अस्वस्थ मनाचा ‘ताप’

Submitted by कुमार१ on 31 October, 2022 - 08:05

ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. शरीराचे तापमान नियंत्रण आणि ताप येण्याची मूलभूत प्रक्रिया आपण यापूर्वी “गरम आणि ‘ताप’दायक” या लेखात समजावून घेतली आहे (https://www.maayboli.com/node/77038).
त्या लेखात संसर्गजन्य आणि अन्य शारीरिक आजारांमध्ये येणाऱ्या तापाचे विवेचन आहे. परंतु त्या व्यतिरिक्त, मानसिक बिघाड हे सुद्धा ताप येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. या प्रकारचा ताप वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यासंबंधी स्वतंत्रपणे काही लिहावे अशी सूचना मायबोलीकर मानव पृथ्वीकर यांनी नुकतीच केली. त्यानुसार हा लघुलेख लिहीत आहे.

मनस्थितीजन्य ताप म्हणजे काय ?
काही व्यक्ती जेव्हा मानसिक ताणतणाव, भीती किंवा भावनिक आंदोलनांना सामोऱ्या जातात तेव्हा त्यांना अचानक ताप येतो. या तापाची काही अंगभूत वैशिष्ट्ये अशी:

• व्यक्तीच्या शरीरात कुठलाही जंतुसंसर्ग नसतो. तसेच शारीरिक तपासणी केली असता कोणताही ‘शारीरिक’ बिघाड सापडत नाही.
• काहींना उच्च पातळीचा ताप येतो (105-106 F) व तो लवकर ओसरतो.
• तर काहींच्या बाबतीत ताप सौम्य ते मध्यम असतो (100- 101 F). परंतु तो दीर्घकाळ टिकतो.
• या प्रकारच्या ताप-उपचारात नेहमीच्या तापविरोधी औषधांचा (क्रोसिन वगैरे) उपयोग होत नाही.
• पौगंडावस्थेतील मुलांत या तापाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.

ताप येण्याची जैविक प्रक्रिया
जंतुसंसर्गाने येणारा ताप आणि मानसिक अस्वास्थ्यातून येणारा ताप यांच्या मूलभूत प्रक्रिया भिन्न आहेत.
जंतुसंसर्गामध्ये खालील घटना घडतात:

संसर्ग >>> दाहप्रक्रिया >>> Prostaglandins आणि अन्य रसायनांमधली वाढ >>> मेंदूच्या हायपोथालामस भागातील विशिष्ट केंद्रावर परिणाम >>> ताप.

मात्र मनस्थितीजन्य तापाची प्रक्रिया यापेक्षा भिन्न आहे. ती समजून घेण्यासाठी आधी शरीरातील मेदसाठ्यांबाबत काही माहिती देतो.

आपल्या शरीरात दोन प्रकारचे मेदसाठे असतात:
१. खूप मोठ्या प्रमाणावरील मेदाला आपण ‘पिवळा’ मेद असे म्हणतो. हा त्वचेखाली सर्वत्र आणि उदर पोकळीत असतो.
२. तपकिरी मेद (ब्राऊन fat) : या प्रकारचा मेद मात्र अत्यंत मर्यादित ठिकाणी आहे. तान्ह्या बालकांमध्ये त्याचे प्रमाण तुलनेने जास्त असते. परंतु प्रौढपणी हा मेद शरीरातील काही मोजक्या भागांमध्ये राहतो. जसे की, मान, गळा व छातीचा मोजका भाग.

Brown AT adult (2).jpg
या मेदाचे एक वैशिष्ट्य असते. तिथे घडणाऱ्या विशिष्ट रासायनिक प्रक्रियांमधून बऱ्यापैकी उष्णतानिर्मिती होते.

मानसिक अस्वास्थ्यामुळे शरीरात अशा क्रिया होतात :
१. Sympathetic चेतासंस्थेचे उद्दीपन होते.
व त्यातून noradrenaline हे रसायन स्त्रवते.

त्यामुळे २ घटना घडतात:
A. तपकिरी मेदाच्या पेशींचे आकारमान वाढते आणि पेशींमध्ये मेदाचे मोठ्या प्रमाणात विघटन होते. तसेच तिथे UCP नावाच्या प्रथिनाचे प्रमाणही वाढते. त्याच्या गुणधर्माने उष्णतानिर्मिती वाढते.
B. त्वचेच्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. >>> उष्णतेचे उत्सर्जन कमी होते.

