![सौजन्य - IMdB](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/02/26/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A0%E0%A4%BE.jpg)
उंबरठा
कृष्णधवल स्वरूपात हा चित्रपट मी पहिल्यांदा ल्हानपणी पाहिला, तो सह्याद्री वर शनिवार / रविवार मराठी चित्रपट दाखवत असत, त्या काळात. अर्थातच काही समजला नव्हता, पण तेव्हा माझ्या आईचा एक उद्गार मात्र लक्षात राहिला, "बाईनं घराचा उंबरठा ओलांडला, की घरात पुन्हा प्रवेश नसतो." याचाही अर्थ तेव्हा समजला नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी ऊनपावसाच्या क्षणांच्या गाठीभेटी झाल्या, तेव्हा चित्रपट पुन्हा पाहिल्यावर त्यातले संदर्भ काहीसे उमगले. पूर्णपणे समजले असा दावा करणं शक्य नाही.
हा चित्रपट शांता निसाळ यांच्या कादंबरीवर आधारित आहे. पटकथा विजय तेंडुलकरांची आहे. सुलभा महाजन ची भूमिका स्मिता पाटीलनं तर तिचा नवरा सुभाष महाजनची भूमिका गिरीश कर्नाड यांनी साकारली आहे. पौर्णिमा गानु (मनोहर) हिनं या जोडप्याच्या गोड मुलीची भूमिका केली आहे. या चित्रपटास १९८२ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट - राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्र सरकारचाही सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार लाभला आहे. या चित्रपटासाठी स्मिता पाटीलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव करण्यात आला.
स्मिता पाटील ही माझी आवडती अभिनेत्री. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी किंवा निर्मात्याने, सुलभा साकारण्यासाठी तिच्या निवडीतून जो परिणाम साधला आहे, तो अन्य पर्यायातून साधला असता का, असं प्रश्नचिन्ह उभं राहतं, इतकी तिने ही भूमिका जगलेली आहे. तिच्या बाबतीत ही नित्याची बाब असेलही. पण चित्रपट फार परिणामकारक होण्यासाठी हेही एक कारण आहे.
आता चित्रपटाच्या कथावस्तूकडे वळते. यामध्ये नायक /नायिका असं कदाचित नाही म्हणता येणार. माझ्या मते, स्त्रीत्व हीच नायिका. तिचे विविध पैलू मांडतानाच कथानकाची घडण होत जाते. स्मिता /सुलभा ही एका प्रतिष्ठित कुटुंबातील एक व्यक्ती. तिचा नवरा सुभाष हा प्रसिद्ध वकील तर मोठा दीर डॉक्टर आहे. चित्रपटात सुरुवातीला स्मिता एक सर्वसामान्य घरातील गृहिणीप्रमाणे वावरताना दिसते. तरी नीतिमत्तेची चाड असणं, न्याय- अन्याय यांच्या संकल्पना सुस्पष्ट असणं, हे तिच्या देहबोलीतून जाणवत जातं. तिची आपल्या लेकीवर माया आहे, एकत्र कुटुंबात वावरताना ती आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडते आहे. कुटुंबावर प्रेम आहे, पण तिच्या अबोल व्यक्तिमत्त्वामुळे ती ते थेट दर्शवू शकत नाही, की कौटुंबिक साचा आपल्या स्वभावधर्माहून वेगळा आहे, हे जाणवून ती ते दर्शवत नाहीये?
घरचे सगळे आपापल्या पॅटर्नमैध्ये जगत आहेत. सासूबाई सामाजिक कार्य करणाऱ्या. पण उच्चभ्रू पांढरपेशा जीवनाला किंचितही धक्का न लागेल इतपत. आपल्या दोन्ही मुलांना व्यावसायिक जीवनात सल्ले देण्याइतपत समज आणि सत्ता त्यांना आहे. मोठा मुलगा म्हणजे श्रीकांत मोघे हा व्यवसाय करताना दिसतो, पण अगदी थेट भ्रष्टाचार किंवा मनमानी करून नाही. तसेच स्मिताचा नवरा गिरीश कर्नाड उत्तम वकील आहे खरा, पण नीति- अनीतीच्या पेचांत न अडकता काम करतो आहे. आपल्याला काही केसेस च्या चर्चेतून या सगळ्याचा अंदाज येत जातो. आशालता वाबगावकर ही मोठी सून. तसा तोरा तिला नाहीये, पण रीतीनं असेल किंवा मळलेल्या वाटेने चालणारी असल्याने असेल, घरात तिला जरा मान्यताप्राप्त स्थान आहे. तिला मूल नाही, तरी कुणी हिणवताना दिसत नाही. म्हणजे हे कुटुंब टिपिकल विचारसरणीचं असलं, तरी इतकं तरी पथ्य पाळतंय. आशालता आपल्या मायेचा वर्षाव स्मिताच्या लेकीवर करतेय. इतका, की ती गोडुली आपल्या आईपासून नकळत दुरावते आहे..हट्टीही बनतेय. ह्याची बोच स्मिताला जितकी जाणवत आहे, तितकीशी नवऱ्याला नाही. तेही स्वीकारून स्मिता आपल्या शिक्षणानुरूप आभाळ शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
एक वरकरणी छान सुस्थितीत असलेलं कुटुंबचित्र.
