मराठी भाषा गौरव दिन- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - पायस - हिरवं कुंकू

Submitted by पायस on 25 February, 2023 - 18:52

भारतातील आद्य चित्रपटसृष्टी असूनही जुने विनोदी चित्रपट वगळता मराठी चित्रपटसृष्टी ही आंतरजालावर काहीशी दुर्लक्षितच राहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट आणि मराठी चित्रपट यामध्ये हे विलक्षण साम्य आहे - काय ते ७०-८० च्या दशकातले वेगवान गोलंदाज होते/काय ते ७०-८० च्या दशकातले खळखळून हसवणारे विनोदी चित्रपट होते! अस्मादिकांच्या मते याचे एक कारण आपले अनेक पटकथाकार अमूर्त अभिव्यक्तीवादी (abstract expressionist) आहेत. जसे अमूर्त अभिव्यक्तीवादी चित्रकारांमधल्या मार्क रोथकोने मारलेल्या फराट्यांचे किंवा जॅकसन पोलॉकने उडवलेल्या शिंतोड्यांचे रसग्रहण करणे हे एक शिवधनुष्य आहे तसेच आपल्या लेखकांच्या कल्पनेच्या भरार्‍या समजून घेणे आव्हानात्मक आहे. या कारणाने अनेक विश्लेषणात्मक दृष्ट्या रंजक चित्रपट विस्मरणात जाऊ लागले आहेत. त्यापैकी एक म्हणजे हिरवं कुंकू!

तेजा देवकर अभिनीत हिरवं कुंकू सहसा 'नागाचा मुकावाला चित्रपट' किंवा 'नागाला फ्रेंडझोन केलेला चित्रपट' म्हणून ओळखला जातो. पण या विशेषणांपलीकडे जाऊन शोधल्यास कथेमध्ये पदरच पदर दिसून येतात. या पदरांना हात घालण्यापूर्वी एक खुलासा - चित्रपटात नाग असला तरी तो इच्छाधारी नाग नाही. त्यामुळे या चित्रपटाची तुलना नागीन, नगीना, शेषनाग, नाचे नागीन गली गली वगैरे सामान्य हिंदी चित्रपटांशी करणे अयोग्य ठरते. किंबहुना मराठमोळ्या अशोक गायकवाड दिग्दर्शित दुधाचे उपकार (दूध का कर्ज) चा सन्माननीय अपवाद वगळता या बाजाचा चित्रपट कोणत्याच भाषेत आढळत नाही. असे ध्रुवतार्‍यासारखे अढळस्थान प्राप्त केलेल्या चित्रपटाचे रसग्रहण करण्याचा हा यथाशक्ती प्रयत्न!

चित्रपटाचे थोडक्यात कथानक पुढीलप्रमाणे - टुमदार गावात रावसाहेब मोठे प्रस्थ! त्यांची पुतणी जान्हवी हिला गावाबाहेरच्या वारूळात राहणार्‍या भुजंगाचे खूप आकर्षण आहे ('मला एकदा भुजंग बघायचा आहे'). बालपणी एकदा वारूळापाशी खेळताना जान्हवी अनवधानाने "भुजंगाशी लग्न करणार आहे" बोलून जाते आणि कधीही वारूळाबाहेर न पडणारा भुजंग फणा ताठ करून बाहेर येतो. जान्हवीला चिडवणार्‍या मैत्रिणीला तो डसतो आणि रावसाहेब त्याचे वारूळ उद्ध्वस्त करतात. पण जान्हवी गुपचूप त्याला आपल्या वाड्याच्या मागील झाडाच्या ढोलीत राहायला जागा देते. अशीच वर्षे जातात आणि जान्हवी मोठी होऊन तेजा देवकर बनते. मध्यंतरीच्या काळात तिचे रक्षण भुजंग गावगुंडांना चावून करत असतोच. बाळ धुरीच्या मुलाशी तेजातैंचे लग्न ठरते. मग त्या भुजंगाला जाऊन "परत मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस" असे सुनावून सासरी जातात. यावर चिडून भुजंग घरातल्या, देवळातल्या, दिसेल त्या कुंकवाच्या करंड्यात विष कालवतो. त्याने कुंकवाचा मूळचा लाल रंग बदलून होतो हिरवा - अर्थात हिरवं कुंकू!

