सर्कस- द्राक्षासव- चित्रपट परीक्षण

Submitted by अस्मिता. on 18 February, 2023 - 16:22

download.jpeg-1.jpg
रोहित शेट्टीच्या मनाप्रमाणे वागणारा एक वेडसर डॉक्टर व त्याचा सगळ्याला 'हो हो' म्हणणारा तेलकट भाऊ असतो. त्याची कायकी थेअरी असते, ती तो टाईम शेअर पद्धतीने पिळतपिळत आपल्याला सांगत असतो. ती कायकी थेअरी म्हणजे खून क्या रिश्त्यापेक्षा परवरिशचा रिश्ता कायकी घट्टं असतो. तो ठरवतो की गोलमाल मधल्या जमनादास आश्रमातल्या दोन जुळ्यांची अदलाबदल करायची, जी एकाचवेळी जन्मलेली व एकाचवेळी गोलमालाश्रमात आलेली असतात. या सिनेमात सगळं रोहितच्याच मनाप्रमाणे घडतं, आणि रोहितनी ठरवलंय की प्रेक्षकांचे डोके पहिलीला सहामाहीत नापास झाल्याने शाळा सोडलेल्या प्रौढापेक्षाही कैकपट कमी आहे. (संदर्भ #हमाल दे धमाल) त्यामुळे तो त्याला हवे ते दाखवणार व आपण बघून हसणार.

त्यामुळे हे रॉय-जॉय बंधूद्वय त्या जुळ्या बाळांच्या दोन सेटची अदलाबदल करतात. हे एकदम १९४२ च्या काळातले दाखवलेयं , मधेच 'भारत छोडो' वगैरेचे नारे व मशाली घेऊन जाणारी लोकं इकडून कायकी तिकडं जातात. त्यांनी सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेत व सिनेमातल्या मेन लोकांनी भडक रंगांचे ओव्हरसाईज सूट व मागून आणलेल्या साड्याब्लाऊज घातलंय. एखाद्या गरीब माणसाला लग्नाला म्हणून उधारउसनवारी करून श्रीमंताचे कपडे एक दिवसापुरते दिले तर तो कसं आखडल्यासारखं वागेल तसे सगळेच लोक कडकपणे वावरतात. अश्विनी काळसेकर तर उषा नाडकर्णीला भारीची साडी वर मोत्यांची माळ व भडक लिपस्टिक दिली तरी ती खानदानी श्रीमंत न वाटता फक्त गणेशमंडळाच्या नाटकात श्रीमंत बाईचं काम करतेयं वाटायची, अगदी तशीच वाटत होती.

ही पूर्ण टीमच बेगडी वाटते. सुलभा आर्याला सुद्धा कधी नव्हे ते जरा बरे कपडे व वर स्वेटर दिलेत. ही ऊठसूठ गोळ्या घालते व एकदम जोरात ड्रायव्हिंग करत भुरकन् जाते. हे स्टिरिओटाईप मोडल्यासारखं आहे असं म्हणावे का नाही कळत नाही. हे सगळेच बेगडी दिसल्याने व सगळ्यांनीच ओव्हरॲक्टींगचा भंडारा लुटण्यानी यात जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच फिट ईन झाली. लोकहो भानावर या , जॅकलिन खरी वाटू लागली , ये अपनेआपमें एक रेकॉर्ड हंय. हा सिनेमा बघताना पहिल्यांदा मला हिला पायात पाय घालून पाडावे वाटले नाही, म्हणजे 'स्वयं विचार किजिये'! माझी लेक हिला सारखं 'कायली जेनर' म्हणू लागली.

तर या आश्रमात येऊन दोन पालकांच्या जुड्या दोन बदललेली बाळं घेऊन जातात व चक्रम डॉक्टरला म्हणतात, तुमच्यावरून आम्ही आमच्या बाळांची नावं रॉय-जॉय ठेवू . हे सगळं दोन्ही पालकाच्या जुड्या चारी बाळांना बघत करतात तरी यांना जुळणारं जुळं हे नाही हे लक्षात येत नाही. मगं 'हेहेहे' करत घरी जातात, मुलं मूर्ख निघाली तर नवल ते काय..!