यात खळबळ माजते ती स्मिताला तसं आभाळ खुणावतं आणि त्यामध्ये पंख पसरण्याची इच्छा ती व्यक्त करते तेव्हा.. गिरीश कर्नाडचा स्वभाव आकांडतांडव करण्याचा नाही. आपली नाराजी तो प्रत्येक प्रसंगी विशिष्ट पद्धतीनं व्यक्त करतो. मला तरी तो आपमतलबी, तरीही स्मितावर पत्नी म्हणून तेवढ्या प्रमाणात प्रेम करणारा वाटला. पण नंतर क्लायमॅक्सच्या वेळी त्याचं वागणं पाहून, जयवंत दळवी यांनी एका ठिकाणी लिहिल्याप्रमाणे 'फ्लेश पुरतं बघणारा' नवरा वाटू लागला.
तर स्मिताला एका निराधार महिलाश्रमात पर्यवेक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. आपली मुलगी काकू जवळ आनंदात राहील , याची खात्री आणि नवऱ्याचं नाराजीनं का होईना, पण अनुमोदन यांच्या जोरावर ती आश्रमात रुजू होते. तिथे समाजातील विविध स्तरांतील वयोगटातील निराधार स्त्रिया आहेत. प्रत्येकीची कहाणी वेगळी असली, तरी गंतव्यस्थान आश्रम हेच आहे. ह्या व्यथा आणि कथा प्रसंगवशात स्मिताला आणि आपल्यालाही समजत जातात. ती व्यथित होते, पण आपल्या पदाचा आब राखण्यासाठी तसं दर्शवत नाही. त्या जीवनात शिस्त आणण्यासाठी, त्यांना अधिक चांगलं आयुष्य, तेही सन्मानाने जगता यावं, म्हणून ती सतत प्रयत्नशील असते. पण ही गोष्ट प्रस्थापित संभावितांना कशी रुचावी? या अनुषंगाने आश्रम ही संस्था, तिची कार्यपद्धती, भ्रष्टाचाराच्या वाटा, विश्वस्तांची भूमिका (त्यांच्या मीटिंगमध्ये वागण्याच्या तऱ्हा अक्षरशः चीड आणतात. चेअरमन ची भूमिका करणारी दया डोंगरे तर यांची मेरुमणि), निराधार स्त्रियांचं भावविश्व, सर्वच पातळीवरील गरजा
तडजोडी, चारित्र्याचे धिंडवडे इ. अनेक तपशील दाखवत कथा सुरू असते. कथेच्या ओघात गाणीही येतात. ही गाणी रसभंग करीत नाहीत. प्रसिद्ध आहेत. मला गगन सदन आवडतंच. पण अधिक /अत्यंत आवडतं व ऐकताना, विशेषतः पाहताना, प्रत्येक वेळी अंतःकरणाचा अवकाश स्तब्ध करून टाकणारं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... त्यामधे असलेली शब्दांची नि संगीताची कमाल साथसोबत आणि काळ्या मोठ्या चष्म्यातून हातातल्या अल्बममध्ये हातून निसटून गेलेले स्मृतिक्षण गोंजारत, भावनांना आवर घालणारी स्मिता मला विलक्षण वाटते नेहमी. नंतर सारेगम च्या एका भागात पं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी ह्या गीताची कथा सांगितली होती, तीही मनात घर करून आहे. तुझे हसू आरशात आहे ही ओळ शांताबाईंनी सुचवली होती. आणि हे गाणं ऐकल्यावर स्मिता ढसाढसा रडली होती. असं उत्कटतेने भूमिका जगणं किती विलोभनीय आहे ना.
तर मध्येच एकदा गिरीश स्मिताला भेटायला आश्रमात येतो. त्या एक दिवस व एक रात्रीच्या मुक्कामात जे घडतं त्यावरूनच पुढच्या कथानकाच्या वळणांचा थोडा अंदाज येतो. पुढे स्मिता तिथल्या अनिष्ट कार्यपद्धतीमुळे नोकरी सोडून घरी परत येते खरी. पण तिचं घरी परतणं, हे या टप्प्यावर कुटुंबातील लोकांकडून तितकंसं स्वागतार्ह नसतं..
