माझी घासाघीस

Submitted by nimita on 25 April, 2023 - 09:30

घासाघीस...… तसं पाहिलं तर हा अगदी सरळ, साधा अर्थ असलेला शब्द.... पण या एका शब्दात माझे दोन आगळेवेगळे छंद सामावले आहेत.

त्यातला एक छंद तर अगदी शब्दशः आहे... घासाघीस करणं... पण 'साराभाई vs साराभाई' मालिकेमधल्या माया साराभाईच्या शब्दांत सांगायचं तर. 'घासाघीस is just too middle class... say bargaining.'

हं....तेच ते !! Bargaining करणं... मला अगदी मनापासून आवडतं ! आणि म्हणूनच मला शक्यतो मोठमोठ्या मॉल्समधे जाऊन खरेदी करायला फारसं आवडत नाही. जर खरेदीची खरी मजा अनुभवायची असेल तर शहरातल्या local market मधे जाऊन, दहा दुकानं फिरून, वस्तूंचे भाव compare करून आणि शेवटी - ज्या दुकानात सगळ्यात स्वस्त भाव असतात तिथे जाऊन ...दुकानदाराशी गप्पा मारता मारता घासाघीस करण्यात जी मजा आहे ती वर्णनातीत आहे.

फक्त या 'बार्गेनिंग' चे स्वतःचे असे काही अलिखित नियम आहेत. आणि 'अलिखित' असल्यामुळे साहजिकच ते कोणाकडून शिकून घेता येत नाहीत. ते जात्याच असायला लागतात तुमच्या अंगी. सगळ्यात पहिला नियम म्हणजे- निर्लज्ज आत्मविश्वास... एखाद्या वस्तूची दुकानदाराने सांगितलेली किंमत ही नेहेमीच अवाजवी प्रमाणात जास्त असते हे गृहीत धरून,त्याच्या किमतीच्या एक चतुर्थांश आकडा आत्मविश्वासाने आणि तितक्याच निर्लज्जपणे सांगता यायला हवा - चेहेऱ्यावर कमालीचा शांत आणि सहज भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. इंग्लिश मधे 'with conviction' का काय म्हणतात ना- नेमका तोच भाव!

आता दुसरा नियम- एकदा आपण किमतीचा एक आकडा सांगितला की मग त्यात कोणताही बदल करायचा नाही. दुकानदार काहीही म्हणाला; त्याने कितीही प्रलोभनं दाखवली तरीही आपण आपला मुद्दा सोडायचा नाही. आपल्याला घोळात घेण्यासाठी तो बऱ्याच वेळा आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल देखील करून बघतो. पण आपण आपल्या स्थानावरून अजिबात डळमळायचं नाही. आपल्या या अढळ पवित्र्यामुळे शेवटी तो नमतं घेतो.

तिसरा अतिशय महत्वाचा नियम - मोलभाव करताना दुकानदाराशी कधीही खोटं बोलायचं नाही. ' त्या समोरच्या दुकानात इथल्या पेक्षा स्वस्त मिळतंय ' ; किंवा - ' मागच्या वेळी तुमच्याच दुकानात कमी किमतीत मिळालं होतं ' ... ही आणि अशी धादांत खोटी,बिनबुडाची विधानं कधीही करायची नाही. हे असलं काहीतरी ऐकता क्षणी समोरच्या व्यक्तिसमोर आपलं पितळ उघडं पडतं आणि मोल'भाव' करणारे आपण आपला 'भाव' गमावून बसतो.

आणि आता सगळ्यात महत्वाचा नियम- आपलं सगळं कसब पणाला लावून सुद्धा जर आपण त्या विक्रेत्याला पटवण्यात (म्हणजे पटवून देण्यात) अयशस्वी ठरलो; तर आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षांवर पाणी सोडून , निःसंग होऊन तिथून निघून जाता यायला हवं..आणि तेही ताठ मानेने, आपल्या चेहेऱ्यावरचं विजयी हास्य तसंच कायम राखत! आपल्या या अशा पवित्र्यामुळे समोरचा पक्ष साशंक होऊन कमकुवत पडतो आणि मग त्याने आपल्याला परत बोलावण्याची शक्यता शतपटीने वाढते.

