महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .
पूर्वी मात्र असं नव्हतं . महाराष्ट्रात अनेक छोटे व्यवसाय किंवा रोजगार सुरू असायचे . पोटापाण्यासाठी काम धंदा निवडणारे अनेक लोक होते , तर पारंपारिक काम करणारे असेही होते .अशा रोजगारांची एक मोठी यादी तयार होते . हे रोजगार स्वतंत्र असायचे पण कुटुंब एकत्र येऊनच करायचे . उत्पन्न कुटुंबातील सर्व सदस्यांचे असायचे .खेड्यात- गावात बारा बलुतेदार असायचे ,असे बलुतेदार प्रत्येक गावीच असायचे .शेतकऱ्यांची अधिक महत्त्वाची काम करणारे त्यांच्या नित्याच्या गरजा भागवणारे ते बलुतेदार . गावातील पाटील, कोतवाल ,कुलकर्णी सोडून हे बलुतेदार असायचे . सुतार ,लोहार , चांभार, तेली , कुंभार ,नाव्ही ,सोनार , परीट, गुरव आणि कोळी .
आता एकेकाची काम बघुयात .
कुंभार मातीची भांडी घडवणे ,पिण्याच्या पाण्याचे माठ, रांजण ,घट ,गाडगी, मडकी ,पणत्या , कवेलू इत्यादी तयार करायचे त्यांना भाजून विकायचे . स्वयंपाकाची भांडी तयार करायची ती विकायची . गौरी- गणपतीच्या मुर्त्या तयार करायच्या , दुर्गा देवीच्या मुर्त्या तयार करायच्या आणि त्या विकायच्या . कुंभार सुगडी तयार करायचे संक्रांतीला ती विकायचे . अशा प्रकारे आपल्या घरात येणारी सगळी जी मातीची भांडी होती ती कुंभाराच्या आव्यात तयार होऊन भट्टीत भाजून आपल्यापर्यंत पोहोचत असत . सुदैवाने आजही कुंभार ही कामे करतात . कारण ते काम इतर कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही .
कोळी नदीतून नावेतून प्रवास करवून आणायचे . यांना ढिवर धीवर असेही म्हणतात . समुद्रात शोध घेऊन मासे ,शंख शिंपले शोधून आणणे , माशांवर विविध प्रक्रिया करून ती लोकांपर्यंत नेऊन विकणे अशी काम गावातील कोळी करायचे . त्याशिवाय लहान- लहान गावात नदीच्या पात्रातून पैलतीरी स्वतःच्या नावेतून नेऊन सोडण्याची कामही कोळी करायचे .
गुरव - गुरव हे गावातल्या देवळात पुजारी म्हणून काम करायचे . घरोघरी बेलपत्री पोहोचवण्याचे काम गुरव करायचे .गुरव देवळात गात असत , गुरुवांच्या अनेक पिढ्या देवळात राहात , देऊळ संरक्षणाचे काम देखील करत असत .
चांभार - चांभार गावातल्या मृत जनावरांच्या कातड्यांपासून निरनिराळ्या वस्तू तयार करायचे ते विकायचे . चपला , बूट , कातडी सामानं , मोटं इत्यादी दुरुस्त करायचे नवीन वस्तू तयार करायचे आणि ते विकायचे . आता आपण आपली पादत्राणे शोरूममधून घेतो .
मातंग - मातंग समाज केतकी पासून निघणारा जो तंतू आहे त्याचे दोरखंड तयार करायचे . शिंदीच्या पानांपासून झाडू तयार करायचे . सुपं , टोपल्या ,परडे इत्यादी वेताच्या वस्तू तयार करायचे आणि गावात विकायचे . शुभप्रसंगी हलगी वाजवायचे . इत्यादी कामे मातंग समाज करायचे . आता आपण वरील सगळ्या वस्तू माँलमधे किंवा दुकानात घेतो .
तेली - तेली शेतकऱ्याने दिलेल्या तेल बियांपासून तेल काढून द्यायचे . लाकडाच्या घाण्यावर बैलाला फिरवून शेंगदाणा , जवस , तीळ , करडई , मोहरी , एरंडेल तेल काढायचे. सरकी, ढेप ,पेंड विकणे वंगण विकणे इत्यादी कामे तेली करीत असत . तेलाच्या व्यवसायाशी संबंधित बाकी सगळे लहान मोठे व्यवसाय तेली करत असत . एक बैले किंवा दोन बैलें तेली असायचे . म्हणजेच एका बैलाचे फिरवून तेल काढणे किंवा दोन बैलांना फिरवून तेल काढणे अशी ती पद्धत असे .आता आपण डबेबंद ,. बाटलीबंद सिलबंद रिफायनरी तेल वापरतो , किंवा लाकडी घाण्याचा व्यवसाय हल्ली वाढतांना दिसतो आहे .
