https://www.maayboli.com/node/82951 -9
मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -१०
एके दिवशी देवळातून येताना सासूबाई वाटेत पडल्या . मी आणि मानसने त्यांना दवाखान्यात नेले , (घरात कोणालाही काहीही झालं तरी दवाखान्यात नेणे आणणे , दवाखान्याचा खर्च , आजऱ्याची शुश्रषा हे सगळं मी आणि मानस न बोलता न सांगता करायचो . मग ते कुणी का असेना माऊ , वहिनी , दीर यापैकी कुणीही आजारी पडलो तरी आम्हीच आणि आम्ही आजारी पडलो तरी आम्हीच.. असो , असेच आठवले म्हणूंन सांगते एकदा निशीच्या वेळी मी प्रेग्नंट असताना वाहिनी तापाने खूप फणफणल्या होत्या , सुमारे पंधरा दिवस ,खूप आपलेपणाने मी त्यांची सेवा केली , त्या बऱ्या होऊन ऑफिसला जाऊ लागल्या आणि लगेचच मी आजारी पडले , मी ही तापाने फणफणले पण मानस येईपर्यंत कोणीही खोलीत डोकावून पाहिलं नाही किंवा त्यांना असा प्रश्न ही पडला नाही की हि आज दिवसभर का झोपली आहे ? हेच मला त्रासाचं व्हायचं , एवढी सुद्धा जाणीव का नसावी ? संध्याकाळी मानस ने मला दवाखान्यात नेले ,मग तिथून तसेच माहेरी सोडले , मग पुढचे औषधोपचार वैगेरे आईने केले .. ) तर सासूबाईंचा उजवा हात फ्रॅक्चर झाला , त्या हाताने त्यांना काहीच करता येईना , झाले माझी कसरत सुरू झाली . सकाळी ऑफिसला निघायच्या आधी निशीचे आवरायचे , स्वयंपाक करायचा , मग सासूबाईंना अंघोळ घालायची , कपडे घालायचे ,त्यांची वेणीफणी करून दयायची . शिवाय त्यांचे राहणीमान सदैव टापटीप असल्यामुळे त्या केवळ मला वेळेवर ऑफिसला जावं लागतं ,म्हणून कॉम्प्रमाइज करायला तयार नव्हत्या. मग त्यांना कानातले घालून द्या , गळ्यातलं घालून द्या , साडी नेसवून द्या , सगळं करेपर्यंत मला अकरा होऊन जात , वाहिनी यापैकी काहीही करत नव्हत्या आणि त्यांच्याकडून ती अपेक्षाही केली जात नव्हती , कारण तेच नेहेमीचंच , त्यांचा नवरा कमावत नव्हता आणि माझा नवरा आणि मी दोघेही कमावते होतो . साहजिकच माझी चिडचिड होऊ लागली. त्यात सासूबाईंचा ठसका काही कमी व्हायला तयार नव्हता ,असेच आठ -दहा दिवस गेले असतील , अखेर नेहेमीच्या ठसक्यात एकदा त्या त्यांचं फेव्हरेट वाक्य म्हणल्याच ,“ माझी सेवा करणं हे तुमचं कर्तव्यच आहे , काही उपकार नाही करत तुम्ही माझं करता तर .. करायलाच पाहिजे !.. “ हा आहेर नेहेमीचाच होता , होता पण आता मी नेहेमीची नव्हते , सरळ निशी ला घेतलं आणि त्याच दिवशी आई कडे निघून गेले . मी गेले की मग करतीलच ना मॅनेज ? मग कोणाला दाखवणार ठसका ? वहिनींना की मानस ला ?
घरात घडलेली कुठलीही गोष्ट मला मानस ला सांगता येत नसे कारण त्याला ते आवडायचं नाही , आणि चुकून कधी मी काही सांगितलंच तर बायकांची भांडणं यापलीकडे त्याच्या डोक्यात काही येत नसे , यु डी या विरुद्ध होते , मुळात मला टिपिकल बाईचं लेबल त्यांनी लावलंच नव्हतं , दुसरं माझं जे काही गाऱ्हाणं असेल ते शांतपणे ऐकून त्यावर योग्य निर्णय द्यायची त्यांची क्षमता होती , आणि तिसरं ते कितीही बिझी असले तरी माझ्यासाठी वेळ काढायचे . साहजिकच घरातल्या गोष्टी मी त्यांना सांगू लागले . त्यामुळे निशी ला घेऊन मी आईकडे राहायला का गेले हे त्यांना कळलं पण आमच्या घरात कोणाला कळलं नाही , मग ही किती आगाऊ आहे , काम करायला नको ,सासूबाईंच करायला नको म्हणून खुशाल घरात अडचण असतानाही निघून गेली असे ताशेरे वहिनींनी आणि सासूबाईंनी वाजवल्यावर त्यांचीच री ओढून मानस तावातावाने मला घ्यायला आला , माझे काही एक म्हणणे न ऐकता मला घरी यायचा आग्रह करू लागला , मी अर्थातच गेले नाही . मग तो घुश्शात निघून गेला . मी ही यावेळी अडून राहिले .
