रक्त..!

Submitted by संप्रति१ on 19 March, 2023 - 10:19

'रक्त'

संजूबाबा, डिनो मारिया, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन.
शिवाय बिपाशा, नेहा धुपिया, अमृता अरोरा, पायल रहतोगी...! चार हिरो, चार हिरॉईनी..! प्रेमाचे बहुविध आणि कॉंप्लीकेटेड अष्टकोन..! शिवाय थ्रिलर, हॉरर, मर्डर- मिस्ट्री, बालसंगोपन आणि सायकोथेरपी..! असं साधारण पॅकेजचं स्वरूप.

इ.स. २००४ मध्ये हा चित्रपट आला आणि समजा काळाच्या शांत प्रवाहात एक खडा पडला. त्यासंबंधी तेव्हा कुणी काही लिहिलं नाही. अर्थात, घटनेसंदर्भात ताबडतोब असं काही लिहिणं योग्य नसतं, हे मला मान्य आहे. कारण चित्रपटाचा नीट आस्वाद घेण्यासाठी, त्याचा समाजावर काय परिणाम होतो, हे अभ्यासण्यासाठी काळाचा एक मोठा स्पॅन जाऊ द्यावा लागतो..! आपल्यात उमटणारे पडसाद शांतपणे मुरवत रहावे लागतात..! पेशन्स ठेवून वाट बघावी लागते.. याच तत्वानुसार मी १९ वर्षे वाट बघितली. आणि मग कालची संधी साधून चित्रपटात प्रवेश केला.

तर ह्यात बिपाशाला दिव्यदृष्टीचं वरदान मिळालेलं आहे. म्हणजे भविष्यात घडणारं आधीच दिसतं तिला. ह्यावर आपला विश्वास बसणार नाही. हरकत नाही. सुरूवातीला ते एक डेमो दाखवतात.

म्हणजे पायल आणि बिपाशा रस्त्याने चाललेल्या असतात.. तेवढ्यात बिपाशाला कसलासा करंट बसतो..! डोळे वगैरे पांढरे होतात..! शिवाय शॉर्ट-सर्किट झाल्यासारखं बॅकग्राऊंड म्युझिक...! बिपाशा ओरडून पायलला इशारा देते की एक पाऊलसुद्धा पुढे टाकू नकोस.! आणि मग झाडाची एक फांदी पायलच्या पुढ्यात कोसळते..!
पायल थोडक्यात बचावते..! दॅट इज दिव्य दृष्टी..!!

''आता ह्या बचावलेल्या उर्वरित आयुष्याचं मी काय करू?'' असा तात्विक प्रश्न पायल बिपाशाला विचारत नाही. त्यामुळे बिपाशावरही काही उत्तर द्यायची बिलामत येत नाही. बिपाशाचा फोकस क्लिअर आहे.‌ पायलला वाचवणं हे तिचं कर्तव्य..! बाकी मग पायलनं पुढील आयुष्य सत्कारणी लावायचं की बोंबट्या मारत फिरायचं, हा सर्वस्वी पायलचा वैयक्तिक अखत्यारीतला प्रश्न..! तुम्ही-आम्ही त्यात पडू नये.!

"मुझे आज भी याद है वो बचपन की रात.."
ह्या बिंदूवर फ्लॅश बॅक सुरू होतो.‌ बिपाशाला बालपणीच हे दैवी वरदान मिळालेलं असतं. बिपाशाची आज्जीसुद्धा दिव्यदृष्टीच्या क्षेत्रातली अधिकारिणी स्री होती.
परंतु बिपाशाच्या वडिलांना, शिवाजी साटम, यांना काहीही वरदान नसतं. ते तेव्हा फक्त सोफ्यावर निवांत बसून 'द हिंदू' नावाचं वर्तमानपत्र वाचत असत.
(शिवाजी साटमांना पूर्वी युपीएससी चा अभ्यास करताना 'द हिंदू' वाचायची सवय लागली असणार..! ॲन्ड रेस्ट इज हिस्ट्री..!! नंतरचं सगळं तर तुम्हाला माहितीच आहे..! नंतर मग ते परीक्षा यशस्वीरीत्या पास झाले.. आणि मग एसीपी प्रद्युम्न म्हणून सीआयडी मध्ये चिटकले वगैरे..! पण दिग्दर्शक हे सगळं सांगत बसत नाही. तो फिल्म मेकिंग बद्दल गंभीर आहे..! तो फक्त 'द हिंदू' वाचणाऱ्या चाणाक्ष शिवाजी साटमांवर कॅमेरा फिरवतो. दॅट्स इट.)