स्त्रीने उंबरठा ओलांडणं, न ओलांडणं, उंबरठ्याच्या आतलं आणि बाहेरचं जग यांमधलं अंतर हे एका उंबरठ्याइतपतच असत नाही,याची जळजळीत जाणीव जशी स्मिताला होते तशीच तिची धग आपल्यालाही जाणवते. आयुष्याच्या या टप्प्यावर स्मितानं उचललेलं पाऊल प्रातिनिधिक म्हणावं का, हे मला सांगता येणार नाही. कारण काळ कुठलाही असला, तरी उंबरठे असतातच.. फक्त आता ते अदृश्य असू शकतात.. ओलांडणं वा न ओलांडणं, दोन्हीकरिता बळ तर हवंच. आत्मबळ असेल, आर्थिक बळ असेल किंवा आणखी काही..
या उपक्रमाच्या माध्यमातून माझ्या आवडत्या चित्रपटावर लिहिण्याची संधी मिळाली, याबद्दल संयोजकांना धन्यवाद.
- प्राचीन.
चित्रपटाचं पोस्टर- सौजन्य - IMdb
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!
'साधना'च्या दिवाळी अंकात जब्बार पटेलांची एक दीर्घ मुलाखत 'उंबरठा'बद्दल आली होती. ही तिची लिंक.
https://weeklysadhana.in/view_article/jabbar-patel-interview-on-film-umb...
या इतक्या सुंदर गाण्यांसाठी लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी एकही रुपया घेतलेला नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मला आता बघितल्याला बरीच वर्षं झाली, पण नवरा 'फ्लेशपुरते' बघतो असं आठवत नाही. तिच्या गरजा आणि प्रायॉरिटीज आहेत तशा इतरांच्याही आहेत, आणि त्यावर प्राइस टॅगही आहे. तो भरावाच लागणार.
वावे, लिंक वाचते, धन्यवाद.
हा चित्रपट मला कधी पासून
हा चित्रपट मला कधी पासून baghaycha आहे. सुंदर परिचय करून दिला आहे तुम्ही...
वावे, लिंक बद्दल धन्यवाद!
मस्त रसग्रहण केलयस.
मस्त रसग्रहण केलयस.
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!
सुरेख रसग्रहण!
सुरेख रसग्रहण!
वावे,इतक्या सुरेख लिंकबद्दल अनेक धन्यवाद!
मस्त लिहिले आहे.. खरंच उंबरठा
मस्त लिहिले आहे.. खरंच उंबरठा ची पातळी फार वरची आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मला ही साधना मधला लेख आठवला . तो वाचल्या नन्तर तूनळी वर मुव्ही पण बघितलेला परत.
छान लेख .....
छान लेख .....
वावे, लिंक बद्दल धन्यवाद !...... साधना मधला लेख आवडला. यातील सारेच दिग्ग्ज अतिशय प्रतिभाशाली, परिपूर्णतावादी, अभ्यासु व संवेदनशील.
परफेक्शनिस्ट करता
परफेक्शनिस्ट करता परिपूर्णतावादी हा उत्तम शब्द योजिला आहे योगेश अहिराव. मला या शब्दाला अडखळायला होत असे की भाषांतर कसे करावे.
छान लिहिलंय तुम्ही...
छान लिहिलंय तुम्ही...
उंबरठा कांदबरी वाचली आहे बऱ्याच वर्षापूर्वी मात्र चित्रपट पूर्ण पाहिला नाही अजून ... आता पाहीन नक्की..!!!
हे परिक्षण खूपच भावले.
हे परिक्षण खूपच भावले.
उंबरठा चित्रपटाबाबतचं उत्तम
उंबरठा चित्रपटाबाबतचं उत्तम मनोगत, या चित्रपटाबाबत अनेक वेळा वाचलेलं आहे. ज्यावेळी पाहिलाआ त्या वेळी खोलवर समज नसल्याने पुन्हा बघावा लागेल. तुमच्या लेखाने पुन्हा एकदा तीव्र इच्छा झाली. धन्यवाद.
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!
अरे वा. अजून एक लेख 'उंबरठा'
अरे वा. अजून एक लेख 'उंबरठा' वर.
हा देखील छान आहे. सुरेख रसग्रहण केलंयस प्राचीन.
प्राचीन, फार आवडलं. यावेळी
प्राचीन, फार आवडलं. यावेळी मभागौदि मुळे किती सुंदर लेख वाचायला मिळाले. आता परत उंबरठा पहायला पाहिजे इतके सुरेख रसग्रहण केले आहे.
वावे, लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. मुलाखत अगदी वाचनीय आहे.
हा लेख सुद्धा आवडला. दोन
हा लेख सुद्धा आवडला. दोन वेगवेगळ्या आयडीज नी तीस एक वर्षापूर्वी आलेला हा सिनेमा निवडावा यातच काय ते आले.