किशोर - मुलांचे मासिक

Submitted by Abuva on 25 January, 2023 - 09:44
किशोरचा वाचक

आज सकाळी माझ्या काकांचा फोन आला होता. वय वर्षे ८०, व्यवसाय - शिक्षक. मी 'निवृत्त' असं लिहिलं नाही, कारण हाडाचा शिक्षक कधीच रिटायर होत नाही! कोरोना, मुलांची ऑनलाईन शाळा, त्याचे फायदे-तोटे अशी चर्चा ठराविक वळणं घेत घेत मुलांचं वाचन, मराठी पुस्तकं, आणि मुलांसाठीची मासिकं या विषयावर आली. मग उजळणी झाली ती चांदोबा, आनंद, अमृत, मुलांचे मासिक (हे आजही बहुधा नागपूरहून प्रकाशित होतं) यांच्या आठवणी! त्यांना किशोर हे मासिक फारसं माहिती नव्हतं याचं मला जरा आश्चर्य वाटलं. पण या मासिकांच्या उल्लेखामुळे आठवणी जाग्या झाल्या आणि उसंडु, मुरावि यांच्या आठवणींनी आम्ही दोघेही मनमुराद हसलो!
आणि मग मी या मासिकांच्या शोध घ्यायला निघालो. आंतरजालावर किशोर आहे हे आठवत होते. बालभारतीचं प्रकाशन होतं त्यामुळे त्याला सरकारी वरदहस्त होता. शोधता शोधता मनात आठवणी नाचत होत्या - आमच्या आईला वाचनाचा भलताच नाद. त्यामुळे मला आठवतंय तेव्हापासून आमच्याकडे लायब्ररीचं सभासदत्व होतं. ते काका काकू म्हणजे आई-बाबांचे जवळचे मित्र. त्यामुळे हवं ते पुस्तक, मासिक हक्कानं मिळायचं. बरं, उन्हाळ्याच्या सुट्टीत तर मी दिवसातून दोन पुस्तकांचा फडशा‌ पाडायचो! आमच्या घरगुती ओळखीमुळे मी दिवसात दोनदा पुस्तक बदलायचो, आहात कुठे! पुलं, वपु, नासं इनामदार, रणजित देसाई आणि हो गुरूनाथ नाईक, यांची आणि इतर अनेक लेखकांची ओळख इथेच झाली. आज गंमत वाटते आहे पण त्यावेळी वाचनाची इतकी खाखा लागली होती की कळो न कळो पण योगिनी जोगळेकर, सुमती क्षेत्रमाडे, कुसुम अभ्यंकर, शैलजा गोगटे आणि तत्सम लेखिकांच्या गृहिणींसाठी लिहिलेल्या कादंबऱ्यांचाही फडशा पाडायचो! आपलं पुस्तक आधी संपवायचं आणि मग आईसाठी म्हणून आणलेली कादंबरी (वा मासिक) तिच्या अगोदरच वाचून संपवायची! आज गंमत वाटते, त्या वयात वाटेल ती पुस्तकं वाचली हो, पण मनात घर करून राहिलेली पुस्तकं तीन: भुताळी जहाज, ब्रह्मदेशाचा खजिना आणि चंद्रावर स्वारी. तिन्ही किशोरवयाच्या मुलांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेल्या कादंबऱ्या!
तर सांगत काय होतो - किशोर मासिक! त्या काळात किशोर मासिकाची वार्षिक वर्गणी असलेली मुलं आमच्या वर्गात होती कुठे? पण हस्तेपरहस्ते दर महिन्याचं किशोर वाचायला मिळायचंच! तसंच अनेक पुस्तकं ह्या फिरत्या लायब्ररीसमान मित्रांच्या देण्याघेण्यातून वाचायला मिळाली. त्या काळी वाढदिवस, मुंज वा शाळेत नंबर काढणे या किंवा अशा कुठल्याही प्रसंगी भेट म्हणून हमखास पुस्तकं मिळायची! आणि सणासुदीला आवर्जून स्वामी, श्रीमान योगी, मृत्युंजय अशी नावाजलेली पुस्तकं विकत घेतली जायची. मला आठवतंय, आमच्या शाळेत आठवीत पहिला आला होता