माझ्या या तथाकथित छंदाच्या बाबतीत माझ्या घरच्यांच्या मिश्र प्रतिक्रिया असतात. म्हणजे जेव्हा मी माझ्यासाठी एखादी वस्तू घेताना घासाघीस करते तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर एकाच वेळी लाज, वैताग, कंटाळा आणि काहीसा उद्वेग अशा हावभावांची रांग लागते. पण जेव्हा त्यांना एखादी वस्तू खरेदी करायची असते तेव्हा मात्र अगदी प्रेमाने आणि आदराने मला पाचारण करण्यात येतं ; अगदी अजिजीने, काकुळतीला येऊन मला विनंती करण्यात येते - ' प्लीज, बघ ना किमतीत काही कमी होतंय का ते?'

यावरून एक मजेशीर किस्सा आठवला. आम्ही एकदा बाहेरगावी फिरायला गेलो होतो, तेव्हा तिथल्या एका प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळाजवळ असलेल्या स्थानीय दुकानांत खरेदी करत होतो. मी माझी बार्गेनिंग साठी लागणारी सगळी अस्त्र-शस्त्र पाजळून त्या दुकानदारा बरोबर चार हात करायला तयारच होते. आणि नेहेमीप्रमाणे मी विजयश्री खेचून आणली होती. पण या क्षेत्रातली माझी मातब्बरी बघून तिथे जवळच उभा असलेला एक विदेशी तरुण चांगलाच प्रभावित झाला आणि माझ्या जवळ येऊन म्हणाला,"माझ्या या सगळ्या वस्तूंची पण योग्य किंमत सांगता का मला? म्हणजे मी त्याप्रमाणे पैसे देईन." अर्थात मी त्याचेही बरेच पैसे वाचवले त्या दिवशी... माझं कर्तव्यच होतं ते; कारण एकच - 'अतिथी देवो भव'!

तर अशाप्रकारे माझ्या घासाघीस करण्याच्या छंदाचा महिमा देशोदेशी जाऊन पोचला आहे.

आता सुरुवातीला म्हटल्याप्रमणे माझ्या दुसऱ्या छंदाबद्दल थोडंसं -

सध्या माझी गृहकार्य मदतनीस (योग्य व्यक्तीला योग्य शब्दांतच मान द्यायला पाहिजे ना!) रजेवर असल्यामुळे घरातली सगळी कामं आता officially माझ्या खात्यात आली आहेत.... म्हणजे आधी सुद्धा यातली 'तिची' कामं सोडली तर बाकीची सगळी कामं मीच करत होते ; पण ते कटू सत्य आता घरच्यांना मान्य करावंच लागतंय ! या सगळ्या वाढलेल्या कामांत माझं आवडतं काम म्हणजे 'भांडी घासणं' !!!

ही आवड काही जन्मजात नाही बरं का.... किंवा मला अगदी भांडी घासण्याचं व्यसन आहे असंही नाही. पण 'हालात इन्सान को सब कुछ सिखा देते हैं।' - या वाक्यातलं सब कुछ म्हणजे माझ्यासाठी 'भांडी घासणे' .....

लग्नानंतर नवऱ्याच्या वारंवार होणाऱ्या postings मुळे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राहायची संधी मिळाली... अगदी देशाच्या काना कोपऱ्यात जाऊन राहून आले. लोहितपुर सारख्या ठिकाणी तर फक्त आमची आर्मीची कॉलनी सोडली तर दूर दूर पर्यंत मनुष्य वस्ती देखील नव्हती. बसोली, जंगलोट यांसारख्या गावांत... एवढंच कशाला अगदी देहरादून सारख्या शहरात राहिल्यानंतर तर माझा असा (गैर)समज झाला होता की -' घरातले समस्त नळ हे स्वतःच्या मर्जीचे मालक असतात. चोवीस तास पाणी देणं हे त्यांच्या 'शान के खिलाफ' असतं. त्यांना फक्त ठराविक वेळीच पाझर फुटतो; दिवसाच्या उरलेल्या वेळात ते सगळे नळ ही एक शोभेची, गृहसजावटीची वस्तू असते' ... आणि माझ्या या समजुतीवर शिक्कामोर्तब झालं ते सिकंदराबाद ला पोस्टिंग झाली तेव्हा! सिकंदराबाद सारख्या इतक्या मोठ्या शहरात असूनसुद्धा माझ्या घरातल्या एकाही नळातून पाणी यायचं नाही....त्यामागची कारणं खूपच टेक्निकल होती... पण त्यामुळे माझ्या तोंडचं पाणी मात्र पळालं होतं.

