चित्रातली देवळे-देवळातले चित्र
अगदी लहानपणापासून जेव्हा कधी मला फावला वेळ मिळत असे कागदावर रेघोट्या मारतांना सहजच माझ्या हातून चित्र उमटे .एक नदी, काठावर एक देऊळ हेमाडपंथी घाटाचे , देवळामागे उंच झाड , देवळावरचा ध्वज, दगडी पायर्या , आणि बाकीचा अख्खा परिसर मोकळा .
असे निर्मणुष्य चित्र माझ्या खूप आवडीचे आहे. प्रवास करतांना बसमधून मागे पळत जाणारी डोंगरं , झाडी , कौलारू घरं , शेतं , तळी आणि देवळाचे कळस दिसतात. खुप आनंदाने मी हे बघत असते. अशा वेळी निसर्गाच्या भिन्न रुपात आपण हरवून बसतो . असं वाटतं संपूच नये हा प्रवास . आनंदाची मजा अशी आहे की , प्रत्येक आनंद हा वेगळा असतो . प्रवासात निसर्ग बघण्याचा आनंद खुप वेगळा .या प्रवासात उंच हिरव्यागर्द झाडीतून डोकावणारे देवळाचे कळस पाहून मनाला खूप आनंद होतो . माझी नजर अशी देवळे शोधत असते.
देवळे विशेषतः दक्षिण भारतातील फारच मनमोहक . एकुण काय तर सर्वच प्रसन्न.. प्रवेशद्वार ते कळस आणि पायऱ्या ते गाभारा . सगळं आखिव रेखिव स्वच्छ, सुंदर प्रमाणबद्ध . शिस्त ,टापटीप . प्रवासात दक्षिण भारतातील देवळं बघितली . प्रत्येक प्रवासात द्रुष्टीकोण निराळा होता . कधी नुसताच प्रवास . कधी देवळाची शैली अभ्यासणे , कधी नुसतेच दर्शन तर कधी मुद्दाम भेट देणे . कधी देव पावतो म्हणून आपले गाऱ्हाणे मांडणे. असे विविध हेतू असतात देवळाच्या भेटीचे . हेतू वेगळे असल्यामुळे दर्शन वेगळ्या पद्धतीने होते .
इस्कॉन मंदिर परिसरात जी भव्यता व टापटीप असते ती इतरत्र नाही . दक्षिणेकडे जी संगीतमय शास्रीय पद्धतीने चालणारी शास्तोक्त्र पूजा आहे तीला तोड नाही . बिर्ला मंदिरांची उंची आणि भव्यता नजरेत सामावल्या जात नाही . कधी प्रांतातील विविधता आणि स्थापत्य शैली याचा संगम दिसतो तर कधी क्षेत्रीय विविधता आढळते .पण साधारणतः गोपूरम , शिखर , गर्भगृह , पुष्करणी , सभामंडप , प्रांगण ,अंतराल मंडप , अर्धमंडप असे एकुण प्रकार भारतभर आढळतात .
काही देवळं राजाश्रय असताना बांधली , काही स्वयंभू आहेत , काही लोकांनी श्रद्धेने बांधली , काही कलाकारांना स्वतःची कलाकृती सादर करायची म्हणून बांधली , काही भारतातील अती प्राचीन देवळं आहेत . या देवळांना स्वतःचा इतिहास आहे , लोकाश्रय आहे , दंतकथा आहेत , पौराणिक कथा आहेत , काही पारंपरिक पूजेसाठी आहेत . गावातील देवळं ही साधारणतः मारूती आणि ग्रामदेवता यांची असतात .
ज्योतीर्लिंग , शक्तीपीठ अशी प्राचीन पौराणिक देवळं आहेत .
