह्या मधल्या अमेरिकेत ऑरगॅनिक, vegan पदार्थ मिळतात का ? >>>
हो, मेट्रो मध्ये किंवा छोट्या शहरात रहात असलात तर ऑरगॅनिक / विगन / इंटरनॅशनल सगळ्या टाईपचे पदार्थ मिळतात. अगदी इथल्या वॉलमार्ट / क्रोगर / मायर टाईप रेग्युलर चेन ग्रोसरी स्टोर मध्ये हि त्यांचे सेपरेट आईल सापडतील. शिवाय होल फूड / फ्रेश थाइम वगैरे तुलनेने फॅन्सी ग्रोसरी स्टोर आहेतच.
>>>>>>>रूरल कट्टर रिपब्लिकन
>>>>>>>रूरल कट्टर रिपब्लिकन
होय. विसकॉन्सिनमध्ये तसा अनुभव आलेला. रुरल मध्ये लोकल दुकानांच्या बाहेर अजस्त्र अमेरिकन फ्लॅग्स वगैरे. 'होमकमिंग हिरोस' चे स्वागत आख्खे गाव करणार. ४ जुलै च्या परेडस. ट्रंप जिंकला तर लगेच ऑफिसात डोनटस ठेवणार.
मला रेसिझमचाही अनुभव आला. पण तसा तो कीलिफोर्निआ/लॉन्ग बीचला ही आलेला. सो नॉट शुअर.
माझाही फारएन्डासारखाच अनुभव.
माझाही फारएन्डासारखाच अनुभव.
छन्दीफन्दींनी बहुधा या लेखांना 'अमेरिका' डायरी म्हटल्यामुळे संपूर्ण अमेरिकाभर हे असं चालतं असा ग्रह होतो आहे.
भारत अठरापगड असेल तर अमेरिका अठराशेपगड आहे हे लक्षात ठेवून हे लेख लिहिले / वाचले जायला हवे आहेत.
थोडक्यात अमेरिका एकाच रंगाची
थोडक्यात अमेरिका एकाच रंगाची नाही.>>+१
आमच्या इथे एका मॅाल मधे फूड कोर्ट बंद व्हायच्या वेळेला कमी किमतीतही पदार्थ(संपवण्यासाठी) विकताना पाहिले आहे.
मॉल मध्ये सुशी प्लेसला बंद
मॉल मध्ये सुशी प्लेसला बंद व्हायची वेळ होत आली की ३०% मग ५०% डिस्काऊंट असतो. त्यावेळात तिकडे असू तर हमखास एकावर एक फ्री घ्यायचा आग्रह पोरं करतातच. त्यांना फ्री चं असलेलं आकर्षण सफरचंद फार लांब न पडल्याचं समाधान मला देऊन जातं.
"भारत अठरापगड असेल तर अमेरिका
"भारत अठरापगड असेल तर अमेरिका अठराशेपगड आहे हे लक्षात ठेवून हे लेख लिहिले / वाचले जायला हवे आहेत." - सौ टकेकी बात हैं|
>>>>>>त्यांना फ्री चं असलेलं
>>>>>>त्यांना फ्री चं असलेलं आकर्षण सफरचंद फार लांब न पडल्याचं समाधान मला देऊन जातं. Happy
वाह!! सॉलिड.
छान अनुभवकथन.
छान अनुभवकथन.
lawsuit च्या भीतीपोटी काही अतर्क्य आणि आचरट प्रकार घडत असावेत असे दिसतेय.
लेखमालिकेच्या शीर्षकातच 'माझी' शब्द असल्याने हे पूर्ण अमेरिका देशाविषयी भाष्य आहे अशी कोणी स्वतःची समजूत करून घेतली तर तो त्या वाचकाचा दोष आहे. लेखिकेने तसेही डिस्क्लेमर दिलेले आहेच.
ही ' माझी अमेरिका डायरी '
ही ' माझी अमेरिका डायरी ' आहे, नुसती अमेरिका डायरी नाही. खालील लिंकवर मनोगत आहे, त्यात माझा हे लिहीण्यामागाचा हेतू मी स्पष्ट केला आहे. हे ललित लेखन आहे, कुठलाही रिसर्च पेपर किंवा थिसिस नाही.
https://www.maayboli.com/node/82953
एखादं अपना बाझार सारखं दुकान 24 तास चालू राहिलं किंवा पाणी पुरी कंपनी सारखं एखाद्अगदी ५ वाजता बंद झालं तर ती दोन्ही outliers झाली. ७०-८०% जो मधला पट्टा असतो ते म्हणजे नॉर्मल अनुभव.
एखादी गोष्ट एकदा घडली तर नोंद करून सोडून देते, दुसऱ्यांदा घडली तर काउंटर वाढतो, एखाद्या threshold ला पोहोचला की मग ती गोष्ट register होते. त्यातली एखादी गोष्ट ठळक पणें लक्षात राहते, मग ती सांगितली जाते पण ठोकताळा बांधताना फक्त त्या एका गोष्टीवरून केला जात नाही.
हे मी इतक्या सविस्तरपणे लिहित्ये कारण इकडे बऱ्याचदा कोपऱ्यातल्या एखाद्या अनुभवा वरून कीस पाडला जातो( हे माझं बऱ्याच धाग्याना बघुन केलेलं निरीक्षण आहे).
जसे भारतात आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जायचे म्हंटले की साडे आठ नऊला निघतो त्या हिशेबाने इकडे धरून चालत नाही इकडे जनरल जेवणाचा टाईम 6.30-7 असतो. इतकं सरळ साधं सोपं आहे.
Food wastage %ge बघितलं तर तर अमेरिका अव्वल क्रमांकावर आहे. Statistical Data जाऊ देत पण आपल्या डोळ्यांसमोर खाण्यायोग्य अन्न ट्रे भर भरून कचऱ्यात टाकलं जातं हे सत्य तर डोळ्यांना दिसते. आता त्यामागची कारण मिमांसा वर दिली आहे, किंवा त्या व्यतिरिक्त अजूनही आहेत.
End रिझल्ट काय आहे तो लिहीलाय.
40% फूड waste आणि कमर्शिअल 61% वेस्ट हे statistical number तुम्हाला google केल्यावर सहजच मिळतील.
आता इतर देशात होत नाही का? तर जरूर होत, जेव्हा त्यावर लिहत असेन तेव्हा तिकडचे अनुभव/ अकडे इत्यादी बघायला लागतील.
हाही भाग छान.
हाही भाग छान.
>>पण आता इकडची जीवनशैली बघून वाटत की खरंच त्याच्या उत्तरावरून त्यांना जज करू नका किंवा तोलू नका कारण प्रत्येकाची प्रश्न पत्रिका वेगळी असते त्यामुळे त्यांची उत्तरेही निरनिराळीच असणार!
अगदी अगदी.
निर्देश, वर्षा धन्यवाद!
निर्देश, वर्षा धन्यवाद!
>>>> बेगल (एक प्रकारचा गोल
>>>> बेगल (एक प्रकारचा गोल डोनट सारखा दिसणारा पण त्यापेक्षा जास्त सकस(?)
बेगल सकस नाही! especially, plain बेगल!
Pages