संजूबाबा एका शाळेचा प्राचार्य आहे. जो डायरेक्टर संजूबाबास प्राचार्य करू शकतो, त्यास ह्या जगात काय अशक्य आहे? म्हणून संजूबाबाने 'राहुल' असं क्यूट नाव धारण केलं आहे.
बाकी मग, बिपाशा दुःखी विधवा आहे..!‌ तिच्या लंडनस्थित नवऱ्याची तिकडेच अपघातात अवतार-समाप्ती झालेली असते. तिला हे दिव्यदृष्टीमुळं दिसलेलं असतं.‌ पण कम्युनिकेशन गॅपमुळे ती त्यास वाचवू शकत नाही. पण हे असे दुर्दैवाचे फटके बसतच असतात आयुष्यात. ते स्वीकारायचे. आणि पुढं चालत राहायचं. दुसरं काय? बिपाशा तेवढी प्रगल्भ आहे जीवनाबद्दल.

सध्या बिपाशा आणि पायलची मुलं संजूबाबाच्या शाळेत शिकतायत‌..!
प्राचार्य असल्यामुळे संजूबाबास बिपाशावर थेट लाईन मारता येत नाहीये. आता ही समजा त्या प्रोफेशनचीच एक अंगभूत मर्यादा म्हटली पाहिजे..!

तिकडे दूर डोंगरात सुनील शेट्टी गॅरेज टाकून बसलेला आहे. त्याच्याकडे फारशी वर्दळ नसते. कारण बिघडलेली गाडी खांद्यावर उचलून एवढ्या लांबच्या गॅरेजमध्ये नेणं तेव्हाच्या लोकांना मान्य नसतं.
सुनीलवर लहानपणी काहीतरी अत्याचार झालेले आहेत. परिणामी मोठेपणी त्याच्या मानसिक आरोग्यात गंभीर बिघाड निर्माण झाला आहे..!
'काल मी खुश होतो. आज मी खुश नाहीये' हाच एक धोशा तो लावून धरतो.
शिवाय वेगाने स्विंग होणारे मूड्सही, त्यास अधूनमधून येणारे संतापाचे तीव्र झटके, आणि काहीच कारण नसताना जागच्या जागी थरथरणे, अशी काही दृश्य लक्षणे आहेत म्हणजे..!

बिपाशा त्याच्या गॅरेजमध्ये गाडी रंगवून घ्यायला जात असते अधूनमधून..! शिवाय त्यास मानसिक आधारही देत असते..!
एकमेव गाडी दुरूस्त करून कंटाळा आला की सुनील चित्रं काढतो.. आपल्याला माहीतच असेल की गॅरेजमध्ये मिस्री लोकांनी एक ऑईलनं माखलेली वही आणि बॉलपेन ठेवलेला असतो. त्यात कस्टमरचा फोन नंबर आणि गाडी नंबर लिहायचा असतो. सुनील त्या वहीत चित्रं रंगवतो आणि बिपाशाला दाखवतो. ती चित्रं त्याच्या मनोविश्लेषणास उपयुक्त असतात.‌ हापण शेवटी एक थेरपीचाच भाग आहे..!

तिकडे हिटलरनं तरूणपणी काढलेल्या चित्रांना कुणी ढुंकूनही बघितलं नाही. आणि मग त्या साचलेल्या रागातून नंतर जे झालं ते सगळ्या दुनियेला सोसायला लागलं.. आपल्यापुढचा धोका थोडक्यात टळला.. कारण २००४ साली सुदैवानं आपल्याकडे बिपाशा होती.. तिनं सुनीलमधला लपलेला कलाकार जाणला.. जोपासला.. त्यास ॲप्रिशिएट केलं. ..! आज मी जेव्हा तो सीन पाहतो, तेव्हा बिपाशाबद्दलच्या कृतज्ञतेनं माझं हृदय गदगद होतं..!ॲन्ड आय होप तुमचंही होईल. व्हायला हवं..! मी आशावादी मनुष्य आहे.

अमृता अरोरा ही त्या दुर्गम शहराच्या महापौराची मुलगी आहे. अमृता संजूबाबाची मंगेदर आहे. शिवाय अमृतास एकाच वेळी पॅरलली इतरही नायकांना प्रेमाचा प्रसाद वाटण्याचा छंद जडलेला आहे.
अमृता थोडीशी संगीतकारही आहे..! त्यामुळे आता अमृताचा म्युझिक अल्बमही रिलीज करावा लागतोय..! शहरातील झाडून सगळे प्रतिष्ठित नागरिक फुकट पार्टीच्या वासाने जमलेलेयत..! आणि अमृताचे वडील त्या प्रसंगी 'होनेवाला दामाद'ला जमलेल्या तमाम रिकामटेकड्यांसमोर इंट्रोड्यूस करून देतात..! आणि आपला जावई संजूबाबा आगामी महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही उरकतात..! एक तीर, तीन निशाण..!