उर्वरित कथानकात भुजंगाने तेजातैंच्या संसारात आणलेली विघ्ने आणि त्यांनी त्याचा धीरोदात्तपणे केलेला सामना दाखवला आहे. चवीला सासरी खाष्ट आत्याबाई (उषा नाईक), आत्याची मुलगी जिचा मामाच्या मुलावर डोळा आहे (माधवी निमकर), नारायण छाप नोकर (सतीश तारे) इ. लोक आहेत. चित्रपट रोमांचक आहे, भावनाप्रधान आहे, नाट्यपूर्ण आहे (इसमे अ‍ॅक्शन हैं, इमोशन हैं, ड्रामा हैं). असे असूनही चित्रपट दुर्लक्षित राहण्याचे कारण बहुधा यातील छेकापन्हुति (दादा कोंडक्यांचा आवडता भाषालंकार) असावी. पण काकदृष्टिने चित्रपट बघितल्यास इतर पैलू नजरेस पडतात.

सर्वप्रथम नजरेत भरते ती या चित्रपटाचे रुपकप्रधान स्वरुप! हा संपूर्ण चित्रपट विषारी नातेसंबंधांवर (टॉक्सिक रिलेशनशिप) भाष्य करतो. टॉक्सिक एक्स ही संज्ञा तेव्हा अस्तित्वातही नसेल पण टॉक्सिक एक्सचे खरे स्वरुप लक्षात घेऊन अत्यंत चतुराईने त्या पात्राकरिता विषारी अशा नागाची निवड केली आहे. इतर चित्रकर्मींनी कितीही प्रयत्न केले तरी भुजंगापेक्षा अधिक विषारी भूमिका त्यांना वठवता येणार नाही. जर एक्स जहरीच दाखवायचा असेल तर खर्‍याखुर्‍या नागापेक्षा विषारी कलाकार मिळणे शक्य आहे का? अशा रीतिने आपण रुपकप्रधान विचार केल्यास आपल्याला भुजंगाच्या व तेजातैंच्या भूमिकेचा समग्र अभ्यास करता येतो. आधी भुजंग - विषारी नातेसंबंधात गुंतलेल्या व्यक्तीप्रमाणेच भुजंगामध्ये शून्य स्वाभिमान आहे. उदा. एका पॉईंटला गावातील सावकाराची नजर वयात आलेल्या जान्हवीवर पडते. तिला रस्त्यात अडवून छेड काढण्यापर्यंत त्याची मजल जाते. मग नदीवर जान्हवी आणि तिची सखी एकट्याच असताना तो वाईट हेतुने तिथे थडकतो. ते बघून भुजंग हल्ला करून त्याचा जीव घेतो. यावर तेजातै त्याला "परत मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस" भाषण ठोकतात. तो सावकार कितीही लोचट, नीच असेना का, भुजंगाला त्याचा जीव घेण्याचा अधिकार नाही असे त्यांचे म्हणणे. इथे सोयीस्कररित्या त्या विसरतात की त्यांच्या बालपणीच्या मैत्रिणीने 'केवळ भुजंगावरून चिडवले' या किरकोळ कारणावरून भुजंगाने त्या मैत्रिणीचा जीव घेतला होता. त्यामुळेच त्याचे वारूळ फोडले गेले. आणि तेजातैंनीच एवढे झाल्यावर भुजंगाला आपल्या घरात आसरा दिला. आणि जेव्हा भुजंगाने त्यांचे रक्षण केले तेव्हा त्या भुजंगाला दुटप्पी वागणूक देतात. एवढे असूनही भुजंग रात्री निमूटपणे मनधरणी करायला गपचूप त्यांच्या खोलीच्या खिडकीत येतो.

जशी एका हाताने टाळी वाजत नाही तसेच विषारी नातेसंबंध निर्माण होण्यास दोन्ही संबंधित कारणीभूत ठरतात. वर लिहिल्याप्रमाणे जहरी कलाकार समोर असल्यावर त्याला तुल्यबळ अभिनेत्री असणे अत्यावश्यक आहे. तेजातैंनी हे शिवधनुष्य पदार्पणातच पेलले आहे. त्यांच्या कलागुणांना या चित्रपटानंतर म्हणावा तसा वाव मिळाला नाही - भरला मळवट रक्ताने (खून भरी मांगचे स्वैर रुपांतर), कर्ज कुंकवाचे सारखे काही अपवाद वगळता - हे खेदाने नमूद करावे लागेल. संपूर्ण सिनेमात जान्हवी विषारी नातेसंबंधांची दुसरी खूण दाखवते - संदिग्ध संवाद आणि वर्तन. भुजंग रात्रीचा वारंवार खिडकीत येतो हे लक्षात आल्यानंतरही जान्हवी उत्तेजनच देत राहते. त्याचीच परिणती नागमुक्यात होते (नोंद: इथे जर तुमच्या डोक्यात खेळ दाखवणारे गारुडी घेतात तसला फण्याचा मुका असेल तर तुमची अजून या दृश्यासाठी तयारी झालेली नाही. केवळ अंदाज बांधण्यापुरते एकदम कामुक दृश्याची कल्पना करा.) या नागमुक्याने जान्हवी पार महिरून जाते. भुजंगाकडून स्पष्ट संदेश येत असतानाही जान्हवी त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करते आणि वेळ येताच त्याच्या शेपटावर पाय देऊन लग्न करते.