वेळोवेळी आणि जागोजागी भेडसावणाऱ्या या पाण्याच्या प्रश्नामुळे माझ्या घरी भांडी घासायला कोणी तयार व्हायचं नाही.

त्यामुळे माझ्यासमोर आत्मनिर्भर होण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. पण मी जरी नाईलाजास्तव हे काम करायला सुरुवात केली असली तरी हळूहळू मला त्यात मजा यायला लागली...

सुरुवातीला मी अगदी यांत्रिकपणे हे काम करत होते. काहीशा निरिच्छेनेच समोर पडलेला तो भांड्यांचा ढीग घासून पुसून हातावेगळा करत होते. पण मग हळूहळू माझ्याही नकळत 'भांडी घासणं' हे माझ्यासाठी एक क्षुल्लक काम न राहता एक अतिशय अभ्यासपूर्वक असा stress buster उपक्रम सिद्ध झाला.

आणि ही अशी स्वच्छ, चकचकीत झालेली भांडी जेव्हा मी एकावर एक नीट रचून ठेवते ना तेव्हा तर त्यांचा तो झगमगाट बघून मला अगदी एखाद्या आईनेमहालात उभी असल्याचा भास होतो.अग मी पण त्यातली एक ताटली उचलून तिच्यात दिसणारं माझं रूपडं न्याहाळत म्हणते,"ये बर्तन है या दर्पन!!"

तसं पाहिलं तर किती साधं आणि सोप्पं काम आहे हे . अगदी कोणालाही जमेल असं ....त्यासाठी कोणत्याही प्रकारचं खास प्रशिक्षण वगैरे काहीच लागत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी कुशलतेच्या बाबतीत अगदीच क्षुल्लक वाटणारं हे काम मला मात्र बरंच काही शिकवून गेलं. आणि मीदेखील अगदी एकलव्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सगळं ज्ञान आत्मसात करून घ्यायला सुरुवात केली.

मला मिळालेली सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे - प्रत्येक भांडं जसं इतरांपेक्षा वेगळं असतं, तशीच त्याला हाताळण्याची, घासून पुसून लख्ख करण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारे श्रमही तितकेच भिन्न असतात. आपल्या मनासारखी स्वच्छ्ता हवी असल्यास कधी एखादा हलका, प्रेमळ स्पर्श ही पुरेसा असतो; तर काही वेळा जरा जास्त जोर लावावा लागतो. एखाद्या भांड्याच्या हट्टीपणाला धडा शिकवण्यासाठी कधी गरम पाणी वापरावं लागतं; तर कधी घासणीने त्याच्या सर्वांगाचं मर्दन करावं लागतं. आणि या सगळ्या क्लृप्त्या हळूहळू, सवयीने आत्मसात करून घेता येतात.

आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांचं आणि त्यांच्यबरोबरच्या आपल्या नात्यांचं देखील असंच काहीसं असतं, नाही?

आणि म्हणूनच मला वाटतं की 'भांडी घासणे' हा छंद जोपासला तर प्रत्येकाला त्यातून काही ना काही फायदाच होईल...

थोडक्यात काय, तर माझ्या या दोन्ही छंदांमुळे माझा फायदाच झाला आहे... पहिल्या छंदामुळे माझे (आणि पर्यायाने माझ्या नवऱ्याचे) पैसे वाचतात ...आणि दुसऱ्या छंदातून मिळालेल्या शिकवणी मुळे माझे इतरांशी जोडलेले नातेसंबंध वाचतात!

