कोल्हापुर परगणा
विकेंडची एक्सप्रेस हायवेवरची गर्दी, पुढे सातारा कराड पेठ नाका सांगली वाडी कुरूंदवाड टाकळी मार्गे सायंकाळी खिद्रापुरात पोहचलो तेव्हा सुनिल आमची वाट पाहतच उभा होता. सुनिल आणि त्याच्या घरातल्या मंडळींनी जे काही आमचे आदारतिथ्य केले त्या बद्दल काय सांगू. असे म्हणतात मैत्रीत किंवा आपल्या माणसांमध्ये धन्यवाद आभारी वगैरे असल्या शब्दांना किंमत नसते. त्यामुळे असे काही शब्द वापरून मी त्यांच्या प्रेमाचे मोल कमी करणार नाही.
खिद्रापुरचे उत्कृष्ट शिल्पकलेचे प्राचीन शिवालय !
अतिशय उत्कृष्ट कोरीव शिल्पकाम असलेल्या देवी देवतांच्या मुर्ती. पौराणिक तसेच अगदी ईसापनितीच्या कथा सांगणारे शिल्प, पुर्वापार चालत आलेल्या परदेशी अरब चीनी व्यापारांचे शिल्प तर कुठे नर्तकी आणि लावण्यवती अप्सरा.
या मंदिराबद्दलची आख्यायिका..
वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नंदी नाही. तो येडूर या गावी. त्या ठिकाणी भगवान शंकराचे सासरे दक्ष प्रजापती पुत्रकामेष्ठी साठी यद्न्य करत असतात. शंकराला ते आमंत्रण देतात, भगवान शंकर जात नाहित. मग त्यांची पहिली पत्नी सती/ दक्षायिनी नंदी घेऊन जाते. ती गेल्यावर तिला तिथे कुणी विचारत नाही मग ती यद्न्यात उडी घेते. मग शंकर कोपले ती जागा हि कोपेश्वर खिद्रापुर, जटा आपटून त्यातून निघतो तो विरभद्र त्या करवी तो यद्न्य विध्वंस करायला. हे सर्व झाल्यावर शंकराला शांत कोण करणार, म्हणून विष्णुची मुर्ती धोपेश्वर धुप. मंदिराचे मुख्य तीन भाग स्वर्ग मंडप, सभा मंडप आणि मुख्य गाभारा ४८ वर्तुळाकार खांबाचे दगडी वर्तुळाकार छतातून थेट आकाशाचे दर्शन होते. सभामंडपात रामायण महाभारत तसेच पंचतंत्राच्या गोष्टी सभामंडपाच्या खांबावर कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिर आणि सभामंडपाच्या बाहेरील बाजूस दगडात कोरलेले हत्ती तर सुरेखच, सुंदर कोरीव झरोके, दोन्ही बाजूला द्वारपाल किर्ती मुख आणि बरेच काही. खऱतर ही वरवरची माहिती झाली. इथला अभ्यास खुप मोठा अजुनही संशोधनात वाव आहेच.
चालुक्य शिलाहार भोज ते देवगिरीकर यादव यांचा मंदिराच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा दुर्दैवाने मुघली राजवटीत बरेच नुकसान झाले. असे म्हणतात की मंदिराच्या बांधणीत जे दगड वापरले तसे दगड गावाच्या जवळपास कुठेच आढळत नाहीत. मग त्या काळी कसे काय हे सर्व शक्य झाले ? आत्ताच्या आधुनिक अभियांत्रिकी युगाच्या तुलनेत तेव्हाची परिस्थिती त्यांचे स्थापत्यशास्र, कुशल कारागीर पाथरवट आणखी किती गोष्टी अनाकलनीय.. खऱच हे सर्व पाहून अक्षरश: आपण थक्क होतो.
सांगली कोल्हापुरात आल्यावर थोडा वेळ काढून नक्कीच पहावे असे हे सुंदर शिवालय.
