शाहरूख खान भारतीय महिलांना ईतका का आवडतो?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2022 - 13:45

हो,
शाहरूख खान भारतीय महिलांना आवडतो.

आणि हे मी म्हणत नाहीये......
तर सर्व्हेचा निकालच तसा आहे.

त्याच निकालावर आधारीत हा सुंदर लेख आज सकाळीच त्याच्या वाढदिवसानिमित्त वाचण्यात आला.

https://www.bbc.com/marathi/india-59472935

या लेखाला केवळ शाहरूखच्या चाहत्या महिलांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक पुरुषाने वाचावे आणि यावर विचार करावा अशी मनापासून ईच्छा म्हणून हा लिखाणप्रपंच !

-------------------------------------------------

आमच्याकडे माझ्या आईला शाहरूख आवडतो. "कभी खुशी कभी गम" आम्ही जोडीने तब्बल पंधरा ते सोळा वेळा बघितला आहे.

आमच्याकडे माझ्या बायकोला शाहरूख आवडतो. थेट कबूल करणार नाही ती.. पण ते कळते. माझ्या शाहरूखप्रेमाचेही तिला तितकेच कौतुक आहे.

आमच्याकडे माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही ती सहा वर्षांची असल्यापासून शाहरूख आवडतो. टीव्हीचा रिमोट हातात घेते आणि शाहरूख खान मूवीज असे सर्च करून त्याचा जो चित्रपट दिसेल तो बघून घेते. आम्ही जोडीने कैक शाहरूख मूवी नाईट मारल्या आहेत. अगदी त्याच्या उतरत्या काळातले झिरो, दिलवाले, हॅपी न्यू ईयर हे चित्रपट देखील तिच्यामुळेच बघून झालेत.

मला सख्खी बहिण तर नाही, पण माझ्या चुलत-मामे-मावस सर्वच बहिणींना शाहरूख आवडायचा. आम्ही जवळपास सारे एकाच वयोगटातले. तो आम्हाला डीडीएलजेच्या काळापासून आवडायचा.

माझ्या सर्वच सख्या मैत्रीणींनाही शाहरूख आवडतो. किंबहुना असेही म्हणू शकतो की शाहरूख आवडणार्‍या मुलींशी माझी छान गट्टी जमते. शाहरूखप्रेम हा आमच्यातला कॉमन फॅक्टर असतो.

हो, पण आपल्याकडे मागच्या पिढीपर्यंत महिलांनी एखादा हिरो आवडतो हे उघड सांगायची जरा चोरीच होती. कारण हिरो वा हिरोईन आवडतो/आवडते असे म्हटले की आपल्या डोक्यात आधी शारीरीक आकर्षणच येते. पण शाहरूखबाबत गणिते बदलली. शाहरूख आवडणे हे बरेचदा कुठल्या शारीरीक आकर्षणातून आले नसते.. तो बस्स आवडतो!

हो, तो तसा क्यूट आहे. गालावर छान खळीही पडते. पण भारतीय मर्दानी सौंदर्याचे निकष लावता, त्यात तो कधी फिट झाला नव्हता.
तो आमीर सारखा चॉकलेट हिरो नव्हता, ना तो सलमानसारखा शरीरसौष्टव मिरवायचा.
तो अक्षय कुमारसारखा अ‍ॅक्शन हिरो नव्हता, ना सनी देओलसारखा त्याचा ढाई किलो का हाथ होता.
पण तरीही त्याने आबालवृद्धांना भुरळ पाडली.

का?

एक छान कारण वरच्या लेखातच दिले आहे ..
त्याची एक चाहती म्हणते,

"मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर असा हिरो पाहिला जो घरातल्या बायकांबरोबर स्वयंपाक घरात गाजर सोलत होता, स्वयंपाक घरात इतका वेळ देत होता." (चित्रपट - डीडीएलजे)

तिच्यामते हे तेव्हा फार रोमँटीक द्रुश्य होते.

हो, शाहरूखने हिरोईजमची व्याख्या बदलली. जेव्हा नव्वदीच्या दशकात सनी देओल, जॅकी श्रॉफ, संजय दत्त असे अ‍ॅक्शन हिरो अमिताभचा वारसा पुढे चालवायला तयार होते तेव्हा असे एखादे कॅरेक्टर पडद्यावर साकारायची हिंमत त्याने दाखवली. आणि ही शाहरूखचीच जादू की ते चक्क लोकांना आवडले. खास करून मुलींना आणि महिलांना आवडले. असाही हिरो असू शकतो हे त्यांना नव्याने कळले. आणि आपल्यालाही असा पुरुष जोडीदार असावा हे त्यांना वाटू लागले. असा म्हणजे कसा. तर आपल्या जोडीदाराची कदर करणारा, तिचे बोलणे तिचे विचार संपुर्णपणे ऐकणारा, तिला आणि तिच्या भावनांंना समजून घेणारा, तिला हसवणारा, तिला वेळ देणारा, तिला आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे स्थान देणारा...
केवळ गुंडांशी चार हात करून हिरोईनचे रक्षण करणार्‍या हिरोमध्ये प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला तितका रस नव्हता.