न्हावी- न्हावी गावातील लोकांची दाढी करणे , केशभूषा करणे , केशरचना करणे इत्यादी कामे करत असत . विधवा स्त्रियांचे केशवपण करणे केशकर्तनालय चालवणे , लहान मुलांची जावळं काढणे, एखाद्या घरी कार्यक्रम असेल घरोघरी जाऊन जेवणाची आमंत्रण देणे ही कामे नाभीक करत असत.
परीट आपण यांना धोबी या नावाने ओळखतो . घरोघरी जाऊन मळलेले कपडे गोळा करायचे ते नदीवर किंवा घाटावर न्यायचे तिथे धुवायचे, वाळू घालायचे, धुवून इस्त्री करून पुन्हा घरोघरी पोहोचवून देणे हे त्यांचे काम होते .आता आपण त्यांना आयरन वाला , इस्त्रीवाला या नावाने ओळखतो त्यांच्या व्यवसायात आता बराच बदल झालेला आहे.
माळी - माळी स्वतःच्या बागेत माळवं पिकवायचे, म्हणजेच फुले ,भाज्या ,कांदा बागायती पिके काढायचे आणि ते गावात विकणे अशी काम करायचे . "आमची माळीयाची जात शेत पिकवू बागायत " ही संत चोखोबांची ओळ आठवते .
लोहार लोखंडाच्या वस्तू घडवणारे हे कारागीर असत . तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून विविध वस्तूंचे आकार देण्याचे काम ते करायचे . शेतीची अवजारे तयार करणे , बैलगाडीचे आरे तयार करणे , बाग कामाची अवजारे तयार करणे , विळे , कोयते , सळया , प्राण्यांच्या खुरांची नालं तयार करणे , कुदळी , घमेली , पावडे , खिडक्यांची गजं , दाराच्या चौकटी इत्यादी तयार करण्याचे काम लोहार करत असत . " ऐरणीच्या देवा तुला ठिणगी- ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे " हे गाण्याचे बोल आठवले का ?
सुतार लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे काम सुतार करायचे . त्यांना कारागीर असे म्हणत . लाकूड आणल्यावर त्याला तासायचे , करवतीने कापायचे , पटाशी वापरून, रंधा वापरून गुळगुळीत करून विविध वस्तू तयार करायचे . पाटं , खुर्च्या , स्टूल , चौरंग , घरातली छोटी देवळं , दाराच्या चौकटी, खिडकीच्या चौकटी इत्यादी तयार करण्याचे काम सुतार करत असतं . लाकडी खेळणी तयार करायचे , बंगया तयार करायचे, बारशासाठी पाळणे तयार करायचे, लाकडाचे छोटे नंदी तयार करायचे अशी कामे सुतार करायचे .
सोनार - सोन्या-चांदीचे दागिने घडवायचे , देवांचे टाक घडवायचे , वास्तुदेवतेच्या प्रतिमा तयार करायचे चांदीची भांडी दागिणे इत्यादी तयार करण्याचे काम सोनार करत असत . गावागावात जिवती म्हणजेच दीपपूजा हा सण असतो त्यावेळी दारावर जीवती लावण्याचे काम सोनार करायचे .
हल्ली आपल्याला ज्वेलर्स आढळतात पण बारकी दुकाने टाकून सोनाराचे काम पण सुरू असतं .
हे जे बारा बलुतेदार होते ते आपला व्यवहार पैसा न घेता करायचे .कामाच्या मोबदल्यात सुगीच्या दिवसात वर्षभराचे धान्य द्यावे लागे .
या बारा बलुतेदारांशिवाय गावोगावी फिरून आपले पारंपरिक उद्योग करणारे , व्यवसाय करणारे असत . अशावेळी हे पूर्ण कुटुंब बैलगाडी , खाचर किंवा घोड्यावरून सामान वाहून नेत गावी जाऊन राहुटी ठोकत व तिथेच काही दिवस मुक्काम करत , तिथेच आपला व्यवसाय सुरू करत असतं . तिथला व्यवसाय झाला की पुन्हा दुसऱ्या गावाला जायचं .
कल्हई करणारे- गावात कल्हई करणारे लोक तांब्या- पितळेची भांडी कल्हई करून देत असत . ते स्वतः बैलगाडीवर प्रत्येक गावाला जायचे , त्यांचे कुटुंब सोबत असायचे . गावाच्या वेशीवर एखाद्या वडाच्या सावलीला कोळशावर चालणारा भाता जमिनीत गाडून ते बसवत असत . त्याला फिरवायला दांडा असे , तो दांडा फिरवला की निखारे फुलत , त्यावर पितळी भांडी तांब्याची भांडी गरम करून त्यावर नवसागराचा लेप देऊन कल्हई केली जात असे . आता पितळेची भांडी वापरणे बंद झाल्यामुळे कल्हई प्रकार दिसत नाही .
वडार - वडार लोक गावोगावी फिरून दगडाचा पाटा- वरवंटा , दगडी खल विकायचे .भटक्या जमाती तील हे लोक कुठेही आपली झोपडी शाकारायचे व व्यवसाय संपला की इतरत्र जायचे . गावातले लोक त्यांच्याकडून दगडाच्या वस्तू विकत घ्यायचे , आता मिक्सरने हे उद्योग बंद केले .
