एकटेपणा

Submitted by SharmilaR on 3 February, 2023 - 00:04

(पूर्वप्रकाशित- माहेर दिवाळीअंक २०२२)
एकटेपणा

शुभदा फाटकापाशी आली, तेव्हा रात्रीचे आठ वाजत आले होते. वेळ घालवण्या करता उगाच संध्याकाळचं एकटीचं फिर फिर फिरणं झालं होतं. पण रोजच्या सारखं उल्हासीत मात्र वाटत नव्हतं. रस्त्यावरच्या दिव्यांचा अंधुक प्रकाश अंगणात पडला होता.

लोखंडी फाटक उघडच होतं. नेहमी ती ते उघडच ठेवायची दिवसभर. एकदम रात्रीच बंद करायची मग. आता तिला परत कुठेच जायचं नव्हतं बाहेर. ती फाटक बंद करायला गेली. पण आज रोजच्या सारखा दिव्याचा प्रकाश नव्हता. जुनं जड लोखंडी फाटक होतं ते.. जरा गंजलही होतं. ‘नीट करून घ्यायला हवं..’ रोजचाच विचार मनात आला. ‘पण एवढ्या तेवढ्या कामाला लोकही मिळत नाही पटकन..’ हे ही तिने रोजचंच स्वत:ला दिलेलं उत्तर..

आज बाहेर जातांना, बाहेरचा दिवा लावायचाच राहिला होता. अंधुक प्रकाशातच शुभदा ने कसं बसं दाराचं कुलूप उघडलं. घरातले दिवेही बंदच होते. चाचपडतच तिने हॉल मधला दिवा लावला, बाहेरचाही दिवा लावला. खांद्यावरची छोटीशी लांब पर्स टिपॉयवर टाकली अन् पाणी घ्यायला ती डायनिंनग टेबल कडे वळली.

पाण्याचा पेला घेऊन सोफ्यावर बसता बसताच तिच्या लक्षात आलं, हॉल चा दरवाजा आज उघडाच राहिलाय. आज सगळंच बिनसत होतं.. बाहेरचं फाटक तरी लावलय की नाही, कुणास ठाऊक! तिला आठवतच नव्हतं.

पेला तसाच टिपॉय वर ठेवून शुभदा परत अंगणात गेली. उघडच होतं तेही.. म्हणजे मगाशी फाटक लावायचा फक्त विचार केला होता तर! रोज ती स्कूटर घेऊन बाहेर जायची संध्याकाळी ट्रॅक वर. तसं व्यायाम म्हणून सकाळी तासभर फिरून झालेलं असायचं. संध्याकाळी जायचं म्हणजे सहजच रमत गंमत चालायला. मग संध्याकाळी तिथे मिनाही यायची. दोघींचं थोडं फिरणं, अन् भरपूर गप्पा व्हायच्या रोज. मग येतांना भाजी नाही तर आणखींन काहीतरी आणायचच असायचं. गप्पा रोजच्याच असल्या मैत्रिणीशी, तरीही भरपूर हसल्या बोलल्यामुळे, परत येतांना मन हलकं झालेलं असायचं. मग आल्यावर रोजची कामं अगदी सवईने व्हायची.

आज संध्याकाळी फिरायला निघायच्या आधीच, मिनाचा फोन आला, काहीतरी काम निघालं, म्हणून येणार नव्हती ती ट्रॅकवर. मग शुभदाला तेव्हाच चिडचिडल्या सारखं झालं होतं. एक तर आज सकाळी कामाला बाई आलेली नव्हती.. त्यातून मग दुपारी बराच वेळ लाइट नव्हते.. सईशी जरा फोनवर बोलावं म्हटलं, तर तिच्याकडे पाहुण्यांची बरीच गडबड होती. तशीही आता सई कमीच भेटणार. तिची कायमची ऑस्ट्रेलियाला जायची तयारी चालू आहे. मग तिचा सगळा दिवसच कंटाळवाणा गेला होता. संध्याकाळी मिना भेटली असती, तर हे सगळं तिला सांगून मन मोकळं झालं असतं. पण नेमकी ती आजच आली नव्हती.

मिना येणार नाही म्हंटल्यावर, मग शुभदाने ठरवलं होतं, आज नकोच स्कूटर न्यायला. ट्रॅक वर तर फिरणार नाहीच आहोत आपण एकटं.. तर जरा रस्त्यानेच पायी पायी फिरूया.. मग ती उगाच तास दीड तास भटकत राहिली होती निरुद्देश! पण रस्त्यानेही आज कुणीच ओळखीचं भेटलं नाही. मग फिरता फिरताच विद्याला फोन केला.... वाटलं, ती तरी आहे का जरा मोकळी बघूया. तर तिचा फोन सतत एंगेज.. शुभदाला कंटाळा आला होता अगदी. तशीच भरल्या कंटाळ्याने आणी रिकाम्या पिशवीने मग ती घरी आली होती.

