अनबालगन आणि विजयालक्ष्मी - माझ्यासाठी अनबा आणि विजी. माझे चेन्नै बडीज. सदा आनंदी राहणारे जोडपे. दोघेही माझे जिवलग मित्र. विजीच्या हातचे तमिळ पद्धतीचे चविष्ट जेवण जेवणे हा माझा चेन्नैतला नियमित कार्यक्रम. घरी चार-चार मदतनीस असूनही स्वतः पदर खोचून माझ्यासाठी स्वयंपाक करणारी विजी आणि प्रचंड आग्रह करकरून वाढणारा अनबा हे दृश्य नेहमीचेच. दोघांच्या आग्रह करून वाढण्याच्या सवयीला मी हसतो, नावे ठेवतो. दोघे काही बोलत नाहीत, सवय बदलत नाहीत. एकदा खोदून विचारले, इतका आग्रह का? पटकन विजी म्हणाली - "फूड इज द ओन्ली थिंग व्हिच यू विल से इज 'इनफ' अॅट सम पॉइंट, ऑल अदर थिंग्स यू विल वॉन्ट मोअर." अद्भुत विचार! एकदा पोट तुडुंब भरले की मग पुढे कितीही वासना झाली तरी काही खाता येत नाही, हा साक्षात्कार वेगळ्या शब्दात पुढ्यात आला.
एकीकडे हे, तर दुसरीकडे पोट भरलेले असूनही खा-खा सुटणारे अनेक सहकारी. माझे मराठी मित्र अशा खादाड मंडळींना 'बकासुर' म्हणतात, तर गुजराती मित्र 'बेगडाभाई / बेगडाबेन' म्हणतात. बकासुर प्रचंड प्रमाणात अन्न खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले पौराणिक पात्र, तर गुजरातचा मेहमूद बेगडा सुलतान म्हणे भरपूर जेवण झाल्यानंतर पुन्हा रात्री-अपरात्री ५०-५० मटन समोसे आणि १०० केळी खात असे. चिमणीच्या चोचीने अगदी कमी खाणारे, मोजकेच पदार्थ खाणारे, ठरवून मिताहार करणारे लोकही भरपूर आहेत. घरी अजिबात भूक नाही म्हणणारे दहाच मिनिटांनी दुसऱ्यांच्या घरी भरपेट खातात. नापसंतीमुळे घरी एखादा पदार्थ न खाणारी मुले मित्रांकडे तोच पदार्थ आनंदाने खातात. वेगवेगळी आवडनिवड, वेगवेगळे डाएट प्लॅन, खाण्यापिण्याच्या निरनिराळ्या पद्धती आणि तऱ्हा, 'खाण्यासाठी जन्म आपुला' ते 'जिवंत राहण्यासाठी जेमतेम खाणारे' अशी विस्तृत रेंज आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्येच दिसून येते.
क्रिकेट आणि राजकारण याखालोखाल ‘चर्चाविषय पुरवणे’ हा खानपानाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. 'डाएट' किंवा 'मला अमुक आवडते / अजिबात आवडत नाही खायला' असा विषय निघण्याची खोटी की शेकडो सल्ले, अनुभव आणि स्वसिद्ध-परसिद्ध माहितीची वळकटी सांडलीच समजा. 'माझा डाएट प्लॅन' या विषयावर तर लोकं तासंतास बोलू शकतात. जरा चर्चा लांबली तर सकाळी कोपऱ्यावरच्या अण्णाकडे खाल्लेल्या इडलीपासून ते पाच वर्षांपूर्वी फ्रेंच पॉलिनेशियाला भेट दिली तेव्हा काय काय खाल्ले, याचे साग्रसंगीत वर्णन येईल, वेळ मजेत जाईल याची खात्री.