२. वरील दोन्हींच्या एकत्रित परिणामातून ताप येतो.
अर्थात ही सर्वसाधारण उपपत्ती आहे. सर्व वैज्ञानिकांचे याबाबतीत अद्याप एकमत नाही. या विषयावरील संशोधन अद्याप पुरेसे झालेले नाही.

मानसिक अस्वास्थ्याची कारणे:
मनस्थितीजन्य ताप येणाऱ्या लोकांचे निरीक्षण केले असता अनेक प्रकारची कारणे आढळून आलेली आहेत. त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ. तो घेताना मुले आणि प्रौढ अशा दोन गटांचा स्वतंत्र विचार करता येईल.

मुले
• एका अथवा दोन्ही पालकांची भीती, दडपण, आई वडिलांतील भांडणे, इ.
• शाळेतील त्रासदायक वातावरण, शिक्षकांची भीती, अन्य मुलांनी वारंवार चिडवणे, टिंगल करणे किंवा धमकावणे, परीक्षा/स्पर्धापूर्व वातावरण.
• कुटुंबातील दुःखद घटना
• भीतीदायक दृश्ये/चित्रपट/ चित्रफितींचा परिणाम

प्रौढ व्यक्ती
• कामाच्या ठिकाणचे ताणतणाव, वरिष्ठांची भीती, नोकरी जाण्याची भीती
• काही लोक कामाच्या ठिकाणी कायमच मरगळलेले दिसतात. अशांवरही काही अभ्यास झालेले आहेत. त्यांचा कामाचा दिवस आणि विश्रांती/सुट्टीचा दिवस यांमध्ये देखील त्यांच्या शरीर तापमानात फरक पडलेला आढळला आहे.
• मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आधीचा दिवस
• कुटुंब व जिवलग मित्र परिवारातील दुःखद घटना आणि त्यांचे काही काळाने केलेले स्मरण, इत्यादी.
• मोठ्या शस्त्रक्रिया/ भूल यांना सामोरे जाताना.

उपचार
वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की अशा प्रकारच्या तापामध्ये नेहमीच्या तापविरोधी औषधांचा उपयोग होत नाही. किंबहुना अशा औषधांचा उपयोग न झाल्यानेच डॉक्टर त्या व्यक्तीचा वेगळ्या प्रकारे विचार करतात. संबंधिताची खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर मानसिक मुद्दे समोर येतात. उपचारांच्या
पहिल्या पातळीवर मानसिक आधार आणि समुपदेशन हे उपाय राहतात. मनशांतीच्या नैसर्गिक उपायांनी पण फायदा होतो. जिथे ताप अशा उपचारांनी आटोक्यात येत नाही तिथेच औषधांचा विचार करता येतो. संबंधित औषधे मानसोपचार तज्ञांच्या अखत्यारीतील आहेत. त्यांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करता येतात.

................................................................................................................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे इंटरेस्टिंग आहे. मानसिक अस्वास्थ्याने डोके दुखते हे अनुभवले आहे. ताणाने पाठदुखी होते हे वाचले आहे. पण ताप माहीत नव्हता.

लौकरच आला लेख.
चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.
चरबीचे हे प्रकार आणि त्यातुन होणारी उष्णता रोचक प्रकार आहे.

सर्वांना धन्यवाद !
खरंय, हा या प्रकारचा ताप हे वैशिष्ट्यपूर्ण प्रकरण आहे. यामध्ये कंडीशनिंग असाही एक प्रकार असतो. आम्ही विद्यार्थी असताना एका वर्गमित्राबाबत हे अनुभवले आहे.

आम्हाला शिकवणाऱ्या एका प्राध्यापकांशी त्याचे काही कारणाने बिनसले होते. त्यानंतर पुढची तीन वर्षे हे प्राध्यापक आम्हाला कधी ना कधी परीक्षक म्हणून असायचे. एकदा का ही माहिती समजली की आमच्या त्या वर्गमित्राला कापरे भरायचे, खूप अस्वस्थ व्हायचा. त्याचे कपाळ गरम लागायचं. प्रत्यक्ष तोंडी परीक्षेच्या वेळेस बिचारा खूप घाबरून जायचा.
शेवटी अन्य एक-दोन प्राध्यापकांना मध्ये घालून त्या दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागली होती.