आता या ठिकाणी 'रॉय-जॉय' नावाच्या तीन जोड्या झाल्या आहेत. चक्रम डॉ. रॉय आपल्याकडे बघून म्हणतो की मी माझी कायकी थेअरी सिद्ध करायला ह्यांच्यावर तीस वर्ष लक्ष ठेवणार आहे. हा 'अगंबाई, सासूबाई'त ती सून कसं प्रेक्षकांकडे बघून 'अय्या-ईश्श' करायची, तसं आपल्याला एकांतात गाठत रहातो. तीस वर्षं तर सख्खे आईबाप पण लक्ष ठेवत नाहीत, पण हा पंपु रॉय म्हणजे परमपुज्य रॉय फार तळमळीने कधी ऊटीला तर कधी बेंगलोरला तडफडतो व आपल्याला 'अगंबाई, सासुबाई' सारखं प्रवचन देतो. ह्या सिनेमाची कथा अंगूर सारखीही नाही , अंगूरपेक्षा वेगळीही नाही. पण 'अंगूर' म्हणून द्राक्षासवात कडुलिंबाचा अर्क व भरपूर पाणी घालून काहीतरी मचूळ सरबत तीर्थ म्हणून दिलेले आहे. जे गिळताही येत नाही व थुंकताही. Proud

यात कुणालाही अभिनय करावासा वाटलं नाही , सगळ्यांची पार 'जॅकलिन' झाली आहे. 'आम्ही सारे खवय्ये' सारखे 'आम्ही सारेच जॅकलिन' नाव द्यायला हवे होते या सिनेमाला. अरे, हे तर स्पॉयलर झाले Wink . ही उटीची रॉय-जॉय जोडी सर्कस करते म्हणे. पण बेंगलोरची रॉय-जॉय जोडी काय करते माहिती नाही. दोन्ही रॉयांवर विजेचा कायकी करंटचा परिणाम होत नाही म्हणे, एकाने तारेला हात लावला की दुसऱ्याला हात लावणाऱ्याला कायकी करंट लागतो. एक जोडी सर्कशीत काम करताना घालायचे कपडे बाहेरही घालते पण दुसरी जोडी सर्कशीत काम न करताही तसेच कपडे घालून गावोगाव फिरते. तेच कपडे हे लहानपणीही घालायचे व हे कपड्यांसगटच मोठे झाले. कहां मिलते है ऐसे कपडे !!

सर्कशीतल्या रॉयची बायडी पूजा हेगडे हिला कायकी मूल न होण्याचं दुःख आहे म्हणून ही अधूनमधून गळा काढते. पण साड्या मात्र 'काटें नहीं कटते दिन ये रात' मूडच्या घालते. ही एक प्रसिद्ध लेखिका आहे म्हणे व कर्नल विक्रांत या टोपण नावाने लिहिते. तिचा दीर-रॉय ह्या कर्नल विक्रांतचा फ्यान आहे. तो जेव्हा उटीला टिईस्टेटच्या व्यवहारासाठी येतो, ती याच्याशी उदास मनाने 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल' खेळते. दीररॉयला तर काही कळतंच नाही, तो फार भाबडा आहे. ती त्याला 'रंगमहाल' नाही तर नाही, निदान बाळ दत्तक घ्यायला जमनादास आश्रमात तरी चला म्हणून 'ऊं ऊं' करते. तो म्हणतो 'कायकी मै आपका पती नहीं हूं , मुझे कायकी जॅकलिन करके मैत्रीण आहे.'

