भिंत

Submitted by मंगलाताई on 11 February, 2023 - 00:47

भिंत
‌ घर प्रत्येकाचं . घराच्या भिंती आपल्या . भिंतींशी ओळख, भिंतींशी जवळीक आणि रोजची सुरू असलेले व्यवहार .आपल्या घराच्या भिंती आपल्या किती जवळच्या असतात . त्या चार भिंतीच्या आत स्वतःला सुरक्षित ठेवून , स्वतःला झोकून देऊन आपण आत गुंततो . भिंतीला कधी जवळून आत्मीयतेने बघणे वगैरे आपण काही करत नाही . भिंतीचे निरीक्षण भिंतीचा आपलेपणा वगैरे साठी आपल्याला निवांत वेळच नसतो मुळी . पण आपल्याला सर्वात सुरक्षित वाटतं असलेली जागा कुठली आहे तर आपलं घर . घराच्या भिंती भिंतीला असलेले दार दारावरची कडी , कडी लावून अडकवलेले कुलूप आणि किल्ली सुरक्षित ठिकाणी ठेवून आपण निर्धास्त असतो .
कसा लागला असेल भिंतीचा शोध आपल्या पूर्वजांना ॽ कसा आला असेल भिंती बांधण्याचा विचार त्यांच्या मनात ॽ कुडाच्या भिंतीपासून प्रवास सुरू होऊन सिमेंटने बांधलेल्या भिंतीपर्यंतचा प्रवास झाला आहे . यात भिंतींची किती रुपं बदलली असतील , किती नव्या कल्पनांनी भिंतीला नवे रूप देऊन जन्माला घातले कोण जाणे ॽ कुडाच्या भिंतीतही सुरक्षितता नक्कीच वाटली असेल आणि आता इमारतीच्या भिंतीतही सुरक्षितता आहेच ‌. कुडाच्या , झावळ्याच्या , लाकडी , पत्र्यांच्या, सिमेंटच्या पत्र्यांच्या , ताडपत्रीच्या, बांबूच्या , नारळी दोरीने विणलेल्या , तरटाच्या , लाकडी पडप्यांच्या काचेच्या , प्लास्टिकच्या , मातीच्या , खंजिरी विटांच्या ,भाजणीच्या विटांच्या , सिमेंटच्या भिंती ऐकिवात आणि पाहण्यात आहेत . आता तर असे वाचनात आले की , कागदाच्या , वर्तमानपत्राच्या भिंतीही आहेत . पण काळाची पावलं ओळखून बेंगलोरला एका महिलेने फेकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यातून गोळा केलेल्या बाटल्यांची भिंत तयार करून घर बांधले आहे . स्थानिक गरज , संशोधक वृत्ती , उपलब्ध सामग्री यावर आधारित रचना होत राहिली आहे भिंतीची .
मातीच्या भिंतींची जाडी 9 ते 35 इंचापर्यंत असलेली पाहिलेली आहे मी .दोन हातांच्या कवेत न मावणारी भिंत आजे सासऱ्याच्या वडिलांनी बांधलेल्या घरी होती आमच्या गावाकडे . नंतर ती घरे ढासळत जाऊन पडायला आली . मातीच्या भिंती बांधतांना त्यावर लाकडी सागवानी बत्ते ठोकून लादनी करायचे . वर शाकारायला भाजकी कौल असायची ,नळीची कौलं किंवा पुढे जाऊन इंग्रजी कौलं साच्यातली . आता सारा संपलं . खेड्यापाड्यात दिसतं एखादं कौलारू घर . या मातीच्या मोठ्या भिंती घालण्यासाठी खास बेलदार मंडळी गावी उन्हाळ्यात राहुटीला यायची आणि कुटुंब कबेल्यासह असायची . यांच्याकडे गाढव असायची माती वाहून आणण्यासाठी. घर बांधण्यासाठी बेलदाराचे अख्खे कुटुंब राबायचे . साधारणता गुढीपाडव्यानंतर सुरू व्हायचे व्यवहार , ते मृग नक्षत्रांच्या एक आठवडाभर आधीपर्यंत सुरू असायचे हे बांधकाम . गावात बेलदाराला बोलावणे धाडलं की ज्यांना कुणाला घर बांधायचे ती मंडळी आपली बोलणी बेल दाराशी उरकून घ्यायची . व्यवहार कसा असायचा, धान्यं , गाय, वासरू ,मेंढी, शेळी, कोंबडी देऊन बदल्यात घर बांधून घ्यायचे ‌.