उमलून आले पुन्हा... प्रेम हे

Submitted by प्रथमेश काटे on 16 April, 2023 - 08:33

उमलून आले पुन्हा..
प्रेम हे !

" वंदना अगं झाला की नाही डबा ? "

हॉलमधून, ऑफिसला निघण्याच्या घाईत असलेल्या अनिलने मोठ्याने विचारलं. अर्थात पत्नी पर्यंत आवाज पोहोचावा म्हणून ; पण आता त्याच्या आवाजात किंचित रागही जाणवत होता.

" हो हो झालं." वंदना किचन च्या दरवाजाकडे बघत उत्तरली. तिच्या हालचाली चपळाईने सुरू होत्या. चेहऱ्यावर अगदी प्रसन्नता, उत्साह वैगेरे नसला, तरी सकाळप्रमाणेच तो टवटवीत होता, मात्र कपाळावर जमा होऊ लागलेले घामाचे थेंब, आणि काहीसा जलद गतीने होणारा श्वासोच्छवास, यांवरून तिला थकवा आला असावा हे जाणवत होतं. अशात एकदम त्याचा चिडलेला आवाज कानावर पडला. तिने उत्तर दिले तेव्हा तिचा आवाज शांतच होता. त्यात काहीशी दिलगिरी होती. तिच्या मनात जरासा राग, वा नाराजी आली असेलही, तरी ती कळून येत नव्हती.
हॉलमध्ये, अनिलच्या चेहऱ्यावर मात्र जराशी खिन्नता, अपराधीपणाची भावना आल्यासारखी दिसत होती. खरंतर त्याला बिलकूल रागावायच नव्हतं. तो कुणावरही एवढ्या तेवढ्यावरून चिडत नसे ; पण आता वेळच अशी होती. ऑफिसमध्ये सध्या महत्वाच्या प्रोजेक्ट वर काम सुरू होतं. आणि आज काही न काही कारणाने निघायला उशीर होत होता. आता अजून त्याचा टिफीन तयार नव्हता. तो बराचवेळ - अर्थात त्याच्या मते, कारण त्याला ऑफिसला निघण्याची घाई होती - हॉलमध्ये बसून होता. दोन तीन वेळा वंदना ला आवाज देऊन झाल्यानंतर त्याच्या आवाजात काहीसा त्रासिकपणा उमटला होता. वंदनाची कुठलीही चूक नाही, किचनमध्ये एकाचवेळी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी सांभाळायला लागत असणार, हे त्याला समजत होतं ; पण शेवटी त्याचाही नाईलाज होता.

मिनीटभराने वंदना घाईघाईने किचनमधून हातात टिफीन घेऊन बाहेर आली. तसा तो खुर्चीवरुन उठून पुढे झाला‌.

तिने अनिलच्या हातात टिफीन दिला.

" येतो हं." तो कसंनुसं हसू ओठांवर आणत म्हणाला.

तिने काही न बोलता, कोऱ्या चेहऱ्याने होकारार्थी मान हलवली. तिच्या कोरड्या प्रतिक्रियेने ओसरू लागलेलं हसू तसेच ठेवण्याचा प्रयत्न करून तो आपल्या टीव्ही बघत बसलेल्या वडिलांना, आणि हॉलमध्येच काहीतरी आवराआवर करणाऱ्या आईला म्हणाला -

" आई बाबा येतो."

" होय होय." आई - वडील दोघेही हसून निरोप देत म्हणाले

तो दरवाजातून बाहेर पडला. चेहऱ्यावरची खिन्नता कायम होती. राहून राहून आपला चढलेला आवाज, वंदनाचा गंभीर ( उतरलेला?) चेहरा त्याला आठवत होता. मनाला चुटपुट लागून राहिली होती.
वंदना रागावली असेल का ? की तिला वाईट वाटलं असेल ? ती दुखावली असेल का ? असे विचार मनात घोळत होते. काय करायला हवं ? तो विचार करू लागला. अन् एकदम त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. खिन्नता, गोंधळ जाऊन त्यावर आत्मविश्वास दिसू‌ लागला. त्याने आपल्या मनाशी काहीतरी निश्चय पक्का केला होता.