यांच्या मागावर जॉनी लिवर व सिद्धार्थ जाधव आहेत. कारण तो अंगूरमधला 'हिरोंका हार' यांना चोरायचा आहे. त्या हारासाठी मौशमीला किती रडावं लागलं, अक्षरशः डोळ्यात ड्रॉप घालावे लागले, पण पूजाच्या डोळ्यात टिपूसही नाही. सोनाराचे काम टिकूने केलेयं व सोनाराच्या नोकराचे कुणीतरी केलेयं. हा नोकर बाष्कळ वाटतो, मूळ अंगूरच्या 'बिवी तो सालमें बासी होती है, कोई साली है क्या' म्हणणाऱ्या कारागिरासारखा हलकट वाटत नाही. याचा आधी मला इतका राग आला होता पण आता त्या पर्फेक्ट हलकटपणाला मिस केले मी. यात अरूणा ईराणी नाही , भांग घातलेले पकोडे नाहीत, ब्लाऊजमधून किल्ली काढायचा चढलेला सीन नाही, दीप्ती नवल सारखी चुरचुरीत मेहूणी नाही, प्रीतम आन मिलो नाही. काही काही नाही. सगळा आचरटपणा आहे, ज्याला विनोद समजून हसणारं जिवंत माणूस सापडणं कठीण आहे.

सिद्धार्थ जाधव याचा केसांचा भलामोठा कोंबडा आहे, त्यावरूनही विनोद केलेत. तो कधी पडद्यातून कधी दरवाज्यातून आधी कोंबडाच बाहेर काढतो. त्यामुळे मी 'शेजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, घालीन कोंडा पाजीन पाणी' ही बालभारतीची कविताच दोनतीनदा गुणगुणली. मगं सगळा आचरटपणा करत करत मधे उगाच संशयास्पद पार्श्वसंगीत देत ओढूनताणून काहीतरी होत रहाते. आपल्याला रिमोट उचलायची शक्ती सुद्धा रहात नाही म्हणून बघत रहातो. अशावेळी जे सिनेमा बघत नाहीयेत त्यांना हाक मारून बदलायला लावावे व 'क्लिफर्ड द बिग रेड डॉग' किंवा स्ट्रीट फूड व्हिडिओत घेवर करणारा भैया बघत बसावा. मगं दुसऱ्या दिवशीपर्यंत शक्ती गोळा करावी व उरलेला अर्धा(का ?) बघावा.

बिंदू-जॅकलिनचा बाबा संजय मिश्रा आहे हा प्राणची नक्कल करून आपल्याला निष्प्राण करतो. कारण सव्वादोन तासांच्या सिनेमात हा दीडतास बोलत होता. शब्दबंबाळ केलेयं याने. याचा मदतनिस काहीतरी गिरक्या घेत, गॉगल लावून मधेच पियानो वाजवत होता. असं का ते काही आदी शंकराचार्य सुद्धा सांगू शकणार नाहीत. त्यामुळे मला विचारू नका , जेवढं होईल तेवढं केलंय मी !

असं काही तरी होत होत बायांच्या मनात संशयाने जागा घेतल्यावर दोन्ही रॉय-जॉय जोड्या एकमेकांसमोर येतात. हे एकदम सर्कशीतच होतं. सर्कशीची काहीही गरज नव्हती, सुरवातीला आणि शेवटी उगाच सर्कससारखा लखलखाट दाखवलायं. हा लखलखाट बघून डोळे दिपतात, पण ते आश्चर्याने नाही, तर नकली धृतराष्ट्रासारखे व्हायला लागते. आपण 'ये क्या हो रहा है रोहित , ये क्या हो रहा है रोहित' म्हणत बसतो. रोहितचा फक्त पहिला गोलमाल चांगला होता, नंतरचे सगळे सिनेमे बेकार-बेकारेतर-बेकारोत्तम अशा चढत्या भाजणीत गेलेले आहेत. अधूनमधून त्याच्याचं सिनेमाचे संदर्भ, गाणी व संवाद येत रहातात. कथा नाहीच, त्यामुळे कथेवर पकड नाही हेही लिहिता येत नाही. अभिनय नाहीच, त्यामुळे काय लिहू हेही कळत नाही. गाणी लक्षात रहात नाहीत. सगळी हिरवाई, निळाई, सगळे सेट्स जलरंगांच्या बाटल्या सांडल्यासारखी वाटत रहाते. कपडे व मेकप अतिशय भडक. प्रत्येक गोष्ट वाईट करून दाखवणं खरंतर अवघड आहे. पण या टीमला ते शिवधनुष्य सहज पेलवले आहे. हा सिनेमा थेटरात बघणाऱ्या प्रेक्षकालाच ऑस्कर देऊन थोरवीची नवीन परंप्रा सुरू करायला हवी. सर्कसचं स्पेलिंग सुद्धा 'सिरकुस' (Cirkus) वाटतं. सोशिकांसाठी नेटफ्लिक्सवर उपलब्ध..!