या सगळ्या देवळात नेहमीच गर्दी असते . या देवळांमध्ये रीतसर नेमलेले पुजारी असतात . पूजा शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जाते , भव्य दिव्य अशा मूर्ती असतात . स्थापत्य कलेच्या नियमानुसार ही मंदिरे बांधलेली असतात . इथे येणारे भक्तही नियमित येणारे आणि भरपूर पैसा खर्च करून देवालयासाठी देणगी देणारे असतात . अशा देवळांची श्रीमंत देवळांमध्ये गणना करण्यात येते , परंतु ग्रामीण भागात, गावकुसात , शेताच्या कडेला, तळ्याच्या पारीला कधीतरी नवसाला पावलेला एखादा देव असतोच . आणि भक्ताने आपल्या श्रद्धेनुसार कुवतीनुसार बांधलेलं छोटसं मंदिर असतं . हे चित्र खूप देखणं असतं . श्रद्धेचा भाग सोडला तर हे चित्ररूपाने खूप सुंदर दिसत. श्रद्धा ही व्यक्तीपरत्वे अवलंबून आहे त्यामुळे ती मंदिर मोठी की लहान यावर अवलंबून नाही.
या भव्य दिव्य देवळांसमोर खूप मोठी कमान असते . प्रवेशद्वार असतं , खूप मोठा परिसर असतो , आत खूप गर्दी असते, रांगा लागाव्या लागतात , दर्शन सहज होत नाही . कधी कधी तर दर्शनासाठी चार-चार तास रांगेत लागावे लागते . असो . पण याहीपेक्षा या देवळांच्या दोन चार किलोमीटर आधीपासून जी दुकान असतात त्यामुळे देऊळ झाकल्या गेलेलं असतं आणि कधी देवळाचे पूर्ण स्वरूप दृष्टीस येत नाही . अर्थात याला अपवाद काही देवळं आहेत . पण अगदी छोटुकली जमिनीवरून सहज नजरेत येतील अशी जी देवळं असतात ती फार सुरेख दिसतात . अशी माणसांची गर्दी नसणारी, दुकानांची नगरी नसणारी प्रवेशद्वारापासूनच अखंड नजरेत भरणारी अशी देवळं फार सुंदर दिसतात . त्यामागे एखादं झाड असेल तर विचारूच नका. झाडामागे निळंशार आभाळ डोकावत असेल तर अती आनंद.
भव्य देवळातल्या चित्रात सभामंडप असतो , भव्यता असते , गर्दी असते , देवळाचे स्वतः चे काही नियम असतात त्याचे पालन करावे लागते . आकर्षक रोषणाई , हारांनी दबून गेलेली देवाची मान , मोठे आरसे , आकर्षक पाळणे , सोन्याचांदीचे अलंकार , मोठी दानपेटी , नंदी , कासव , नैवेद्यासाठी ठेवलेली फळ , ताटं ,मिठाई सी सी टिव्ही कमेरे इत्यादि इत्यादि .
कुठें कुठे देऊळ प्रवेशासाठी पास काढावी लागते . कुठे आनलाईन बुकींग करावे लागते . देवापाशी पोहचण्यासाठी खूप घाई करावी लागते . जरा इकडे तिकडे रेंगाळत बसलो तर रांग वाढलेली असते. मग पुन्हा धावपळ . देवळात जी सौंदर्य स्थळ आहेत ती बघताना रांगेतूनच बघावी लागतात . दर्शन घेऊन बघावे म्हंटलं तर बाहेर पडण्याचा मार्ग दुसर्या बाजूने असतो .
चपला परत घेऊन परतावे लागते . असे हे देवळातले चित्र आहे .
चित्रातल्या देवळात फक्त देऊळ आणि देव दोघेच असतात . वर मोकळे आकाश त्यात तंरंगणारे ढग . कधीतरी एखादा पक्षी सुरकांडी मारताना दिसतो . खाली फक्त माती किंवा गवत . बाहेर बसायला छोटा ओटा असतो , एखाददोन पायर्या .त्या देवळाला कधीतरी रंग दिलेला असतो त्यामुळे रंग कुठे उडून आतला पापुद्रा दिसतो . शिखरावर फडकणारी ध्वजा रंग उडून पांढरट झालेली दिसते . कधी गाभारा आणि मूर्ती एवढेच असते . एखादी आकाराने छोटी घंटा असते . संपले .बस एवढेच . पण देवाशी सहज बोलता येते. शांतता आतपर्यंत घुसून बसते . सारं काही विसरायला होतं . हार , पूजा , प्रसाद , आरती याचा विसर पडतो .प्रदक्षिणा वगैरे काही नाही .शांतता पिऊन झाल्यावर सरळ निघायचे .