बोहारीण - डोक्यावर मोठ्या गाठोड्यात कपडे बांधून भांडी घ्या अशी आरोळी ठोकत बोहारीन दारात येते आणि जुन्या कपड्यांच्या बदल्यात आपल्याला अनेक घासाघसी नंतर एक भांडे देते . आजकाल बोहारीन प्लास्टिकची टोपले ,सुपं , भरण्या असा ऐवज पण मोबदल्यात देते . तिच्याशी घासाघिस करण्यात एक तास जातो .पण कापडं उपयोगात येतात वाया जात नाही .
पोतराज - अंगावर कपड्यांच्या माळा ,घुंगरांच्या माळा घालून , कपाळावर कुंकवाची मळवट भरून उघड्या अंगावर आसुडाचे फटके मारत , कोरडा ओढत पोतराज अंगणात येतो . पायात मोठे घुंगराचे चाळ बांधलेले असतात, सोबत बायको असते , तिच्या डोक्यावर देवीचे छोटेसे देऊळ असते . ते घेऊन ते घरोघरी जातात आणि शिधा मागत पोतराज फिरत असतो . हल्ली हे प्रमाण कमी झालेले आहे तरी नामशेष मात्र झालेले नाही कधीतरी पोतराज आढळतो .
सरोदी - फाटलेल्या दर्या सतरंज्या जोडणारे . हातात दाभन , जाड सुया आणि दोरा घेऊन फिरणारे भटके लोकं गोण्याला ठिगळ लावून देणारे , हे लोक गावातून फिरत असायचे आता हे लोक दिसत नाहीत .
सरोदी लोक पत्रावळी द्रोण तयार करण्याचे काम करीत असत . मोहाची पाने , पळसाची पाने गोळा करून पत्रावळी तयार करायचे .
शिकलगार - सायकलवर आपले अवजार घेऊन फिरणारे , हातात पत्रा कापायची कात्री , हातोडी , रिपीट , खिळे घेऊन गल्लीबोळ्यातून आवाज देत हे लोक फिरत असायचे . लोखंडी बादलीचे बुड बदलवून द्यायचे , लोखंडी बादली कापून त्याची शेगडी तयार करून द्यायची ,चाळणी तयार करून द्यायची, घमेल्या
ला बुड बसवून द्यायचे अशी लोखंडी पत्र्याशी संबंधित असलेले काम हे शिकलगार लोक करायचे .आता ते चाळण्या , लोखंडी कढया ,खलबत्ते असे विकतात .
कासार - बांगड्या भरणारे. सायकल वर बांगड्यांची माळ लावून गावोगावी खेडेपाडी जाऊन काचेच्या बांगड्या भरणारे लोकं . काही गावात बाया डोक्यावर टोपली घेऊन बांगड्या विकायच्या अजूनही विकतात . फार पूर्वी कासार लोक घोड्यावरून बांगड्या वाहून न्यायचे आणि भरायचे आता सगळं हातगाडीवर मिळतं , त्यामुळे जायची गरज नाही . पण गावात अजूनही कासार जात असतो , विशेषतः सणावाराला ग्रामीण भागातल्या बाया चुडा भरतात .
मातीच्या भिंतींना गिलावा करून देणारे सारवून देणारे लोक गावात फिरवून आरोळी द्यायचे . अशावेळी ज्यांना आपली घर सारवायची असत ते लोक यांना बोलवून आपल्या भिंतींना गिलावा करून घेत असत . आता मातिच्या भिंती नाही त्याच्यामुळे गिलावाही नाही.
घर साकारणारे - घराच्या छतावर नळ्याची कवेलू किंवा इंग्रजी कवेलू असायची. ती पावसाळ्यापूर्वी शाकारून घ्यावी लागायची . अशी कवेलू शाकारून देणारी माणसं गावात यायची . लोक त्यांच्याकडून कवेलू शाकारून घ्यायचे . दरवर्षी हे काम उन्हाळ्यात करावं लागे .
वीट भट्टीवर विटा भाजण्याचे काम करणारे लोक होते , आताही आहेत . आताही गावाबाहेर वीट भट्टी दिसते आणि त्यावर काम करणारे मजूरही दिसतात .
गारुडी - आपल्या खांद्यावर एक झोळी अडकवून त्यात पुंगी पेटारा असे साहित्य घेऊन गारुडी गावोगावी फिरत असत , आणि सापाचे खेळ दाखवत असत . विशेषता नागपंचमीत गारुडी जास्त दिसायचे . पुंगी वाजवली आवाज केला तर गावातली बालमंडळी गोळा होत असे आता प्राण्यांच्या खेळांवर बंदी असल्यामुळे हे गारुडी दिसेनासे झाले .
केसांच्या मोबदल्यात फुगे विकणारे लोक यायचे . सायकलवरून ते खूप फुगे घेऊन यायचे आणि विंचरून गोळा केलेले केस घेऊन त्या ऐवजी फुगे देत असत .