सकाळी पुन्हा एकदा शिवालयाचे मनसोक्त दर्शन घेऊन, चहा नाश्ता करून सुनिलच्या घरच्या मंडळींचा निरोप घेत खिद्रापुरहून निघालो. रस्ता लहान पण दुर्तफा ऊसाची शेती तसेच काही ठिकाणी तंबाखुची लागवड दोन्ही बाजूला हिरवळ डोळ्यांना फारच दिलासा देणारी. टाकळी-दत्तवाड मार्गे महाराष्ट्राची सीमा ओलांडून कर्नाटक राज्यात दाखल झालो. सदलगा पुढे बेडकीहळ या छोट्या गावी श्री. विजयराव ईनामदार यांची किल्लेवजा गढी पहाण्यासाठी थांबलो. त्यांचा त्याबद्दलचा ईतिहासातून डोकावणारा अभिमान. सुदैवाने विजयरावांशी भेट झाली. महाराणी ताराराणीच्या सतराव्या शतकाच्या कालखंडात दक्षिण कोल्हापुर प्रातांत ईनामदारांच्या पुर्वजांनी इथुनच मोलाची कामगिरी बजावली. पुर्वापार वारसा लाभलेल्या या गढीत सध्या ते कुटुंबासह रहातात. मुख्य तटबंदीच्या आत मोठा वाडा आहे. अंदाजे २०-२५ फुट उंचीची तसेच १५-२० फुट रूंदीची तटबंदी अजुनही भक्कम अवस्थेत तसेच चारही दिशांना काही प्रमाणात पडझड झालेले बुरूजही खास नजरेत भरतात. प्रवेश करतानाच मध्यभागी तुळशी वृंदावन, मोठा वरंडा, आतमध्ये मोठी बाव, प्रशस्त नाण्हीघर तसेच वाड्यातच पलीकडच्या बाजूला औदुंबराचे झाड, दत्तगुरूंचे छोटे मंदिर आणि काही पुरातन प्राचीन मुर्ती. मागच्या दरवाज्यातून बाहेर पडले की शेतीसाठीची अवजारे आणि गुरांचा गोठा. विजयरावांनी मोठ्या अभिमानाने तसेच आपुलकीने सर्व काही माहिती दिली. हल्लीच्या काळात एवढा मोठा ऐतिहासिक ठेवा सांभाळणे, दिवसेंदिवस त्याची डागडुजी करणे हे सर्व महाकठिण काम. बहुतेक ईतिहासप्रेमी, दुर्गअभ्यासकांची कायम उठबस असते. हे सर्व पार पाडत असताना विजयरावांचा उत्साह कुठेही कमी पडत नाही. चहापाणी झाल्यावर निघते वेळी रूढी परंपरेनुसार अश्विनी आणि उषा काकूंची पारंपारीक पध्दतीने सवाष्णींची ओटी भरली. तासाभराचा सुंदर अनुभव गाठीशी घेऊन दुपारच्या जेवणासाठी निपाणीत थांबलो हॉटेलचे नाव आता लक्षात नाही पण तिथली गोल भजी/म्हैसुर भजी चव अप्रतिमच. निपाणीहून राधानगरी हायवे पकडत पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करत अदमापुरहून डावीकडे वळत थेट गारगोटी पुढे पुष्पनगर शिंदेवाडी मार्गे घाटरस्त्याने लांबलचक तटबंदीच्या भुदरगडावर प्रवेश केला. शिलाहारकालीन राजाराम महाराजांचे वास्तव्य लाभलेला विस्तीर्ण पठार लाभलेला भुदरगड. रविवार असल्यामुळे असेल कदाचित पण गडावर खुपच गर्दी त्यात बकरे कोंबडी साग्रसंगीत बेत असलेलेच खुप ती गर्दी तो कोलाहाट पाहून कसेतरीच वाटले. सहाजिकच कचरा आणि अस्वच्छता ठायी ठायी जाणवत होती. भैरवनाथाच्या मंदिराच्या मागच्या बाजूस धर्मशाळेचे काम चालू होते. वाड्याच्या अलीकडच्या शिवमंदीरात मुक्काम टाकला. मंदिरात सफाई करत, शिधा सामानाची ठेवाठेव, पिण्यासाठी पाणी हे सर्व पहातच सुर्यास्त झाला. रात्रीचे खिचडीचे जेवण आटपून भटकंतीचा दुसरा दिवस भुदरगडावर मावळला.