पैसा काही मध्ये येत नव्हता. या बेलदारांच्या अंगी मातीच्या व कुडाच्या भिंती रचनेचे मोठे कसब होते . या मातीच्या भिंती मोठ्या कौशल्याने रचल्या जायच्या . या भिंतीतच दाराची चौकट ,खिडकीची चौकट, गज, सळया बसवून घराला आकार येई . भिंतीचा जन्म होताना सोबतीला कोनाडे, फडताळे कपाटं यांचा पण जन्म होई . कौलाच्या उताराची दिशा ठरवून भिंतीचा आकार चढे आणि उतरतही असे. मातीच्या भिंतीला वरून मुलामा देण्याचे काम मोठे जिकिरीचे असे . वाळू ,राख, शेण, माती एकत्र कालवून भिंतीला मुलामा बसे तोही हातानेच याला गिलावा असेही म्हणत असत. हाताची कातडी सोलेपर्यंत काम चाले .रात्री झोपतांना तेल हळद लावून शेकनिवा करायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी हात कामासाठी तयार. अशा प्रकारच्या भिंतींनी बांधलेल्या घरात वाड्यात बंगल्यात अनेक बिऱ्हाडं दाटी-वाटीने प्रेमाने कित्येक पिढ्या नांदत असतं .कधी डागडुजी करून भिंत सावरत असतं. या भिंती माणसाळलेल्या असतं, घरातली सुखदुःख ,लग्न ,मुंजी, बारसे ,डोहाळे जेवण, सत्यनारायण व्रत सणवार, मृत्यूचे सोहळे ,आजारपणं सारं सोसून भिंती पुन्हा माणसासाठी जिवाभावाच्या सोबती म्हणून तयारच असायच्या.
घरातली भांडण, हेवे दावे ,वाटण्या खर्च आवकजावकं सारं काही चार भिंतीच्या आत असे. स्त्रियांचा सन्मानही असे आणि पुरुषांचा मानही असे. कुटुंबप्रमुखाचा प्रभावही घरावर असे. ॓चार भिंतीच्या आत हा वाक्प्रचार अगदी समर्पक ठरत असे . भिंतीला आधार घराचा आणि घराला आधार भिंतीचा .
नवी नवरी दारी आली की भिंती माना उंचावून तिच्याकडे बघत तिचं स्वागत करत. बाळाची चाहूल लागली की भिंती कान गोष्टी करत .बाळाचे आगमन झाले की सतत जागरण सुरू व्हायची , बाळं खेळू लागले की भिंती त्यांना सावरून घ्यायच्या , मुलं मोठी झाली की भिंती कौतुकाने पुढच्या सोहळ्यांची आज लावून बसायच्या.
गावाकडून , शहरातून आलेले पाहुणे या भिंतींच्या आत सामावून जायचे ,कुठेही कधीही जागेची अडचण व्हायची नाही .
चिकन मातीने सारवलेल्या ,शेणाने सारवलेल्या , शेणाने सारवलेल्या, रंगांनी सारवलेल्या ,पेंटने सारवलेल्या भिंती प्रत्येक घराला आधार देत राहिल्या‌. सणवार असो दसरा दिवाळी असो भिंतीच रूप पालटे . भिंतीचा प्रवास सुरू होता मजल दरमजल करत भिंत सिमेंट पर्यंत येऊन पोहोचल्या.
आता भिंती अधिक सुरक्षित आहेत . मजबूत आहेत टिकाऊ आहेत पिढ्यानं पिढ्या टिकणार आहेत पण या घरात राहायला पिढ्या मात्र न टिकणार्या आहेत. भिंतीला कान असतात ही म्हण आपल्या नावाला जागते आहे आणि कोणतीही गोष्ट आज घराच्या आत न राहता सर्व दूर पसरते सार्वत्रिक होते आहे. भिंतीच्या कानाचा कोणी विचारच करत नाही , मीच का विचार करू, मीच का लहानपण घेऊ . भिंत अबोल सोशिक बघते आहे सारे दुरून .
या चार भिंतीच्या बांधणीला आणि वरच्या छताला धरून घर असे नामकरण झाले .बंदिस्त पसारा पण घरातल्यांच्या जिव्हाळ्याचा पसारा भिंतीने आपल्यात सामावून घेतला .