चित्रपटाचा पूर्वार्ध रुपकप्रधान बनवल्यानंतर उत्तरार्ध थकल्या जीवाला विसावा म्हणून ग्रामीण मेलोड्रामा आहे. जान्हवीचे लग्न ठरते ते इनामदार (बाळ धुरी) सुपुत्र शिवराज इनामदारशी! इथे चित्रपटाचा चमू नवशिका असल्याची पहिली लक्षणे दिसून येतात. उदा. संवादलेखकाने जान्हवी हे गंगेचे एक नाव आणि शिवराज अर्थात शिवाने शंकराने जशी गंगा धारण केली तशी तिला धारण केली आहे असे दिव्य ड्वायलॉक प्रेक्षकावर फेकून मारण्याची संधी दवडली आहे. हाडाचा अचाट चित्रपटकर्मी अशा हाफ व्हॉली वाया घालवत नाही. सासरची मुख्य पात्रे पाच - १) सासरे (बाळ धुरी) - यांचा बहुतांश वेळ आपल्या दिवंगत पत्नीच्या छायाचित्रासोबत गप्पा मारण्यात जातो. २) आत्याबाई (उषा नाईक) - सासरच्या संपत्तीवर डोळा. त्यासाठी आपली मुलगी नलिनी या घराची सून कशी होईल याच्या योजना आखणे हा मुख्य कामधंदा. ३) नलिनी (माधवी निमकर) - आईच्या तालाने वागणे, ४) सतीश तारे - घरातील नोकर. मधून मधून पांचट विनोद मारण्यासाठी केलेली योजना. ५) दीर विक्रांत- याच्याकडे नंतर परत येऊ. यातील आत्याबाई-नलिनीचे बव्हंशी प्रयत्न हे भुजंगामुळे येणारी संकटे ही जान्हवी पांढरी पायाची असल्यामुळे येतात या संकल्पनेभोवती फिरतात. इथे हाडाच्या अचाट चित्रपटकर्मीने आत्याबाई-नलिनीची भुजंगासोबत युती, त्या युतीवर दुधाचे ग्लास व चकण्याच्या साक्षीने केलेले शिक्कामोर्तब दाखवले असते. पण तसे काही होत नाही.

राहता राहिला दीर! हे पात्र भयानक आहे. सुरुवातीस शिवा लग्नास नकार देतो. पण दीर गुपचूप वहिनीचा फोटो मिळवून आपल्या दादाला लग्नासाठी तयार करतो. नंतर तो स्पष्ट म्हणतो की वहिनीला बघितल्यावर माझ्या मनात माझ्या आईची छबी डोळ्यासमोर येते. पण या भावजींना हे कळत नाही की वहिनीत आईची छबी दिसली तरी वहिनीला "मला तुमच्या मांडीवर झोपून हट्ट करावासा वाटतो" असे म्हणायचं नसतं. विशेष म्हणजे या प्रकारावर शिवा कसलीही हरकत घेत नाही. दुसरी कोणी असती तर यापेक्षा भुजंगच बरा असे म्हणून काढता पाय घेतला असता पण तसेही काही होत नाही.