भुदरगडावरची सकाळ उत्साही आणि चैतन्यदायी. मंदिर पुर्वाभिमुख असल्यामुळे समोरच्या भल्या मोठ्या पठारावरचा सुर्योदय छान टिपता आला. सकाळची सर्व कामे उरकून, झटपट नाश्ता पुढे मंदिरातल्या मुक्कामाच्या जागेची व्यवस्थित साफसफाई करून गडफेरी साठी निघालो. पठारावर स्थानिकांनी चांगलीच शेती केली आहे. मुख्य आकर्षण असलेला दुधसागर तलाव त्या अलीकडेच मोडकळीस आलेले भवानीदेवीचे मंदिर, वाटेतले शंकराचे मंदिर तसेच पुढे जखुबाईचे गुहा मंदिर पाहून तटबंदीच्या वाटेने उत्तरेकडच्या छोट्या तलावाजवळ आलो तिथेही शिवपिंड आणि नंदी विराजमान आहेत. भुदरगडाची बरीच तटबंदी नव्याने बांधून काढली आहे. दिड दोन तासात पुर्ण फेरी करून मुख्य भैरवमंदिराचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन निघालो. उतरताना मुरूकटे, दिडेंवाडी, उत्तूर मार्गे गडहिंग्लजला भर दुपारी पोहचलो गर्दीतल्या एका हॉटेल्यात पोटपुजा करून पुढे भडगाव चेन्नकुपी मार्गे छोट्या घाटरस्त्याने थेट सामानगडावर गाडी नेली. हनुमान मंदिरात बेळगावच्या स्वयंसेवकांचा योगा अभ्यासाचे वर्ग सुरू होते. मंदिर परिसर प्रशस्त समोरच दिपमाळ. त्याच वाटेने पुढे जात कातळात खोदलेले शंकराचे मंदिर आणि अनेक छोटी ध्यानस्थ गुफा मंदिरे आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठान बरेच चांगले कार्य सामानगडावर केले आहे. सामानगडाचे खरे वैशिष्ट्ये म्हणजे या जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहीरी, विस्तीर्ण झेंडा बुरूज, वेताळ बुरूज आणि खुप काही खऱतर मुक्काम गडावरच करायचा होता पण हनुमान मंदिरात योगा अभ्यासाचे शिबिर असल्याकारणाने सायंकाळीच गड सोडावा लागला. आल्या मार्गे भडगावहून थेट नेसरीचा रस्ता पकडला, छोटी छोटी गांव मागे टाकत साडेपाच सहाच्या सुमारास नेसरीत दाखल झालो. प्रतापराव गुजरांच्या पराक्रमाची कथा सांगणारे ‘नेसरी’. स्मारक सायंकाळी सहा वाजता बंद होते असे कळाले मग काय तशीच गाडी दामटवली सहाच्या ठोक्याला बरोब्बर स्मारकात पोहचलो पहातो तर कुलुप. सहाजिकच सर्व निराश झाले अर्थातच एवढ्या दुरवर येऊन स्मारक न पहाताच पुढे जाणे हे आम्हा सर्वांना मान्यच नव्हते. कशीबशी नेसरीत एका ठिकाणी मुक्कामाची सोय झाली. रात्रीच्या जेवणासाठी चांगल्या हॉटेलची चौकशी केली असता एकाने एस टी स्थानकाजवळची मनोहर खानावळ सुचवली. अक्षरश: रूचकर आणि चविष्ट अशी शाकाहरी थाळी त्यात गरम गरम चपातीचा आग्रह दोन घास जास्तच पोटात ढकलले गेले त्यामुळेच अंथरूणात पडताच निद्राधीन झालो.
नेसरीतून आरामात आवराआवरी करून निघालो. मुबलक पाणी आणि वेळ होताच मग गाडीला पण अंघोळ घातली. एस टी स्थानकाअलीकडे एका छोट्या टपरीवजा हॉटेलात नाश्ता केला, मला त्या हॉटेलचे नाव आता आठवत नाहिये पण तिथला उपमा, बटाटेवडा आणि चहा खऱच अप्रतिम एकदंर खाण्याच्या बाबतीत नेसरीने मुळीच निराश केले नाही. पुढे चौकात अंकल आणि अश्विनी भाजीपाला घेण्यासाठी उतरले पुढच्या मुक्कामासाठी शिधापाण्याची तजवीज. तसाच गाडीत बसलो असताना समोरच न्हावीच्या टपरीतून कुमार शानुचे गाणे ऐकू येत होते. रिकामा न्हावी, कुमार शानुची गाणी आणि माझी चार दिवसाची वाढलेली दाढी मग काय गाणी ऐकत पहिल्यांदा शांत किंवा मौनी म्हणा हवंतर अश्या न्हाव्याकडून दाढी करून घेतली. मला वाटतं कुमार शानु ची गाणी हिट होण्यामागे ह्या सलुनवाले, ईस्त्रीवाले आणि पानटपरीवाले यांचे मोठे योगदान आहे. असो विषय भरकटतोय...
