सर्कस- द्राक्षासव- चित्रपट परीक्षण

Submitted by अस्मिता. on 18 February, 2023 - 16:22

download.jpeg-1.jpg
रोहित शेट्टीच्या मनाप्रमाणे वागणारा एक वेडसर डॉक्टर व त्याचा सगळ्याला 'हो हो' म्हणणारा तेलकट भाऊ असतो. त्याची कायकी थेअरी असते, ती तो टाईम शेअर पद्धतीने पिळतपिळत आपल्याला सांगत असतो. ती कायकी थेअरी म्हणजे खून क्या रिश्त्यापेक्षा परवरिशचा रिश्ता कायकी घट्टं असतो. तो ठरवतो की गोलमाल मधल्या जमनादास आश्रमातल्या दोन जुळ्यांची अदलाबदल करायची, जी एकाचवेळी जन्मलेली व एकाचवेळी गोलमालाश्रमात आलेली असतात. या सिनेमात सगळं रोहितच्याच मनाप्रमाणे घडतं, आणि रोहितनी ठरवलंय की प्रेक्षकांचे डोके पहिलीला सहामाहीत नापास झाल्याने शाळा सोडलेल्या प्रौढापेक्षाही कैकपट कमी आहे. (संदर्भ #हमाल दे धमाल) त्यामुळे तो त्याला हवे ते दाखवणार व आपण बघून हसणार.

त्यामुळे हे रॉय-जॉय बंधूद्वय त्या जुळ्या बाळांच्या दोन सेटची अदलाबदल करतात. हे एकदम १९४२ च्या काळातले दाखवलेयं , मधेच 'भारत छोडो' वगैरेचे नारे व मशाली घेऊन जाणारी लोकं इकडून कायकी तिकडं जातात. त्यांनी सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेत व सिनेमातल्या मेन लोकांनी भडक रंगांचे ओव्हरसाईज सूट व मागून आणलेल्या साड्याब्लाऊज घातलंय. एखाद्या गरीब माणसाला लग्नाला म्हणून उधारउसनवारी करून श्रीमंताचे कपडे एक दिवसापुरते दिले तर तो कसं आखडल्यासारखं वागेल तसे सगळेच लोक कडकपणे वावरतात. अश्विनी काळसेकर तर उषा नाडकर्णीला भारीची साडी वर मोत्यांची माळ व भडक लिपस्टिक दिली तरी ती खानदानी श्रीमंत न वाटता फक्त गणेशमंडळाच्या नाटकात श्रीमंत बाईचं काम करतेयं वाटायची, अगदी तशीच वाटत होती.

ही पूर्ण टीमच बेगडी वाटते. सुलभा आर्याला सुद्धा कधी नव्हे ते जरा बरे कपडे व वर स्वेटर दिलेत. ही ऊठसूठ गोळ्या घालते व एकदम जोरात ड्रायव्हिंग करत भुरकन् जाते. हे स्टिरिओटाईप मोडल्यासारखं आहे असं म्हणावे का नाही कळत नाही. हे सगळेच बेगडी दिसल्याने व सगळ्यांनीच ओव्हरॲक्टींगचा भंडारा लुटण्यानी यात जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच फिट ईन झाली. लोकहो भानावर या , जॅकलिन खरी वाटू लागली , ये अपनेआपमें एक रेकॉर्ड हंय. हा सिनेमा बघताना पहिल्यांदा मला हिला पायात पाय घालून पाडावे वाटले नाही, म्हणजे 'स्वयं विचार किजिये'! माझी लेक हिला सारखं 'कायली जेनर' म्हणू लागली.

तर या आश्रमात येऊन दोन पालकांच्या जुड्या दोन बदललेली बाळं घेऊन जातात व चक्रम डॉक्टरला म्हणतात, तुमच्यावरून आम्ही आमच्या बाळांची नावं रॉय-जॉय ठेवू . हे सगळं दोन्ही पालकाच्या जुड्या चारी बाळांना बघत करतात तरी यांना जुळणारं जुळं हे नाही हे लक्षात येत नाही. मगं 'हेहेहे' करत घरी जातात, मुलं मूर्ख निघाली तर नवल ते काय..!

