टहनीपर बैठा था वो...
नीचे तालाब था पानीका, और -
तालाबके अंदर आसमान था
डूबनेसे डर लगता था
न तैरा, न उड़ा, न डूबा
टहनीपर ही बैठे बैठे बिलाखिर वो सूख गया
एक अकेला शाखका पत्ता!
कवितेचं आणि माझं शाळेच्या दिवसापासूनच कधी जमलं नाही. पण गुलजारचे शब्द आवडतात. नेहमी कळतातच असं नाही. आता हेच बघा ना. वरच्या ओळी परवा एका दिवाळी अंकातल्या लेखात वाचल्या तेव्हापासून मनात रुतल्या आहेत. पण नेमक्या कळल्या नाहीत अजून. झाडाखालचा तलाव कशाचं प्रतीक आहे? अथांग वाहणाऱ्या जीवनाचं का अटळ अश्या मृत्यूचं? कशाला घाबरतंय ते पान? आहे तिथेच राहिलो तर एक तर सुकून जाऊ किंवा वाऱ्यावर कुठेतरी दूर उडून जाऊ हे प्राक्तन त्याला माहीत असणारच. कारण भोवतालच्या अनेक पानांचं हेच तर होताना पाहिलं असणार त्याने. शेवटचं उरलंय ना ते. मग आहे तिथेच सुकण्यापेक्षा लाटांवर तरंगत अलगद शेवट झालेला काय वाईट? का जे आहे ते ठीक आहे असं म्हणत स्थित्यंतर नाकारतंय ते? जे व्हायचंय ते इथेच होऊ देत. कदाचित आता कुठलाही बदल स्वीकारण्याची इच्छा आणि ताकद नसेल राहिली. हे सांगतोय का गुलजार?
मग एकदम जाणवलं की मृत्यू आणि बदल ह्या तर टोकाच्या गोष्टी आहेत. जे आहे ते तरी समरसून जगतो का आपण? सुखाच्या क्षणी पुढच्या वळणावर दु:ख दबा धरून तर बसलं नाहीये ना ही भीती आणि दु:ख वाट्याला आलं की सुखाच्या वाटेकडे डोळे लावून बसणं. झोकून देऊन जगतो का आपण कधी? निदान एखादा क्षण तरी? डूबनेसे डर लगता था. आयुष्याच्या डोहात बुडी मारून तळाशी जायची भीती वाटते आपल्याला. कुठल्या प्रश्नांच्या गुंत्यात पाय अडकेल काय माहीत. परत वर नाही येत आलं तर? एका मृत्यूनंतर काय ह्या प्रश्नाचं ठाम उत्तर कोणाकडेही नाही. चिमूटभर राख का पुनरपि जननं पुनरपि मरणं? पुनरपि जननं असेल तर कुठे हा प्रश्न आहेच. कोण म्हणतं पाप-पुण्याचा हिशेब ह्याच जन्मी चुकता करायचा. कोण म्हणतं ह्या जन्मीचं त्या जन्मी फेडायचं. पुढचा जन्म (असलाच तर!) ह्या गणितावर अवलंबून नसेल तर random असतो का? नुसत्या विचाराने थरकाप होतो. नको हे प्रश्नांचं मोहोळ. काठाकाठावर जगणं बरं.
म्हणून काठाकाठाने जगतो आपण. जायची वेळ येईतोवर.
टहनीपर ही बैठे बैठे बिलाखिर वो सूख गया
एक अकेला शाखका पत्ता!
—
'अग्गबाई!'
खिडकीबाहेरच्या जाळीवर ठेवलेली भांडी काढताना मातोश्रींचा हा आवाज ऐकला की समजावं काहीतरी पडलं खाली. 'फक्त मोठी भांडी ठेव त्यात. जाळीतून पडणार नाहीत' किती वेळा सांगून झालंय. पण 'बालादपि सुभाषितं ग्राहयम' वगैरे संस्कृत वचनं आया मनावर घेत नाहीत. तरी बरंय. ३-४ चमचे गमावल्यावर वाळायला त्यांची रवानगी windowsill वर होते. वाट्या-bowlsच्या नशिबी हे भाग्य अद्याप यायचं आहे. तस्मात एक स्टीलचं छोटं bowl खाली पडलं होतं.
'जा ना जरा खालून घेऊन ये'
'अगं, तिथे वाट्या-bowls ठेवू नको म्हणून सांगितलं तर ऐकत नाहीस. आता मला कपडे बदलून जावं लागेल परत.'