पण तुम्हाला म्हणून सांगते हं... आणि तेही अगदी मनापासून... हे नातेसंबंध जोडताना मात्र मी माझा पहिला छंद पूर्णपणे विसरून जाते.

हो ना...नात्यांत आणि प्रेमात - no bargaining!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

A man will pay $2 for a $1 item he needs.
A woman will pay $1 for a $2 item that she doesn't need.
सौजन्य: आंतरजाल

घासाघीस करणे हे माझे काम नाही. हा स्वभाव मुळातच अंगी असायला लागतो. तो बाहेरून पाहून शिकता येत नाही. माझी बहीण मात्र अगदी माझ्या उलट. वर म्हणल्या प्रमाने २०० रु चि वस्तु ५० रु पासुन सुरु करणार आणि ६५ ते ७० पर्यन्त घेणार. मी बरेचदा तिच्यासोबत खरेदिला गेले कि भाव करताना दोन पावल मागेच थांबते, जणू काही मि ह्या व्यक्तिबरोबर नाहिचमुळी. कारण एकदम एवढी कमी किमत सांगणे हे झेपतच नाही मनाला.
पर्यटन स्थळी घासाघीस करूनही वस्तू घेऊन नये. हे मात्र अगदी खर.

आमची आई जेव्हा घासाघि‍सीत तिचा पहिला आकडा सांगायची, तेव्हा आता धरणी दुभंगली तर बरं असं वाटायचं. पण जरा वेळाने ती खरंच तिला हव्या त्या किमतीत वस्तु मिळवायची.

छान लेख आणि विषय Happy

पर्यटन स्थळी घासाघीस करूनही वस्तू घेऊन नये
...
अगदीच!
एकदा गोव्याला गेले असताना माझ्या बायकोने म्हणजे तेव्हाच्या गर्लफ्रेंडने ७०० रुपयांचे कानातले रिंग जे हिमालयातील चमकणाऱ्या दगडांपासून बनवले होते ते फक्त ३०० रुपयांना मिळवले. कौतुकाने मला सांगू आणि दाखवू लागली. मी बर्र म्हटले. मग नंतर बसमध्ये आलो तर कळले त्याच माणसाकडून त्याच प्रकारचे सेम कानातले तिच्या स्टुंडंटनी तब्बल ३० रुपयांना घेतले होते. माझी हसून हसून पुरेवाट Lol

पुढे माझ्या मनाचा मोठेपणा म्हणा वा धाडस म्हणा. तरीही त्याच मुलीशी लग्न केले Happy

एक काळ होता मला पण भारी गंमत वाटायची bargaining करताना. हिरीरीने करायचे, फॅशन स्ट्रीट आणि दादरच मार्केट इकडे त्यांना बार्गेनिंग अपेक्षितच असतं किंवा तेव्हा तरी असायचं.

एकदा माझा नवरा म्हणाला, " का उगाच छोट्या छोट्या विक्रेत्यांशी हुज्जत घालता. त्यांना असा कितीसा नफा होतो ?"
मग मी पण चढवलं "अरे ते स्किल असतं .. "
"एव्हढं तुमच्याकडे स्किल आहे तर मॉल्स मध्ये वापर ना. ते दाम दुपटीने नफा कमावतात आणि भरमसाठ किमती पण लावलेल्या असतात, ", तो

मुद्दा विचार करण्यासारखा होता.

काही दिवसांनी एका मॉल मध्ये गेले तेव्हा आमचं संभाषण आठवलं. ती सेल्सगिरील बरच काही माझ्या गळ्यात मारतच होती म्हंटल बघूया खर्च स्किल आहे का ते. आणि "मी एव्हढा सगळं घेत्ये काही तरी डिस्काउंट दे " मी खडा टाकून बघितला.
तिने एक दोन मिनिटं विचार केला आणि खरोखरच मला सूट दिली, अजून एक काही गोष्ट कॉम्पलीमेंटरी दिली.