खाणे ही जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी अनिवार्य क्रिया आहे, हे आपण जाणतोच. प्रत्येक जिवाला स्वपोषणासाठी अन्नाची गरज आहे. प्रमाण आणि प्रकार थोडे कमीजास्त आणि दिवसातून कितीदा खायचे हे बदलते फारतर. अन्नाशिवाय जगू शकण्याला मर्यादा आहेत आणि 'भूक' सहन करण्यालाही, अन्यथा अन्नावाचून जगभरात भूकबळी होते ना. आपण खातो ते जिवंत राहण्यासाठी हा अगदी प्राथमिक स्तरावरचा विचार, पण त्यापलीकडे अन्न आणि अन्नविचार फार विस्तृत विषय आहे. भूक आणि अन्नाबद्दलचे चिंतन मानवी इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आपण खात असलेले अन्न हे आपलाच 'आरसा' आहे अशी समजूत अनेक देशांमध्ये आणि अनेक संस्कृतीत सुस्थापित आहे. ‘we are what we eat’ किंवा 'जैसा खाओ अन्न, वैसा होगा मन' वगैरे सुविचार आपल्या कानावरून गेले आहेतच. मनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही. जाणते-अजाणतेपणी अनेक सूक्ष्म भावभावना अन्नाशी जुळलेल्या आहेत. उदा. प्रेम - आईच्या हातच्या जेवणाची सर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या हाताला नसणे, ….वात्सल्य - प्रेमाने पाहुण्यांना खाऊ घालणे, …अभिमान - आमच्या घरच्या खास रेसेपी... सुरक्षा - हिने केलाय ना स्वयंपाक, मग भाज्या नीट धुतल्या असतीलच….. समाज - आमच्यात हे असे करतात, तुमच्यात वेगळे करतात... परंपरा - होळीला पोळी आणि पाडव्याला श्रीखंड... भूगोल - हिमाचली लग्नातले 'धाम' तर कश्मिरातील 'वाझवान' आणि कानडी गुन्तपांगळू ... धार्मिक समजुती - श्रावणात आम्ही कांदा लसूण नाही खात ....इतिहास - तंजावूरच्या राजबल्लवाची किंवा कुण्या लखनवी नवाबाच्या ९ पिढ्यांनी जपलेली जगावेगळी पाककृती … एक ना अनेक.
'मारून' खाणारा माणूस 'पेरून' खायला शिकला, हा अन्नविषयक बदल भटक्या टोळ्यांतील मानव एका जागी वस्ती करून राहण्यास कारणीभूत ठरला. हीच आपल्या वाड्या-वस्त्या आणि गावे-शहरे वसण्याची सुरुवात. कालपरत्वे काय खावे आणि काय खाऊ नये याचे दीर्घ चिंतन मानवी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत झालेले आहे. ‘काय खावे’ हे साधारण उपलब्धता, भौगोलिक स्थान, आर्थिक स्तर, सामाजिक परिस्थिती, धार्मिक श्रद्धा आणि समजुती अशा मुद्द्यांवरून ठरते. समुद्रकिनारी पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या समाजाचे प्रमुख अन्न भात आणि मासे-जलचर असणार, हे ओघानेच आले. कमी पावसाच्या प्रदेशात खाण्यात बाजरी-नाचणीसारखी धान्ये, सुपीक नद्यांकाठी भरपूर दूधदुभते, बर्फाच्छादित प्रदेशात प्राणिज पदार्थांची रेलचेल हे सगळे भौगोलिक उपलब्धतेच्या मूलभूत मुद्द्यावरून ठरते. जलप्रचुर प्रदेशातील सौम्य चवींचे, भरपूर वैविध्य असलेले गरिष्ठ भोजन आणि रखरखीत दुष्काळ सोसणाऱ्या प्रदेशातील कोरडे, जहाल तिखट साधे अन्न हा फरक ठसठशीतपणे घरोघरीच्या ताटात डोकावतो. भारतासारख्या प्रचंड वैविध्य असलेल्या देशात सामाजिक आणि धार्मिक समजुतींचा पगडा घट्ट आहे. त्यामुळे खानपानाच्या सवयींना श्रावणात मांसाहार न करणे, चतुर्मास्यात एकभुक्त राहणे किंवा काही पदार्थ वर्ज्य असणे, कंदमुळे खाणे किंवा न खाणे, उपवास आणि त्यात ‘चालणारे’ आणि ‘न चालणारे’ पदार्थ असे अनेकानेक पैलू आहेत.