'घरातल्या कपड्यात जा. कोण असतंय आता दुपारच्या वेळेला बाहेर. लवकर जा नाहीतर त्या कामवाल्या बाया जातात त्या घेऊन जातील उचलून'.
'बरी आहेस ना? ह्या अवतारात जाऊ? लोक म्हणतील ही वेडी झाली बहुतेक'
वैतागत मी कपडे बदलले आणि खाली पळाले. बाहेर ऊन मी वगैरे म्हणत होतंच. तरी bowl समोरच पडलं होतं. पुन्हा पित्ताचा त्रास नको म्हणून ते उचललं आणि पळत लिफ्टमध्ये शिरले. bowl ला पोचा वगैरे आलाय का काय बघत होते तर पूर्वी स्टीलच्या भांडयावर नाव कोरून द्यायचे तसं नाव आणि तारीख कोरलेली दिसली - आशा कीर. १९८५ ची तारीख होती. आं? ही बाई कोण?
'आशा कीर कोण ग?' आईच्या हातात bowl देता देता मी विचारलं.
'आशा कीर?'
'bowl वर नाव आहे बघ. तारीख पण आहे १९८५ ची.'
आईने bowl उलटंपालट करून बघितलं. 'अय्या खरंच की.'
'ही आईची मामी.'
'आज्जीची मामी?' म्हणजे आपली कोण ह्या प्रश्नावर मी काही सेकंद विचार केला. जाऊ देत.
'कुठे राहायची ती. कधी उल्लेख नाही आला तो तुझ्या बोलण्यात तिच्याबद्दल'
मग आईने आठवत आठवत आजीच्या मामीबद्दल थोडंफार सांगितलं. पण १९८५ मध्ये कशासाठी तो bowl दिला होता ते काही तिला आठवलं नाही. तिला पाहिल्याचंही आईला आठवत नव्हतं.
मी मात्र आईने धुवून ठेवलेला तो bowl नंतर परत एकदा हातात घेऊन पाहिला. किती वेळा त्यातनं काय काय घेऊन खाल्लं असेल. कधी नाव दिसलंच नाही. कशी दिसत होती आजीची ही मामी? गोरी होती का सावळी? उंच होती का? सडपातळ का ठेंगणीठुसकी? पाचवारी का नऊवारी? वेणी का अंबाडा? प्रेमळ होती का खडूस? ह्या प्रश्नाची उत्तरं आता मिळणं शक्य नव्हतं.
मागेसुधदा असंच कुठल्यातरी भांड्यावर कोणाचं तरी नाव सापडलं होतं. मला वाटतं त्याबद्दल लिहिलंही होतं मी. पण असे अजून नातेवाईक असतील असं वाटलं नव्हतं तेव्हा. एका सुट्टीच्या दिवशी दुपारी किचनमधली आणि मग माळ्यावरची भांडी काढून कश्याकश्यावर नावं आहेत ती पाहायचं ठरवलं.
अजून हा निश्चय तडीस जायचाय. त्या भांडयांत किती विस्मरणात गेलेले नातेवाईक दडून बसले असतील काय माहीत.
—
'सुरेशच्या बहिणीचं लग्न ठरलंय' माझा भाऊ म्हणाला.
सुरेश आमच्या second home चा केअरटेकर.
'चला उजवली का तिला पण? कर्तव्यातून मोकळी झाली त्याची आई' हे महान उद्गार आदरणीय मातोश्रींशिवाय कोण काढणार आणखी? I rolled my eyes (हे वाक्य मराठीत कसं म्हणायचं?).
सुरेश आमच्याकडे आधी लागला तेव्हा त्याच्या बोलण्यात फक्त आईचा आणि बहिणींचा उल्लेख यायचा. बरं त्याच्या आईच्या गळ्यात तर मंगळसूत्र दिसत होतं. त्याला विचारलं तर एव्हढंच म्हणाला की बाबा नागपूरकडे असतात. एक दिवस त्याच्या आईनेच बोलता बोलता खुलासा केला.