©अस्मिता

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वप्रथम अंगी बाणवलेल्या धाडस, पेशन्स, मानसिक ताकद, तितिक्षा वगैरे गुणांसाठी तुमचं कौतुक!

मुळात माणसाने आपल्याला झेपतील, जमतील, पचतील तीच कामं करावीत. आचरटपणा आणि अतर्क्यपणा हा आपल्या सिनेमाचा बाज असताना उगाचच कॉमेडी ऑफ एरर्स सारख्या क्लासिकची माती करावी हा कॉन्फिडन्स रोशे ला कुठल्या मनहूस घडीला आला कुणास ठाऊक!

उगाचच कॉमेडी ऑफ एरर्स सारख्या क्लासिकची माती करावी
>>>+1

मला अंगूर देखील माती वाटतो... प्रचंड ओव्हररेटेड... सर्कस तर ट्रेलर आणि चुचा बघूनच ठरवले कि नको बघायला....

मला अंगूर आवडला होता. गुलझारने त्याला खूप चांगली ट्रीटमेंट दिली होती ज्यामुळे तो बेगडी न वाटता, उत्तम विनोदी सिनेमा झाला.

Lol
मस्त परीक्षण . काल का परवाच नेफ्लिवर आलेला पाहिला . त्या रोहित शेट्टीचे काही इंटरव्ह्यू पाहिलेत इतक्यात , एवढं व्यवस्थित आणि सेन्सिबल बोलणारा माणूस असले बिनडोक चित्रपट कसे काढू शकतो न कळे .

अगं ग Rofl
कसलं लिहितेस तू
बघणार हा चित्रपट, तुझ्या कमेंटस आठवत Wink

धमाल परीक्षण.
'अंगूर' म्हणून द्राक्षासवात कडुलिंबाचा अर्क व भरपूर पाणी घालून काहीतरी मचूळ सरबत तीर्थ म्हणून दिलेले आहे. जे गिळताही येत नाही व थुंकताही >> Lol

बेस्ट !!
आधी लेखाबद्दल ... पिक्चर पाहिल्याची भडास नंतर चवीचवीने.
इतक्या कमी वेळात भन्नाट जमवलाय लेख. सिनेमा बघतानाचा मनःस्ताप अगदी पोहोचवलाय.

यात कुणालाही अभिनय करावासा वाटलं नाही , सगळ्यांची पार 'जॅकलिन' झाली आहे. 'आम्ही सारे खवय्ये' सारखे 'आम्ही सारेच जॅकलिन' नाव द्यायला हवे होते या सिनेमाला >>>> Lol
बिंदू-जॅकलिनचा बाबा संजय मिश्रा आहे हा प्राणची नक्कल करून आपल्याला निष्प्राण करतो. >>>> Lol
'तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल' खेळते >>>> Lol

पंचेस तर कुठले कुठले कॉपी करू असं झालंय. हजारो प्रेक्षकांची व्यथा उत्तम मांडलीय असं वाटलं. शिवाय साड्या ब्लाऊजचं बायकी निरीक्षण अगदी अचूक आलंय Lol
काळसेकर दिसली तेव्हांच कुठून तरी शिवाजी साटम " ये क्या हो रहा है दया ?" म्हणत येतील असं वाटत होतं. नाहीतरी रोहित शेट्टी मराठी कलाकारांना घेतोच. (त्यामुळे सिनेमे चालतात ही त्याची अंधश्रद्धा).
(अंगूर मधला कारागीर म्हणजे युनूस परवेज. त्या वेळी त्यांच्यावर विनोद होत असत. त्यांच्याकडे नोकर टिकत नाहीत कारण अशा माणसाला सिनेमात काम मिळतं तर आम्हाला का नाही ? या विचाराने नोकर नशीब काढायला येत).
सिनेमा चालावा म्हणून सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर यांचा वापर केलाय. मूळ कॉमेडी जमलेली नाही हे जाणवत असल्यानेच ठिगळं लावावी लागली आहेत. जॉनीभाय आता वयस्कर झाला. आता पूर्वीचा आचरटपणा केविलवाणा वाटतो. त्यामुळं जॉनीचा जॉनर सिद्धार्थच्या माथी मारलाय. त्याच्या एनर्जीचा वापर नाही करून घेतलेला.