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक पहाताना फक्त आणि फक्त शिवरायांचे खऱमरीत पत्र आठवत... " स्वराज्यावर वारवांर चालून येणार्या गनिमास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवु नका." येथेच त्यांच्यासह सहा शुर मावळ्यांनी बहलोलखानच्या सैन्यावर लढाई करून हौतात्म्य पत्करले. असा हा मुलुख...
पुढच्या दहा मिनिटांतच हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या स्मारकस्थळी पोहचलो. अतिशय व्यवस्थित आणि निटनेटके छोट्या फुलझांडानी सजवलेले तसेच प्रतापरावांच्या संपुर्ण कालखंड त्या बद्दलची सर्व माहिती एकंदर सकाळच्या वातावरणात त्या तो परिसर खुपच छान. अदिलशाही सरदार बहलोलखानावर प्रतापराव आणि त्यांचे सहा सहकारी सोबती तुटून पडले याच लढाईत सात ही जणांना वीरमरण आले. सात ढाली सात तलवारी स्मारकात पहाताना महाराजांचे ते शब्द सारखे कानात घुमत होते, "स्वराज्यावर वारंवार चालून येणार्या गनिमांस गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवु नका." खऱच सारं काही अद्भूत अनाकलनीय एका विचित्र भारावलेल्या अवस्थेत तिथून निघालो.
पाऊण तासात चंदगड गाठले पुढे हेरे मार्गे इसापुर पारगडसाठी उजवीकडे वळालो सरळ रस्ता बेळगावी जातो. इथुन पुढचा रस्ता हा या संपूर्ण ट्रेक मधला माझा आवडता, अगदी दाट जंगलातून त्यातही चांगल्या स्थितीत असणारा रस्ता. ड्रायव्हींगचा पुरेपुर आनंद घेत छोटी छोटी गावं मागे टाकत एका टोकाला पारगडाचे दर्शन झाले. छोटा घाटरस्ता चढत गाडी थेट गडावर नेली. ‘पारगड’ अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडणारा हा पारगड. महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या सह्याद्रीतला दक्षिण सीमेवरचा चंदगड तालुक्यातला शेवटचा किल्ला म्हणता येईल हवंतर.सह्याद्रीतल्या स्थानाचे महत्व ओळखून, गोवाच्या पोर्तुगीजांवर वचक बसविणे हा महाराजांचा हेतू. गडावर प्रवेश करताच भवानी मातेचे मंदिर देवीची मुर्ती हुबेहूब प्रतापगडाच्या भवानीमातेच्या मुर्तीसारखीच. पुढे वस्तीअलीकडे शाळेच्या आवारात महारांजाचा पुतळा. गडावर तानाजी मालुसरे, शेलार मामा यांचे वशंज रहातात. दुपारचे जेवण श्री.तांबे यांच्या खानावळीतच उरकले. मारूतीचे मंदिर पुढे वाटेतले तलाव पाहत गडाच्या उत्तर टोकाची तटबंदी आणि शिवमंदिर
श्री. रघुवीर शेलारांकडे मुक्काम टाकला, सायंकाळी सुर्यास्त पाहून त्यांच्या अंगणातच स्वयंपाक केला. चांदण्या रात्री जेवण झाल्यावर पुन्हा एकदा रघुवीर मामा आम्हाला गडफेरीस घेऊन निघाले. माळवेंची समाधी, महादेव बुरूज, गणेश तलाव तसेच गोव्याच्या सीमेवरचे दुरून लुकलुकनारे दिवे हे सर्व दुधाळ चंद्रप्रकाशात पहाण्यात एक वेगळीच मजा. एकंदरीत पारगडावर दिवस वसुल झाला. पारगडावर दोन दिवस पूर्ण राहिलो तरी पाय निघत नव्हता. पण मोहिमेतील पुढील टप्पे खुणावत होते. नियोजनानुसार निघणं भाग होतं. पारगडाचा छोटासा घाट उतरून इसापूर मार्गे डावी मारली. दरी काठचा अधे मधे दाट जंगलातून जाणारा रस्ता फारच रमणीय. काही ठिकाणी कामं