याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/82831
"दादासाहेब..."
"कधी तरी मामा म्हण."
"बरं. मामा! यावेळी वायनरीचं उत्पन्न खूप कमी झालंय."
"विदेशी लोक आताशा जास्त येत नाहीत श्रेया, डिसुझा मार्केटिंगमध्ये कमी पडतोय."
"मग?"
"थोडा फंड वाढवायला हवा. आणि स्टील?"
"कालच चार टन आलंय."
"चांगलय. आमदारकीच्या उमेदवारांना निधी गेला?"
"प्रत्येकी दोन कोटी दिलेत. सगळ्यांना. पण मामा, आपण त्यांना एकच पक्षातून का निवडून आणत नाही?"
"आपल्याला राजकारण करायचं नाही श्रेया. मला हवा आहे फक्त वचक. जो निवडून येईल, त्याला कळायला हवं, आम्ही शेलारांमुळे निवडून आलो."
श्रेया फक्त हसली.
"जेव्हा तू खुर्चीवर बसशील ना, तेव्हा तुला कळेल की प्रत्येक पक्षात आपली माणसं असण्याचे फायदे काय असतात. जकप बाजी मारणार असं दिसतय."
"वारं तर त्यांचंच आहे."
"जनता काँग्रेस आणि शेतकरी काँग्रेस, दोन्हीही पूर्ण रसातळाला चालल्यात. एकेकाळी काय शान होती जनता काँग्रेसची."
"बाबा जनता काँग्रेसकडूनच लढणार आहेत मामा."
"अतिशय चांगला निर्णय. धुळ्यात काँग्रेस कधीही संपणार नाही."
"तिथेही महाराष्ट्रसेना चांगलीच उभी राहतेय."
"एक हाती सत्तेचे दिवस गेलेत श्रेया... आता उरल्या फक्त तडजोडी. तुही यातलं थोडंफार शिकून घे, माझ्यानंतर तुलाच सगळं बघायचंय."
"दादासाहेब, मला नाही वाटतं मी बघू शकेन."
"बघावं लागेल श्रेया, बघावं लागेल. संग्राम कायम नशेत असतो, गुंडगिरी करत फिरतो. पाण्यासारखा पैसा खर्च करतो. असं वाटतंय, एक ना एक दिवस मीच त्याला गोळी घालेन. पण नातं आड येतं. तू ताईची सावली आहेस. तूच हे सगळं सांभाळू शकशील."
श्रेया शांतपणे त्यांच्याकडे बघत होती.
"माझी सावली तिकडे दूर साता समुद्रापार आहे. मला कधीही वाटलं नाही, त्याने हे सगळं बघावं. म्हणून उरलीस फक्त तू. मोक्ष नाही, तर श्रेयाच हे सगळं बघेन. आणि मी दूर त्याच्याकडे निघून जाईन. निवांत. ही उझी, ही एके ४७, सगळं सोडून. नाशिकला रामराम, गोदावरीला नमस्कार. त्याच्या मुलांना खेळवेन. खेळण्यातील गन घेऊन... मग ते म्हणतील... आजोबा, तुम्हाला बंदूकच चालवता येत नाही, आणि मी अभिमानाने सांगेन, नाही चालवता येत." दादासाहेब स्वप्न रंजनात रमले.
"मामा, तुम्ही कुठेही जायचं नाही कळलं?"
"नाही ग बेटा, येणाऱ्या प्रत्येकाला जावं लागतं."
श्रेयाचे डोळे भरून आले...
...तिने दादासाहेबाना मिठी मारली.
"तू ताई सारखीच आहेस, वरून नारळ, आतून लोणी."
श्रेया हसली.
"आपलं नाशिक सोन्याची खाण आहे श्रेया. हे सर्व शहर आपलं आहे. हा पूर्ण जिल्हा आपला आहे. इथली जिल्हा बँक, मर्चंट बँक, स्कूल, कॉलेजेस सगळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या नियंत्रणात आहे. या नाशिकला मुंबई जवळ आहे, या नाशिकला पुणे जवळ आहे. गुजरात इथून जवळ आहे, तिकडे खानदेशातून मध्य प्रदेश जवळ आहे...
... आपली गोदावरी इथे आहे, संतांचा नाथ तो निवृत्तीनाथ इथे आहे, रामाची पावलं या भूमीत घट्ट रोवली आहेत, महिषासुरमर्दिनी आई जगदंबा इथे आहे, तो महामृत्युंजय त्रंबकेश्वर इथे आहे, आपली सगळी माणसं इथेच आहेत, आणि हीच आपली सोन्याची खाण..."
दादासाहेबांचा आवाज आता कंप पावत होता.
श्रेया भारावून त्यांच्याकडे बघत होती.