खाण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी व्यक्तिगणिक बदलत असल्या, तरी स्थळ-काळ-वेळ हा एक महत्त्वाचा पैलू सदैव लागू असतो. आवडते म्हणून कुणी सहसा भल्यापहाटे न्याहारीला पुरणपोळ्या खात नाही की रात्रीच्या जेवणाला चहा-पोहे जेवत नाही. म्हणजे योग्य वेळी योग्य जेवणे असे काहीसे ठोकताळे आपल्या सर्वांच्या डोक्यात ठामपणे रुजलेले असतात, त्यात एखादेवेळी बदल आपण चालवून घेतो, पण नेहमीसाठी नाही. आपली पसंती हीसुद्धा अमरपट्टा ल्यायलेली नसते, त्यात स्थळा-काळाप्रमाणे बदल होत असतात. लहानपणी खूप आवडणारे पदार्थ आता अजिबात न आवडणे आणि याचेच उलट हे मुबलक दिसणारे उदाहरण आहे. अगदीच प्रसंग आला तर खाण्याबाबत कितपत तडजोड करायची, याचे ठोकताळेसुद्धा व्यक्तिपरत्वे बदलतात. काही आपद्धर्म म्हणून जे मिळेल ते खातात. मूळच्या शाकाहारी सारस्वत ब्राह्मणांनी 'मासे खाऊन वेद जगवले' असे दाखले दिले जातात. शाकाहारी काहीच उपलब्ध नसल्यास माझ्यासारखे काही लोक आइसक्रीम हे जेवणच आहे असे ठरवतात आणि त्याप्रमाणेच कृती करतात. काही स्वहस्ते रांधतात आणि जळले करपले तरी त्याला मेजवानी म्हणून ग्रहण करतात. या बाबतीत तडजोडीची सर्वोत्तम चाचणी म्हणजे ‘अंडे अजिबात चालत नाही’ ह्या पहिल्या पायरीपासून पुढे केकमध्ये चालते, ऑम्लेट चालते, उकडलेले अंडे चाट मसाला टाकून खाईन एखादेवेळी ते एग बेनेडिक्ट - हाफ-फ्राय - सनी साइड अपपर्यंतचा प्रवास! कट्टर शाकाहारी ते अट्टल मांसाहारी असा अनेकांचा प्रवास होतो. त्यात चांगले-वाईट असे काहीच नाही, कोणतेही एका पद्धतीचे अन्न दुसऱ्यापेक्षा उजवे-डावे आहे, हा वाद फिजूल आहे. घरी साधे जेवण जेवणारे दुसऱ्या शहरात फिरायला गेले असताना चमचमीत पदार्थांवर ताव मारताना दिसतात आणि परदेशभ्रमणात 'मला सुशी आणि वासाबी प्रचंड आवडते' असे म्हणणारे पाचव्याच दिवशी घरच्या साध्या आमटी-भाताच्या आठवणींचे कढ जिरवतात. थोडक्यात, स्थळाप्रमाणे आणि काळाप्रमाणे आपली पसंती बदलतेच.
'मिळेल ते खावे' असा सल्ला कट्टर शाकाहारी असलेल्या लोकांना हमखास देण्यात येतो. मांसाहारी असलेल्यांचे काही वेगळे आहे का ? नाही. काही मासे खात नाहीत, तर काहींना कच्चे मांस खाणे अशक्य. सगळेच प्राणी खाऊ शकणारे विरळाच. 'मांजरीचे मांस खाल का?' असा प्रश्न दर्दी मांसाहारी खवैय्यांना विचारून बघा, तुम्हाला वेड्यात काढतील. अगदी सगळे जलचर-वनचर 'चालणारे' लोकही बँकॉकच्या रस्त्यांवर कॉक्रोच आणि विंचू तळून खात असलेल्या अन्य मानवांकडे बघून ओकाऱ्या काढताना याच डोळ्यांनी बघितले आहेत. कुत्र्याचे मांस आवडीने खाणाऱ्या नागालँडच्या आपल्याच बांधवांच्या पंक्तीला किती जण जातील शंकाच आहे. म्हणजे आपण मानवांना अन्न म्हणून 'चालणारे' आणि 'न चालणारे' प्राणी हेसुद्धा वंशविद्वेषाचे बळी आहेत, म्हणायचे. तसेही हा विषय घनघोर वादविवादाचा आहे, मानवांच्या 'रेसिझम'सारखाच 'स्पिसिझम' वाद! त्यावर पीटर सिंगरसारख्या अनेक महानुभावांनी चिंतन-अध्ययन करून ग्रंथ लिहिले आहेत आणि ‘अन्न’ या विषयावर चिंतन-संशोधन करणारे विद्वान त्यावर वर्षानुवर्षे भरपूर वाद घालत आहेत.