दोन दिवसानंतर यु डी नी मला विचारलं की आई कडे किती दिवस आहेस ? मी म्हटलं ,असं काही ठरवलं नाही , माझा राग शांत होईपर्यंत राहणार आहे , अजून चार किंवा पाच दिवस , त्यावर ते मला म्हणाले निदान महिनाभर थांब . मी हो म्हणाले , खरं तर ईतके दिवस मी कधीच आईकडे राहिले नव्हते , त्यामुळे मानस ला काय सांगायचे हा ही प्रश्न होताच पण कधी नव्हते ते पहिल्यांदा यु डी मला काहीतरी म्हणाले होते ते सुद्धा माझ्याच भल्यासाठी असणार ही खात्री मला होती , दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांनी मला केबिन मध्ये बोलावून सांगितलं की उद्या सकाळी सहा वाजता आवरून तयार रहा , यु डी नी असं सांगितलंय म्हणजे काही तरी उपयुक्त गोष्ट असणार हे मला माहिती होतं आणि आईकडे आल्यामुळे निशीची काळजी नव्हती , भावाची मुलगी ऋचा आणि तिचे छान जमत असे ,दोघी बरोबरच जेवत आणि शाळेतही जात. सकाळी सहा वाजता आवरून मी ऑफिस जवळ पोहोचले , यु डी गाडी घेऊन उभेच होते , त्यांच्याबरोबर असं एकट्याने मी प्रथमच जात होते , गाडीत त्याच्याशेजारी बसताना पाहिला मानस आठवला आणि मग सुपर्णा ,आणि मला धडधडलं , पण आता माघार घेऊन काय उपयोग शिवाय त्यांना मी माझा गॉडफादर मानलं होतं त्यामुळे मनात कितीही शंका कुशंका आल्या तरी मी काही प्रश्न केले नाहीत , काही वेळात आम्ही एका जुनाट ईमारती जवळआलो , अजून नीटसं उजाडलं नव्हतं , लिफ्टने वर आलो , समोर एक भला मोठा हॉल होता, हॉलच्या भिंतीला लागून एका टीपॉय वर एक तसबीर होती आणि त्याला ताज्या फुलांचा हार घालून पूजा केली होती , उदबत्त्यांचा मंद सुगंध दरवळत होता , एकंदरीत वातावरण प्रसन्न होतं आणि आमच्यासारखे बरेच लोक आलेले होते , ते सर्व एका जाजमावर बसले होते , पलीकडे एका टेबलवर नुकतेच आलेल्यांची नाव-नोंदणी चालू होती . तिथे जाऊन यु डी नी माझी आणि त्यांची नावनोंदणी केली . थोड्याच वेळात सौम्य वाटणारे , प्रेमळ व्यक्तिमत्वाचे एक गुरुजी आले आणि त्यांनी इंग्रजी मध्ये बोलायला सुरूवात केली . योगाभ्यास वैगेरे करायची मला आवड होती पण हे काहीतरी वेगळं होतं , काही वेगळ्या कॉन्सेप्ट्स आणि जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन ते शिकवत होते , वर्गाच्या शेवटी त्यांनी प्राणायाम शिकवला आणि साधारण नऊ वाजता आम्ही निघालो , खूप फ्रेश आणि छान वाटत होतं , परत येताना मला वाटलं हे असं सगळं मानस कडे का नाही ? यु डी नी मला आईकडे सोडलं . वाटेत येताना त्यांनी मला सांगितलं की हा कोर्स २१ दिवसांचा आहे , शेवटचे चार दिवस ते लांब एखाद्या रिसॉर्ट ला नेतात , त्यांनी हा कोर्स मागच्या वर्षी केला होता , ते म्हणाले खूप काही शिकायला मिळेल तुला यातून , तुला कसलीही अडचण आली तर मला सांग मी त्या मॅनेज करीन , अगदी निशीला सांभाळायचा प्रश्न आला तरी नि:संकोचपणे सांग , जाई आहे , मी आहे , मंदार आहे आम्ही तिला आळीपाळीने सांभाळू , पण काहीही झालं तरी हा कोर्स तु पुर्ण कर .