•••••••

सात वर्षांपूर्वी वंदना व अनिलचं लग्न झाले होते. अनिल अगदीच हॅंडसम वैगेरे जरी नाही तरी रूबाबदार आणि डॅशिंग पर्सनॅलिटीचा होता. वंदना ही फारच मोहक नाही तरी खूप नीटस, उजळ रंगाची काही क्षणातच पाहणाऱ्यावर छाप पडेल अशीच होती. तसं दोघांचं अरेंज मॅरेजच ; पण लग्न झालं, आणि मनं फार लवकर जुळली. स्वभाव, विचार सारखेच असणं काही शक्य नाही. या गोष्टी समजण्याइतपत दोघेही परिपक्व होते. मग एकमेकांसोबत वेळ घालवताना, एकमेकांना समजावून घेताना कधी प्रेमात पडले, त्यांचं त्यांनाही कळलं नाही.
सुखाचा संसार सुरू झाला. दोन वर्षांनी त्यांना गोंडस बाळ झालं. दोघेही अजूनच आनंदी झाले. अनिल चे आई वडिल आता थकत चालले होते. त्यांना एकटं ठेवणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनाही घरी बोलावून घेतलं. शिवाय बाळालाही आजी आजोबांचं प्रेम मिळणार होतं.
बाळाचं करण्यात ती व्यस्त होऊ लागली. शिवाय आता त्यांचा दोघांचाच, राजा राणीचा संसार राहिला नव्हता. पहिल्या सारखी privacy नव्हती. हळूहळू त्या दोघांना एकमेकांना वेळ देणं अवघड होऊ लागलं. पण त्या दोघांनी ही गोष्ट फार मनावर घेतली नाही. थोड्याच काळाचा प्रश्न.. एकदा मुलगा मोठा झाला की झालं. असा विचार दोघांनी केला. मात्र मुलगा दोन वर्षांचा होऊ लागला, आणि अनिलच्या आईने दुसऱ्या नातवाचा आग्रह सुरू केला.‌ एकाला दोघं असलेले चांगले, असं त्यांचं म्हणणं होतं. वंदनालाही ते पटलं. मुलासोबत एखादी गोड मुलगी झाली तर त्यालाही त्यात आनंदच होता.

यथावकाश वंदनाची कूस पुन्हा उजवली. मुलगी झाली. पुन्हा आनंदी आनंद. मग वाढलेल्या responsibility ची जाणीव. आता तर वंदनाचा सर्व दिवस घरकाम आणि मुलं यांच्यातच जाऊ लागला. अनिल ही नोकरीत हळूहळू प्रगती करत होता. वाढत्या प्रगतीबरोबर जबाबदारी ही वाढू लागली होती. हळूहळू त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागला होता. दोघांनीही हे समजत होतं ; पण यालाच कदाचित बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत संसार करणं म्हणत असावेत, असा विचार करून दोघेही दिवस ढकलत होते.

पण हा दुरावा, बोलण्या वागण्यात निर्माण होऊ लागलेला संकोच हे सगळं त्याला आता असह्य होत चाललं होतं. - तिलाही होत असेल ; पण स्त्रीसुलभ संकोचाने ती आपल्या मनातील भावना दाबून धरत असेल. - त्याच्या मनात विचार आला. आता आपणच पुढाकार घेऊन काही करायचं त्याने ठरवलं होतं.

•••••••

" टिंगsटॉंssग.... टिंगs टॉंssग.... "

दरवाजा उघडला गेला ; आज अनिल अगदी हसऱ्या चेहऱ्याने, आणि जणू कसल्याशा तयारीने उभा होता ; पण दरवाजा आईने उघडल्याचं पाहताच त्याचा जरासा हिरमोड झाला. चटकन " वंदना कुठेय.." असं तो विचारणारच होता ; पण त्याने ओठांवरचे शब्द मागे घेतले. ते बिलकुल बरोबर दिसलं नसतं. त्याचा काहीसा बदललेला रागरंग काही त्याच्या आईला लक्षात आला नाही.
अनिल सर्वप्रथम आपल्या खोलीत जाऊन, फ्रेश होऊन बाहेर आला. आई कसलंसं कापड शिवत हॉलमध्ये बसली होती. ती काम हातावेगळं केल्याशिवाय उठणार याची त्याला खात्री होती. मुलं यावेळी खेळायला गेली असणार हे त्याला ठाऊकच होतं. बाबांबद्दल सहजपणे विचारल्यावर ते जवळच्या मित्राकडे असल्याचं समजलं. एवढा सगळा अंदाज घेतल्यावर त्याने आपला मोर्चा थेट किचन कडे वळवला.
वंदना नेहमी प्रमाणे किचन ओट्याजवळ उभी राहून काहीतरी कामात गढली होती. क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने बघून तो हलक्या पावलांनी पुढे आला. पाठीमागे लपवलेला हात त्याने पुढे आणला. त्यात पांढऱ्याशुभ्र, सुंदर फुलांचा गजरा होता. अनिलने हळूवार हाताने तो गजरा वंदनाच्या काळ्याभोर, दाट केसांत माळला. तशी वंदना जराशी दचकून मागे वळाली. दोघांची नजरानजर झाली. अन् दोघांच्याही ओठांवर खुदकन हसू उमटलं.

" काय रे हे ? " ती नवलाने म्हणाली. " आज एकदम पूर्वीच्या काळातील मूव्हीतल्यासारखा रोमॅंटिक अंदाज.."

" अरे हो. फारच जुनी, टिपीकल स्टाईल आहे नाही." त्याचा चेहरा खर्रकन उतरला. ते पाहून तिला उगाचच काहीतरी बोलून गेल्यासारखं वाटलं. ती पटकन म्हणाली -

" कम ऑन. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत जुनी असो वा नवी. ती genuine असली पाहिजे हे महत्त्वाचं. आणि तुझं प्रेम किती खरं आहे, किती genuine आहे हे मला चांगलं ठाऊक आहे."