हे कमी म्हणून दीपिकाचं आयटम साँग घातलंय. नवरा बायकोच्या रील्स पेक्षा जास्त वाटत नाही ते. गाण्याचे बोल भारावून टाकणारे आहेत. रणवीरच्या चेहर्‍यावरचा " एकदाचं जॉन ने सोडलं बाबा हिला" हा आनंद लपत नाही.
एकमेकांना लागलेला साखळी शॉक प्रियदर्शनच्या पिक्चरमधून घेतलाय. खून के रिश्ते से बडी परवरीश होती है हे मनमोहन देसाईंच्या "परवरीश " आणि पहलाज निहलानींच्या "पाप कि दुनिया" पिक्चरमधून कॉपी केलंय. कॉपी करण्यासाठी सुद्धा मसाला पिक्चरच घेतलेत.

याच माणसाने चेन्नई एक्सप्रेस बनवला होता अशी शंका यावी इतका वाईट सिनेमा बनवलाय. नक्कीच बंटा मारून डोकं जड झाल्यावर शूट केला असेल.

हा लेख मी बुकमार्क करून ठेवलाय. काही खास ऑनलाईन मिटींग च्या वेळेस माझा माईक म्यूट करून हा वाचणार आहे. खीखीखी करायला खूप भारी आहे..

मी रोहित शेट्टीचा पंखा आहे.
आय फीील सॉरी फॉर यू. गल्ली चुकली. हा पिक्चर आमच्या सारख्यासाठी आहे. समोर बसून शिट्ट्या मारणारे. "अरे सोड .बास झाल" असले सीन आले कि लहान भावंडाची मुंडी खाली दाबून धरणारेे, पडद्यावर साप आले कि हळूच पाय वर घेऊन बसणारे, "झोपी गेलेला जागा झाला" "दिनूच्या सासूबाई
राधाबाई" अशा फार्सला गर्दी करणारे आम्ही, "साली साल" "तुम्ही कोण? आम्ही गायिका. मग आम्ही बैल का?" अश्या कोट्यांना टाळ्या पिटणारे. एकूण जीवनातला मूर्खपणा आणि meaninglessness
पूर्ण अनुभवलेले लोक . त्यांच्या साठी महान रोहित शेट्टी पिक्चर काढतो. मग आम्ही बघणार नाही अस कस होईल.

छान परिक्षण!
शॅाक लागल्यावर माणूस मरतो ना? का माझाच तसा भ्रम आहे.
हा हिरो तर केव्हढ्या मोठ्या तारा हातात घेतो आणि तिकडे तो फक्त झटका नाच करतो. शिवाय झटका देऊन झाल्यावर त्या तारा तश्याच मंचावर टाकतो. Uhoh
असले काहीतरी बघून पोरांनी कुठे तसे काही करायला नको.

Lol
एकतर तुम्ही माझ्या लेखावर अभिप्राय नोंदवला नाहीत, त्यात 'यू'व्ह फेल्ट सॉरी फॉर मी' लिहिलंय. तुम्हाला काय वाटलं सरदार खुस होगा , साबासी देगा. देव पाण्यात बुडवून बसा केकू Proud .

-------
Just kidding ! कुठल्याही सिनेमावरची (किंवा इतरांच्या कलाकृतीवरची) मतं मी पर्सनली घेत नाही , हाकानाका. I am just an observer. Thanks, though Happy

अय्यया केकू... केssssssssकु
अय्यया करू मै क्या केकु केकु ..
हो गया दिल मेरा केकु केकु ....