तिथेच आडबाजूला संजूबाबा बिपाशाला म्हणतोय की तुम खुबसुरत हो..!
मग बिपाशा संजूबाबाला म्हणतेय की अमृता अरोरा खुबसुरत है..!
मग तिथे अमृता प्रकटतेय. संजूबाबा तिला विचारतोय की तुम तो बिपाशा को जानती ही हो ना ??
अमृता म्हणतेय की, 'हां. बिपाशा तुम खुबसुरत हो.'
और इस प्रकार बडी खुबसुरती के साथ डायरेक्टर पांच मिनट का रील यहाँ उडा देता है.

तिकडे डिनो मारिया नेहा धुपियावर रोज कौटुंबिक हिंसाचारांचे नवनवीन आविष्कार सादर करत असतो.. कोणतंही वाक्य बोलण्याच्या आधी, वाक्य निम्मं झाल्यावर आणि वाक्य पूर्ण संपल्यावर डिनो निर्हेतुक खिंकाळतो..! त्याला तशी सवय असते..! आणि मीसुद्धा सायको असल्याचं सगळ्यांना कळावं, हापण एक उद्देश..! बाकी, हा स्वैर इसम जगण्यासाठी काम काय करतो, हा नेमका मुद्दा लोंबकळताच आहे..!

तर नेहासुद्धा बिपाशाची पेशंट असते..! डिनो मला मारतो, तर आता मी काय करू, ही तिची मुख्य तक्रार..!
एकदा तिथे एक छलमाड पोलिस इन्स्पेक्टर येतो..!
''नवरा- बायकोच्या भांडणात नाक खुपसणं तुला शोभत नाय, बिपाशा'', असा गजब डायलॉग मारून निघून जातो..!

बिपाशाची दिव्य दृष्टी हाच यातला क्रक्स आहे.
घटनांची, संवादांची सगळी ठिगळं तिच्या दिव्यदृष्टीभोवतीच नृत्य करतात.. परंतु शेवटी डायरेक्टर हे सगळं गाठोडं मस्तपैकी शिवून टाकेलच.. आणि त्यात काही गैर असं नाही.

गावात समजा पूर्वी असा एखादा ज्ञानी मनुष्य असायचा.. एखादं पोरगं घराला वैतागून पळून गेलं की हा ज्ञानी माणूस मार्गदर्शन करायचा.. डोळे बंद करून सांगायचा की पोरगं उत्तर दिशेला गेलं किंवा समजा पूर्व दिशेला गेलं असेल..‌! किंवा समजा इथून मावळतीला चाळीस मैलांवर अमुक हॉटेलात कपबश्या विसळत असेल..! तर आणा त्याला धरून आणि फटकन् लगीन लावून टाका. म्हंजे पुना कुटं पळून जानार नाय..!

बिपाशाच्या प्रोफेशनचा गाभा असाच आहे. फक्त थोडासा सॉफीस्टीकेटेड.. ! ती पत्त्यांची पानं बघून सांगते की कुणाचं काय होईल ते..!

तर इथवर सगळं नीट चाललेलंय. आणि अचानक अमृता गायब होते..! आता ही महापौराची मुलगी. त्यामुळे पोलिस नेहमीप्रमाणेच चप्पा चप्पा छान मारतात. पण उपयोग शून्य..! अरे बापरे..! आता काय करावं? आता अखेरचा उपाय काय?? कोण शोधेल तिला?
बिपाशाच..! आणखी कोण?
तिला दिसतंय सगळं दिव्यदृष्टीतून..!
ते गूढ हॉंटींग वातावरण..! स्रीलींगी भूत, हमखास पांढरे कपडे घालून रात्री भटकावं लागणारं..!
आणि सुनसान जंगलातून निर्जन रस्त्यानं चाललेले डिनो-अमृता..! मध्येच संतप्त होत 'मला इथेच सोडून जा' म्हणणारी हिरॉईन..!
तिथंच मिस्टीक धुक्यात तळ्याकाठी झाडाखाली एक म्हातारा व्हायोलिन वाजवत उभा..! तो सचिन पिळगावकरसारखा दिसतोय, पण तो नाहीये..!

मग नंतर अनपेक्षित दुर्दैवी मृत्यू..‌ किंवा समजा अपेक्षित खून..!
संजूबाबा व्यथित..! संजूबाबा आता नैसर्गिक रूपात प्रकट झालेला आहे. स्वतःचं प्राचार्य असणं त्यालाच पहिल्यापासून खटकत होतं. त्यामुळे तो आता रूबाबदार 'वास्तव' स्टाईलमध्ये केस मागे चोपून मस्त पेग रिचवतोय.
बिपाशा त्यास समजावतेय की बाबा असं तर होतंच असतं म्हणजे..‌! मृत्यू हेच जीवनाचं परमसत्य असल्याचंही कथन करतेय..! आणि बिपाशानं स्वतः ते जाणलंय..! अन्यथा कोण असं अधिकारवाणीनं सांगेल?