म्हणून एकाला शाळेनं मॅक्सिम गॉर्कीच्या जगद्विख्यात मदर या पुस्तकाचं आई हे मराठी भाषांतर बक्षिस दिलं होते. आणि ते पुस्तक वाचायला आम्ही नंबर लावले होते; आज हा वाचेल, उद्या तो वाचेल, आणि रविवारी मी घरी घेऊन जाईन! या वाचनाच्या आवडी मागे शिक्षकांच प्रोत्साहन हे महत्त्वाचं कारण होतं. शाळा सुरू झाल्यावर मराठीच्या पहिल्या तासाला "सुट्टीत काय वाचलं?" हा प्रश्न असायचाच. मग मला आठवतंय, एका सुट्टीत मी‌ श्रीमान योगी आणि राजा शिवछत्रपती ही एकाच विषयावरची दोन सुप्रसिद्ध पुस्तकं वाचली होती. बाईंनी लगेच विचारलं, "या दोन्हीपैकी कुठलं पुस्तक आवडलं?" मोठा कठीण प्रश्न होता. विचार करायला लावणारा प्रश्न होता. मी उत्तर दिलं "श्रीमान योगी!" लगेच बाईंचा प्रश्न, "का?" आणि मग वर्गात चर्चा झाली; सगळ्यांची मतमतांतरं आणि मग बाईंचं निरूपण! किती सहजपणे हे सगळं घडत होतं! संस्कार हे वेगळे काय घडवायचे असतात?
तर किशोर मासिक हे दिवाळीच्या सुट्टीचं खास आकर्षण! किल्ला, फटाके, फराळाइतकंच ते ही महत्त्वाचं होतं. दर महिन्याला असायचंच, पण दिवाळी अंकाची मजा वेगळीच..
गेलो आंतरजालावर, आणि गूगलला पृच्छा केली. फटक्यात साईट सापडली. पहिलंच मासिक‌ उघडलं तो होता नोव्हेंबर १९७८ चा अंक. मी चौथीत होतो.... मला मुखपृष्ठाची ओळख लागली नाही. अनुक्रमणिकेत इंदिराबाई संत, पुलं, शांताबाई, कुसुमाग्रज वगैरै दिग्गजांची नामावली वाचून एक स्मितलकेर उमटली. हे प्रथितयश लेखक त्या काळी वेळात वेळ काढून मुलांसाठीच्या मासिकांत लिहीत होते याचं कौतुक वाटलं. आपली बालपणं समृद्ध करण्यासाठी हे सिद्धहस्त लेखक कारणीभूत होते याचं विस्मरण झालं होतं म्हणा, पण त्यावरची पुटं दूर झाली.
पहिलीच कधा होती - दीडशहाण्या हिमराण्या. अं? नावानं काही बोध झाला नाही. पण लेखकाचं नाव वाचलं - अशोक प्रभाकर मोटे, स्क्वाड्रन लीडर. एक सेकंद थबकलो. ते नाव आणि गोष्टीच्या शीर्षकाशेजारचं चित्र कुठे तरी मेंदूत घरघरत होतं. आणि खाडकन् काळाच्या पापुद्र्यांआड दडलेली गोष्ट खळाखळा प्रवाहित झाली... नेफा, विमान, तो दोरखंडांचा पूल, तो धोका, आणि एक लाल शर्ट... एकही शब्द न वाचता ती गोष्ट डोळ्यासमोर उभी राहिली. चाळीसेक वर्षांपूर्वी कधीतरी वाचलेली ती गोष्ट. पण नकळत मनात, आठवणीत, मेंदूच्या अनेक पटलांपलीकडे दडली होती, विस्मृतीतच गेली होती म्हणा ना! पण होती! त्या आठवणींच्या कल्लोळानं पापणीआड पाणी तरळलं... क्षणकाल मी आठदहा वर्षांचा झालो. जुन्या घरी कलत्या सूर्याच्या प्रकाशात वरच्या मजल्यावरच्या खिडकीत भिंतीला पाठ लावून मासिक वाचत बसलो असलेला मी मलाच दिसलो. खिडकीबाहेर रायावळ्याच्या झाडाला आवळ्याचे घड लोंबत होते, आणि मी.. मी त्या शब्दांच्या जादुई गालिच्यावर आरूढ होऊन नेफाच्या, अरुणाचल प्रदेशात मुशाफिरी करत होतो...