धुंडीराज जोशी यांच्या घर कवितेतल्या दोन ओळी घरासाठी आणि भिंतींसाठी ते म्हणतात, घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नव्हेत जिथे सुंदर कार्य होतात ते घर असते घर केवळ एक वास्तू नसते ती एक आनंदी इमारत असते .किती खरं आहे हे . घराला केवळ चार भिंती म्हणता येणार नाही अशी सजीवता भिंतीत कोण आणतं त्या घरातली माणसं . या चार भिंतीच्या आत आणखी भिंती प्रत्येकाची वेगळी खोली त्याला आणखी भिंती कारण खाजगी पणा प्रायव्हसी .
प्रश्न असा येतो की भिंतीमुळे खरंच आयुष्य खाजगी जगता येतं की , मनाच्या आतल्या भिंती आम्हालाच हव्या असल्यामुळे या भिंतींचा आधार आम्ही घेतो. प्रत्येकाला स्वतंत्र खोली आणि खोलीचे दार बंद , भिंती पलीकडचे जग एक वेगळे विश्व त्याच्याशी माझा काही संबंध नाही , मला त्याची काही देणे घेणे नाही. माझ्या फ्लॅट शेजारी असलेले कुटुंब माझ्यासारखे पण त्या कुटुंबातली मंडळी दिसू नये म्हणून गॅलरीची दिशा वेगळी दारांची तोंड विरुद्ध .शेजाऱ्यांना दूर करण्याचे काम भिंत करते की दूर व्हायला भिंत मदत करते ॽ घराभोवती भिंतीचे कंपाउंड आणि त्याची भिंत इतकी उंच की शेजारची दिसू नयेत . खरं तर आमची ओळख लपवण्यास भिंतीचा आम्हाला आसराच होतो .
॔ घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती . नुसत्या भिंतींनी घर घरा सारखातर होत नाही ते होतं घरातल्या माणसांच्या सहवासाने ,आपुलकीने .समाजातल्या भिंतींना छेद देण्यासाठी आत असलेल्या मनाच्या भिंती पडल्याशिवाय काही शक्य होईल का ॽ
वाचनात आलेली एक अशी कविता आहे की, एक लहान मूल शेजारच्या घराच्या कंपाउंड मधून डोकावून बघतो ,काहीतरी शोधायचा प्रयत्न करतोय . त्या शेजारच्या घरातला माणूस बाहेर येतो आणि मुलाला विचारतो काय बघतोस तर लहान मुलं उत्तर देतो की मी नव्याने आलोय शेजारी राहायला. माझ्याशी खेळायला तुमच्याकडे मुलंं आहे का ते बघतोय. शेजारी म्हणतो अरे मूलं कशाला शोधतोस, ये की मी तुझ्या एवढाच आहे मलाही तुझ्यासारख्याच मित्राची गरज आहे. मी हे कंपाउंड काढूनच ठेवतो म्हणजे तुला सरळच माझ्या घरात येता येईल .
गदिमांची एक सुंदर कविता आहे बिनभिंतीची शाळा . बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु , झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू .अशा बिनभिंतीच्या शाळेची कल्पना शिक्षण क्षेत्रात क्रांती आणणारी नक्कीच असेल .शाळेच्या भिंती म्हणजे वर्ग खोल्या नव्हेत आणि वर्गखोल्यातून भारताचे भविष्य घडवले जाते अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात असते . शांतिनिकेतन सारखी शाळा कोणालाही हवीहवीशी वाटेल . मुलांना तर भिंती पलीकडच्या विश्वातच रमायला आवडते . वर्गाबाहेरचे जग त्याला खुणावत असते . भिंतींच्या भिंती शाळकरी मुलांच्यात नसतातच मुळी खरंतर अख्खा वर्ग त्यांचा मित्र असतो . भिंती तर पुढे पुढे आयुष्यात येत जातात आणि त्या बळकट होत जातात . शाळेतल्या मित्रांसारखे मित्र पुढे कधीही मिळत नाही आणि नव्याने तयार होतही नाहीत.