फाटक बंद करून परत घरात येऊंन शुभदाने पुढचं दार लावलं.
मघाशी बाहेर जातांना मागचं, किचन चं दार लावलं होतं नं? तिला आठवेच ना. आत जायचीही तिला भीती वाटायला लागली. वॉचमन ला आवाज द्यावा का..? की नकोच..? तो असेल कॉलनी च्या कुठल्या तरी दुसऱ्या टोकाला. मी घाबरते, हे कुणाला फार कळायला नको.. परत पुढंच दार उघडून ती बंगल्याच्या मागच्या बाजूला गेली. किचनचं दार आतून बंद होतं.

उलट फेरा घालून ती परत पुढच्या दाराने आत आली, तरी तिला भीती वाटतच होती. आधीच कुणी आत शिरलं असेल तर..? तसच दार उघडं ठेवून, कशीबशी हिम्मत करून ती आत गेली अन् पटापट घरातले सगळ्या खोल्यातले दिवे लावले. जरा बरं वाटलं.

नानांच जाणं, अन् शुभदा ची रिटायरमेंट दोन्ही अगदी बरोबरीने म्हणजे जेमतेम पंधरा दिवसांच्या अंतराने झालं होतं. जणू ती ऑफिस ला गेल्यावर घर राखायला कुणीतरी असावं, म्हणूनच एवढे दिवस नाना थांबले होते.

नव्वदी पार करूनही अगदी जाईपर्यंत नाना टकटकीत होते. शेवटचे आठ दिवस, ते जे काय बिछान्यावर होते तेवढेच. पण तोपर्यंत मात्र चांगले फिरते बोलते होते नाना. रहदारी मुळे बाहेर एकट्याने फिरणं मात्र त्यांनी जरा बंद केलं होतं. सकाळी थोडा वेळ गच्चीतच फेऱ्या मारायचे ते. मग दिवसभर येणाऱ्या बाईकडून घरकाम करून घेणं.. तिच्याशी थोड्या गप्पा.. मग थोडं वाचन.. थोडा टीव्ही.. घरातली काही बारीक सारिक काम.. मग थोडी विश्रांती.. शुभदा घरी यायच्या वेळी दारा बाहेर खुर्ची टाकून हातात एखादं पुस्तक घेऊन बसलेले असायचे ते.
मग शुभदा आल्यावर ती दोघांचा चहा घेऊन बाहेरच यायची. आणी निवांत गप्पा व्हायच्या दोघांच्या. आई जाऊन दहा वर्ष होऊन गेली होती. आणी दोन वर्षांपूर्वी सईचं लग्न होऊन ती दिल्लीला गेल्यावर घरात नाना आणी शुभदा दोघंच उरले होते. शेवटी नानाही गेले सहा महिन्यांपूर्वी.. अन् शुभदा एकटी पडली.

चांगला भर वस्तीत छोटासा बंगला होता त्यांचा. पुढे मागे मोठ्ठं आवार. मागच्या बाजूला तर पेरू, आंबा, नारळाची किती तरी झाडं लावली होती नानांनी, बंगला बांधला तेव्हाच. लहानपणी तर शुभदा तिथेच जास्त असायची.. अगदी दिवसभर. प्रत्येक झाडाशी तिची नाळ जुळली होती.
शुभदा चं लग्न झाल्यावर चार पाच वर्षे ती जी काय दूर होती घरापासून तेवढीच. पण सचीनशी पटेनासं झाल्यावर सईला घेऊन आलीच ती परत येथे. तिला तिचं घर होतंच सामावून घ्यायला. तिचं पूर्वीच आयुष्य परत तसच चालू झालं. आता फक्त सईची भर पडली त्यात. पण आई नाना खंबीर होते तिला मानसिक आधार द्यायला अन् सईला सांभाळायला.
आता मात्र शुभदाला एकटेपणा अंगावर यायला लागला होता.

किचन मध्ये येऊंन शुभदा ने देवाजवळ दिवा लावला. जेवायला काही वेगळं करायच नव्हतंच. सकाळी एकच वेळ ती स्वयंपाक करायची. उरायचंच मग ते संध्याकाळला. डिश मध्ये सगळंच वाढून घेऊन ती हॉल मध्ये आली आणी टीव्ही बघता बघता जेवायला लागली. रोजच्या सारखं टीव्ही बघण्यात पण मन रमत नव्हतं.