फेफ,
सर्वप्रथम अंगी बाणवलेल्या धाडस, पेशन्स, मानसिक ताकद, तितिक्षा वगैरे गुणांसाठी तुमचं कौतुक! >>> Lol आता मानसरोवर यात्रेलाच निघावं म्हणतेयं. Wink
मला अंगूर आवडला होता. गुलझारने त्याला खूप चांगली ट्रीटमेंट दिली होती ज्यामुळे तो बेगडी न वाटता, उत्तम विनोदी सिनेमा झाला.>>>> अनुमोदन.

ट्युलिप, धनि, ऋ, अवलताई, धनवन्ती, आचार्य, यानिशा, हर्पा, सोनाली धन्यवाद. Happy
तुमच्यापैकी कुणीही बघितला तर इथे मला +१ द्यायला विसरू नका, मग मी तुम्हाला ऑस्कर अवार्डचा इमोजी देईन.

इतक्या कमी वेळात भन्नाट जमवलाय लेख. >>>>
आचार्य, विचारू नका, हा 'कौन बनेगा' मधल्या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळासारखा लेख आहे. नावं ठेवण्यासाठी रूमाल टाकणारा मी पहिला आयडी असेन. तुम्हीपण प्रेरणा दिलीत. Lol

पिक्चर पाहिल्याची भडास नंतर चवीचवीने.>>>> येऊ द्या.

(अंगूर मधला कारागीर म्हणजे युनूस परवेज. त्या वेळी त्यांच्यावर विनोद होत असत. त्यांच्याकडे नोकर टिकत नाहीत कारण अशा माणसाला सिनेमात काम मिळतं तर आम्हाला का नाही ? या विचाराने नोकर नशीब काढायला येत).

>>>> धमाल माहिती आहे. मला ती व्यक्तिरेखा पहिल्यांदा चायसे ज्यादा किटली गरम वाटली होती. सोनारापेक्षा कारागीर भाव खाऊन जातो, उर्दू बोलतो, शेरोशायरी करत आगाऊ टिप्पणी जोडतो. त्याच्या बोलण्यामुळे आपल्याला पद्मा चव्हानवर संशय घ्यायला वाव मिळतो. ती का संन्यासिनीसारखी दाखवली होती काय माहिती. पण आता सर्कस सहन केल्यावर त्याची किंमत कळाली.

जॉनीभाय आता वयस्कर झाला. आता पूर्वीचा आचरटपणा केविलवाणा वाटतो
>>>>> जॉनी लिव्हर मला कधीही आवडला नाही. आधीही नाही आणि आताही नाही. त्याचे चेहऱ्यावरचे भाव लाऊड, उग्र व अचकटविचकट वाटायचे. त्याची विनोदाची पुरवणी नेहमी ठिगळ जोडल्यासारखी वाटायची. त्याने कथेत भर पडायची नाही किंवा कथानक पुढेही जायचे नाही. मूळ कथानकाला खीळ बसायची.

जॉनी वॉकरच्या काळात जो मान विनोदी अभिनेत्याला मिळायचा नाही, तो महेमूदने महत्प्रयासाने मिळवून दिला. काही ठिकाणी तो हिरोपेक्षाही जास्त भाव खाऊन जायचा. त्याच्या आडदांड शरीरासोबतही एक निरागसता त्याने आपल्या देहबोलीत जपली होती. बॉम्बे टू गोवा मी कितीदाही बघू शकते, किती अर्थहीन तरी धमाल आहे तो सिनेमा. या सगळ्या गोंधळातही एक सुसूत्रता आहे , जी प्रेक्षकाला बांधून ठेवते. विनोदी अभिनेत्याला दर्जा व पत मिळवून देणारा अभिनय करून महेमूदने जी उंची प्राप्त करून दिली होती , ती जॉनी लिव्हर व शक्ती कपूर यांनी घालवून टाकली असं मला खरंच वाटतं.

सिद्धार्थची एनर्जी मला आवडते, तो चांगले काम करू शकतो. त्यानी स्वतःची शैली जपावी, दुसऱ्याला कॉपी करु नये. तो काही मिमिक्री आर्टिस्ट नाही.वाया घालवले आहे याबद्दल सहमत. संजय मिश्रालाही वायाच घालवले आहे. जॅकलिन सोडून सगळ्यांनाच वाया घालवले आहे. ती मात्र 'वाया प्रूफ' आहे. Happy प्रियदर्शनचा सिनेमा मलाही आठवला होता. दीपिकाचे आयटम सॉन्ग जिममधे एकायला चांगले आहे.