मला बहुतेक हा अनुभव एकदा आलाय.
कोविडची दुसरी लाट ऐन भरात असतानाची गोष्ट. महाराष्ट्रात जवळचे अनेक नातेवाईक कोविडने आजारी होते. थोडी दूरची एक नातेवाईक आणि एक ओळखीची ताई कोविडने गेल्याचं कळलं. सोसायटीतही कुणाला ना कुणाला कोविड होताच. रोज काही तरी नवीन वाईट बातमी ऐकायला येत होती. अशात आत्याचे यजमान कोविडने गेले आणि मला ताण असह्य झाला असावा. अचानक ताप आला. काही काळाने उतरला. असं दोन दिवस झालं. नेमकी दुसऱ्या दिवशी आमच्या सोसायटीत मनपाची कोविड टेस्ट ड्राईव्ह होती म्हणून मी जाऊन टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली.
पण नंतर नवऱ्याला आणि दोन्ही मुलांना ताप आला. दोन दिवसांत बराही झाला. त्यांची टेस्ट वगैरे काही केली नव्हती. तेव्हा कुठे बाहेर तर जात नव्हतो, बाहेरून घरात कुणी येत नव्हतं. नक्की ताप कशामुळे आला, हे काही कळलं नाही. पण एका क्षणी प्रचंड टेन्शन आलं होतं आणि तेव्हाच ताप भरला हे खरं.

**पण एका क्षणी प्रचंड टेन्शन आलं होतं आणि तेव्हाच ताप भरला हे खरं.
>>>
+११
तुमच्या अवस्थेची कल्पना करू शकतो.

खूप छान माहिती.
असा ताप येण्याचे प्रमाण बायकांमध्ये जास्त असते का?

धन्यवाद !
**असा ताप येण्याचे प्रमाण बायकांमध्ये जास्त असते का? >>
नाही. यासंदर्भातील आकडेवारी उलटसुलट आहे.
ठाम असा निष्कर्ष नाही

छानच माहिती. मला येतो असा ताप. कामाच्या ठिकाणी उच्चतम स्ट्रेस व अनिस्चितता नेहमीच असते. कधी कधी हे प्रमाण असह्य झाले की येतो ताप . माझ्या पिशवीत नेहमी थर्मामिटर व व्हिक्स ची बाटली असते. व एक ओढणी मी कॅरी करत असे. ताप आला की व्हिक्स लावुन ओढणी डोक्या स गुंडाळून काम चालू ठेवायचे. घरी जाउन जुजबी आवश्यक ती कामे करायची व मग झोपून जायचे. अश्यावेळी क्रॅकर्स किंवा बिस्किट खाउन झोपून जात असे.

कंडिशनिन्ग हे पण बरोबर आहे. मी दुसृयांच्या घरी वाढले व ते वडील फार तापट व्यक्तिमत्व होते. आई कायम घरकामात बिझी त्यामुळे काही त्रास होत असल्यासही किंवा असल्यास सांगायचे नाही बोलायचे नाही असेच ट्रेनिन्ग होते स्वतः ला. मग ते असे व्यक्त व्हायचे. पुढे सासू पण सावत्र व फारच तापट मग पुढे कंटिन्यू झाले.

आता निवृ त्तीच्या सुमारास हे सर्व परि णाम व त्याची कारणे ह्यावर माहिती मिळवली आहे व स्ट्रेस कमी झाल्या ने त्रासही कमी होतो. मला हपिसातील जुन्या सामानात एक चांगले जाकीट सापडले होते. बापे लोक घालतात ते. ते पण मी धुवुन आणले व घालुन बसत असे तास भर ताप आलाकी. आता निवृत्तीला ते घेउन जावे असे वाटत आहे. असे नेहमी वाट्ते पण त्याची खरी गरज इथे आहे.

ह्याच्या जोडीस एक विचित्र प्रकारचे हाय बीपी पण होते. मला एका लोकेशन ला कामासा ठी जावे लागे तिथे बसोन काम करताना फार दडपण यायचे मनावर व लाइटही बरोबर नसायचा. काम नीट करून उठुन उभे राहिले की एकदम चक्कर, डोके दुखणे.. म्हणजे शुटिन्ग पेन. मग मी बाहेर चपला बूट घालायला एक बेंच ठेवतात तिथे दोन मिनिटे बसत असे. त्याने बरे वाट्त असे. ह्याचा पण मी शोध केला होता. आता विसरले ह्या बीपी चे नाव.

एखाद्या तापाचे निदान कर्करोगा पर्यंत जाउ शकते.
आपुले मरण पाहिले म्या डोळा... डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. यांचा नुकताच स्वानुभव असलेला अत्यंत बुद्धीप्रामाण्यवादी लेख जरुर वाचा. हा लेख अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात आला आहे.