आईस गोळे किंवा आईस कांड्या , कुल्फी विकणारे लोक दारासमोर गाडी किंवा सायकल घेऊन यायचे आणि गोळे विकायचे .
बुरडकाम करणारे लोक बेताच्या बारीक कमच्यां पासून सुपं , टोपल्या , परडे , झालं , पेटारे असे विनत असत आणि गावोगावी नेऊन विकत असत . आता हे सगळं साहित्य दुकानात मिळतं .
विणकर - हाताने सूतकातून त्या सुतापासून मागट्यावर हातमाग यंत्रावर कापड विणणारे विणकरी होते .
रंगारी विणकर जे कापड विणत असत त्या कापडाला रंगवण्याचे काम रंगारी करत असत .
बेलदार मातीच्या भिंती बांधण्याची मातीचे घरे बांधण्याची काम बेलदार करत असत .
कानातला मळ काढणारे लोक हातात एक तेलाची बुधली आणि जाड तांब्याचा तार घेऊन गावोगाव फिरत असत आणि कानातला मळ काढून देत असत .
नंदीवाला - सोबत एक नंदी घेऊन नंदीवाला घरोघरी फिरत असे . हा नंदीवाला गावाच्या बाहेर राहूटी ठोकत असे . लोकांचे भविष्य सांगण्याचे काम तो करत असे आणि ते भविष्य ऐकून त्याचा नंदी होकारार्थी मान डोलवत असे .
धार लावणारा - लावण्याची काम करणारे लोक सायकलवर आपलं धार लावायचं छोटसं यंत्र घेऊन यायचे आणि सायकल ला पैडल मारून ते धार लावून देत असत .
जादूचे खेळ दाखवणारे जादूगार आपली पोतडी घेऊन यायचा एक विशिष्ट प्रकारचा पोशाख घालायचा गावातले बाळ गोपाळ गोळा करायचा त्याच्या हातात एक जादूची काडी असायची आणि तो काही मंत्र म्हणून छोटे छोटे हात चलाखीचे खेळ दाखवून ही जादू असे सांगत असे .
मोड घेणारे - पितळेची , हिंडालियमची , तांब्याची जुनी भांडी घेऊन त्या मोबदल्यात पैसे किंवा नवीन भांडी अशी देवाणघेवाण हे मोड घेणारे लोक करत असत .
चित्रपट दाखवणारे - एक षटकोनी आकाराचा डबा घेऊन त्याला आत बघता येईल अशी पाच-सहा झाकणे असलेल्या खिडक्या असत . त्यातून आत बघितले तर आतला सिनेमा दिसत असे . असे चालते बोलते सिनेमागृह डोक्यावरून वाहून नेले जाई . आणि जिथे मुक्काम असे तिथे एका फोल्डिंग स्टॅन्ड वर ठेवले जाई .दहा पैसे घेऊन दहा मिनिटांकरिता हा सिनेमा बघता येत असे .यानंतर दुसरे सहा मुलं बघत असत . अशा प्रकारचे हे चलचित्र दाखवणाऱे खऱ्या अर्थाने चल असे फिरतीवर होते . गावोगावी चालून तो चित्रपट दाखवायचे . त्या सिनेमाची मजा आता कशातच नाही .
पिंजारी लोक- सायकलवर किंवा गाडीवर पिंजण्याचे यंत्र घेऊन गादी भरून देण्यासाठी उशा भरून देण्यासाठी पिंजारी लोक गल्ली बोळात फिरायचे आणि कापूस पिंजून रजया , गाद्या, उशा भरून द्यायचे .
आधी मातीच्या भिंती असत ,त्यावेळी त्या सारवण्यासाठी मालामिट्टी नावाची एक प्रकारची चिकन माती येत असे . बैलगाडीतून ती माती विकणारे लोक यायचे आणि दहा पैसे पायलीच्या हिशोबाने ती माती विकत घेऊन बाया घरोघरी साठवून ठेवायच्या नंतर वर्षभर त्या सारवणासाठी उपयोगी आणत असत .
तेल मालिश करून देणारे हातात तेलाची बाटली कंगवा एवढेच साहित्य घेऊन गावात तेल मालिश वाला फिरत असे . आठवला का जॉनी वॉकर सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाये आजा प्यारे पास हमारे काहे घबराए .
गोंदवणारे सुया घ्या बिबे घ्या दाभन घ्या अशी हाक मारत गोंदवून देणाऱ्या बाया गावात येत असत . आणि त्यांच्या जवळच्या सुईने त्या कपाळावर हातावर नावे गोंदवून देत असत .
वासुदेव भल्या पहाटे दारात येत असे आणि भुपाळी आळवत असे .काही भागात अद्यापही वासुदेव फिरताना दिसतात .
गावात बारई लोक विड्याच्या ( नागवेलीची पाने ) पानांची विक्री करत होते .सायकलवर पानाचा पेटारा बांधून गावात फिरायचे .