अशा तह्रेने माझा कोर्स सुरू झाला , त्याची फी पण यु डी नी च भरली , रोज सकाळी ते मला घ्यायला यायचे आणि परत आणून सोडायचे. शेवटचे चार दिवस आम्हाला खानापुरच्या एका रिसॉर्ट मध्ये नेण्यात आले , हे चार दिवस बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क ठेवायचा नसतो , वर्तमान पत्र देखील वाचायचे नाही , पूर्णपणे डिस्कनेक्ट व्हायचं . जीवनाकडे बघण्याचा दुष्टीकोन किती वेगळा असू शकतो आणि त्यामुळे आयुष्य जगतानाचा स्तर किती उंचावला जाऊ शकतो याचं प्रात्यक्षिक ते आधी देत आणि त्यानंतर त्यावर उपदेश , ही या कोर्स ची खासियत होती , त्यामुळे ते चार दिवस कधी भुर्रकन उडाले कळलं देखील नाही . फक्त शेवटच्या दिवशी मात्र मला निशीची जाम आठवण येऊन रडू येऊ लागलेलं , कधी एकदा तिला बघते असं होऊन गेलं होतं . या चार दिवसात माझं वजन आणखी कमी झालं , मानसिक स्थिती सुधारली ,वैचारिक गोंधळ कमी झाला . सतत स्वतः:लाच स्वतः:बद्दल दया दाखवणे बंद झाले , एका नवीन विचाराने आणि नवीन ध्येयाने मी वाटचाल करू लागले. पूर्वी मला असं वाटायचं माणसं जशी आणि जेवढ्या ब्रेन कॅपसिटीने जन्माला येतात ती शेवट्पर्यंत तशीच राहतात त्यांच्यामध्ये कधीच काही बदल होत नाही , पण या कोर्स नंतर मला माझा हा समज किती चुकीचा होता हे कळलं , रोज आपल्या शरीरात नवीन पेशी जन्म घेतात meiosis आणि mitosis शाळेत हे मी शिकले होते पण त्याचा खोल अर्थ मला ईथे कळाला , एखाद्या रोपट्यावर कलम करावं तसं आपण आपल्यावर नवीन विचारांचं रोपण करून स्वतः:ला अंर्तबाह्य बदलू शकतो त्यासाठी परमेश्वराने आपल्याकडेच प्रचंड ताकद दिली आहे , मनाची आणि अंर्तमनाची ताकद अफाट असते , यु डी ला माझ्यापर्यंत जे काही पोहोचवायचं होतं मला वाटतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ते माझ्यात उतरलं . रोज ते मला घ्यायला येत असत तेव्हा कोर्सच्या शेवटच्या दिवशी बाबांनी मला त्यांना घरी घेऊन यायला सांगितले , त्यानंतर ते आपण होऊन सतत येत राहिले एव्हाना माझ्या माहेरीही या सगळ्या गोष्टींची कुणकुण लागलीच होती , आता प्रश्न फक्त मी काय पाऊल उचलते याचा होता आणि ते काही केल्या मला जमत नव्हते , ईकडे यु डी ने स्वभावानुसार सगळ्यांना आपलेसे करून घेतले होते , माझा धाकटा भाऊ तेव्हा बिझनेस मध्ये सेटल होण्यासाठी धडपडत होता , यु डीने त्याला सर्व तर्हेची अगदी फायनान्स पासून दुकान टाकून देण्यापर्यंत मदत केली , ते जेव्हा जेव्हा घरी येत असत सगळ्यांची अदबीने चौकशी करत असत , शिवाय येताना प्रत्येकाला काही ना काही भेटवस्तू आणत असत , यापैकी मानस ने कधीही काहीही केले नव्हते , तो कायम मी ‘जावई’‘ याच तोऱ्यात असायचा . तो घरी यायचा तेव्हाही हुप्प असायचा , बाबा त्याला खुर्ची आणून देऊ लागले तरी ठोंब्यासारखा बघत उभा राहायचा . त्यामुळे सहाजिकच यु डी अल्पावधीत सर्वांना आवडू लागले होते याला अपवाद फक्त ताईचा होता , तिला माझे जे काही चालले होते ते फारसे पसंत नव्हते . तिचे म्हणणे होते की सासरी जाच होणे ही गोष्ट सामान्य आहे आम्ही दोघी नाही का सासरचा त्रास काढत मग तुझं काय वेगळं आहे ? यावर मी तिला म्हणाले की तुम्हाला यातून बाहेर पडण्याची संधी आलीये का ? आली असती तर तुम्ही काय केलं असतं ?बाकी आपल्या सर्व गोष्टी सारख्या आहेत पण ईथे वेगळेपणा नाही का ? यावर ती काही बोलली नाही . ती बिचारी माझ्यावरच्या प्रेमापोटी बोलत होती , कारण माझी पावलं कोणत्या दिशेने वळतायत हे तिच्या लक्षात येत होतं . मलाही हे करायचं नव्हतंच ,पण तरीही नंतरच्या आयुष्यातही सुपर्णा सारख्या तमाम सती सावित्रीना माझा हाच प्रश्न होता की तुमच्या आयुष्यात यु डी सारखं जीवाला जीव देणारं पात्र आलं असतं तर तुम्ही काय केलं असतं ? माझा निर्णय कोणता होता , योग्य होता की अयोग्य होता या सगळ्या गोष्टी गौण आहेत , कारण मी जे काही केलं ते मीच भोगलं पण बाकीच्यांनी काय केलं असतं ? हा प्रश्न मुख्य आहे असो ..
छान!
छान!
उल्काचा व्यक्तिमत्त्वत होणारा हळूहळू बदल छान रेखांकित केलाय
छान झालाय हाही भाग!
छान झालाय हाही भाग!
यु डी अचानक इतके का बदलले हे
चांगली सुरु आहे कथा