आपल्या देशात आदल्या पिढीपर्यंत अन्नाची सरसकट उपलब्धता गृहीत धरता येत नसे. भारतासारख्या शेतीप्रधान देशातही आर्थिकदृष्ट्या जेमतेम असलेल्या जनतेला दोन वेळच्या जेवणापुरते अन्न मिळेलच अशी खात्री नव्हती. अन्नाचे रेशनिंग, निकृष्ट प्रतीचा लाल गहू, पामोलिनचे वास मारणारे जुनाट खाद्यतेल आणि जाडाभरडा खडेयुक्त तांदूळ सक्तीने खावा लागण्याचे दिवस पाहिलेली एक पिढी आपल्या आसपास आजही आहे. तो प्रवास आजच्या चंगळवादी जगात अन्नाची आणि पर्यायांची भरपूर उपलब्धता आणि उतमात करण्याइतपत सुबत्ता ह्या वळणावर आल्याचे बघणाऱ्या जुन्या पिढीजवळ 'अन्न' या विषयावर मौलिक आणि सुदीर्घ चिंतन साठलेले असणे साहजिकच आहे. शहरी, आर्थिकदृष्ट्या उत्तम परिस्थिती असलेल्यांचे आणि गावकुसाबाहेरच्या, आदिवासी वाड्यावस्त्यांमधल्या बांधवांचे अन्न यात फार मोठा फरक आहे. पोटभर पौष्टिक अन्न मिळणे हे आजही भारतातल्या आणि अन्य गरीब देशातल्या कोट्यवधी जनतेच्या स्वप्नाचा मोठा भाग व्यापलेले वास्तव आहे. उंदराचे मांस खाऊन जीवन कंठणारी 'मुसहर' समाजाची माणसे असोत की मृत पशूंचे मांस खाऊन दिवस ढकलणारे लोक, सर्वांसाठी पुरेश्या अन्नाची उपलब्धता आजच्या जगातही गृहीत धरता न येणे वेदनादायक आहे. रोज काबाडकष्ट करून कमावलेल्या पैशांचा साधारण ७५ टक्के भाग फक्त अन्नावर खर्च होणे हे आजही अनेक गरिबांचे प्राक्तन आहे.
‘कशासाठी- पोटासाठी’ ही संज्ञा मराठीत वर्षानुवर्षे लोकप्रिय आहे. जे कष्ट करायचे ते अन्नासाठी असा मूळ अर्थ आता विस्तारला आहे. 'पोटापुरते' म्हणजे आता फक्त जगण्यापुरते अन्न असा नाही, त्यात देशोदेशीचे खाद्यपदार्थ, ते सिद्ध करण्यासाठीची उपकरणे आणि घटक पदार्थ, सुंदर मांडणीसाठीची भांडी, सजावट, खाणे-पिणे आनंददायक होण्यासाठीच्या सोयीसुविधा असे सगळेच खर्चीक आणि वैभवशाली आयाम आपल्या पोटाला आणि अन्नाला चिकटले आहेत. थोडक्यात आपला खिसा दररोज न चुकता रिकामा करणारा एक मोठा चुंबक म्हणजे आपले अन्न.
अन्नाचे चोचले खिसा रिकामा करतातच असे नाही, उलटही घडते. जिभेच्या चोचल्यांनी मोठमोठे आर्थिक,राजकीय आणि ऐतिहासिक बदल घडवले आहेत. भारतातून आणलेल्या काळ्या मिऱ्यांना युरोपीय उमरावांकडे समसमान वजनाच्या सोन्याचा भाव मिळत असे, इतकी त्यांची मिजास. जायफळाने डचांचे तर मिऱ्यांनी पोर्तुगीझांचे साम्राज्य विस्तारले असे म्हणता येते. आशिया उपखंडातील चहा आणि मसाल्याच्या पदार्थांची चटक पाश्चात्त्य जगातला लागली नसती, तर आशिया गुलाम झाला नसता आणि जगाचा इतिहास वेगळा असता असे म्हणायला जागा आहे. ह्याच न्यायाने आफ्रिका खंडाच्या गुलामगिरीचे पातक कोको आणि कॉफीच्या माथी मारता येते. नीट बघितल्यास गेल्या चार-पाच शतकांचा जागतिक इतिहास अन्नाच्या अवतीभोवती फिरतो, मानवी जिव्हालौल्याच्या सामर्थ्याची साक्ष देतो. नाहीतर चहा-कॉफी,चॉकलेट आणि मसाले काही जीवनावश्यक वस्तुत मोडत नाहीत, पण ह्याच वस्तूंनी जगाचा इतिहास-भूगोल बदलला हे सत्य दृष्टीआड करता येत नाही. देशोदेशीचे व्यापारी, शासक-राज्यकर्ते, सामान्य लोक सगळेच एका अदृश्य अन्नसूत्राने एकमेकांशी बांधलेले दिसून येतात.
अन्नधान्याचे उत्पादन, त्याचे देशभर-जगभर वितरण आणि त्यामागचे आर्थिक गणित हा तर फार मोठाच विषय आहे. ज्याची झोळी रिकामी तो देश आपसूकच दुबळा ठरतो, मोठ्या दांडग्या देशांच्या दाराशी वाडगे घेऊन उभे राहण्याची नामुश्की टाळू शकत नाही. याउलट भरलेले अन्नकोठार असलेले देश-प्रदेश इतरांवर दादागिरी करू शकतात, करतात.