आता या ठिकाणी 'रॉय-जॉय' नावाच्या तीन जोड्या झाल्या आहेत. चक्रम डॉ. रॉय आपल्याकडे बघून म्हणतो की मी माझी कायकी थेअरी सिद्ध करायला ह्यांच्यावर तीस वर्ष लक्ष ठेवणार आहे. हा 'अगंबाई, सासूबाई'त ती सून कसं प्रेक्षकांकडे बघून 'अय्या-ईश्श' करायची, तसं आपल्याला एकांतात गाठत रहातो. तीस वर्षं तर सख्खे आईबाप पण लक्ष ठेवत नाहीत, पण हा पंपु रॉय म्हणजे परमपुज्य रॉय फार तळमळीने कधी ऊटीला तर कधी बेंगलोरला तडफडतो व आपल्याला 'अगंबाई, सासुबाई' सारखं प्रवचन देतो. ह्या सिनेमाची कथा अंगूर सारखीही नाही , अंगूरपेक्षा वेगळीही नाही. पण 'अंगूर' म्हणून द्राक्षासवात कडुलिंबाचा अर्क व भरपूर पाणी घालून काहीतरी मचूळ सरबत तीर्थ म्हणून दिलेले आहे. जे गिळताही येत नाही व थुंकताही. Proud

यात कुणालाही अभिनय करावासा वाटलं नाही , सगळ्यांची पार 'जॅकलिन' झाली आहे. 'आम्ही सारे खवय्ये' सारखे 'आम्ही सारेच जॅकलिन' नाव द्यायला हवे होते या सिनेमाला. अरे, हे तर स्पॉयलर झाले Wink . ही उटीची रॉय-जॉय जोडी सर्कस करते म्हणे. पण बेंगलोरची रॉय-जॉय जोडी काय करते माहिती नाही. दोन्ही रॉयांवर विजेचा कायकी करंटचा परिणाम होत नाही म्हणे, एकाने तारेला हात लावला की दुसऱ्याला हात लावणाऱ्याला कायकी करंट लागतो. एक जोडी सर्कशीत काम करताना घालायचे कपडे बाहेरही घालते पण दुसरी जोडी सर्कशीत काम न करताही तसेच कपडे घालून गावोगाव फिरते. तेच कपडे हे लहानपणीही घालायचे व हे कपड्यांसगटच मोठे झाले. कहां मिलते है ऐसे कपडे !!

सर्कशीतल्या रॉयची बायडी पूजा हेगडे हिला कायकी मूल न होण्याचं दुःख आहे म्हणून ही अधूनमधून गळा काढते. पण साड्या मात्र 'काटें नहीं कटते दिन ये रात' मूडच्या घालते. ही एक प्रसिद्ध लेखिका आहे म्हणे व कर्नल विक्रांत या टोपण नावाने लिहिते. तिचा दीर-रॉय ह्या कर्नल विक्रांतचा फ्यान आहे. तो जेव्हा उटीला टिईस्टेटच्या व्यवहारासाठी येतो, ती याच्याशी उदास मनाने 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल' खेळते. दीररॉयला तर काही कळतंच नाही, तो फार भाबडा आहे. ती त्याला 'रंगमहाल' नाही तर नाही, निदान बाळ दत्तक घ्यायला जमनादास आश्रमात तरी चला म्हणून 'ऊं ऊं' करते. तो म्हणतो 'कायकी मै आपका पती नहीं हूं , मुझे कायकी जॅकलिन करके मैत्रीण आहे.'

यांच्या मागावर जॉनी लिवर व सिद्धार्थ जाधव आहेत. कारण तो अंगूरमधला 'हिरोंका हार' यांना चोरायचा आहे. त्या हारासाठी मौशमीला किती रडावं लागलं, अक्षरशः डोळ्यात ड्रॉप घालावे लागले, पण पूजाच्या डोळ्यात टिपूसही नाही. सोनाराचे काम टिकूने केलेयं व सोनाराच्या नोकराचे कुणीतरी केलेयं. हा नोकर बाष्कळ वाटतो, मूळ अंगूरच्या 'बिवी तो सालमें बासी होती है, कोई साली है क्या' म्हणणाऱ्या कारागिरासारखा हलकट वाटत नाही. याचा आधी मला इतका राग आला होता पण आता त्या पर्फेक्ट हलकटपणाला मिस केले मी. यात अरूणा ईराणी नाही , भांग घातलेले पकोडे नाहीत, ब्लाऊजमधून किल्ली काढायचा चढलेला सीन नाही, दीप्ती नवल सारखी चुरचुरीत मेहूणी नाही, प्रीतम आन मिलो नाही. काही काही नाही. सगळा आचरटपणा आहे, ज्याला विनोद समजून हसणारं जिवंत माणूस सापडणं कठीण आहे.