'आता तुमच्यापासून काय लपवायचं ताई? सुरेश ३-४ वर्षांचा होता आणि धाकटी असेल १-२ वर्षांची तेव्हा त्याचे बाबा सोडून गेले. त्यांना नागपूरला राहायचं होतं. मला इथे ह्या गावात'. नोकरीनिमित्त नवरा-बायकोने वेगळ्या शहरात राहणं पाहिलं होतं पण ह्या छोट्या गावात तो मोकळेपणा असणं शक्यच नव्हतं. मी आणि आई काय ते समजून गेलो. ह्या असल्या नवर्याच्या नावाने ही बाई मंगळसूत्र घालते ह्याचाच मला राग आला. त्याच्या नावाने आंघोळ करायला हवी होती खरं तर तिने. पण जोवर तो जिवंत आहे तोवर ते घालणं तिची मजबुरी असावी.
सुरेशला मोठ्या ३ बहिणी आणि धाकटी एक. वडील निघून गेल्यावर त्याच्या आईला गावातच असलेल्या आईवडिलांचा आणि मोठ्या भावाचा भक्कम आधार मिळाला हे विशेष. वडिलांनी राहतं घर मुलीच्या नावावर करून दिलं. तरी मोठ्या तिन्ही बहिणींनी मुंबईत राहून मुलं, वृद्ध माणसं सांभाळायचं काम करून आईच्या संसाराला हातभार लावला होता. फार शिकल्या नसतील पण गावाच्या रीतीप्रमाणे योग्य वयात तिने त्यांची लग्न करून दिली होती. पदरात ५ पोरं, नवरा सोडून गेलेला,उत्पन्नाचं साधन नाही तेव्हा त्या बाईला काय वाटलं असेल? त्या स्थितीत माझी कल्पना केली तरी जीव दडपतो. किती खस्ता खाव्या लागल्या असतील तिला. हे सगळं कळल्यावर त्याच्या आईला मी मनोमन सलाम केला होता.
तर आता ही धाकटी बहीण लग्नाची राहिली होती. तिला खरं तर एव्हढ्यात लग्न करायचं नव्हतं म्हणे पण गावातल्या कोणा माणसाच्या मुलीने परजातीतल्या मुलाबरोबर लग्न केल्याची बातमी सुरेशच्या आईनेच आम्हाला सांगितली होती. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली असेल कदाचित. पण सुरेशच्या बहिणीचं लग्न नंतर महिन्याभरात ठरलं हे नक्की.
यथावकाश सुरेशचा फोन आला आणि व्हॉट्सएपवर पत्रिकाही आली. उत्सुकतेने उघडून पाहिली आणि तळपायाची आग मस्तकात गेली माझ्या.
गावाच्या शिरस्त्याप्रमाणे गावातल्या अनेकांची नावं होती त्यात. सुरेशच्या मामांची, मामेभावांची नावं होती. त्याच्या वडिलांचं नाव तर अगदी सगळ्यात आधी होतं.
पत्रिकेवर एकच नाव नव्हतं. त्याच्या आईचं.
त्याचे वडील लग्नाला आले की नाही मला माहित नाही. पण गावातल्या आमच्या घरात असून आम्ही कोणीच त्या लग्नाला गेलो नाही.
—-
हे पन्ने नेहमी वाचणाऱ्या मायबोलीकरांना कदाचित आठवत असेल - मी ह्याआधी लिहिलंय की आमचं कुटुंब देव मानणारं असलं तरी घरात पूजा वगैरे कधी झाल्याचं मला आठवत नाही. आईबाबा पहिल्यांदा ह्या घरात आले तेव्हाही फक्त दूध उतू जाऊ देण्याखेरीज गृहशांती वगैरे काही केली नाही. दोन्हीकडचे आजीआजोबासुद्धा त्याच विचारांचे असल्याने कोणालाही ह्यात काही खटकण्याचा प्रश्नच आला नाही.
त्यामुळे दोन वर्षांखाली काही कारणाने घरात पूजा करायचं ठरलं तेव्हा 'संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी' ह्या न्यायाने गुरुजींचा शोध सुरु झाला. माझी एक जवळची मैत्रीण धार्मिक आहे. मागे एकदा तिने "प्रदोष आहे म्हणून माझा उपास आहे" असं सांगितलं तेव्हा 'प्रदोष म्हणजे काहीतरी अशुभ आहे असं मला वाटलं होतं' असं सांगून तिला मी फेफरं आणलं होतं तर तिच्याकडे चौकशी केल्यावर बहुतेक आधी ती तीन ताड उडाली असणार. त्या धक्क्यातून सावरल्यावर तिने मला त्यांच्या गुरुजींचा नंबर दिला. हे गुरुजी भलतेच बिझी निघाले. आज फोन करा, उद्या फोन करा असं करत करत त्यांनी आठवडाभर आम्हाला तंगवल्यावर आम्ही त्यांचा नाद सोडून दिला. मग मी सरळ व्हॉटसएपला शरण गेले आणि आमच्या एरियातल्या एक रिसोर्स ग्रुप आहे त्यावर हा मेसेज टाकला. तिथे एका गुरुजींचा नंबर मिळाला आणि 'अगदी देवमाणूस' हे सर्टिफिकेटसुद्धा मिळालं. 'देवमाणूस' वगैरे वर्णन केलेले लोक बेरकी निघतात हा अनुभव असल्याने मी थोडा सावध पवित्र घेतला.