विहिरी खोदून, बांधून देणारे लोक असायचे .आजही आहेत . विहीरी उपसून स्वच्छ करून देतात .
वरील व्यवसायांचे स्वरूप आता बदललेले आहेत यातले काही जसेच्या तसे आहेत तर काहींचे रंगरूप बदललेले आहेत .काही दुकानातून व्यवसाय करतात , काही ऑनलाईन करतात , काही नुसत्या फोनवरून घरोघरी पोहोचतात अशा प्रकारे काळानुरूप अनेक बदल झालेले आहेत . समाज मागणीनुसार व्यवसाय बदलतात आणि आपणही ते सहज स्वीकार करत करत बदलत जातो . त्यामुळे अनेक व्यवसाय आता वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतात एक आठवण म्हणून सहज लिहून बघितले .
लिहिता लिहिता यातले काही व्यवसाय कदाचित सुटलेले असतील . नव्या व्यवसायांची यादी करते म्हटलं तर ती इतकी मोठी होणार आहे की त्याचा एक स्वतंत्र लेख द्यावा लागेल आणि त्यातले पूर्ण स्वरूपही कधीकधी माहीत नसते .
या व्यवसायांमध्ये मुद्दाम पैठणी चा उल्लेख केलेला नाही . कारण पैठणी तयार करणारे लोक वर्षभरात सर्व कुटुंब मिळून काहीच पैठण्या तयार करत असत . आणि त्यांना राजाश्रय असल्यामुळे त्यांचा पिढीजात पैठणी तयार करणे हाच होता .असे कौशल्य असणारे काहीच कुटुंब असतात त्याच्यामुळे हा व्यवसाय पैठण किंवा गुजरातमध्ये पाटण येथेच होता .पैठण ची पैठणी आणि पाटणचा पटोला प्रसिद्ध आहे .हे लोक आपल्या मुळ गावातच राहिले .गाव आणि व्यवसाय बदलला नाही .
या सगळ्यात एक लिहायचे राहिले ते म्हणजे शाळेच्या आवारात जी आजी बसायची टोपलं घेऊन ती .आठवते का . कवठ ,चिंच ,बोरे ,पेरू ,बोरकूट, फुटाणे खारे दाणे अशा मैत्रीभाव असलेल्या वस्तू तिच्या जवळ मिळायच्या आणि मैत्री नांदवायच्या .या खाऊचे वैशिष्ट्य असे होते की तो कितीही कमी पैशात घेतला तरीही सगळ्यांना पुरत असे .
वर उल्लेख केलेल्या व्यवसायात काही सुटलेले आहेत तर काही व्यवसाय थोड्याफार फरकाने नवीन रूपात समोर येत आहेत .व्यवसाय भिन्नता बघून आनंद होतो . जो तो आपल्या क्षेत्रात निष्णात .आपले पूर्ण आयुष्य एकाच उद्योग व्यवसायात लावून निष्ठेने कर्म करत राहणे हेच एक उद्दिष्ट होते .फसवणूक, लबाडी याचा मागमूसही नव्हता या किरकोळ धंद्यात . शुद्ध व्यवहार .त्यांना तपासून घेण्यासाठी कोणीही भेषज अधिकारी नव्हते .त्यांचे शुद्ध मन हेच त्यांचे सर्वस्व होते .माणुसकीचा अमोल ठेवा जपला या जुन्या लोकांनी .आभारी आहोत
©️ मंगला लाडके
( कृपया लेख नावासहित पुढे पाठवावा )
छान लेख आहे.
छान लेख आहे.
आमच्या कराड च्या घरी विद्यानगर भागात, अजुनही केस विकत घेणारे दारावर येत असतात अधुनमधुन.
सुट्टी साठी तिकडं गेलं की त्यांची हाळी येते कानावर.
आहेना
आहेना
"कासार - बांगड्या भरणारे. सायकल वर बांगड्यांची माळ लावून गावोगावी खेडेपाडी जाऊन काचेच्या बांगड्या भरणारे लोकं . काही गावात बाया डोक्यावर टोपली घेऊन बांगड्या विकायच्या अजूनही विकतात . फार पूर्वी कासार लोक घोड्यावरून बांगड्या वाहून न्यायचे ...">>>हे काय आहे हो. स्त्री आय डी बांगड्या कशा विसरतील?
लहानपणी गिरणीतून गहू दळून आणले की पीठ चालायचे. जो कोंडा वर येईल तो मारुतीच्या देवळात नेऊन दिला कि नारळाची वाटी मिळायची. बार्टर सिस्टीम!
लहानपणीच्या आठवणी.
लहानपणीच्या आठवणी.
नवीन प्रसृती झालेल्या स्त्रीला मसाज करणे आणि नवजात बालकाला अंघोळ घालणे, कानात तेल टाकून .स्वच्छ पुसून वेखंडाची पावडर लावणे. कसलीशी(बाळंतशोपा?) धुरी देणे. त्या आज्ज्या कुठे गेल्या?