लेखकाला मध्येच थकल्या भागल्या प्रेक्षकाची दया आल्याने त्याने कथानक पुढे नेण्याच्या दृष्टीने तीन प्रसंग टाकले आहेत. पहिल्या रात्री भुजंगाने प्रेमगीतात व्यत्यय आणणे. अंगठी शोधण्याचा खेळ चालू असताना शिवावर भुजंगाचा हल्ला. आणि दीराचे "आईची आठवण येते" टुमणे असह्य झाल्याने रंगपंचमीच्या दिवशी भुजंगाकरवी त्याची इहलोकातील यात्रा संपवणे. सासरचे लोक इतक्या वेळ असेल कोणीतरी नाग म्हणून सोडून देत असतात पण दीर मेल्यानंतर तेजातैंना सत्य सांगावे लागते. आणि मग येतो चित्रपटातील दुसरा महान प्रसंग - नागाला फ्रेंडझोन करणे. तेजातैं नागासमोर उभ्या राहून त्याला ठणकावून सांगतात - "मी तुझी विषारी सावली माझ्या कुंकवावर पडू देणार नाही. आयुष्यभर मी तुला फक्त मित्र मानत आले. मी तुझी कधीच होऊ शकत नाही." या संपूर्ण प्रसंगात तो नाग प्रचंड वैतागलेला आहे. त्याला बोलण्याची शक्ती दिली तर तो नक्की म्हणेल की बाय माझे, मला तुझ्यात इंटरेस्ट नाही. आयुष्यभर तू मला दूधभात खायला लावून माझ्या पचनसंस्थेचे जे वाटोळं केलंस त्याचा बदला घ्यायला मी आलो आहे.

अखेर शिवा भुजंगाला मारण्याचा निर्णय घेतो. अर्थातच त्याला काही ते जमत नाही उलट भुजंगच त्याला दंश करतो. आता तेजातैंकडे पुढील पर्याय आहेत - १) लगेच नवर्‍याला शहरात डॉक्टरकडे नेऊन प्रतिविषाची लस टोचणे. २) जखमेतील विष चोखून थुंकून टाकणे. ३) त्यांना सोळा सोमवारचा सल्ला दिलेल्या नाथपंथी साधूला बोलावून त्याच्याकडून विष उतरवणे. आणि अर्थातच त्यांनी निवडलेला पर्याय आहे
...................
...................
...................
...................
...................
...................
पर्याय क्र. ४) शंकराच्या मंदिरात तांडवनृत्य करणे. त्यांनी निवडलेला उपाय बघितल्यानंतर भुजंग गपगुमान येतो आणि शिवाच्या शरीरातून स्वत:चे विष चोखून काढून घेतो आणि तेजातैंच्या संसारातून कायमचा निघून जातो. त्यांच्या पातिव्रत्याची शक्ती बघून सासरची सर्व मंडळी त्यांना शरण येतात आणि साठाउत्तराची कहाणी पाचा उत्तरा सफळ होते.
****
इथे वेताळाने विक्रमाला प्रश्न विचारला - विक्रमा, भुजंगाने शिवाला जीवनदान का दिले? जान्हवीच्या नृत्याने आणि वटारलेल्या डोळ्यांनी तो घाबरला तर नाही ना? का भगवान शंकरांनी त्याला एकतरी सत्कृत्य करण्याची प्रेरणा दिली? का जवळपास शंभर वर्षे जगलेल्या भुजंगाला जान्हवीच्या मागे फिरण्यापेक्षा इच्छाधारी बनण्यात अधिक फायदा आहे हे समजले असेल? जर तू बरोबर उत्तर दिले नाही तर तुझ्या मस्तकाची शंभर शकले होतील.
विक्रम हसला. अरे वेताळा, जान्हवीची अतार्किक उपाययोजना आणि शिवाचे एकट्यानेच भुजंगावर हल्ला करण्याचे वेडे साहस बघता दोघेही डोक्यावर पडलेले असल्याची भुजंगाची खात्री पटली. तेव्हा त्यांना डोक्यावर पडलेल्या माणसासोबत आयुष्य घालवणे याहून मोठी शिक्षा दुसरी ती कुठली? असा सारासार विचार करून भुजंगाने अखेर मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेऊन जाता जाता सूड उगवण्याकरता शिवाला जीवनदान दिले.
****