सुरू असल्यानं कच्चा पक्का होता पण तासाभरातच निसर्गरम्य अशा चौकुळ गावात दाखल झालो. बेळगाव अलीकडून वाहणारी घटप्रभा नदी याच चौकुळच्या सह्याद्री भागात उगम पावते. चौकुळ जरी घाटावर वसलेले असले तरी ते मोडते सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात. आंबोली परगण्यातील या गावात प्रचंड पाऊस पडतो. नोव्हेंबर महिना असूनही गावात भरपूर पाणी.. भात, नारळ, सुपारी ते केळी सारखी पिकं घेतली जातात. धोंडू गुणाजी गावडे यांच्या कडे मुक्काम टाकला. शांत सुंदर गावात भरपूर प्रसन्नत जाणवली. इथली माणसं खरोखर साधी भोळी त्यांच्या काळजात खरोखरच शहाळी भरलेली. सायंकाळी गावात चक्कर मारून क्रेस्ट लाईन अलीकडे पठारावर खामदा मातेचे देऊळ पाहिले. मंदिर परिसर तसा शांत निर्मनुष्य पण तरी सकारात्मक उर्जेने भारावलेला. त्याच निर्विकार अवस्थेत सुर्यास्त पाहिला. सोबत येणारी कातरवेळ पण फार आवडून गेली. निघताना डोळे बारीक करून पाहिलं तर पारगडावरील दिवे लुकलुकत होते. या चौकुळ पासून हनुमंतगड फुकेरी ते भेकुर्ली मार्गे पारगड असा मस्त ट्रेक होऊ शकतो. असेच काही मनसुबे रचत झोपी गेलो.. सकाळी आवरतं घेत पुन्हा आल्यामार्गे इसापूर शिनोळी पाटणे कलिवडेचा घनदाट जंगलातील चारही दिशांना धरणांचे विहंगम दृश्य दाखवणारा कलानिधीगड. गावात गाडी लावली तेव्हा काही मंडळींनी आमचा कुटूंब कबिला त्यात छोट्या चार्वी कडे पाहून गडाच्या आसपास रानटी हत्ती आल्याची बातमी दिली. एवढ्या दूरवर येऊन आमचा उत्साह पाहून दोन मुलं आमच्या सोबत स्वतः हून यायला तयार झाली. गडावर एक बर्यापकी अवस्थेत असलेला दरवाजा बुरूज काही ठिकाणची तटबंदी, गणपतीची छोटी सुबक मुर्ती, भवानी देवीच मंदिर. सामानगड सारखीच वाटणारी मोठी विहीर. हल्लीच लावलेला असावा बहुतेक एक टेलिफोन टॉवर त्यांचे ऑफिस कुणी एक राखणदार तिथे ड्युटीवर असतो. छोटेखानी भौगोलिक दृष्ट्या मोलाचे स्थान पटकावून असलेला कलानिधीगड आवडून गेला. आता आमची स्वारी निघाली महिपालगड !
कुण्या महिपाल राजाची कहाणी सांगणारा पण गडावरील मनुष्यवस्तीतच आपल्याच अवशेषांच्या खानाखुणा हरवलेला बेळगाव जवळचा महिपालगड. पाटणे पुढे शिणोळी फाट्यावरून डावीकडून देवारवाडी.. कर्नाटक सीमेला लागूनच असलेला हा पुरातन किल्ला. गडाच्या वाटेवर जाताना मोठे वैजनाथ मंदिर लागते. मंदिर बहुदा अकराव्या का बाराव्या शतकात बांधलेले. भव्य शिवलिंग, नंदी व बाजूला असलेले पाण्याचे कुंड सारं वेगळ्याच वातावरणात घेऊन जातं. लहानसा घाट चढून गडावर दाखल झालो. आधी म्हणालो तसेच किल्ल्यात पूर्ण गाव वसलेले आहे. उध्वस्त तटबंदी तर काही जुने अवशेष. महाराजांच्या पुतळ्या अलीकडील मोकळ्या जागेत गाडी लावली. गावातून मुख्य रस्त्याने जात. मोठा दरवाजा मग देवीचे मंदिर व मला मोठा झेंडा लावलेला बुरूज इथून मात्र आजूबाजूचा बराच प्रदेश नजरेत येतो. खरंतर गर्दी आणि वस्ती यामुळेच फार न रेंगाळता लगेच निघालो. मुक्काम थेट बेळगावी. घासाघीस करून चांगले हॉटेल रहायला मिळाले यात अश्विनीचे कन्नड मधील बार्गेन स्कील कामी आले.