सगळं आवरून, पुस्तक घेऊन ती बेडरूम मध्ये आली. हातातलं पुस्तक वाचायचं बऱ्याच दिवसांपासून लांबलं होतं. हल्ली पूर्वीसारखं वाचन नाहीच होत. आज निदान खूप वेळ वाचुया, हे पुस्तक.

फॅन करता बटणाकडे हात केला अन् एकदम दचकलीच ती. स्विचबोर्ड जवळच भली मोठी पाल होती. शुभदाला एकदम घाम फुटला. सगळ्यात जास्त ती कशाला घाबरायची तर पालीला. एरवी तर वॉचमन ला आवाज दिलाच असता तिने, पण आता दहा वाजायला आले होते रात्रीचे.. आता तर नकोच बोलवायला... समोरच्यांना पण नको.. त्यांना तरी किती त्रास द्यायचा अवेळी..

पुस्तक तसंच पलंगावर फेकून ती कोरीडओर कडे वळली, बेगॉन स्प्रे आणी केरसुणी आणायला. आधी तिने केरसुणी ने भितीवर मारत पालीला खिडकीकडे न्यायचा प्रयत्न केला. पण पाल आणखींन वर गेली. मग तिने स्प्रे मारला पण पाल आणखींन वर वर सरकली. आता भिंतीवर झाडू आपटायचीही तिला भीती वाटायला लागली. पाल छताकडे गेली तर..?

शुभदा तशीच हॉल मध्ये आली. आता बेडरूम मध्ये झोप येणं शक्यच नव्हतं. ती तिथेच सोफ्यावर लवंडली. डोळे मिटून ती दीर्घ श्वास घ्यायला लागली. झोप लागली की बरं वाटेल.. पण, घरात आणी मनात पाल तशीच होती.

शुभदाला एकदम रडायला यायला लागलं. ‘गेले सहा महीने मी प्रयत्न करतेय.. एकटेपणाशी जुळवून घ्यायचा.. कधीतरी ही वेळ येणारच होती.. सई आता दिल्लीला आहे.. नंतर परदेशी जाणार.. पण ती इथे असती तरी.. तिच्या संसारात कायमची थोडीच जाणार होते मी.. फार तर ती आहे इथेच.. लागलं तर येईल केव्हाही.. हा आधार मिळाला असता.

बाकी आहेत नातेवाईक गावात.. मैत्रिणी आहेत.. जुने काही शेजारी अजून राहतात आसपास.. पण घरातला एकटेपणा तर कायमचाच असणार आहे..’
‘कुणाला बोलावून घ्यावं का ह्या बंगल्यात..? रहायला..? कुणी नातेवाईक.. मैत्रिणी.. माझ्यासारखी एकटी असतीलच कुणीतरी... दोन बेडरूमस आहेत.. वाटलं तर एखाद दुसरी खोली मागच्या बाजूला वाढवता येईल.. बरोबरीचं कुणी असलं तर सोबत मिळेल.. वेळ पण चांगला जाईल.. पण म्हणजे वृद्धाश्रम काढायचा..? म्हणजे मग सगळं मॅनेज करायला लागेल.. येणारी लोकं कशी मिळतील..? आणी त्यात काही प्रॉब्लेम आले तर..? आणी हे सगळं बघयचं.. सांभाळायचं.. कुणी..? झेपेल मला ते..? मग दूसरा काय पर्याय आहे..? की आपणच जावं कुठे रहायला..? आहे ते सगळं गुंडाळून..? ’ ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत शुभदा बराच वेळ जागीच होती.. पहाटे केव्हातरी डोळा लागला.

सकाळी फोनच्या आवाजाने शुभदाला जाग आली, तेव्हा खिडकीतून स्वच्छ सूर्यप्रकाश आत आलेला होता. फोन टिपॉय वरच होता. तिने बघितलं समोरच्या काकांचा फोन होता.

“हॅलो..”
“गुडमॉर्निंग बेटा.. उठलीस का..? कशी आहेस..? आज सकाळी तुझं गेट बंद दिसलं म्हणून फोन केला..”
“गुडमॉर्निंग काका.. आज जागच नाही आली सकाळी.. आता उठतेय..”
आपल्याला अजून कुणीतरी ‘बेटा’ म्हणतय हे जाणवून, तिला एकदम उबदार.. प्रसन्न वाटलं.