आपल्या जिभेच्या चोचल्यांसाठी हजारो हात राबतात, हा पैलू विसरता येणार नाही. शेतीवाडीतून धान्य-भाज्या-फळे पिकवणारे, त्यांची वाहतूक करणारे, विकणारे-विकत घेणारे, उत्तमोत्तम उपाहारगृहातून अन्न सिद्ध करणारे, ते आपल्याला वाढणारे असे हजारो हात हा अन्नाचा डोलारा उचलून धरतात. यातील प्रत्येक पायरीला ‘सरकार’नामक अदृश्य हात कररूपी पैसे वसूल करत असतात. अन्नसाखळीचे महत्त्व जंगलातच नाही, तर मानवी जीवनाच्या दैनंदिन कारभारातही तेव्हढेच ठळक आहे.
अन्नाचा एक सामाजिक विचार आहे. कौटुंबिक कार्यक्रमात सर्वांनी एकत्र जमून जेवणे, शाळेतल्या मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांची अंगतपंगत आणि लग्न-सणावारानिमित्ताने समूहभोजन असे सर्व सामूहिक भोजनाचे कार्यक्रम म्हणजे मनुष्यजीवनाचे सुखनिधान. गावखेड्यात वारी, कीर्तन, देवळातले वार्षिक उत्सव या निमित्ताने होणारे भंडारे आणि गावजेवणाच्या पंक्ती आपली सामाजिक वीण मजबूत करणारे प्रसंग. अनेक धार्मिक यात्रांतून आणि सोहळ्यातून दररोज किंवा प्रसंगानुरूप सामूहिक भोजन हा सर्वांना जोडणारा दुवा ठरतो.
शिखांच्या गुरुद्वाऱ्यात 'लंगर' म्हणजे लोकांनी लोकवर्गणीतून आणि स्वतः ‘कारसेवा’ करून - म्हणजे स्वहस्ते तयार करून वाढलेले भोजन अनेकांना तृप्त करते. साधे अन्नही परवडत नसलेल्या गरिबाला जगण्यापुरते अन्न मिळावे हा लंगरचा मुख्य उद्देश असला, तरी त्यामुळे धार्मिक/ सामाजिक रूढींमुळे एका पंक्तीत न जेवणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान पातळीवर आणून बंधुभाव वाढवणे सहजच साधले जाते. आज लंडनसारख्या समृद्ध शहरात एकटा साउथ हॉल गुरुद्वाऱ्याचा लंगर दररोज पाच ते दहा हजार भुकेल्या जिवांना उत्तम प्रतीचे अन्न देतो, विनामोबदला! कर्नाटकात शृंगेरीसारख्या गावात अन्न विकणारे एकही हॉटेल नाही, सर्वांना देवळाच्या अन्नछत्रात मोफत अन्न मिळते, हेसुद्धा स्थानिकांच्या अन्नविषयक कल्पनेला असलेल्या सामाजिक भानाचे एक सुंदर रूप.
एक अध्याय आपण खात असलेल्या अन्नाच्या शुद्धतेचा. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये वगैरे सगळे पुस्तकात. प्रत्यक्षात दररोज कोट्यवधी लोक रस्त्यावर अत्यंत अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले अन्न खातात. त्यातले पोषणमूल्य वगैरे तर एक कविकल्पना म्हणून सोडून देता येईल, पण चकचकीत मॉल्समध्ये आकर्षकरित्या मांडून ठेवलेल्या अन्नपदार्थांचे काय? उत्तम सुबक वेष्टनात असलेले अन्नपदार्थ जास्त खपतात. त्यावर आत असलेल्या खाद्याचे 'न्यूट्रिशन फॅक्ट्स' उर्फ पोषण तक्ता' छापलेला असतो, पदार्थ कधीपर्यंत संपवावेत याचा कालावधी दिलेला असतो. यात सर्रास घोळ बघायला मिळतो. 'सब चलता है' हा भारतीय बाणा आहेच, पण प्रगत देशातील तथाकथित कडक कायदेसुद्धा वेष्टनबंद पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल आणि त्यात असलेल्या घटक पदार्थांबद्दल पूर्ण खात्री देऊ शकत नाहीत. मुळात यासंबंधित सगळीकडच्या कायद्यात पळवाटा फार आहेत.