ह्याच धामधुमीत तिकडे सुनीलचा आजार टोकाला गेलाय.. आणि त्याने त्याच्या पित्यास मारझोड सुरू केली आहे.. पिता चेहऱ्यावर टोमॅटो सॉस पसरवून विव्हळतो आहे.. छान सूर लागलाय..! आणि सुनीलची माऊली बिपाशास मध्यस्थीसाठी आवाहन करते आहे...!

कित्ती कित्ती बाई कष्ट आहेत बिपाशाच्या जीवास..!!! सारखी दगदग..!! कुणाकुणासाठी काय काय करते ती..!! जीवाची पर्वा न करता धावत असते सतत..!
दिव्य शक्ती मिळालीय म्हटल्यावर हे सगळं करावंच लागत असेल काय..??
की तिनं निस्वार्थी हेतूनं इतरांसाठी आयुष्य वेचण्याची प्रतिज्ञा केलीय ??

बुडती हे जन देखवेना डोळा /
म्हणोनि कळवळा येत असे //

तुकोबांच्या अवस्थेत गेलं की असा कारूण्याचा झरा फुटतो, असं ऐकून आहे..!
पण 'त्या' अवस्थेत जाण्यापूर्वीसुद्धा असं काही होतं का??

हे आणि असे बरेचसे प्रश्न तुमच्या विचारार्थ सोडत आहे.
आणि सध्या हा प्रकार थांबवतो आहे..!
कारण इथं मला नाईलाजाने थोडा ब्रेक घ्यावा लागतोय.
न घेतल्यास मलाही सूक्ष्म झटका येईल, अशी बाकबूक वाटते आहे..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol प्राचार्य, हिंदू, गॅरेज, चित्र काढणं, दिव्यदृष्टी, डिनो, सु शे, काल मी खुष होतो, टोमॅटो सॉस, हिटलर-बिपाशा रेस्क्यू, सचिन पिळगावकर सारखा म्हातारा. सु शेने त्याच्या सगळ्या भावना व्हायब्रेट मोडवर टाकलेल्या आहेत. तुम्ही पण सायको का, समजा.. Welcome to the club...! Wink

धमाल लिहिले आहे. Happy

विपू बघा.

अस्मिता,
तुम्ही पण सायको का, समजा.. >>
आता इथं समजा जाणकारांकडून वेळीच ॲप्रीशिएशन मिळालं तर ठीक..! नाहीतर मग पुढचं काही सांगता येत नाही.. Proud Wink
धमाल लिहिले आहे>>
धन्यवाद वगैरे Happy

वावे,
आभारी आहे. Happy

मस्त लिहिलय द हिंदू Lol
दिनो मोर्या चं काय झालं पुढे? उत्सुकता लागून राहिली हो. असं कसं मधेच सोडता? टप्प्या टप्प्याने लिहा पाहू Wink

मस्त लिहीलंय.
चित्रपट अचूक निवडला कि अशा प्रकारचे जमून आलेले लेख वाचायला मिळतात. पॅरानॉर्मल , सायकॉलॉजिकल आणि इल्लॉजिकल पण बिग बजेट (सिरीयस) असा मामला असला कि चांगला स्कोप राहतो. तुमची शैली शांत आहे. काही वेळा अशा प्रकारच्या चित्रपट - चिरफाड लेखात अनावश्यक आक्रस्ताळेपणा डोकावतो. त्याचा लवलेशही नाही. खुसखुशीत वाक्ये आहेत. पंचेस आहेत.
मजा आणली. पुढचा भाग येऊ द्यात.
अधून मधून हातभार लावूच.

भयाण !!!!! Rofl Rofl आवडले.

तिकडे हिटलरनं तरूणपणी काढलेल्या चित्रांना कुणी ढुंकूनही बघितलं नाही. आणि मग त्या साचलेल्या रागातून नंतर जे झालं ते सगळ्या दुनियेला सोसायला लागलं.. आपल्यापुढचा धोका थोडक्यात टळला. कारण २००४ साली सुदैवानं आपल्याकडे बिपाशा होती. तिनं सुनीलमधला लपलेला कलाकार जाणला. त्यास ॲप्रिशिएट केलं. आज मी जेव्हा तो सीन पाहतो, तेव्हा बिपाशाबद्दलच्या कृतज्ञतेनं माझं हृदय गदगद होतं..!ॲन्ड आय होप तुमचंही होईल. व्हायला हवं..! मी आशावादी मनुष्य आहे.>>>>>>>> Rofl सॉलिड्ड !!!