सिद्धार्थ जाधव याचा केसांचा भलामोठा कोंबडा आहे, त्यावरूनही विनोद केलेत. तो कधी पडद्यातून कधी दरवाज्यातून आधी कोंबडाच बाहेर काढतो. त्यामुळे मी 'शेजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, घालीन कोंडा पाजीन पाणी' ही बालभारतीची कविताच दोनतीनदा गुणगुणली. मगं सगळा आचरटपणा करत करत मधे उगाच संशयास्पद पार्श्वसंगीत देत ओढूनताणून काहीतरी होत रहाते. आपल्याला रिमोट उचलायची शक्ती सुद्धा रहात नाही म्हणून बघत रहातो. अशावेळी जे सिनेमा बघत नाहीयेत त्यांना हाक मारून बदलायला लावावे व 'क्लिफर्ड द बिग रेड डॉग' किंवा स्ट्रीट फूड व्हिडिओत घेवर करणारा भैया बघत बसावा. मगं दुसऱ्या दिवशीपर्यंत शक्ती गोळा करावी व उरलेला अर्धा(का ?) बघावा.

बिंदू-जॅकलिनचा बाबा संजय मिश्रा आहे हा प्राणची नक्कल करून आपल्याला निष्प्राण करतो. कारण सव्वादोन तासांच्या सिनेमात हा दीडतास बोलत होता. शब्दबंबाळ केलेयं याने. याचा मदतनिस काहीतरी गिरक्या घेत, गॉगल लावून मधेच पियानो वाजवत होता. असं का ते काही आदी शंकराचार्य सुद्धा सांगू शकणार नाहीत. त्यामुळे मला विचारू नका , जेवढं होईल तेवढं केलंय मी !

असं काही तरी होत होत बायांच्या मनात संशयाने जागा घेतल्यावर दोन्ही रॉय-जॉय जोड्या एकमेकांसमोर येतात. हे एकदम सर्कशीतच होतं. सर्कशीची काहीही गरज नव्हती, सुरवातीला आणि शेवटी उगाच सर्कससारखा लखलखाट दाखवलायं. हा लखलखाट बघून डोळे दिपतात, पण ते आश्चर्याने नाही, तर नकली धृतराष्ट्रासारखे व्हायला लागते. आपण 'ये क्या हो रहा है रोहित , ये क्या हो रहा है रोहित' म्हणत बसतो. रोहितचा फक्त पहिला गोलमाल चांगला होता, नंतरचे सगळे सिनेमे बेकार-बेकारेतर-बेकारोत्तम अशा चढत्या भाजणीत गेलेले आहेत. अधूनमधून त्याच्याचं सिनेमाचे संदर्भ, गाणी व संवाद येत रहातात. कथा नाहीच, त्यामुळे कथेवर पकड नाही हेही लिहिता येत नाही. अभिनय नाहीच, त्यामुळे काय लिहू हेही कळत नाही. गाणी लक्षात रहात नाहीत. सगळी हिरवाई, निळाई, सगळे सेट्स जलरंगांच्या बाटल्या सांडल्यासारखी वाटत रहाते. कपडे व मेकप अतिशय भडक. प्रत्येक गोष्ट वाईट करून दाखवणं खरंतर अवघड आहे. पण या टीमला ते शिवधनुष्य सहज पेलवले आहे. हा सिनेमा थेटरात बघणाऱ्या प्रेक्षकालाच ऑस्कर देऊन थोरवीची नवीन परंप्रा सुरू करायला हवी. सर्कसचं स्पेलिंग सुद्धा 'सिरकुस' (Cirkus) वाटतं. सोशिकांसाठी नेटफ्लिक्सवर उपलब्ध..!

©अस्मिता

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता.. .खतरनाक रिव्हू लिहीलाय. पुढे मागे कधी चित्रपट पहायची वेळ आली की ही चिरफाड वाचत चित्रपट पाहीन.

जॉनी लिव्हर मला कधीही आवडला नाही. आधीही नाही आणि आताही नाही. त्याचे चेहऱ्यावरचे भाव लाऊड, उग्र व अचकटविचकट वाटायचे. या बाबतीत असहमत. काही चित्रपटात जॉनी भाईंनी अचकट विचकटपणा केला असेल पण ओव्हरऑल ह्याची कॉमेडी आवडायची. जुदाई, बाजीगर, अनारी हे चित्रपट जॉनी लिव्हरमुळे सुसह्य होतात. गोलमाल ३ मध्ये भुला भाईचा रोल पण जबरदस्त होता. जुदाई हा चित्रपट दुसर्‍यांदा केवळ जॉनी लिव्हर व परेश रावल साठी पाहिला.