जगभरच्या विविधभाषी साहित्यात कळत-नकळत अन्नाविचार डोकावतो. भुकेल्या जनतेला 'ब्रेड नसेल तर केक खा' असा उपदेश देणाऱ्या उद्दाम राज्ञीला तिचीच प्रजा मृत्युदंड देते आणि राज्यक्रांतीचे बिगुल वाजवते. भाकरीचा चंद्र मराठमोळ्या काव्यात दिसतो. ‘पंक्तिपावन’ आणि ‘पंक्तीपतित’ असे जुने शब्द त्या व्यक्तींचे सामाजिक स्थान दर्शवतात, तर 'जसे अन्न खाल, तशीच संतती निपजेल' असा इशारा देणारे संस्कृत वाङ्मय पुढ्यात येते.
दीपो भक्षयते ध्वान्तम कज्जलं च प्रसूयते
यदन्न भक्षयेनित्यं जायते तादृशी प्रजा
दिवा अंधकार खातो, त्याच्यापोटी काजळ जन्मते. (त्याच प्रकारे) जसे अन्न आपण खातो तशीच प्रजा उत्पन्न होते.
आपले सर्व जीवन व्यापून वर दशांगुळे उरणाऱ्या अन्नाबद्दल बोलावे-चिंतावे तितके कमीच. तोंडाला चव आहे तोवर जमतील तेवढे जिभेचे लाड करावेत, उपलब्ध असलेल्या पर्यायातून स्वतःसाठी सर्वोत्तम तेच अन्न निवडावे, प्रसन्न मनाने शिजवावे आणि मग 'जाणिजे यज्ञकर्म' अशा भावनेने खाऊन तृप्त व्हावे, ह्यातच मनुष्यजीवनाचे सुख सामावलेले आहे.
***
पूर्वप्रसिद्धी :- मिसळपाव दिवाळी अंक २०२२
अनिंद्य
अनिंद्य
तुमचं लेखन वैविध्य नेहमीच आकर्षक ! आणि तुंम्ही ते लिहिताही छान .
हाही लेख चविष्ट
@ बिपिनसांगळे ,
@ बिपिनसांगळे ,
अभिप्रायाबद्दल आभार !
सध्या एका लेखमालेसाठी काही
सध्या एका लेखमालेसाठी काही पौराणिक कथा अन्नाच्या अँगलने वाचतोय. धमाल अचाट कथा आहेत ! ग्रीकांचे ambrosia, देवगणांच्या लग्नसमारंभात Eris नी फेकलेले उष्टे सोनेरी सफरचंद उर्फ Golden Apple of Discord, एटलांटा च्या लग्नासाठीच्या रेसमधली golden apples, Athena नी निर्मिलेली ऑलिवची झाडे- फळे, मेसोपोटामियाच्या Ninkashi देवीच्या कडक लिक्युअर्स,
चीनची पीचेस ऑफ लॉंगेव्हीटी, आपल्याकडचे अमृत आणि जंबुफल आख्यान, शबरी फेम बोरे, तामिळ आद्यकथेतले स्कंद- गणेशाचे भांडण लावणारे सोनेरी आंब्याचे आख्यान, अश्विनीकुमारांच्या मधमाश्या आणि मध, बंगाली-ओरिया धर्मठाकुराचे फक्त शुभ्र अन्न खाण्याचे तर डाकिणीचे फक्त रक्त आणि रक्तवर्णी अन्नाचे obsession …. एक ना दोन!
अगदी शेकडो रम्य रोमांचक कथा. फार म्हणजे फारच मजा येत आहे. डीटेलवार इथे लिहीन पुढेमागे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर लेख....
आज पुन्हा वाचला...
>>>अगदी शेकडो रम्य रोमांचक कथा. फार म्हणजे फारच मजा येत आहे. डीटेलवार इथे लिहीन पुढेमागे Happy>>>>
आवश्य लिहा...वाट पहातो....
तुमचं हैदराबाद ही वाचतो. मजा येते...
प्रत्येक ठिकाणी विशिष्ट खाद्यपदार्थ आणि त्यांचा उगम यांचे सुंदर किस्से आहेत. आपण तर विविधतेने नटलोय...
काही किस्से मला पुसट स्मरतात उदा. पतियाळा पेग, दिल्लीचे यमुनेचे पाणी चविष्ट नव्हते म्हणून मोगल मुदपाकखान्यात कसे बदल झाले... काश्मिरी लोक हिवाळ्यात सुकवलेल्या भाज्या वापरतात... सुकवलेले मटनही शिकारीवर जाणा-या राजेरजवाड्याचं खाद्य... मैसूरपाकाचा जन्म
व्यंकोजी राजेंनी दक्षिणेत आमटी नेली...वगैरे... वगैरे
तुम्ही छान विस्तार कराल ....