मी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा डोंगराच्या कुशीत वसलेले अम्रुतेशवर येथे असलेल्या महादेवाच्या देवळात गेले होते . सप्टेंबर महिन्यात खूप पाऊस पडत होता . आम्ही रहायला शेंडी गावात होतो . तिथून आम्ही भंडारदरा डोंगर चढायला सुरुवात केली . भंडारदरा डोंगराच्या कुशीत बसलेलं रतनवाडी हे गाव पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर आहे तर सामरस या गावाहून आठ किलोमीटर अंतरावर आहे . अमृतेश्वर एक सुंदर हेमाडपंती घाटाचं मंदिर आहे आणि छोटसं दहा-बारा घरांचं गाव पण आहे . हे मंदिर हेमाडपंथी घाटाचं असून शिवाचं मंदिर आहे . या मंदिराबद्दल असं सांगण्यात येतं की दहाव्या शतकातील जांझ राजाने गोदावरी ते भीमा नदीच्या दरम्यान असलेल्या प्रमुख 12 नद्यांच्या उगम स्थळी एकेका मंदिराची स्थापना केलेली आहे . ती सर्व मंदिरं महादेवाचीच मंदिरं आहेत आणि या अमृतेश्वर मंदिराच्या खाली प्रवरा नदीचा उगम आहे असं सांगण्यात येतं .
हे मंदिर दिसायला इतका सुंदर आहे की नुसतं बघतच राहाव वाटतं . डोळ्यांची तृप्ती काही होत नाही आणि मनाची तृप्ती ही होत नाही आणि वरून पाऊस पडत असताना तर ते इतकं अप्रतिम सुंदर दिसत होतं . मागच्या बाजूला उभा डोंगर , हिरवी शेतं , प्रसन्नतेने डुलणारी झाड , अशा वेळी संध्याकाळी सहा वाजता मी ते मंदिर बघत होते . थोडं अंधारलेलं आकाश आणि खाली हिरव्या रंगाची गालिचे , आजूबाजूला कौलारू दहा-बारा घर. मंदिर एका दृष्टीक्षेपात संपूर्ण नजरेत येत होतं कुठेही पायऱ्या नाही कुठेही माणसं नाहीत . अखंड मंदिर जमिनीपासून ते आकाशापर्यंत नजरेत सामावल्या जात होतं . मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदी आहे .मंदिराचा गाभारा, सभामंडप आहे .सभामंडपात आणि एकूण मंदिरातच वेलींची रचना केलेली आहे , आणि भौमितिक रचना केलेल्या आहेत . अखंड मंदिर हे कोरीव कामाने युक्त आहे. प्रवेशद्वारावर सुद्धा जे खांब आहेत , जे स्तंभ आहेत त्यावर खूप सुरेख असे कोरीव काम केलेले आहे .संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बांधलेले आहे . सभागृहात यक्ष , अप्सरा , देव दानव यांची शिल्पे आहेत . काही शिल्पपट पण आहेत त्या शिल्पपटांमध्ये समुद्रमंथनाचा देखावा आहे . आतील स्तंभ कोरीव देखणे आहे . गर्भागृहात जून ते ऑक्टोबर पर्यंत पाणी भरलेले असते त्यामुळे महादेवाची पिंड ही पाण्याखाली असते . कारण खाली जिवंत झरा असून ते प्रवरा नदीचे उगमस्थान आहे असे मानले जाते . समुद्रमंथनात भगवान विष्णूं नी जे अमृत काढले ते राहू घेऊन अमृतेश्वर या मंदिरापर्यंत गेला होता त्याचा तेथे वध करून विष्णूंनी ते अमृत त्याच्याकडून हिसकावून घेतले म्हणून त्याला अमृतेश्वर असे नाव पडले की कथा सांगण्यात येते . हे अखंड मंदिर चुना न वापरता इंटरलॉक पद्धतीने बांधलेले आहे . म्हणजेच एका दगडाच्या खाचेत दुसरा दगड असा अलगद फसावला आहे की ते कधी पडणार नाही . दगडाच्या गुळगुळीतपणावरून आपल्या हे लक्षात येतं की मंदिर फार प्राचीन आहे . स्तंभांवरील कोरीव काम स्तंभांवरील यक्ष किन्नर नर्तक व वादक आपले लक्ष वेधून घेतात .