जॉनी लिव्हरचा सगळ्यात आवडलेला रोल म्हणजे छोटा छत्री
जे काय एक्स्प्रेस केलाय ना ते निववळ अशक्य
तसेच अस्लम भाई, हिरो व्हायला निघालेला असतो तो

हे परीक्षण मुद्दाम निवांतपणे वाचायला म्हणून राखीव ठेवलं होतं ते वसूल झालं
अशक्य पंचेंस आणि धमाल चिरफाड

इतक्या भन्नाट परिक्षणामुळे बघायला घेतोय सर्कस आता.
जगलो वाचलो तर सांगायला येईन.
अपडेट- नेटफलिक्स कृपेने स्पीड 1.5 ठेवून रेंट लगा नामक भयानक नृत्याविष्कार नुकताच बघून झाला. अंगूर सिनेमाची आणि या परीक्षणाची खूप आठवण आली बघताना.

चैतन्य, 'करंट लगा रे' आहे हो , रेंट नव्हे. Happy
अर्थात मेंदूच्या पेशी मरतात तोपर्यंत,त्यामुळे रेंट दिल्यासारखेच वाटते. Proud

माफ करा. पण हे सांगायचं राहीलच की. परिक्षण छान लिहिले आहे. आवडली स्टाईल.
(त्यामुळे) पिक्चर बघणारच!

आज या ठिकाणी अस्मिताताईंनी आमच्या रोहितदादांच्या पिक्चरवर जी टीका केली आहे ती वाचण्यात आली या ठिकाणी. आमचे रोहितदादा हे तळागाळातल्या लोकांसाठी पिक्चर काढत असताना मग तो फिटर असो, गवंडी असो, बिगारी असो, डायवर असो, किन्नर असो , ठेलेवाला, असो, फेरीवाला असो, फिरता विक्रेता असो, हातगाडीवाला असो, कचरा वेचणारा असो, भंगार माल गोळा करणारा असो अशा अनेक लो़कांचा विचार करून पिच्चर बनवत आले आहेत या ठिकाणी. त्यांच्या जीवनातल्या दु:खातून दोन घटका विरंगुळा देण्याचं काम या ठिकाणी रोहित दादा शेट्टी हे करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.

आज त्यांच्या पिक्चरमुळे असे असंख्य दबले पिचलेले लोक आम्ही वाढवलेले टॅक्स विसरून जीवन सुखाने जगू शकतात हे एक प्रकारचे सामाजिक काम त्यांनी हाती घेतलेले आहे. त्यांच्या या कामामुळेच लोकांचा आमच्यावर राग राहत नाही. आज या सर्व लोकांचे राग विसरून आम्हाला मतदान होते आणि आम्ही आज तुमच्यापुढे समाजसेवेसाठी पुन्हा पुन्हा येत राहतो या ठिकाणी, याचे श्रेय आमचे नसून रोहितदादांचे आहे. त्यांच्या भरवशामुळेच आम्ही निवडून आल्यावर पाईपलाईन न टाकता आमच्या कार्यकर्त्यांचे टँकर सोसायट्यांना पाणी पुअरवायला चालवू शकतो या ठिकाणी. अशा पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा खूष. कार्यकर्ते खूष तर आम्ही खूष. आम्ही खूष तर जनता खूष आणि जनता खूष तर दंगली का घडवाव्या ?

अशा पद्धतीने शांततेचे मोठे काम रोहितदादा शेट्टी यांनी या ठिकाणी हाती घेतलेले असताना, दंगली रोखण्याचे काम केलेल असताना त्यांचा सत्कार करण्याच्या ठिकाणी ताईंनी अशा पद्धतीने त्यांच्या पिक्चरबद्दल वाइट साईट लिहावे हे अजिबात पटणारे नाही. यामागे त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सांगण्याची गरज नाही या ठिकाणी.

या ठिकाणी आम्ही इश्वराकडे एव्हढीच प्रार्थना करतो कि ताईंना सद्गती .... काय रे काय झालं ? मग ? काय म्हणायचं असतं ?.... हां सद... जाऊ द्या... चांगली बुद्धी द्यावी जेणेकरून.... ए खाली बस रे डुचकाळ्या.... ताई एकाद्याचे काम लक्षात न घेता अशी टीका भविष्यात करणार नाहीत आणि त्याचे खच्चीकरण करणार नाहीत हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि खाली बसायच्या कामाला सुरूवात करतो.

मी नुकतंच नेटफ्लिक्स घेतलंय आधी सिनेमा बघणार मग परिक्षण वाचणारे मग पंचेस चांगले कळतात आणि मग मज्जा येते वाचायला..