या आनंदाचा अनुभव तुम्हीही घ्या, तुमच्या आठवणी जागृत करा...
https://kishor.balbharati.in/Archives/Index.aspx

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख! शाळेतले दिवस आठवले.
आमच्या शाळेच्या ग्रंथालयात किशोर मासिके असायची. ३-४थीत असताना शाळेत लायब्ररी कार्ड आणि बचत खाते उघडलेले आठवते. शनिवार हा पुस्तक बदलायचा आणि खात्यात पैसे भरायचा/काढायचा दिवस होता. अगदी २५ पैसे सुद्धा काढता/ठेवता यायचे.

मस्त आठवणि बुवा. किशोर मासिक माझेहि आवडते होते. माझ्या लहानपणि व्यंकटेश माडुगळकरांच्या कन्या ज्ञानदा (आडनाव आथवत नाहिये) संपादिका होत्या. त्यांनि अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले होते. त्यापैकी एक लक्षात राहिलेला उपक्रम म्हणजे किरा आर्गुनोव्हा ह्या रशियन मुलिने किशोर वाचकांना मराठितुन लिहिलेल पत्र. ती रशियन सरकारच्या एका उपक्रमांतर्गत शाळेत मराठी शिकत होती. इतर देशातली मुले मराठी शिकु शकतात ह्याचा धक्का बसलेला आठवतो. त्या स्वतः पण खुप छान लिहायच्या. त्यांच संपादकिय वाचनिय असायच च पण 'तेरेखोलचे रहस्य' ही गोवा मुक्ती संग्रामावर लिहिलेलि त्यांचि कादंबरी क्रमशः प्रसिद्ध झाली होती. ती फार आवडली होती मला. खुप आवर्जुन दर महिन्याला वाट बघितली जायची अंकाची. तुम्हि लिहलय तस दिवाळी अंकाच विषेश आकर्षण असायचे. चित्र कोण काढायच ते आठवत नाहि पण चित्र फार चपखल असायची. लहान मुलांच मासिक कस असाव ह्याचा वस्तुपाठ घालुन दिला होता किशोर ने.

ज्ञानदा नाईक नाव त्यांचे.
किशोर आणि चांदोबा आणि भा. रा. भागवत हे माझ्यापण बालपणाचे अविभाज्य भाग आहेत. बालपण समृद्ध केले त्यांनी..

करेक्ट ज्ञानदा नाईक. थँक्स धनवन्ती. त्यांची लेखन्शैली मला फार आवडायची. संपादकीय पण अजीबात प्रिचि टोन न वापरता लिहायच्या.

खर आहे तुमच किशोर, चांदोबा आणि भा रा भागवत हे आपल्या लहानपणिचे अविभाज्य भाग आहेत. चांदोबा चा फील पौराणिक होता, चित्र पारंपारिक दाक्षिणात्य शैलीत असायची आणि गोष्टिहि मोस्ट्लि राजा राणिच्या असायच्या. त्या तुलनेत किशोर एकदम आधुनिक आणि रिलेटेबल वाटायचे. म्हणुन मला किशोर जास्त आवडायचे.