आतल्या गाभाऱ्यातील अष्टकोनी बाजूंवर नर्तक व वादकांची चित्र आहेत. मंदिराच्या कळसावर चारी बाजूने वेली आहेत . मंदिराच्या छताला महिरप आहे त्यावरचे कोरीव काम एकसारखे व प्रमाणबद्ध आहे . एकूण सर्व मंदिराकडे बघितल्यानंतर ते मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं आणि हे काहीतरी वेगळं आहे हे लक्षात येतं. मंदिराच्या परिसरात एक पुष्करणी आहे म्हणजेच एक छोटा तलाव . या छोट्या तलावात अनेक देवळी आहेत त्या देवळींमध्ये विष्णूंच्या मुर्त्या वेगवेगळ्या स्वरूपात दाखवलेल्या आहेत . कदाचित अमृतेश्वर मंदिराचा संबंध समुद्रमंथनाशी असल्यामुळे आणि अमृताचा संबंध भगवान विष्णूशी असल्यामुळे त्यांच्या विविध रूपातल्या मुर्त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात .
आता मी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद या गावात असलेल्या श्री केशवराव मंदिराबद्ल सांगते आहे. हे मंदिर दापोली पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे . निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर अगदी जवळ गेल्याशिवाय लक्षात येत नाही कारण चारही बाजूने घनदाट सुपारीची झाड नैसर्गिक वनराई , झरे आहेत . कोकणी घरांनी एक सुंदर चित्र तिथे निर्माण केलेले आहे . कोकणी घरांच्या परिसरात सुपार्या वाळवण्याचे काम आणि फोडण्याचे काम सुरू असते . अरुंद पायवाट असलेल्या दोन्ही बाजूच्या बागेतून आपल्याला जावे लागते बागेच्या परिसरात मधुमालती आणि जास्वंदाची फुले लगडलेली असतात त्याचा सुगंध परिसरात दरवळत असतो. सामायिक पाणीपुरवठा योजना या भागात दिसते त्यामुळे वेळ आणि वार ठरवून प्रत्येकाच्या बागेला पाणी सोडण्यात येतं . या पाण्यासाठी कुठल्याही प्रकारची वीज न वापरता फक्त उतारावरून हे पाणी सोडले जाते पण कोकणी भागांना पाणीपुरवठ्याचं काम हे पाटाचे पाणीच करत असतं . नारळी पोफळी, काजू फणस यांची उंच उंच झाड, बाजूला बांधलेल्या दगडांच्या ताली , अगदी जुन्या बागा चिरांच्या पायऱ्या असलेल्या घरांच्या पायऱ्या , रानफुलं , नदीचं झुळझुळणारे पात्र , घनदाट झाडी पक्षांचा कलरव , जुना साकंव या सगळ्यांची मजा तिथे पाहायला मिळते . तिथे असलेली पायऱ्यांची पायवाट दोन्ही बाजूने गर्द सावलीने झाकल्या गेल्यामुळे उन्हाचा अजिबात त्रास होत नाही मध्येच कधीतरी उन्हाचे कवडसे बघायला मिळतात . आणि अशा गर्द झाडीत लपलेलं हे केशवराज मंदिर आहे . हे मंदिर दगडी मंदिर आहे . सभामंडपाला खांबांनी आधार दिलेला आहे. गाभारा काळ्या दगडांनी बांधलेला आहे ,सभामंडप नवीन पद्धतीने बांधले आहे . डावीकडे लाकडी खांबांवर पत्रे घालून एक छोटसं मंदिर तयार केलेले आहे . ते स्वच्छ शेणाने सारवलेले आहे. त्यात गणपतीची दगडी मूर्ती आहे . मंदिराच्या परिसरात एक गोमुख आहे ते गोमुख दगडाने बांधलेले आहे . त्यात बाराही महिने थंड व चवदार असं पाणी येतं . हे पाणी डोंगरावरून दगडी पन्हाळीने गोमुखात साठवलेले आहे . आणि गोमुखातून ते पाणी खाली बारी मध्ये सांडल्या जाते . बारीमध्ये सांडलेले पाणी पाणीपुरवठा योजनेद्वारा बागांना देण्यात येतं . पाण्याचा थेंबही वाया न घालवता केलेले हे नियोजन असते . मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीविष्णूंची एक सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती आहे . तिच्यावर समईचा प्रकाश पडतो आणि ती सुंदर मूर्ती दिसते . सभा मंडपात एकीकडे गरुड आणि मारुती यांच्या मूर्ती आहे .