आपण तर विविधतेने नटलोय...
आपण तर विविधतेने नटलोय...
+ ११११११
व्यंकोजी राजेंनी दक्षिणेत आमटी नेली.... हे मात्र फारसे बरोबर नसावे. तंजावूर-तमिळ प्रदेशात स्थायिक झालेल्या मराठीजनांचा पारंपरिक स्वयंपाक हे एकदम रोचक प्रकरण आहे. सुदैवाने त्याबद्दलचे दस्तावेज उपलब्ध आहेत.
तुमचं हैदराबाद ही वाचतो. मजा
तुमचं हैदराबाद ही वाचतो. मजा येते...
आभार !
छानच लेख..
छानच लेख..
म्हटलं तर माहितीपर बाबी.. पण तुमच्या लेखनशैलीमुळे सुंदर ललित लेख झालाय..
लेखमालेसाठी काही पौराणिक कथा
लेखमालेसाठी काही पौराणिक कथा अन्नाच्या अँगलने >> वा! दोन आवडते विषय एक साथ म्हणजे दुधात साखरच. नक्की लिहा. आवडेल.
>>>व्यंकोजी राजेंनी दक्षिणेत
>>>व्यंकोजी राजेंनी दक्षिणेत आमटी नेली.... हे मात्र फारसे बरोबर नसावे.>>>> सहमत....
आपली खाद्य संस्कृती हळूहळू बदलत जाते. हे बदल स्थलकालानुरुप घडत असतात. व्यापार उद्योगधंदे यासाठी माणसं ठिकाणं बदलत असतात. त्यावेळी ते आपल्याबरोबर खाद्य संस्कृतीही घेऊन जातात. नवीन ठिकाणी इतर लोकांना तो खाद्यपदार्थ आवडला तर ते देखील तसे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतात आणि तो खाद्यपदार्थ सगळ्यांचा होतो.
आता थोडेसे सांबाराविषयी. सांबरा बाबत अशी कथा प्रचलित आहे की शाहूजी महाराज आमटी बनवत असताना आमटी बनवायला लागणारे कोकम नव्हते. मग कोकम ऐवजी चिंच घालून आमटी केली. पुढे शंभू महाराज दक्षिणेत गेले असता त्यांना ही आमटी शाहूजींनी जेवनात वाढली आणि शंभूराजांच्या सन्मानार्थ त्या आमटीचे नामकरण सांभ आहार म्हणून सांभार असे झाले. अजून एका कथेनुसार शंभूराजे त्यांचा खानसमा आला नसता स्वतः आमटी बनवत होते आणि त्या आमटीत टाकायला कोकम नव्हते म्हणून त्यांनी चिंच वापरली आणि त्याचे सांभार झाले.
खरंतर प्रत्येक स्वयंपाकघरात कधी ना कधी असे प्रयोग होत असतात. त्यातूनच नवनव्या पदार्थांचा उगम होतो. वरील कथा खोट्या समजल्या तरी मुदपाकखाण्यात कोकम संपले म्हणून आमटीत चिंच घातलीच गेली नसेल असे म्हणू शकत नाही. हीच आमटी मद्रास मधल्या तमिळ भाषिकांनाही आवडली आणि तिचे (Champaaram) सांबार असे नामकरण झाले. आपल्या खाद्य संस्कृतीचे म्हणावं तसं दस्ताऐवजीकरण झालेले नाही . पण हल्ली भरपूर प्रमाणात ते होतयं. पूर्वी खाद्यपदार्थ कसा बनवायचा याची पद्धती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वंश परंपरेने जात होती.
त्यात कालानुरूप बदल होत गेले . खाद्यपदार्थ बनविण्याच्या पद्धतीचे राजे रजवाड्यांकडेच दस्ताऐवजीकरण असाव . पण इतर लोक याकडे एक परंपरागत वारसा म्हणूनच पाहत होते.
तंजावुरकर भोसल्यांचे सर्वच
तंजावुरकर भोसल्यांचे सर्वच क्षेत्रातले योगदान प्रचंड आहे. त्यात सांबाराचे जनकत्व मात्र नाही.