काय आहे हो. स्त्री आय डी
काय आहे हो. स्त्री आय डी बांगड्या कशा विसरतील?>> अय्यो माय बॅड.
ह्या धाग्यावर त्या ह्यांची
ह्या धाग्यावर त्या ह्यांची उणीव भरून काढणारे समर्थ नेतृत्व झळाळले.
ढंपस टंपू
ढंपस टंपू
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जुग जुग जियो मेरे लाल. तुम जियो हजारो साल है मेरी ये आरझू.
happy birth day to you.
हे सगळे व्यवसाय अजूनही
हे सगळे व्यवसाय अजूनही खेड्यापाड्यात आणि लहान शहरान्मधे दिसून येतात. जातीव्यवस्था काल्बाह्य होत चालली आहे, पण हे व्यवसाय अजूनही आहेत.
व्यवसाय कमी झालेत, पण काल्बाह्य नक्क्कीच नाही.
ढंपस टंपू
ढंपस टंपू
मी आता केकची ऑर्डर द्यायला जातो आहे. तोपर्यंत थांब.आल्यावर केक कापू. आणि गप्पा मारू. ऐश करेंगे. क्या?
व्यवसाय -"धंदे"- और भी है. त्याची चर्चा करू.
मी परत आSSSSलो आहे बरका.
मुंबईत आमच्या भागात हल्ली
मुंबईत आमच्या भागात हल्ली नंदीवाला , वासुदेव येत असतात.
हाडवैदूही आहे एक.
रस्त्यावर जडीबुटी विकायला बसणारे काही वर्षांपूर्वीपर्यंत दिसत.
कापूस पिंजणारे, पाट्याला टाकी काढणार्या बायका माझ्या लहानपणी पाहिल्यात.
मालिशवाले अर्बन क्लॅपवर आलेत.
जी एंच्या चैत्र कथेत हळदीकुंकवाचे आमंत्रण घरोघरी देणारी एक स्त्री आहे. कुठल्यातरी चित्रपटात की कथेत स्थळांची माहिती पोचवणारी एक बाई पाहिल्याचे आठवते. हेही व्यवसाय.
मंगळसूत्र ओवून देणाऱ्या बायका
मंगळसूत्र ओवून देणाऱ्या बायका .
बहुरूपी.
पाथरवट.
नाक, कान टोचून देणारे. हे प्रयोग मी केलेत , कुठली सुई की काय माहिती. मेलो नाहीत देवाची कृपा.
गादीतली रूई बडवून देणारे.
तव्यावर लाह्या करून देणारे.
पुण्यातील सोमेश्वर या महादेवाच्या मंदिराच्या मागे हे व्यवसाय भिंतींवर सचित्र रंगवलेले आहेत. आपल्या मुलांना घेऊन जरूर जावे. पाषाण जवळचे मंदिर. छोटा फिरत फिरत बघायचा पार्क आहे, तिकीट लक्षात नाही. आवर्जून बघावा असा आहे. हीच थीम आहे. हे फारच छान आहे. माझ्याकडे फोटो होते पण ते गेले कम्प्युटरच्या महासागरात.
https://g.co/kgs/Xvd5w6
ही त्या ग्रामसंस्कृती उद्यानाची लिंक. अगदी मोठ्यांनाही आवडेल व मजा येईल असे आहे.
लग्न जमवणारे मध्यस्त.
लग्न जमवणारे मध्यस्थ.
आता त्याचे वधू वर सूचक मंडळ झाले आहे.
मुहूर्त काढून देणारे ,कुंडली जमवून देणारे .
पूर्वी गणेशोत्सवात कार्यक्रम करणारे.
गजाननराव वाटवे, बी. सायांना, पी. वसंत. कुणाला आठवतात हे लोक?
एक दस्तावेजीकरण म्हणून लेख
एक दस्तावेजीकरण म्हणून लेख आवडला. >> +१
यातील बरेचसे लोक लहानपणी आमच्या चाळीत येत. विहिरीत पडलेल्या कळशा काढून देणारे हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला
पूर्वी असलेले विहिरींचे प्रमाण पाहता नक्कीच असे लोक असतील.
अमावस्येला "अवस वाढा" म्हणत एक बाई येत असे. ती एरव्ही काय करत असे माहीत नाही. पोतराज आणि कडकलक्ष्मी एकच का वेगळे माहीत नाही.
अस्वल घेऊन येणारे "दरवेश" बहुधा. बिब्बे विकणार्यांचा संदर्भ "बिब्बं घ्या बिब्बं, शिकंकाई" या गाण्यात आहे. सोंगाड्या मधले असावे.
अगदी जुने व्यवसाय नव्हेत, पण आइसक्रीम विकणार्यांमधे सुद्धा - बर्फाचे गोळे विकणारे, एका ड्रम मधे एका साच्यात साधारण तसेच बर्फाचे गोळे देणारे, वडाच्या की कसल्या पानावर आईसक्रीम देणारे, कुल्फीवाले व जनरल "कॅण्डी" आइसक्रीम विकणारे - इतके विविध लोक होते.