शाळेच्या भिंती बोलक्या असाव्यात असे म्हटले जाते अशा भिंती बोलक्या करण्याचा अट्टाहास सुरू होतो, पण शिक्षणातील मुक्त प्रयोग मात्र बोलक्या भिंतींच्या ही पलीकडे क्षितिजापलीकडे नेतात . ज्ञानदेवांनी भिंत चालवली . निर्जीवतेवर सजीवता आणली तुलना चढाओढ , वरचढपणा नव्हताच मुळी त्या भिंत चालवण्याचा उद्देश .
चीनची भिंत जगातली सर्वात मोठी भिंत म्हणून गणल्या जाते . मॅकमोहन भिंत .अशा किती भिंती उभारणार आहोत आम्ही , देशांच्या सीमा ठरवण्यासाठी आणि त्याच्यापासून कोणाचे संरक्षण होते आहे ॽ खरंच अशा भिंती देशातल्या जनतेला सुरक्षित ठेवू शकतात का ॽ देशांना सुरक्षित ठेवतील अंतकरणाचे विचार . विचार आधी की भिंत आधी विचार असेल तर भिंत नको आणि भिंत असेल तर भिंतच हवी तिथे विचार संपला .
भिंती पलीकडे काही करा मला काय त्याचे , भिंती पलीकडे कचरा टाका , भिंती पलीकडे अडगळ गोळा करा , भिंती पलीकडे नको ते करा . हवे ते करण्यासाठी भिंती नको पण नको ते करायचेच का भिंत आहे म्हणून की भिंतीला दिसत नाही म्हणून . मला तर असे वाटते की भिंतीला फक्त कानच असतात असे नाही तर भिंतीला डोळेही असतात .
एखाद्या संस्कारी घराच्या भिंती आपले हसून स्वागत करतात , तर एखादी प्रसन्न भिंत आगमनातच आपले लक्ष वेधून घेते, प्रसन्नतेने या या असे भिंत सुचवत असते . हल्ली मोठ्या शहरात माणुसकीची भिंत दिसते .त्यावर कपड्यांचे, जुन्या वस्तूचे ढीग दिसतात ते बघून असं वाटतं की , अशा वस्तूंची आता गरज संपलीय की , भारतातली गरिबी संपली .पाण्यापावसात वस्तू कपडे सडत असतांना दिसतात .
भिंतीच्या तटबंदींनी अनेक किल्ल्यांचे , राजघराण्यांचे ,वारसांचे संरक्षण केले आहे . किल्ल्यांच्या मजबूत भिंती म्हणजे किल्ला अभेद्य .अभेद्य किल्ला टिकवण्याचे काम भिंतींनीच केले आहे .भारतातील ग्रेट वॉल ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाणारी 36 किलोमीटर लांबीची कुंभलगड येथील भिंत राणा कुंभाने बांधलेली आहे. ही 15 मीटर जाडीची भिंत आहे . ही भिंत बघण्यासाठी भारताबाहेरून अनेक प्रवासी इथे येतात आणि भेट देतात .कुंभल गडचे संरक्षण करणारी ही अभेद्य भिंत आहे.
भिंतीची उंची किती वाढवली भक्कम मजबुती किती केली तरी पुन्हा भीती कायमच आहे .कायम राहणार आहे, कारण माणसाकडे बघण्याची निकोप वृत्ती हेच या भिंतीवरचे उत्तर आहे .भीती आणि भिंती एका अनुस्वाराच्या फरकाने आशय बदलतो. भीती घालवण्यासाठी भिंत की भिंत आहे म्हणून भीती जास्त आहे ॽ भिती गळून पडाव्यात अशी कणव असेल तर भिंती कशा उंच होतील ॽ उंची वाढेल माणसांच्या आतल्या माणुसकीची . ही उंची वाढली तर सिमेंटच्या भिंतीची गरज उरेल काय ॽ

*©️ मंगला लाडके*
( कृपया लेख नावासहित पुढे पाठवावा )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त! आवडला लेख
त्या जाडजूड भिंतीचे वाचून गावच्या भिंती आठवल्या ज्यात भिंत बांधताना त्यात एखादे छोटेसे मडके पुरले जायचे ज्याचे तोंड आतल्या बाजूने असायचे, म्हणजे झाला भिंतीतील ड्रॉवर.. फार आवडायचा तो प्रकार.
भिती आणि भिंतींचेही आवडले. पण जोपर्यंत त्या भिंतींना दारे खिडक्या आहेत आणि त्या सताड उघड्या आहेत, तोपर्यंत भितीला मनात प्रवेश नाही असे म्हणू शकतो Happy