पण हे गुरुजी खरोखर सज्जन निघाले. आणि सहनशक्ती तर अफाट. माझे किती प्रश्न ऐकून त्यांना चक्कर आली असेल कोणास ठाऊक. त्यांनी पूजेसाठी आणायच्या सामानाची यादी दिल्यावर आमच्यात झालेला व्हॉट्सएपवरचा संवाद मुळातून वाचण्यासारखा आहे.
(भावना दुखावण्याची वगैरे भानगड असेल तर पुढे वाचू नका. मी पुढला संवाद काही अभिमानाने लिहीत नाहीये. पण उगाचच गिल्टसुद्धा नाहीये. ज्याला जसं वाटेल तसं आणि तेव्हढंच धार्मिक असावं असं माझं मत आहे. नंतर कुरकुर नको. तुमचं मत तुमच्याकडे. माझं माझ्याकडे.)
"तेला-तुपाचा दिवा म्हणजे निरांजन का?" - मी
'हो, तेलाचा एक आणि तुपाचा एक असे दोन दिवे' - गुरुजी
'ताम्हण, पळी-भांडं, आसन / पाट, कुंकू, रांगोळी, कापूर वगैरे रानडे रोडवर मिळालं तर पहाते'
'पाट नसेल तरी चालेल. उगाच विकत आणू नका. घरात स्टीलचा तांब्या असेल तर तोही चालेल. पळी-भांड्याऐवजी चमचा, ग्लास चालेल, घरातलं कुंकू चालेल. १ रद्दी पेपर काढून ठेवा'.
कुंकू, कापूर ह्या गोष्टी यथावकाश मिळाल्या. रांगोळी मिळायची चिन्ह दिसेनात. गुरुजींना कळवल्यावर 'चिंता करू नका. जे नाही मिळालं ते मी आणतो' असं म्हणाले. अमुकच हवं, तमुकच हवं किंवा तुम्हीच घेऊन या असा आग्रह अजिबात नाही.
मग मी जे काही होतं त्या सगळ्याचा फोटो पाठवला. त्यात एकच ताम्हण पाहून ते म्हणाले की मी दोन्ही घेऊन येतो. गंध नव्हतं तेही त्यांनीच आणलं. सुदैवाने घरात चंदन पावडर मिळाली.
पूजा व्यवस्थित पार पडली. घरभर फुलांचा, कापराचा वास दरवळत राहिला. मंत्रांचं उच्चारण स्वच्छ होतं पण संस्कृतचा हात सोडून वर्षं लोटली आहेत. काही कळलं, बरंचसं निसटून गेलं. पण जे काही ओंजळीत राहिलं ते खूप समाधान देऊन गेलं.
मनात आलं - असाच असावा ना धर्म. वाहत्या नदीसारखा. आसपासचे बदल सामावून घेणारा. विशाल. ज्याला जितकं, जे आणि जेव्हा हवं तसं त्याने घ्यावं. आग्रह नको, दुराग्रह नको, धाक नको, भीती नको. भाव असावा. दगडाचा देव असावाच असं काही नाही.
दगडातही देव असतो असं म्हणतात. पण म्हणून तो फक्त दगडातच आहे असं समजायची गरज नाही.