काहिसं विषयांतर पण या वरून पारगडावर रघुवीर शेलार मामांकडे भारीच मजा आली. झालं असे की पहिल्यांदाच बोलत असताना उत्साहाच्या भरात आमची बडबड चालू झाली. नारायण अंकल व उषा काकू हे मुळचे केरळमधील, त्यामुळेच अधेमधे ते मल्याळम भाषेत बोलायचे. अश्विनी पण कर्नाटक बाॅर्न, मातृभाषा कन्नड मग ती चार्वी सोबत कन्नड मध्ये बोलायची, तर मी आणि चार्वी मराठीत. मध्येच अंकल व अश्विनी फाडफाड इंग्रजी तर मी व उषा काकू कधी हिंदीत..
हा सारा गुंता पाहून शेलार मामा म्हणाले तुम्ही नक्की आहात कोण ? त्यांचा चेहरा पाहून जाम हसायला आले. त्यांना म्हणालो This is unity in diversity... ते पण पाहतच राहिले..असो....
रात्री अस्सल अश्विनीच्या आवडीचे कानडी पध्दतीने जेवण. सकाळी लवकर आवरून बेळगावचा किल्ला नियोजनात, खाली हॉटेल मध्ये टीवी त्यात एकच बातमी ओरडून सांगत होते नोटबंदी... मोदी... भाजपा...
गेले काही दिवस टीवी बातम्या पासून दूर होतो म्हणून हे काय चाललंय ते कळेना मग शांततेत नीट काय ते समजले. सरकारने काही नोटा चलनातून बाद करायचा निर्णय घेतला होता. आम्ही राहिलो तो हाॅटेलवाला भला माणूस त्याने एटीएम मधून काढलेल्या पैशातून आम्हाला सुटे पैसे दिले.. या गडबडीत किल्ला वगैरे काही सुचेना किंबहुना लवकर परतीला लागू असं ठरले. तसेही सात दिवस व सहा रात्र मुक्काम घडले होते..
स्टार्टर मारला थेट NH 4 ...... हायवे वर बघतो तर काय रस्ता पुर्ण रहदारी मुक्त त्यात नोटबंदी मुळे कुठेही टोल नाही..सहाजिकच गाड्यांच्या रांगा नाहीच. सुसाट कोल्हापूर गाठून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन दुपारच्या जेवणाला सातारा. घड्याळात पाहिलं तर फक्त दिड वाजलेला या वेगाने जर घरी गेलो तर अंधार पडायच्या आत घरी पण असे झाले तर यात मजा नाही. मग काय जेवण झाल्यावर लगेच गाडी देगाव मार्गे पाटेश्वर रवाना. कोटीश्वरलिंग पाटेश्वर असंख्य शिवलिंग आणि सुरेख स्थापत्यशास्राचे अस्सल उदाहरण. या बद्दल लिहायचे झाले तर वेगळाच लेख होईल तसेही या पाटेश्वर बद्दल भरपूर माहिती पुस्तकात व इंटरनेट वर उपलब्ध आहे. एकदा तरी भेट देऊन अनुभवावे असे हे मंत्रमुग्ध करणारं पाटेश्वर.. आमची या भटकंतीची शेवटची सायंकाळ आम्ही या प्राचीन व रमणीय पाटेश्वरात घालवली...अत्यंत समाधानी चित्ताने परतीचा लागलो ते पुन्हा कधीतरी येण्यासाठीच......
कोल्हापुर परगणा
Submitted by योगेश आहिरराव on 1 March, 2023 - 02:37
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा