
त्या प्राचीन मंदिराच्या प्रचंड गोपुराखालून प्रवेश घेतानाच मनावर एक गारूड घडतं. आपण देवाच्या सान्निध्यात प्रवेश करतोय हे तर जाणवतंच, पण ते देवत्व गगनचुंबी आहे हे समजतं. विस्तीर्ण पसरलेली ही दाक्षिणात्य मंदिरं प्राचीनता, आकार, सौंदर्य, समृद्धी, महत्ता या कोणत्याच अर्थांनी खुजी नाहीत. मी एका चौकस, उत्सुक प्रेक्षक या भावनेने इथे दाखल झालेलो असतो. एका पुस्तकातल्या या मंदिरांच्या वर्णनानं प्रभावित होऊन, अचानक आलेली संधी साधून आलेलो असतो.
माझ्या आजूबाजूला अनेकविध मनुष्यविशेषांची गर्दी असते. लहान मुलं आईबापांचे हात सोडून मोकळ्या पटांगणात बागडत असतात. नवविवाहित जोडपी चांगले 'कोन' बघून सेल्फी वा जोडीनं फोटो काढून घेत असतात. पांढऱ्या धोती घालून खांद्यावर उपरणे लेऊन वृद्ध पुजारीगण कुठे कुठे खांबाला पाठ देऊन बसलेले असतात. शबरीमालाचे यात्री त्यांच्या विशेष वेशात आणि आवेशात दर्शनाला धावत असतात. बाहेरगावचे आमच्यासारखे नवशे मान उंच करून इकडेतिकडे बघण्यात मग्न असतात. पण मुख्यत्वे गावातलेच साध्या वेशातले, धोती आणि कॉटन टीशर्ट घातलेले मध्यमवयीन भाविक, आणि घरच्याच साडीत पण केसांत वेणी माळलेल्या गृहिणी संथपणे, आपल्याच नादात, खाली मान घालून हातात फुलांची परडी वा प्लॅस्टिक पिशवी घेऊन नित्यनेमानुसार देवदर्शनाला आलेले दिसतात. त्यांची अनवाणी चाल संथ आणि सहज असते. त्यांचा दर्शनक्रम ठरलेला असतो. आजूबाजूच्या जगाशी त्यांचा तसा संबंध नसतो.
अशाच एका वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका जोडप्याची पाठ मी पकडतो. ते रोजचे दिसत नव्हते. पेहेरावावरून ते बाहेरगावाहून आले असावेत असं वाटत होतं. पण नेहमी येणारे असावेत, तिथल्या वातावरणाला सरावलेले वाटले. नवरा थोडासा कंबरेत वाकलेला, आणि बाई म्हणजे दाक्षिणात्य आईचा नमुनाच जणु! म्हटलं चला, यांच्या बरोबर राहिलो तर या मंदिरांत आचरण कसं असतं ते तरी कळेल. प्राकारात आल्यावर मानस्तंभाला त्यांचा प्रथम नमस्कार घडतो. कुठल्याशा खांबावर कोरलेल्या गणपतीला त्यांचा नमस्कार घडतो. मी आपला मागेमागे, जरा अंतर ठेऊन, पण त्यांच्या हालचालींचा मागोवा घेत. मग आजूबाजूला असलेल्या देवळींत विराजमान देवतांना अनुक्रमे नमस्कार होतो. प्रत्येक देवतेला जणु नजरेतूनच क्षेमकुशल कळवले जाते. आता मोहोरा वळतो तो मुख्य देवतेकडे. दर्शनबारीत, लायनीत उभं राहात स्वतःशीच स्तोत्र गुंजन चालू असतं. नवरेबुवा नवख्यांच्या बनचुकेपणाचा अंदाज घेत असतात. वेळप्रसंगी कोणा चुकाराला दटावत मार्गी लावत असतात. बाई सगळं निरखत असतात, पण हरवल्यासारख्या दिसतात. मधूनमधून नवरोबांशी हलकंच, द्राविडी भाषेत काही तरी बोलतात. त्यांच्या हातात फुलांची माळ असते, नवरोबांकडे तुलसी माला. या दक्षिणी लोकांचा कर्मकांडांवर, फुलांवर बुवा, भलताच जीव.
सभामंडपातून गर्भगृहात प्रवेश करताच माहोल बदलतो. देवार्चनेच्या वेगवेगळ्या साधनांचा एक संमिश्र वास दाटतो. ऊद, धूप, उदबत्ती, कापूर, अत्तर, फुलं, पानं, दीप यांचा मोहक, जणु अनंतकाळ ओळख असलेला गंध दरवळतो. गाभाऱ्यात फक्त तेवत्या समयांचा आणि नंदादीपाचाच मंद उजेड असतो. समोरच्या विष्णूमूर्तीवर मुख्यत्वे शेवंतीच्या अन् तुळशी माळांची मनमोहक आरास केलेली असते. कपाळी हिऱ्यांची नाममुद्रा जडवलेली असते. झळाळतं वस्त्र ल्यायलेली अन सुवर्ण अलंकारांनी नटलेली, हार अन् फुलांनी सजलेली ती काळ्या दगडातून घडवलेली चतुर्भुज मूर्ती शांतभाव प्रकटत उभी असते. नवरोबांनी आणलेल्या तुलसी पत्रांचा आणि बाईंनी दिलेल्या फुलांचा, माळांचा देवतेला भोग चढवून त्याला पुजारी ओवाळू लागताच 'गोविंदा गोविंदा गोऽविंदा' असा हरिनामाचा गोड गजर होतो. सगळेच त्या गजरात सामील होतात. बाईंचे भावभक्तीने ओथंबलेले डोळे आता हरिमुखावर खिळलेले असतात. नजरेतूनच या उरीचे त्या उरी होतं असते. पुजाऱ्याने देवाला ओवाळून आणलेल्या आरतीवर हात धरून ती भगवत्प्रसादाची ऊब डोळ्यांना लावली जाते. आता त्या भाविकेच्या मुखावर सात्विक भक्तीभाव उमटतो. चेहेऱ्यावर आनंद फुलतो. पुजाऱ्याने दिलेला खडीसाखरेचा प्रसाद, अन् देवाला वाहिलेल्या तुलसीमालांचा, फुलांचा प्रसाद ग्रहण करताना डोळ्यांच्या कडा हळूच ओलावतात. अनिमिष नेत्रांनी, केवळ दीपशिखांनी उजळलेल्या त्या देवतेच्या प्रभेचे जणू आकंठ रसपानंच घडत असते. देवाला पाठ न दाखवता बाहेर पडणारी ही भाविक स्त्री पुन्हा एकदा कुठल्याशा आंतरिक, अनन्वित ओढीनं देवाच्या दिशेने गोविंदा, गोविंदा करत सरसावते. अनेक पिढ्यांनी जतन केलेला, जन्मजात वारश्याने लाभलेला अनुबंध तिला खेचून आणतो, जणु बंदिवान करतो. ती भगवंताचरणी लीन होत त्या मूर्तीला लांबूनच अश्रूंचा अभिषेक घडवते. बाहेर पडू लागलेले नवरोबा पुन्हा पाऊल मागे घेऊन आत येतात. हळूच हाताला धरून पत्नीला बाहेर नेतात. आणि हा भावसोहळा बघणारा मी भारावून जातो, मनोमन हरखतो. नामदेव महाराजांनी सुखाचे सुख म्हटलेले श्रीहरीचे मुखदर्शन ही काय चीज आहे याचा प्रत्यय मला येतो. त्या भक्तिभावाच्या दर्शनानं माझे डोळे पाणावतात. माझं भगवद्दर्शन हे या भक्तीच्या दर्शनात होतं. जणु भगवंतानेच मला साक्षात्कार घडवण्यासाठी या जोडप्याशी सांगड घालून दिली असावी!