आचार्य Lol भारीच जमलंय. 'चालू' घडामोडींवरचे ('च' चहाचा) तुमचे भाष्य बघून डोळ्यात पाणी आले, आता रोहितदादाला राखी पौर्णिमाला बोलवून क्षमा मागून 'भैय्या मेरे, रिव्ह्यू के बंधन को निभाना' म्हणेन. कारण या परीक्षणामुळेही काही जणांनी बघितलाय/बघणार आहेत. ओवाळणी म्हणून एखादी स्पोर्ट्स कार चालवून घेईन. दादालाच आवडतात, मी तरी काय करणार. Wink

अर्थात मेंदूच्या पेशी मरतात तोपर्यंत,त्यामुळे रेंट दिल्यासारखेच वाटते. >>
अगदी अगदी...
आज या ठिकाणी हा सिनेमा 1.5 च्या स्पीडने बघून माझा मेंदू fry झालाय असं मी जाहीर करतो आणि
या परीक्षणाला 'तंतोतंत' असं म्हणतो.

भारी झालाय रिव्ह्यू Lol

नवर्‍याने उत्सुकतेपोटी सिरकूस पहायला सुरूवात केली. जेमतेम १० मिनिटं पाहिल्यानंतर 'एकदा पुन्हा अंगूर पाहून बघूया का?' असा विचार डोक्यात आल्याने तो लावला. मग त्यात रमायला झालं. अंगूर संपल्यावर नवर्‍याने शांतपणे सिरकूस नेफ्लि लिस्टीतून काढून टाकला. अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली Proud
परीक्षण वाचून रोशेने दिलवालेसारखीच इथेही माती खाल्लेली वाटत आहे. त्यात सुद्धा कॉमेडी करणार्‍यांचाच भरणा अती झाला आणि हसू आलं नाही. इथेही तसाच प्रकार वाटतोय. जाऊद्या झालं.

काय धमाल लिहिलय नेक्ष्ट लेवल अगदी Lol
स्वप्ना राज च्या विनोदी परीक्षण लिखाणाची आठवण झाली !

मी का कोण जाणे रोहित शेट्टी, रनवीर सिंग, जॅकलीन ही नावं ऐकुनच न बघायचा निश्चय केला Lol

मला अंगूर देखील माती वाटतो>>>> वाक्य वाचल्या वाचल्या कुणी लिहिलेय ह्याची कल्पना आली Wink

धन्यवाद आशु, कमलेश पाटील, माझे मन, वंदना, रमड, मृ ,केशवकूल , योगी, आशुचॅम्प, झकासराव, सुनिधी आणि प्राचीन Happy

अंगूर संपल्यावर नवर्‍याने शांतपणे सिरकूस नेफ्लि लिस्टीतून काढून टाकला. अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली >>>> Lol

जुदाई, बाजीगर, अनारी हे चित्रपट जॉनी लिव्हरमुळे सुसह्य होतात.
>>छान लिहिले आहे योगी, पुन्हा बघायला आवडतील असेच सिनेमे आहेत. Happy

भारीत भारी परिक्षण. मी वाचूनच हहगलो , पण पिक्चर बघायची डेअरिंग नाही हो . Rofl अस्मे तुला दंडवत. रघु आचार्यांची पोस्ट पण या ठिकाणी आवडली.

>>जॉनी लिव्हरचा सगळ्यात आवडलेला रोल म्हणजे छोटा छत्री
जे काय एक्स्प्रेस केलाय ना ते निववळ अशक्य

आवारा पागल दिवाना, याचा पंखा वर्ग वेगळाच आहे Happy मस्त टाइम्पास होता.

हहपुवा.. मस्त लिहिलंय. पिक्चर तसा बोअर च आहे. पण माझ्या पहिली मधल्या मुलाने खूप एन्जॉय केला. आम्हीही त्याच्या सोबत हसलो त्यामुळे. पठाण, ब्रह्मास्त्र पण त्याला आवडले खूप. कदाचित चित्रपटांची पातळी आता घसरून टार्गेट audience लहान मुलेच होत आहेत की काय!!
आणि चित्रपटामुळे का असेना, सुपुत्र jubilee circus पहायला जाऊयात म्हणून मागे लागलेत. कुठून आणू आता electric man? Lol

धन्यवाद निशा, Happy
मुलाने एन्जॉय केला हे छान झाले.

कदाचित चित्रपटांची पातळी आता घसरून टार्गेट audience लहान मुलेच होत आहेत की काय!!>>>+१ तसं वाटतंय खरं !

Pages