तिथे लिहून ठेवलेल्या माहितीपटावरून असे लक्षात येते की हे मंदिर पांडवकालीन आहे . पांडवांनी तिथे वास्तव्य केले आणि हे मंदिर बांधलेले आहे . अतिशय शांतता असणारी ही जागा आहे शांतता इतकी की आपला आपल्याला विसर पडावा आणि तिथून निघूच नये असं वाटतं . या शांततेत हे मंदिराचं स्वरूप आणि आजूबाजूच्या निसर्गाचा रूप इतकं यांचा इतका सुरेख संगम झाला आहे की तिथेच वारंवार जाण्याची इच्छा होते . असे हे केशवराज मंदिर संपूर्णपणे एका नजरेत येणारं आणि आधुनिक युगातील अलिप्त असं मंदिर आहे . याच्या सौंदर्याचे काय वर्णन करावे शब्दांत न करणारे ते एक सुरेख चित्र आहे .
अशी अखंड डोळ्यात भरणारी शांततेत वसणारी मंदिर फार सुबक सुंदर दिसतात आणि ती मला फार आवडतात . म्हणून चित्रातल्या देवळांचं वर्णन म्हणून मी ही दोन देवळे निवडलेली आहेत . देवळातली चित्र तुम्हाला कधीही कुठेही बघायला मिळतात पण मला चित्रात दिसलेलं हे देऊळ फार सुरेख वाटलं .
आपल्या पुढच्या पिढीला जपून ठेवलेला हा वारसा आवर्जून दाखवा . ते आपलं वैभव आहे.
चित्रातली देवळे-देवळातले चित्र
Submitted by मंगलाताई on 19 February, 2023 - 01:52
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान वर्णन. काही पाहिलेली
छान वर्णन. काही पाहिलेली देवळे मनात घर करून आहेत. रम्य,शांत.
सुंदर,चित्रदर्शी वर्णन!
सुंदर,चित्रदर्शी वर्णन!
केशवराज ला अनेकदा भेट दिली आहे,खूप आवडते तिथली शांतता , तिथल्या गोमुखात ज्या पन्हाळी ने पाणी येतं, तीसुद्धा किती सुंदर बांधली आहे, त्याचे उगमस्थान एका वडाच्या झाडाच्या मुळातून आहे हे प्रत्यक्ष पाहिलं आहे.
अमृतेश्वर व केशवराज दोन्ही
अमृतेश्वर व केशवराज दोन्ही देवळे बघितली आहेत त्यामुळे फारच रिलेट झालं. लेख आवडला हेवेसांन..
सुरेख लिहिले आहे. चित्रंही
सुरेख लिहिले आहे. चित्रंही आवडली.
केशवराज मंदिर गो नि दांडेकर यांचे कुलदैवत आहे असं ऐकलं/वाचलं होतं.
मुक्ता नार्वेकर हिच्या यूट्यूबवर बघितले होते हे मंदिर.