—--
आमच्या घरासमोरच्या झाडावर नेहमीच्या पक्ष्यांसोबत गेले काही दिवस एक केशरी रंगाचा पक्षी दिसायचा. नेहमी सगळ्या फांद्यावरून नाचत बागडत असायचा. एका जागी म्हणून स्थिर नाही. त्याचा गर्द केशरी रंग मावळतीच्या उन्हात सुरेख दिसायचा. शेपटी थेट fantail सारखी पण डोकं बुलबुलसारखं. नेटवर fantail आणि बुलबुल दोन्हीच्या जाती पाहून झाल्या. पण हा कोण ह्याचा पत्ता नाही लागला. फोटोही काढता आला नाही. तो एकुलता एक असल्याने migratory असणार हे उघड होतं. तरी हा इथे कायम वस्तीला राहावा असंच वाटायचं. ५:३० च्या चहाच्या वेळेस बरोबर हजर व्हायचा ते सूर्यास्त झाला की गायब व्हायचा.
हळूहळू ५:३० च्या ऐवजी तो ५:४५-६ ला येऊ लागला. हवेतला गारवा गेला आणि एक दिवस तो आला नाही. काही दिवस आम्ही वाट पाहिली. मग लक्षात आलं की तो पुढल्या मुक्कामाला निघून गेला असणार. चुटपुट लागली. एक फोटो काढून घ्यायला हवा होता.
पुढल्या वर्षी येईल का?
त्याला हे ठिकाण लक्षात राहील का?
इथून गेल्यावर त्याला इथली आठवण येत असेल का?
आम्ही तो यायची वाट पाहायचो आणि तो जाईपर्यंत हातातलं काम टाकून त्याच्या खोड्या पाहत राहायचो हे त्याला माहीत असेल का?
बाकीचे पक्षी यायचे तरी त्याच्यावाचून ते झाड सुनंसुनं वाटायला लागलं.
काय करायचं काय ह्या हुरहुरीचं?
पुन्हा गुलजार आला मदतीला. म्हणाला...
हाथ छुटे भी तो रिश्ते नही छोडा करते
वक्तकी शाखसे लम्हे नही तोडा करते
जिसकी आवाजमें सिलवट हो, निगाहोमे शिकन
ऐसी तसवीरके टुकडे नही जोडा करते
शहद जीनेका मिला करता है थोडा-थोडा
जानेवालोंके लिये दिल नही थोडा करते
लगके साहिलसे जो बहता है, उसे बहने दो
ऐसे दरियाका कभी रुख नही मोडा करते
स्वप्ना, तु ज्या सहजतेने तुझे
स्वप्ना, तु ज्या सहजतेने तुझे विचार लेखणीत नेमक्या शब्दात व तुझ्या खास शैलीत मांडतेस त्याला तोड नाही! गुलझारच्या कवितेच्या ओळींचा अर्थ लावताना किती गहन व अंतर्मुख करणारे विचार मांडलेस! खुद्द गुलझारने त्या कवितेत काय भावार्थ दडवला होता हे समजण्याइतके कवितेंबद्दल माझे ज्ञान नाही पण तुझा त्या कवितेत काय भावार्थ दडलेला असेल याबद्दलचे विचारमंथन मात्र खुप भावले!
खुप दिवसांनी (का खुप वर्षांनी?) मायबोलीवर आलीस. बर झाल! त्या निमित्ताने मायबोलीवर काहीतरी दर्जेदार वाचायला मिळाल! धन्यवाद!
(No subject)
गुलझारची तू लिहीलेली दुसरी
गुलझारची तू लिहीलेली दुसरी कविता आवडतेच. पहिली मात्र वाचली नव्हती या आधी. त्यासाठी स्पेशल थँक्यू.
आणि पन्न्याबद्दल काय लिहू? इतके वेगवेगळे विषय इतक्या सहजतेने आणि ओघ न बदलता एकाच पन्न्यात लिहीणं किती लीलया करतेस, स्वप्ना! You are blessed indeed.
पक्षी यापैकी कुठला होता का पहा -
https://en.wikipedia.org/wiki/Black-and-orange_flycatcher
https://en.wikipedia.org/wiki/Orange_minivet
पक्ष्यांची अशीच सवय लागते. आमच्या घरासमोरच्या झाडावर असंच एका रॉबिनने घरटं केलं होतं मागे एकदा. त्याचा/ची पार्टनर काही दिसायचा नाही. तो एकटाच असायचा. मग एक दिवस खूप जोराचं वादळ झालं. त्यानंतर तो घरट्यात परतलाच नाही. मी पण तुझ्यासारखीच काही दिवस वाट पाहिली त्याची. पण तो नाहीच आला. जाऊदे.
खूप तरल आणि सुंदर स्वप्ना ...
खूप तरल आणि सुंदर स्वप्ना ... लिहीत रहा ग ..