कितीही उंच गगनवेधी गोपुर असू द्या, शिल्पांकित, सुवर्णशिखरांची ही मंदिरं फक्त दगडी पायावर नाही तर ह्या आंतरिक भक्तिच्या वज्रलेपावर उभी आहेत. पिढ्यानपिढ्यांच्या, शतकानुशतके चाललेल्या या अविरत भाविकतेतच या सर्वांगसुंदर मंदिरांच्या युगायुगांच्या अस्तित्वाचं गमक आहे. देवाला देवत्व भक्तांमुळे येतं हे ऐकलेलं होतं, समजलेलं होतं. पण असं ते प्रत्यक्ष अनुभवून, उमजून माझी ही अवचित घडलेली यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
माझं भगवद्दर्शन हे या
माझं भगवद्दर्शन हे या भक्तीच्या दर्शनात होतं. >>>
आज माझं देवदर्शन हा लेख वाचून झालं.
छान लिहिलंय , लिहीत रहा.
मायबोलीवर स्वागत.
मथळ्यापासूनच एक छान सूर लागलाय ह्या लिखाणाला.
आता ते गाणे ऐकावेच लागते.
वा वा, सुंदर लिहिलंय!
वा वा, सुंदर लिहिलंय!
सुरेख लिहिलंय!
सुरेख लिहिलंय!
गाभाऱ्यात फक्त तेवत्या समयांचा आणि नंदादीपाचाच मंद उजेड असतो. >>>>>> दक्षिणेकडे हे नेत्रसुख मिळते.भविक नसूनही त्या वातावरणाचे मनावर गारुड होते.
खूप सुंदर लिहीलंय
खूप सुंदर लिहीलंय
काय सुरेख लिहीलं आहे, व्वा!
काय सुरेख लिहीलं आहे, व्वा!
(माबोवर वाचनखूण साठवायची सोय असती तर बरं झालं असतं)
सुरेख!
सुरेख!
अनुभव फार सुंदर शब्दबद्ध केला
अनुभव फार सुंदर शब्दबद्ध केला आहे. प्रसन्न वाटलं वाचून.
>>>>>>>>>.दक्षिणेकडे हे
>>>>>>>>>.दक्षिणेकडे हे नेत्रसुख मिळते.भविक नसूनही त्या वातावरणाचे मनावर गारुड होते.
होय!
लेख आवडला.
माझं भगवद्दर्शन हे या
माझं भगवद्दर्शन हे या भक्तीच्या दर्शनात होतं.
>>>हे फार आवडलं.
लेख सुरेख झालायं. मायबोलीवर स्वागत.
सुंदर लिहिलंय!
सुंदर लिहिलंय!
सुंदर लेख.
सुंदर लेख.
पश्चिम महाराष्ट्राची भाषा.>>>
संपादित
सुरेख लिहिलंय
सुरेख लिहिलंय
आनंदाचे डोही आनंद तरंग..
आनंदाचे डोही आनंद तरंग..
अफाट सुंदर शब्दांकन केलं आहे तुम्ही.
पु ल देशपांडे एके ठिकाणी म्हणतात , " मी आस्तिक आहे का नास्तिक आहे ते ठाऊक नाही , पण देवासमोर हात जोडून उभा राहिलेला भक्त बघून मला ते दृश्य बघत रहावे असे वाटते !"
पशुपत, मलापण पुलं आठवले होते.
पशुपत, मलापण पुलं आठवले होते.
पण वेगळा संदर्भ होता म्हणून इथे लिहिलं नव्हतं. 'जावे त्यांच्या देशा'मध्ये त्यांनी चार्ली चॅप्लिनला बघितल्याचं जे वर्णन केलंय, त्यात त्यांनी 'दर्शन' या संकल्पनेवरच फार छान लिहिलंय.
व्हावे , थोडक्यात इथे लिहून
वावे , थोडक्यात इथे लिहा ना.
जावे त्याच्या वंशा वाचलेलं नाही..
सुरेख लिहिलंय.
सुरेख लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
सुरेख
सुरेख
देवाला देवत्व भक्तांमुळे येतं
देवाला देवत्व भक्तांमुळे येतं हे ऐकलेलं होतं, समजलेलं होतं. पण असं ते प्रत्यक्ष अनुभवून, उमजून माझी ही अवचित घडलेली यात्रा सुफळ संपूर्ण झाली.>>>> अतिशय ह्रद्य, भावपूर्ण अनुभव...
______/\_____