तिच्या या शब्दांनी तो पुन्हा आनंदित झाला.

" सॉरी वंदू."

" सॉरी ? कशासाठी ? "

" सकाळी तुझ्यावर उगाचच आवाज चढवला. तुला इतकी कामं असतात. एकाचवेळी दहा कामं सांभाळायची असतात. मी हे समजून घ्यायला हवं. ते सोडून..."

" अनिल. तु माझ्यावर नेहमी विनाकारण ओरडतोस का ? नाही. सध्या तुझ्या खांद्यावर नव्या प्रोजेक्टची जबाबदारी आहे. त्यात आज कामावर जायला उशीर झाल्यामुळे तुझी जरा चिडचिड झाली एवढंच. एवढं मनाला नको लावून घेऊस."

" वंदू गेल्या काही दिवसांपासून आपल्याला एकमेकांसाठी वेळच देता येत नाही ना ? "

" हो रे.‌ पण आता त्याला इलाज नाही नं. थोडं कॉम्प्रोमाइज करायलाच हवं.''

" नाही वंदू. अजून आपलं वयच काय आहे ? आपण एकमेकांसोबत छान वेळ घालवला पाहिजे. खूप हिंडलं फिरलं पाहिजे. लाईफ एन्जॉय केलं पाहिजे." अनिल वंदनाचा हात पकडून म्हणाला.

" हो पण.."

" नाही वंदू... काहीतरी जमायला पाहिजे गं. "

त्यांचं असं बोलणं सुरु असतानाच अनिलच्या आई एकदमच किचनमध्ये आल्या. तसे दोघेही एकमेकांपासून थोडे दूर सरले. आत येताच अनिलच्या आई म्हणाल्या -

" अनिल, वंदना अरे आपली अनिता आलीय ना मलेशियाहून, ती आणि तिचे मिस्टर सारखा आग्रह करत आहेत, की एकदा भेटून जा म्हणून. विचार करतीये एकदा जाऊन यावं. मुलांचीही फार इच्छा आहे आपल्या आत्याला आणि तिच्या बाळाला भेटायची. त्यांनाही घेऊन जावं म्हणते."

अनिता म्हणजे अनिलची एकुलती एक, धाकटी बहीण. लग्न झाल्यानंतर मलेशियात नवऱ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्थायिक झाली होती‌.

आईचं बोलणं होताच अनिल आणि वंदनाने क्षणभरच एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांत अस्पष्टसा उमटलेला आनंद त्यांनाच जाणवला."

" अरे काय विचारतीये मी." अनिलच्या आई आवाज थोडासा वाढवून म्हणाल्या. तसे दोघेही भानावर आले.

" अं.. हो हो आई. अहो त्यात विचारायचं काय ? खुशाल जाऊन या." वंदना हसून म्हणाली.

" हो. निश्चिंतपणे जाऊन या." अनिल.

" आणि मुलं आज माझ्यापाशीच झोपायचा हट्ट करत आहेत."

" अच्छा. झोपू दे की." वंदना

अनिलच्या आई बाहेर गेल्या. वंदना भुवया उंचावून थट्टेच्या सुरात म्हणाली -

" कुणीतरी एकदम खुशीत आलेलं दिसतंय. अं ? "

" अच्छा म्हणजे तुला नाही आनंद झाला का ?" अनिल हळूहळू तिच्या दिशेने पुढे पुढे येत म्हणाला.

" अनिल... आई परत आल्या तर." वंदना लटक्या रागाने म्हणाली.

किचन बाहेर पडलेल्या अनिलच्या आईच्या ओठांवर मिष्किल हसू उमटलं. परदेशातून येणाऱ्या मुलीच्या आमंत्रणाला नकार द्यावा की काय, असा त्यांचा आधी विचार होता खरा - तसं काही नकारामागे काही खास कारण नव्हत. फक्त जरा संकोच.- पण मघाशी किचनमध्ये येताना त्यांना मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकू आलं होतं. तेव्हाच त्यांनी मनाशी ठरवलं होतं की मुलीला येत असल्याचं कळवून टाकायचं. स्वतःशीच मान हलवीत त्या हॉलमध्ये परतल्या.

समाप्त
@ प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथेचा विषय आणि लेखनाचा बाज हा माहेर, स्त्री, मनोहर, अलका अशा अंकांमध्ये नियमित लिहिणार्या एखाद्या लेखिकेचा वाटतो. प्रथमेश हा स्त्रीआयडी असावा असा संशय आला.
कथा छोटीशीच पण गोड आहे.

feel good story!
इथे माबो वर असे विषय नसतात हे एक निरीक्षण. अशी मधेच एखादी छोटी कौटुंबिक मध्य मवर्गीय गोष्ट वाचायला छान वाटलं.