*****
"जर नाशिक सोन्याची खाण असेल ना, तर मामा या खाणीतला हिरा होते. तू म्हणतोस, हा हक्क माझा होता. नाही, कधीही नाही. फक्त तू इथे नाहीस, म्हणून दादासाहेबांनी तो हक्क मला दिला, आणि जेव्हा तू इथे आलास, तेव्हाच तुझा हक्क मी तुला परत केला."
"बाबांचं नाशिकवर खूप प्रेम होतं ना?" मोक्षने विचारले.
"जीवापाड. आणि जेव्हा आपण एखाद्या जागेवर प्रेम करतो ना, ती जागा आपल्याला मोठी करते. ती जागाच आपल्याला मार्ग दाखवते. लहान माणसे घर बनवतात, मोठी माणसे जग बनवतात. माझ्या मामानी नाशिक बनवलं. इथलीच माणसे मोठी केलीत, आणि त्या माणसांनी त्यांना अद्वितीय बनवलं. मालेगावची हजारोंची दंगल त्यांच्या एका हाकेने थांबली. सिंहस्थात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शेलारांची फौज उभी राहिली. गल्लीबोळात सर्रास चाकू दाखवून मंगळसूत्र लुटणाऱ्या भुरट्यांना हातपाय तोडून दादासाहेबांनी घरी बसवलं. गल्लीत दादा बनून कुणाच्याही घरात घुसून अब्रू लुटणाऱ्या गुंडांना दादासाहेबांनी सरळ संपवलं. हे नाशिक उभं राहिलं दादासाहेबांमुळे, आणि दादासाहेब उभे राहिले या नाशिकने त्यांच्यावर केलेल्या प्रेमामुळे!" श्रेया बोलायची थांबली.
मोक्ष शांत बसला होता.
"ही एक्सेल फाईल, यात शेलारांची कुणाच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जमीन जुमला, फ्लॅट्स, घरे, सोनं, रोकड कॅश, किंमती सामान व उधारी... सगळ्या डिटेल्स आहेत. अभ्यास करायला वर्षही लागेल. जोशी तुला सगळं समजावतील."
मोक्ष काहीही बोलला नाही.
"आणि हो, हा हक्क कायम तुझाच होता हे नीट लक्षात घे. आणि आता मोठा हो. जर संग्रामला तू तुझा प्रतिस्पर्धी समजशील, तर कधीही त्याच्या पुढे जाणार नाही. संग्राम आता खूप खाली गेलाय. यापुढे आव्हाने खूप मोठी असतील. हा सगळा पट आता खुला झालाय मोक्षा. हळूहळू सारेजण आपल्या चाली रचतील, पण तू शेवटी राजा हो...
...आणि राज्य कर... नाशिकवर, इथल्या माणसांवर, त्यांच्या मनावर..."
मोक्षच्या तोंडून शब्द फुटत नव्हता... आज त्याचा नाशिककडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता...
आता हे शहर त्याच्यासाठी फक्त शहरच राहिलं नव्हतं...
...तर एक जिवंत अनुभूती झालं होतं...
*****
मुंबईकडून आठ ट्रक नाशिककडे निघाल्या.
पुढे दोन टेम्पो ट्रॅव्हलर सुसाट वेगाने धावत होत्या.
कसाऱ्याजवळ पोलिसांनी गाड्या अडवल्या.
ड्रायव्हर बाहेर आला.
"चेकिंग चालू आहे."
देवराज जाधवांच्या गाड्या आहेत!
"या गाड्यांचे नंबर नाहीत आमच्याकडे..."
"चला दाखवतो." ड्रायव्हर त्यांना ट्रॅव्हलरकडे घेऊन गेला.
गाडीत पुढच्याच सीटवर गफूरभाई बसला होता...
आणि त्याच्या बाजूच्या सीटवर दोन लोक बसलेले होते.
लिओनेल डिसुझा,
...आणि देवराज जाधव!!!!
क्रमशः
अजून एक अनपेक्षित (की
अजून एक अनपेक्षित (की अपेक्षित च?? .... ) वळण.
<< जर संग्रामला तू तुझा प्रतिस्पर्धी समजशील, तर कधीही त्याच्या पुढे जाणार नाही. >>
लाखमोलचं वाक्य..
छान चाललंय कथानक..!!
छान चाललंय कथानक..!!
खूप मेहनत घेतलेली दिसतेयं कथेसाठी.!!
@धनवंती - धन्यवाद, आपल्या
@धनवंती - धन्यवाद, आपल्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी
@रूपाली - धन्यवाद! आणि नाही हो, नाशिक आपलंच आहे!!
छान!!
छान!!
जोरदार सुरुय
जोरदार सुरुय
धमाकेदार action येईल असे दिसतेय
@आबा - धन्यवाद!
@आबा - धन्यवाद!
@ झकासराव - धन्यवाद! बघू काय होतं ते पुढे.
@आबा - धन्यवाद!
.