केकू, मला meaningless सिनेमे आवडतात, रोशेचाच पहिला गोलमाल आणि धमाल दोन्ही माझे आवडते आहेत. दोन्ही meaningless आहेत पण चलाख आहेत. If it is meaningless, it has to be clever and fun, Circus is neither !! Happy

आता तुम्ही हे गाणंं पहा आणि ऐका.
https://www.youtube.com/watch?v=r7sI7T1EJwk&ab_channel=IshtarMusic
It is so simple to be meaningfull, subtle, etc etc and so difficult to be Absurdist.
अस्मिताजी, आयुष्यात कधी लॉजिक भेटत नाही पण सिनेमात मात्र पाहिजे. अस का बर?

अस्मिता मला सिनेमांत रस नसल्याने मी हा धागा वाचलेला नाही. पण तुझा आहे तेव्हा मस्त धमाल असणार याची खात्री आहे. पण सिनेमे प्रचंड बोअर होतात मला.
माझी येथिल, उद्धट वाटू शकणारी कमेन्ट काढलेली आहे. कारण त्यानंतर संवाद/वाद-विवाद एकदम ठप्प पडला. माफी असावी.

मला meaningless सिनेमे आवडतात, रोशेचाच पहिला गोलमाल आणि धमाल दोन्ही माझे आवडते आहेत. >>> प्रेक्षकाला कोणता पिक्चर कधी आणि का आवडावा याचं काही एक शास्त्र नाही. पहिल्या पाचच मिनिटात दिग्दर्शक आपले इरादे स्पष्ट करत असेल तर हा डोकं बाजूला ठेवून पहायचा पिक्चर आहे या परस्पर समझोत्यातून तो पिक्चर पाहिला जातो. तो बिनडोकपणा मात्र ट्रॅक सोडून मधेच भलताच आव आणू लागला कि चहात मीठ लागावं तसं होतं.

वैचारिकतेचा आव आणलेल्या सिनेमाला मात्र आपण डोकं जागृत ठेवून, अंधारात डोळ्यात बोटं घालून तपशिलासकट बघतो.
आखिर आपसका मामला होता है. म्युच्युअल अंडरस्टँडींग फसलं कि फसलं.

सर्कस ना धड अंगूर च्या जॉनर मधला, ना ओम शांती ओम सारखा, ना फार्स सारखा. सगळंच मिक्श्चर केलंय. आणि एव्हढे रामोजी राव सिटी सारखे रंगीत संगीत सेटस का वापरायची बुद्धी झाली हा सारखा पडणारा प्रश्न !! एखादं लोकेशन वारंवार दिसू लागलं कि आपणही सांगतो हा पाचगणीचा पॉइण्ट, हे शिमल्याजवळचे जय जय शिव शंकर मंदीर... रोहित शेट्टीचा सांवरिया वाटतो पिक्चर.

सवयीनुसार, सिनेमा पाहिलेला नाही. पण परीक्षण आणि प्रतिसाद (१+१+१+१+१+१.....)^न आहेत. meaningless सिनेमा मला आवडतो. जाने भी दो यारो हा meaningless चा बादशहा वाटतो.

जाने भी दो यारो धमालच होता. Infinite Gratitude, हीरा Happy !
फार चपखल सांगितले आहे, आचार्य.
सामो, इतकं सोपं नाहीये बरं मला नाराज करणं , तू मोकळेपणाने लिहित जा. Happy

जबरी लिहिलंय अस्मिता.. रिमोट उचलण्याची शक्ती/पक्षी काही वेळा कामसूपणा) हे तर आमच्याकडे नित्याचंच आहे.. ःफिदीः

जॉनी लिव्हर आमचा खूप लाडका होता. जबरदस्त करायचा. शक्ती कपूर मात्र नाही आवडायचा. काम चांगलेच करायचा तरीपण.
अस्मिताचा रिव्ह्यु वाचुन तरीही कोणी हा सिनेमा पाहिला तर त्या व्यक्तीला शाब्बासी.

Pages