आपल्याकडे हिरोईन म्हणजे केवळ शोभेची बाहुली हा ओरडा खूप असतो. शाहरूखच्या चित्रपटात ते कधी आढळले नाही. म्हणून त्यातला हिरोही मुलींना आपला हिरो वाटायचा. हे प्रेम आपल्या आयुष्यात यावे असे वाटायचे. पण शाहरूखची ही ईमेज केवळ पडद्यापुरतीच मर्यादीत नाहीये. तो प्रत्यक्ष जीवनातही स्त्रियांना तितकाच सन्मान देणारा म्हणून ओळखला जातो. आजही त्याच्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहाचा आदर्श ठेवला जातो. त्याच्या सहकलाकार नायिकांशी असलेल्या त्याच्या निखळ मैत्रीचे उदाहरण दिले जाते. चित्रपटाच्या नामावलीत हिरोच्या आधी हिरोईनचे नाव यावे ही पद्धत त्याने सुरू केली, जे ईतक्या वर्षात कोणाला सुचले नव्हते.

त्याचे पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही कुटुंबवत्सल असणे लोकांना आवडते. मध्यंतरी बातमी ऐकली. शाहरूखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते. पण सेलिब्रेटींच्या मुलावर आली की आपण आपला हक्क समजून तोंडसुख घेतो. पण ती बातमी ऐकल्यावर आमच्या घरी सर्वांना शाहरूख खान "या बापाबद्दल" वाईट वाटले.

त्या लेखात अजूनही काही कारणे दिली आहे. जसे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. त्याचे चटपटीत बोलणे, त्याचे हजरजबाबी असणे... पुर्णपणे सहमत!
पण या सर्वात तो विनम्रही कधीच नव्हता. किंबहुना त्याने विनम्रतेचा आव कधीच आणला नाही.
जेव्हा सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या डोक्यात हलकीशी हवा गेली तेव्हा अमिताभ आणि दिलीपकुमार बेस्ट असले तरी आपण थोडे बेटर आहोत असे विधान त्याने बिनधास्त केले होते. पण पुढे तो आपला वेडेपणा होता हे प्रामाणिकपणे कबूल करायलाही त्याचे जीभ कचरली नाही. तर आज पुन्हा यशाच्या शिखरावर असताना स्वतःला किंग खान देखील तो तितक्याच आत्मविश्वासाने म्हणवून घेतो.

आपल्याकडे मुले रडत नाहीत असा एक समज आढळायचा. तसेच मुलांच्या मनावर बिंबवले जायचे. त्यामुळे अश्या मुलांना पुढे जाऊन मुलींच्या भावना कळणे अवघड व्हायचे.
पण शाहरूखने पडद्यावर रडणारा हिरो यशस्वीपणे साकारला. बायकांच्या भावनांना समजून घेणे हा देखील एक गुण असतो आणि तो प्रत्येक पुरुषाकडे असायला हवा हा विचार प्रेक्षकांमध्ये रुजवला.

आता तुम्ही म्हणाल की चित्रपट दिग्दर्शकाचा असतो, लेखकाचा असतो. त्यात काम करणारे कलाकार तर केवळ त्यांचे विचार वाहून नेणारे माध्यम असतात. त्यामुळे हे सारे काही शाहरूखने केले नाही.
पण प्रत्यक्षात असे नसते. तो चेहरा असतो, त्याला स्टारडम असते म्हणून ते विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. म्हणून तसे चित्रपट बनतात. म्हणून ते प्रभाव पाडतात.
शाहरूख नसता तर यातले काहीच झाले नसते.
आणि म्हणून आपल्याला शाहरूख च आवडतो Happy

-------------------------------

उलट सुलट मनात आलेले विचार कसेही लिहून काढलेत.
तुर्तास थांबतो पण लिहायचे अजून संपले नाही.
प्रतिसाद ईथे मी आयुष्यभर देऊ शकतो.
कारण भारतातच काय, जगात अशी महिला नाही... जी माझ्यापेक्षा मोठी शाहरूखची चाहती असेल Happy

-------------------------------

अरे हो, हॅपी बड्डे शाहरूख. हे राहिलेच. किती वर्षांचा झालास हे माहीत नाही. जाणून घेण्यत ईंटरेस्टही नाही. तुझे वय कधी मोजावेसे वाटलेच नाही. कारण आजही शाहरूख म्हटले की डोळ्यासमोर तुझा हाच चेहरा येतो

srk.jpg

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.facebook.com/share/r/15jRx99kyt/

हा व्हिडिओ बघून हा धागा आठवला
९५ दिवस शाहरूखच्या बंगल्याबाहेर उभा राहिला.
अखेर त्याला शाहरूख येऊन भेटला.
फॅन चित्रपट खराही असतो तर...

वरची पोस्ट टाकायला या धाग्यावर आलो.
आणि माया मेमसाब पोस्ट दिसल्यावर आठवले अरे हा अजून बघायचे राहिला आहे.

पोस्ट कोणाच्या हे बघितल्या आणि मग जाणवले की अश्या पोस्ट आता पुन्हा येणार नाहीत..

पोस्ट कोणाच्या हे बघितल्या आणि मग जाणवले की अश्या पोस्ट आता पुन्हा येणार नाहीत..

>> त्या जाताना प्रत्येकाच्या हृदयावर अश्या काही ना काही पाऊलखुणा सोडून गेल्या आहेत की त्यांची हटकून आठवण आल्याखेरीज रहात नाही. त्याना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहिलेल्या धाग्यावर "त्या म्हटलं तर प्रत्येकाच्या कंपूत होत्याही आणि म्हटलं तर कोणत्याच कंपूत नव्हत्याही" हे वाक्य तेव्हा साहित्यिक वाटलं होतं. पण खूप विषयांवर लिहिताना ते वाक्य आठवतं. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या विषयात त्यांनी एकदम घट्ट साथ दिली आहे मायबोलीवर.

जेवढे वर्ष आमच्यासोबत होतात तेवढे वर्ष वेगवेगळ्या प्रकारे आमच्यावर प्रेम करत राहिलात. Thank you ❤️

Pages