तुमचे लेखन खरेच सुंदर असते
तुमचे लेखन खरेच सुंदर असते ! . खूप दिवसानी लिहिलंत, worth the wait.
सुंदर! मी मायबोलीवर नवीन
सुंदर! मी मायबोलीवर नवीन असतानाच्या काळापासून तुमची ही सीरीज आवर्जून वाचतेय. आज बऱ्याच दिवसांनी नवीन पन्ना पाहून खूपच छान वाटलं. प्लीज लिहीत रहा.
वरील सर्व सर्व प्रतिसादांशी
वरील सर्व सर्व प्रतिसादांशी सहमत..
काय सुरेख लिहिलं आहे, व्वा!
काय सुरेख लिहिलं आहे, व्वा!
"...मनात आलं - असाच असावा ना धर्म. वाहत्या नदीसारखा. आसपासचे बदल सामावून घेणारा. विशाल. ज्याला जितकं, जे आणि जेव्हा हवं तसं त्याने घ्यावं. आग्रह नको, दुराग्रह नको, धाक नको, भीती नको. भाव असावा. दगडाचा देव असावाच असं काही नाही.
दगडातही देव असतो असं म्हणतात. पण म्हणून तो फक्त दगडातच आहे समजायची गरज नाही...."
या ओळीना +१००
छान. आवडलेच!
छान. आवडलेच!
सुंदर! बऱ्याच दिवसांनी आलीस.
सुंदर! बऱ्याच दिवसांनी आलीस. लिहीत रहा...
वा!
वा!
पहिल्या कवितेचा जो अर्थ मला वाचताना जाणवला त्यापेक्षा बराच गहन अर्थ तू लावलास.
खूप छान लिहीले आहे.
खूप छान लिहीले आहे. पक्ष्याचा अनुभव आहे.
अगदी केशरी सुंदर नाही. आमचा बाळ्या आहे राखाडी कबूतर. एका पंखावरती एक तर दुसर्या पंखावरती २ शुभ्र रेघा असलेला. सांगायचा मुद्दा - आहे इम्परफेक्ट पण फार जीव लावलाय. गॅलरीत येउन आत बघत बसतो. गुड मॉर्निंगचा आवाज काढतो. पण एकदाच सकाळी भेटल्या भेटल्या.
का कोण जाणे काही दिवसात दिसला नाही. हुरहूर लागली आहेच पण मनात कुशंका येतायत. हा हिवाळा नाही काढणार असे वाटते.
---------
गुलजारच्या कविता मस्त पेरलेल्या आहेत. धर्माबद्दल वाचताना - ""मानवी संस्कृती हा एक वाहता प्रवाह आहे. त्याला किनारे आहेत. माणसे आपापसात लढतात. ...." हा शांता शेळके यांच्या 'ललित नभी मेघ चार' मधील उतारा आठवला. अर्थात दोन्ही उतार्यांमधील कल्पकता वेगळी आहे. आणि दोन्ही आवडले. साभार - http://sansmarniya.blogspot.com/2010/01/blog-post_29.html
---------------
कसे काय मिस झालेले नकळे. पण तुमचे लेखन वाचले नव्हते. खरच अशी होती का जुनी मायबोली .... मग बरोबर!!!
खुप खुप छान लेखन.
खुप खुप छान लेखन.
"...मनात आलं - असाच असावा ना धर्म. वाहत्या नदीसारखा. आसपासचे बदल सामावून घेणारा. विशाल. ज्याला जितकं, जे आणि जेव्हा हवं तसं त्याने घ्यावं. आग्रह नको, दुराग्रह नको, धाक नको, भीती नको. भाव असावा. दगडाचा देव असावाच असं काही नाही.
दगडातही देव असतो असं म्हणतात. पण म्हणून तो फक्त दगडातच आहे समजायची गरज नाही...."
>>>>> अगदी अगदी
अप्रतिम!
अप्रतिम!
नेहमीप्रमाणे सुरेख लिहले आहे.
नेहमीप्रमाणे सुरेख लिहले आहे. त्यात गुलजारच्या कविता.. आहाहा..अगदी तरल
बऱ्याच दिवसांनी लिहीती झालीस!
बऱ्याच दिवसांनी लिहीती झालीस!
नवीन पन्ना अतिशय सुरेख! गुलजारांची सुरुवातीची कविता माहिती नव्हती. लिहीत रहा अशीच!