सो इट वर्क्स Bw

चित्रांची किंमत ही ठरवणे अवघड असते. तरीही तुम्ही कोणत्या आयोजित गटाबरोबर किंवा स्वतः: जाता यावर विकणारे किंमत चढवतात. बुंदी (कोट्याजवळ, राजस्थान) येथे चित्रकाराने एका दहा x आठ इंच चित्रांची किंमत "दोन हजार फारिनरसाठी आहे पण तुमच्यासाठी दोनशे रु आहे" म्हणाला.

लेखातला भांडी घासयचा पार्ट मी अर्धाच सोडला.. ज्या गावाला जायचेच नाही त्याचा ईतिहास भूगोल वाचाच कश्याला.. बिलकुल जमत नाही मला ते काम. कपडे धुणेही. तरी ते नाईलाजाने धुतलेय एकेकाळी .. भांड्यांमध्ये मात्र चहा घेतानाही गाळण्या किचन सिंकमध्ये असतील तर कोणाचे तरी पाय धरावे लागतात ती धुवून द्यायला..

लेख नेहमीप्रमाणेच छान, ओघवता बोलका. आणि शेवटी अगदी तरल भाव व्यक्त केलेत.

>> "एव्हढं तुमच्याकडे स्किल आहे तर मॉल्स मध्ये वापर ना. ते दाम दुपटीने नफा कमावतात आणि भरमसाठ किमती पण लावलेल्या असतात"
+१११
हे स्कील असते हे मात्र खरे. आपल्याला गरज नाही असे दाखवणे हे इथे खूप महत्वाचे असते. पण छोट्या दुकानदारांकडे बार्गेनिंग करणे मलाही योग्य वाटत नाही. त्यापेक्षा स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना किंवा कंपनीत प्रोजेक्ट बिडिंग किंवा तत्सम मोठ्या कामांत मात्र हे स्कील कामी येते.

मस्त लिहीलंय.
भांडी घासण्यासाठी डिश वॉशर घेऊन मोकळे व्हावे.

छान लेख. मी पण मिस केला होता.
छोट्या दुकानदारांकडे बार्गेनिंग करणे मलाही योग्य वाटत नाही. >>> माझा तो प्रांत च नाही.. भाजी वाल्यांशी तर मी मुळीच बार्गेन करत नाही..मेहनती असतात, फारसे पैसे सुटत नाहित त्यांना.
बिलकुल जमत नाही मला ते काम>>> भांडी घासण्यात न जमण्या सारखे काहीच नाही, आउटसोर्स करण्या सारखे आहे म्हणुन जमत नाही म्हणुन एखाद्या ला मोकळे होता येते. बॅचलर एकटे राहणार्या ला करावेच लागते.

लेख आवडला. किंमतीची घासाघीस जमत नाही कधीकधी घाबरत घाबरत फुटकळ कमी करते तेव्हा दुकानदारांनाही वाईट वाटते व ते कमी करतात. भाजीवाल्यांशी कधीच नाही त्यामुळे नेहमीचे असले तर तेच रास्त भावात देतात.

भांडी घासायला छान जमते आणि सिंकमधील भांडी संपून जेव्हा सिंक व ओटा स्वच्छ होतो तो आनंद काही वेगळाच. पण आता डिशवॉशरच वापरते.

मस्त लिहिलं आहे.
किमतीची घासाघीस काही जमत ही नाही आणि आवडत ही नाही. एक रुपया नसेल सुट्टा तर राहू दे काकू अस दुकानदाराने म्हटलं तरी शोधून शोधून रुपया त्याला दिल्याशिवाय चैन नाही पडत.
दुसरी घासाघीस मात्र खुप आवडीची. इतकी की एक अख्खा लेख लिहिलाय त्यावर.

निमिता, माझ्या प्रतिसादात लिहिलेल्या निळ्या रंगातील " एक अख्खा लेख " ह्या वर क्लिक करा म्हणजे माझा लेख ओपन होईल.