आलेपाक विकणारे येत. "लाल सुपारी" नावाचा एक प्रकार कागदी पुड्यांमधून कोणीतरी विकत असे. नक्की काय होते लक्षात नाही.
एका हातगाडीवर विविध वस्तू, खेळणी वगैरे "हर माल पाच रुपिया" टाइप ओरडत विकणारे असत. हे सगळे लोक अजून असतात का माहीत नाही. सोसायट्यांमधे येऊ देत नाहीत.
कानातील मळ काढणारे पुण्यात शनिवारवाड्याजवळ व लकडी पुलावर पाहिले आहेत. पोपटाकरवी भविष्य सांगणारे लकडीपुलावर असत. एक वजन काटा ठेऊन काही पैशात आपलेच वजन करून देणारे ही
कल्हईवाल्यांबद्दलचा सर्वात धमाल संदर्भ पुलंचा आहे. सदाशिव पेठेत एका बोळात "कल्हईवाले पेंडसे आत राहतात" अशी माहिती व आत म्हणजे कोठे ते बोटाने दाखवलेले चित्र काढलेले असते. पण तेथेच कोणीतरी "पण कल्हई रस्त्यात बसून काढतात" अशी अॅडिशन केलेली असते
फारएण्ड >>>+१११११
फारएण्ड >>>+१११११
आंबे आणि मधमाशांची पोळी काढून
आंबे आणि मधमाशांची पोळी काढून देणारा एक ग्रूप दर ऊन्हाळ्यात आमच्या घरी येत असे.
झाडावरून ऊतरवल्यापैकी ५०% ऐवज त्यांचा असा एक ढोबळ हिशेब असे.
माथाडी हमाल ही एक मोठी सिस्टीम मार्केटमध्ये ऊपलब्ध असे. ह्यात बाप्ये किराणा दुकानांमध्ये पोती वाहण्याची कामे करत तर बाया किरकोळ ग्राहकांचे वाणसामान त्यांच्या मोठ्या पाटीत ठेऊन घरी पोचून देत.
तसेच गूळ, दाणे घेऊन चिक्की बनवून देणारे आणि मैदा, तूप, साखर घेऊन बिस्किटे बनवून देणारे सुद्धा बरेच होते आमच्या गावात.
एक दस्तावेजीकरण म्हणून लेख
एक दस्तावेजीकरण म्हणून लेख आवडला. >> +१
आमच्या दक्षिण मुंबईतल्या चाळीत कित्येक वर्षं बुधवारी वासुदेव येतो. कल्हई करणारे, सुर्यांना धार लावणारे, कापूस पिंजणारे, मोठ्या पेटार्यातून खारी बिस्किटं विकायला आणणारे, आंब्याच्या दिवसांत आंब्याच्या पेट्या आणणारे 'आंबावाले' भय्या, केळीच्या सोपात बांधलेली राजेळी केळी, भाजीला केळफुलं, मोसमात जांब आणि ताडगोळे वगैरे आणणारे वसईवाले (असंच म्हणायचे त्यांना), दारी बसून दाढी-हजामत करून देणारे न्हावी, मटका कुल्फीवाले, बोहारणी, धार्मिक पुस्तकं, श्रावणात जिवतीचा कागद विकणारे इत्यादी व्यावसायिक अगदी नेहमीचे. 'बुगुबुगु' नंदीबैलवालेही यायचे पूर्वी, त्यांच्याकडे हमखास एखादी पाठीला एक्स्ट्रा पाय फुटलेली गाय वगैरे असायची. एक कोपराने फरशा फोडून दाखवणारे यायचे. आपल्या फरशा आपण वाहून आणायचे. असं काम त्यांनी का निवडलं असेल काय माहीत.
वडाची पाने देवून कुल्फी पण
वडाची पाने देवून कुल्फी पण मिळत असे
अवस वाढा अवस अजुनही येत असेल
अवस वाढा अवस अजुनही येत असेल बहुतेक.
मुंबईत लोकल मध्ये 'टोपाझ ब्लेड पाच रुपया' करुन एकेक ब्लेड विकणारे हमखास दिसत. आणि सैगदाणे क्स्स क्स्स..... असं तोंडातून स चा आवाज काढत वाफ सोडत म्हणणारे. आणि लाकडाच्या ओंडक्यावर हिरवी आणि लाल चिकट गोळीचा रॉ ऐवज घेऊन मागितली की हाताने त्या ऐवजातून थोडा मसाला (?) घेऊन पोरासोरांना गोळया वळून देणारे. (ह्याचा मध्यंतरी एकदम पॉश टिकटॉक बघुन मला टडोपा झालेलं).
आणि 'ए झाडाला लाल मातीssssए' अशी आरोळी देऊन लाल माती विकणारे.
'धारवाला धार... कात्री सुरी विळीला धार' अशा आरोळ्या अजुनही ठाण्याला ऐकू येतात.