एवढे प्लॉट पॉईंट भरलेले असतानाही जर रस निघून जाऊ लागला तर नेहमीप्रमाणेच आपल्याला बॅकग्राऊंड एलिमेंट्स अभ्यासता येतात. उदा. गावात शंकराचे मोठे देऊळ आहे, जवळपास सर्वचजण शिवभक्त दाखवले आहेत. पण घरांमध्ये चतुर्भुज लक्ष्मी, राम, विठ्ठलाच्या तसबिरी/मूर्ती आहेत. जान्हवीच्या सासुरवाडीत एकच धातुची फुलदाणी सर्व खोलीत कशी फिरते आणि तिचा नवरा येताजाता ती फुलदाणी कशी पाडत राहतो. तेजातैं नागाला भाषणे देतात तेव्हा नागाच्या भावमुद्रांचे वर्गीकरण करणे - गोंधळ, वैताग, त्रागा, आश्चर्य इ. नाग इंडियन कोब्रा (दहाच्या आकड्याचा नाग) असतानाही त्याला किंग कोब्राचा (नागराज) गर्जनेचा आवाज दिला आहे. आणि सर्वात मोठ्ठी लक्षवेधी बाब ही की हा चित्रपट नीता देवकर (तेजाच्या मातोश्री?) यांनी आपल्या आईच्या एकसष्टीनिमित्त तिला अर्पण केला आहे!

याहून अधिक खोलात गेलो तर आपण डोहात बुडू. तरी आवरते घेऊयात. जाता जाता धरमपाजी देतात त्याप्रमाणे परीक्षणाचा संदेश - जपानी रहस्य कादंबर्‍यांमध्ये डोगुरा मागुरा नावाची गाजलेली कादंबरी आहे. ती कादंबरी वाचून आजवर जगात कोणी सुखी झालेले नाही पण आधुनिकोत्तरवादाचा (पोस्ट मॉडर्निजम) आणि मेटाटेक्स्टचा अतिरेक झाले तर काय होते हे ती कादंबरी शिकवते. तसेच जडगंभीर प्रतीकप्रधान चित्रपट बनवण्याच्या अट्टाहासापायी अतर्क्य कथानकाची कशी माती होते हे आपल्याला हिरवं कुंकू शिकवतो.

यानंतरही चित्रपट बघायचा असेल तर आपल्या जबाबदारीवर बघावा - साहसी व्यक्तींकरता झी ५ वर उपलब्ध!

Group content visibility: 
Use group defaults

Lol धमाल लिहिलेयं.
टॉक्सिक रिलेशनशिप्स Lol
नागमुका म्हटल्यावर विद्या बालनचे डर्टी पिक्चरमधले गाणे आठवले. Proud
https://youtu.be/Zd2mBEkom6M

भयंकर छान लिहिलंय. विषयानुरूप म्हणून नमस्कारा ऐवजी भुजंगप्रयात स्वीकारावा. आपण डोहात बुडून जाऊ हे वाचून आवरलेल्या हसण्याचा बांध फुटला.

सर्व वाचकांचे आभार Happy
अस्मिता, साद, rmd, धनि, MazeMan, प्राचीन, यानिशा, मानव, सामो >> प्रतिसादाकरता धन्यवाद Happy

कसलं भारी लिहिलंय पायस. विकेंडसाठी राखून ठेवलेल्या ह्या लेखानं विकेंड सत्कारणी लागला.

“ 'मला एकदा भुजंग बघायचा आहे” - गुलशन राय निर्मीत आणि राजीव राय दिग्दर्शित ‘त्रिदेव’ मधे हाडामांसाचा भुजंग, उर्फ दुर्जनसिंग पाहिलाय. Happy

सर्वप्रथम नजरेत भरते ती या चित्रपटाचे रुपकप्रधान स्वरुप! हा संपूर्ण चित्रपट विषारी नातेसंबंधांवर (टॉक्सिक रिलेशनशिप) भाष्य करतो. <<<<<<<
अमेझिंग! आज हे रसग्रहण वाचल्यावर टोटली 'I was today years old...' फीलिंग आली.

आणि सर्वात मोठ्ठी लक्षवेधी बाब ही की हा चित्रपट नीता देवकर (तेजाच्या मातोश्री?) यांनी आपल्या आईच्या एकसष्टीनिमित्त तिला अर्पण केला आहे!<<<<<<
नीता देवकरांच्या आईने पंचाहत्तरीला मात्र मुलीकडून 'मी आता चित्रपट बनवणार नाही' असे वचनच घेतलेले दिसते भेट म्हणून. कारण 2018 साली 'हिरवा सिंदूर अर्थात हिरवं कुंकू पार्ट 2' वगैरे काही रिलीज झालेले दिसले नाही.

याहून अधिक खोलात गेलो तर आपण डोहात बुडू. तरी आवरते घेऊयात. जाता जाता धरमपाजी देतात त्याप्रमाणे परीक्षणाचा संदेश -<<<<<<
धरमपाजींचा संदेश म्हणजे तोच का? 'If you want to shoot, shoot.. don't talk!'