चिंच + तूर डाळ वापरून केलेले सांबार आणि भात हे अतिशय जुने स्थानिक तमिल अन्न असल्याने आणि त्याचे लेखी पुरावे असल्याने सांबार/ सांभार आणि छत्रपती संभाजीराजे- छ़ शाहूमहाराज आणि तो कोकम- चिंचेची आमटी वगैरे किस्सा सांगोवांगी कथा आहे असे मला वाटते. पण सांबाराचे जनकत्व आपल्याकडे आहे हे ऐकायला आपल्याला आवडते हे खरेच
असो
@ दत्तात्रय साळुंके
@ दत्तात्रय साळुंके
@ अ'निरु'द्ध
@ हपा
अभिप्रायाबद्दल आभार
>>>चिंच + तूर डाळ वापरून
>>>चिंच + तूर डाळ वापरून केलेले सांबार आणि भात हे अतिशय जुने स्थानिक तमिल अन्न >>>>
हो पुरावे असतील तर तेच सत्य आहे.... धन्यवाद
>>>>>>>डीटेलवार इथे लिहीन
>>>>>>>डीटेलवार इथे लिहीन पुढेमागे Happy
![https://lh3.googleusercontent.com/pw/AJFCJaXafe_shnq4mIVCcNCBDO9g2FexiuFpya3wey9zn-nBAyGtDzf9_VeHK0eaJ2He3qTMW7VMO5R_o3oq-jGE40dbL3Xojp64Svxn3IWemmTISJmxslWrTSvU3kAI8gWEhpgO9BBTutnrPMG03j5piZOsIQ=w469-h625-s-no?authuser=0](https://lh3.googleusercontent.com/pw/AJFCJaXafe_shnq4mIVCcNCBDO9g2FexiuFpya3wey9zn-nBAyGtDzf9_VeHK0eaJ2He3qTMW7VMO5R_o3oq-jGE40dbL3Xojp64Svxn3IWemmTISJmxslWrTSvU3kAI8gWEhpgO9BBTutnrPMG03j5piZOsIQ=w469-h625-s-no?authuser=0)
प्लीज लिहाच. मला सुद्धा 'अन्नचिंतन' विषयावरची पुस्तके आवडतात. हे माझ्याकडील एक - रोचक आहे.
.
लेखमालेसाठी काही पौराणिक कथा
लेखमालेसाठी काही पौराणिक कथा अन्नाच्या अँगलने >> वा! दोन आवडते विषय एक साथ म्हणजे दुधात साखरच. नक्की लिहा. आवडेल.
अन् ते पौराणिक चावट कथांचं काय झालं? ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>>>
हर्पांशी सहमत.
नक्की लिहा अनिंद्य.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/44335
सांबार म्हणजे मसाले किंवा तोंडीलावणे. त्यात तूर डाळ किंवा चिंच असलीच पाहिजे असं नाही. सांबार या नावाचे अनेक पदार्थ आहेत. एकाचाही छ. संभाजी महाराज किंवा अन्य राजाशी संबंध नाही.
चिंच आणि तूर डाळ घालून
चिंच आणि तूर डाळ घालून केलेल्या पदार्थांचे नाव कुलंबू असं आहे. सांबार हे नाव आधुनिक आहे.
एकाचाही छ. संभाजी महाराज
......एकाचाही छ. संभाजी महाराज किंवा अन्य राजाशी संबंध नाही.....
अगदीच !
पौराणिक चावट कथांचं काय झालं?
पौराणिक चावट कथांचं काय झालं? ….
Work in progress है ते. आठवण करुन दिल्याबद्दल ठान्कू !
>>>>>>>पौराणिक चावट कथांचं
>>>>>>>पौराणिक चावट कथांचं काय झालं? ….
यावरुन,
माझी रिक्षा - अध्यात्म आणि विनोद
वाचला तो लेख सामो
वाचला तो लेख सामो
शृंग ऋषींना मोहित करण्यासाठी अप्सरांनाही आधी 'खाण्यासाठी' फळे ऑफर करावी लागली, बाकी बेनेफिट्स नंतर.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
माझा लेखातला पॉईंट सिद्ध झाला की नाही ?
BTW ह्याच शृंग ऋषींकडे 'पुत्रकामेष्टी यज्ञाचे' जनकत्व आणि पेटंट होते. राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न शृंगकृपेने जन्मले. असो.
>>>>>>शृंग ऋषींना मोहित
>>>>>>शृंग ऋषींना मोहित करण्यासाठी अप्सरांनाही आधी 'खाण्यासाठी' फळे ऑफर करावी लागली, बाकी बेनेफिट्स नंतर. Biggrin
हाहाहा करेक्टो!!!
>>>>. एकाचाही छ. संभाजी
>>>>. एकाचाही छ. संभाजी महाराज किंवा अन्य राजाशी संबंध नाही.>>>>
तुमची bbc वरची याविषयीची मुलाखत ऐकली तेव्हाच वाटलं मायबोलीकर चिन्मय दामले (चिनूक्स). ....
ही लिंक त्याची
https://youtu.be/IwmV4Qwq1_w
Pages