“तब्बेत बरी आहे नं? काल जागी होतीस खूप वेळ..? दिवा चालूच होता तुझा..” काकांच्या आवाजात काळजी होती.
हे समोरचे काका, शुभदाला आठवतात तेव्हापासून तिथेच रहायचे. आता त्यांचा मुलगा सुन, प्रदीपदादा आणी आशावाहिनी पण त्यांच्या जवळच रहातात. नाना असतांना खूपदा गप्पा मारायला काका अंगणात येऊंन बसायचे. नाना गेल्यावर पण एक दोन दिवसाआड काका चौकशीचा फोन करतातच. प्रदीपदादा आशावाहिनी पण जाता येता तिच्या फाटकाशी थांबून चार शब्द बोलातातच.

“चांगलं पुस्तक हातात होतं काका म्हणून वाचत होते.. त्यामुळे आजच फिरणं राहिलं.. संध्याकाळी जास्त फिरेन. तुम्ही काळजी नका करू.” शुभदा म्हणाली.
“नक्की बरी आहेस नं पण..? काळजी घे.. काही लागलं तर सांग. आशा नाहीतर प्रदीप आणून देतील..” काका अजूनही खात्री करून घेत होते.
“खरच छान आहे मी काका.. येताय का तुम्ही जरा वेळाने..? छान तुमच्या आवडीचा मऊ सांजा करते.. भरपूर खोबरं, कोथिंबीर घालून... मिळूनच नाश्ता करू. खूप दिवसात आलाच नाहीत तुम्ही गप्पा मारायला..” शुभदा उत्साहाने म्हणाली..
काकांचा होकार ऐकताच पटकन उठलीच ती.. अगदीच काही लागलं, तर लोकं होतीच मदतीला आसपास... आपण फक्त जरा हात लांब करायचा होता. तिची एकटेपणाची भीती.. मनातली अन् भिंतीवरची…. तिलाच सांभाळायची होती.

रात्री चालू असलेले दिवे तिने पटापट बंद केले. भिंतीवरची पाल गायब झाली होती. घरभर सूर्या ची प्रसन्न किरणं खेळत होती...

**************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सकारात्मक शेवट वाचून खूप हुश्श झाले.. .. कितीही सुबत्ता असली तरी जिवंत सोबतीची जागा कोणीच घेऊ शकत नाही... 4 शब्द का होई ना पण बोलणारी माणसे आजूबाजुला हवीतच.

Classic कथा आहे ही कुठलंही धक्का तंत्र नाही, साधी, सरळ... तरीही अत्यंत प्रभावी मनोविष्लेशणात्मक ...

आवडली.
नको असलेले एकटेपण खरेच शाप असतो

मस्त ! छान जमलिय कथा. नायिकेचे बदलते मुड मस्त पकडलेत तुम्हि. साध्या रोजच्या आयुष्यातल्या घटना आणि त्या अनुषंगाने येणारी लेखिच्या मनातलि आंदोलने!

मस्त कथा आहे.
>>>>अगदी दिवसभर. प्रत्येक झाडाशी तिची नाळ जुळली होती.
खरे आहे असेच अगदी असेच होते.

भितीचा मनाचा ताबा कसा घेते हे छान मांडलंय.
शिवाय चांगला शेजार 'लाभणं' किती मोलाचं आहे हे सांगितलं आहे. एकट्या रहाणाऱ्या प्रत्येक वयस्कर व्यक्तीची ही आज व्यथा आहे. आवडली कथा.

चांगली कथा. एक टे पणा चा ओव्हर डोस झाला की त्या पाली डास ह्यांची पण सोबत वाटू लागते..

अवांतर -
पालींबद्दलचा एक किस्सा - पालीचे डोळे खुनशी व आक्रमक असतात असा माझा अनुभव आहे. त्या सरसर सरसर आक्रमण करतील हे त्यांच्या हावभावात असते. इतका भयानक प्राणी मी पाहीला नाही. इतर प्राणी, माणसाला पाहून सूंबाल्य करायचे बघतात पण पालींचे तसे नसते. त्या आपली जागा सोडता सोडत नाहीत. तर असो.
एक पाल माता मी पाहीलेली तिने तोंडात तिचे अगदी नवजात पिल्लू धरलेले होते व कुठे तरी घेउन चालली होती. मला ती वरती दिसली. आम्ही दोघी थबकलो. पण या पालीच्या डोळ्यात अजिबात क्रूरपणा नव्हता. स्निग्धता होती, काकुळती होती. की बाई मला मारु नकोस, माझे पिल्लू आहे.
हे वाचायला तुम्हाला विचित्र व अविश्वासाचे वाटेल पण हा माझा अनुभव आहे.

>>>>>>>> पालीकडे बघवले एवढा वेळ?
तोंडात स्वतःचे पिल्लू घेतलेली पाल पहील्यांदाच पाहील्याने, नीरीक्षण केले गेले.