फेरफटका, झकासराव, Ajnabi, श्रद्धा >> धन्यवाद Happy

‘त्रिदेव’ मधे हाडामांसाचा भुजंग, उर्फ दुर्जनसिंग पाहिलाय >> Lol टेक्निकली, यातला भुजंग रबरी नसून खरा नाग असल्याने हाडामांसाचाच भुजंग आहे. व्हिलन म्हणून 'अमरीश पुरीसी तुळणा कैशी, हिरवे भुजंग धाकुटे' हे मात्र मान्य!

नीता देवकरांच्या आईने पंचाहत्तरीला मात्र मुलीकडून 'मी आता चित्रपट बनवणार नाही' असे वचनच घेतलेले दिसते भेट म्हणून. >> Biggrin मला त्यांचा आणखी एकच चित्रपट ठाऊक आहे - शंभू माझा नवसाचा. यात तेजातै चक्क व्हिलन आहेत, त्याही अलका कुबल ताईंच्या विरोधात!

धरमपाजींचा संदेश म्हणजे तोच का? 'If you want to shoot, shoot.. don't talk!' >> Lol येस्स, तोच!

नोंद: इथे जर तुमच्या डोक्यात खेळ दाखवणारे गारुडी घेतात तसला फण्याचा मुका असेल तर तुमची अजून या दृश्यासाठी तयारी झालेली नाही. केवळ अंदाज बांधण्यापुरते एकदम कामुक दृश्याची कल्पना करा.>> जिज्ञासु , अभ्यासू मंडळींनी कृपया इकडे लक्ष द्यावे. Proud

देवा! Lol

धमाल। Rofl Rofl Rofl

नागमुका म्हटल्यावर विद्या बालनचे डर्टी पिक्चरमधले गाणे आठवले >>> मला पण

या पदरांना हात घालण्यापूर्वी >>> Lol

दुधाचे उपकार >>> याचे अचूक नाव "उपकार दुधाचे" आहे हे नम्रपणे दर्शवून देतो. भावी काळात पिक्चरच्या नावाच्या भेंड्या जर कोणी खेळत असेल व ते "उ" वर अडकले तर हे दस्तऐवजीकरण उपयोगी होईल म्हणून हा खटाटोप.

टुमदार गावात रावसाहेब मोठे प्रस्थ! >> हे एक बरे झाले. जर रावसाहेब नावाची व्यक्ती ही गावात मोठे प्रस्थ नसेल तर त्या गावाबद्दल मला अपार आदर दाटून येइल.

टॉक्सिक एक्सचे खरे स्वरुप लक्षात घेऊन अत्यंत चतुराईने त्या पात्राकरिता विषारी अशा नागाची निवड केली आहे. >>> Lol हे भारी आहे.

आयुष्यभर तू मला दूधभात खायला लावून माझ्या पचनसंस्थेचे जे वाटोळं केलंस त्याचा बदला घ्यायला मी आलो आहे. >>> इथे टोटल फुटलो Lol

नवर्‍याला वाचवण्याचे तीन पर्याय व तिने निवडलेला चौथा, हे धमाल आहे. बाय द वे, कुंकू हे विषाच्या बाबतीत लिटमस पेपरसारखे काम करत असावे.

मग नदीवर जान्हवी आणि तिची सखी एकट्याच असताना तो वाईट हेतुने तिथे थडकतो. ते बघून भुजंग हल्ला करून त्याचा जीव घेतो. >>> भुजंग तेथे काय करत होता? बहुधा तो सज्जन हेतूने आला असावा Happy अर्थात अशा पिक्चर्स मधे स्थळकाळ वगैरे लागू होत नाहीत. कोणीही कोठेही केव्हाही असू शकतो.

भुजंगाला जान्हवीच्या मागे फिरण्यापेक्षा इच्छाधारी बनण्यात अधिक फायदा आहे हे समजले असेल >>> मला हेच खरे वाटते. इच्छाधारी झालो तर उच्च दर्जाच्या पण कमी पैसे देणार्‍या मराठी रोल्स पेक्षा कामचलाउ पण लोअर सर्किट्स मधे भरपूर चालणार्‍या हिंदी पिक्चर्स मधे रोल मिळेल असे त्याला वाटले असावे. शेषनाग-२ वगैरे काही निघाले तर चान्स मिळावा असे काहीतरी त्याच्या डोक्यात असेल.

झी-५ आहे माझ्याकडे. शोधतो आता Happy

Pages