आता विसरले ह्या बीपी चे नाव.
>>
डॉक्टरांकडे तब्येत दाखवायला जाण्याच्या धास्तीने जो रक्तदाब वाढतो त्याला white coat hypertension
असे म्हणतात.

धन्यवाद Dr
..>आपुले मरण पाहिले म्या डोळा>>>>>
बापरे ! खरं आहे

माहितीपूर्ण लेख.

त्यांचा कामाचा दिवस आणि विश्रांती/सुट्टीचा दिवस यांमध्ये देखील त्यांच्या शरीर तापमानात फरक पडलेला आढळला आहे.>>
नवीन नोकरीला लागल्यावर, गंमत म्हणजे मला सुटीच्या दिवशी ताप यायचा. त्यादिवशी ‘आपल्याला आज झोपून रहाणं परवडू शकेल..’ हेच बहुधा कारण असावं.

गंमत म्हणजे मला सुटीच्या दिवशी ताप यायचा. त्यादिवशी ‘आपल्याला आज झोपून रहाणं परवडू शकेल..’ हेच बहुधा कारण असावं.
>>>>>
आणि मला एकेकाळी रविवारी संध्याकाळी यायचा. दुसर्‍या दिवशीच्या कामाच्या टेंशनने.
दुपारी लंचच्या आसपासही यायचा. लंचनंतरच्या मिटींगच्या भितीने. जेव्हा त्यात होणार्‍या राड्याची जबाबदारी मला घ्यायची असायची.
थंडी भरून ताप यायचा. सोबत छातीवर दडपण यायचे. ज्यामुळे तापामागचे कारणही समजून जायचे.
मग मला जाणवले की आपण ज्या कामात एक्स्पर्ट आहोत वा जे मनापासून आवडते तेच करायला हवे.
न जमणारे वा न आवडणारे काम करीअर ग्रोथ म्हणून डोक्यावर ओढवून घेतले की उगाच लाईफमध्ये टेंशन वाढवून घेतो.
हे वाढीव टेंशन मी जवळपास सात-आठ महिने झेलले. मग एक मोठी सुट्टी घेत स्पष्ट नकार दिला.
एक तो दिवस आणि एक आजचा.. मजेत जगतोय. घेतलेल्या निर्णयाचा आनंदच आहे.

लेख नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण आणि छान हे वेगळे सांगायला नको.
प्रतिसादातील अनुभवही वाचायला आवडत आहेत. रिलेट होत आहेत.

धन्यवाद.
१. सुटीच्या दिवशी ताप यायचा. >>> अच्छा ! हे वेगळेच प्रकरण आहे.
...
२. प्रतिसादातील अनुभवही वाचायला आवडत आहेत. >>>अगदी +१११

लिहावे कि लिहू नये अशा द्विधा मनस्थितीत आहे.
डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांच्या प्रमाणे मलाही ताप येत होता. माझा प्रोब्लेम काय आहे ह्याची मला जाणीव होती. पण काही कारणाने मी कुणाशी बोलत नव्हतो ,ते कारण दूर झाल्यावर आणि तपासण्या केल्यावर मी ऑपरेशन करून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. ताप येतच होता. सर्जन मोठा ग्रेट माणूस होता. (नाव नाही लिहित त्यांचे). त्याला तापाचे कारण शोधून काढून मग ऑपरेशन करायचे होते. त्याच्याही सगळ्या चाचण्या झाल्या. पण कारण मिळालेच नाही. सर्व एमडी च्या मते स्ट्रेस हेच कारण असावे. मला मात्र सगळे समजूनही स्ट्रेस मुळीच नव्हता. हॉस्पिटलमध्ये मी मजेत टी-१० च्या मॅॅचेस (तेव्हा दुबईला चालू होत्या) आणि तारक मेहता बघत होतो. सर्जन आता थांबायला तयार नव्हता. त्याने सरळ ऑपरेशन करायचे ठरवले.
ऑपरेशन झाल्यावर तीन दिवसांनी छातीतून एक लिटर पाणी काढण्यात आले नि माझा ताप गायब झाला.
मी डॉक्टर नाही पण ताप कदाचित छातीतल्या पाण्याच्या इन्फेक्शन मुळे असावा.
छातीत पाणी का झाले? जाऊ द्या. ते सांगायचे म्हणजे सगळा किस्सा सांगायला पाहिजे. पण मग मनातली डॉक्तारांविषयीची मळमळ बाहेर पडेल. अर्थात डॉक्टरांनीच मला मृत्युच्या दरवाज्यात उभे केले आणि दुसऱ्या डॉक्टरांनी ओढून बाहेर काढले. चांगला डॉक्टर भेटायला पण नशीब लागते!
मूळ मुद्दा बाजूलाच राहिला. मानसिक स्थितीचा प्रकृतीवर परिणाम हो त्याचे नाते आहे. त्या बद्दलचा माझा अनुभव नंतर केव्हातरी लिहीन.