पोरासोरांना गोळया वळून देणारे
पोरासोरांना गोळया वळून देणारे>>
आणि हातावर लावायचे घड्याळ!
कोकणात वाडी बनवून देणारे,
कोकणात वाडी बनवून देणारे, आंबे उतरवणारे असतात. शहरात काही जण नारळ उतरवण्यासाठी येतात.
>>> लाकडाच्या ओंडक्यावर हिरवी
>>> लाकडाच्या ओंडक्यावर हिरवी आणि लाल चिकट गोळीचा रॉ ऐवज घेऊन मागितली की हाताने त्या ऐवजातून थोडा मसाला (?) घेऊन पोरासोरांना गोळया वळून देणारे.
हे नाही बुवा कधी पाहिलेलं.
पण त्यावरून बुड्ढी के बाल, चना जोर गरम, तसंच बिमली/ओली बडीशोप/शेंबडी बोरं वगैरेंचे वाटे विकणारे आठवले. तशी पेप्सीकोलाची एक फार फॅन्सी असायची शाळकरी वयात.
दुकानातून घेतलेला पाकिटातला ऐवज तसा लागत नाही.
मस्तच आहे लेख.
मस्तच आहे लेख.
आपल्या कडची जुनेरी घेऊन तिथल्या तिथे गोधड्या शिवून देणाऱ्या बायका ही येत असत. इतकी मस्त गोधडी शिवायच्या की बघत रहावं.
शाळेच्या रस्त्यावर पूर्वी
शाळेच्या रस्त्यावर पूर्वी बायोस्कोप घेतलेले लोक असत. चार मुलं जमली कि फिल्म सुरू व्हायची.
गाणं बायोस्कोपवालाच गायचा " आता मुंबई आली बघा, राजाभाई टावर बघा , राजेश खन्ना डिंपल बघा "
मस्त चाल लावलेली असायची.
दस्तावेजीकरण म्हणून छान आहे
दस्तावेजीकरण म्हणून छान आहे लेख + १
हे मी स्वतः बघितले आहे :-
गावोगावी भरपूर गटारे आणि उकिरडे असल्यामुळे उदंड झालेल्या डुकरांना सापळ्यात पकडून त्यांचे केस उपटून काढणाऱ्या टोळ्या. त्या केसांचे ब्रश बनवतात. डुकरे मात्र विलाप करतात केस उपटत असतांना.
आचार्य - हे गाणे आठवले लगेच.
आचार्य - हे गाणे आठवले लगेच. मस्त आहे.
https://www.youtube.com/watch?v=BWYaMiqlNfc
तो बायोस्कोप आम्ही पुण्यात चतु:शृंगीच्या जत्रेत पाहिला आहे. यात फक्त फ्रेम्स असत की रनिंग क्लिप्स ते लक्षात नाही. आम्ही रनिंग क्लिप्सही पाहिल्या आहेत.
पण बारा बलुतेदार पद्धती मध्ये
पण बारा बलुतेदार पद्धती मध्ये सर्वांना जगण्यासाठी हक्क नी
व्यवसाय दिले होते.
त्यांचा मान त्यांना दिला जायचा.>> मान दिला जायचा??
कोणत्या जगात वावरता सर तुम्ही?
डुकरांना पकडायला लोकं येत ती
डुकरांना पकडायला लोकं येत ती बघितलेली आहेत. पण ती डुक्करं मारुन खायला म्हणून नेत असवीत असं वाटायचं. त्यांचे फक्त केस उपटायला नेत असतील तर अगदीच डोंगर पोखरुन.... आपलं. 'डुक्कर पकडून केसच उपटले' असं झालं!
फारएण्ड - एक नंबर आठवण काढली
फारएण्ड - एक नंबर आठवण काढली . हे गाणं बहुतेक स्पीकरवर लावलेलं असायचं.
येरवड्यातलं मारूती मंदीर, शुक्रवार पेठेत शाहू कॉलेजच्या अलिकडच्या चौकात अशा चार पाच ठिकाणचे बायोस्कोपवाले आठवतात.
गावच्या जत्रेत धंदा चांगला व्हायचा त्यांचा.
काळी काळी मैना
काळी काळी मैना
लै गोड मैना
करवंदे विक्रेते गाडीवर करवंदे आणत
मस्त लेख आहे. कितीतरी लोकं
मस्त लेख आहे. कितीतरी लोकं आठवणींच्या पडद्याआड गेली होती त्यांची या लेखाच्या निमित्ताने आठवण झाली पुन्हा.
मला लिफ्टमन ह्या व्यवसायाची
मला लिफ्टमन ह्या व्यवसायाची गंमत वाटते. त्या दीड बाय दीडच्या लिफ्टमध्ये दिवसभर थांबून लोकांना फक्त कुठे जायचे आहे तिथलं बटण दाबून देणे असा एक जॉब असतो, हे बाहेर कुणाला सांगितलं तर खोटं वाटेल. अजूनही काही ठिकाणी हे लोक शिल्लक आहेत, पण हळू हळू हे जॉब्स जातील.
Pages