मनात आलं - असाच असावा ना धर्म
मनात आलं - असाच असावा ना धर्म. वाहत्या नदीसारखा. आसपासचे बदल सामावून घेणारा. विशाल. ज्याला जितकं, जे आणि जेव्हा हवं तसं त्याने घ्यावं. आग्रह नको, दुराग्रह नको, धाक नको, भीती नको. भाव असावा. दगडाचा देव असावाच असं काही नाही.
दगडातही देव असतो असं म्हणतात. पण म्हणून तो फक्त दगडातच आहे समजायची गरज नाही ## क्या बात है।
अतिशय तरल अनुभव!
अतिशय तरल अनुभव!
प्रत्येक मुद्द्यावर अगदी अगदी हेच वाटतं असं झालं.
प्रतिसादाबद्द्ल सर्वाचे आभार
प्रतिसादाबद्द्ल सर्वाचे आभार
मला समजलेला अर्थ असा की, आपण
मला समजलेला अर्थ असा की, आपण कधी जीवनाचा आनंद घेत नाही संधी समोर असून सुद्धा कारण फक्त भिती. बरोबर का चूक भगवान जाने.
पण कवितेचा एकच असा अर्थ नसतो. ते प्रत्येकाचा दृष्टीकोण असतो, जो अनुभवानुसार बदलतो,
>>>>मग एकदम जाणवलं की मृत्यू
>>>>मग एकदम जाणवलं की मृत्यू आणि बदल ह्या तर टोकाच्या गोष्टी आहेत. जे आहे ते तरी समरसून जगतो का आपण? सुखाच्या क्षणी पुढच्या वळणावर दु:ख दबा धरून तर बसलं नाहीये ना ही भीती आणि दु:ख वाट्याला आलं की सुखाच्या वाटेकडे डोळे लावून बसणं. झोकून देऊन जगतो का आपण कधी?<<<
हेच ते मला समजलेलं... निव्वळ भितीखाली बरेच आयुष जातं.
>>>'अगदी देवमाणूस' हे
>>>'अगदी देवमाणूस' हे सर्टिफिकेटसुद्धा मिळालं. 'देवमाणूस' वगैरे वर्णन केलेले लोक बेरकी निघतात हा अनुभव असल्याने मी थोडा सावध पवित्र घेतला.<<<
अगदी अगदी. मला तर एकदमच हरा*** भेटलेत देवमाणूस म्हणून ख्याती असलेले.
पुजेतील संवाद वाचून एक किस्सा आठवला.
माझा आणि आजीचा वाद आठवला. आजी अडून बसलेली की, केळीचं पान नाहीये, चंदन सुद्धा नाहीये. मी म्हटलं , आता उन्हात कोण जाणार?
मी आजीला म्हणाले, काय ते किती तो अवडंबर. हे केलं नाही तर देव रागवतो, ते केलं नाही तर चालत नाही. कोणी सांगितलं तुला आजी? काहीही लॉजिक नसताना करत बसायचं. सुटसुटीतपणा नाहीच. जमेल तसं करा ना. काळानुसार वागा ना.
आजी शांतपणे उत्तरली(मी तावातावाने बोलायला लागली की तिला माहित असायचं की कमीच बोलावं :)) , मग देव सुद्धा सुटसुटीतच देइल. त्याला जसं जमेल तसं, जमेल तेव्हा?
मग एकदम जाणवलं की मृत्यू आणि
मग एकदम जाणवलं की मृत्यू आणि बदल ह्या तर टोकाच्या गोष्टी आहेत. जे आहे ते तरी समरसून जगतो का आपण? सुखाच्या क्षणी पुढच्या वळणावर दु:ख दबा धरून तर बसलं नाहीये ना ही भीती आणि दु:ख वाट्याला आलं की सुखाच्या वाटेकडे डोळे लावून बसणं. झोकून देऊन जगतो का आपण कधी?>>>>>>> खरं आहे! भिती आणि लोकं काय म्हणतील यातच आयुष्य जातं.
असाच असावा ना धर्म. वाहत्या नदीसारखा. आसपासचे बदल सामावून घेणारा. विशाल. ज्याला जितकं, जे आणि जेव्हा हवं तसं त्याने घ्यावं. आग्रह नको, दुराग्रह नको, धाक नको, भीती नको. भाव असावा. >>>>>> १००%
खूप छान. आवडलं.
खूप छान. आवडलं.