I have been there. माझ्या माहेरी घराच्या आसपास खूप झाडं झुडपे आहेत. वस्ती फार नाही. त्यामुळे साप, विंचू सर्रास बघायला मिळतात. असाच एके दिवशी एक मोठा साप ज्याला आमच्याकडे 'आदलं' म्हणतात, तो बागेतून बांधाला लागून फिरताना दिसला. म्हणजे आम्ही घरातून बघितला. मग आमची चाहूल लागून तो लगेच बांधावर चढून पलिकडे निघून गेला. तो कुठे गेला असेल हे बघायला मी आणि बाबा बाहेर गेलो. आणि एका बाजूला बांधा वरून डोकावून मी बाहेर बघायला आणि सापानेही त्याच क्षणी तिथूनच आत डोकावायला एकच गाठ पडली. भीतीचा करंट काय असतो हे तेव्हा कळलं. तरी नशीब तिथे फ्रीज न होता पटकन लांब पळायला सुचलं. रात्रभर तापाने फणफणत होते मी. तेवढी भीती आजतागायत पुन्हा वाटलेली नाही. पुन्हा तसला आचरटपणा करायलाही गेलेले नाही.

मानसिक ताणाने ibs,पाठदुखी होते हे माहीत आहे.तापाचे क्वचित ऐकले होते.परंतु इथे सविस्तर माहिती मिळाली.चरबीचे प्रकार नवीन होते.
Sympathetic चेतासंस्थेचे उद्दीपन होते... सिंपथेटीक डीस्ट्रोफीवर वेळ काढून लिहाल का?

चिन्मयी यांनी सांगितलेले एक परफेक्ट उदाहरण असावे, अशा तापाचे लहान मुलांच्या बाबतीत. अशा काही केसेस पाहिल्या लहानपणी.

त्यांच्या अनुभवाच्या अगदीच जवळ उदाहरण. आम्हीच दगड मारलेल्या सापाने फटीतून बाहेर येऊन काढलेला फणा, तो चांगलाच मोठा नाग होता. ती भीती आणि मग मुला मुलींनी तो नाग होता आता डूख धरणार म्हणुन नागाने मागोवा घेऊन कसा डंख केला याचे सांगितलेले ऐकीव किस्से.
माझा वर्गमित्र त्याने मग तापाने फणफणला, आठवडाभर शाळेला आला नव्हता. मला ताप नाही आला पण स्वप्न पडून घाबरून उठायचो.

मला सुद्धा आला होता असा ताप लहानपणी एकदा, तोही अशाच एका भीतीने.

प्रकाश घाटपांडे लेखाच्या लिंक बद्दल मनापासून धन्यवाद. ते डॉक्टर ठीक आहेत का.>>>> होय, ते फेस्बुकवर लिहिते आहेत

आपणा सर्वांना धन्यवाद !
मनमोकळेपणाने भरभरून अनुभव येत आहेत. आपण लिहीत असलेले अनुभव क्लेशदायक/ भीतीदायक आहेत. तरीही सर्वजण ते अतिशय चांगल्या पद्धतीने लिहीत आहेत याचा आनंद वाटतो.
…..
Sympathetic dystrophy>>>
चांगली सूचना आहे. सवडीने पाहू

छान विश्लेषण, डॉक्टर.
म्हणजे हा' ताप 'सायकोसोमॅटिक सदरात मोडतो का? अचानक कुठल्याही गोष्टीचा ताण आला, कि मला ताप नाही; पण जोरात शिंका येऊ लागतात काही वेळा.. माझा मलाच याचा शोध लागला आणि मग अशा वेळी तणावाचे नियोजन करण्यासाठी रस्तेही शोधून काढले गेले)
अवांतरः "ह्याच्यामुळे ताप झाला, त्याच्यामुळे ताप झाला " हे बोली भाषेत म्हणतात ते काही वेळा योग्यच असावं मग.. Happy

सर्वांना धन्यवाद !
...
ताप 'सायकोसोमॅटिक सदरात मोडतो का?
होय, बरोबर.
या तापाबाबत काही वैज्ञानिकांनी असहमती दर्शवलेली आहे. जंतूजन्य तापांच्या इतके या प्रकाराचे स्पष्टीकरण सरळसोट नाही.

Pages